मूव्ह अॉन!

Submitted by आशूडी on 8 October, 2015 - 08:14

आज पुन्हा एकदा विविधभारती जिंकलं. सहज म्हणून लावावं आणि नेमकं मनातलं गाणं लागावं असं माझ्या बाबतीत खूप वेळा होतं. विभा सुरु झालं आणि ‘मूव्ह ऑन!’ लागलं! ते ऐकताना मला जाणवलं की खरंच किती दिवसांपासून मला ते ऐकायचं होतं. एकदा ऐकून मन भरलं नाही म्हणून यू ट्यूबवर पुन्हा पुन्हा व्हिडीओही पाहिला. हा सिनेमा बघितला तेव्हाच बरंच काही लिहायचं होतं ते आठवलं. पण सिनेमाबद्दल इतरांनी लिहिलेलं वाचता वाचताच लिहायचं राहून गेलं.

आता पुन्हा मी ‘तनु वेडस मनू’ पहिला, दुसरा, कंगना राणावत बद्दल काहीही लिहिणार नाहीये. मला लिहायचंय ते ‘तनू’ बद्दल. हे गाणं बघताना मला दिसलेल्या तिच्याबद्दल. अनपेक्षितपणे आपला संसार मोडीत काढून माहेरी येऊन राहिलेली एक स्वतंत्र विचारांची ताठ मुलगी. लौकिकार्थाने तिला काही कमी नाही. सज्जन, सालस नवरा, श्रीमंत सासर, परदेशात राजा राणीचा टुमदार संसार. ना कुठल्या जबाबदार्या ना कसले लळेलोंबे. इतरांच्या दृष्टीने बघावं तर हिला काहीतरी अवदसाच आठवली असणार असं तडकाफडकी निघून यायला. काही काही दुखणी ‘दुखतं आहे’ हे समोरच्याला पटवता पटवताच एखाद्याचा जीव जावा इतकी मायावी असतात. स्वत: रोगीही बुचकळ्यात पडतो की च्यायला, आपल्याला खरंच काही होतंय की हे नुसतेच मनाचे खेळ? आपल्याला रिकामपणी भास तर होत नाहीत? मग तो स्वत:च स्वत:ची परीक्षा घेतो. नको असतानाही पास होत राहतो. पक्की खूणगाठ बसते की आपल्याला काहीतरी झालंय. आता आपल्या आजाराबद्दल इतरांना समजावत बसण्याइतकाही वेळ नाही राहिलाय. आलात तर तुमच्या बरोबर नाही आलात तर तुमच्याशिवाय! आपल्याला काय झालंय किंवा काय हवंय हे जर नीट समजलंय तर मग कशाला हवंय आणखी कुणी? मग सुरु होतो एक नवा प्रवास. बेपर्वाईचा!

ही बेपर्वाई रक्तासारखी अंगभर भिनवत तनू वावरत असते. ती हुशार आहे, जे म्हणेल ते करून दाखवण्याची तिच्यात धमक आहे. ती कुणावर कशाहीसाठी अवलंबून नाही. तिचं कुणावाचून काही अडत नाही. तिचा शब्द झेलायला कोण आजही तयार आहे हे ही ती ओळखून आहे. दुसर्यांनी तिच्याबद्दल जे कौतुक म्हणून बोलायला हवं ते सगळं ती आधीच जाणून आहे आणि त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हेही. आणि म्हणूनच तिच्या स्वतंत्र वृत्तीला हळूहळू माजाचा रंग चढायला लागतो. पण हा माज वागवत राहणंही सगळ्यांना जमतंच असं नाही. तनूला मात्र ते शोभून दिसतं. अगदी ‘बन्नो तेरा swagger लागे सेक्सी’! तंतोतत!

