तो.....माझ्या नजरेतला

Submitted by लक्ष्मी on 11 March, 2015 - 00:45

तो.....माझ्या नजरेतला

हे प्रिय,

बऱ्याच दिवसांनंतर मी तुझ्याशी लिखित स्वरुपात बोलते आहे. तुझ्यापासून दूर होते तेव्हा तुझ्याशी होणारा संवाद, प्रेम, राग, शंका-कुशंका सगळं सगळं डायरीत लिहून काढायचे (व डायरी तुला वाचायला द्यायचे). एकत्रित राहायला लागल्यावर थेट तुझ्याशीच बोलायला लागले. तरीही काहीतरी उरतच.....लिहिण्यासाठी.....
अजूनही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील आपली पहिली भेट आठवते. दिवाळीची तोबा गर्दी. माझ्याकडे भलीमोठी सुटकेस. फक्त तुझ्याशेजारची जागा रिकामी. मला लॉटरी लागल्याचा आनंद. मी बसणार तेवढयात तू माझ्याकडे तिरक्या नजरेने त्यावर विरजण टाकलस, “ इथला माणूस खाली उतरला आहे. तो आला तर मी उठणार नाही, तुम्हांला उठावं लागेल.” तुझ्या या खडूस निक्षूनपणाचा रागच आला. एका मुलीशी (तेही इतक्या सुंदर !) बोलण्याची किती कठोर आणि उद्धट पद्धत वाटली मला. ‘तो उतरलेला माणूस आला तर आपण उठायचच नाही, होईल ते होईल,’ असा विचार करून मी बसले. शेवटी तो ‘उतरलेला माणूस’ काही परत आला नाही आणि आपल्या बस प्रवासाबरोबर आपल्या आयुष्याच्या सह्प्रवासाचीही सुरुवात झाली. या तीन तासांच्या प्रवासात बरच काही घडलं. अगदी सिनेमातल्यासारखं. मुली कशा असतात, मुले कशी असतात यावर आपला झालेला वाद, रात्री आठच्या वेळी रस्त्यात एक रॉकेलच्या ट्रकचं पुलावरून खाली पडणं, तू जखमींना वाचविण्यासाठी अंधारात उतरणं, तुझी बस चुकणं,माझं कंडक्टर व प्रवाशांशी भांडण, तुला शोधण्यासाठी परत अपघात स्थळी पळत येणं, दोघांनी बराच अंतर पुढे गेलेली बस पळत पळत पकडणं, तुझे रक्ताने माखलेले कपडे पाहून सगळ्यांकडून कौतुक वगैरे वगैरे. ज्यावेळी तू जखमींना वाचविण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता एकटाच उतरलास, त्याचवेळी तू माझ्या मनात घर केलस...म्हटलं... ‘चांगला माणूस’ आहे.’ (पहिल्या नजरेचं प्रेम वगैरे असं काही नव्हतं हं !)
मैत्री वाढत गेली. ‘मैत्रीपलिकडच्या’ नात्याचा दोघांनाही मागमूस लागला. मी निर्धास्त. तुझा फोन, ‘आपलं नातं मैत्रीपलीकडे जात आहे. माझ्या घरी खूप पारंपारिक वातावरण आहे. मला तुला फसवायचं नाही, खोटया आशेवर ठेवायच नाही. आजपासून आपला संपर्क बंद.’ याहीवेळी तू आवडलास. तुझ्या स्पष्टपणामुळे तुझ्याबद्दलचा आदर आणखी वाढला. पुढ कसला संपर्क बंद, तो वाढतच गेला, अगदी ‘आता आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही’ इथपर्यंत.
