"प्रवासी...." ~ जी.ए.कुलकर्णी

Submitted by अशोक. on 29 July, 2015 - 01:30

"बेळगांव नावाच्या गावास....पावले जरी दूर भटकत गेली तरी तुझ्या जुन्या आठवणींची बुत्ती सतत जवळ राहिली आहे..." ~ ही आहे अर्पणपत्रिका "रमलखुणा" या पुस्तकाची....जी.ए.कुलकर्णी यांची. एक प्रवासी...शरीराने जरी खूप भटकंती केली नसली तरी (बेळगावहून १०० किलोमीटर दूर असलेल्या धारवाडमध्ये येऊन राहिले आणि तिथलेच झाले) मनाने आणि कर्नाटक युनिव्हर्सिटी येथील ग्रंथालयात बसून नॅशनल जिऑग्राफिक मॅगेझिनच्या वाचनाने सार्‍या जगाची सफर करत असत. त्यांच्यातील प्रवासी प्राचीन काळातील त्या रम्य आणि रोमहर्षक प्रांतांतून भटकण्यास सदैव उत्सुक असे. त्याना ग्रीक, रोमन, आफ्रिकन साम्राज्याच्या घडामोडीविषयी आकर्षण होते. कल्पनेने ते काबूल, कंदाहार, इस्पहान, समरकंद, मदिना आदी मिथकांनी भरलेल्या नगरीतील अगदी छोट्यामोठ्या गल्लीतून अभ्यासू नजरेने फिरत असत. त्यांच्यातील प्रवाशाला फक्त त्या स्वप्नील गावातील सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळेच पाहायची नसतात तर तेथील रहिवाशांच्या जगण्यामरण्याच्या व्याख्या कशा चित्रविचित्र रितीरिवाजांनी फुलल्या आहेत...त्यांची अंमलबजावणी करणारे शासक कसे आहेत. प्रशासनाचे धारदार शस्त्रांनी भरून गेलेले हात महत्त्वाचे की धर्मसत्ता राज्यसत्तेवर कुरघोडी करण्याची तयारी दाखवित आहे. दोन्हीतील छुपा आणि प्रसंगी उघड संघर्ष किती पराकोटीचा असू शकतो यानी तर प्राचीन इतिहासाची ग्रंथे भरभरून वाहत आहेत तर त्याच जोडीने या दोन अकाल महाकालामध्ये सर्वसामान्य नागरिक किती आणि कसा भरडला जातो याचाही जी.ए.कुलकर्णी अत्यंत कुतूहलाने अभ्यास करत आणि त्यातूनच मग "प्रवासी" आणि "इस्किलार" अशा कादंबरीच्या आवाक्याच्या दीर्घकथा त्यानी जन्माला घातल्या. दोन दीर्घ कथांचा हा संग्रह म्हणजे "रमलखुणा".
जी.ए.कुलकर्णी यांच्या कथाप्रवासाकडे एक अभ्यासक या नजेरेने आपण पाहात गेलो तर सर्वसाधारणपणे तीन टप्प्यात त्या कथासंग्रहांना ठेवता येईल. "निळासावळा....पारवा....हिरवे रावे...रक्तचंदन" असा सुरुवातीच्या काळातील प्रवास तर एकट्या "काजळमाया....पिंगळावेळ" यान दुसर्याा टप्प्यात ठेवता येईल आणि "रमलखुणा...सांजशकुन..." यांच्यासाठी तिसरा टप्पा असे स्थूलमानाने मानता येईल (अर्थात वाचकागणीक यात मतभेद असू शकतात हे मान्यच). या दोन संग्रहातील कथा आणि पात्रे आपल्याला नित्यनेमाने व्यावहारिक पातळीवर वा समोरासमोर भेटत नाहीत. "रमलखुणा" मधील दोन दीर्घकथांचे दोन्ही नायक....दुर्दैवी नशीब घेऊनच जन्माला आले आहेत...पराक्रमी आहेत, संकटांना बेडरपणे सामोरे जाऊन वाटेत येणार्‍या प्रत्येक विरोधी पावलाला ठेचायची क्षमता आहे त्यांच्यात, पडेल ते कष्ट करायची, संकटे झेलायची प्रवृत्ती आहे त्यांच्यात. संवादावरून ते सुसंस्कृतही आहेत...तरीही नियतीच्या खेळापुढे ते हतबल झाल्याने अंती अटळ अशा पराभवाला ते सामोरेही जातात (शरण जातात असे मी म्हणणार नाही...कारण ते भाग्य बदलण्याचे त्या दोघांनीही अथक असे प्रयत्न केल्याचे दाखले कथानक प्रवासातून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतेच). पराक्रमी तरीही पराभूत असले तरी वाचकांच्या मनी त्या दोघांबद्दल प्रेम आणि प्रेमच निर्माण करण्यात जी.एं.ची कथनशैली कमालीची यशस्वी झाली आहे.

याना रुपककथा म्हणावे की दृष्टांतकथा की लोककथा की मिथक की प्रवासवर्णन ?....याचे उत्तर ज्याने त्याने शोधायचे आहे. जी.एं.चा हा एक प्रवास आहे....त्या नायकाकडे पाहताना जाणीव होते की हा बराच भटकलेला जीव आहे. प्रवासाचा ढोबळ अर्थ एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पायी वा वाहनाच्या मदतीने जाणे वा परत घरी येणे. प्रवास या संकल्पनाचा बौद्धिक पातळीवरील विकास करत जी.एं.नी आपल्या नायकाना कल्पनेच्या गावी भटकभटक फिरविले आहे. त्यांच्या प्रचंड वाचनभूकेत "अरेबियन नाईट्स...गलिव्हर्स ट्रॅव्हल्स, डॉन क्विक्झोट, हेलेन ऑफ ट्रॉय, क्लिओपात्रा" अशा लोककथा दीर्घ स्वरूपी येत असल्याने आणि मुळातच या सार्‍या, कहाण्या वाळवंट, निळे आणि काळे आकाश सोबतीला गलबताच्या मदतीने करावा लागणारा समुद्र प्रवास यांच्याशी निगडित असल्याने जी.एं.ना त्याची भूल आणि ओढ असणे नैसर्गिकच. या वाचनाच्या जोरावरच अद्भुतरम्यतेच्या झुल्यावर त्यांच्या कल्पनाविलासातील नायक आपल्यासमोर अनुभवाची पोतडी उलगडतो...घेऊन जातो आपल्या बोटाला धरून...पानापानातून एका अशा विश्वात की तोच नव्हे तर आपण...एरव्हीचा एक वाचक...आता पुढे काय ? हा प्रश्न नायकाला विचारत राहतो...किंबहुना त्या कथानकाच्या गर्द डोहात उडीच घेतो....तो अनुभव म्हणजे "प्रवासी" आणि "इस्किलार" ह्या दोन कथा.....त्यापैकी आज मी तुमच्यासाठी "प्रवासी" घेऊन आलो आहे....मनोमनी इच्छा आहे की तुम्हालाही ह्या नायकाला सोबत करावीशी वाटेल. त्याच्या कपाळी जे काही लिहिले होते सटवाईने ते दूर करण्याची क्षमता आपल्याकडे नाही, किंबहुना "अल मख्तूब मख्तूब....जे लिहिले आहे ते लिहिले आहे..." या वचनावर विश्वास ठेवण्याची वाळवंटी शिकवण असल्याने आपण भागधेय जे आहे ते ज्याचे त्याला भोगावे लागणार आहे ही बाब मनी पक्की ठेऊनच कथानकाच्या मागेमागे जावे हेच बरे.