चिंटू जेव्हा तनूला म्हणतो, “क्या उदासी भरी है इन आंखोमें! कहां से लायी?” तेव्हा मला हसू येत नाही, तर हे वाक्य लिहिणाऱ्यासाठी टाळ्या वाजवाव्याशा वाटतात. एखाद्या नदीच्या तळाशी असलेल्या जिवंत झऱ्याला वरून बर्फाच्या पातळ पापुद्र्याने बंदिस्त करून टाकावे तशी संपूर्ण सिनेमाभर तनुच्या मनातले दु:खाचे कढ, सल ती डोळ्यातली जिवंत उदासी सीलबंद करून टाकते. चुकून हा पापुद्रा तडकला तर जे उद्रेक उसळत बाहेर येतील ते आपल्याला झेपणारे नाहीत इतकी जबरदस्त ताकद आहे त्या एकसंध उदासीत. त्या डोळ्यांकडे बघातानाच मनात येतं, ती उदासी म्हणजे मेलेली आशा नाही, मरगळलेली, बारगळलेली इच्छा नाही. जणू जीवावर बेतल्यावर एक खून माफ म्हणून कायम जवळ बाळगलेल्या लोडेड बंदुकीसारखी. तनू ती उदासी एखाद्या नंग्या तलवारीसारखी आपल्या डोळ्यात नाचवत सूडाच्या आगीत धगधगत राहते.

सूड कोणावर उगवायचाय पण? नवऱ्यावर? पण त्याचं जितकं वाईट करता येऊ शकणार होतं तेवढं करून झालं आहे. नशीबावर? त्याचा तर माज औरच. ते बेटं कुणालाच भीक घालत नाही. मग आता करायचं काय या धुमसत राहणाऱ्या ऊर्जेचं? स्वत:चा सत्यानाश का करून घ्यायचा? त्यापेक्षा वाट्टेल तसं वागू. आता आपल्याला कोणती बंधने नाहीत, कुणाची पर्वा नाही. हम तो अब रानी बन के राज करेंगे दुनिया पे! ती एकेक दागिने उतरवत बंधनांचे सूचक पाश तोडत जाते. हातात जमेल तेवढी ताकद एकवटून कपाळवरची नक्षी पुसून टाकते. पहिल्याच फटक्यात इतकी स्वच्छ की मागे पुसटशी खूणही राहू नये. सगळा लूकच बदलून ती पुन्हा तिच्या ‘जुन्या’ स्वत:ला शोधायला निघते. आपल्यावर पूर्वी फिदा असणारे आशिक आजही आपल्या एका नजरेने घायाळ होतात की नाहीत हे तिला आजामावायचे असते. स्वत:ला स्वत:साठीच सिद्ध करायचे असते. ज्याचा एवढा माज आपण करतोय ते आजही शिल्लक आहे हे चिंटूला दाखवून देण्यापेक्षाही स्वत:च खुंटा हलवून बळकट करणे तिच्यासाठी फार आवश्यक होऊन बसते. Because she wants to move on!

ओ रे पिया रे

घीस गये सारे दर्द भरे नग्मे..

या गाण्याचे शब्द एखाद्या वरातीत किंवा मिरवणूकीत मस्त नाच करताना उधळलेल्या दौलतजादा पैशांसारखे भिरभिरत तुमच्याभोवती पडत राहतात. या खाली पडलेल्या किंमती पैशाचं काय करायचं ते समजत नाही तोवर दुसरा कुणीतरी येऊन ते उचलून घेतो. तसं अंगावर येणारी एकेक ओळ लक्षात येत नाही तोवर नवीन उगवत राहते. या गाण्याचं दृष्य बघायला तर मला नेहमीच आवडतं. बारीक बारीक तपशीलांतून जी धमाल उडते ती गाणं ऐकतानाही समोर दिसत राहते. चिंटू ‘खूनी मंगलसूत्र’ नावाची भयकथा तितकीच घाबरून वाचत असताना तनू मात्र बेदम हसत असते! त्या पुस्तकाचे नाव, चिंटूचे हावभाव आणि हसून हसून तनूच्या डोळ्यात आलेलं पाणी एका क्षणात आपली दाद घेतात.

