घटस्फोट

Submitted by शिरीष फडके on 17 February, 2015 - 02:23

घटस्फोट
'लहानपण देगा देवा' असं म्हणण्या इतपत लहानपणीचे दिवस चांगले होते तिचे. पण कळायला लागल्यापासून किंवा कळत्या वयापासुनच दिवस पालटले. सतत घरातलं वातावरण तणावाचं राहू लागलं. वडिलांचं दारू पिण्याचं प्रमाण दिवसें-दिवस वाढत होतं. आणि दारूमुळे होणार्या आई-वडिलां मधल्या भांडणांचं प्रमाण देखील वाढतच होतं. तसं नाही म्हटलं तरी आधी तिला तिच्या भावंडांचा आधार वाटायचा. पण कालांतराने भावंडांमध्ये देखील तणावाचं वातावरण निर्माण झालं. घरातील प्रत्येक दिवस प्रत्येकजण तणावाखाली वावरत होता. घरात तणाव निर्माण होण्यासाठी किंवा भांडणं होण्यासाठी आता कुणालाच विषयांची कमतरता भासत नव्हती. शुल्लक गोष्टींवरुन देखील भांडणं होत होती.
तिचं शिक्षण पूर्ण झालं. अर्थात तिचं शिक्षण हा विषय देखील भांडणासाठी अपवादात्मक नव्हता. शिक्षणाच्या बाबतीत लहानपणापासूनच तशी ती खूप हुशार होती. शाळेत पहिला क्रमांकं तिने कधीच सोडला नव्हता. घरातील एकंदरीत परिस्थिती पाहता ती पदवीधर होणं हे खरच कौतुकास्पद होतं. आता तिला चांगली नोकरी लागली होती. नोकरी निंमित्ताने का होईना पण ती दिवसातले ८-१० तास घराबाहेर राहत होती. आणि तिला घराबाहेर असं राहणं आवडू लागलं होतं. तिच्या मनावरचा सततचा ताण हळू-हळू कमी होऊ लागला होता.
तिला आता घरापासून दूर रहाण्यासाठी नोकरी हा जणू काही एक पर्याय मिळाला होता. तिला घराबाहेरील वातावरण हे घरापेक्षा निश्चितच चांगलं वाटत होतं. तिने जास्तीत-जास्त काळ ऑफीस मध्ये काम करण्यावर भर दिला. तिच्या कामाचं तिच्या ऑफीस मध्ये कौतुक देखील होऊ लागलं. आपलं असं भरभरून कौतुक कुणी करत आहे, आपल्या कामाला कुणी चांगलं म्हणत आहे हे तिला का नाही आवडणार?. जे तिला स्वतःच्या घरातून कधी मिळालं नाही ते
तिला कौतुक ऑफीस मधून मिळत होतं. आपोआपच तिची कामाची वेळ वाढली. घराकडे ती केवळ झोपण्यासाठी एक छप्पर किंवा रात्रीचा आसरा म्हणून पाहु लागली.
घरापासून दूर राहण्याचाच सतत ती विचार करू लागली. घरापासून दूर राहण्यासाठी ती सुट्टीच्या दिवशी देखील ऑफीसला जाऊ लागली. सुट्टीच्या दिवशी काम नसेल तर ती वाचनालयामध्ये (Library) जाऊन बसू लागली. त्यासाठी तिने नोकरी / काम (Job) करता-करता आणखीन शिक्षणातील पदवी कशा घेता येतील ह्याकडे लक्षं दिलं. अधिक पदव्या पदरात पडू लागल्याने त्याचे फायदे तिला कामाच्या ठिकाणी देखील होऊ लागले. ती मोठ्या पदावर पोहोचली. तिच्या व्यावसायीक आयुष्यातील हा उन्नतीचा काळ जवळ-जवळ ८-१० वर्षांचा होता. पण ह्या काळात ती कामाच्या कधी अधीन गेली हे तिचं तिलाच कळलं नाही.
ऑफीस मधून घरी जाण्यासाठी तिच्याकडे चांगलं किंवा उत्साह वाढवणारं असं कुठलच निमित्त तिच्याकडे नसल्याने ती सतत घराबाहेर राहण्यासाठी मार्ग शोधत राहिली. घरी आपलं कुणी आपुलकीने वाट बघणारं असेल, कुणी काळजी करणारं असेल जेणेकरून घरी परतण्याची ओढ निर्माण होईल अशी परीस्थिती नसल्याने तिला घरी जावसच वाटायचं नाही. परंतु कामाची अती सवय तिला कधी जडली ते तिलाच उमजले नाही. आता ती पूर्णपणे “Workaholic” झाली होती. दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस ती केवळ ऑफीस मधलं काम आणि कामाचा विचार करत होती.
