उदासिन मध्यंतरं...

Submitted by मुग्धमानसी on 29 May, 2015 - 04:31

ही अशी उदासिन मध्यंतरं यापुढे टाळुयात आपण!
वेळ खुप कमी आहे आणि करण्यासारखं, भोगण्यासारखं खुप जास्त!

माझ्या असण्या-नसण्यावर तुझ्या विचारांची प्रक्रीया अवलंबुन नाही. तुझ्या डोक्यातली विचारांची प्रयोगशाळा अशीच निरंतर कार्यरत राहणार. माझ्या नसण्याने किंवा गप्प असण्याने ती काही थांबणार नाही.

पण विचार म्हणजे पाणी....! विश्वाचा फेरा केला तरी पाणी शेवटी पाण्याकडेच परततं... आणि जन्माला येण्यारा प्रत्येक विचारही अंती एका विचाराशीच जाऊन मिळतो! दरम्यानचे सगळे उतार, कडेलोट, खळगे, बांध, बाष्पीभवनं, कोसळणं, मुरणं वगैरे वगैरे... फक्त एक प्रवास! पाण्यापासून पाण्याकडे.... विचारांपासून विचारांकडे!

पाणी आपल्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्यातला गाळ अशुद्धी, कचरा मागे ठेवतं आणि शुद्ध होतं. पाण्याची वाफ होताना अशुद्धी खालीच राहते आणि शुद्ध स्वरुपाने पाणी आकाशाला भिडून येतं. मातीत मुरलेलं पाणी मातीखालच्या हजारो स्तरांतून स्वत:ला गाळून घेतं आणि स्वच्छ, पवित्र बनुन दगडांमधून झिरपतं. प्रत्येक टप्प्यावर प्रवासादरम्यान पाण्यानं मागे सोडलेली ही घाण... अशुद्धी... म्हणजे खरंतर प्रदुषण! प्रदुषण पाण्याचं होत नाही. ते होतं प्रवासादरम्यान ज्या रस्त्यावरून ते वाहत गेलं त्या रस्त्याचं... सृष्टीचं! मागे सोडण्यासाठी पाण्याकडे कमीत कमी अशुद्धी उरावी याची काळजी म्हणूनच सृष्टीच्या वारसदारांनी करावी... पाण्याला त्याची पर्वा नाही.

विचारांचेही तेच! ते वाहते असताना आपण गढूळ होऊ नये म्हणून.... ही अशी उदासिन मध्यंतरं यापुढे टाळुयात आपण.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयला! आमच्या लहानपणी नाटकाच्या मध्यंतरात बटाटेवडा मिळाला नाही तर औदासीन्य येत असे. Lol मोठ्या लोकांचंही तसंच काहीसं दिसतंय. Wink

-गा.पै.