मागचं सगळं सोडून आता तनूला नवीन सुरुवात करायची आहे. मागचं सगळं तिला जादू झाल्यासारखं विसरून जायचं आहे. आणि तिकडे तो मनू तिच्या एका मेसेजसाठी झुरतो आहे. रेंज नसेल म्हणून जागा बदलून पाहतो आहे, मोबाईल स्वीच ऑफ, स्वीच ऑन करत राहतो आहे. त्याचं कशातच लक्ष नाही. सगळ्यांसोबत असून तो अगदी एकटा आहे. त्याचं दु:खं जगजाहीर आहे आणि तो त्याचं आणखी दुकान मांडून बसला आहे. त्याच्या आई वडिलांना, मित्राला ते अगदी स्वाभाविक वाटतं. ते त्याला त्याच्या दु:खातून बाहेर काढायची सर्व कर्तव्यं निभावतात. शेवटी त्याला त्यात मुरवत ठेवण्याचंसुद्धा! तनू मात्र काहीच न घडल्यासारखी आपल्याच मस्तीत जगते आहे. नवीन मित्रासोबत हिंडते आहे, शॉपिंग, दारू, नाचगाणी, हास्यविनोद सगळे छान सुरु आहे. आणि हेच तिच्या आई वडिलांना खटकतंय. दु:खं सेलिब्रेट करण्यासाठीसुद्धा आपल्याकडे विशिष्ट चालीरीती आहेत. त्याबाहेर तुम्ही गेलात की तुम्ही बंडखोर. हे दु:खंच नशा होऊन तुमच्यावर गारुड करतं. तनूला त्याची झिंग चढते.

फिरसे क्यूं कोई बेगाना ढून्ढे
फिरसे क्यूं एक अफसाना ढून्ढे
दिल दर बदर खुश रहता है
फिर कोई क्यूं ठिकाना ढून्ढे!!

आता फक्त मस्तीत राहायचं एवढा एकच अजेंडा. काय फरक पडतो? या ओळींमधून गीतकाराला जी बेफिकीर वृत्ती हवी आहे ती तनू तिच्या देहबोलीतून आपल्यापर्यंत शंभर टक्के पोचवते. आता नवीन काहीच नको कारण जेवढं काही करायचं होतं ते करून झालेलं आहे. त्यापेक्षा वेगळं काही घडणार नाही. आता फार काळ कुठे गुंतणं नकोच!

नया जहां हम जब भी बसाएंगे
कोई खुदा भी हम ढून्ढ के लाएंगे!

किती अस्थिर मानसिक अवस्था! वरच्याच ओळीत ‘मला कुणाची काय गरज, माझी मी समर्थ आहे. स्वतंत्र आहे. आणि आता मला कुणाशीच बांधील राहायचं नाही’ वगैरे गर्जना करत असतानाच मनाने दुसरीकडे ‘नया जहां’ बनवायचे इमलेही बांधायला घेतले! पुन्हा घरटं, पुन्हा बंध! आणि त्यातही कुणाशी तरी लीन व्हावं सगळा अभिमान, तोरा गळून पडावा, चुकांची कबूली द्यायला आणि क्षमा वसूल करून घ्यायला ‘नया खुदा’ देखील शोधून आणायची तयारी झालीसुध्दा!

अरेच्चा! असं कसं होउन चालेल? आपल्याला कुणीही नकोय ना? मग हे नया जहां, खुदा कुठून आले? ती पुन्हा सावरते. तो खंबीर झगा पुन्हा अंगावर चढवते आणि म्हणते –

जो मिला नही कोई उस काबिल

हम खुद ही खुदा फिर बन जाएंगे!

क्या बात है! एवढा दुर्दम्य आत्मविश्वास असलेली व्यक्ती जग जिंकू शकते यार! तिच्या खुदाची लायकीही तीच ठरवणार. आणि आपल्यासारखे लोक मात्र स्वत:ची लायकी सिद्ध करण्यात जन्म वाया घालवतो! इथेही तो पतंग काटण्याचा सीन अगदी चपखल बसवला आहे. सुरवातीला वाटतं की खुदा हा शब्द आला की लगेच आकाश कशाला दाखवायला हवं! पण वर जाऊन जेव्हा ती एक दोन प्रयत्नात पतंग काटते तेव्हा दोन सेकंद आधी आपण किती घिसापीटा विचार केला, दुसऱ्याला मोडीत काढायची घाई करून स्वत:च भंगारात निघालो अशी टपली बसते. तनू ये चीज ही कुछ गजब है.

