वारी - भाग ८

Submitted by टवणे सर on 22 March, 2015 - 00:10

भाग ७ (http://www.maayboli.com/node/15006)

पहाटे चार-साडेचारच्या सुमारास काकांनी मला उठवलं. थंडीमुळे मी जाड रजई तोंडावरून गुरफंटून झोपलो होतो. काकांनी उठवल्यावर रजई बाजूला केली आणि थंडी एकदम अंगात रुतली. मी दात आवळून, खांदे आकसून परत पांघरुण तोंडावर घेणार एव्हड्यात 'मी परसाला जाऊन येतो. तू दात घासून घे. पलीकडे रस्ता ओलांडून टेकाड चढून मागे जा मग संडासाला.' असं सांगून काका अंधारात चालत गेले. मी तरी परत पांघरुण अंगाभोवती गुंडाळून बसल्या-बसल्याच छोटीशी डुलकी काढली. डुलकीत मान एकदम खाली जाऊन झटका बसला आणि आजचा जेवणापर्यंतचा पल्ला फार मोठा आहे असं आठवल्यानं मी एकदम ताडदिशी जागा झालो. आजूबाजूला अजून बरेच लोक झोपलेले होते. बापू चिवटे अंथरुणावर नव्हते. माझी चाहूल लागल्याने धनंजय जागा झाला आणि त्यानं आ - ऊ करत मोठमोठ्याने आळोखे पिळोखे देत आळस झटकला. मैदानाच्या दुसर्‍या टोकाला आचार्‍यांनी सिंगल शेगडीचा मोठा गॅस पेटवलेला दिसत होता. गॅसवर एका मोठ्या पातेल्यात चहा उकळत होता बहुतेक.

मी पांघरुणाची घडी केली. उश्याला घेतलेल्या पिशवीतून ब्रश-पेस्ट काढली व वर टाकीकडे जाऊन दात घासून आलो. काका अंथरूण गुंडाळत होते. धनंजय आपलं अंथरुण आवरून टमरेल घेऊन निघाला. 'दादा, मी जाऊन येतोच. मग आपण एकत्रच निघुया.'
'तू पण जाऊन ये रे.' काका मला म्हणाले.
'नाही, मला लागली नाहिये अजून.'
'मग दिवसा वाटेत कुठेतरी जायला लागेल हां. सगळा बोडका माळ आहे त्यावर कुठे आडोसा पण सापडत नाही मग.'
'असुदे.'
'बरं. मी बेडिंग आणि पिशव्या ट्रकमध्ये टाकून येतो. ह्या तुझ्या पिशवीत दोघांचे टॉवेल, चड्ड्या घेउया. बाकी काही नको बरोबर हातात चालताना.' असं म्हणत त्यांनी ह्यातलं त्यात, त्यातलं ह्यात असं करून बरोबर घ्यायची आणि ट्रकमध्ये टाकायची अश्या सामानाच्या दोन पिशव्या केल्या. एका खांद्यावर बेडिंग आणि दुसर्‍या हातात ट्रकमध्ये टाकायची पिशवी घेऊन ते सामानाच्या ट्रककडे गेले. मी बरोबर घ्यायची पिशवी आणि चहासाठी स्टीलचे पेले हातात घेऊन चहा बनवत होते तिकडे गेलो.

लोकं आता हळुहळु चुळबुळायला लागली होती. आचारी चहा करत होते त्या मैदानाच्या टोकाला झोपलेली दिंडीतली माणसं मात्र अजूनही गाढ झोपलेली होती. मी दोन पेले पुढे करून चहा भरून घेतला आणि बाजूलाच विनोबा बसला होता त्याच्याशेजारी जावून चवड्यांवर बसलो. एक पेला जमिनीवर ठेवला आणि दुसर्‍या पेल्याच्या वरच्या कडेला दोन्ही हात गुंडाळुन ऊब घेत चहा फुंकायला लागलो.
'कसं काय पुतणेशेठ. झोप लागली का निवांत?'
मी मानेनंच हो म्हटलं.
'आज नेट लाव. आपला ठेका पकडायचा बघ चालताना. त्या तुझ्या काकाच्या बरोबरीनं चालू नकोस. उगाच दमशील.' ख्याख्याख्या हसताना गॅसशेगडीच्या प्रकाशात त्याचे वेडेवाकडे दात दाढीतून एकदम फूटभर बाहेर आल्यासारखे दिसले.

