आजी, गोष्ट सांग ना...

Submitted by पल्लवी अकोलकर on 15 August, 2015 - 14:59

"ए आज्जी गोष्ट सांग ना".
का?
काय गंमत आहे आजही या वाक्यात?
तर पूर्णपणे, अद्भूत अशा अविश्वसनीय, पण हव्या हव्याशा विश्वात नेणारं हे प्रकरण.
रात्री झोपतांना, आजीच्या मांडीवर डोकं ठेवून, ऐकल्या गेलेल्या गोष्टींना, आजही मनाच्या एका कोपर्‍यात, अढळ स्थान आहे.
शिरिष कणेकरांचे एक वाक्य आहे, आपल्याकडच्या दोन गोष्टी, पूर्णपणे ओरिजनली भारतीय आहेत.
१. रामायण
२. महाभारत
बरोबरच! माझ्या मते त्यांच्या या वाक्यावर, कुणाचेही दुमत नसेल.
तर, आज्जीच्या पोतडीतून निघालेल्या या रामायण महाभारताच्या गोष्टींत आम्ही आजही रमतो.
मग कौरव १०० च का होते?
ते एकमेकांची नावं कशी लक्षात ठेवत असतील?
त्यातील पहिल्या आणि शंभराव्या भावात, वयाचे नेमके किती अंतर असेल?
लक्ष्मण १४ वर्षे वनवासाला गेल्यानंतर, उर्मिलाने काय केलं?
असे मेंदूला ताण देणारे प्रश्न पडूनही, तेवढ्याच तन्मयतेने या गोष्टी ऐकत आलेलो आहोत.
”कोण्या एका गावात एक गरीब ब्राम्हण रहात असे...”
आज आठवल्यावर जाम हसू येतं, पण लहानपणी वाचल्या गेलेल्या पुस्तकांत, बर्‍याचदा कुठल्याही गोष्टीची सुरुवात याच वाक्याने का होई? हे अजुनही न उलगडलेले कोडं आहे.
हे असलं वाक्य वाचलं, तरी पुढे नक्की काहीतरी इंटरेस्टींग घडणार आहे याची खात्री असे.
किंवा,
”आटपाट नगरात, चित्रसेन नावाच्या राजाला २ राण्या होत्या, एक आवडती तर दुसरी नावडती." या वाक्यानेच, बर्‍याचदा राजे राण्यांच्या कथांना सुरुवात होई.
आणि मग, कसं शक्य आहे? असे कुठलेही प्रश्न मनात येवू न देता, अगदी झपाटल्यासारखे अशा गोष्टी वाचल्या जात.
अशा राजांची नावं चित्रसेन, बाहूबली, विचित्रसेन, किंवा विक्रमादित्य अशीच का असत? माहीत नाही.
मात्र,
गोष्टीच्या शेवटी, हुशारीने प्रश्न विचारणारा वेताळ, व त्याला बिनधास्तपणे, स्मशानातून खांद्यावर टाकून घेऊन जाणारा विक्रमादित्य राजा आणि, त्यांच्या क्रमश: चालणार्‍या गोष्टी आजही वाचायला आवडतात.
बाकी,
श्रावण बाळ, भक्त प्रल्हाद, साने गुरुजींचा शाम व त्याची थोर आई, गोरा कुंभार, हि हुकमीपणे, डोळ्यातून पाणी आणणारी मंडळी, मनावर खुप डिप इम्पॅक्ट करुन गेलेली आहेत.
जादूच्या कुठल्याही गोष्टींमध्ये, राक्षसाचे प्राण हे त्याच्या शरीरात नसून, एखाद्या पोपटात किंवा दिव्यात असत.
मग एखादा गरीब तरुण येवून त्या राक्षसाचा खातमा करी व राजा, त्याची सुंदर राजकन्या व अर्धे राज्य या तरुणाला देई.
आणि ”मग ते सुखाने नांदू लागले...” असा हेवा वाटणार्‍या, आणि छानसा शेवट असणार्‍या वाक्याच्या गोष्टी आपल्याला नेहमीच आवडून गेलेल्या आहेत.
अल्लाउद्दीन आणि जादूच्या दिव्याने तर कित्येक दिवस भारावून टाकले होते.
त्यातील, दिवा घासल्यानंतर हवेत तयार होणारा, व ”क्या हुक्म है मेरे आका”? विचारणारा जिनी आपल्यासमोर आल्यास, त्याच्याजवळ, नेमकी कोणती गोष्ट मागायची यावर मी अनेकदा विचार केला असेल.
त्याचबरोबर, घरातील मोठ्यांची अंगठी बोटात घालून आरशासमोर उभे रहायचे, व काहीतरी मंत्र म्हणून गायब होता येते का? हा शोध लावण्याचा प्रयत्न भरपूर वेळा करुन झालेला आहे.
किंवा,
घरातील चटईवर बसून काहीतरी मंत्र म्हणून, ती हवेत उडवण्याचा प्रयत्नही कित्येकदा आम्ही बहिण-भावांनी आमच्या लहानपणी केला असेल.
