ऍट एनी कॉस्ट- अभिराम भडकमकर

Submitted by पूनम on 22 June, 2015 - 03:04

ऍट एनी कॉस्ट

लेखक- अभिराम भडकमकर
राजहंस प्रकाशन
प्रथम आवृत्ती- जानेवारी २०१५
पृष्ठसंख्या ३७२, किंमत रू. ३००/-

तुमच्या अत्यंत आवडत्या क्षेत्रामध्ये टिकून राहण्यासाठी तुम्ही कोणती किंमत मोजायला तयार होऊ शकता? काय काय पणाला लावू शकता? तुमचं कुटुंब, तुमचा सगळा वेळ, तुमचा पैसा, इत्यादी. आणि तुमची सदसदविवेकबुद्धी? तीही लावाल पणाला? सदसदविवेकबुद्धी म्हणजे काय? ती का असते माणसाला? ही विवेकबुद्धी नेमकी नको तिथे नको तेव्हा आड येते आणि तथाकथित यशाच्या मार्गातला अडथळा होते. या विवेकबुद्धीला गाडून, किंवा अगदी ते नाही तर किमान ती जमेल तितकी झाकून टाकायला तुम्हाला जमलं तर मात्र यश तुमचंच! हां, हे यश मधूनच एखादी टोचणी लावून जाईल, पण ते फारसं महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे ते या स्पर्धेच्या जगात टिकून राहणं. ऍट एनी कॉस्ट!

टेलिव्हिजन माध्यमानं समाजाला विळखा घातला आहे. तथाकथित मनोरंजन आणि तथाकथित बातम्यांचा सतत भडिमार, सतत भडिमार असल्याने आलेला उथळपणा, येनकेनप्रकारेन केवळ सतत प्रसिद्धी आणि प्रसिद्धी- मग ती कुप्रसिद्धी का असेना, लोकांच्या मनावर अत्यंत बिनडोक ’ब्रेकिंग न्यूज’ बिंबवणं या प्रकारांनी वाहिन्यांनी लोकांवर कब्जा केला आहे. टी.आर.पी या तीन संपूर्ण अक्षरंवरही नाही, तर अद्याक्षरांवर ही दुनिया फिरते आहे. प्रत्येक वाहिनीला ऍट एनी कॉस्ट हवा असतो तो सर्वाधिक टीआरपी. त्यासाठी काय वाटेल ते करायची मुभा असते. काहीही करा, पण लोकांनी आपलीच वाहिनी, आपलीच मालिका पाहिली पाहिजे. आज आपल्या चॅनल्समोर बसलेला प्रेक्षक उद्याही बसायलाच हवा हा इथला हट्ट असतो. इतकं सगळं पणाला लागल्यानंतर मग त्यातलं राजकारण, पैशाचे खेळ, मुस्कटदाबी, हेवेदावे, मत्सर, ताकद, सत्ता हेही ओघानं आलंच. ते तुम्ही टाळूच शकत नाही. या कारखान्यात अस्सल माल तयार होत नाही, वापरलाही जात नाही, कारण त्याची गरजच नसते. जे जे नकली, ज्याचं आयुष्य दोन-चार वर्षांपेक्षा जास्त नाही, जे जे फक्त चमकतं त्यालाच इथे सोन्याचं मोल असतं.

