जोग

Submitted by kulu on 4 February, 2015 - 02:43

जोग

वूड्स होलने मला ज्या अनेक गोष्टी दिल्या त्यातील एक म्हणजे आपलं संगीत ऐकायला खूप मोकळा वेळ दिला. संध्याकाळी ५ ला लॅबमधून आलो की अगदी मध्यरात्रीपर्यंत वेळच वेळ. आणि घरासमोरच समुद्रकिनारा. सरळ किनाऱ्यावर जाऊन गाणी ऐकत बसायचो. असंच एकदा मी तिथं मला माहित नसणारा एक राग ऐकला....जोग! जानेवारीची कडाक्याची थंडी, शांत समुद्र आणि मी किनाऱ्यावर बसलेलो असताना, वीणाताई राग जोग आळवू लागल्या!

मुळातच एकाच स्वराच्या कोमल आणि शुध्द श्रुती ज्या रागात येतात ते सगळे राग मला आवडतात, मग त्यात मिया मल्हार, देस, तिलंग , असे अनेक. आणि जोग मध्ये दोन्ही गंधार आणि दोन्ही निषाद! वीणाताईंनी पहिल्या कोमल निषादातूनच वातावरणावर कब्जा केला. धृपदाच्या वळणानं जाणारा सुरुवातीचा आलापातूनच जोग पसरू लागला. आणि आलाप संपून आता विलंबित बंदिश सुरु होणार तेव्हढ्यात वीणाताईनी एक अलगद मींड घेतली. शुद्ध गंधाराला षड्जाचा कण देऊन मध्यमाला स्पर्शून कोमल गंधारावर उतरणारी ती मींड म्हणजे जोगाचा आत्मा! आणि वीणाताईंच्या आवाजात ती मींड ऐकायची म्हणजे पूर्वजन्मीचे पुण्य फळाला आले असं वाटलं! वीणाताईंचा आवाज मुळातच स्निग्ध, गोड आणि गोल. त्यात कुठेही खरखर नाही. अगदी खर्जातल्या मध्यमापासून तारसप्तकातल्या पंचमापर्यंत आवाजाची गोलाई कुठेही कमी झालेली नाही. आणि त्या आवाजावर इतक्या वर्षांच्या रीयाजाचं कुठेही ओझं नाही. अगदी हळुवार फुंकर घालणारा आवाज!

ऐकताना जेवढा वाटतो तेवढा सोपा नाही हा राग. जरा न्यासाची स्थानं चुकली की त्यात सारंग आणि तिलंगाचा आभास व्हायला वेळ लागत नाही. त्यात या रागात निषाद इतका कोमल आहे की तो धैवताजवळ जातो आणि असाच निषाद कंसामध्येही वापरतात. त्यामुळे त्या निषादावरून इतकं सांभाळून कोमल गंधारावर जावं लागतं, नाहीतर तिथे जोगकंस झालाच. आणि तिथे जाऊन पोहोचतोय तोपर्यंत परत मींड घेऊन षड्जावर यायचं! प्रचंड आहे ते. हे सगळं करताना जोगाच्या सगळ्या नाजूक श्रुतीना कुठेही धक्का लावायचा नाही!

हळूहळू आलापचारी संपून, बेहालावा सुरु होतो. मग ग्वाल्हेर अंगानं जाणाऱ्या पंचम आणि षड्जावर विसावणाऱ्या सपाट ताना, छूट ताना , गमकेच्या ताना असं वर्षाव सुरु होतो. आणि मग मध्यलयीतली "साजन मोरे घर आए" ही जोग ची ट्रेडमार्क बंदिश इतकी लोभस वाटते की त्याला तोडच नाही! वीणाताईंच गायन तराण्याशिवाय पूर्ण कसं होईल. शेवटचा द्रुत तराणा म्हणजे Ecastsy. असा सबंध जोग ऐकला की कितीही ऐकलं तरी कमीच वाटावं. पुढे जवळ १०-१५ रात्री मी असाच १० ला त्या किनाऱ्यावर कडाक्याच्या थंडीत जायचो. आणो रोज वीणाताई तसाच जोग आळवायच्या. आणि रोज ती शांतता मी अनुभवायचो.!