"रमलखुणा" ~ अरेबिकमध्ये 'रमल' म्हणजे वाळू...भविष्यवेत्ता वा ज्योतिषक वाळूवर बोटाने वा काडीने करीत असलेल्या खुणा किंवा रेषा...त्या अगम्य अशा आकृतीवरून समोर पृच्छा करणार्‍या व्यक्तीचे तो पुसटसे भविष्य वा कपाळी आलेले भोग सांगतो....हा रमलज्ञ. रमलात स्वच्छ झगझगीत काहीच सांगितले जात नाही....रेषांमधून दिसणार्‍या आकृतीतील संदिग्धता हाच मुख्य विशेष. काजळचित्रच एकप्रकारे....स्पष्टता नसल्याने नेमके आपल्या वाट्याला काय आले आहे हे जाणण्याची उत्सुकता कमालीची ताणली जाते....किंबहुना "सारे काही उघडपणे सांगितले जात नसल्यानेच" रमलज्ञाकडे येणारी गर्दी कधी आटलेली नसते. "इस्किलार" देवळातील नवी सेविका रमलाच्यापुढील भविष्य प्रखरतेने पाहात असल्याने भविष्य जाणून घेणारे कमीच झाले असे तेथील दासी सांगते. "ही आली आणि सारेच पालटले. तिच्यामुळे चित्रे अत्यंत स्वच्छ झाली. भयानकतेवर अस्पष्टपणाची छाया नाही, शद्बांना अनेकार्थांची माया नाही..." ~ असे जळजळीत चित्र सर्वसामान्य व्यक्तींना नको असते. पण या दोन दीर्घकथांतील नायकांना मात्र अशा चित्रांसमोर जाण्याची तीव्र इच्छा आहे....आणि त्यांचाच मागोवा घेण्याचे कार्य जी.ए.कुलकर्णी यानी अत्यंत समर्थपणे आपल्यासमोर ठेवले आहे.

दोन्ही कथांविषयी एकाच धाग्यात लिहिणे शक्यच नाही हे तर स्पष्टच असल्याने मी "प्रवासी" कथा निवडली आहे. "इस्किलार" ची माया सांगण्याचा प्रयत्न करतो इतपत म्हटले तरीही ते कार्य किती मोठे आहे याची जाणीव ज्यानी ती कथा वाचली आहे त्याना निश्चित पटेल. तरीही पुढे केव्हातरी त्या कथेचीही ओळख करून देणे मला फार आवडेल. "प्रवासी" कथा संपूर्णपणे सांगणे योग्य नाही. हा लेख वाचल्यावर कथा न वाचलेल्या सदस्यांनी "रमलखुणा" पुस्तक घेऊन त्या वाचनाला सुरुवात करावी असाही उद्देश्य असल्याने कथेची सुरुवात करून दिल्यानंतर प्रवासी अकाल आणि महाकाल या दोन शासकाच्या शापित नगरीत आल्यानंतर तेथून पुढे जे काही घडते त्याचे औत्सुक्य तुमच्या मनी राहाणे अत्यंत आवश्यक असल्याने नायकाने नगरीत प्रवेश केल्यानंतर मी थांबतो.

"प्रवासी"...विश्वाच्या या अफाट विराट पसार्‍यात मानवी जीवनाच्या ऐहिक आणि पारलौकिक सार्थकतेची प्रवासी या नायकाला चिंता नाही....[एक विशेष सांगितले पाहिजे....प्रवासी आणि इस्किलार या दोन्ही कथेत अनेक पात्रे आपापल्या नावानिशी वावरत असली तरीही विशेष म्हणजे दोन्ही दीर्घकथेतील नायकांना सर्वसामान्य असे नाव नाही....अन्यांना आहेत. त्यामुळे प्रवासी या नामानेच मुख्य पात्राला ओळखले जाते]....कथेतील नायकाला अनोख्या आणि समृद्धतेने भरून गेलेल्या ठिकाणी येऊन काही लोकशिक्षण घ्यायची इच्छा नाही...त्याला काहीतरी भव्यदिव्य संपत्तीने भरून गेलेले काहीतरी प्राप्त करायचे आहे...जीवन सुखात ठेवून लाल रंगाचे स्फटिकाप्रमाणे चमकणारे मद्य घशाखाली रिचवून परीसम रमणीच्या बाहुपाशात राहून त्याला आयुष्याची सज्जा सजवायची आहे. जंगले, पर्वत, दर्‍याखोर्‍यातील बिकट वाट, जंगली हिंस्त्र प्राण्यांशी मुकाबला करून, समयी अन्यांच्याविरोधात लढाई करत तो आता प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आला आहे. दुर्गम टेकडीवरील प्राचीन मंदिरातील रुद्रकालीच्या मूर्तीवर...देवीच्या कपाळावर जडवलेलं एक अमूल्य असे झगझगीत हिरवे रत्न मिळविणे हे त्याचे आयुष्यभराचे ध्येय आहे. नंतर ते विकून त्यातून मिळणार्‍या अफाट संपत्तीतून येणार्‍या सौख्याचा त्याला भोग घ्यायचा आहे. कथेच्या सुरुवातीस नावाड्याला घाई करून सूर्यास्तापूर्वी हा प्रवासी नदीच्या काठावर उतरतो, दोन्ही बाजूंनी गर्द झाडी आहेत...त्यामधून पायवाट काढत तो टेकडी चढून मंदिरात येतो. निर्जन आहे आजुबाजूला सारे. तरीही मंदिरात त्या समयी दोन समया तेवत आहेत, ते पाहून त्याला किंचित नवलही वाटते. पण आता तो ते सारे विचार बाजूला ठेवत आहे आणि अत्यंत अधीरपणे तब्बल पुरुषभर उंचीच्या अष्टभुजा आणि नृत्यमुद्रेत असलेल्या रुद्रकालीच्या कपाळावर रुतून बसलेले ते आकर्षक हिरव्या रंगाचे रत्न पाहतो...बधीरच होतो त्या सौंदर्याने....जणू काही आपला प्राणच आता हिरवा होऊन त्याचे रुपांतर या रत्नात झाले आहे असे त्याला वाटते आणि देवीची नजर चुकवून हातातील लोखंडी दांड्याने तिच्या मस्तकावर प्रहार करतो आणि ते झपदिशी हातात आलेले हिरवे रत्न प्राणपणाने घट्ट पकडून ठेवतो.