या इन्डस्ट्रीचं अतिशय यथार्थ वर्णन करणारी ही कादंबरी- ऍट एनी कॉस्ट. विकास हा कोण्या एका चॅनेलचा अत्यंत यशस्वी निर्माता. चार मालिका एकाचवेळी चालू असतात त्याच्या. संयुक्ता ही एक अत्यंत महत्त्वाकांक्षी स्त्री आणि त्या चॅनेलची हेड त्या चारही मालिका एक दिवस अचानकच बंद करून टाकते. कारण? टीआरपी कमी आहे! सगळी इन्डस्ट्री या दोन वाक्यांभोवतीच तर फिरते. तुमचा टीआरपी हाय तरी असतो नाहीतर लो तरी. विकासला जबर धक्का बसतो. इथे ट्रॅक रेकॉर्ड उपयोगाचं नसून, आज आत्ता तुम्ही कुठे आहात हेच महत्त्वाचं हे त्याला परत एकदा पटतं. तो सगळं सोडून शांतपणा अनुभवायला, आपल्याला नक्की काय करायचं आहे याचा विचार करायला चांदणवाडी या त्याच्या गावी जातो. इथे त्याला भेटतो धनंजय नावाचा एक हौशी, गुणी नट. पाहताक्षणीच विकासला धनामधला स्पार्क दिसतो. पण धनाचं एक विदारक सत्यही असतं. धनाला ब्रेन ट्युमर झालेला असतो आणि त्याच्या हातात केवळ दोन वर्ष असतात. धनाचा ब्रेन ट्युमरमुळे विकासच्या मेंदूतला ट्रिगर दाबला जातो आणि एक भन्नाट कल्पना जन्म घेते. सुरू होतो एक जीवघेणा खेळ- धनाच्या मृत्यूचा रिऍलिटी शो- अच्छा तो हम चलते है!

एक तरूण, होतकरू, हुशार मुलगा मरणार आहे. तो क्षणाक्षणाने कसा मरणार आहे याचं जिवंत चित्रण देशभर विकायचं. त्याची व्याधी कॅश करायची, प्रेक्षक, त्यातही स्त्रियांना रडवायचं, त्याच्या नावावर टीआरपी मिळवायचा, प्रचंड पैसा कमवायचा, लोकांना वापरायचं आणि त्याला मरायला सोडून द्यायचं! कादंबरीची ही मध्यवर्ती कल्पनाच मेंदूला मुंग्या आणते. माणूसकी, कणव, माया या भावना ना कोणाच्या मनात येतात, मुळात त्यांची जाणीवच या पैशांच्या छनछनीमध्ये कोणाला होत नाही. धना मरतो आहे. अरेरे, वाईट झालं. पण मला त्यातून फायदा होणारे? व्हेरी गुड. धना तू मर. पण माझ्या सोयीने, मी सांगेन तसं मर बाबा- हा स्टॅंड धनाच्या सख्ख्या भावंडांपासून ते विकास, संयुक्तापर्यंत सगळे घेतात. खुद्द धना सुरूवातीला बिचकतो. पण आपल्यानंतर आपल्या आई, बहिण आणि भावाचं पैशाच्या दृष्टीनं भलं होणार आहे हे समजल्यानंतर तोही तयार होतो. शिवाय टीव्हीवर झळकण्याची, अभिनयाची हौसही आयती भागणार असते. मरण? आज ना उद्या ते येणारच. पण ते इतक्या जणांचं भलं करत असेल तर टीव्हीत का नाही जायचं?

प्रेक्षकांना हा रिऍलिटी शो आऊट ऑफ धिस वर्ल्ड, माईंडब्लोईंग वगैरे वाटतो. अनेक रिऍलिटी शो पाहिले, पण कोणाला मरताना नाही पाहिलं. कसलं वेगळं आहे हे! अरेरे, बिचारा हा मुलगा. काय ना हा. याला रोज (तो) मरेपर्यंत पहायलाच हवा. जमलं तर याच आजाराने गेलेल्या, तरूणपणी गेलेल्या अन्य नातेवाईकांच्याही आठवणी त्याच वेळेला काढता येतील, एखाददोन नवस बोलता येतील बिचार्‍यासाठी, त्या निमित्तानं आपल्याला पुण्य लाभेल. कोणाची टीव्हीची ती वेळ ठरलेली असते म्हणून, कोणी कुतुहल म्हणून, कोणी नाईलाज म्हणून, कोणी धना दिसायला चिकणा आहे म्हणून टीव्हीला चिकटतात- कारणं काही का असेनात, धना टीव्हीचा स्टार होतो.