काल रात्री तोच जोग परत ऐकला आणि लिहावं वाटलं. या सगळ्या कितीही लिहिलं तरी अनुभवायच्या गोष्टी!

http://m.youtube.com/watch?v=2AGewbgftD8

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे असं सूक्ष्म ऐकता आलं पाहिजे यार!
कधी जमणार इतकं छान ऐकायला??

वीणाताईंचा जोग तर फारच सुरेख आहे!
ग म ग..कोमल ग... सा... कोमल ग... सा.... हे अगदी कातिल आहे !!

खूपच सुरेख लिहिलंस रे ....

....... पण मी अजून "जोग" निवांतपणे ऐकलेला नाहीये ....

कुलु, खूप छान. एक सांग तुझी संगीतातले प्राथमिक शिक्षण कुठे झाले आहे कारण हे सर्व कळायला एक गुरु लागतोच लागतो. आणि हे अनेक वर्ष कळत सुद्धा नाही. माझे गुरु मला शिकवत आहेत गेले ३ वर्षांपासून तरी मला अजून साधे स्वर ओळखत येत नाही. कुठला कोमल कुठला शुद्ध हे तर दुरच राहिले. तुला संगीतातील सर्व परिभाषा माहिती नाहेत. पुर्वी मला शास्त्रिय अजिबत ऐकवत नव्हते. पण शिकायला लागल्यापासून तबला वाजला की खांदे हलायला लागतात बोट नाचायला लागतात आणि मन डोलयला लागत.

वीणा सहस्त्रबुद्धे ह्यांन्च्याबद्दल जर तो बोलत असशील तर त्यांचे घट घट मे पंछी बोलता मला सर्वाधिक आवडते.

कुलु हा मुलगा (मी त्याला मुलगाच समजतो) ज्यावेळी समोर बसून माझ्याशी बोलतो त्यावेळी "आपल्याला संगीतातील इतके ज्ञान आहे....माहिती आहे...." असे कधीच जाणवून देत नाही, उलटपक्षी संगीत विषय चर्चेला आला म्हणजे एक नियमित विद्यार्थी याच भूमिकेतून तो आपला वावर ठेवतो. "चंद्रनंदन" नंतर आज जोग बद्दल वाचताना मला राहूनराहून वाटू लागले की कोल्हापूरच्या देवल क्लबमध्ये आम्ही विद्यार्थी बसलो आहोत आणि कुलदीप नामक शिक्षक या रागाची जादूमय व्याप्ती आम्हाला समजावून सांगत आहेत.

फार प्रसन्न वाटले कुलूचे हे लिखाण वाचून. जोगेश्री नामक रागाची आणि या जोग ची काही सुसंगती आहे काय ? म्हणजे मी जोगेश्री रागातील "चलरी सजनी अब क्या सोचे..." हे गाणे ऐकले आहे. सदर गाणे जोग गटातही येऊ शकते का ?

मला प्रभा अत्रेंच्या 'तन मन धन तोपे वारु.. ' बद्दल लिहावेसे वाटते आहे पण इतके सखोल लिहिता येणार नाही. पण तन मन धन तोपे वारु म्हणजे एकदम मन प्रसन्न चित्त करणारी बंदीश आहे.

बी, कुलु कदाचित लिहिणार नाही, पण त्याच्याकडे हे निसर्गतःच आले आहे. वारश्याने म्हणू हवे तर. त्याचे आजोबा गात असत ( ते माझ्या आईच्या ओळखीचे होते. ) बाबाही गात असत. त्याच्या सर्व गुणांना जोपासणारी प्रेमळ आई त्याला लाभली आहे.

तो खुप मोठा कलाकार होणार आहे. त्याला तशी संधी मिळू दे, अशी शुभेच्छा आपण सर्वांनी व्यक्त करु या.

दिनेशदा धन्यवाद. मला हेच म्हणायचे होते की घरात काहीतरी बेस असला की त्या त्या कला अवगत करायचा खूप मदत होते. मला इथे कुलुला कमी नाही लेखायचे आहे. असे कितीतरी जण असतात ज्यांच्या घरात कलाकार वडील माणसे असतात पण त्यांचा कल तिकडे नसतो. कुलु तुला ढीगभर शुभेच्छा. तु अवश्य मोठा होशील.