पण आता त्याला हर्षासोबत विलक्षण अशी भीतीही वाटू लागली आहे. मूर्तीवर लोखंडी दांड्याने प्रहार केल्यावर तिचे मस्तक फुटले आणि रत्न जरी निखळले असले तरी आता तेथील पोकळीतून एक लाल डोळ्यांचा सर्प बाहेर येत आहे. भीतीपोटी असेल वा अंगी निर्माण झालेल्या असहाय्य अशा संतापापोटी असेल, प्रवासी त्याच दांड्याने आता देवीच्या सर्पावरही त्वेषाने प्रहार करतो आणि त्याच भरात त्याचे तुकडेतुकडेही करून टाकतो. पण दुसरीकडे सर्पाच्या मृत्यूपाठोपाठ सभोवताली निसर्गाचा रुद्रावतार सुरू होतो. मंदिरात उत्पात घडतो, धरणीकंपाने देवतेची मूर्ती पूर्ण भंगते, बाहेर वादळ सुरू झाले आहे, विजेचा कडकडाट होऊन ते मंदिर पूर्णपणे कोसळते. ह्या कंपीत अवस्थेतही प्रवासी स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा यत्न तर करतोच पण त्याचजोडीने त्याच्या दृष्टीने आता प्राण बनलेले ते रत्नही मुठीत घट्ट धरून ठेवतो....हाताला आधार म्हणून दुसरा हात तिकडे नेताना त्याला जाणवते की आपला हात अगोदरच कुणीतरी तितकाच घट्ट धरून ठेवला आहे. विस्मयाने तो पाहतो तर एक धिप्पाड आकृती तिथे आली आहे. हा आहे दंडदूत. त्याने प्रवाशाला चोरी करताना पकडले आहे. म्हणून त्याला पकडून न्यायाधिशासमोर आणले जाते. दंडदूत प्रवाशाला बंधक बनवून न्यायप्रासादात घेऊन आला आहे. त्याला बाकावर बसवून दंडदूताने आता तिथे खुंटीवर अडकविलेली मखमली पायघोळ वस्त्रे घातली आहे आणि तोच आता न्यायाधीश बनला आहे. प्रवाशाने चोरी केली आहे हे दंडदूताने पाहिले असल्याने न्यायाधीश प्रवाशाच्या अपराधाबद्दल देहांताची शिक्षा सुनावतात. शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीश आसनावरून उठतात आणि वधकाची काळी वस्त्रे परिधान करतात...हातात तळपता परशू घेऊन प्रवाशाला समोर येण्यास सांगितले जाते कारण आता त्याचा शिरच्छेद होणार आहे. दंडदूत, न्यायाधीश, वधक या तिन्ही भूमिका एकाच व्यक्तीने करणे प्रवाशाला रानटीपणाचे वाटते. पण वधक त्याला आपले तत्वज्ञान सांगतो, "तू गुन्हा केला आहेस, दंडदूताने ते पाहिले आहे, रत्नचोरीची तू कबूलीही दिली आहेस. असे असताना तुझ्या एकट्यासाठी आता तीनतीन वेगळी माणसे कशासाठी ? तुझ्या अपराधासाठी तीन लोक नेमणे म्हणजे तू काही समाजावर उपकार केलेले नाहीस. शिरच्छेदासाठी तयार हो..." असे म्हणत वधक आपला परशू वर उचलतो. त्याचवेळी प्रवाशाला जाणवत राहते की आपला हात जरी पट्टीने मागे बांधलेला असला तरी आता ती वादी सैल झाली आहे, सुटत आहे. तो लगबगीने हालचाल करून ती सोडवितो आणि वर हात केलेल्या वधकाचे पाय ओढून त्याला खाली पाडतो आणि स्वतःच त्याचा वध करतो...झालेल्या घडामोडीमुळे तो आता खूप गडबडला आहे. एका पिशवीत ते हिरवे रत्न ठेवून ती कमरेला बांधून तसल्या अंधार्‍या रात्रीतच तिथून तो बाहेर पडतो आणि पुढील प्रवासाला लागतो.

रात्रीचा प्रवास, तोही घनदाट अशा जंगलातून करताना प्रवासी थकून जातो. अंधारात त्याला आता एके ठिकाणी अग्नी तेवत असल्याचे दिसल्यावर तिथे कुणी तरी असेल आणि आपल्या भुकेल्या पोटाला काहीतरी मिळेल या आशेने तिकडे खेचला जातो. जवळ गेल्यावर त्याची भूकच मरून जाते कारण तो जाळ म्हणजे पेटती चिता आहे आणि अत्यंत तटस्थपणे पत्नीच्या देहाला स्वाहा करण्यासाठी भडकलेल्या अग्नीकडे पाहात एक बैरागी बसला आहे. इतकेच नव्हे तर त्याच चितेवर तो पीठाचे गोळे भाजून खातही बसला आहे, ते पाहून प्रवाशाला अगदी उन्मळून येते. त्याची भूक मरतेच. आता रात्र दाट झाली असून पुढील प्रवास तशा स्थितीत करणे शक्यच नसल्याने प्रवाशाला नाईलाजास्तव सकाळपर्यंत त्या बैराग्याच्या सहवासात थांबणे भागच असते. विषयांतर आवश्यक असल्याने प्रवासी बैराग्याला सहज विचारतो, "तुम्ही फार हिंडला असाल. फार पाहिलं असेल नाही ?"....त्याला बैरागी उत्तर देतो, "दिसलं पुष्कळ, पण मला पाहता आलं नाही, घडलं पुष्कळ, पण जाणता आलं नाही, केलं पण फारसं उमगलं नाही. काही कण मात्र हाडात व्रणाप्रमाणे रुतले. सगळीकडे वेडाचे झटके येणारे तेच रक्त आहे, सगळ्यांची शेवटी तीच राख होते, सर्व स्त्रिया अंधारात सारख्याच असतात. पशू म्हणून पाहिल्यास माणूस सर्वात बुद्धिमान पशू आहे, परंतु दैवी अंश म्हणून बघितल्यास त्याच्यापेक्षा हीन, क्षुद्र जीव नाही...". बैराग्याचे त्याचे असे अनुभवातून आलेले वा त्याने निर्माण केलेले तत्त्वज्ञान प्रवाशाच्या डोक्यावरून जाते कारण जीवनाविषयीची त्याची आसक्ती कमालीची आहे आणि त्यासाठीच तो आपला जीव धोक्यात घालून ते रत्न मिळविता झाला आहे. इथून पुढे तो बैरागी प्रवाशाला सकाळ होईतोपर्यंत काही कथा सांगायला सुरुवात करतो. त्या कथा कोणत्या आणि त्यांची बैराग्याने केलेली मांडणी ही मूळातूनच वाचणे महत्त्वाचे ठरते.