या दरम्यान कादंबरीमध्ये अनेक पात्र येतात. केवळ पैशांसाठी काम करणारा दिग्दर्शक धरम, संवादलेखक मनीष, धनाची हिरॉइन नेत्रा, हिरॉइनची मैत्रिण तनुजा, मावशीचं काम करणारी शब्बो, धनाचे खरे मित्र, अनेक स्ट्रगलर्स ज्यांना धनामुळे या मालिकेत काम मिळतं आणि सर्वात महत्त्वाचं पात्र म्हणजे अरविंद. विवेक आणि पैसा या कात्रीत अडकेल्या अरविंदच्या रूपात अभिराम काय बरोबर आणि काय चूक याचं द्वंद्व चपखलपणे रेखाटतो. अरविंद नाटकांचा दिग्दर्शक आहे. नाटक म्हणजे अस्सल, जातिवंत कलाविष्कार. त्याच्यापाशी दृष्टी आहे, शैली आहे, त्याचं स्वत:चं कौशल्य आहे, जाण आहे. पण नाटकांच्या दिग्दर्शकांना विचारतं कोण? त्यांनी प्रसिद्धी, पैसा कमवायचा की नाही? अत्यंत फालतू, बेगडी, नकली लोक टीव्हीत येऊन आयुष्यभराची ददात मिटवतात, मग नाटकवाल्यांनी कोणाचं घोडं मारलंय? पण या इन्डस्ट्रीमध्ये मनाचा जो कोडगेपणा लागतो तो स्वीकारायला तो धजावत नाही. त्याच्या आजूबाजूचे लोक, तंत्रज्ञ त्याच्याकडे आदराने बघतात, पण कोणी त्याच्या वाटेवर चालू इच्छित नाही, कारण त्याच्या वाटेवर झगमगाट नाही. हा विरोधाभास अरविंद त्याच्या आभास नावाच्या मित्राबरोबर सतत शेअर करत असतो. आभास हे अरविंदचंच दुसरं, सच्चं रूप आहे. अखेरीस, अरविंदच मग हळूहळू बदलतो. अरविंदचं हे बदलणं सर्वात जास्त चटका लावून जातं कारण या संपूर्ण कादंबरीत तेच एक पात्र आहे ज्याने सुरूवातीला आपल्या मनातले प्रश्न विचारायची हिंमत केलेली असते.

अभिराम अत्यंत अनुभवी आणि मुरलेला लेखक असल्याने आणि नाटक, टीव्ही आणि सिनेमा या तिन्ही माध्यमात तो वावरलेला असल्याने कादंबरी अस्सल आहे. मजकूराने, घटनांनी, उलथापालथींनी खच्चून भरलेली ही कादंबरी म्हणूनच उत्कंठावर्धक आहे. एखाद्या सिरियलप्रमाणे हे पुस्तक आपला ताबा घेतं; आता पुढे काय होणार हे आपण आपसूकच वाचत जातो. कादंबरीचा क्लायमॅक्स तर सर्वार्थाने हाईट आहे!

टीव्ही या माध्यमाने काय वादळ आणलं आहे याचं यथार्थ लेखन म्हणजे ही कादंबरी. ऍट एनी कॉस्ट चुकवू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूनम, छान ओळख करुन दिलीस. धन्यवाद.
द ट्रुमन शो मधून प्रथम भेटलेली ही भन्नाट कल्पना ( अर्थात ट्रुमन शो मधल्या कल्पनेचा आवाका फार मोठा आहे आणि त्यात नायक सोडून बाकी सर्वांना हा रिअ‍ॅलिटी शो आहे हे माहिती आहे ) हल्लीच 'मि. अँड मिसेस' नाटकातही पाहिली त्यामुळे विषयाचं नाविन्य अजिबात वाटलं नाही. मात्र डिटेलिंगसाठी वाचायला नक्कीच आवडेल.

