बाप्पा आणि व्हीआयपी !

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 September, 2015 - 17:57

गणपतीनिमित्त बरेच फिरणे झाले. बरेचसे गर्लफ्रेंडबरोबर जोडीने झाले. तिच्याच विभागातील एका गणपती दर्शनाचा किस्सा.

मी, ती आणि सोबत तिची कॉलनीतील एक मैत्रीण व मैत्रीणीची दोन मुले होती. त्यांच्या जवळच्याच वसाहतीतील गणपती असल्याने दोघाचौघांशी त्यांच्या ओळखीही होत्या. त्या दिवशी तिथे सत्यनारायणाची पूजा होती, मात्र तरीही गणपतीला तितकी गर्दी नव्हती. किंबहुना रांग अशी फारशी काही नव्हती. गणपतीच्या शेजारीच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेज उभारला होता. त्यावर लहान मुले नुसता धुडगूस घालत होती. गणेशोत्सवाचा खरा आनंद लुटत होती. मी देखील देवदर्शनाऐवजी त्या बालक्रिडा बघण्यातच रमलो. आमच्याबरोबरची मुलेही त्यांना सामील झाली.

ईतक्यात मंडळाच्या काही विघ्नसंतोषी लोकांनी त्यांना दमदाटी करत शांत राहायची सूचना केली. क्षणात तिथला रंग पलटला आणि आनंदावर विरजण पडल्यासारखी सारी मुले चिडीचूप झाली. काही घाबरून स्टेजवरून उतरली, तर काही जण पुढची सूचना मिळेपर्यंत तिथेच चुळबुळत राहिली. आमच्याबरोबरची मुलेही उदास चेहर्‍याने माघारी आली.

मला वाटले आता त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होणार असेल, पण तसे काही नव्हते. मागे वळून पाहिले तर कोणी मंत्रीणबाई देवदर्शनाला आल्या होत्या. आमदार होत्या की खासदार, की आपल्या साध्या नगरसेवक याची कल्पना नव्हती. कोणत्या पक्षाच्या होत्या ते देखील माहीत नव्हते. (मागाहून चौकशी करता समजले ती गोष्ट वेगळी). पण मंत्रीणबाईंचा थाट होता एवढे मात्र नक्की. पांढर्‍याशुभ्र गाडीतून उतरल्या, चार पॉलिटीकल युनिफॉर्ममधील माणसे आजूबाजुला, सोबत स्वताचा फोटोग्राफर. कुठे ते फोटो छापणार होते त्यांनाच ठाऊक. पण त्यांच्या खातिरदारीसाठी मंडळाची लगबग चालू होती. रांगेच्या नावावर जी काही दोनचार माणसे होती त्यांना तिथेच थांबवत मंत्रीणबाईंना पुढे जागा देण्यात आली. नेमके त्याचवेळी माझी गर्लफ्रेंड आणि तिची मैत्रीण दर्शन घेत होत्या. त्यातल्या त्यात एवढेच नशीब की त्यांचे दर्शन अर्ध्यावर थांबवायला लाऊन मंत्रीणबाईंना नाही घुसवले.

असो, माझे दर्शन बाकी होते. ते केलेच पाहिजे असे काही माझ्यासाठी गरजेचे नव्हते. बरेचदा मी लांबूनच पाया पडून घेतो. पण आज मात्र दुष्ट विचार मनात आला. मुद्दामच मंत्रीणबाईंच्या लवाजम्याला बाजूला सारत आमच्या फॅमिलीला जॉईन झालो. त्यांनी सोबत पेढे-हार वगैरे घेतल्याने, आणि गणपतीसोबत सत्यनारायणही असल्याने दर्शनासाठी किंचित वेळ लागत होता. तसेच मागाहून मंत्रीणबाई खोळंबल्या आहेत या दडपणाने धांदलही उडत होती. मी त्यांना सावकाशपणे सारे करायचा सल्ला दिला. सोबत स्वत:ही कधी नव्हे ते मंत्रपुष्पांजली म्हणावी तसे मनोभावे डोळे मिटून प्रार्थना करत आणखी वेळ कसा जाईल हे बघू लागलो.

