मकर संक्रांत आणि भारतीय विविधता

Submitted by मनी मानसी.... on 23 January, 2015 - 05:24

मकर संक्रांती हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण आहे. भारतातील जवळजवळ सर्वच भागात मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. इंडो - आर्यन (हिंदी) भाषेनुसार यांस 'मकर संक्रांथी' असे म्हंटले जाते. दक्षिणेकडील काही भागात आजही हेच नाव प्रचलित आहे. हा सण विशेषत: सुर्य देवतेशी संबंधित आहे. सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारे संक्रमण यांस 'संक्रांती' असे म्हणतात तर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो म्हणून 'मकर संक्रांती' असे नाव प्रचलित झाले, यानुसार सूर्याचा मकर राशीतील प्रवेश, वसंत ऋतूचे भारतातील आगमन अशा अनेक परंपरागत समजुती आणि प्रतीके हा सण साजरा करण्यामागे आहेत. ग्रेगोरिअन केलेंडर नुसार दरवर्षी सारख्याच तारखेस येणाऱ्या काही भारतीय सणांपैकी हा एक सण आहे. दरवर्षी १४ जानेवारीला येणारा हा सण अपवादानेच कधी १३ किंवा १५ जानेवारीस येतो.

कृषीप्रधान असलेल्या भारत देशात कापणीच्या हंगामाची सुरुवात मकर संक्रांतीपासून होते तर हाच काळ उत्तर पूर्व मान्सूनचा दक्षिण भारतातील समाप्तीचा काळ मानला जातो. शास्त्रीय दृष्ट्या संक्रांत हा ऋतूबदलाचा काळ मानला जातो ज्यामध्ये हिवाळा ऋतू संपून वसंत ऋतू म्हणजेच एका अर्थाने कापणीचा हंगाम सुरु होतो. या दिवसापासून रात्रीच्या तुलनेत दिवसाचा कालावधी मोठा असलेला म्हणजेच मोठा दिवस सुरु होतो. महाभारतासारख्या प्राचीन ग्रंथातही मकर संक्रांतीचा विशेष उल्लेख आढळतो यावरूनच हा सण केवळ सामाजिक-भौगोलिक दृष्ट्या महत्वाचा आहे असे नाही तर ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्याही महत्वाचा मानला जातो. सूर्य या मकर संक्रमणाच्या दिवशी आपला दक्षिणायनातील म्हणजेच मकर अक्षवृत्ताचा प्रवास संपवून आपला उत्तरायानातील म्हणजेच कर्कवृत्ताकडील प्रवास प्रारंभ करतो असाही एक शास्त्रीय तर्क यामागे आहे.

संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात मकर संक्रांतीचा गाजावाजा असतो. विविध भागात हा सण विशिष्ट पद्धतीने आणि विशिष्ट नावाने साजरा केला जातो. विशेषत: उत्तर आणि पश्चिम भारतातील काही भाग आणि दक्षिणेतील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या भागांमध्ये मकर संक्रांतीचे विशेष महत्व आहे. विविध भागांत वेगवेगळ्या रिती - परंपरांनुसार साजरा केल्या जाणाऱ्या या सणाची नावेही वेगवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गुजरात मध्ये 'उत्तरायण', तामिळनाडूत 'पोंगल', पंजाब - हिमाचल प्रदेश या भागात 'लोहरी' अथवा 'माघी', आसाममध्ये 'भोगी बिहू', उत्तर प्रदेश - बिहार या भागात 'खिचडी', कश्मीर मध्ये ' शिशुर सेंक्रात' तर कर्नाटकमध्ये ' मकर संक्रमणा' अशा वैविध्यपूर्ण नावांनी मकर संक्रांत साजरी केली जाते. भारताव्यतिरिक्त नेपाळ, थायलंड, म्यानमार, कंबोडिया, श्रीलंका या देशांमध्येही मकर संक्रांत वेगवेगळ्या पद्धतींनी आणि नावांनी साजरी केली जाते.

महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना विविधरंगी हलवा (तिळगुळ) देऊन "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला" अशा शुभेच्छा देण्याची पद्धत आहे. याप्रसंगी लग्न झालेल्या स्त्रिया एकत्रितपणे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात. संक्रांतीच्या दिवशी विशेषकरून काळ्या रंगांची वस्त्रे परिधान करण्याचीही पद्धत आहे. काळा रंग हा उष्णतेचा शोषक असल्याने थंडीत असणाऱ्या या उत्सवात उब असणारी वस्त्रे असावीत हे यामागील शास्त्रीय कारण. त्याचप्रमाणे संक्रांतीच्या काळात पतंग उडवण्याचीही परंपरा महाराष्ट्रात प्रचलित आहे.

