मासिक भविष्य सप्टेंबर २०१५

Submitted by पशुपति on 31 August, 2015 - 13:02

राशिभविष्य सप्टेंबर २०१५

राशी भविष्य
सप्टेंबर २०१५
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी लग्न रास व जन्मरास अशी दोन्ही भविष्य वाचावीत व समन्वय साधावा .
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )
ह्या महिन्यातील ग्रहमान :
रवि सिंहेत १७ सप्टेंबर नंतर कन्येत,मंगळ कर्केत १६ सप्टेंबर पासून सिंहेत ,बुध कन्येत,गुरु सिंहेत ,शुक्र वक्री ६ सप्टेंबर पर्यंत कर्केत नंतर मार्गी होत आहे ,शनि वृश्चिक राशीत , राहू कन्येत ,केतू मीन राशीत.

मेष : या महिन्याच्या सुरवातीला चंद्र मेषेला, राशी स्वामी मंगळ चतुर्थात बुध षष्ठात आहे. हे ग्रह योग घर अगर फ्लॅट विकण्याच्या दृष्टीने उत्तम आहेत. कलाकारांना पण हा काळ छान आहे. आजोळच्या नातेवाईकांना भेटायचा योग येणार असे दिसते , त्या तयारीत राहा. द्वितीयेश शुक्र चतुर्थात व बुध षष्ठात आर्थिक लाभ मिळवून देतील असे वाटते. पंचमातील रवि, गुरु मुलांचा अभ्यास अगर शाळाप्रवेश समाधानकारक राहतील. काही मोठ्या मुलांना कदाचित जवळच्या शहरात हॉस्टलवर राहण्याचे योग आहेत. सप्तमेश शुक्र चतुर्थात, बुध षष्ठात, काही लोकांच्या बाबतीत घर अगर तत्सम गोष्टीत जोडीदाराशी चर्चा किंवा थोडा विसंवाद होण्याची शक्यता आहे. सतरा तारखेनंतर रवि कन्येत जात आहे. षष्ठात तीन ग्रह आल्यामुळे प्रकृतीची काळजी घ्यावी असे ग्रहयोग सुचवीत आहेत. अष्टमातील शनि व द्वाद्शातील केतू हेच सुचवीत आहेत. त्यातल्यात्यात पंचमातील गुरु हि जमे ची बाजू आहे. दशम व लाभ या दोन्ही भावांचा स्वामी शनि अष्टमात, नोकरी अगर व्यावसायिक त्रासदायक होईल असे वाटते. पण त्याबरोबर मंगळ चतुर्थात, बुध षष्ठात, तारीख सतरा नंतर रवि पण तिथेच हे योग आर्थिक घडामोडी थोड्याफार मनाप्रमाणे घडवून देतील असे पण वाटते. एकंदरीत हा महिना आर्थिक बाबतीत उत्तम आहे....

वृषभ : वृषभ राशीचा शुक्र तृतीयात वक्री आहे. त्यामुळे प्रवास विषयक बऱ्याच गोष्टी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. प्रकृति संबंधी फारसे काळजी करण्यासारखे काही नाही. द्वितीयेश बुध पंचमात, चंद्राच्या भ्रमणानुसार शेअर व्यसायीकांना बरेच चढ उताराला सामोरे जावे लागणार असे दिसत. तरी व्यवहार जपूनच करावेत. तृतीयात मंगळ, पंचमात बुध ज्योतिष अगर तत्सम विषयाचा अभ्यास करणाऱ्यांना काळ चांगला आहे. चतुर्थातील रवि, गुरु घरातील वातावरण समाधानी व आनंदी ठेवतील. मुलाबाळांचा अभ्यास व इतर गोष्टी व्यवस्थित चालतील. जोडीदाराशी थोडे फार वाद होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. नवमेश, दशमेश शनि सप्तमात, नोकरी करणारांनी वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल असे वाटते. सर्वसाधरणपणे हा महिना ठीक जाईल.