खरं तर प्रेम, लग्न अशा गोष्टी मी स्वतःच्या आयुष्यात गृहीत धरलेल्या नव्हत्या. लहानपणापासून आई-वडील, भाऊ-वहिनी या नात्यांपासून ते आजूबाजूचे सर्व संसार होरपळलेले पाहिले होते. तर्र दारू पिऊन येणारे नवरे, दिवसभर शेतात राबून रात्री नवऱ्याच्या लाथा खाणाऱ्या, विव्हळणाऱ्या बायका; भेदरलेली, असहायपणे रडणारी लेकरे हे सर्व मी अनुभवलं होतं,पाहिलं होतं. सणाच्या दिवशी माझ्या वडिलांचं दारू पिऊन येणं, जेवायला वाढलेली ताटे पायाने उधळणं, आईला कोपर्यासत घालून पोटात लाथा घालणं, तिचं वेदनेनं ओरडणं, ‘माझ्या पोरीला मारू नका हो,’ असा आजीचा केविलवाणा सूर, आम्हां बहिण-भावाचं आईला धरून रडणं, तिनं रागाने लेकरांना घेऊन घर सोडणं, पण ‘जायचं कुठं?’ याचं उत्तर न मिळाल्याने निम्म्या रस्त्यातून घरी परतणं, तिचं व माझंही रात्रभर रडणं.....अशा कितीतरी जखमाच जखमा...मनावर कोरलेल्या...कधीच न पुसल्या जाणाऱ्या (कालांतराने काही परिस्थिती बदलली तरीही)...सतत सलणाऱ्या...प्रश्न विचारणाऱ्या...असं का? राग यायचा सगळ्या नात्यांचा.नको ते वडील, भाऊ.....पुरुषच नको.....का सहन करतात बायका सगळं?...तेही अगदी निमूटपणे...बायकांनी, मुलींनी असंच रहायचं असतं, बायकांनी डोक्यावरून पदर पडू देवू नये, परपुरुषाशी बोलू नये, विधवेने कुंकू लावायचं नाही, बायको मेल्यावर चुलत भावाने लगेच लग्न केलं, मात्र नवरा वारल्यावर चुलत बहिण सासरीच राहिली.....कितीतरी घटना...खटकणाऱ्या......मग नकोच ते लग्न ...ती साडी...ते मंगळसूत्र...आणि ते जोखड... (माझे हे विचार सर्वांना ‘काहीतरीच, पुस्तकी आणि बंडखोर’ वाटायचे.)
तुझ्याशी जुळलेलं नातं मात्र जैविक झालं...कदाचित, नाही, खरचं तू ‘वेगळा’ वाटलास.
पण तुझ्यासोबतच्या सहजीवनाला मी सहजासहजी तयार नव्हते. मी तुला अटींची यादीच सांगितली( मी भूतकाळात दुसऱ्यांच्या लग्नाच्या सहजीवनाच्या भयंकर सत्याला अनुभवल होतं, त्यामुळे मला दूधही माझ्या परीने फुंकून प्यावेसे वाटले असेल.)... ‘मी आहे तशीच राहणार, मीही तुला बदलवण्याचा प्रयत्न करणार नाही. साडी, कुंकू, महत्वाचं म्हणजे मंगळसूत्र घालणार नाही, मूल व्हावं की नाही यावर आता माझं ठाम मत नाही, पुढे काय निर्णय घेईन हे मला माहित नाही, माझ्या घरच्यासाठी तू प्रस्थापित ‘जावई’ न होता ‘मुलगा’ बनशील वगैरे वगैरे.’ तू फक्त एवढचं म्हणालास, ‘मला या अटी मान्य आहेत, तू समजूतदार आहेस. मला खात्री आहे वेळप्रसंगी तू सांभाळून घेशील.’ मी स्तंभित.
तुझ्याशी मैत्री हा सहजयोग असला तरी पुढील वाटचाल सोपी नव्हती. मी तथाकथित ‘खिशात नाही दाणा अन् पाटील म्हणा’ अशा जातकुळीत जन्मलेली. वडील सुशिक्षित, राजकारणी, प्रतिष्ठित. त्यांच्या मते, मी माझ्या आयुष्यातले सगळे निर्णय घ्यायला सक्षम(लग्न सोडून). कुणाशीही मैत्री, हरकत नाही. (त्यांचे स्वतःचे जिवलग मित्र सगळ्या जाती-धर्मातील होते.) मात्र लग्न...फक्त आणि फक्त जातीतच. (माझा अकरावितला पहिला दिवस..ते मला सायकलवरून बस थांब्याला सोडायला आलेले... ‘शिकायचं तेवढ शिक...मात्र दुसऱ्या जातीत लग्न करायचं नाही,’ सूचक शब्द.)