अगो, मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस कसं वाटलं? पहायचं आहे ते नाटक, पण प्रयोग होत नाहीयेत आताशा त्याचे Sad

प्राची, आशू थँक्स!

तुम्ही करुन दिलेल्या ओळखीतून ही कादंबरी वाचावीच असे वाटल्याने मुद्द्याला हात घातला. Happy

किंमत भले रु.३००/- असो...पण वाचतोच आता ..

अ‍ॅट एनी कॉस्ट.

Happy

वाचायला हवी. खरं तर असा शो हा सध्या तरी कल्पनाविलास आहे, ( पण तो दिवस दूर नाही )
सध्या या क्षेत्रात काय "खेळ" चालू आहेत ते कुणी इनसायडर लिहिल का ?

अगो, मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस कसं वाटलं? >>> चांगलं आहे नाटक. बांधीव स्क्रिप्ट आणि छान कामं झाली आहेत सगळ्यांची. एकदा बघण्यासारखे नक्कीच आहे.

दिनेश, चॅनलमधलं, प्रॉडक्शन हाऊसेसमधलं इनसायडर हॅपनिंग ब-यापैकी कव्हर केलंय कादंबरीत. ज्या शोमध्ये स्पर्धा म्हणून अनेक लोक भाग घेतात आणि जिथे एलिमिनेशनचे खेळ असतात तिथलं राजकारण आणखी वेगळं आणि आणखी गलिच्छ असतं हे उघड सत्य आहे!

मंजूडी, कैलास, शशांक, पराग- थँक्स! Happy

छान लिहिलंय. आवडलं. Happy
तरूण पिढीला खिळवून ठेवणारं आहे का हे पुस्तक? त्यांनी वाचायला हवं असं हे वाचल्यावर मला वाटलं.

(अवांतर - 'मि. अँड मिसेस'चे प्रयोग सुरू झालेत पुन्हा.)

टीना, मानुषी, अमितव, प्रीति, मैथिली- थँक्स! Happy

प्रीति, हो, टीव्हीत जाऊ इच्छिणार्‍यांनी आणि ज्यांना त्या ग्लॅमरच्या आड काय दडलं आहे हे ठाऊक नाहीये त्यांनी अवश्य वाचावं असं हे पुस्तक आहे!

(मिस्टर अ‍ॅन्ड मिसेसवर लक्ष ठेवते! :))

पूनम पुस्तक आणलं. सावकाश वाचणार. याच फील्डमधे अगदी अपकमिंग अशी एक नातेवाईक तरुण मुलगी आहे. तिला गिफ्ट देणारे हे पुस्तक.

पूनम.. असे अंतर्गत राजकारणावर लिहिलेले नक्कीच आवडेल मला वाचायला.

सहज एक संदर्भ देतोय. मी चायनामधील सुपरमॉडेल्स वर एक कार्यक्रम बघितला. आपल्याकडे फॅशन वगैरे जे चित्रपट आले त्यात हे संदर्भ आलेच नव्हते. पण या कार्यक्रमात ते होते.

जागरणामूळे त्यांना अनेक आजार जडतात. वजन वाढू न देण्याचे टेंशन येते. सतत तसे चालल्याने कंबर दुखी जडते. सतत हाय हील्स घातल्याने टाचा दुखतात. बहुतेक मॉडेल्स उंच असल्याने त्यांचे पायही मोठे असतात पण त्यांना त्यांच्याच मापाचे बूट मिळतील अशी शक्यता कमी असते.. या सगळ्या बाबींमूळे तो कार्यक्रम अस्सल वाटला.

आपल्याकडच्या चित्रपटात लैंगिक शोषण, व्यसनाधीनता, घरची गरीबी वगैरे विषयावर जास्त लक्ष दिले गेले असते. ( ते वास्तव आहेच पण वरचे मुद्देही वास्तव आहेतच कि )