या गाण्यात तनूचं सुंदर दिसणं खरंतर महत्त्वाचा भाग होता. कारण, पुन्हा जुन्या बिनधास्त तनूचं समोर येणं, तिच्या सौंदर्यावर फिदा झालेले तिचे जुने प्रेमी, सगळं माहीत असूनही तिच्याभोवती रुंजी घालणारा चिंटू या सगळ्याचा केंद्रबिंदू तिचा ‘अपीअरन्स’ किंवा तिचं दर्शन म्हणू हवंतर, पण हाच आहे. पण कंगनाच्या सौंदर्यापेक्षाही बाजी मारून जातो तो तिचा अटीटयूड! तो आत्मविश्वास, बिनधास्त देहबोली आणि तिचं गुंतागुंतीच्या व्यक्तिमत्वाचंच रूपक घेऊन आलेले ते घनदाट कुरळे केस! हात लावाल तर अडकून पडाल अशी एका नजरेतच धमकी देणारे! गाण्याच्या शेवटी जेव्हा त्या बेगानी शादी मी अब्दुल्ला दिवाना बनून जेव्हा तनू रस्त्यावर मन मानेल तसं नाचते तेव्हा तिच्या मनातल्या धुमसत्या असंतोषाला वाट मिळते. सगळ्या संतापाचा निचरा होतो. अपमान, अवहेलना, उपेक्षा, अपेक्षा सगळी ओझी दूरवर फेकली जातात. मन हलकं होतं. कदाचित तिला मनातून तेव्हा वाटतही असेल की आत्ता समोर मनू असता तर माझ्या अशा बेभान नाचण्याचं कारण त्याला नक्की माहित असतं! जेव्हा त्या वरातीतून ती बाहेर येते तेव्हा ती त्या वरातीइतक्याच बिनबुडाच्या मानसिक कोलाहलातून जात आहे हे स्पष्ट दिसतं. आता मनू तिच्यासमोर आला तर एका नजरेत जळून राख होईल असे पेटते अंगार आणि उदासीची ती नंगी तलवार डोळ्यात नाचवत तनू पुढे चालत राहते.

हे गाणं माझ्या ‘एनर्जी लिस्ट’ पैकी एक आहे. जेव्हा कधी फार हताश वाटतं, अप्रिय गोष्टी घडतात तेव्हा तेव्हा अशी गाणी मला बघायला ऐकायला आवडतात. शब्दांवर, सिनेमावर माझं नितांत प्रेम आहे. प्रत्येक गोष्टीचं उत्तर बाहेरून कधीच मिळत नसतं. पण पुस्तकं, सिनेमा यांच्यात तुमचे मूड बदलण्याची अफाट ताकद आहे. आणि या ताकदीला शरण जाताना मला कधीच कमीपणा वाटत नाही. तनूला मात्र या कशाची गरज वाटत नाही (म्हणून तर ती हिरोईन आहे आणि आपण प्रेक्षक!) या गाण्याने मनावरची मरगळ दूर जाण्यात मोठा वाटा सुनिधीच्या खड्या आवाजाचा आणि रॉकिंग म्युझिकचाही आहे. पुढे सिनेमा बरीच वळणं घेत गाडी स्टेशनात नेतो, पण माझ्यासाठी सिनेमा इथेच संपतो. मला तनू अशीच बघायला आवडेल कायम. बेपर्वा, बेफिकीर, बिनधास्त, स्वतंत्र, बंडखोर आणि खुदही खुदा बनलेली!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच सुंदर लिहिलेय.

