गुन गुन गायिए !

Submitted by kulu on 13 January, 2015 - 06:53

गुन गुन गायिए !

स्वीस एअर च्या कृपेमुळे रविवारी सकाळी ११:३० ला येणारा मी शनिवारी रात्री १०:३० लाच दिनेशच्या घरात वहिनीला जागे करत प्रवेश करता झालो. बरंच झालं. रविवारी पहाटे ६:३० ला किशोरीताईंची मैफल होती. पहाटे पावणेपाचालाच वहिणीने हाक दिली, मी तयार होऊन पावणे-सहाला पार्ले टिळकला हजर. प्रभावळकरांच्या कृपेने पटकन जाऊन एक चांगली जागा पकडली. मनात उत्सुकता होती...... ताईंची मैफल! एखाद्या सत्यनारायणाच्या पूजेच्या आधी असते तशी सात्विक लगबग सगळीकडे होती.! पावणे सातला सगळी मंडळी हजर झाली. संवादिनीवर सुयोग कुंडलकर, तबल्याच्या साथीला भरत कामत, व्हायोलीनवर मिलिंद रायकर आणि तानपुऱ्यावर तेजश्री आमोणकर नि नंदिनी बेडेकर! गाभारा सजला होता, गानसरस्वती आता त्यात विराजमान होणार होती ! ताई आल्या..... नेहमीप्रमाणे काळी साडी, काळे कुळकुळीत केस, बाणेदार नाक, तेजस्वी मुद्रा, आब असलेली चाल आणि पूर्ण पाठीवरून घेऊन पुन्हा उजव्या हाताच्या घट्ट मुठीत पकडलेला सोनेरी किनारीचा पदर! आता मंदिर पूर्ण झालं. ताईनी नतमस्तक होऊन श्रोत्यांना आणि रंगदेवतेला नमन केलं!

....... ताईंनी स्वरमंडल छेडलं आणि त्यातून अवघा तोडी सांडला! ताईंच्या पहिल्या आ बरोबर जणू सगळं जग त्यांनी कवेत घेतलं. मेरे मन याहू रटे ही तोडीतली धीरगंभीर विलंबित बंदिश! "जीवनात खूप दु:ख आहे आता तरी हरीनाम जप " असा काहीसा अर्थ! ताईंच्या स्वरांचं वर्णन मी काय करणार! आर्त आणि आवाहन करणारे ते स्वर सगळीकडे भरून राहिले. ताईंच्या आवाजातलं कंपन पहिल्या दहा मिनिटांत गेलं आणि मग सुरु झालं ते तोडी होणं! प्रत्येक श्रुती तोडी होऊन आलेली. प्रत्येक स्वरवाक्याला त्या त्या जागेवर समर्थन होतं. उगीच सुचतंय म्हणून आणि श्रोत्याला आचंबित करण्यासाठी श्रुतींची permutations-combinations ताईंनी कधीही वापरली नाहीत! जर त्या स्वरवाक्याला रागाच्या त्यावेळच्या भावविश्वात जागा नसेल तर ते स्वरवाक्य ताईंच्या गळ्यातून कधीही येत नाही! तोडीतला पंचम ऐकणं म्हणजे एक अद्भुत आनंद पण ताई मोठ्या सॅडीस्ट! मध्यमावरून पंचमावर जाणार असं वाटतंय तोपर्यंत ताई पंचमाला अलगद स्पर्शुन कोमल रिषभावर समेवर येऊन पोहोचल्या पण! पंचमाचा आभास ही फक्त theoretical वाटावी इतकी कठीण गोष्ट ताई मात्र अगदी सहजतेनं गातात. आणि मग तो आंदोलित कोमल धैवत म्हणजे दु:खात हुळहुळणारा जीवच! असं किती सांगावं ! ताई ताना घेताना पण जेव्हा सा-प, म-ध अशा अवरोही ताना घेतात तेव्हा षड्जावरून पंचमावर अशा जातात की जणू हवेत अलगद विहरणारं पीस! तिथे मींडीचा आभास होतो पण ती मींड नसते. गुन गुन गायिए या दृताबरोबर तोडी चा अविष्कार संपवला ताईनी! एकसलग तोडी तास-सवातास झिरपत होता!