मिथुन : या राशीचा स्वामी बुध चतुर्थात स्वतःच्याच राशीत आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. तसेच प्रकृति पण छान राहील. द्वितीयात मंगळ, शुक्र व चंद्र लाभात महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आर्थिक प्राप्ती देणार असे ग्रह आहेत. तृतियात रवि, गुरु व दृष्टी नवमात. तुम्हाला एकंदरीत भरपूर उत्साह जाणवेल. शुक्र वक्री असला तरी थोडे फार प्रवास, नातलगांच्या भेटी इत्यादी नक्कीच होतील असे वाटते. पंचमेश शुक्र द्वितीयात व बुध चतुर्थात, अभ्यासाच्या बाबतीत उत्तम आहेत, पण वक्री शुक्राचा त्रास जाणवेल. बुध चतुर्थात असल्याने प्रेमिजनांनी सध्या काही काळ भेटी गाठी पुढे ढकलाव्यात असे वाटते. षष्ठेश मंगळ द्वितीयात मारक स्थानात, बुध चतुर्थात, शनि षष्ठात वयस्क मंडळींना दुखण्याचा थोडा फार त्रास होईल असे दिसते. सप्तमेश गुरु त्तृतियात, केतू दशमात व शनि षष्ठात जोडीदार (विशेष करून नवरे) कामानिमित्त लांब राहतील असे वाटते. एकंदरीत हा महिना तसा काही गोष्टी वगळता बऱ्यापैकी छान आहे.

कर्क : महिन्याच्या सुरुवातीला या राशीचा स्वामी चंद्र दशमात व मंगळ प्रथम स्थानी, दशमातून चंद्र-मंगळ लक्ष्मी योग करत आहेत. त्यामुळे काही लोकांना उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. प्रकृतीच्या दृष्टीने हा काळ उत्तम राहील. रवि महिन्याच्या मध्यापर्यंत द्वितीयातून तृतीयात जाईल. द्वितीयातील गुरु आणि दशमातील चंद्र हा योग देखील आर्थिक प्राप्तीसाठी उत्तम आहे. तृतीयात कन्येचा स्वराशीतील बुध, राहू तिथेच त्यामुळे १५ तारखेनंतर निश्चितच प्रवासाचे योग दिसत आहेत. पंचमेश मंगळ लग्नी व बुध तृतीयात त्यामुळे मुलांच्या अभ्यासाच्या दृष्टीने काळ चांगला आहे. शेअर ब्रोकर्सना हा काळ संमिश्र फळे देणारा आहे. ज्यांना मैदानी खेळाची आवड आहे, अश्या व्यक्तींना हा काळ मात्र फलदायी आहे. षष्ठेश गुरु द्वितीय स्थानी, केतू नवमात आणि शनि पंचमात हा योग बँकेतून कर्ज मिळवण्याच्या दृष्टीने थोडा त्रासदायक होईल असे वाटते. कर्ज वगळता इतर आर्थिक प्राप्तीसाठी मात्र उत्तम काळ आहे. सप्तमेश शनि पंचमात असल्याने जोडीदाराशी संबंध खेळीमेळीचे राहतील. दशमेश मंगळ प्रथमात आणि बुध तृतीयात ह्यामुळे ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल किंवा काहींना प्रमोशन पण मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा महिना कर्क राशीसाठी उत्तम आहे.

सिंह : सिंह राशीचा स्वामी रवि १६ सप्टेंबर पर्यंत तुमच्याच राशीत असून शुक्र द्वादश स्थानी वक्री आहे. त्यामुळे तुमची बरीचशी कामे रेगाळतील असे वाटते. मनाला उभारी राहणार नाही. १४ सप्टेबर नंतर मात्र परीस्थितित बदल घडेल व उत्साहवर्धक कार्यकाल सुरु होईल. १७ सप्टेंबरला रवि कन्या राशीत प्रवेश करील तेंव्हा थोडी फार आर्थिक मिळकत होईल, पण खर्चाचा वाटा देखील वाढतील असे दिसते. तेंव्हा व्यवहार जपून करावेत. त्रीतीयातील चंद्र काही लोकांना परदेशी जाण्याचा योग आणेल असे वाटते. ज्यांना नवीन घर बुक करायचे त्यांनी आत्ताच विचार करावा, नंतर बुध वक्री झाल्यावर लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मुला बाळांचा अभ्यास वगैरे सर्व व्यवस्थित आहे. घरगुती वातावरण नरम गरम राहील असे वाटते. दशमेश ७ तारखेनंतर मार्गी झाल्यावर नोकरी संदर्भात चांगली फळे देईल. एकंदरीत हा महिना संमिश्र आहे.