चित्रपट इतका सुंदर असेल का माहित नाही. पहिला भाग पाहवला नहता, दुसरा बरा आहे असे ऐकुन आहे. मिळाला तर नक्कीछ पाहिन.

कंगनाने वर जे लिहिलेय ते जसेच्या तसे कॅरी केले असणार याची खात्री आहे. कधी कधी वाटते ती खरेच एक समर्थ अभिनेत्री आहे की हेच तिचेही वास्तव आहे?

भन्नाट लिहिलंयस. तो सगळा प्रसंग डोळ्यासमोर आला, आणि कंगनाचा बेपर्वा चेहरा. ते प्रसंग, लहानलहान घटना घडताना काय वाटलं ते मस्त उलगडून सांगितलं आहेस. आता दोन्ही पार्ट परत बघणं. Happy

छान लिहिलेस !दोन्ही पार्ट पाहिलेत. हे गाण मस्त आहे पार्ट २ मधल . तसच पार्ट १ मधल " कितने दफे दिलको कहा " हे ही गाण मस्तय .

वॉव!!! हे गाणं माझ्याही फेव्हरीट लिस्ट मधलं आहे. पण तुम्ही सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्या गाण्यात तनूचा पूर्ण चित्रपटच बंदिस्त (किंवा मुक्त म्हणेन) केलाय... मस्त लिहिलंय!!!

"मैं घनी बावरी हो गई" गाण्यात, नाचता नाचता अचानक डोळ्यांत आलेलं पाणी निखळून तनू कोसळणार की काय असं वाटतं, तिथे एक सायलेन्स आहे, आणि अचानक सगळं विसरून झटक्यात तनू पुन्हा त्याच बेपर्वाईने नाचायला सुरुवात करते...
तिचे ते बदललेले एक्सप्रेशन्स आणि तो सायलेन्स, सगळ्या हुल्लड करणार्‍या प्रेक्षकांना चित्रपटगृहात शांत करणारा होता Happy

पहिला पार्ट आवडला होता पण दुसरा सुरवातीपासूनच बोअर झाला त्यामुळे तू जितक्या आत्मियतेने लिहिलं आहेस तसा माझ्याकडून बघितला गेला नाही आणि कशाहीकडे लक्षही गेलं नाही. परत बघायला हवा असंही म्हणवत नाहीये.

मस्तं लिहिलय :).
मला सॉल्लिड आवडली पार्ट २ ची मनु !

पण कंगनाच्या सौंदर्यापेक्षाही बाजी मारून जातो तो तिचा अटीटयूड! तो आत्मविश्वास, बिनधास्त देहबोली आणि तिचं गुंतागुंतीच्या व्यक्तिमत्वाचंच रूपक घेऊन आलेले ते घनदाट कुरळे केस! हात लावाल तर अडकून पडाल अशी एका नजरेतच धमकी देणारे! गाण्याच्या शेवटी जेव्हा त्या बेगानी शादी मी अब्दुल्ला दिवाना बनून जेव्हा तनू रस्त्यावर मन मानेल तसं नाचते तेव्हा तिच्या मनातल्या धुमसत्या असंतोषाला वाट मिळते

अतिशय परफेक्ट वर्णन !
अ‍ॅटीट्युड , यस्स .. इथेच ती हजार पटींनी वेगळी आहे इतर प्लॅस्टीक डॉल्स पेक्षा.. फॅशन मधे सुध्दा बॅकस्टेज वाकडी तिकडी तोंड करत वाद घालत असते, रागाने सिगरेट विझवते पण जशी रँप वर पाउल टाकते, इट्स मॅजिक, किलर अ‍ॅटीट्युड !

छान लिहिलेय..पण
काही काही दुखणी ‘दुखतं आहे’ हे समोरच्याला पटवता पटवताच एखाद्याचा जीव जावा इतकी मायावी असतात.>> हे नक्की काय दुखणे आहे हे मला कळलेच नाही..
आणी खरच जर असे असेल तर मग ती त्याच नवर्याच्या प्रेमात कशी काय पडते?