नव्या बांधणीतील कथा तसेच बैराग्याचे तत्त्वज्ञान ऐकून प्रवासी सकाळनंतर आपले मार्गक्रमण पुढे चालू ठेवतो. काही वेळानंतर त्याला दूर अंतरावर असलेल्या एका गावाच्या खाणाखुणा दिसू लागतात. गावाच्या प्रवेशद्वाराच्या अगोदर त्याला एक जटाधारी भेटतो. तो प्रवाशाला आपली ओळख एक गीतकार, कवी अशी करून देतो. हा गावातील लोकांच्या सुखदु:खांना, भूतकाळातील करूण आठवणींना, भविष्यातील आशाआकांक्षा, स्वप्नं, जणू काही स्वतःच अनुभवून आपल्या कविताद्वारे त्यांची मांडणी करत असतो. इतकी प्रखरता गावकर्‍यांना सोसवत नसते. त्याना सुख वा दु:ख पाण्यावरून सुळकन सटकणार्‍या. माशाप्रमाणे हवे असते...तितकेच. जीवनाविषयीची गोडी कमी करून टाकणारे भविष्य लोकांना नको असते, पण जटाधार्‍याच्या वाणीतील प्रखरता सहन होत नसल्याने त्यानी त्याला गावातून बाहेर काढले आहे आणि रानात त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून दिली आहे. आता तो एकटाच आहे. त्या वाटेने येणार्‍या प्रवाशाला तो थांबवितो. प्रवासी आणि जटाधारी यांच्यातील संवाद जी.ए.कुलकर्णी आपल्याला जणू काही त्यांचीच जीवनदृष्टी, काव्याचे महत्त्व आणि प्रत्यक्ष जीवन यातली जादू उलगडून दाखवितात. प्रवाशाच्या सर्व शंकांची जटाधारी उत्तरे देतो. एक महत्त्वाचा विचारही बोलून दाखवितो, "प्रत्यक्ष म्हणजे अगदीच क्षुद्र गोष्ट आहे. समिधेची अग्नीशी जेवढा संबंध तेवढादेखील प्रत्यक्षाचा सत्याशी संबंध नसेल. मी आहे एक कवी, माझ्यापुरतेच बोलायचं झालं तर जे शक्य आहे ते सत्य आहेच...". आपला नायक या तर्काला विरोध करतो कारण बैरागी आणि हा जटाधारी यांचे विचार रखरखीत सत्यसृष्टीत जगणार्‍या प्रवाशाच्या पचनी पडत नाहीत. श्रेयसप्राप्तीची त्याला आस आहे...ते त्याचे साध्य आहे आणि त्याच्यासाठी करावी लागणारी साधना जीव पणाला लावून तो करीत आहे. जीवनसत्याची मांडणी ऐकून तसेच जटाधार्‍याने तेथील झुडुपात अडकून पडलेले आणि भूकेने तळमळत असलेले कुत्र्याचे एक पिलू त्याच्या दोरीसह घेऊन प्रवासी आपल्या पुढील वाटचालीसाठी निघतो. यानंतर प्रवाशाला भेटतो तो एक शिकारी...जो आंधळा आहे. आपल्या कौशल्याने तो अचूक शब्दवेधाने सुरीच्या साहाय्याने शिकार करीत आहे. प्रवासी आणि शिकारी हा भाग एका स्वतंत्र कथेचाच विषय आहे. त्या शिकार्‍याच्या महालात अडकलेला प्रवासी आपली कशी सुटका करून घेतो हे वाचणे फार रोमहर्षक आहे. दंडदूत, न्यायाधीश, वधक, पत्नीच्या चितेसमोर बसलेला बैरागी, प्रखर काव्य करणारा जटाधारी, आंधळा शिकारी हे प्रवाशासोबत बौद्धिक वादविवाद करून जीवनसत्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करताना दिसतात....शिकार्‍याला तर पराभवामुळे जीवनभर जपलेले वा निर्माण केलेले तत्त्वज्ञान सर्वस्वी चुकले याची जाणीव होते...नैराश्येने तो फाटून जातो अगदी.....हा भाग विलक्षण प्रभावी उतरला आहे कथेत.

इथे संपतो कथेचा पूर्वार्ध.... शिकार्‍याच्या कांडातून सुटका मिळालेला प्रवासी पुढे निघतो आणि इथपासून सुरू होतो या दीर्घकथेचा उत्तरार्ध. यापुढे कथानक लोककथेच्या शैलीत उतरले आहे. नायक एका शापित म्हटल्या जाणार्‍या नगरीत आला आहे. गावावर अंगावर येईल अशी शोककळा पसरली आहे...सारे काही थंड, प्रेतवत झाले आहे. लोक आहेत पण भयभीत अवस्थेत आपला चिमूटभर बिनकिमतीचा जीव जपत...आपापल्या घराची दारे घट्ट बंद करून आत गुडूप पडून आहेत. काळोखातच आहे सारे विश्व. प्रवाशाला भूक लागली आहे तहान आहे. पण कुणीही त्याला दार उघडून या आत असे म्हणत नाही. कित्येक घरांच्या दारावर हा थाप मारतो, पण दार निर्दयी असल्याप्रमाणे उघडले जात नाही. बिनआतड्याचे हे असले मेलेले गाव पाहून संतापून प्रवासी आल्या मार्गाने परत जायला निघतो तर प्रवेशद्वार आपोआप बंद झाले आहे...त्याला या गावाखेरीज आता कुठलाच रस्ता नाही. शाप आहे गावाला असे तेथील एक वृद्ध प्रवाशाला त्यातूनही सांगतो...महाकाल आणि अकाल या दोन शासकांनी हे गाव आपल्या रेट्याखाली ठेवले आहे. रात्री वेशीतून कुणीही आत येऊ शकतो पण कुणालाही येथून बाहेर पडता येत नाही. बाहेरून आलेला परदेशी सूर्योदयापलीकडे जिवंत राहू शकत नाही. लाल राक्षस मनोर्‍यावरून खाली उतरतो व नव्या प्रवाशाचा शिरच्छेद करतो. त्यामुळे आपल्या नायकापुढे आता उपाशीपोटी मरायचे की शिरच्छेद होऊन प्राण सोडायचे एवढाच विकल्प उरला आहे.....

....प्रवासी समोर येणार्‍या घटनांना सामना करण्यास तयार झाला आहे. इथून पुढे काय होईल वा होते....याचे प्रत्यक्ष वाचन तुम्ही सदस्यांनी "रमलखुणा" तून करावे अशी मी विनंती करीत आहे....