आता पेल्यातला चहा थोडा कोमटसर झाल्याने मी आख्ख्या पेल्यालाच तळवे गुंडाळुन हात शेकले. तितक्यात काका आले. त्यांच्या मागोमाग धनंजय आणि गडबडीत आवरून आल्यासारखा सुधीर पण आला. पाठोपाठ बापू चिवटे, त्यांची बायको आणि शिल्पा आली. शिल्पाबरोबर काळी आरती होतीच.
मी, काका, विनोबा, धनंजय सगळेच स्टीलच्या पेल्यातून चहा पीत होतो. सुधीरने मात्र खिशातून एक प्लास्टिकची पिवळ्या रंगाची चकती काढली. मग त्या चकतीच्या मध्ये बोट घालून ते त्याने वर ओढले तर एकात एक, एकात एक अश्या लहान चकत्या वर येऊन शंकूसारखा वर निमुळता होत गेलेला प्लास्टिकचा एक पेलाच तयार झाला. जिथे तिथे शायनिंग मारायची गरजच होती सुधीरला.
'माझ्याकडे अ‍ॅल्युमिनिअमचे कॅन्टीन आहे. एकदम हलके. ट्रेकिंगला घेऊन जायला. त्याच सेटबरोबरचा आहे हा ग्लास'. त्याच्याकडे उत्सुकतेने बघणार्‍या बाकीच्यांकडे बघत त्याने उगाच माहिती दिली.
दादा कॉलेजात कँटिनला चहा आणि वडा खातो ते वहिनीचे कँटिन मला माहिती होते. तसेच स्टेशनजवळ एक अश्विनी कँटिनपण होते. कुणाला स्टेशनवर सोडायला गेलो की मग परत येताना मी-आई-बाबा-ताई अश्विनी कँटिनमध्ये डोसा खायचो. हे सुधीरचे अ‍ॅल्युमिनिअमचे कँटिन म्हणजे काय ते काय मला कळले नाही.

चहा संपल्यावर आम्ही सगळे आपापल्या पिशव्या खांद्यावर लटकवून निघालो. मी मैदानावरुन रस्त्यावर येता येता मागे वळून पाहिले. मैदानावर आता बरीच हालचाल जाणवत होती. अंधूक प्रकाशात अंथरुणांवर उठून बसलेली लोकं रस्त्याच्या कडेला उस तोडणार्‍या टो़ळ्यांच्या उभारलेल्या पालांसारखी दिसत होती. धनंजयच्या मनगटावर घड्याळ होते. मी किती वाजले विचारले तर तो ५ वाजलेत म्हणाला.

रस्त्यावर चालायला सुरुवात केल्यावर पाच-दहा मिनिटातच सगळे जण आपापला वेग पकडून पांगले. शिल्पा, आरती आणि चिवटे काकू हळुहळु चालत मागे पडल्या. विनोबाने त्याचा प्रसिद्ध वेग धरला आणि दिसेनासा झाला. त्याच्याकडे बॅटरी पण नव्हती. त्यामुळे अंधुक प्रकाशात तो बराच वेळ भुतासारखा समोर दिसत राहिला आणि थोड्या वेळाने एका वळणावर अदृश्य झाला. काकांनी थोडं चालताच कालसारखेच डोक्याचा मफलर काढून कमरेला गुंडाळला. त्यांच्या हातात त्यांना कामावर मिळणारी स्टीलची चकचकीत फूटभर लांबीची बॅटरी होती. काका एका हातात बॅटरी पकडून पावलासमोर रस्त्यावर प्रकाश टाकत मोठ्या ढांगा टाकत निघाले होते. उजेड होईपर्यंत माझ्याबरोबरच चाल असं त्यांनी मला बजावलं होतं. धनंजय गुढग्यापर्यंत लांब खाकी चड्डी घालून आमच्या आगेमागेच चालत होता. बापूपण दादांबरोबर शक्य होईल तेव्हडं चालायचं म्हणजे उन्हाआधीच बरचसं अंतर कापून होईल म्हणुन वेग राखत चालत होते. आम्ही रस्त्याच्या कडेने चालत होतो. बर्‍याच ठिकाणी रस्त्याचे डांबर आणि बाजूची मातीची पट्टी यात वीतभर उंचीचा फरक होता. डांबराचे गोळे वा दगड धोंडे पायाखाली येत होते. काकांच्या हातातल्या बॅटरीचा गोल प्रकाश पडत होता त्यावर नजर ठेवून मी दगड चुकवत होतो. मधूनच एक-दोनदा मैलाच्या दगडाचा पिवळा अर्धगोल बॅटरीच्या प्रकाशात चमकला.

