क्लास !!! मेटस .. (मराठी चित्रपट)

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 May, 2015 - 08:40

टिपा -

१..) चित्रपट १६ जानेवारी २०१५ ला प्रदर्शित झाला आहे, आणि त्यावर आज साडेतीन महिन्यांनी लिहितोय कारण मी काल रात्री पाहिला, मला आवडला, आणि एखादा मराठी चित्रपट आवडला की तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा हे मी मराठी चित्रपटरसिक या नात्याने माझे कर्तव्यच समजतो.

२..) यात अंकुश चौधरी हा माझा आवडता नट आणि सई ताम्हणकर ही माझी कमालीची आवडती नटी असल्याने संधी मिळताच हा चित्रपट बघणारच होतो. पण चित्रपट आवडण्यामागे एवढेच कारण नव्हते. किंबहुना सई-अंकुश आहेत म्हणून मी त्यांना फेवर करत चित्रपटाबद्दल मुद्दाम चांगले चुंगले तेवढेच लिहीलेय अश्यातलाही भाग नाही.

३..) चित्रपट आवडला नसता तर लिहिलेच नसते, कारण मी चित्रपट परीक्षक नाही जे कर्तव्य म्हणून प्रत्येक चित्रपटाबद्दल बरेवाईट लिहायलाच हवे. त्यामुळे एखादा मराठी चित्रपट नाही आवडला तरी शक्यतो ते माझ्यापुरतेच ठेवतो, त्याबद्दल वाईटसाईट लिहिणे टाळतो. हा आवडला म्हणून लिहितोय.

माझ्या ग’फ्रेंडचे तटस्थ रेटींग - चांगला पिक्चर आहे. वन टाईम बघायला हरकत नाही.
(तळटीप - तिला मारधाड, पॉलिटीक्स, धटींगबाजी वगैरे असलेले चित्रपट जास्त आवडत नाहीत, जे या चित्रपटात बरेपैकी असूनही हा आवडला हे विशेष!)

बॉक्स ऑफिस रेटींग - ५ करोडच्या चित्रपटाने पहिल्या ३ आठवड्यात १२ करोड कमावले म्हणजे हिट म्हणावयास हरकत नसावी.

_________________________________________________________________
_________________________________________________________________

क्लासमेट्स ..

चित्रपट सुरूच होतो ते दुनियादारीची आठवण देत. कारण सिनेमाचे प्रोमोज बघून आधीच डोक्यात असलेला कॉलेजकट्टा बॅकग्राऊंड आणि दुनियादारीसारखेच सारे कॉलेजफ्रेंडस आज कित्येक वर्षांनी भेटत असल्याची सिच्युएशन. पण जसा चित्रपट पुढे सरकतो ते आपला वेगळा ठसा उमटवतच.

तर, साधारण वीसेक वर्षांनी भेटत असते एक "टी.वाय. १९९५" ची पासआऊट बॅच.

या स्नेहसंमेलनात सईचे चाळीशीच्या वयाला साजेश्या मेकअप नंतरही लोभसवाणे दिसणे, या पार्श्वभूमीवर प्रकर्षाने उठून दिसते ते अंकुश चौधरीचे खंगलेले अन परिस्थितीने पिचलेले दिसणे. आणि त्याच वेळी आपल्याला अंदाज येतो की ही कथा एका कॉलेज हिरोच्या ट्रॅजेडीची आहे.

तर, जमण्याचे निमित्त असते ते त्यांच्याच एका मित्राच्या आठवणीचे, जो वीस वर्षांपूर्वीच त्यांना सोडून गेलेला असतो. जो कॉलेजच्या प्रिन्सिपल मॅडमचा मुलगा असतो. जो या सर्वांना ज्युनिअर असतो. ज्याला म्युजिकची आवड असते. ज्याला दम्याचा त्रासही असतो, पण थट्टामस्करी करणे हा ज्याचा स्वभाव असतो. तो अन्या उर्फ अनिरुद्ध (कलाकार - सिद्धार्थ चांदेकर)..

सर्व मित्रांना एकत्र जमलेले बघून त्यांच्यातील नातेसंबंधाबद्दल आपण तर्क करत असताना, आता फ्लॅशबॅक सुरू होत आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील या अंदाजात आपण असतानाच, एक हादरवून टाकणारी घटना घडते. अंकुश चौधरी हा कॉलेजच्या ईमारतीवरून ऊडी मारत आत्महत्या करतो(?) की कोणीतरी त्याला ढकलून त्याचा खून करायचा प्रयत्न करते(?). नक्की काय होते ते तुर्तास गुलदस्त्यात पण त्याला बेशुद्धावस्थेत ईस्पितळात भरती केले जाते आणि पोलिस तपासाला सुरुवात होत फ्लॅशबॅक उलगडू लागतो...

