मालवणी विषारी दारूकांडानंतर आमच्या ऑफिसमध्ये जेवणाच्या सुट्टीत घडलेली एक छोटीशी चर्चा..

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 June, 2015 - 16:28

मालवणी विषारी दारूकांडानंतर आमच्या ऑफिसमध्ये जेवणाच्या सुट्टीत घडलेली एक छोटीशी चर्चा.
___________________________________________________________________

:- दारू पिऊन मेले त्यांना सरकार काय म्हणून नुकसान भरपाई देते? कोण त्यांना प्यायला सांगते? मेले आपल्या कर्माने. नाहीतरी दारू कुठे जगवते. उद्या मरणार होते ते आज मेले.

:- त्यांना नाही त्यांच्या अनाथ झालेल्या बायकापोरांना ते पैसे मिळतात. घरच्यांचा आधार जातो, यात त्यांची काय चूक?

:- काही आधार बिधार नाही जात. उलट दारूड्या नवर्याच्या छळातून सुटतात. वर पैसेही मिळतात. त्यांना एकप्रकारची लॉटरीच लागते. कोणता बेवडा आपल्या बायकोला पोसत असतो, उलट तिच्याच पैश्यांवर थेरं करत असतो. पगार झाल्यावर अर्धा पैसा पहिल्याच दिवशी गुत्त्यात उडवतात, नाहीतर कुठेतरी रस्त्यावर पडतात. त्यांच्या खिशातून कोणी अख्खा पगार काढून नेला तरी त्यांना त्याचे भान नसते.

:- पण दिली नुकसान भरपाई तर तुमचे काय जातेय? जरा माणुसकीनेही विचार करा रे.

:- काय जातेय म्हणजे? आणि कसली माणुसकी घेऊन बसला आहेस. सरकारचा पैसा म्हणजे आपलाच पैसा. आपल्याच टॅक्समधून जमा झालेला पैसा. कोणी अपघातात वा अतिरेकी हल्ल्यात गेले, भूकंप वा पुरात दगावले, त्या अभागी लोकांना करा ना मदत. कोणी हरकत घेतली आहे का? पण जे लोक दारू पिऊन मरतात त्यांच्याबद्दल मला जराही सहानुभूती नाही.

:- तुला कोणाबद्दल सहानुभूती वाटते का नाही हा मुद्दाच नाही. तो तुझा वैयक्तिक प्रश्न झाला. कायद्यानुसार नुकसान भरपाई मिळणे योग्यच आहे. ते दारू नाही तर "विषारी दारू" पिऊन मेले आहेत आणि दारू पिणे हे बेकायदेशीर नाही.
विषारी दारूला रोखता न येणे हे सरकारी यंत्रणेचे अपयश आहे, म्हणून त्यांना नुकसान भरपाई मिळणे योग्यच आहे.

:- विषारी असो वा नसो, तो पुढचा मुद्दा झाला. मुळात दारू पिऊन मेल्यावरही मायबाप सरकार पैसे देते ही जाणीव आणखी कित्येक पावले दारूच्या गुत्त्यावर वळवतील हा विचार का नाही कोण करत,? की हे पैसे केवळ मेलेल्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश दाबायला वाटले जातात..

सरतेशेवटी न राहवल्याने मी ऋन्मेष देखील चर्चेत उतरलो,
:- पण सरकार दारूबंदीच का नाही करत? मॅगीवर बंदी आणणार्‍या सरकारला दारूवर बंदी आणायला जमू नये हेच सरकारचे सर्वात मोठे अपयश नाही का? लोकांना स्वस्तात रेशनचे गहू-तांदूळ पुरवण्याऐवजी स्वस्तातली हातभट्टीची वा सरकारमान्य देशी दारू पुरवायचा हट्ट का? .... वगैरे वगैरे..

----

आणि तत्क्षणीच ठरवून केल्यासारखे सारे डब्बा धुवायला उठले. अश्या अविर्भावात जणू काही मी विषय एका डेड एंडला आणून सोडला. ‘विषारी दारू प्रकरणात मृतांना नुकसान भरपाई मिळायला हवी का नको’ यावर तावातावाने चर्चा करणार्यांना संपूर्ण दारूबंदी हा विषय मात्र अतर्क्य, अशक्य आणि अनाकलनीय कसा काय वाटू शकतो याचे नवल करत मी देखील उठलो.