मला जात-पात मानण कधीच मान्य नव्हतं, त्यामुळे तुझ्याबद्दलचा निर्णय मी घेवू शकत होते. तरीही त्यांनी टाकलेला ‘विश्वास,’ माझ्यासाठी घेतलेले कष्ट, माझं अवकाश धुंडाळण्यासाठी दिलेले प्रोत्साहन व संधी, पाहिलेली स्वप्ने हे सगळं सगळं विस्कटणार होतं. तुझी स्थिती तर माझ्याहून बिकट...तू थोरला,शिक्षकाचा ‘आदर्श’ मुलगा. तुझ्या घरी चहा प्यायला गेलेली मी पहिलीच मुलगी...तुला मोजून एक-दोन मैत्रिणी. आपण जेव्हा एकमेकांबद्दल घरी सांगितलं...सगळं काही आपल्याला अगदीच अपेक्षित..तुझ्या आईचा बी.पी. वाढला. वडिलांनी, भावाने संबंध तोडण्यास सांगितले..माझ्या आई वडिलांनी त्यांच्या माझ्यावरील ‘विश्वासाची’ परत परत आठवण करून दिली, आत्महत्या करण्याच्या धमकीपर्यंत प्रकरण गेलं. दोघेही भावनिक झालो..क्षणभरच..तू तर जाहीरच केलं, ‘लग्न केलं तर हिच्याशीचं.’ तुझ्यातला हा ठामपणा मला जरा अनपेक्षितच होता खरा. अशा सगळ्या परिस्थितीत एक फारच वाईट गोष्ट घडली..तुझी आई अपघाताने वारली.तू तिच्या काळजाचा तुकडा आणि ती..तुझ्या हृदयाची धडधड...आईचा लाडका.अतिशय आज्ञाधारक..घरी धुणी-भांडी करण्यापासून ते घर सारवन्यापर्यंत सगळं काही आनंदाने करणारा.तिची काळजी घेणारा.आधीच अबोल तू ...आणखीनच नि:शब्द झालास. माझ्या घरी लग्नाचा विषय बंद तर तुझ्या घरी या विषयाने आणखीनच जोर धरला....या सगळ्या तणावाच्या परिस्थितीत आपण आणखीनच जवळ आलो. ‘आता आपण लग्न करायलाच हवं’ या तुझ्या विचारांशी मी सहमत झाले. घरच्यांनीच लग्न लावून द्यायला हवे, या विचाराला आता अर्थ नव्हता.तुझ्या धाकटया भावाचे लग्न व घरच्यांनी आपल्या लग्नाचा विचार करण्यसाठी वेळ घ्यावा म्हणून ‘लग्न करायचे पण सांगायचे नाही’ असे ठरले आणि ‘ दोघांचा विवाह झाला’ असा कायदेशीर पुरावा नोंद करून घेतला. (खरं तर माझा ‘कायदेशीर लग्न’ वगैरेत विश्वास नव्हता,मात्र तुझी ‘लिव्ह-इन-रिलेशनशिपची’ (कायदेशीर लग्नाविना एकत्रित राहण्याची) तयारी नव्हती. शिवाय एकदा कायदेशीर पुरावा तयार झाल्यावर इतर हालचाली न करता घरचे आपल्याला स्वीकारतील, अशी अशाही वाटत होती.) हा सगळा खटाटोप ‘घरच्यांना बांधून ठेवायचच’ अशा निर्धारासाठी होता.यात तुझी परिपक्वता कामी आली.
तुझे दोन मित्र, तू आणि मी असा आपला ‘संसार’ सुरु झाला. (खरं तर काहीच बदललं नव्हतं, होस्टेलमध्ये राहिल्यासारखे वाटायचे.)एकत्रित स्वयंपाक करणं, स्वतःचे कपडे स्वतः धुणं, घरातील व बाहेरील जबाबदाऱ्या मिळून पार पाडणं, दोघांनी सल्लामसलत करून निर्णय घेणं या गोष्टी आपल्या आयुष्यात आपोआप होत होत्या. यासाठी मला तुझं कोणत्याही प्रकारचं ‘जेंडर सेन्सिटिव’ होण्यासाठीचं प्रबोधन करावं लागलं नाही. त्यामुळे एकत्रित राहण्यातल्या काही गोष्टी सोडल्या तर आपणा दोघांचही ‘लग्न’ वगैरे झालंय असं दोघांनाही वाटायचं नाही.(आठवतंय ना, तीन-चार प्रसंगात आजुबाजूच्यांना आपण सख्खे बहिण-भाऊ वाटलो होतो.) आणि असंच आयुष्य मी अपेक्षिल होतं.