Confusing character

खुप छान...काही काही दुखणी ‘दुखतं आहे’ हे समोरच्याला पटवता पटवताच एखाद्याचा जीव जावा इतकी मायावी असतात - खरय !

दुसरा पार्ट अजिबात convincing नव्हता फक्त कन्गना मुळे मी तो पाहिला, तनु जशी आहे अतरन्गी ..तशी या गाण्यात पुरेपुर उतरलिये.. पार्ट १ ची गाणि अर्थात जास्त आवड्लीत ...स्पेशली रन्गरेज मेरे.

लेख आवडला मस्त शब्दांकन.

पण सॉरी, तनू सेल्फिश आहे असं आणि असंच वाटत आलं पार्ट १ & २ दोन्ही पाहून.
चिंटू म्हणा का शेरगील, लोकांना वापरून आपल्यासाठी पायघड्या टाकून घेणं तिला उत्तम जमतं. पहिल्या भागात ती मनू ला मस्त वापरून घेते Sad
नवर्याला वेड्याच्या हॉ. मधे सोडून ती मजेत आपल्या जुन्या मित्रांना घेऊन फिरते... एकटेपणा प्रत्येक परदेशातल्या स्त्री ला जाणवत असेल, सर्वच काही अशा बेपर्वा होत नाहित. स्वतः मजेत भटकेल, पण मनू शास्त्रोक्त लग्न करायला निघाला, तर तो बेवफा..वगैरे Lol
ज्या आपल्या आप्तांबद्दल (नवरा, आई, बाप) सुद्धा बेपर्वा होऊ शकतात त्यांच्याबद्दल काडी ईतकीही आपुलकी वाटत नाही.

आशुडी, छान लिहीलंयस.

दोन्ही सिनेमे पाहीले नाहीत त्यामुळे त्याबद्दल काही लिहीता येणार नाही.

पण तुझ्या निरीक्षणशक्तीला दाद देते.

Lihila ahes sundar. Pan Tanu chya character sathi justifiable nahi vatla. Mulat te character itka vichar karun lihilay asa mala vatla nahi! Ya pexa part 2 madhli haryanvi kangana assal tari vatate.

Tuzya interpretation madhe 'tuzya vatnyacha' bhag ahe mhanun lekhan chan zalay Happy

आताच मायबोली उघडल आनि हे वाचल.दिन बन गया मेरा Happy
पण पुस्तकं, सिनेमा यांच्यात तुमचे मूड बदलण्याची अफाट ताकद आहे. आणि या ताकदीला शरण जाताना मला कधीच कमीपणा वाटत नाही>>>> + १००००
खुप मस्त लिहल आहेस. ___/\____

हे गाणं माझ्या ‘एनर्जी लिस्ट’ पैकी एक आहे........ +१ ... माझ्याही..
मस्त लिहिलंय .

मी जेव्हा गाण पाहिलं तेव्हा

"फिरसे क्यूं कोई बेगाना ढून्ढे
फिरसे क्यूं एक अफसाना ढून्ढे..."

या शब्दांचा अर्थ असा घेतला कि... जीवनाचा जोडीदार वगैरे भानगडीत पडून आपण एकदा आपटलो पण तरीही आता का पुन्हा त्याच शोधात निघालो आहोत? अस काहीस...

धन्यवाद सर्वांना! हे लिहीलेले वाचल्यावर तनू कुणाला आवडावी अशी अपेक्षा नाहीच. पण या गाण्यातून ती मला कशी दिसली, हे लिहायचा प्रयत्न केला आहे. चित्रपट न पाहिलेल्यांना उत्सुकता असेल तर फक्त या गाण्याचा व्हिडीओ पहा. Happy
प्रिती, हो सुरवातीला कॉपी पेस्ट झाले होते दोनदा, दुरूस्त केले. धन्यवाद.
साधना, कंगनाच्या खाजगी आयुष्याविषयी काही माहीत नाही पण ती एक उत्तम अभिनेत्री नक्कीच आहे.
डीजे, fashion चा तो सीन मस्ट वॉच पैकी आहे खरंच!

Pages