कन्या : कन्या राशीचा स्वामी बुध कन्येत असून राहू पण कन्येतच आहे . रवि १७ तारखेनंतर कान्येतच येत आहे त्यामुळे प्रकृती चांगली राहील . आर्थिक लाभ लांबणीवर पडण्याची शक्यता आहे .लेखक,प्रकाशक,तसेच IT ह्या क्षेत्रातील लोकांच्या दृष्टीने महिना चांगला आहे . कलाकार मंडळीना कला सादर करण्याच्या दृष्टीने चांगले योग आहेत .मुलांच्या दृष्टीने पण महिना चांगला आहे . शेयर्स चा व्यवसाय असणार्यांनी सावधतेने व्यवहार करावेत . जोडीदाराला प्रवास योग आहेत . सरकारी नोकरांना आर्थिक लाभ होतील . दशमेश बुध प्रथमात तसेच १७ तारखेनंतर रवि पण प्रथम भावात त्यामुळे सरकारी नोकरांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे . एकंदरीत महिना चांगला जाईल.

तूळ : प्रथमेश शुक्र दशमात ,रवि,मंगळ, गुरु लाभात त्यामुळे प्रकृती चांगली राहील .ह्या महिन्यात आर्थिक लाभ चांगले होतील . लेखक,प्रकाशक,तसेच IT ह्या क्षेत्रातील लोकांच्या दृष्टीने महिना चांगला आहे.नातेवाईकांच्या भेटी होतील .शेयर्स चा व्यवसाय असणार्यांना महिना थोडा लाभ मिळवून देईल. मुलांच्या दृष्टीने पण महिना चांगला आहे.नोकरी/व्यवासायानिमित्त परदेश प्रवास होईल. एकंदरीत हा महिंना आर्थिक लाभाच्या दृष्टीने उत्तम आहे.

वृश्चिक : प्रथमेश मंगळ नवमात व बुध लाभात असल्याने प्रकृती चांगली राहील. भावंडांच्या गाठीभेटी होतील ,दिवस छान जातील. कलाकारांच्या दृष्टीने उत्तम काळ आहे . बर्याच संधी चालून येतील.नोकरी/व्यवसाय करणाऱ्या लोकांना हा महिना कामाच्या दृष्टीने गडबडीचा राहील. जोडीदाराशी सबंध चांगले राह्तील .ज्या लोकांची पेन्शन ची कामे आहेत ती पण मार्गी लागतील .लाभेश व अष्टमेश बुध लाभात तसेच राहू पण लाभात आहे त्यामुळे एकंदरीत ह्या महिन्यात अनेक प्रकारचे लाभ होतील असे वाटते .

धनु : धनु राशीचा स्वामी गुरु सिंह राशीत नवम भावात आहे. केतू चतुर्थात गुरुच्याच राशीत आहे. प्रकृति संबधी काळजी नसावी. द्वितीयातील शनि खर्चाचे प्रमाण वाढत ठेवील किंवा प्राप्तीच्या संदर्भात असमाधान राहण्याची शक्यता आहे.तृतीयेश शनि बाराव्या स्थानात प्रवास घडेल असे वाटते. चतुर्थेश गुरु नवमात शनि बाराव्यात, काही मंडळींना घर बदलण्याचे योग पण आहेत. पंचमेश मंगळ अष्टमात, बुध दशमात मुलांचे प्रश्न समाधानकारक सुटतील. जोडीदाराबरोबर थोडीफार कुरबुरी होण्याची शक्यता आहे. दशमभावातील बुध, राहू नोकरीतील तुमचे स्थान बळकट ठेवण्यात मदत करतील. एकंदरीत हा महिना संमिश्र आहे असे वाटते.