----

काय चीझ आहे ही दारू ..
सरकार याच्या खरेदी विक्रीवर आक्षेप घेत नाही. दारू पिणे हा गुन्हा ठरत नाही.
जर कोणी दारूच्या नशेत कोणाचा बळी घेतला तर तो दारू पिणारा गुन्हेगार ठरतो. विकणारा मोकाट सुटतो. बळी जाणारा मात्र नाहकच मरतो.
जर दारूने पिणार्‍याचाच बळी घेतला तर त्याला मदत आणि सहानुभूती मिळते. विकणार्‍याला शिक्षा होते. कारण पिणार्‍याने ते अमृत(!) समजून घेतले असते, पण देणार्‍याने फसवून विष दिले असते.

रोज थोडे थोडे आतडे जाळत मरणाच्या दारी फरफटत नेणारी दारू विकणे हा गुन्हा नाही.
पण एकाच फटक्यात यमसदनी पोहोचवणारी दारू बनवली तर तो मात्र गुन्हा आहे.

कमाल आहे !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> सरतेशेवटी न राहवल्याने मी ऋन्मेष देखील चर्चेत उतरलो
>> आणि तत्क्षणीच ठरवून केल्यासारखे सारे डब्बा धुवायला उठले

इन्टरेस्टिंग. Happy

आणि तत्क्षणीच ठरवून केल्यासारखे सारे डब्बा धुवायला उठले.
>>>>>

ऑफीसमधले लोक ओळखून आहेत अगदी Lol

जसे सगळ्यांच्या मनात असतांनाही मायबोलीवर संपूर्ण ऋन्मेषबंदी न होणे हे अतर्क्य, अशक्य आणि अनाकलनीय वाटू शकते तसेच आहे दारूबंदीचे सुद्धा, एवढे तुम्ही समजून घेतले तरी पुष्कळ आहे.

सरकार कन्फ्यूज्ड आहे ते क्लियर झाले पाहिजे
अ) दारु नकोच साली चीजच वाईट
ब) अबकारी कर भरपुर मिळतो प्या दाबुन

लोक दारुमुळे मेले नाहित तर विषारी दारुमुळे मेले. जर दारुबंदी केली तर अशी विषारी दारु पिऊन मरणारांची
संख्या अजून वाढेल.

सरकारने १ लाख मदतीची घोषणा केली आहे.. अजून दिली नाही. आणि दिली तरी त्या कुटुंबाच्या हातात ५०% तरी रक्क्म मिळेल त्याची शक्यता कमी आहे.

आणि हो १ लाख फक्त मदत केली आहे..आजकाल १ लाखात काय येते?
या १ लाखावर चर्चा करण्यापेक्षा भ्रष्ट नेता/ कंपनी/ सरकारी अधिकार्याच्या सम्पत्तीवर सरकार टाच का नाही आणतं त्या करोडो/ अरब रक्क्मेवर चर्चा करा.

नेमेची येतो पावसाळा तसे नेमेची येतो ऋन्मेषचा धागा. अरे काय विषय निवडलाय! या ऐवजी ग्रीस ची पिछेहाट, टिम ईन्डियाचा पळपुटेपणा, ललित मोदी हे चर्चेला मिळाले नाही का? की यातली काही माहिती नाही? ऑ!

धागा ऋन्मेषने काढलाय म्हणून पहिल्या चारातल्या तीन प्रतिक्रीया उगाच उचकून दिल्यासारख्या येतायत.

धागा काढणे बेकायदेशीर नाही. धागा वाचणे बेकायदेशीर नाही. धागा वाचण्या न वाचण्याचा (किमान लेखकाचे नाव पाहिल्यावर) ऑप्शन पब्लिकच्या हातात आहे. तरी लोक वाचून डोकं फिरवून घेतात. यात दोष धागा वाचणार्‍यांचा की ऋन्मेषचा? Happy

दारूचंही असंच आहे. योग्य परवाने घेतल्यास दारू बनविणे कायदेशीर आहे. गुजरात सारख्या काही जागा वगळता आणि काही ठराविक दिवस वगळता दारू विकणे कायदेशीर आहे. दारू प्यावी न प्यावी हे पिणार्‍याच्या हातात आहे.
मग दारू पिऊन नुकसान झालेतर तो दोष दारू पिणार्‍याचाच नाही का?