अर्धा-पाउण तास चालल्यावर काळामिट्ट अंधार थोडा फुटायला लागला. काकांनी मी, धनंजय आणि बापू त्यांच्याबरोबर चालायची कसरत करत होतो ते बघितले. त्यांनी माझ्या हातात बॅटरी दिली आणि म्हणाले तू ये तुझ्या वेगाने. आपण नागजच्या जवळ कुठेतरी चहा पिउया.
'दादा, आज केरेवाडीला उप्पीट आहे कुणाकडून तरी'. बापूंनी माहिती दिली.
'अरे हो की. तू ये मग तिथं बापूबरोबर. मी वाट बघतो' असं म्हणुन काका सुसाट सुटले.

माझ्या हातात बॅटरी आल्याने मला एकदम बरं वाटलं. आता मी हवा तसा बॅटरीचा गोल रस्त्यावर मारत निघालो. रस्त्यावर आता गाड्यांची रहदारी पण वाढायला लागली होते. आजुबाजुच्या गावातून दुधाचे कॅन भरलेल्या जीपा मिरजेकडे निघाल्या होत्या. पहाटेच्या कवठेमहंकाळ डेपोच्या बशी पण मिरज-सांगली-कोल्हापुरला निघालेल्या. समोरून येणार्‍या या गाड्यांच्या प्रकाशात रस्ता एकदम झळाळून जात होता. आमच्या डोळ्यांवर पण एकदम प्रकाश चकाकत होता. एखादा ट्रक जर गेला तर डोळे दिपूनच जात होते. मला माझ्या हातातली बॅटरी एकदम पॉवरफूल आहे असे वाटत होते. जर मी ती येणार्‍या ट्रकच्या ड्रायवरच्या डोळ्यावर मारली तर त्याचेपण डोळे दिपतील का असा मला प्रश्न पडला. एक-दोन ट्रकड्रायवरांवर मी बॅटरी मारण्याचा विचार केला मात्र शेवटच्या क्षणी त्यांच्यावर झोत मारायला धरलेली बॅटरी मी रस्त्यावर रोखली. जर त्या ड्रायवरचे डोळे दिपले तर तो ट्रक रस्ता सोडून बाजुच्या झाडांवर घालेल अशी मला भिती वाटली. शेवटी एकदा धीर करुन मी येणार्‍या ट्रकवर बॅटरीचा झोत मारला, मात्र तो ट्रक आरामात निघून गेला. आतल्या ड्रायवरने माझ्याकडे बघितले पण नाही बहुतेक.
'तुला काय वाटलं तुझ्या बॅटरीनं त्या ट्रकाच्या ड्रायवरला त्रास होईल? यडा कुटला!' धनंजय हसत हसत माझ्या पाठिवर थाप मारत म्हणाला. मला एकदम चोरी पकडल्यासारखं कानकोंडं झालं. मी काय करतोय हे त्याच्या लक्षात येईल असं मला लक्षातच आलं नव्हतं.