मध्ये १० मिनिटे मध्यंतर मागताना ताई म्हणाल्या "जाणार नाही ना कुठे? मी आलेच दहा मिनिटांत. जाऊ नका हं!" पुन्हा जेव्हा आल्या तेव्हा देखील "का माझ्या श्रोत्यांना ऊनात बसवलंय, त्याना इकडे स्टेजवर आणा. केव्हढी जागा आहे इथं. तुम्ही येत नाही इथं तोवर मी गाणार नाही हं!" असा लहान मुलाप्रमाणे हट्ट धरणाऱ्या, श्रोत्यांना वंदन करणाऱ्या ताईंना जेव्हा लोक गर्विष्ठ म्हणतात तेव्हा अशा जन्मजात बिनडोक लोकांच्या डोक्यात मी तंबोरे का फोडत नाही हा प्रश्नच आहे! पु लं नी म्हटल्याप्रमाणे "काही लोकांना नाक हे मुरडण्यासाठीच दिलेले असते" आणि तोंड हे चरण्यासाठी! हो, कारण पुढे ताई तोडी गात असताना माझ्या मागे बसलेली बाई दुसरीला "वडे कित्ती टेस्टी आहेत " हे सांगत होती. डोक्यात कांदे बटाटे असणे हा नुसता वाक्प्रचार नसून ते प्रत्यक्षात असतं हे मला त्यावेळी कळलं! ज्या लोकांना शास्त्रीय संगीत आवडत नाही अशा लोकांपेक्षाही मैफलीला येऊन कोरडी राहणारी आणि चरणारी ही ढोरं जास्त दुर्दैवी!

असो! मध्यंतर झाल्यावर ताईंनी स्वरमंडलावर ललत पंचम छेडला! खरं स्वर-मंडल वापरावं ताईंनीच! स्वर-मंडलावर राग सेट करणं हे ताईच करू जाणे! स्वर आणि स्वराची वर्तुळात्मक आस , यामुळे आपल्याकडे २२ श्रुती सोडूनही एका सप्तकात स्वरांची अनेक रूपे संभवतात! त्या त्या रागाला त्या त्या स्वराची फक्त ती आणि तीच श्रुती! त्यामुळे ताईंच्या स्वरमंडलावर देखील गंधार, पंचम असं स्टोकॅटो न ऐकू येता त्यातून तो एक रागच ऐकू येतो! ललत पंचम हा ताईंना आंदन दिलेला राग आहे. त्यामुळे इतर कुणाचा ललत पंचम मी ऐकला नाही आणि ऐकणार पण नाही! या ललत पंचमनं सकाळच्या झुलत्या ऊनाला एक प्रभा आली!

यावेळी दोन गोष्टी अगदी प्रकर्षाने जाणवल्या. पहिली म्हणजे मिलिंद रायकरांचं व्हायोलीन! असं गाणारं व्हायोलीन कधीही ऐकलं नाही! ताईंच्या स्वरवाक्याला रायकरांनी व्हायोलीनवर खूप मुरब्बीपणे पूर्ण केलं आणि तेही पूर्ण श्रुतींसहित! आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेजश्री आमोणकरचा गोड आवाज! इतक्या सुंदर आकाराच्या ताना घेतल्या तिने की ताईनी देखील वाहवा दिली! पुढे एकदा तिचा आवाज फुटल्यावर सर्वांसमक्ष ताईनी "जिथंपर्यंत आवाज जातो तिथंपर्यंतच गां" असं सांगितलं! ह्यालाच गुरु म्हणतात!

असो! पावणे सातला सुरु झालेली मैफल १० ला संपली. ताईंचं वय ८४ या गोष्टीला Biological fact याउप्पर काही महत्व नाही! साक्षात संगीताला वयाची बाधा नसते! ताईंच्या गायानामुळ साक्षात अवघ्या ब्रह्मांडातली ऊर्जा माझ्यापर्यंत प्रवाहित झाली. आता ती आयुष्यभर पुरेल!

(ताईंचा तोडी आणि ललत पंचम इथे ऐका http://mio.to/album/Kishori+Amonkar/Prabhat+%28Navras%29+%282000%29
हे आधीचे रेकॉर्ड आहे. मी मैफल रेकॉर्ड केली नाही )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय अभ्यास आहे! वाचताना वाक्यावाक्याला अवाक व्हायला होतं! जे जाणवतं ते तसंच शब्दातही उतरवण्याचं जबरदस्त सामर्थ्य आहे तुझ्यात. तू लिहिलेलं वाचल्यावर खुप सकस काहीतरी वाचल्याचं एक अपूर्व समाधान मिळतं.
अशा त-हेने ना कधी ऐकलं ना कधी अभ्यासलं. प्रत्यक्ष मैफली किती ऐकल्या असतील पण तुझे लेख वाचताना हे सगळंच अद्भूत आहे असं वाटतं. गाणं ऐकायच्या शिकवणीला येणारे मी तुझ्याकडे.

