आपण स्वतःला आरशात पाहूया

Submitted by मुंबई ग्राहक पं... on 18 April, 2015 - 13:19

एक काळ असा होता की दिवाळी जवळ आली याची चाहूल लागायची घराघरातून येणाऱ्या चकल्या व कडबोळी तळणाच्या खमंग वासाने किंवा साजूक तुपात भाजलेल्या रव्याच्या सुवासाने! मात्र आजकाल दिवाळी जवळ आल्याची सूचना मिळते ती दुकानांवर लागलेल्या सेलच्या पाट्यांनी आणि खरेदीच्या निरनिराळ्या योजनांच्या जाहिरातींनी - "एका नगावर एक फ्री", "scratch कार्ड खरडा नी शेकडो बक्षिसे मिळावा", "शून्य टक्के दराने कर्ज घ्या आणि कोरी करकरीत गाडी खरेदी करा" अशा अनेक योजनांचा भूलभुलय्या ग्राहकांना अडकवण्यासाठी सज्ज असतो. याचे कारणही तसेच आहे -- आजकाल सण म्हटला की खरेदी जोडीने येतेच! अर्थात पूर्वी सणासुदीला खरेदी होत नसेच असे नाही. दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर एखादा दागिना किंवा सोन्याच्या वळ्याची खरेदी व्हायची. आणि हे नाहीच जमलं तर कुटुंबियांसाठी कपड्याचे एक दोन जोड तर घरात यायचेच. अगदी आजही टी. व्ही., फ्रीज यासारखी मोठी खरेदी सणाच्या मुहूर्तावर होते. त्यात आता भर पडली आहे ती भेटवस्तूंच्या खरेदीची! दिवाळी, नवीन वर्ष, वाढदिवस अशा अनेक निमित्ताने भेटवस्तू देण्याची पद्धत आता रूढ होत आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या आर्थिक अंदाजपत्रात भेटवस्तूंची आणि सुखसोयीच्या वस्तूंची खरेदी हा विषय महत्वाचा झाला आहे.

सणासुदीला किंवा भेटवस्तूंच्या निमित्ताने केलेली खरेदी हा आनंदाचा भाग असतो यात शंका नाही. परंतु हळूहळू सण, खरेदी आणि आनंद/समाधान यांचे समीकरण होत आहे; किंबहुना खरेदी शिवाय सण साजरा झाला आहे असे वाटूच नये हे चिंताजनक आहे. एका अर्थाने खरेदीच्या या हौशीचा हळूहळू हव्यास होत आहे हे आपल्या लक्षात येतंय का? आणि या हव्यासाला खतपाणी घालतायत त्या जाहिराती आणि खरेदीच्या विविध योजना! या खरेदीमुळे बाजारातील उलाढाल प्रचंड वाढली आहे, बाजार वस्तूंनी खचाखच भरले आहेत हा त्याचा दृश्य परिणाम होय, परंतु एक अदृश्य परिणाम आपल्या विचारसरणीवर झाला आहे; आपण नकळत एका वस्तू संस्कृतीच्या (commodity culture) आहारी जात आहोत हे नि:संशय! प्रेम, कृतज्ञता, नातेसंबंध इ. भावना आपण आता भेटवस्तूंद्वारे व्यक्त करायला लागलो आहोत की काय असे वाटू लागले आहे. क्वचित स्वत: बाजारात जाऊन भेटवस्तू खरेदी करण्याचे कष्टही न घेता, परस्पर मागणी घेऊन भेटवस्तू योग्य त्या व्यक्तीला पोहोचवण्याची सोय झाल्याने या व्यवहारातील वैयक्तिक स्पर्शही (पर्सनल टच) नाहीसा होईल की काय अशी भीती वाटते. पाश्चात्य संस्कृतीचे हे लोण आपल्याकडे येऊ घातले आहे याचीही नोंद घेणे गरजेचे आहे.