साधारण दीड तास गेल्यावर बर्‍यापैकी उजाडलं. आम्ही पुर्वेकडेच निघालो असल्याने समोरच तांबडं फुटलं होतं. मी बॅटरी बंद करून दांडपट्टा फिरवल्यासारखी उगाचच हातात फिरवत होतो. बापू मगाशीच कुठेतरी मागे पडले होते. धनंजय रस्त्याखालून पाणी जायला घातलेल्या पाइपच्यावर बांधलेल्या सिमेंटच्या कट्ट्यावर बसला व त्याने बूट खोलून पायाला जरा हवा दिली. माझे पाय अजिबात दुखत नव्हते. त्यामुळे मी नुसताच बाजूला उभा राहिलो, बसलो नाही.
'आठ-नऊ किलोमीटर तरी चाललो असू आपण. उन्हं चढायच्या आत जेव्हडं होईल तेव्हडं बरं, काय?'
'ह्म्म.' मी नुसताच हंबरलो.
'केरेवाडी अजून तासभर तरी असेल. नागजच सतरा किलोमीटर आहे लांडगेवाडीपासून. म्हणजे तीन तास धर सकाळच्या आपल्या वेगाने आजच्या. केरेवाडी नागजच्या अलिकडेच आहे म्हणे.'
'नेहेमी नसतो काय केरेवाडीला नाष्टा?' मी विचारलं.
'मला काय माहिती. मी पहिल्यांदाच येतोय. पण बापू म्हणाला आजकाल बरीच लोकं जेवण नाष्टा असं देतात वारीत. बापूला दु:ख जेवण कुणी दिलं तरी वारी कमिटीवाले पैसे कमी करत नाहीत याचं' ह्याह्याह्या करत तो जोरात हसला.
'ह्म्म.' मी पुन्हा हंबरलो.
'चला. निघुया.' पायात पुन्हा बूट चढवत धनंजय म्हणाला.