काही आखाती देश वगळले तर दारू पिणे/विकणे बेकायदेशीर नाही.
भारतासारख्या देशात जिथे मुळातच प्रशासन भ्रष्ट आणि लिथार्जिक आहे तिथे दारूवर बंदी आणली तर राजु७६ म्हणतात तसे चोरट्या आणि हलक्या दारूची उलाढाल वाढेल.
आजही बेकायदेशीर दारू धंद्यांची उलाढाल कायदेशीर दारू धंद्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. (आकडेवारी विचारू नका, आसपास पाहिलं तरी कळेल)
लोक दारू पिऊन मरत असते तर एव्हाना युरोप अमेरिका निर्मनुष्य झाले असते. प्रमाणित दारू, योग्य प्रमाणात घेतल्यास ती अपायकारक नाही. (उलट काही वेळा फायदेशीर आहे)
मालवणीसारख्या कांडात लोक मरतात ते चोरीछुपे फर्मेंटेशन करताना काही रासायनिक घटक चुकीचे मिसळल्याने किंवा फर्मेंटेशनची प्रक्रीया चुकल्याने. अगदी चोरून दारू विकणार्‍यालापण आपली दारू पिऊन एकदाचे गिर्हाईक मरून जावे असे वाटत नसते तर पुन्हा पुन्हा परतोनि यावे असेच वाटत असते.

राहिला मुद्दा मॅगी आणि दारूच्या कंपॅरिझनचा.
तर सरकारने मॅगी नावाचा ब्रँड विकण्याला बंदी घातलीय. ती सुद्धा तिच्यात काही हानीकारक गोष्टी सापडल्याने.
'नूडल्स' नावाच्या गोष्टींवर बंदी नाही आहे. घरगुती शेवया करून विकणार्‍यांवर तर काही निर्बंधच नाही आहेत.

त्यात दारू प्रौढ लोक आपल्या मर्जीने पितात आणि मॅगी शक्यतो लहान मुलांना टर्गेट करून विकली जाते. त्यामुळे ती शक्यतो निर्धोक स्वरूपात विकावी हा आग्रह योग्य ठरतो.

बाकी बारवाल्यांनी दारू पिऊन गाडी चालविणार्‍या गिर्हाईकांकरिता काही तजवीज केली पाहिजे हे योग्य.
पण घरात दारू पिऊन , गाडी चालवून मग तिच्याखाली माणसे चिरडणार्‍या लोकांकरिता मुद्दलात ती दारूची बाटली विकणारा जबाबदार कसा?

साती, तुमच्या पुर्ण पोस्टला अनुमोदन.
वर्तमानपत्रातल्या बातमीप्रमाणे त्या दारुत मिथेनॉल वापरले गेले होते. आणी बहुतांश लोकांना माहित असेलच की मिथेनॉल हे विषारी आहे.

धागा काढणे बेकायदेशीर नाही. धागा वाचणे बेकायदेशीर नाही. धागा वाचण्या न वाचण्याचा (किमान लेखकाचे नाव पाहिल्यावर) ऑप्शन पब्लिकच्या हातात आहे. तरी लोक वाचून डोकं फिरवून घेतात. यात दोष धागा वाचणार्‍यांचा की ऋन्मेषचा? >>>>>१

अरे अरे साती तू कायको रागवती?:फिदी::दिवा: मला खरच हा धागा अनाकलनीय वाटला. एकतर इथे कुणी हातभट्टी वा तत्सम झोकणारे असतील असेही नाही किन्वा सोशल पार्टीजच्या नावाखाली घेतली तरी टाकाऊ घेणारे असतील असेही नाही. आणी हा वाईट दारुचा किन्वा दारुच्या नावाखाली जे काय असेल ते, प्रकार साधारण २० एक वर्षापूर्वी पण दोनदा मुम्बई की आसपासच्याच कुठल्यातरी ठिकाणी घडला होता. बाळ ऋ तेव्हा नर्सरीत असेल.