गुजरातमध्ये 'उत्तरायण' या नावाने ओळखला जाणारा हा सण विशिष्ट पद्धतीने दोन दिवस साजरा केला जातो. १४ आणि १५ जानेवारी अनुक्रमे 'उत्तरायण' आणि 'वासी उत्तरायण' अशा नावांनी विशेषत: पतंग उडवण्यासाठी गुजरातमध्ये संक्रांतीच्या सणाची वाट पाहिली जाते. संक्रांतीसाठी विशेष वजनाने हलक्या कागदाचे पतंग बनवले जातात. गुजरातमध्ये डिसेंबर पासून संक्रांतीपर्यंत 'उत्तरायण' साजरा केला जातो. हिवाळी भाज्यांचे प्रकार आणि तिळापासून बनवलेल्या गोड चिक्की हा या काळातील विशेष खाद्यप्रकार असतो. वडोदरा, अहमदाबाद, भावनगर यांसारख्या मोठ्या शहरांत पूर्ण दोन दिवस पतंग उडवण्याचा आनंद घेतला जातो, एकमेकांचे पतंग कापण्याच्या स्पर्धा लावल्या जातात.

दक्षिण भारतात तीन दिवस साजरा केला जाणारा हा सण 'पोंगल' या नावाने ओळखला जातो. पोंगल हा एक प्रकारचा गोड भात प्रकार यानिमित्ताने केला जातो. यामध्ये पहिल्या दिवशी पोंगल प्रसाद चढवून पावसाची प्रार्थना केली जाते. दुसऱ्या दिवशी सूर्याला पोंगल चा प्रसाद चढवून अध्यात्मिक प्रगती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते आणि तिसऱ्या दिवशी घरातील पाळीव प्राणी, गुरे यांना पोंगल प्रसाद दिला जातो.

उत्तर प्रदेशातही संक्रांतीचे विशेष महत्व आहे. हिंदू शास्त्र-पुराणानुसार मकर संक्रांत हा वर्षभरातील पवित्र स्नानांपैकी पहिल्या स्नानाचा दिवस मानला जातो. येथील असंख्य लोक या दिवशी अलाहाबाद, वाराणसी यांसारख्या पवित्र धार्मिक स्थळी एकत्र जमून पहाटे स्नान करून प्रार्थना करतात. त्यानंतर दिवसाची सुरुवात केली जाते. याप्रसंगी नवीन वस्त्रे परिधान करून एकमेकांना तिळाचे लाडू (तिळगुळ) देण्याची पद्धत आहे.

लोहरी हा पंजाबमधील एक भव्य उत्सव समजला जातो जो मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो. १३ जानेवारीच्या दिवशी शेकोटी करून त्याभोवती एकत्रित जमले जाते. याप्रसंगी नातेवाइक आणि मित्रमैत्रिणी एकत्र जमतात. विविध प्रकारचे खाद्य प्रकार आणि नृत्य हे लोहरी सणाचे विशेष आकर्षण असते. पंजाबी लोकांचा प्रसिध्द नृत्यप्रकार 'भांगडा' केला जातो त्याचप्रमाणे पंजाबी गाणी याप्रसंगी म्हंटली जातात. 'सरसो का साग' आणि 'मक्की की रोटी' हा लोहरीचा विशेष खाद्यपदार्थ असतो. लोहारीचा दुसरा दिवस म्हणजेच संक्रांतीचा दिवस पंजाब मध्ये 'माघी' म्हणून साजरा केला जातो.

विविध राज्यांमधील अशा अनेक प्रथा आणि परंपरांच्या माध्यमातून प्रतिकात्मक रित्या मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा केला जातो. आपल्या संस्कृतीनुसार साजऱ्या केला जाणारा प्रत्येक सण-उत्सव तो साजरा करण्यामागे काही शास्त्रीय, वैज्ञानिक अथवा पारंपरिक कारणे निश्चितच असतात.यावर्षीचा हा मकर संक्रांतीचा सण सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन यावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मकर संक्रांतीच्या असंख्य शुभेच्छा….

-- मानसी मगरे
पुणे

पूर्वप्रकाशित - साप्ताहिक सकाळ (१७ जानेवारी २०१५, संक्रांत विशेषांक).

images.jpgKUDSVHI-W135_G0U21P_346463e.jpgSANKRANTI_1720283g.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला या वेळी एक नविन गोश्ट कळली की सोलापुर कडे या सन्क्रतिसाथी आई ने मुलीला जोडवी आणि साडी घ्यायची आहे.