आता आजुबाजुला एखाद-दुसरा वारकरी दिसत होता. आजुबाजुच्या शेतातून लोकांची कामं सुरू झाली होती. विहिरींवरचे पंप पाणी उपसत होते. इकडे फारसा ऊस दिसत नव्हता. शाळू, अधेमधे भाज्या, कुठेतरी गहू असं दिसत होतं. शाळूची कणसं, गव्हाच्या लोंब्या कुठे कुठे फुटू लागल्या होत्या. या पूर्व भागात पाणी नाही म्हणुन ऊस नाही असं भाऊ म्हणायचे ते मला आठवलं. भाऊ रोज शेतावर जायचे. शेवटची दोन-तीन वर्षे त्यांना रोज जायला जमायचं नाही कारण त्यांनी सायकल चालवणं बंद केलं होतं. मग ते सिटी बसनी जायचे. पण वड्डीला जायला सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अश्या तीनच बस होत्या. त्या पण कधी कधी रद्द व्हायच्या. आणि ती बस पकडायला आधी अर्धं अंतर चालून स्टँडवर जायला लागायचं. तसं मार्केटातून स्टँडवर जायला बस मिळायची. पण तेव्हड्यासाठी कशाला अजून एका तिकिटाचे पैसे द्या म्हणुन भाऊ स्टँडपर्यंत चालतच जायचे. सुट्टी असेल शाळेला तर मी पण भाऊंबरोबर शेतावर जायचो. वड्डी गावातनं बस ढवळीला जायला वळायची. आमचं शेत शीवेवरच होतं. बस गाडी रस्त्यावर सोडली की आत अर्धा तास चालत जायला लागायचं. बसमधून जाताना भाऊ मला सगळ्या शेतांची नावं सांगायचे. मुजावर पैलवान, पिड्डे, कोळी, शिरढोणे, कदमाची म्हातारी अश्यांची ही शेतं होती. चालताना कुणीतरी 'काय आज नातवाला घेऊन काय' असं विचारायचं. मग भाऊ नुसतेच हसायचे आणि 'भुईमुग कसा आलाय या वेळी तुझा' नाहीतर 'कांदा गावातल्या घरात न्यायचाय. बैलगाडी लागेल तुझी म्हाद्या' असं ह्याच्याशी त्याच्याशी बोलत पुढे चालत राहायचे. भाऊ नेहेमी हसायचे. 'कशाला रोज रोज उन्हाचं जाता शेतावर' असं बाबा नाहीतर काका वैतागून म्हणाले तरी भाऊ नुसतेच हसायचे. शेतावर मग म्हशींची पाठ खाजवत गोंविदाशी भाऊ काहीतरी बरीच अगम्य बडबड करायचे. गोविंदा आमचा गडी होता. त्याला फक्त कानडी येत असे. भाऊंना कानडी समजायचं बहुतेक पण ते त्याच्याशी बोलायचे मराठीत. गोंविदा मराठीचा एक शब्द बोलत नसे. मग बराच वेळ झाल्यावर बरोबरच्या खाकी उभट पिशवीतून भाऊ फुलस्केप वही बाहेर काढायचे. त्यात हिशोब लिहिला जायचा. भाऊंच्या मोडी लिपीत लिहिलेला हिशोब कानडीत लिहिलाय की मराठीत असा प्रश्न पडायचा. मला तर त्यातले कधीच काही वाचता आले नाही. अधे मधे त्यात उभ्या उभ्या रेघा असायचा. त्या त्या-त्या दिवशी किती पुरुष आणि बायका कामाला होत्या त्याच्या रेघा असत. किती माणसे कामाला होती यावरून बहुतेक नेहेमी भाऊ आणि गोविंदात एकमत होत नसे. मग बराच वेळ असं झाल्यावर गोविंदाची बायको मल्ली शेळीच्या दुधाचा चहा स्टीलच्या छोट्या कपातनं देत असे. त्याला कुबट वास यायचा. पण आई-आजी मला चहा देत नसल्यामुळे मी तो आनंदाने प्यायचो. मग मल्ली तिच्या खरबर्‍या हातांनी माझ्या गालाला कुरवळायची. गोविंदा आणि मल्ली बरेच म्हातारे दिसायचे पण त्यांचा मुलगा परश्या वयाने माझ्याएव्हडाच होता. परश्या वड्डीला शाळेत जायचा. काड्यापेट्या आणि बाभळीचे काटे वापरून तो ट्रॅक्टर - डंपर असल्या वस्तू करायचा. तो सकाळी सकाळी सुद्धा निवांत त्याचा नेहेमीचा गुढग्यापर्यंत येणारा मळलेला पांढरा शर्ट घालून फिरत असायचा. मला मात्र आई घरी विणलेला स्वेटर, कानटोपी असं सगळं घालून पाठवायची. मग शेतावर गेलो की मी कानटोपी काढून भाऊंच्या पिशवीत टाकायचो.
'पावसाळ्यात तू आलास तर डोक्यापर्यंत आत जाशील एव्हडा चिखल होतो.' भाऊ सांगायचे.
'खरंच! आपण येऊया की भाऊ'
'नको. त्यापेक्षा आपण मळणीला येऊया. खळ्यावर बसून परडी करुया मस्त, आणि रात्रभर जागायचं मग.'
पण दरवर्षी मळणीला मुक्कामाला बाबाच जायचे. आधी भाऊपण जायचे मुक्कामाला. पण मग नंतर त्यांनी बंद केलं. आईनं मला थंडीनं आजारी पडेन म्हणुन कधीच पाठवलं नाही. परश्या मात्र रोज शेतावरच मुक्कामाला असायचा. कारण त्याचं घरंच तिथे होतं.
एकदा मी आणि परश्या ऊस खात होतो.
परश्या म्हणाला 'टोळ्या आल्यात. आपला ऊस जाईल आता दोन दिवसात दत्तला'.
'आपला नाही. आमचा. आमचं शेत आहे हे.' गोविंदानं हाक मारली म्हणुन मग परश्या तिकडे गेला.
मला थोडं वाईट वाटलं. असं बोलायला नको होतं. भाऊंना नंतर सांगू म्हणुन मी लक्षात ठेवलं होतं. पण कधी सांगितलं नाही.
मग भाऊच गेले. दंडोबासारखा शेतावरचा मुक्काम पण राहून गेला.
आता गोविंदाला पण काढून टाकला. हिशोब मात्र अजूनही त्या भाऊंच्या हिशोबाच्या वहीतच होतात आणि ती वही ठेवायची खाकी पिशवी पण तीच आहे. तिला भाऊंच्या हाताचा वास येतो.