डोळे मिटून मनातल्या मनात विचार करत होतो की नक्कीच पाठीमागे मंत्रीणबाई किंवा मंडळाच्या कार्यकर्त्यांची चरफड चालू असणार. तसेही मला मंडळाच्या वागणूकीचाच जास्त राग आलेला. आमचे उरकताच ते उतावीळपणे, चला या या मॅडम म्हणत झेपावले. आम्हाला बाहेर पडतानाही त्यांच्या गर्दीतून अंग चोरतच बाहेर पडावे लागले. सौजन्य नावाचा प्रकार दूरदूरपर्यंत नव्हता.

आम्हाला आता फारसे थांबायची गरज नव्हती, पण मला थांबून तो तमाशा पुर्ण बघायची इच्छा झाली. नाही म्हटले तरी त्या मंत्रीणबाईंसमोर आपल्याला दुय्यम लेखले गेल्याने अपमानाची भावनाही मनात उपजलेलीच.

बाईंचे दर्शन झाले आणि त्या पाहुणचार स्विकारायला पहिल्या रांगेतील एका खुर्चीवर जाऊना बसल्या. लगोलग एकादोघांनी त्यांना हारतुरे दिले. तसे ते स्विकारताना त्यांचा फोटो काढायचा म्हणून बाईंचा फोटोग्राफर सरसावला. पण डावीकडून त्याला गर्दीमुळे योग्य अ‍ॅंगल न मिळाल्याने तो पळतपळत उजवीकडे यायला निघाला. याच घिसाडघाईत माझ्या शेजारी उभ्या असलेल्या, दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाला त्याचा कॅमेरा आदळला. त्या माणसाच्या कडेवर एक लहान मुल होते. नशीबाने ते डाव्या बाजूला होते आणि कॅमेरा त्याच्या उजव्या खांद्यावर आदळला. तरी त्या धक्क्याने तो मुलासह हललाच आणि ते पाहून संतापाने माझ्या तोंडून निघाले... अबे चूऽऽ

संस्कार, सवय आणि प्रगल्भता या सर्वांची सरमिसळ झाल्याने माझे बरेचदा असे होते. राग आला की प्रतिक्षिप्त क्रियेसारखी शिवी बाहेर पडते पण पडता पडता अर्ध्यावरच रोखली जाते.

"दिखता नही क्या, ईतनी क्या जल्दी है" .. माझ्या या वाक्यासरशी त्याने पलटून खुन्नस दिली. पण माझ्याशी भांडत थांबायला त्याच्याकडे वेळ नव्हता. एकीकडे तो त्या मंत्रीणबाईंचा नोकर म्हणून लाचार होता. तर त्याच वेळी मंत्रीणबाईंच्या जीवावरच त्याने मला नजरेनेच राग दिला, की तू नंतर भेट मला, मग बघतो मी तुला.

असो, नंतर काही आमची भेट घडायची नव्हतीच. कारण त्या दिवशी मंत्रीणबाई जिथे जिथे जातील तिथे तिथे कॅमेरा घेत पळायची त्याची ड्यूटी ठरलेली होती. आणि घडला प्रकार पाहता मलाही तिथून लवकरात लवकर हलवणे माझ्या गर्लफ्रेंडने योग्य समजले.

पण पुढच्या गणपतीकडे जाता जाता बरेच विचार मनात आले. कोण कुठले हे गल्लीबोळातले नेते, जे संविधानानुसार केवळ लोकप्रतिनिधी असतात, मात्र तोरा असा असतो की जनतेचे मायबाप आहेत. बरं तसे असते तरी प्रश्न नव्हता, पण १० पैकी ९ निव्वळ भ्रष्ट असतात. त्यापैकी कित्येकांची आदर करावा अशी ना शैक्षणिक पातळी असते ना वैचारीक पातळी असते, ना नितीमत्ता त्यांच्या ठायी असते. तरीही सारे संकेत डावलून त्यांना अतिरीक्त मानसन्मान द्यायचा.. कोणी सांगितलेय..
ही स्थिती मुंबईसारख्या शहरात तर गावच्या ठिकाणी चित्र कदाचित आणखीन गडद असेल.. चापलूसीतून फोफावलेले हे वीआयपी कल्चर या देशात असेच चालू राहणार का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष,तुम्हि जे लिहीलेत ते सर्वत्र चालते ह्या व्हिआयपि कल्चर विरुध्द आवाज फक्त आप ह्या पार्टिने उठवला होता