अनुभवाचे अनेक पदर वाट्याला आल्यानंतर ज्ञानप्राप्ती होते असे म्हटले जाते. प्रवाशाच्या भाग्यात जे काही येते ते पाहून खुद्द तोही संभ्रमीत होऊन जातो....त्याला वाटते, "इतरांचे प्रवास संपतात, रस्ता राहतो....माझ्याबाबतीत रस्ता संपला आहे....प्रवास मात्र चालूच राहाणार आहे...." ~ हे सारे विलक्षण आहे...जी.ए.कुलकर्णी यांची जादू.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. एकेकाळी पारायणे केली आहेत. जस्ट सर्व बाजू व भाषा नीट समजून घ्यायला. व रसग्रहण करायला. इस्किलार पण छान आहे अशीच. पण विषण्ण करतात दोन्ही कथा.

प्रवासी कथा जबरदस्त आहे. एस्किलार पण चांगली आहे. अशीच काजळ माया मधली गुलाम पण चांगली आहे.
जी ए ना तुलनाच नाही.

अमा आणि mi_anu ~

धन्यवाद....खरे तर "इस्किलार" सुद्धा डोक्यात अगदी रुतून बसली आहे....पण प्रचंड आवाका आहे त्या कथानकाचा. त्यावर लिहिणे मनात आहेच आहे....पण सारे काही एकाच लेखात (क्रमशः नको वाटते म्हणून...) बसविणे किती कठीण काम होऊ शकेल, तेही नव्या वाचकामधील कथेची गोडी कमी न होईल हेही पाहावे लागतेच, हे तुम्ही जाणताच.

तरीही कधीतरी "इस्किलार" आणि "विदूषक" याना घेऊन येतो...इतकेच आता सांगू शकतो.

खुप दिवसांनी तुम्ही काहीतरी लिहिलंत, त्याबद्दल आधी आभार Happy

चांगला झालाय लेख. कथा कोळून पिऊन आमच्यासाठी सार पोचवल्यागत वाटलं.
मी दोन्ही कथा वाचलेल्या नाहीत, किंबहुना जी. ए. च कमी वाचलेत. त्यामुळे मला एक आयता दृष्टिकोन मिळाला त्या कथांसाठी. वाचलेली नसली तरी कथेतली वातावरणनिर्मिती, तपशील तुम्ही खुप प्रभावीपणे उलगडून दाखवले आहेत, ते जाणवतंय.

कृपया नियमीत लिहीत रहा. आमच्यासाठी जरुरी आहे.

अल मख्तुब मख्तुब त्या गुलाम मधलेच आहे.

जालीय लेखन आणि खरे प्रतिभाशाली लेखन ह्यातला फरक कळायचा असेल तर अशी पुस्तके नक्की वाचावी. ह्या लोकांची जीवनतपस्या असते तिचे सार ते लिहीतात. म्हणून ते इतके प्रभावी बनते.

होय अमा...."गुलाम" मध्येही त्या नायकाचा असाच काहीसा शोध चालू आहे....भरकटत चालला आहे तोही. वाळवंटातील त्या बोलाचालीत त्याच्या कानावर तो पुकार पडत जातो..."अल मख्तूब मख्तूब...". मी वर उल्लेख केल्याप्रमाणे जी.एं.च्या दुसर्‍या टप्प्यातील ज्या कथा आहेत त्यात "गुलाम, रत्न, दूत, प्रवासी, यात्रिक, इस्किलार, विदूषक" अशांची वर्णी लागते...नियतीशी मुकाबला आहे हा सारा....कल्पनासाम्राज्यात बांधण्यात आलेला हा पट, आपल्याला स्तिमित करून टाकायला सज्ज असलेला.

हे असे लेख वाचले की मायबोलीवर येणं सार्थकी लागतं आणि याचबरोबर माझं मराठी वाचन किती मर्यादित आहे याचीही मला जाणीव होते. जी. ए. कुलकर्णी यांचे हेच काय पण कुठलेच सहित्य मी आतापर्यंत कधीही वाचले नव्हते. पण तुम्ही हे केलेलं समीक्षण इतकं जबरदस्त आहे की हे पुस्तक वाचणे माझ्यासाठी आता मस्ट झाले आहे.

लेखक उत्तमोत्तम साहित्य लिहितात. पण माझ्यासारखे असे बरेच लोक असतात ज्यांना चांगलं वाचायची आवड तर असते पण नेमकं काय वाचावं याचीच माहिती नसते. त्यामुळे पार गोंधळून जायला होतं. पण नेमके अशाच वेळी ही अशी उत्कृष्ठ पुस्तक समीक्षणं, पुस्तक-ओळखी आमच्यासाठी एका हुशार वाटाड्याचे, कुशल सारथ्याचे काम करतात.
या कथेची, पुस्तकाची इतकी छान ओळख करून दिल्याबदद्ल तुमचे खूप खूप आभार.

खुप छान ओळख.. नकळत्या वयात वाचली होती ही. त्यावेळी माझ्या प्रवासाला सुरवातही झाली नव्हती, आता कदाचित नव्याने समजून घ्यायचा प्रयत्न करता येईल.

रमल प्रमाणेच अरब जगतात कॉफीच्या कपातील उरलेल्या कॉफीच्या खुणांवरुनही असेच भविष्यकथन करतात. तेही असेच गूढ असते.

<< हे असे लेख वाचले की मायबोलीवर येणं सार्थकी लागतं >> + १

जी. ए. एक अतिशय वेगळे रसायन होते..
काजळ- माया वाचून मनावर आलेले मळभ अजुन विसरले जात नाही...

मामा, खुपखुप लिहा....

अशोकराव जेव्हा जीएंवर लिहितात तेव्हा त्यांच्या लिखाणात एक वेगळ्या प्रकारची आत्मियता नेहेमी दिसते. कारण ते जीएंना प्रत्यक्ष भेटले आहेत. जीएंचा प्रत्यक्ष सहवास लाभलेल्या आणि त्यांच्याशी वारंवार गप्पा मारण्याचा योग आलेल्या अशोकरावांचे जीएंबद्दलचे लिखाण मननीय होणारच. यावेळी त्यांनी शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले आहे. कारण रमलखुणा म्हणजे शिवधनुष्यच.