तासाभरात मी आणि धनंजय केरेवाडीला पोचलो. लांडगेवाडीसारखेच केरेवाडी पण रस्त्याच्याच दोन्ही बाजूला पसरले होते. गावात रस्त्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळी दुकानं होती. एक-दोन शेवचिवड्याची नाष्ट्याची हाटेलं होती. थोडी किराण्याची दुकानं होती. आणि पिवळा रंग दिलेली खत-औषधाची शेतीचं एक दुकान. त्या दुकाना बाहेरच्या फळ्यांवर सकाळपासूनच काही लोक येऊन बसलेले होते. आत मालक देवाच्या तसबिरींची पुजा करत होता. शेवचिवड्याच्या हाटेलाबाहेरच्या फळ्यांवर काही लोक वर्तमानपत्रं उघडून चहा पीत बसले होते. मी आणि धनंजय गाव ओलांडून पुढे आलो तर डाव्या हातालाच थोडी आत टेकाडावर एक ग्रामपंचायतीची कसलीतरी बसकी दोन खोल्यांची इमारत दिसत होती. तिची पाठ रस्त्याकडे होती. एक कमान व त्याखाली गेट होते. बिजागर्‍या तुटल्याने गेटचा अर्धा भाग जमिनीवर टेकला होता. उरलेला अर्धा भाग गायब होता. गेटातून लेंगे-पायजमे घातलेल्या आणि खांद्यावर पताका घेतलेल्या आमच्या वारीतल्याच पाच-सहा जणांचा घोळका बाहेर आला.
'उप्पीट आत आहे बघा' असं म्हणुन ते पुढे गेले.

मी आणि धनंजय आत वळलो. इमारतीला वळसा घालून आलो तर एक सपाट केलेलं छोटं मैदान तिच्यासमोर होतं. इमारतीच्या व्हरांड्यात मोठ्या स्टीलच्या डब्यातून उप्पीट तयार करून आणलेलं होतं. एका मोठ्या तोटीवाल्या पिंपात चहा होता. आणि मैदानात ताडपत्री पसरली होती. बूट काढून मी आणि धनंजय दोघे आधी एका पिंपात ठेवलेलं पाणी प्यायलो. काका ताडपत्रीवर एका खुरट्या झाडाला टेकून डोळे मिटून बसले होते. कागदाच्या डिशमध्ये भरपूर उप्पीट आणि पेलाभरून चहा घेऊन आम्ही दोघेही काकांच्या शेजारी येउन बसलो.
'पोचलास. दमलास का?' काकांनी विचारलं.
मी मान हलवूनच नाही म्हटलं.
'बर खा आता निवांत. मी पण बसतो अजून थोडा वेळ. ऊन चढायला लागलय. सगळा बोडका माळ आहे आता घोरपडी नाल्यापर्यंत. एकत्रच जाऊया मग. '
'दादा, जेवण घोरपडी नाल्याला ना? किती अंतर आहे अजून?' धनंजयने उप्पीटाचा मोठा बकाणा भरत विचारलं.
'अजून दीड तास तरी लागेल बघ. आंघोळीला थांबायला लागेल, त्यात एक अर्धा तास जाईल. आणि हे काळू बाळूचे डोंगर सरत नाहीत या रस्त्यावर'.
'साडे आठ झाले. नऊला निघालो तरी अकरा/साडेआकरा वाजतील. ऊन चढणार'.

ह्या काळूबाळूच्या डोंगराबद्दल मी लहानपणापासून भाऊंकडून ऐकलं होतं. मी बसल्या जागेवरनंच लांब पंढरपूरकडे नजर टाकली तर लांबवर सुर्योदयाच्या चित्रात काढतात तश्या दोन एकमेकांना चिकटलेल्या टेकड्या होत्या व त्यांच्या मधोमध निमुळता होत रस्ता गेलेला दिसत होता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षांनी पुढचा भाग ! Happy

बहुत देर आए लेकिन दुरूस्त आए.... वारी पुर्ण कराल ही अपेक्षा Happy

छानच लिहिलयं. पुभाप्र....!!