मला प्रचलित ‘नवरा-बायको’ अशा जड नात्याबद्दल (अगदी शब्दांबद्दलही) तिटकारा होता, आहे. कोणाचीतरी बायको, तिचा कोणीतरी नवरा, त्या नात्याची एकमेकांशी वागण्याची समाजनिर्मित उतरंड. विचारानेच धस्स व्हायचं. मात्र आपल्या नात्यात असं काहीच झालं नाही. मला प्रचलित ‘बायको’ व्हायचं नव्हतं, मात्र तूही ‘नवरा’ न बनता नेहमीच मित्रासारखा वागलास, वागतोस हे महत्वाचं. म्हणूनच मला आपलं नातं ‘जड किंवा नकोसं’ कधीच वाटलं नाही. सहजीवनातील सुरुवातीस क्षुल्लक कारणावरून आपल्यात अबोला व्हायचा(इतक्या क्षुल्लक की काही वेळाने आपण कोणत्या कारणावरून भांडलो हेही लक्षात राहायचं नाही.), मात्र माझी समजूत काढायची जबाबदारी बऱ्याच प्रसंगात तुझीच असायची (बहुतेकदा ‘तुझीच’ चूक आहे, अशी मला पक्की खात्री असायची, त्यामुळे तू ती चूक पुन्हा करू नये यासाठी माझा मौन व्रताचा प्रपंच). कधी कधी छोटया पण महत्वाच्या गोष्टींवरून वाद व्हायचे. उदा. मी बर्मुडा वापरणं, संध्याकाळी रस्त्याच्या कठडयावर एकटीनं बसणं, कामावरून रात्री जास्त उशिरा घरी येणं हे तुला खटकायचं. अशावेळी माझ्याप्रतीची ‘काळजी’ तू व्यक्त करायचास, पण जाताजाता मी तुला टोकाची ‘स्त्रीमुक्तीवाली’ वगैरे वाटायची. (आता यातल्या कशानेच काहीच फरक पडत नाही, हा भाग अलाहिदा. तुला एक गंमत सांगते, बऱ्याचवेळा अशा छोटया वाटणाऱ्या महत्वाच्या गोष्टींना मी मुद्दामहून ताणून धरून तुला खूप उलट प्रश्न विचारायचे, अजूनही कधीकधी विचारते जे तुला आवडत नाही. उद्देश एकच असतो, तू या मुद्द्यांचा तळाशी जाऊन विचार करावास.) मात्र या सगळ्या ‘गोड’ खटक्यांमधेही ‘आपण आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत राहणार आहोत, तेव्हा कोणतीही समस्या संवादाने लवकरात लवकर सोडवायची,’ हा दोघांचा विचार आपल्या नात्यात दृढ करायला तुझाच पुढाकार असायचा.
तुझ्यासोबतच्या सह्जीवानातली व माझ्या आयुष्यातला महत्वाचा कप्पा असलेली एक महत्वाची गोष्ट, जिचा उल्लेख करायलाच हवा ती म्हणजे आपले शरीरसंबंध. अगदी लहानपणापासून स्वतःच्या लैंगिक अवयवांना, स्वतःतल्या लैंगिकतेला इतकं झाकून ठेवलेलं की मी आयुष्यात कधी कुणाशी शरीराने जवळ येईन असा विचारही करवत नव्हता(समाजानं ज्या पद्धतीनं त्याला ‘गलिच्छ’ समजून ‘नैतिकतेला’ जोडलेलं त्यानूसार मी त्याचा तिरस्कारच केलेला). पुरुषांच्या वखवखलेल्या नजरा (अगदी जवळच्या नात्यातीलही), नकोसे स्पर्श, अप्रत्यक्षपणे केली जाणारी ‘आवाहने’ हेही अनुभवलेलं. शिवाय ‘नवरा’ कशा पद्धतीनं ‘बायकोच्या’ शरीराला ओरबाडून ‘बलात्कार’ करत असतो, याची अनेक उदाहरणे ऐकलेली, पाहिलेली असल्याने मला माझ्या आयुष्यात तो भागच नसावा अशीच माझी इच्छा.(काही घटना ऐकल्यावर तर कितीतरी दिवस मन अस्वस्थ होतं. माझ्या जवळच्या नातेवाईकाने मरणपंथाला लागलेल्या बायकोला प्रत्येक संबंधासाठी ५०रु. देऊन तिच्यावर केलेल्या ‘बलात्काराची’ कहाणी शेवटच्या श्वासाला तिने आपल्या लेकीला सांगितली व एका पोत्यात कोंबलेले ३००-४०० रुपये ती मेल्यावर सापडले. माझ्याकडे आलेल्या दुसऱ्या केसमध्ये मुस्लीम कुटुंबात बायकोच्या योनीमार्गात गाजर, मुळा घालून केलेल्या हिंस्त्र अत्याचाराने तिची योनी इतकी फाटली होती की तिला चालवतही नव्हतं. माझ्या एका मैत्रिणीच्या नवऱ्याने तिला ‘सुहागरात्रीत’ इतकं ओरबाडलं की तिने दुसऱ्या दिवशी घरच नव्हे तर नवऱ्यालाही सोडलं.)