"प्रशासनाचे धारदार शस्त्रांनी भरून गेलेले हात महत्त्वाचे की धर्मसत्ता राज्यसत्तेवर कुरघोडी करण्याची तयारी दाखवित आहे. दोन्हीतील छुपा आणि प्रसंगी उघड संघर्ष किती पराकोटीचा असू शकतो यानी तर प्राचीन इतिहासाची ग्रंथे भरभरून वाहत आहेत तर त्याच जोडीने या दोन अकाल महाकालामध्ये सर्वसामान्य नागरिक किती आणि कसा भरडला जातो याचाही जी.ए.कुलकर्णी अत्यंत कुतूहलाने अभ्यास करत आणि त्यातूनच मग "प्रवासी" आणि "इस्किलार" अशा कादंबरीच्या आवाक्याच्या दीर्घकथा त्यानी जन्माला घातल्या. " ही वाक्ये वाचल्यावर अशोकराव काही नवीन शक्यता उलगडुन दाखवत आहेत असे वाटु लागले. पण त्यांनी यावर लेखात तपशीलाने लिहिले नाही. मात्र मला पुढच्या लेखात या वाटेवर अशोकराव काय विचार करताहेत हे वाचायला आवडेल. मी हा लेख रमलखुणा भाग १ असाच घेतला आहे. वर दिलेली काही वाक्ये अशोकरावांना खुप काही नवीन सांगायचे आहे हे दाखवणारी आहेत. पुढच्या लेखात त्यांनी धरलेली ही वाट आमच्यासारख्यांना तपशीलाने उलगडुन दाखवावी अशी माझी त्यांना विनंती आहे.

जीएंचा गजर कुठेही चालला असताना मी देखिल टाळ वाजवतोच. शिवाय जीए आणि अशोकराव ही दोन्ही स्थाने आदराची असल्याने आपले मत मांडुन दोघांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते.

रमलखुणा हे तिसर्‍या टप्प्यातील पुस्तक आहे या अशोकरावांच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. सुनिताबाईंना लिहिलेल्या पत्रात एका ठिकाणी जीए लेखक म्हणुन व्यक्तीच्या होत जाणार्‍या विकासाबद्दल चर्चा करतात. त्यात ते म्हणतात सुरुवातीला गोष्टी, त्यानंतर त्यातील व्यक्तीरेखांना खुणा किंवा चिन्हांचे स्वरुप येणे हे त्यांना प्रगल्भतेचे लक्षण वाटत असे. असे गणितात रामाकडे पाच आंबे आहेत हे लहानपणी शिकल्यावर पुढे अ+ ब= क अशा खुणा वापरुन माणसे पुढे जातात. तद्वतच कथेची वाढ व्हावी असे जीएंचे मत होते. त्यामुळे गुढवादातील यंत्र या गोष्टीचादेखिल त्यांनी उल्लेख केला आहे. सगुणा नंतर अटळपणे येणारे निर्गुण. त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर जीएंच्या कथेचा हा विकास झाला आहे हे लक्षात घ्यायला हवे. म्हणुनच नायकांना नाव नाही. सांजशकुनचेही तेच. ज्याला अ‍ॅबस्ट्रॅक्ट म्हणता येईल या पातळीवर "रमलखुणा" आणि "सांजशकुन" ही पुस्तके लिहिली गेलीत असे मला वाटते.

दुसरे महत्त्वाचे हे कि रमलखुणा काय किंवा सांजशकुन काय ही वाचकाकडुन काही "पात्रतेची" मागणी करतात असे माझे स्पष्ट मत आहे. ज्यांनी जीएंची आधीचे लिखाण वाचले नाही, ज्यांना भारतीय अध्यात्माच्या काही परंपरा माहित नाहीत त्यांना ही दोन्ही पुस्तके कितपत कळतील आणि रुचतील याची मला शंका वाटते. तपशीलाने लिहायला वेळ नाही पण एक उदाहरण देऊन माझे लिखाण थांबवतो.

ज्या बैराग्याच्या प्रसंगाचा उल्लेख अशोकरावांनी केला आहे त्यात तो प्रवाशाला आपल्या हाडात रुतलेल्या ज्ञानाचे काही कण देतो. सगळीकडे वेडाचे झटके येणारे तेच रक्त आहे, अंधारात सर्व स्त्रीया सारख्याच असतात्.....पण प्रवाशाला त्यात रस वाटत नाही. त्याचा स्वतःचा एक जीवनमार्ग आहे. त्याला जीवनाचा पूर्ण उपभोग हवा आहे. अंधारात सर्व स्त्रिया सारख्याच असतील पण प्रत्येक भोगक्षण अद्वितीय असतो हे आपले मत तो बैराग्याला सांगतो. तेव्हा बैरागी म्हणतो म्हणजे तु वस्त्रात जगणारा किडा आहेस. सगळेच किडे. एक वस्त्रात कसर निर्माण करत सुखाने जगतो तर दुसरा शरीर पोखरत जातो. बैरागी स्वतःला दुसर्‍या प्रकारचा किडा म्ह्णतो.

ज्यांना भारतीय परंपरेतील प्रवृत्ती आणि निवृत्ती हा वाद माहित नाही, त्यांना बैरागी नक्की काय म्हणतोय हे कदाचित कळणार नाही. जीएंचा अध्यात्माचा अभ्यास प्रचंड होता. त्यामुळे त्यांनी हा प्रसंग अतिशय कौशल्याने गुंफला आहे. प्रवासी हा प्रवृत्तीच्या मार्गावरचा आहे. आणि बैरागी देखिल प्रवासीच पण तो निवृत्तीच्या मार्गावरचा. मात्र बैराग्याने सारेच मार्ग शेवटी सोडुन ज्याला "नि:संगता" म्हणता येईल असा मार्ग पत्करलेला दिसतो. कारण आता त्याला कशाचेच आकर्षण नाही. तो इतका नि:संग झाला आहे कि तो पत्नीचा चितेवर पिठाचे गोळे भाजुन खात आहे. त्यामुळे सुरुवात जरी प्रवृत्ती, निवृत्ती वादाने झाली तरी त्याचा शेवट हा येथे मोक्षाकडे वगैरे जाणारा नाही. कारण ही जीएंची कथा आहे. त्यांना या सार्‍या मार्गांचे फोलपण दाखवायचे असावे कदाचित, पण अंतिम सत्याबद्दल जीए आपल्या कथेत कधीही काही बोलत नाही. शेवटी उरणारी नि:संगता हेच वाचकाला अटळपणे जाणवणारे सत्य उरते.

प्रवासी कथेच या अ‍ॅबस्ट्रॅक्टनेस मुळे मला नेहेमी असे वाटते कि जीएंनी आयुष्याच्या शेवटी वाचकांना या कथेच्यारुपाने एक चौकट दिली आहे. ती चौकट आपल्या आयुष्यावर बसवुन त्यात ते कसे दिसते ते आपणच पाहायचे आहे. प्रवासी कथेतला प्रवासी म्हणजे जीएच. पण आपण ही कथा वाचताना आपणदेखिल अटळपणे या प्रवासाला निघालो आहोत याची गुदमरुन टा़कणारी जाणीव आपल्याला होते. आपल्याला देखिल आपल्या आयुष्यात बैरागी भेटतात. अन्नाच्या बदल्यात डोळे काढण्याचा मोबदला मागणारे शिकारी भेटतात. कुठलाही पर्याय स्विकारला तरी मृत्यु देणारे अकाल, महाकाल भेटतात. त्यामुळे "प्रवासी" वाचताना, प्रवाशाचा प्रवास हा अटळपणे वाचकाचा प्रवास होऊन जातो असे मला वाटते.