तेव्हा पण सरकारने अशीच मदत जाहीर केली होती. मग बाळासाहेब गर्जले होते( बाळासाहेब कोण ते विचारु नका, आमचे आपले एकच) की दारु पिऊन सन्सार उध्वस्त करणार्‍याना कशाला मदत देताय? ते त्यान्च्या कर्माने गेले, मग अशाना मदत देऊन नवीन पायन्डा कशाला पाडताय? मग मला हा प्रश्न पडलाय की अनेक वर्षापासुन जर हेच चालले असेल, सरकार तात्पुरते याना पकडुन परत सोडते, नाहीतर दुसरे कुणीतरी हैवान उठुन परत हेच करतात तर मग यावर धागे कशाला? की करमत नाही चला धागा काढुया असे काही आहे? मग माहितीपर विषयान्ची कमतरता आहे का? तसे धागे काढा ना. उगाच पावसाळ्यात कुत्र्याच्या छ्त्र्या उगवाव्या तसे धागे कशाला काढायचे?:अओ:

रश्मी, मै रागावती नही रे.
पहिल्या पाच प्रतिसादानंतर मी लिहिला होता प्रतिसाद.
पण सेव्ह करायचा राहिला.
मी माझ्या प्रतिसादात फक्तं शेवटच्या पॅरातल्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न केलाय.

थोड्यावेळाने वरचे प्रश्नं बघते.
तुझ्या प्रतिसादानंतर याला आरोग्य आणि प्रशासन सोडून पॉलिटीकल ओरिएंटेशनही असू शकतं हा नवाच आयाम लक्षात आला.
आता त्या अँगलने विचार करून लिहिते.

सॉरी पण एक गोष्ट लिहाविशी वाटली ती आधीच्या पोस्टमध्ये राहुनच गेली. साती तुमची ( तू म्हणले तर चालेल का?) माहिती तुम्ही डॉ. असल्यानेच नव्हे तर सर्वान्गाने परीपूर्ण असते. त्यामुळे असे वाटते की तुमच्याकडे येणार्‍या पेशन्टला तुम्ही देत असलेली माहिती एक टक्का जरी पटली आणी त्याने ती चार जणाना सान्गीतली तर खरच सार्थक होईल तुमच्या आणी तुमच्यासारख्या अनेक डॉ. च्या कष्टान्चे.:स्मित:

@रुंमेस - तुझे धागे बकवास आणि बर्‍याच वेळेला तिडीक आणणारे असले तरी आम्ही वाचतोच ना अगदी न चुकता. तसेच दारू चे आहे. एकदा नशेची सवय लागली की सोडवत नाही रे.

कशा कशावर बंदी आणणार? मला प्रायॉरीटी विचारली तर दारू पेक्षा तुझ्या धाग्यावर बंदी आणायला माझे मत देइन.

"रूंमेस" च्या अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या प्रस्तावाचा णिशेद.

तुम्ही धागे काढत रहा हो... मला मतप्रदर्शन करण्याजोगं काही मिळेपर्यंत मी दुर्लक्ष करत जाइन.

पैसा दारुड्यांना नव्हे,त्याच्या कुटुंबियानि दिला जाणार आहे.अवैध दारूची विक्री व उत्पादन रोखू न शकलेल्या सरकारी ,पोलिस अधिकार्यांकडून दंड वसूल करायची पद्धत अजून तरी नाही

पैसा दारुड्यांना नव्हे,त्याच्या कुटुंबियानि दिला जाणार आहे.अवैध दारूची विक्री व उत्पादन रोखू न शकलेल्या सरकारी ,पोलिस अधिकार्यांकडून दंड वसूल करायची पद्धत अजून तरी नाही>>>>>

सामान्यतः नुकसानभरपाई ही जर कोणी मिळवता ( किंवा भविष्यात मिळवु शकणारा ) माणुस मेला तर दिली जाते. ( म्हणजे ज्या माणसांवर त्यांचे कुटुंब अवलंबुन होते अश्या ). यातल्या कीती दारुड्यांवर त्यांचे कुटुंब अवलंबुन होते ह्याचा अभ्यास करायला नको का?

साती, सुंदर पोस्ट.

ऋन्मेऽऽष.. दारुबंदी तशी यशस्वी होणे अशक्य आहे. गुजराथमधेही ती यशस्वी झालीच आहे असे म्हणवत नाही. गल्फ देशातील सौदी अरेबिया ( कदाचित इराणही असेल ) सोडला तर बाकी देशांचेही धोरण आता सैल झालेय. सौदीमधेही नॉन अल्कोहोलिक बीयर मिळतेच. तसेच त्या देशात ज्या बाकीच्या देशांच्या एंबसीज आहेत तिथे सौदीचा कायदा लागू होत नाही, आणि तिथे दारु गाळली जातेच.