याच्याशी संबंधीत आणखी एक विषय असा की भेटवस्तू जितकी महाग तितके प्रेम, जिव्हाळा जास्त असे भावनांचे मोजमाप तर होत आहेच -- त्यातही या वस्तू विशिष्ट brandच्या असतील तर देणाऱ्याला व घेणाऱ्याला अधिक आनंद वाटतो. एकूणच अगदी दैनंदिन गरजेच्या साबण, टूथपेस्ट, खाद्यपदार्थ यासारख्या वस्तूंपासून ते कपडे, बूट, सौंदर्यप्रसाधने इ. पर्यंत brand चे प्रस्थ वाढू लागले आहे. प्रसिद्ध brand च्या महाग वस्तू वापरणे हे प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे. अगदी लहान मुले सुद्धा आता brand च्या बाबतीत आग्रही होऊ लागली आहेत. brand ला मिळणाऱ्या अवास्तव महत्वामुळे वस्तूचा दर्जा, उपयुक्तता, किंमत इ. न तपासता डोळे झाकून खरेदी करण्याची प्रवृत्ती ग्राहकांमध्ये वाढीला लागली आहे. याचा एक परिणाम असा की आपल्या brand चे नाव ग्राहकांवर ठसवण्यासाठी उत्पादकांचा जाहिरातींवरचा खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे एखाद्या नवीन चांगल्या दर्जाच्या brand ला बाजारात शिरकाव करणेही कठीण झाले आहे. आणि काही चांगल्या दर्जाचे जुने brands स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे बाजारात दिसेनासे झाले आहेत. एका अर्थाने या अतिरेकी brand प्रेमामुळे बाजारात मक्तेदारीसदृश परिस्थिती निर्माण करायला ग्राहकच कारणीभूत आहेत असे म्हणता येईल. पूर्वी बाजारात अनेक प्रकारचे न्याहारीचे पोहे (सिरियल फ्लेक्स ) उपलब्ध असत. आज एकच परदेशी brand सर्वत्र दिसतो आणि तो वापरणे प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे हे एकच उदाहरण यासाठी पुरेसे आहे. ग्राहक म्हणून आपले निवडीचे स्वतंत्र येथे मर्यादित होत आहे याची येथे आठवण करून देणे गरजेचे आहे.

शेवटी, आणि महत्वाचे असे की ग्राहकांच्या या खरेदी ज्वराचा फायदा घेण्यासाठी व्यापारीवर्गाने योजलेल्या खरेदीच्या अनेक योजना, जाहिराती इ. च्या भूल्भूलाय्यामुळे बेसावध ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रमाणही वाढत आहे. ग्राहक संघटनांकडे येणाऱ्या तक्रारींच्या वाढत्या संख्येवरून हे लक्षात येते. त्यामुळे ग्राहक जागृतीच्या विविध उपक्रमांवर आज ग्राहक संघटना भर देत आहेत. यासाठीच मु. ग्रा. प. ने संस्कारक्षम वयातील शालेय विद्यार्थ्यांना ग्राहक दृष्टी देण्याच्या दृष्टीने मुंबई, ठाणे, पुणे, आणि कोकण या भागातील शाळांमध्ये ग्राहक मंडळे स्थापन केली आहेत.

ललिता कुलकर्णी
मुंबई ग्राहक पंचायत

(सदर लेख मुंबई ग्राहक पंचायतीच्या ब्लॉगवर http://punemgp.blogspot.in वर पुर्वप्रकाशित )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad ग्राहक पंचायत हे ही पाश्चात्य संस्कृतीचे लोण नाही का? बेटर बिझीनेस ब्युरो सारख्या पाश्चात्य संस्थांवरून बेतलेली ही संस्था नाही का (अर्थात भारतीय ग्राहकाच्या गरजांसाठी तिच्यात योग्य ते फेरबदल केले आहेत) ?

ग्राहक पंचायत हे ही पाश्चात्य संस्कृतीचे लोण नाही का?
>> समजा असलेच तर काय बिघडले? लोण हे चांगलेही असू शकते. या निमित्तने ग्राहकांचे प्रबोधन होत असेल, फसवणूक टळत असेल तर केवळ पाष्चात्य आहे म्हणून ते टाकावू कसे ठरते?