अतुल ठाकुर

मामा.,,, सर्वात प्रथम जी. ए. च्या प्रतिभेपुढे नतमस्तक! आणि या अफाट कथेच तुम्ही जे सखोल रसग्रहण केलत त्याला सलाम! हे शिवधनुष्य तुम्हीच पेलू जाणे!
जी. ए. सर आणि त्यांचे लेखन म्हणजे तुमच्या मनाचा 'हळवा कोपरा' हे माहित होतेच. पण वाचक म्हणुन हे नात किती आर्त आहे हे तर तुम्ही जाणवुन दिलेच वर 'वाचन कसे करावे' हे ही माझ्यासारख्या वाचन 'सहजतेने घेणारीला' तुम्ही शिकवले आहे.
मुळात जी ए सरांचे लेखन वरवर वाचण्यासारखे नाहीच हे मी पहिल्यांदा इस्कीलार वाचायला घेतली तेव्हाच लक्षात आले.

कथेबद्दल काय बोलु! माझी बुद्धी तोकडी पडतेय...या जबरदस्त कथेला समजण्यात! कथेचा आवाका अवाढव्य आहे. मामा, जी.ए.सरांच्या या दोन्ही कथा 'विधीलिखित' आणि 'नियती' या मुळाशी येउन थांबतात . तुम्ही म्हणता तस दोन्ही कथांचे नायक 'दुर्दैवी नशिब' घेउन जन्माला आले आहेत. खर सांगू का...मला नाही तस वाटत. उलट मला तर इथल्या प्रत्येक मनुष्यात मला त्या 'प्रवाश्याच' प्रतिबिंब दिसतय. आपण सारेच 'प्रवासी' आहोत, मामा. म्हणुनच तर या दोन्ही कथात इतरांना नावे आहेत... पण प्रवासी जो नायक आहे त्याला नाव नाही.मला तर हेच वाटतय जी ए नी जाणुन बुजुनच प्रवाशाला नाव दिलेल नाही. कारण तो आपल्यासारख्या सामान्य जनांच प्रतिक आहे. इथे प्रत्येक जीव आपापले संचित घेउनच जन्माला येउन काही ना काही सुख दु:ख भोगतोय. ज्या सुखाच्या प्राप्तीसाठी छाती फुटेल इतके धावतोय ते सुख पदरात पडताच आतापर्यंत धावाधाव निरर्थक होती याची जाणिव होउन मन उद्विग्न होतेय! आणि मग 'याजसाठी केला होता का अट्टाहास' हे वारंवार आठवतं .
कथेच्या प्रचंड जंजाळात आपण शिरतो. वाटेवर अनेक विविधरंगी माणसे, क्षुद्र प्राणी भेटतात. त्यांचा पेहराव, राहणीमान सगळेच विलक्षण!ते नायकाशी कसे वागतात, त्यांचा त्या काळापुरता नायकाच्या जीवनात सहभाग आणि सर्वात शेवटी या सर्वांना एकत्र आणुन गुंफून , जुळवुन कथानायकाचं नियतीला शरण जाणे या सगळ्यात आपल्याला गुंतून ठेवण्यात जी ए यशस्वी होतात. आसक्तीकडुन विरक्तीकडे हा प्रवास वाटला मला.

कथानायकाच्या आयुष्यात नंतर येतो तो वृद्ध...नायकाला वेळोवेळी तु बद्धजीव आहेस,नियतीच्या हातातल बाहुले आहेस, यातुन सुटायची वाट तु स्वत:च बन्द करुन टाकली आहेस.… याचीच जाणिव करुन देतो.
मामा, जी ए सरांच्या ' आतुन सडत चाललेली हे प्रेते, हसतात, बोलतात इतकेच!" या वाक्याने मी अक्षरशः अन्तर्बाह्य हादरले. एकाच कुटुंबातली काही क्षणापुर्वी अपरिहार्यतेने का असेना एकत्र असलेली माणसे कुणा एकाला मृत्युला सामोरे जावे लागणार असे म्हटल्यावर कशी एकमेकांच्या जीवावर उठतात आणि एका आईविना पोराला मरणासाठी तयार करतात. जगण्याची आसक्ती/ हाव माणसाला किती क्रुर बनवते! या इथेच मनुष्याला बुद्दी असली तरी तो इतर हिंस्र पशुपेक्षा वेगळा नाही याची जाणिव होउन आपण 'डार्विन' च्या सिद्धान्तापुढे हार मानतो.

यापुढे जी ए जे लिहितात तो माझ्या मते या कथेचा कळसाध्याय आहे.
"आता बाहेरच्या जगात जायचे ते कशासाठी? तेथे असलीच माणसे बुजबुजलेली असणार. ओंडक्यात पोखरलेल्या छिद्रात राहाणार्या जाड, वळवळणार्या अळ्यांचे समोर एक लहानसे जग आहे. बाहेरदेखील सारे हेच, अतिविस्तृत प्रमाणात असणार, एवढाच फरक. पुष्कळ अळ्या, अंग वरखाली करीत सरपटणारा, पुन्हा अळ्या, पुन्हा अळ्याच निर्माण करणारा समुदाय, पण सर्वत्र तीच मन कोंदणारी घाण! त्यांच्यात रहायचे? राहताराहता त्यांच्यापैकीच एक होउन जायचे? "

हे किती यथार्थ वर्णन आहे. अंतरातही असाच अळ्यांसारखा वासना विकारांचा बुजबुजाट आहे! बाह्य जगतात पण तेच आहे विस्तृत प्रमाणात. थोडक्यात 'पिंडी ते ब्रम्हांडी '!
कुणीतरी म्हटल्याप्रमाणे," छे, चुक आहे याला जीवन म्हणणे! हे तर व्यर्थ पाश जपणे... "

मामा, ही जी ए सरांची रुपककथाच आहे माझ्या मते.

जी ए सरांच्या (मी जेवढ्या वाचल्या) कथांचे मर्म काढण्याच पातक माझ्या हातून होणार नाही तरी अस जाणवलं की ते एखाद्या मार्गदर्शक गुरुप्रमाणे वाचकांच बोट धरुन अनेक अद्भुतरम्य ठिकाणी फिरवतात. आपणही त्यान्च्या मागे कथेच्या निबीड अरण्यात धावत, ठेचकाळत, फरफटत फिरतो. शेवटाला ते सगळ्या गुन्तवळ्यातुन सोडुनही दाखवतात. पण या चक्रातुन मोक्ष मात्र देत नाहीत. अन्तिमतः परत ते अश्या एका क्षणाला आणुन सोडतात की तिथे पुढचा गुढरम्य प्रवास आ वासुन उभा असतो...आणि या वर्तुळात वाचक पुन्हा अडकतो....पुढे कित्येक दिवस त्या कथेच भूत मानगुटीवर बसलेल असत, तुम्ही कितीही नाकारल तरी!