मकर : मकर राशीचा स्वामी शनि लाभात त्यामुळे प्रकृती चांगली राहील . शनि द्वितीयेश पण आहे त्यामुळे आर्थिक लाभ होतील . बोलताना काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा मनस्ताप किंवा लोक दुखावली जाण्याची शक्यता आहे .विद्यार्थ्यांकरता काळ चांगला आहे . प्रेमात पडलेल्यांनी सबुरीने घ्यावे . शेयर्स चे व्यवहार जपून करावेत . शिक्षक किंवा पौराहित्य करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होतील. जोडीदाराशी किरकोळ वादाची शक्यता आहे . रवि व गुरु अष्टमात त्यामुळे जोडीदाराला आर्थिक लाभ होतील . उच्च शिक्षणाला काळ चांगला आहे . ऑफिस मध्ये मिळते जुळते घ्यावे लागेल . वाहने जपून चालवावीत . एकंदरीत हा महिना संमिश्र आहे .

कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि दशमात स्वतःच्याच नक्षत्रात असल्याने तुमच्या कडून प्रकृतीची काळजी दुय्यम ठरू शकते. कारण तुमचे व्यस्त कार्यक्रम. षष्ठातील मंगळ आणि अष्टमातील बुध हाच संदेश देत आहेत. द्वितीयेश गुरु सप्तमात, केतू द्वितीयात आणि शनि दशमात आर्थिक लाभ उत्तम देईल असे वाटते. पंचमेश बुध अष्टमात आणि राहू तिथेच शेअर व्यावसायिकांनी सावधगिरीने खरेदी विक्री करावी असा संदेश हे ग्रह देत आहेत. सप्तमातील रवी, गुरु जोडीदार बरोबर किरकोळ कुबुरी होण्याचे चिन्ह आहेत. दशम व लाभ हि दोन्ही स्थाने व्यावसायिकांच्या द्रिष्टीने चांगली फळे देतील असे ग्रहमान आहे. एकंदरीत हा महिना आर्थिक बाबतीत उत्तम आहे.

मीन : मीन राशीचा गुरु षष्ठात रवि पण तिथेच व केतू लग्नी हे ग्रहमान प्रकृतीला मारक असू शकतील, तेंव्हा काळजी घ्यावी लागेल. विशेषतः ज्यांना गॅसेसचा त्रास आहे व ब्लडप्रेशर पण आहे त्यांनी जास्त काळजी घ्यावी. द्वितीयेश मंगळ पंचमात व बुध सप्तमात आर्थिक बाबतीत खास नाही. पंचमातील मंगळ प्रकृतीत सुधारणा घडवून आणेल. पंचमातील शुक्र, मंगळ कलाकारांना चांगला आहे. कलेला व्यासपीठ मिळेल असे वाटते. जोडीदाराशी थोडीफार कुरबुरी होण्याचे चान्सेस आहेत असे वाटते. नवमातील शनि मीन राशीच्या लोकांना कुंभ मेळ्याचे पुण्य मिळवून देण्याचे चान्सेस बरेच आहेत. दशमेश गुरु षष्ठात, केतू लग्नात व शनि नवमात हे ग्रहमान कर्तृत्वापेक्षा भाग्याला अधिक महत्व देत आहे. त्यामुळे इतर संसारिक गोष्टीपेक्षा मानसिक समाधान, शांति मिळेल असे वाटते. एकंदरीत हा महिना संमिश्र आहे असे म्हणायला हरकत नाही.

वरील राशी भविष्य सुनिल देव व अनघा भदे (Astrology Counselling ) ह्यांनी लिहिले आहे .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks

अरे वा वा, मी तुमच्या मासिक भविष्याची आतुरतेने वाट बघत असतो. प्रत्येक महिन्यात मला आवडेल ती रास निवडतो. धन्यवाद.

