बहुं शेतात राबावें

Submitted by नवनाथ राऊळ on 14 June, 2015 - 01:34

बहुं शेतात राबावें । कष्ट अपार करावें ।
नाम मुखीं तें धरावें । हरी पांडुरंग ॥१॥

वावरांस नांगरावें । तेथ बियाणे पेरावें ।
विठ्ठलासि आळवावें । श्रमपरिहारां ॥२॥

निगा शेताची करावी । माया मायेची धरावी ।
चित्तीं माऊली स्मरावी । हाचि नित्यनेम ॥३॥

भिन्न नोहें कर्म पुजा । हरिवीण कोण दुजा ।
वर्षवीं पर्जन्यराजा । विठु मायबाप ॥४॥

पांडुरंगकृपा होई । कीर्तन रंगात येई ।
जन्म शिवारांत घेई । हिरवें सुवर्ण ॥५॥

भात जोंधळा बाजरी । शाकें नानाविध तरी
गजर नामाचा करी । हरिदासमेळा ॥६॥

अंगणी धानाची रास । पूर्णब्रम्हाची आरास ।
भीमातीरी विष्णूदास । जैसें मेळविलें ॥७॥

आम्ही कृषक भूमिचें । वैष्णव जन्मोजन्मीचें ।
माधुर्य हरिनामीचें । ढाळितो प्रपंची ॥८॥

नाथ म्हणे श्रीवल्लभ । करी संसार सुलभ ।
घडवी अलभ्य लाभ । नेई कैवल्यासी ॥९॥

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users