शंतनु.. परत एकदा तुमच्या सगळ्यांसोबत .. मी पण प्रत्येक पाउल उचलत.. वारीच्या मार्गावर तु जे जे अनुभवले..ट्रकचे दिवे,रहदारी, डांबरी रस्ता, स्टेनलेस स्टिल पेल्यातला गरम चहा,सुर्योदय, उप्पिट.. ते ते सगळे अनुभवत चाललो आहे याचा आभास झाला.. अतिशय सुंदर! पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघणारा.. मुकुंद!

आं????? चक्क चक्क चक्क वारीचा नवीन भाग? सकाळ सकाळ सुखद शॉक वगैरेच बसला. आता निवांत वाचन करते (आधीचे भागदेखील वाचायला हवेत)

धन्यवाद, टण्या.

टण्या... वारी...
मी तरी आशा सोडली होती बघ.
(देव तुझं भलं करणार ... मी म्हणजे इतकी तावून इथे आले आणि बघते तर 'वारी'...
हे म्हणजे... मृगजळ असणार हे माहीत असून आल्यावर पाणी मिळालं तर कस?... तसं).

नंदिनी म्हणतेय तसं आधीचे भाग आता वाचते परत.

मस्त वाटतय वाचायला. आता पहिल्या पासून वाचतो. Happy

कोणी तरी शोनूला सांगा की वारीचा पुढचा भाग आलाय ते. खबर द्यायला जाताना एखादा माणूस जादा घेऊन जा बरोबर, खबर ऐकून ती अत्यांनंदाने कोसळली वगैरे तर तिला धरायला. Proud Lol

टण्या, किती वर्षांच्या गॅपनंतर वारीचा पुढला भाग लिहिलास! आधीच्या भागांइतकाच अप्रतिम झालाय आणि मुख्य म्हणजे व्यवस्थित मोठा लिहिला आहेस म्हणून उदार मनानं माफ केलं! Proud

वारीचा हा भाग वाचताना पुन्हा एकदा तुझ्या लिखाणातलं काय आवडतं हे प्रकर्षानं जाणवलं. प्रत्येक शब्दात, ओळीत लिहिलेला हरेक प्रसंग, ती ती व्यक्ती उत्तम उभं करण्याची ताकद आहे. उदा: ख्याख्याख्या हसताना गॅसशेगडीच्या प्रकाशात त्याचे वेडेवाकडे दात दाढीतून एकदम फूटभर बाहेर आल्यासारखे दिसले. हे वाचलं आणि विनोबा डोळ्यांपुढे आला. Happy

>>हिशोब मात्र अजूनही त्या भाऊंच्या हिशोबाच्या वहीतच होतात आणि ती वही ठेवायची खाकी पिशवी पण तीच आहे. तिला भाऊंच्या हाताचा वास येतो. अशी वाक्य अजीबात नाटकी न होता कुठेतरी जबरी इमोशनल करून जातात.

फ्लॅशबॅक्स इतके सुंदर आणि ओघात येतात की ते अनावश्यक वाटत नाहीत. आणि मुख्य म्हणजे अजूनही एक आठवी नववीतला मुलगा हे सगळं नॅरेट करतोय याचं बेअरिंग सुटललेलं वाटत नाही, हे फार आवडलं.

फ्लॅशबॅक्स इतके सुंदर आणि ओघात येतात की ते अनावश्यक वाटत नाहीत. आणि मुख्य म्हणजे अजूनही एक आठवी नववीतला मुलगा हे सगळं नॅरेट करतोय याचं बेअरिंग सुटललेलं वाटत नाही, हे फार आवडलं. >>> अगदी अगदी.

सकाळीच फोनवरुन हा भाग वाचला होता. हा भाग इतक्या वर्षांनी का होईना टाकल्याबद्दल धन्यवाद. Happy आय होप आता पुढच्या भागाला इतकी वर्षं लागणार नाहीत.

