मेढींतुन नाद किड्यांचा कानावर हलका येतो
दारावर वारा कातर का गीत उदासिन गातो
मातीत बुजवली स्वप्ने केलीत उशाशी गोळा
कंदील पेटला काळा तू झोप तान्हुल्या बाळा..
गवताच्या पाचोळ्याचे हे छप्पर हसते आहे
पेटली कधीची नाही ती चूल धुमसते आहे
मी पेज पिठाची देते तू नको करु कंटाळा
कंदील पेटला काळा तू झोप तान्हुल्या बाळा...
झोपडि ही माळावरची रात्रीत उगा थरथरते
तुटलेली जुनाट खिडकी लावली तरी करकरते
अंधार भयानक पडता टिटवीला सुचतो चाळा
कंदील पेटला काळा तू झोप तान्हुल्या बाळा....
बरडावर असेल नक्की जित्राब कुणाचे मेले
चवताळून पिसाट कुत्रे परसातुन भुंकत गेले
घाबरु नको थोडाही तू झाक अता रे डोळा
कंदील पेटला काळा तू झोप तान्हुल्या बाळा...
बावडी कोरडी झाली छातीतिल पाझर सुकला
पडतात भुकेची स्वप्ने बोचरा घसाही थकला
पाऊस बरसता यंदा शिकवीन तुला मी शाळा
कंदील पेटला काळा तू झोप तान्हुल्या बाळा...
-- संतोष वाटपाडे (नाशिक)
अगदी विव्हळ करून टाकणारी
अगदी विव्हळ करून टाकणारी रचना!!!
मस्त,...
मस्त,...
जबरदस्त
जबरदस्त
अगदी विव्हळ करून टाकणारी
अगदी विव्हळ करून टाकणारी रचना!!!>>>+१११
धन्यवाद मित्रांनो....
धन्यवाद मित्रांनो....
खुपच मस्त......
खुपच मस्त......
खुपच मस्त......
खुपच मस्त......