किंवा काही वेळेस,
एखादे रहस्यमय पुस्तक आधीच घाईघाईत वाचून, त्याचा सस्पेन्सवाला शेवट, मुद्दाम सगळ्यांना सांगून टाकून, कित्येकदा भांडणाचे कारण मी स्वत: बनलेले आहे.
४० चोरांना ठार मारुन, ”तिळा तिळा दार उघड..." म्हणून त्यांच्या गुहेतील खजिना घेवून जाणार्‍या अलिबाबाला, तुझ्याकडचं एक तरी सोन्याचं नाणं, मला थोडावेळ हातात तरी धरु देशील का? असं त्याला विचारावंसं वाटे.
सिंड्रेलासारखा ड्रेस व तिच्या सारखे ते काचेचे बूट, नेमके कोणत्या दुकानात मिळतील, याची चौकशी, माझ्या लहानपणी मी माझ्या आईला, कित्येक दुकानात करायला लावलेली आहे.
हिमगौरी आणि ७ बुटके कोणत्या जंगलात भेटतील याचा शोध मला घ्यावासा वाटे.
सावत्र आई म्हणजे काय?
अशा सुंदर मुलींची आई, नेहमी सावत्रच का असते?
आणि ती नेहमी दुष्ट व छळ करणारीच का असते?
असे प्रश्न बालपणी आमच्या मनाला अनेकदा पडत.
अकबर-बिरबलाच्या काळात आपण का नाही जन्मलो? असे त्या गोष्टी वाचतांना, मला आजही वाटते.
कसं सुचायचं बुवा बिरबलाला हे असं हजरजबाबीपणाने बोलणं?
मग त्या दोघांनी काय काय धम्माल केली असेल ना तेव्हा, असं आजही वाटून जातं.
चंपकवनातील, चिकू ससा, मिकू माकड, भोलू अस्वल, मिकू उंदीर नावाचे प्राणी तर माझ्या आजुबाजूलाच बागडत आहेत, असं चंपक वाचतांना वाटे, व मन प्रसन्न होई.
गुलाबी रंगाचा फेटा घातलेले चाचा चौधरी, त्यांची ती डोक्यावरुन पदर घेतलेली पत्नी नेहमीच आवडून गेलेली पात्रं आहेत.
भा. रा. भागवतांचा, फुरसूंगीचा फास्टर फेणे, त्याचा तो चौकडीचा शर्ट, तोंडाने ’टॉक्क’ आवाज करायची स्टाईल वाचून कितीतरी दिवस हा आवाज काढण्याचा सराव आम्ही केलेला आहे.
त्यानंतर वाचायला सुरुवात केलेल्या, कॉमिक्समधील महाबली वेताळ, त्याची गुहा, त्याचा तो जांभळ्या रंगाचा कॉस्च्युम, त्याचा डोळे झाकलेला चेहरा, त्याच्या बोटातील कवटीचे चिन्ह असलेली अंगठी वेड लावून गेली होती.
कोणाला ठोसा मारल्यानंतर खरंच कवटीचे चिन्ह गालावर उमटते का? असे प्रयोग घरातल्या घरात आम्ही भावंडांनी एकमेकांवर केलेले आहेत, व अर्थातच त्यावरुन आई बाबांचा ओरडा खाल्लेला आहे.
तर असे हे त्याकाळचे बालपणीचे, जादूई गोष्टींनी भारलेले जग.
त्याकाळी टि.व्ही. कॉम्पुटरचे पेव, विशेष फुटलेले नसल्याने, गोष्टींच्या पुस्तकांवर आम्हा वाचकांच्या नेहमीच उड्या पडत.
दिवाळी अंकांची आतुरतेने वाट पाहिली जाई.
पूर्ण वाचून झाल्यानंतरच, पुस्तक हातातून खाली ठेवण्याचे, व ते एकमेकांशी देवाण-घेवाण करतांना खटाटोप करण्याचे दिवस आजही आठवतात.
आजच्या पिढीतही हे प्रकार कमी प्रमाणात का होईना चालतात, मग ते बघून नकळतच नॉस्टॅलजिक व्हायला होते.©पल्लवी अकोलकर
https://www.facebook.com/PallaviAnecdotes?fref=nf

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानंच! चंपक चांदोबाच्या काळच्या आठवणी जागवल्याबद्दल आभार. इथे रमेश मुधोळकरांचा उल्लेख टाळू म्हणता टाळता येणार नाही. खूप वर्षं झाली आता त्यांची पुस्तकं वाचून. मी त्यांचा पंखा होतो तेव्हा...

मस्त!
गुलबकावली, राक्षसाचा जीव पोपटात.. काय काय मस्त कल्पना होत्या. गुलबक्षीचे फ़ुल पाहीले की हेच आठवते.
लहानपण देगा देवा... Happy

Happy