धन्यवाद पशुपती. इतरांचे माहित नाही पण मला तुम्ही लिहिलेले अगदी १००% लागु पडते.

षष्ठेश गुरु द्वितीय स्थानी, केतू नवमात आणि शनि पंचमात हा योग बँकेतून कर्ज मिळवण्याच्या दृष्टीने थोडा त्रासदायक होईल असे वाटते.

जर कर्ज हवेच असेल तर हा महिना पार पडल्यानंतर प्रयत्न केलेले बरे?

टण्या,

पशुपति नित्यनेमाने ठराविक वेळी हा धागा प्रकाशित करतात. तुमच्या श्रद्धा, विश्वास (असलेले / नसलेले) हे घेऊन इथे येऊन त्यांची खिल्ली उडवणे भावले नाही.

चु भु द्या घ्या

इतरांचे माहित नाही पण मला तुम्ही लिहिलेले अगदी १००% लागु पडते>>+१ मला सुद्धा Happy

धन्यवाद पशुपतिजी!

बेफिकीर, सहमत.
अन असल्या आचरट प्रकारांमुळेच हे हिंदूंच्या (अंध?)धर्मश्रद्धा सुधरविण्याचा वा पुसुन नष्ट करण्याचा वसा घेतलेले (वसा घेणे = परत धर्म आलाच) "समाजसुधारक" लोकांची सहानुभूतीही गमावुन बसतात.
अर्थात हे देखिल खरे आहे की नियती, सटवाईने लिहीलेले "नशिब" कानफटीत मारल्याप्रमाणे बदलवुन टाकते, तेव्हा मग परत चांगले दिवस बघण्यासाठी बारा राशीही पुर्‍या पडत नाहीत हे लक्षात ठेवावे म्हणजे झाले.,असो.

कन्या, तुळ राशींच्या भविष्यात IT व्यावसायिकांचा उल्लेख आला आहे.

कोणत्या ग्रहाचे कारकत्व IT शी संबंधित असते या बद्दल काही माहिती देऊ शकाल का?

>>>> कोणत्या ग्रहाचे कारकत्व IT शी संबंधित असते या बद्दल काही माहिती देऊ शकाल का? <<<<
पशुपती सांगतीलच, माझे दोन आणे.
कलाकारी, ग्रंथ/कविता लेखन, आयटी अशा क्षेत्रात "तरल बुद्धिमत्ता" लागते, किंवा दुसर्‍या शब्दात बुद्धिमत्तेचा वापर अधिक कल्पनाशक्तिने, विविध आयाम लक्षात घेत, नियोजनासहित व एकाग्रतेने करावा लागतो. याकरता निव्वळ एकटा बुध उपयोगी नसुन त्याचे जोडीने अन्य ग्रह किती व कशी साथसंगत देतात यावर जातकाची एकुण बुद्धिमत्ता व ती वापरण्याचे क्षेत्र निश्चित होते.
(असलेली/वापरलेली बुद्धी, व आर्थिक यशस्विता यांचा अर्थाअर्थी दरवेळेस संबंध असतोच असे नाही - सबब हल्ली आर्थिक संपन्नतेवर एखाद्याच्या बुद्धिगत कर्तुत्वाचा/अक्कलेचा अंदाज घेतात व मोजमाप करुन मोकळे होतात तसे करु नये असे माझे मत ).
माझ्या अनुभवानुसार, रवि व नेपच्युन बुधाच्या शुभसंबंधात असतील तर आयटी बाबत उपयोगी ठरतात. काही प्रमाणात शुक्रही उपयोगी ठरतो.
तरीही आयटीमधेही अनेक विभाग आहेत, जसे की प्रोग्रॅमिंग/डेव्हलपिंग पासुन ते डाटासेंटर/कॉलसेंटर पर्यंत सर्व आयटीमधेच मोजले जाते. तर जिथे नविन निर्माण करायचे नाविन्यपूर्ण काम असेल, तिथे नेपच्यून, रवि इत्यादी दिसतील, तर जिथे तेच ते तेच ते व किचकट कंटाळवाणे हमाली काम असेल, तिथे चक्क शनिची साथसंगत दिसून येते. जर यांचे जोडीने रवि वा गुरु बलिष्ठ असेल, तर आयटी क्षेत्रातही निव्वळची "कारकुनी" करावी न लागता अधिकाराची जागा मिळून टीम हँडलिंग वगैरे जबाबदार्‍या मिळू शकतात.
मंगळ अधेमधे लुडबुड करीत असेल, तर मात्र व्यक्ति आयटी क्षेत्रातच काय, कुठेही "भांडखोर/आक्रमक" म्हणून प्रसिद्ध पावु शकते.