आता तिचं वय देखील तिशीच्या आस-पास पोहोचलं होतं. अर्थातच घरात तणावाचा आणि भांडणाचा नवीन विषय होता तो तिच्या लग्नाचा. ती सतत लग्नाला नकार देत असल्याने घरातील व्यक्तींशी तिचे वाद सतत होऊ लागले होते. ह्यातून तिला कशी सुटका मिळवावी हे कळत नव्हतं. मग तिने पूर्णपणे घरच्यांशी अबोला धरला. परंतु ह्यामुळे तिच्या मनावरील ताण अधिकच वाढु लागला. शेवटी तिने ह्या सगळ्या तणावातुन सुटका म्हणून लग्न का करू
नये असा विचार केला आणि आलेल्या स्थळाला होकार कळवला. लग्नाचा कधीही विचार न करणारी, केवळ आणि केवळ सतत कामाचा विचार करणारी, घरातल्या ताण-तणावापासून दूर पळण्यासाठी सतत पर्याय शोधणारी एखादी मुलगी जेव्हा लग्न हा एक पर्याय म्हणून किंवा सगळ्या ताण-तणावयुक्त परीस्थितीवर उपाय म्हणून बघते तेव्हा काय होईल तेच नेमकं तिचं झालं.
लग्न करायची इच्छा नसतानाही केवळ घरातील भांडणयुक्त, तणावपुर्ण परिस्थितीला कायमचा पूर्णविराम देण्यासाठी तिने लग्न केलं. परंतु “Workaholic” म्हणजेच शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कामाच्या अधीन गेल्यामुळे आपल्या जोडीदारासोबत संसार करणं तिला अधिक कठीण होऊ लागलं. ती लग्नाच्या दिवशी आणि अगदी मधुचंद्राच्या दिवशी देखील कामाचाच म्हणजेच नोकरीचाच विचार करत होती. अर्थातच सुरुवातीच्या काळापासूनच तिच्या जोडीदारा बरोबर तिचे खटके उडू लागले. जो तणाव माहेरी होता आणि ज्या तणावापासुन कायमचं दूर जाण्यासाठी तिने लग्न हा पर्याय निवडला होता तोच तणाव किंवा तीच तणावपुर्ण परिस्थिती आता तिच्या सासरी निर्माण झाली होती. लग्नानंतरचे जे काही अत्यंतं नावीन्यपूर्ण सुरुवातीचे दिवस असतात त्या काळात देखील ती दिवसाचे १६ तास ऑफीस मध्ये काम करत होती आणि घरी आल्यावर देखील ऑफीसच्याच कामाचा विचार करत होती. तिला देखील कळून चुकलं होतं की हा सगळा प्रकार “Workaholic” किंवा अती कामाची सवय ह्यात मोडणारा आहे आणि त्यामुळे स्वतःमुळे आपल्या जोडीदाराचं आयुष्य व्यर्थ किंवा त्याच्या आयुष्याचं नुकसान होत आहे.
शेवटी तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. ती आर्थिकदृष्ट्या प्रबळ असल्याने ती आता स्वतःचं घर घेऊन राहू शकत होती. तिने स्वतःचं घर घेतलं आणि घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तिने पुन्हा कुणाच्याही आयुष्यात प्रवेश न करता कायम एकटं
राहण्याचा निर्णय घेतला. शेवट काय होणार? अर्थातच तिने सवयीप्रमाणे स्वतःला ऑफीसच्या कामात बुडवून घेतलं.
घटस्फोटाचं प्रमाण दिवसें-दिवस वाढत चाललं आहे. घटस्फोटाची अनेक कारणे आहेत. शारीरिक छळ, व्यसन, टोकाची वेग-वेगळी व्यक्तिमत्व, अवास्तव अपेक्षा, विवाहबाह्य संबंधं, लैंगिक सुखाची कमतरता इत्यादी. पण ही सगळी कारणे झाली ती लग्न झाल्यानंतर निदर्शास येणारी. आपण वरील कथेतुन हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की लग्नाअगोदर जी परिस्थिती असते ती परिस्थिती घटस्फोटासाठी कशी कारणीभूत ठरते. म्हणजेच विवाह करण्यामागे जी काही कारणे असतात किंवा जे काही हेतू असतात ते देखील विवाह झाल्यावर घटस्फोट होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
विवाह करताना तरुण-तरुणींच्या मनात अनेक अपेक्षा असतात. केवळ जोडीदार किंवा सोबती मिळावा आणि शारीरिक गरजा भागवाव्यात एवढाच मर्यादीत हेतू कधीच लग्न करणार्या जोडप्यांमध्ये नसतो. आपले जीवन अधिक प्रगल्भ व्हावे, आपले जीवन अधिक नियमीत व्हावे, आपले वेगळे असे व्यक्तिमत्व असावे किंवा घडावे असे देखील लग्न करण्यामागे हेतू असतात. ह्या सगळ्या लग्न करण्या मागच्या कारणांचं किंवा हेतुंचं रुपांतर नंतर अपेक्षांमध्ये होतं.