अंकुश चौधरी .. उर्फ, सत्या .. कॉलेजचा भाई आणि युवाशक्तीचा कार्यकर्ता
सई ताम्हाणकर .. उर्फ, अप्पू .. त्याचा उजवा हात
ईतर कट्टा गॅंग .. यात प्रकर्षाने कोणी लक्षात राहत नाही.. तरी नाही म्हणायला "का रे दुरावा" मालिकेतील ‘अदितीचा जय’ लक्षात राहतो. पण त्याचे कॅरेक्टर उभारण्यात फार काही डिटेलिंग केलेली नाहिये.
राहता राहिला सिद्दार्थ चांदेकर .. उर्फ अन्या .. हा मात्र जेव्हा जेव्हा पडद्यावर अवतरतो, तेव्हा तेव्हा भाव खाऊन जातो. सहजसुंदर वावर आणि अल्लड अभिनय. बरेचदा यात रणबीर कपूरची झलक दिसते. तो असताना अंकुश आणि सई देखील नकळत बॅकग्राऊंडला जातात आणि पडदा तोच व्यापून टाकतो. अर्थात नंतर त्यालाच अकाली एक्झिट घ्यायची असल्याने त्याचे ‘हॅपी गो लकी’ कॅरेक्टर त्याच ताकदीने उभारणे गरजेचे होते, कारण मग त्याच्या जाण्याने लागणारा चटका त्याच प्रमाणात बसणार असतो.

तर, आता चित्रपटाच्या कथानकात शिरायचे झाल्यास, सईचे अंकुशवर एकतर्फी प्रेम असणे, पण तिच्या टॉमबॉय इमेजमुळे अंकुशने ते न ओळखणे, पण अन्याने मात्र नेमके ओळखणे. या सर्वांमध्ये सोनाली कुलकर्णी ज्युनिअरची एंट्री होणे. आधी अंकुश आणि तिची खुन्नस असूनही नंतर त्यांचे प्रेम जुळणे हा टिपिकल लव्ह ट्रॅंगल उरकला जातो.

(मला ती सोनाली कुलकर्णी कधीच सुंदर वगैरे वाटली नसल्याने सईला डावलून अंकुश-सोनाली यांचे प्रेमप्रकरण माझ्या पचनी पडायला मागत नव्हते. असो.,)

पण पुढे याच सोनालीला कॉलेजच्या निवडणूकीत स्वताच्या मनाविरुद्ध अंकुशच्या विरोधात उभे राहावे लागते. याला कारण म्हणजे तिचा राजकारणी घराण्याचा बॅकग्राऊंड. तिचे आजोबा रमेश देव हे एक बडे राजकीय प्रस्थ असतात. यात तिच्या सोबत दाखवलेला सचित पाटील हा एक आणखी गुणी कलावंत. याचे वडील संजय मोने हे देखील एक सक्रिय राजकारणी असतात. त्यामुळे चार पोरांची गॅंग याचीही असते. पण हा मात्र मारामार्‍यांपासून दूर राहणारा, आपल्या करीअरवर लक्ष केंद्रीत करणारा, कॉलेजमधील एक सिन्सिअर स्टुडन्ट दाखवला आहे. याचीही सोनालीसारखीच अंकुशशी खुन्नस असते. अर्थात अंकुश आणि सचित हे दोघेही मुलगेच असल्याने त्यांचे काही पटकन प्रेमबिम जुळत नाही.

तर, अंकुश उर्फ सत्या ज्या युवाशक्तीचा कार्यकर्ता असतो त्याचे हे सारे राजकीय विरोधक असतात. एवरीथिंग एझ फेअर इन लव्ह अ‍ॅण्ड वॉर... अ‍ॅण्ड पॉलिटीक्स!. गैरसमज होतात, पसरवले जातात., प्रेम, मैत्री, विश्वासांचे नातेसंबंध., सारेच यात भरडले जातात. अंकुश सोनालीपासून दुरावतो, अन्याला दुखावतो, सई त्याची असूनही नसल्यासारखीच उरते.. आता हे पॉलिटीक्स कोण कसे खेळते याचा अंदाज आपल्याला येत असला तरी ते पडद्यावर बघणे रोचक आहे. आणि हेच चित्रपटाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे की चित्रपट फार वेगाने घडतो. त्यात कुठलाही संदर्भ वा द्रुश्य अनावश्यक वाटत नाही. संजय मोने आणि रमेश देव यांचे मोजकेच प्रसंग आणि संवादही तितकेच पकडून ठेवतात. गाणीही फारशी फॉर्वर्ड न करता बघावी लागतात, कारण त्यातूनही चित्रपट पुढे सरकत राहतो.

‘तेरी मेरी यारींया..’ हे चित्रपटातील सर्वोत्कृष्ट गाणे असून "बाकीचे सारे बाजूला व्हा रे, आला रे आला राजा" हे निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर असलेले गाणे देखील माहौल बनवते. आणि मग तिथे त्या भुमिकेसाठी अंकुश हाच सर्वोत्तम पर्याय आहे हे जाणवते.

चित्रपट पाहताना आणखी एक जाणवलेली बाब म्हणजे संवांदातून उभारलेला काळ!. मुंबईच्या किर्ती, एमडी, सिद्धार्थ, रुईया या मराठमोळ्या अन मध्यमवर्गीय कॉलेजातील त्यावेळच्या मुलांच्या तोंडी असलेली भाषा अचूक पकडली आहे. याउपर फ्रूटीचे डब्बेही दिसले, पॉपिन्स, बॉबी आणि पेप्सीकोल्याचा उल्लेख झाला, सिट्रा नावाचे कोल्ड्रींक सुद्धा एकेकाळी होते हे आठवले.