शिवाय ‘पुरुष’ शरीरसंबंधात प्रेम शोधतो आणि ‘स्त्री’ शरीरसंबंधापलीकडचे प्रेम शोधते, असं बरच काही वाचलं असल्यामुळे सुरुवातीला मी तुझ्याकडे जरा ‘संशयानेच’ पाहत होते. शिवाय प्रत्यक्षात काय होतं (पेक्षा करायचं असतं) हे केवळ वाचीव असल्याने संकोचलेही होते. पण तू मात्र अगदी हळुवारपणे, प्रेमाने, तुझ्या स्पर्शाने, आधी दोन मने मग दोन शरीरे एकत्रित आल्याने होणाऱ्या उत्कट आनंदाची मला ओळख करून दिली. हा अनुभव ‘घाण’ नसून आपण जास्त जवळ येवून आपलं नात अधिक दृढ होतय याची जाणीव मला झाली. नर आणि मादी यांच्यातले शरीर संबंध ‘वासनेच्या’ पलीकडले असू शकतात, त्यातही एकमेकांवरील प्रेमाची प्रचिती येते, घट्ट मिठीतील ‘आधार’ एकमेकांना किती निश्चिंत बनवितो, शरीसंबंधातला प्रत्येक स्पर्श हा एकमेकांच्या मर्जीनूसार झाला तरच तुमचं नातं दृढ आणि सहजीवन आनंदी हे तुझ्या सोबतीने शिकले. तूही या प्रकरणात ‘शिकाऊ’ होता तरी एकमेकांना वेळ देवून, समजून घेवून त्याला ‘सुखद’ बनविण्यात तुझा वाटा मोठा आहे. बिनसलेल्या, लादलेल्या जबरदस्तीच्या रात्रींमुळे विस्कटलेले संसार पाहिले की मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्यामुळे मी तुझ्याच नव्हे तर माझ्याही शरीरावर प्रेम करायला शिकले.
मी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी काम सुरु केले होते. खरं तर तुझी कोणत्याही सामाजिक मुद्याबद्दलची, कोणत्याही प्रकारची (शैक्षणिक वगैरे) पार्श्वभूमी नसतानाही तू या महिलांबद्दल इतर बरेचसे लोक जसं ‘दूषित’ मत व्यक्त करतात तसं कधीच केलं नाहीस. आपल्या चर्चा व तुझं त्यांना भेटणं यामुळे तुला ‘सत्य’ बघता आलं. ‘लक्ष्मी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी काम करते’ हे सांगताना तुझ्या चेहऱ्यावर कधीच संकोच नसायचा, उलट त्यांच्या शोषणास ‘पुरुषप्रधान समाजव्यवस्थाच’ कशी कारणीभूत आहे हे तू इतरांना पटवून द्यायचास. तुझ्यातला ‘चांगला’ माणूस मला वारंवार दिसायचा.
तुझी परीक्षा घेणारे अनेक प्रसंगही आपल्या जीवनात आले. उदा. अचानकपणे काम सोडण्याचा व काही दिवस काहीच न करण्याचा माझा निर्णय. मात्र तुझं मत-‘तुला तुझ्या आयुष्यात जे काही करावं असं वाटतं ते तू कर, आनंद आणि समाधान न देणारी कोणतीच गोष्ट कोणत्याच दडपणाखाली करून नकोसं. कोणताही निर्णय घे, मी तुझ्या बरोबर असेन. आपण सुखी राहू एवढं मी कमावतो.’ तू माझ्या जगण्याला ‘स्पेस (अवकाश)’ दिलस असं मी म्हणणार नाही, पण त्याला तू हलविलं नाहीस हे महत्वाचं. तू शिक्षणाने इंजिनिअर, एम.बी.ए. केलेला, पण पैशांची हाव तुला कधीच नाही. म्हणूनच तू मला आणखी आवडतो.