सचिन पगारे
हो सगळीकडे चालते. माहीत अर्थात होतेच. फक्त जेव्हा स्वताला त्या प्रकारात अपमानित झाल्यासारखे वाटले तेव्हा ते जास्त सलले.

गणपतीच्या दर्शनासाठी 8-8 तास रांगेत एकेक मिनिट मोजत उभे राहणारे लोक आहेत. मी कधी नाही देवदर्शनासाठी एवढे कष्ट घेतले. पण आता समजतेय की जेव्हा अचानक म्हणजे रांगेतल्या लोकांना पूर्वकल्पना नसताना एखादा वीआयपी येतो आणि ती रांग तास अर्धातास खोळंबते तेव्हा त्या लोकांना किती चीड येत असेल.

तरीही काहीही आवाज न उठवता लोकं राहतात मुर्खासारखे रांगेत उभे. त्या लोकांचीही चीड येते मग.

नाही तेव्हा ही सामान्य माणसे ट्रेन लेट झाली की मोटरमनला पकडून मारतात, ट्रेनची मोडतोड करतात. पण इथे कितीही चीडचीड झाली तरी चरफडण्यापलीकडे काही करत नाहीत.

यावर एखादा कायदाच करायला हवा. तुम्ही एखादे मुख्यमंत्री वा प्रधानमंत्री असाल तर ठिक.. अन्यथा गल्लीतल्या नेत्यांना किंवा फिल्मस्टारच्या वेळेला का अवास्तव किंमत द्यायची जिथेतिथे..

आपने आवाज उठवलेला ऐकून माहीत आहे, पण पुढे ते सत्तेत आल्यावर कसे वागताहेत याची कल्पना नाही. ते सुद्धा बघायला हवे.

लालबागच्या राजाच्या द्वारी घडली एक दुर्दैवी घटना -

तासनतास रांगेत थांबूनही दर्शन मिळायची चिन्हे न दिसल्याने एका मुलीने वैतागून व्हीआयपी रांगेत शिरायचा प्रयत्न करताच तिला पोलिसांकडून मारहाण.

विडिओ सोशलसाईटवर वायरल झाल्याने आता याची कसून चौकशी होत आहे. यात पोलिसांचीही चुकी असू शकते. पण शेवटी ती देखील वर्दीआडची माणसेच, आणि या व्हीआयपींच्या बंदोबस्ताने ती देखील वैतागली असणारच, त्याचाच राग निघाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सविस्तर बातमी ईथे वाचा - http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/police-beaten-...

लालबागच्या राजाला काय गर्दी Sad
मी लहान होते तेव्हा तिथून जवळच रहात होतो आम्ही. आई-बाबा घेऊन जायचे तिकडे. अजिबात गर्दी नसायची.

तोफखाना, वाचला वरचा लेख, साधारण भिन्न विषय आहे. पुर्वजांच्या पुण्याईवर टिमक्या मिरवत जगणार्‍यांचा. पण येस्स, राजकारणात अशी धेंडे दिसतात. कर्तुत्व नसलेलीही लपतात, नव्हे त्यांना घराणेशाहीमुळे नेत्रुत्वही करावयास मिळते. जसे धिरुभाई अंबानी यांचा उद्योग त्यांच्या मुलांनी आपल्या कर्तुत्वावर पुढे नेला तसे कर्तुत्व राजकारणात न दाखवताही आयते बरेच काही मिळते. आणि मग अश्यांच्याही पाया पडाव्या लागतात.