अशोक, अत्यंत अवघड अशा लेखनाचा परिचय देतानाच त्यावर भाष्य करणे किती कठीण असते याचा अनुभव मी घेतला आहे. एका प्रेमाच्या उर्मीपोटी आपण सुरुवात तर करतो, पण आपण हे का लिहितो आहोत हेही कळेनासे होते अशीही वेळ येते कारण मूळ लेखनवस्तू काय आहे हेही अल्पाक्षरात मांडायचे असते आणि मग त्यातली सूक्ष्म सौंदर्यस्थळे उलगडायची असतात. हा डोलारा सांभाळणे सोपे नसते.
जी. एं. वर लिहिणे ही तुमच्यासाठी अशीच एक अपरिहार्यता आहे. त्यांचा अंतरंग सहवास मिळाल्याने त्यांचं भावजीवन आणि साहित्यसंसार यातले गूढ दुवे उकलू शकण्याचं अनन्यसाधारण काम तुम्ही करू शकता. या लेखाच्या पूर्वार्धात तुम्ही ते केलं आहे. आमच्या डोळ्यांसमोर परिस्थितीने स्थानबद्ध केलेली एक अपार क्षमतेची प्रतिभा तुम्ही साकारली आहे जिने जगण्याच्या कोंडवाड्यात नवेनवे सृजनाचे धुमारे पालवत ठेवण्याचं काम कधीही सोडलं नाही. एकाच जागी राहून,नोकरीतल्या आणि आडगावातल्या क्षुद्रवादाला बळी न पडता केवळ वाचन आणि व्यासंग यांच्या आधारावर विश्वपरिक्रमा केली .. त्यांच्या आतला प्रवासी हरला नाही..तो नवनवे प्रांत शोधत आणि प्रातिभ पातळीवर घडवतही राहिला ! सपाट वास्तवाला कधी अद्भुताची झळाळी देऊन , व्यक्तिमत्वांना प्रतीकांची आणि साध्या संवादाला गूढ भाकितांची अतर्क्य खोली देऊन तर कधी अगदी कोऱ्या निर्विकार वास्तवाची पातळी न सोडताही त्यातली शोकात्मता अधोरेखित करून या लेखकाने जीवनाचं जे दर्शन मराठी साहित्याच्या प्रांगणात घडवलं त्याला खरं तर ज्ञानपीठासारखा पुरस्कार मिळायला हवा होता..
या लेखाचा उत्तरार्ध कथेचा धांडोळा घेतो. जिथे कथानक हीच एक मयसभा असते, तिथे असा धांडोळा घेणे कठीणच , तेही तुम्ही जी.एं.वरील प्रेमासाठी केले आहे. जी.एं.च्या कथेतील नैराश्य खूपदा अंगावर येतं कारण कथेच्या छोट्या जीवात त्यांनी जणू एक महाकाव्य कोंडलं असतं ..
तर अशोक, तुम्ही असेच आमच्यासाठी जी.ए. नावाचं महादालन जे तुमच्या स्मृतीच्या वाड्यात बंद आहे, जमेल तेव्हा उघडत जा, त्या भव्य प्रतिमाप्रतिकांवर काळाची धूळ साठली असली तरी ते क्लासिकल साहित्य आहे, त्याचे झळाळ अंधुक होणार नाहीत.

वा अशोकांनी जबरीच लिहले आहे. ज्यांना जी ए माहिती नाहीत / वाचले नाहीत त्यांनांही ह्या लेखामुळे प्रतिक्रिया द्यावी वाटली. ठाकुरांचा प्रतिसादही तितकाच वाचनिय ! वेळोवेळी असे लेख येवोत अन अश्या चर्चा होओत.

मलाही प्रवासी आणि इस्किलार वाचून आजही अस्वस्थ व्हायला होते. ह्या दोन्ही कथेतून ठाकूर म्हणतात तसे अध्यात्मिक भाग / फिलॉसॉफी वेगळ्यारितीने पुढे येते. आणि ठाकूर जे म्हणतात की प्रवासी म्हणजेच जी ए, तसा विचार मी नव्हता केला. अ‍ॅबस्ट्रॅक्ट कथेचे हेच वैशिष्ट्य.

पाटिल सर,
अनेकानेक धन्यवाद. भारतीताई म्हटल्या तसेच

तुम्ही असेच आमच्यासाठी जी.ए. नावाचं महादालन जे तुमच्या स्मृतीच्या वाड्यात बंद आहे, जमेल तेव्हा उघडत जा.

सावकाश वाचेन
नवीन ससेमिऱ्यामुळे पार खाली गेला होता म्हणून वर आणतोय इतकेच

नमस्कार सर्व प्रतिसादकांना

~ सविस्तर उत्तर देणे जरूरीचे वाटत आहेच मला....पण आता मी फ़क्त तुमच्या प्रतिसादांची पोच देत आहे....आभारी तर आहेच मी तुम्हा सर्वांचा.

सर, किती सुरेख उलगडून सांगता हो. मनःपूर्वक धन्यवाद!
कॉलेजमधे असताना वाचलेली ही पुस्तके ,त्या वयात फार कळली नसली तरी त्यांनी प्रचंड गारुड केले होते.
ते छायाचित्रही विलक्षण हुरहुर लावणारे आहे.

सावकाश वाचेन. मी जी.ए. काहीच वाचलं नसल्याने मला अगदी नीट जास्त लक्ष देऊन वाचायला लागेल.

प्रवासी सुरु व्हायच्या आधीचे वाचले आत्ता. तुम्ही छान समजावून सांगता. आता उद्या वाचेन.

छान लिहिलेय मामा.
या कथेचा आवाकाच इतका मोठा आहे की लिहिताना विस्तार होणे अपरिहार्य. त्यातून ओळख करून द्यायची म्हणजे कथा न वाचलेले वाचकही असतील त्यांसाठी कथावस्तू थोडक्यात का होईना सांगणे आले. ओळख आणि रसग्रहण एकाच लेखात करणे ही अवघड कसरत बऱ्याच अंशी साधली गेली आहे.
तुम्ही आणि अतुलसारखे जी एंच्या लेखनावर वेगवेगळे झोत टाकणारे मित्र आहेत हीच खूप समृद्ध करणारी बाब. मूळ लेखनाच्या वाचनाइतकाच तुम्हा दोघांचे विचार वाचण्यातही अतीव आनंद आहे.

वाह.. समीक्षण, ओळख वाचून आत्ताच्या आत्ता हे पुस्तक घेऊन वाचायची तीव्र इच्छा होतेय.. लौकरच घेईनच ही दोन्ही पुस्तकं..
धन्यवाद अशोक. जी !! Happy

Pages