असं म्हणतात की ‘खरी समानता मानणारा पुरुष’ घरातल्यांशी वागताना कळतो. तुझं स्वयंपाक बनविणं, स्वतःचे कपडे धुणं (बऱ्याचदा माझेही), चहा बनविणं, भांडी घासणं, माझ्याशी मित्रासारखं (बऱ्याचदा मित्रापलिकडचं) वागणं या सर्व गोष्टी तू इतर लोकांसमोर, नातेवाईक, मित्र मैत्रिणी यांच्यासमोर करतोस म्हणून मला तू ‘ढोंगी’ वाटत नाहीस. आपलं नातं गावी राहणाऱ्या तुझ्या घरच्यांनी स्वीकारल्यावर साडी, मंगळसूत्र यांचा प्रश्न आलाच होता. त्याची जबाबदारी मी पूर्णपणे तुझ्यावर टाकलेली. ‘तिला घालायचं नाही तर ती घालणार नाही, तिला कोणी जबरदस्ती करू नका,’ अशी ठाम पण कठोर भूमिका तू लिलया पेललीस. तुझ्या वडिलांनी आयुष्यभराच्या जमापुंजीतून बांधलेल्या घराच्या वास्तुशांतीच्या पूजेला बसण्यास मी दिलेल्या नकारामुळे निर्माण झालेली नात्यातील तेढ व वादळ तूच शमवलस, तेही मला काहीच दोष न देता. मी माझं नाव बदललं नाही, तुझ्या ध्यानीमनीही हा मुद्दा नाही. उलट लग्नानंतर आपल्या बायकोचे नाव बदलून तिची ‘ओळख’ बदलविणाऱ्या तुझ्या मित्राला तू बरचं सुनावलस.शिवाय घरकाम न करणाऱ्या तुझ्या मित्रांनाही स्वतःचं उदाहरण देवून समजावतोस. घर, लाईट बिल, पाणी बिल दोघांच्या नावावर केलस. होणारं अपत्यही दोघांच्या नावावर, जात-धर्मविरहित असेल या माझ्या मताशीही तू सहमत. आपल्या विवाहामुळे तू काही नात्यांना दुरावलास,पण मी काहीही चुकीचं केलं नाही यावर तू ठाम. तुझ्यासाठी नवीन असणाऱ्या विचारांवर तू विचार केलास, पटल्यावरच स्वतः अंगिकारलेस व महत्वाचं म्हणजे इतरांना विचार बदलण्यासाठी प्रेरणा दिलीस.
सगळं जग जरी विरोधात गेलं तरी एकमेकांची साथ सोडायची नाही, कितीही भांडलो तरी एकमेकांपासून दूर जाण्याची भाषा करायची नाही, नात्यात एकमेकांचा सन्मान ठेवायचा (कोणत्याही किंवा अगदी टोकाच्याही परिस्थितीत), दोघांच्यातील वाद दोघांच्यातच सोडवायचा, समोरच्याला स्वतःला आवडेल असं बनविण्याचा प्रयत्न करायचा नाही (समोरचा व्यक्ती मूळचा तसा असतो म्हणूनच आपण तिच्यावर प्रेम केलेलं असतं ना!), मात्र समोरच्याने दिलेल्या सूचनांचा विचार करायचा प्रयत्न करायचा, समोरच्याला समजून घेण्यासाठी त्याच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघायचं, जगताना दुसऱ्याच्या गरजेला, आनंदाला प्राधान्य द्यायचं, आव्हानं पेलण्याची व नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा द्यायची, नात्यात एकमेकांपासून लपविण किंवा खोटं बोलणं याला थारा नाही, विश्वास हा नात्याचा पाया (‘जोडीदाराने/नवऱ्याने घेतलेल्या संशयाने संसार उध्वस्त’ हे समाजातील वास्तव असताना तुझ्या मनात माझ्या ‘पुरुष’ नात्यांबद्दल कधीच प्रश्नचिन्ह आले नाही. अविश्वसनीय गोष्ट म्हणजे पूर्वी माझ्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या (पण मला कोणताही त्रास न देणाऱ्या) माझ्या ‘चांगल्या’ मित्रांशी मैत्री टिकविण्यास तुझा कधी आक्षेप नाहीच, उलट मदतच असते.), इतरांना त्यांच्या गुणदोषांसकट स्वीकारायचं, स्वतःच्या मुलभूत तत्वांशी कधीच तडजोड करायची नाही ही आणि इतर असंख्य संस्कारित झालेली व जीवनानुभावातून तयार झालेली तत्वे तुझ्यासोबत जगताना आणखीनच घट्ट झाली आहेत.