>>>> बुद्धिमत्तेचा वापर अधिक कल्पनाशक्तिने, विविध आयाम लक्षात घेत, नियोजनासहित व एकाग्रतेने करावा लागतो <<<< या वरील वाक्याच्या अर्थाचे विश्लेषण कसे करता येईल?
तर कल्पनाशक्ति हा निकष घेतला तर चंद्र शुभसंबंधीत हवाच, पण चंद्रराशी व चंद्राचे अन्य ग्रहांबरोबरचे योगही विचारात घ्यावे लागतील. विविध आयाम किंवा एखाद्या गोष्टीचे/घटनेचे विविध अंगांचे निव्वळ कल्पनाशक्तिवर समजुन घेण्याचे असेल, तर चंद्र, बुध व काही प्रमाणात रवि परिणामकारक हवे असतील.
नियोजनाकरताही, बुधाच्या जोडीने शिस्तशीर रवि, चिकाटीचा शनी हवा लागेल. तर नाविन्य पूर्ण कल्पना प्रत्यक्षात उतरवुन बघण्यासाठी बुधासोबत मंगळ असेल, तर कृती प्रत्यक्षात धाडसाने उतरेल.
शुक्र मात्र गडबड करु शकतो. एकाग्रतेच्या बाबतीत शुक्र निव्वळ आवडीच्या विषयात एकाग्रता देईल (नादिष्ट/छांदिष्टपणा किंवा मूडवर काम करणे), तर रवि/शनि विषय आवडो वा ना आवडो, कर्तव्य भावनेने एकाग्रता देतिल. अर्थातच, कुंडलित शुक्रही प्रधान बलिष्ठ असेल, तर व्यक्ति मुडी असेल, व मुड असेल तरच भव्यदिव्य कार्य करेल, अन्यथा आळसात बसेल, या उलट रवि/शनि प्रधान बलिष्ठ असतील तर मुड कसाही असो, परिस्थिती कशीही अनुकुल वा प्रतिकुल असो, व्यक्ति त्यावर मात करुन कार्यरत राहील.
मानसिक, बौद्धिक क्षमता असली, तरी शारिरीक क्षमता/धाडस/उत्साह/उमेद वगैरे बाबी नसतील तर काय उपयोग?? शिवाय जे काही कर्म करायचे ते सत्कृत्य/सदाचरणातुन व्हावे ही अपेक्षाही असावी ना? त्याकरता मंगळ व गुरु या ग्रहांचा विचार मी तरी करेन. यातिल गुरूचे पाठबळ नसेल, तर व्यक्ति अत्यंत बुद्धिमान असूनही तिची बुद्धी कूकर्म करण्यात खर्ची पडू शकते, तर गुरू चांगला असेल, तर तीच बुद्धी भरीव, परोपकारी निदान कुटुंबाचे कल्याण करणारी तरी होतेच होते. मंगळ व गुरु ग्रहांवरुन शारिरीक बैठक्/ताकद बघावी असे मला वाटते.
वरील विवेचन, खरे तर निव्वळ आयटी करता लागु नसुन, सर्वच क्षेत्रातील कार्यामधे लागू पडते असे माझे मत.
असो.
हे गंमतीमधे घ्या.... अधिक अभ्यासपूर्ण विवेचन जाणकारांकडून अपेक्षित.