क्या बात है कुलु. एक्दम मस्त राग.

सा ग म प नि् सां
सां नि प म ग म ग् सा नि् सा
वादि/संवादी प्/सा
एकदा कोमल ग् वर आलात की मग वर जाता येत नाही.

काउ हे तुझ्यासाठी.

स्थाई
सजन मोरा घर आयो (आ...यो)
मोरा अत मन सुख पायो

अंतरा
मंगल गाओ , चौक पुरावो
प्रेम पिया हम पायो

चैतन्य धन्यवाद! आणि तुझं बासरीवादन ऐकल्यानं मला माहीतीय की तु फक्त सुक्ष्म ऐकत नाहेस तर ते बासरीवर उतरवतोसही. तु वाजवलेला यमन कानात आहे अजुन! तुझ्यापुढं माझं ऐकण हे "ढोबळ" पेक्षाही "ढोबळ" आहे Happy

पुरंदरे काका, देव काका, धन्यवाद! अनिलभाई, तुमच्यासारख्या संगीतातील महारठींचा प्रतिसाद पाहुन मन खुलले Happy

मामा आणि दिनेश, तुमच्या प्रतिसादांबद्दल मी काय लिहु? कीती कौतुक करता तुम्ही! तुमच्या कौतुकाने इकडे माझं वजन वाढलं Proud तुमचा माझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त विश्वास आहे. Happy
दिनेश, मला चंगली सतार वाजवता आली तर आपलं बिलासखानीचं डील पक्कं Happy

बी, दिनेशने म्हटल्याप्रमाणे माझे आजोबा आणि बाबा गायचे. खरंतर माझी लहानपणीची सगळ्यात आधीची आठवण म्हणजे माझे आजोबा पेटीवर भीमसेन जोशींच भजन वाजवताहेत अशी आहे. अणि माझे आजोबा मी २ महिन्यांचा असताना गेले. पण माझं ऐकण जितकं सुक्ष्म तुम्हाला वाटतय तितक नाहीय ते. त्यातल्या ज्या थोड्याफार तांत्रिक गोष्टी समजल्यासारख्या वाटतात त्या तशा वाटण्यासाठी मला तो राग ४-५ वेळा ऐकावा लागतो Happy तुम्ही एकदा संगीत अस्वाद गटात सहभागी व्हायला हवय . मज्जा पण येते आणि ज्ञानात भरही खुप पडते. आणि प्रभाताईंच्या कलावतीबद्दल जरुर लिहा, आम्हाला वाचायला आवडेल!

कुलु, २ महिन्याचे असताना आजोबा गेलेत आणि त्यांनी गायलेली भीमसेनंजीची भजने तुम्हाला अजून आठवतात! इतकी तल्लख स्मरणशक्ती मी अद्याप कुणाचीही पाहिलेली नाही!

मी डॉ. प्रभा अत्रेंच्या तन मन तोपे वारु बद्दल नक्की लिहिन. मी रोज दिवसातून दोन तीन वेळा तरी ही बंदीश ऐकतोच. तुम्ही फक्त चार वेळा एक राग ऐकता मी तर एखादा राग आवडला की तो वर्षभर ऐकत असतो. मी सलग तीन वर्षांपासून विभास रागाची एकच बंदीश रोज पहाटे ऐकत ऑफीसमधे जातो.मला ती बंदीश ऐकल्याशिवाय माझी पहाट पुर्ण झाल्यासारखी वाटतच नाही. इतके व्यसन जडते चांगल्या गोष्टींचे सुद्धा.

जसराज जीनी गायलेला जोग ऐकण्यासारखा आहे. मी १९८२ ते ८५ मध्ये खूप वेळा त्यान्च्या मैफिलीत ऐकला आहे.
पन्डित मणीराम , पन्डित प्रताप नारायण आणी पन्डित जसराज यान्ची एक रेकोर्ड देखिल आहे. जरूर ऐका.