दारुबंदी हि सरकारने करायची गोष्ट नसून, तो समाजशिक्षणाचा विषय आहे असे मला वाटते.

मृतांच्या घरच्यांचाही दोष नाही आणि त्यांना थोडीफार मदत केली तर फार चुकलेय असेही मला वाटत नाही.

साती,

तुमच्या प्रतिसादास शंभर टक्के अनुमोदन!

एक प्रश्न : मिथेनॉलच्या विषबाधेवर उतारा म्हणून ईथेनॉल म्हणजे नेहमीची दारू देतात. आता नेहमीच्या दारूत भेसळ करतांना योग्य प्रमाणात मिथेनॉल वापरलं, तर मग मिथेनॉलचा विषारीपणा बाधायलाच नको. प्रस्तुत प्रसंगात मिथेनॉल थेट दारू म्हणून विकले गेले आहे. त्यात ईथेनॉलचा अंशही नव्हता असे दिसते आहे. त्यामुळे प्रस्तुत गुन्हा केवळ भेसळीचा मानता येईल का? हे अजाणता केलेले मनुष्यवध म्हणावेत की जाणीवपूर्वक केलेल्या हत्या म्हणाव्यात?

आ.न.,
-गा.पै.

ते शीर्षकात मालवणीनंतर - टाकाल का?

मालवणी माणुस, मालवणी मसाला, मालवणी कालवण सारख ते मालवणी विषारी दारु असे वाटतेय

ऋन्मेऽऽष, विषारी दारु पिऊन मेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना सरकारने पैसे का द्यावे, ह्या तुझ्या प्रश्नाशी मी सुद्धा सहमत आहे. हल्ली काहीही झालं कि सरकारनी पैसे द्यायचे असा जो प्रघात पडला आहे तो अतिशय चुकिचा आहे. पण लोकानुययासाठी प्रत्येक सरकार तेच करत रहाते. नागरिकांनी कराद्वारे दिलेल्या पैशातून नगर विकासची कामे करावी. ते असे नुकसानभरपाई म्हणून वाटू नये. दारू पिणार्‍याला त्याचे दुष्परिणाम माहिती असतात. आणि बेकायदेशीर केंद्रातून मिळणारी दारु घातक असू शकते हे सुद्धा माहिती असतं. तेव्हा ती पिऊन काहीही झालं तर जबाबदारी त्याचीच. केवळ एक लाख तर देत आहेत वगैरे युक्तिवाद मला तरी पटत नाही.

सातींचा प्रतिसाद अतिशय आवडला.

आशुचँप - Happy

सातीचा प्रतिसाद आवडला. विषयाला धरुन! बाकीही २-३ चांगले आहेत.

ऋन्मेषचा धागा आला म्हणजे दरवेळी त्याची धुलाई करणारे प्रतिसाद यायलाच हवे ह्याचा फार कंटाळा आलाय... ऋन्मेषच्या धाग्यांपेक्षा जास्त कंटाळा! इन फॅक्ट, त्यामुळे ऋन्मेषच्या (धागे काढण्याच्या) चिकाटीचे आणि शांतपणे प्रतिसाद देण्याचे वृत्तीचे कौतुकच वाटायला लागले आहे :फिदी:.

साती मस्त प्रतिसाद.
>>>धागा वाचण्या न वाचण्याचा (किमान लेखकाचे नाव पाहिल्यावर) ऑप्शन पब्लिकच्या हातात आहे. तरी लोक वाचून डोकं फिरवून घेतात.>>> हे तर फार्फार पटले.

मालाड मालवणीमध्ये अनैसर्गिक रितीने मृत पावलेल्या व्यक्तीन्च्या कुटुम्बियान्ना यातुन सावरण्यासाठी बळ मिळो. सरकारने १ लाख रुपये मदत दिली यावर विचार करण्यापेक्षा हजारो कोटी गैरमार्गाने कमावलेल्या केवळ एका प्रकरणाचा छडा लावला आणि सम्बन्धित व्यक्तीवर धडक कारवाई केल्यास अशाप्रकारच्या लाखो प्रकरणात मदत करता येईल.

साती - अप्रतिम प्रतिसाद...

Pages