किशोरीताईंना चार वर्षांपूर्वी 'सहेला रे' ला ऐकलं होतं. तेजश्री आमोणकर, नंदिनी बेडेकर आणि रघुनंदन पणशीकर होते साथीला. पण ताईंच्या दमदार दौडीपुढे ह्या तरुणांची साथ मागे रहात होती. तेव्हा शिष्यांकडून देवीचा ८० पूर्तीनिमित्त्ये खरोखरीच साद्यंत पूजाथाट बघायला मिळाला होता. ह्या थोर गानसरस्वतीला प्रत्यक्ष पहाय-ऐकायला मिळालंय, मिळतंय हे परमभाग्य आहे आयुष्यातलं!

कुलू यू आर ब्लेस्ड. Happy
एक तर इतकी सुरेख समज आणि शब्दात उतरवण्याचं सामर्थ्य दोन्ही अदभूत आहे.

तुझा लेख प्रचंड सात्विक आहे त्यामुळे तंबोरे डोक्यात फोडण्याची किंवा डोक्यात कांदे बटाटे भरलेत ही वाक्य थोडी कर्कश्य वाटली Happy पण तुझा राग समजू शकते. इतक्या सुरेख स्वरांच्या पावसात भिजण्यापेक्षा लोकांना बटाटा वडा किती टेस्टी आहे यावर चर्चा करावी वाटते. आणि ते राग येण्याजोगंच आहे.

मस्त लेख नेहेमीप्रमाणेच!!..........:स्मित:

जे जाणवतं ते तसंच शब्दातही उतरवण्याचं जबरदस्त सामर्थ्य आहे तुझ्यात. तू लिहिलेलं वाचल्यावर खुप सकस काहीतरी वाचल्याचं एक अपूर्व समाधान मिळतं.>>> +१.

मस्र्त लेख. आवडला.

सई कित्ती तोंडभरुन कौतुक करतेस. भारी वाटतं Happy
गाणं ऐकायच्या शिकवणीला येणारे मी तुझ्याकडे.>>>> एकदा आपण मिळुन गाणं ऐकु. आणि मग त्याविषयी बोलु. इतकी मजा येते. अगदी कवितेसारखं एकाच रागाच प्रत्येकाचा व्ह्यु! Happy
ही वाक्य थोडी कर्कश्य वाटली>>>> हो दक्षिणा ती वाक्ये कर्कश्श्य आहेत खरंच. मी लिहिणार नव्हतो इथे टाकताना पण म्हटलं जसं उतरलाय हातातुन तसंच इथे पोस्टावं! आणि माझ्या मनात हे विचार अ‍ॅक्च्युअली नंतर आले, मैफल संपल्यावर. Happy पण फार राग आला त्या बयेचा!
शांकली आणि नंदिनी खुप खुप धन्यवाद! Happy

क्या बात है कुलदीप - एक मैफिलच अनुभवली तुझ्या लेखातून .... असाच 'स्व' विवर्जित संगीतात बुडून रहा - म्हणजे इतरांच्या विचित्र कमेंट्स, इ. ऐकू येणार नाहीत आणि लेखातही उतरणार नाहीत ... Happy

सईची पोस्ट एकदम खास - संपूर्ण अनुमोदन ...

असाच 'स्व' विवर्जित संगीतात बुडून रहा>>>> खरंय काका. असंच व्हायला पाहिजे!
त्यावेळी मी फक्त मागं वळुन बघितलं. पण नंतर गाण्याविषयी विचार करताना लक्ष्यात आलं की मधला जो भाग चुकला तो त्या बाईमुळे चुकला. मग राग आला तिचा. आणि हा राग ना ताईंच्यासाठे जास्त येतो. आयुष्यभर गाण्याची साधना केलेली कलावती गाणं सादर करताना माणसं अशी वागतात. अशा माणसांना हक्कच नाहे संगीत ऐकण्याचा इतका संताप होतो! Sad

भारतीताई धन्यवाद! Happy फोटो दिसत नाहीय! Sad आणि मला अहो जाहो नका म्हणु! अरे कुलु च म्हणा! मला आवडतं Happy

खूप सुंदर लिहिलंय कुलु !

किशोरी आमोणकरांच्या मैफिलींबद्दल काही ज्या इतर कुरबुरी एरवी ऐकू येत असतात त्याचा स्पर्शही ह्या मैफिलीला झाला नाही, अतिशय सुरेख रंगली मैफिल असं ऐकलं.

कुलु....