नाही, टाकावू नाहीच आहे. ग्राहक पंचायत आवश्यक आहेच. पण आपल्या प्रिय लोकांना भेटवस्तू परस्पर देण्याची सोय सुद्धा ह्ल्ली आवश्यक आहे. उगीच ही सोय, ही पद्धत पाश्चात्य आहे म्हणून उल्लेख करण्याचे प्रयोजन काय??

भेटवस्तू, वस्तूसंस्कृती विषयावर जरा अवांतर करतो, क्षमस्व !

मला वाटते भेट देणे घेणे हे आवश्यक सदरात जाण्यापासून वाचवणे गरजेचे आहे .
एखाद्याला मनापासून काहीतरी द्यावस वाटणे आणि ते देणे यात काही म्हणजे काहीच गैर नाही.
पण हि जेव्हा ती नकळत समजाची गरज बनते तेव्हा अडचणी सुरु होतात. पैसेवाले पटकन काहीतरी देऊन मोकळे होतात, पण घेण्याऱ्यास मग काहीतरी तोडीस तोड देणे येतेच. अशाने मग पैश्याची जमवाजमव करून भेटवस्तू घ्यावी लागेल अशी वेळ कित्याकांवर येते. केवळ प्रतिष्ठा, समाजाच्या दडपण यामुळे आर्थिकरित्या थोडे नाजून असलेले लोक (परिवार) भरडले जातात. अशा भेटवस्तू मध्ये मग भावना उरत नाहीत आणि गोष्टी निरर्थक व्हायला लागतात.
त्यामुळे मला वाटते हे भेटवस्तू देणे घेणे अगदी मोजक्या आणि योग्य वेळीच व्हावे. उगाच तिळगुळा सोबत भेटवस्तू, आपट्याच्या पानासोबत भेटवस्तू असे लोण पसरवण्यात फारसा अर्थ नाही.

वरील लेखात ग्राहक पंचायतीस ब्रांड या गोष्टीबद्दल नाराजी दिसून येतेय. असे का.?
ब्रांडेड वस्तू या बऱ्याचदा छान अनुभव देतात, त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर ते तिथे पोहोचलेले असतात. ब्रांड म्हणजे महागच हे समीकरण पण बरोबर वाटले नाही.
Brand is a type of product manufactured by a particular company under a particular name. (गुगल)
या अर्थाने पार्लेजी बिस्कीट, TATA मीठ हे सुद्धा ब्रांडच आहेत कि!

नवीन brand ला बाजारात शिरकाव करणेही कठीण झाले आहे >>> स्पर्धा आहे ; पण चांगली क्वालिटी देऊन सुद्धा brand चालला नाही अस क्वचित होत. झाल तर मार्केटिंगमध्ये कमी पडल्याने होऊ शकत. मार्केटिंग मध्ये कमी पडणे हि चूकच नाही का.? ब्रांडीग, मार्केटिंग कि व्यवसायाचे मुलभूत अंग आहेत. याबद्दल पंचायत नाराज आहे असे दिसले पण कारण कळाले नाही. हे कृपया समजावून सांगू शकाल का.?

काही चांगल्या दर्जाचे जुने brands स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे बाजारात दिसेनासे झाले आहेत. >>>त्यांनी बदल्लेले वारे ओळखले नसतील त्यामुळे ते बाद झाले. हे तर नैसर्गिकच आहे असे मला वाटते.

बाकी पोह्याचे उदा थोडे पटले. केवळ 'ब्रांडचे पोहे' म्हणून स्तोम न माजवायला आणि बुद्धीने निर्णय घ्यायला ग्राहकांनी शिकले पाहजे हे कळाले. पण तो ब्रांड जर कमी किमतीत छान क़्वालिटी देत असेल तर ग्राहकाने तेच घ्यायला हवे ना.? याबद्दल पंचायतीचे मत काय आहे ते कृपया सांगावे.

मुंबई, ठाणे, पुणे, आणि कोकण या भागातील शाळांमध्ये >>> नाशकात पण करा ना हे..

चूभूदेघे
धन्यवाद __/\__