तुझं एवढं ‘कौतुक’ केल्यावर तू अगदीच ‘परिपूर्ण’ आहेस, असा अर्थ होत नाही. तुझ्याबद्दल काही तक्रारीही आहेत. उल्लेखनीय म्हटलं तर तुला कधी कधी माझ्या वेदना कळत नाहीत. (तुझ्या मते, तू त्या अनुभवल्या नाहीस म्हणून कळत नाहीत, जे मला पटत नाही ( मला माहित आहे तुलाही मनातून ते पटत नाही).उदा. आपल्या दोघांच्या वादांच्या क्षणी मी स्वतःला त्रास करून घेते. त्यावेळी तू माझी साथ देत नाहीस असं माझा आतला आवाज मला सांगतो. तुला वाटतं, मी स्वतःला त्रास करून घेवू नये (तुझ्यामुळेच मी त्रास करून घेते), त्याने प्रश्न सुटणार नाही. बरोबर आहे, पण हे तू मला जवळ घेवून, प्रेमाने सांगू शकतोस. मला त्या क्षणी तुझ्या मानसिक आधाराची खरी गरज असते. पण हे तुला माझी अपेक्षा कळूनही तू तुझा ‘अहंकार’ जपत ‘बघ्याची’ भूमिका घेतोस, हे माझ्या मनाला माझ्या त्रासापेक्षा जास्त वेदना देवून जातं. अपेक्षा आहे, यापुढे तू याचा विचार करशील (खरं तर मीच आता त्रास करून घ्यायचा नाही असं ठरवलंय, तरीही).
खरं तर तू भेटण्या अगोदरही मी आनंदी होते, तुझ्याशिवाय. आता मात्र तुझ्याशिवाय जगण्याची कल्पना करवत नाही. माझा एक मित्र म्हणतो, ‘एखाद्या माणसाची सवय होणं फार वाईट, त्याच्याशिवाय आयुष्य नुसते दिवस काढण्यासारखे वाटते.’ माझंही तुझ्यावरचं अवलंबित्व फारच वाढलय.तू सगळ्याच भूमिका पार पाडतोस, जोडीदार, मित्र, भाऊ, वडील, आई, मैत्रीण..अगदी सगळयाच. आपल्याकडे लग्न झाल्यावर ‘मुलीची’ कशी पटकन ‘बाई’ होते, तिला अंतर्बाह्य बदलावं लागतं, किती प्रकारच्या नको असणाऱ्या तडजोडी औपचारिकपणे करत, घुसमट आयुष्य काढावं लागतं, सासर-माहेरच्या फेऱ्यात अडकाव लागतं, हृदयाची धडकन असणाऱ्या जन्मदात्यांना भेटण्यासाठी, ज्या मातीत जन्मले, पहिलं पाऊल टाकलं, तिचा सुगंध उरात साठविण्यासाठी, प्रत्येकवेळी नवऱ्याची/सासरच्यांची ‘पूर्वपरवानगी’काढावी लागते. मी मात्र यातल्या कोणत्याच गोष्टी न करता मोकळा श्वास घेत आयुष्य जगतेय. लग्न किंवा ‘चांगला’ जोडीदार मिळणं हा जुगार आहे, असं म्हणतात. त्यातच ‘माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळावा,’ असा विचार करणाऱ्या तथाकथित उच्च समजल्या जाणाऱ्या ‘पुरुषप्रधान जातीत जन्मणाऱ्या’ स्त्रीसाठी तर तो ‘आकडा’ लावण्याइतकं बेभरवशाचं आहे. मला तर ‘ज्याकपॉट’ लागलाय.