कथा / कादंबरी विभागात टण्या हे नाव वाचून आनंद झाला. तर आहेच आहे. सध्या हातातली नेपोलियन संपल्यावर हीच वाचायला घेतो (तोवर हा आयडी टिकला तर ठीक)

आणि मुख्य म्हणजे अजूनही एक आठवी नववीतला मुलगा हे सगळं नॅरेट करतोय याचं बेअरिंग सुटललेलं वाटत नाही, हे फार आवडलं.>>+१.
मस्त जमलाय हा भाग.
पुढचे भाग पटापटा येऊ द्यात.

कृपया. Happy

१३५९ वेळा तरी कथेचं नाव अन लेखक पुन्हा पुन्हा वाचुन बघितले.. नवीन मराठी वर्ष जोरात तर..

मस्त जमलाय..

विषेश म्हणजे मागचे भाग परत वाचायची गरज पडली नाही.. हा भाग वाचतानाच मागचा भाग कुठे थांबला होता हे व्यवस्थित आठवलं..

आता पुभाप्र... Happy

खुप खुप धन्यवाद

अरे वाह्ह!! वारी!! फार फार म्हन्जे फारच आनंद झाला!! इतक्या दिवसांनी पुढचा भाग.. आता आधी मागल्या भागांची रीवीजन करायला हवी! कुटं अज्ञात वासात हरवले होतात?

आत पुढचा भाग कधी? Happy

धन्यवाद..धन्यवाद..

टण्या, चक्क वारीचा पुढचा भाग!! भाऊंचं आणि तुझं नातं अगदी अतूट आहे हे तुझ्या सहजतेने येणार्‍या वर्णनांवरुन पोहोचतं :-). दंडोबाही असंच सुरेख लिहिलं होतंस.

मृण्मयी +१

मस्त. काही दिवसांपूर्वीच आधीची वारी वाचलेली. एकदम त्याच फ्लो मध्ये वर मृ ने म्हटलंय तसं बेअरिंग न सोडता आणि नाटकी न होता लिहिलयस. आवडला हा भाग पण.
येऊद्या.

विषेश म्हणजे मागचे भाग परत वाचायची गरज पडली नाही.. हा भाग वाचतानाच मागचा भाग कुठे थांबला होता हे व्यवस्थित आठवलं.. + १

हो मलाही वारीचा पुढचा भाग पाहिल्या पाहिल्या गेल्या वेळी कसे कुठे थांबले होते, वाकडतोंड्या सुधीर, आत्याबाई, धनंजय, झपाझपा चालणारे काका सगळे काही आठवले...:)

काही गोष्टी कायमच मनात घर करून राहतात. त्यापैकी ही एक. आणि दुसरी रैनालिखीत फुलोंकी घाटी. त्यापुढचा भाग तिने कधीही लिहीला तरी आधीचे वाचायची गरज पडणार नाही.

उच्च!

मला वाट्लेल पोरगं तेरा वर्षाचं समजायच्गं का की काय आता?

त्या आपल्या केकता कपूरचा बोर्ड लावून, ५ साल बाद...

एवढ्या गॅप नंतर लिहून देखील लेखनातला फ्लो आणि वर मृण्मयीने म्हटल्याप्रमाणे ७-८ वीतल्या मुलाच्या स्टाइलचे बेअरिंग छान सांभाळले आहे.

ट्ण्या, पुढचे भाग लवकर येऊ देत.

मस्त.
टायपायचा कंटाळा आला असेल तर वहीत लिहून काढ आणी मग टाईप कर पण इतका गॅप घेऊ नकोस रे.
नेमाडपंथियांनी नेमाड्यांसारखाच गॅप घ्यावा असा नियम नाही.

खरंच मंडळ अभारी आहे !!

विषेश म्हणजे मागचे भाग परत वाचायची गरज पडली नाही.. हा भाग वाचतानाच मागचा भाग कुठे थांबला होता हे व्यवस्थित आठवलं.. + २

Pages