परंतु आपल्याला भेडसावत असलेल्या समस्यां मधून सुटका करण्यासाठी काही तरुण-तरुणी विवाह करतात तेव्हा काय होऊ शकतं ते आपल्याला वरील कथेतुन कळून चुकेल. घटस्फोट होण्यामागे लहानपणापासून झालेले वैचारीक संस्कार देखील कसे कारणीभूत असतात हे सुद्धा आपल्याला वरील कथेतुन कळेल. ज्या परिस्थितीत किंवा वातावरणात मूल (गा/ गी) लहानाचं मोठं होतं ती परिस्थिती आणि त्या वातावरणात झालेले संस्कार जर योग्य नसतील तर लग्न ही संकल्पना किंवा त्याचा अर्थ हा नकारात्मकरीत्या मुलांच्या मनावर परिणाम करतो.
उदाहरणार्थ काही मुला-मुलींचे आई-वडील त्यांच्या लहानपणीच विभक्त होतात तेव्हा मुलांवर नकारात्मक किंवा लग्न संज्ञे बद्दल मनात तिढा, चीड निर्माण होऊ शकते. एकटेपणा दूर करण्यासाठी देखील काही तरुण-तरुणी लग्न हा एक पर्याय म्हणून स्वीकारतात आणि पुढे जाऊन जर तो एकटेपणा दूर झाला नाही किंवा अधिक वाढला तर त्याचे रुपांतर घटस्फोटात होते.
वरील कथेत त्या तरुणीने लहानपणापासून आयुष्यात असलेल्या ताणपुर्ण परिस्थितीवर तोडगा म्हणून ऑफीसच्या कामात स्वतःला बुडवून घेतलं. त्याचे परिणाम म्हणून ती “Workaholic” म्हणजेच काम करण्याच्या अती सवईच्या अधीन गेली. त्याचे वाईट परिणाम लग्न झाल्यावर तिला जास्त जाणवले. म्हणजेच “Workaholic” असणं किंवा होणं हे देखील घटस्फोट होण्यामागे कारण असु शकतं. ह्याला आपण एक प्रकारचा मानसिक रोग देखील म्हणू शकतो. ह्यावर उपाय म्हणजे लग्न झालेलं असो वा नसो किंवा कितीही आवडीचं काम असो वा नसो कामाच्या वेळेवर बंधन ठेवणं आणि कामाचं नियोजन करणं. कौटुंबिक आयुष्यातील ताण घालवण्यासाठी स्वतःला कामात बुडवून घेणे हा काही योग्य पर्याय असु शकत नाही. पण समजा अश्या “Workaholic” असलेल्या तरुण किंवा तरुणीशी लग्न झालं तर? अश्या वेळी जोडीदाराने आपल्या जोडीदाराचा पूर्व-इतिहास जाणून घेवून संयमाने वागावं. असे केल्याने सुद्धा घटस्फोट टाळता येऊ शकतात. त्यातून वाटलच तर सल्लागार (Counselor) किंवा मानसोपचारतज्ञाची (Psychiatrist) मदत घ्यावी. बाकी प्रश्न राहतो तो वैचारिक संस्काराचा तर प्रत्येक आई-वडिलांनी आपापल्या मुलांवर संस्कार करताना मुलांच्या भविष्यातील संसारिक आयुष्याचा देखील विचार करायला हवा.
संयम, समाधान, प्रेम आणि विश्वास ह्या चार बाबी विवाह ह्या संज्ञेच्या केंद्रस्थानी आहेत. विवाह किंवा लग्न करणं हा कधीही कुठल्याही बाबीसाठी पर्याय असु शकत नाही. विवाह किंवा
लग्न ही एक स्वतंत्र बाब आहे आणि त्याचं स्वातंत्र्य पूर्णपणे अबाधित राहणं नेहमीच यशस्वी विवाहात गरजेचं असतं.
शिरीष फडके
कलमनामा - १३/०२/२०१५ - लेख १४ - घटस्फोट

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या लेखाचे प्रयोजन काय ते समजले नाही? घटस्फोटाची कारणे आणि त्याचे परिणाम सर्वांनाच ठाऊक असावेत. मग नवीन काय? Happy

उदाहरणार्थ काही मुला-मुलींचे आई-वडील त्यांच्या लहानपणीच विभक्त होतात तेव्हा मुलांवर नकारात्मक किंवा लग्न संज्ञे बद्दल मनात तिढा, चीड निर्माण होऊ शकते. >>> हो ना, असं नकारात्मक वागायचं सोडून ती ट्विंकल खन्ना-कुमार का बरं अशी ट्विटर गाजवतीये??