चित्रपटातील मला न आवडलेली गोष्ट म्हणजे त्याचा शेवट. जे झालेय घडलेय ते निस्तरून विसरून एकमेकांना माफ करून सर्वांचेच आयुष्य सावरायचा प्रयत्न, ना कुठली सल मनात ठेवतो ना विश्वासार्ह वाटतो. मला स्वत:ला वेगळा शेवट बघायला आवडला असता.

असो, तरीही शेवट हा शेवटीच येत असल्याने आधीच्या चित्रपटाच्या रसग्रहणावर याचा काहीही फरक पडत नाही. शेवटी मात्र कट्टा ग्रूपमधील कोणाचे काय झाले याचा विचार करताना पुन्हा एकदा दुनियादारी आठवतेच. खास करून दुनियादारीच्या अंकुशबद्दल विचार करताना आत काहीतरी तुटते ते इथे कुठेतरी हरवल्यासारखे वाटते.

तर,
तो असा काय शेवट आहे? अंकुश आत्महत्येचा प्रयत्न करतो की त्याला कोणी मारायचा प्रयत्न करते? की तो निव्वळ एक अपघात असतो? मग त्याने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटचे काय? अन्याच्या अकस्मात मृत्युचे रहस्य काय? राजकारण खेळणार्‍या सचित पाटीलचा यापैकी कश्यात हात असतो? अंकुश शेवटी सोनालीचा होतो की सईचा? या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपट बघूनच मिळतील. इथून तिथून मिळवलीत तरीही चित्रपट एकदा नक्कीच बघणेबल आहे. पण तुर्तास पोस्टर बघा !

classmate.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आवडला .
अन्या तर फार्फारच आवडला .
अंकुश ही मस्त वाटतो .
ही सगळी टी.वाय.ची मुलं वाटत नाहीत , पण तरीही चाल्से !

चित्रपट सुरूच होतो ते दुनियादारीची आठवण देत. कारण सिनेमाचे प्रोमोज बघून आधीच डोक्यात असलेला कॉलेजकट्टा बॅकग्राऊंड आणि दुनियादारीसारखेच सारे कॉलेजफ्रेंडस आज कित्येक वर्षांनी भेटत असल्याची सिच्युएशन. पण जसा चित्रपट पुढे सरकतो ते आपला वेगळा ठसा उमटवतच.>>>>> + १०००००००

छान लिहिले आहे. मला खूप दिवसापासून पहायचा आहे हा चित्रपट. आता नक्की वेळ काढून पाहिन.

बहुधा, एशियन गेम्सचा सिंबॉल होता त्या हत्तीचे नाव अप्पू असे होते. हत्तीच्या पिल्लाला अप्पू म्हणत नसावेत जसे वासरू, लेकरू, बछडा वगैरे असते. तरी एक्झॅक्ट डिटेल गूगाळावे लागेल.

असो,
इथे अप्पू म्हणाल तर अपर्णाचे शॉर्ट नेम अप्पू केले असावे. पण आपल्या भावना पोचल्या Happy

हो

ऋन्मेऽऽष मित्रा,

दिसामाजी तुझे चित्रपट परिक्षण जमु लागले आहे....
चांगला होता..हा चित्रपट आणि अर्थात तुझा हा लेख ही.

-प्रसन्न

सुयोग, येस्स, मल्याळम चित्रपटाचा रीमेक आहे.. पण ते कुठे जाणवत नाही, मराठी टचच आहे चित्रपटाला..

अर्थात अंकुश आणि सचित हे दोघेही मुलगेच असल्याने त्यांचे काही पटकन प्रेमबिम जुळत नाही. Lol

परिक्षण आवडले. चित्रपट बघावासा वाटत आहे Happy

मीसुद्धा पाहीलाय चित्रपट. त्या दुनियादारी पेक्षा तरी खूप खूपच उजवा वाटला. तो अन्या काय क्युट दिसतो ना. ऊफ्फ काय स्माईल आहे त्याची. मी तर जाम फिदा झालेय त्याच्यावर
मराठी फिल्म चा रणबीर कपुर Wink

पण एक झोल आहे. सत्या आणि सोकु (ज्यु) चं प्रेम अन्याच्या पार्टीतल्या गाण्यापासुन सुरु होतं ना?
मग सोकु (ज्यु) ची मैत्रिण जेव्हा शेवटी सांगते कि तिचं आणी अन्याचं प्रेम होतं, ते तर ह्या गाण्याच्या आधीपासुनच दाखवलय.
( कारण ते गाणं तिनेच लिहीलेलं असतं ) पण त्याची मैत्री तर त्या पार्कींग इन्सीडन्स नंतर झालेली दाखवली आहे.

मला माहिती आहे मी एवढं निट नाही लिहीलय पण तरी समजल असेल मला काय म्हणायचय???