तुझ्यासोबतच्या सहजीवनात अनेक चढउतार आले, येतील. मात्र तुझ्या नजरेतील आश्वासकता, स्पर्शातील आपलेपणा आणि आलिंगनातील संरक्षकता यामुळे जीवन मजेदार वाटते. तुझा माझ्यावरील, माझ्या क्षमतांवरील माझ्यापेक्षाही जास्त विश्वास यामुळे मी निश्चिंतपणे आयुष्यावर प्रयोग करीत असते. नात्यातील संवाद, बांधिलकी, विश्वास, प्रामाणिकपणा, समजूतदारपणा या सगळ्यांमुळे तुझ्यासोबत जगताना कधी कंटाळा आला नाही, उलट आपण सारखे एकमेकांच्या प्रेमात पडत असतो. खरं तर आपण तसे खूप बाबतीत भिन्न. मी साहित्याची विद्यार्थिनी, सौंदर्यासक्त, अति संवेदनशील, भावनिक तसेच काहीशी बेशिस्त तर तू विज्ञानाचा, इंजिनियर, सरळ रेषेत चालणारा, शिस्तबद्ध काहीसा व्यवहारी. आपण एकमेकांना बदलवायचं नाही असं ठरविलं होतं, तरी नकळतपणे एकेमकांच्या संगतीत एकमेकांकडून शिकून स्वतःला, नात्याला, समाजाला पूरक अशा साऱ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात समाविष्ट करून घेतल्या. ‘अजून चांगला माणूस’ बनण्याची प्रकिया चालूच राहिली.
माझ्या वडिलांनी अजून तुला स्वीकारलं नाही. त्याबद्दल तुझी तक्रार नाही. ते ज्या सामाजिक जडणघडणीत घडलेत, त्यात आपल्या नात्याचा स्वीकार त्यांच्यासाठी सोपी बाब नाही, हे तूही समजून घेतलस. मात्र त्या सामाजिक मर्यादा, रुढी, परंपरा तोडणं, अशक्य नाही हेही आपण जाणतो. बस्स, माझ्यावरच्या प्रेमापोटीतरी त्यांनी हे धाडस करावं, ते करतील याबद्दल मला विश्वास वाटतो.
आपण एकमेकांसाठी ‘एकमेवाद्वितीय’ आहोत, नात्यात ‘परिपूर्ण’ आहोत असं नाही, हे दोघांनाही मान्य आहे. मात्र जे चांगलं त्याची जपणूक व नात्यासाठी त्रासदायक त्यावर पुनर्विचार हे तत्व जपल्यामुळे नात्यातला ‘गोडवा’ टिकवून एकमेकांसोबत ‘आनंदी’ आहोत इतकचं, बरोबर ना?
माझं सहजीवन ‘सुखी’ करणाऱ्या, मला साथ देणाऱ्या अशा तुझ्यातल्या ‘ साध्या’ व ‘गोड’ माणसाला माझा प्रणाम! तुझ्यासारखी इतरांना ‘आनंदी’ करणारी जास्तीत जास्त माणसं जन्माला येवोत, तयार होवोत ही सदिच्छा!
शरद, हे सर्व ‘पुरुष’ म्हणून करतोयस म्हणून तू ‘विशेष’ आहेस असं नाही, तर तुझ्यातला ‘संवेदनशील’ माणूस तू जिवंत ठेवलास म्हणून तुझं कौतुक.
चल आता पुरे करते. (खरं तर आपल्या नात्याबद्दल, तुझ्याबद्दल लिहिणं कधी संपणारच नाही.)
तुझ्या वारंवार प्रेमात पडणारी (खरं तर प्रेमातच असणारी),
लक्ष्मी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
<< लग्न किंवा ‘चांगला’ जोडीदार मिळणं हा जुगार आहे, असं म्हणतात. त्यातच ‘माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळावा,’ असा विचार करणाऱ्या तथाकथित उच्च समजल्या जाणाऱ्या ‘पुरुषप्रधान जातीत जन्मणाऱ्या’ स्त्रीसाठी तर तो ‘आकडा’ लावण्याइतकं बेभरवशाचं आहे. मला तर ‘ज्याकपॉट’ लागलाय.>>

चांगलं लिहीलंय.