किशोरीताईंच्या दैवी पातळीवरील रागदारी गायनाबाबतच नव्हे तर तुझ्या हृदयी त्या नावाबाबत असलेल्या भक्तीभावनेबाबतही किती सुरेखरित्या तू प्रकटन केले आहे ते भाषा आणि मांडणीवरून अधोरेखीत होत आहे. वाचताना असे जाणवत गेले की एकीकडे ताईंचा स्वर लागला आहे तर दुसरीकडे त्याद्वारे येणा-या लहरीना घेऊन तू त्या जादूचे चित्र रेखाटत आहेस. कलाकाराच्या स्वरमोहिनीने मंत्रमुग्ध होणारा श्रोता कसा असावा याचे तू म्हणजे एक आदर्श उदाहरण आहे. आज ८४ वर्षांच्या ताई तो गळ्यातील जन्मजात धारदार स्वर संगीतसेवेद्वारे कसा राखत आहे आणि तो सादर करताना वयाचे कसलेही बंधन त्याना जाणवत नाही याचा तू साक्षीदार होतास. नशीबवानच म्हणायला हवे तुमच्यासारख्या श्रोत्यांना.

(मैफिलीतील वातावरणात श्रोतवर्गातील काही अनुभव तुला खटकले आणि लिखाणाच्या भरात त्यांचे उल्लेख लेखात अवतरले, ते योग्य की अयोग्य या मुद्दा जरी बाजूला ठेवला तरीही सर्वसाधारणपणे अशा पातळीवरील लोक हरेक मैफिलीत असणार हे गृहित धरणेच ठीक. अशाना प्रसंगी थोडातरी विरोध केला तर त्यापुढील आपला सारा वेळ गायनाऐवजी मनस्तापाला थंड करण्यातच जातो.)

दक्षिणा,

>> एक तर इतकी सुरेख समज आणि शब्दात उतरवण्याचं सामर्थ्य दोन्ही अदभूत आहे.

अगदी शंभर टक्के सहमत.

आ.न.,
-गा.पै.

अरे कुलु कसला आहेस रे तू. काय अफाट लिहितोस. ___/\___.

माझी तर आता खात्री झालीय तू मागच्या जन्मी मोठा गायक असणार शास्त्रीय संगीतातील.

मॅड मॅड लिहिलाय लेख, कुलु. केवळ अप्रतिम.
<<....... ताईंनी स्वरमंडल छेडलं आणि त्यातून अवघा तोडी सांडला! .....
.... एकसलग तोडी तास-सवातास झिरपत होता!>>
हा अख्खा परिच्छेद पुन्हा पुन्हा वाचला... सुरेख म्हणजे सुरेखच.
लिही रे... अजून लिही.

कुलू...
इतक्या दिवसांनी मायबोलीवर आलो आणि सार्थक झालं बघ.
ताईंच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त पुण्यात कार्यक्रम झाला होता. त्यात अलहिया बिलावल आणि नंतर खट गायल्या होत्या. त्या आठवणी जाग्या झाल्या तुझ्या लेखाने.

संगीताच्या मैफिलीत खाबूगिरी करणारे पाहिले की मलाही सात्विक संताप येतो.
पण त्याबद्दल अशोक मामा म्हणालेत तसे, असे लोकही येणार हे गृहित धरलेलेच बरे.

बाकी दक्षिणाशी सहमत
>>एक तर इतकी सुरेख समज आणि शब्दात उतरवण्याचं सामर्थ्य दोन्ही अदभूत आहे.

वा काय सुरेख लिहिलं आहेस. वाचून मन तृप्त झालं!. तू सुद्धा गातोस का? मलाही तुझी शिकवणी लावायची आहे. स्काईपवर एखाद दोन वर्ग घे ना प्लीज.. सीरीअसली. मला कुठला पंचम आणि कुठला गंधार आणि कुठला रिषभ हे अजूनही नीट कळत नाही. कधी कळेल का माहिती नाही. तुम्ही लोक जेंव्हा असे स्वर पकडता तेंव्हा आपली अक्कल कुठे हरवली असे वाटते.

लिहित रहा...

अंजु धन्यवाद अगं! तुझ्य कमेंट्स वाचल्या की एकदम माझ्या अंगावर मुठभर मांस चढतं! Happy
दाद आणि चैतन्य अगदी मनापासुन धन्यवाद! तुमच्या सारख्या संगीत अभ्यासकांचे प्रतिसाद खुप महत्वाचे आहेत Happy
गा. पै. आणि बी थांकु! Happy बी , गंधार वगैरे कळले नाहीत तरी आनंदात तसुभरही फरक पडत नाही. उलट ते कळायला लागल्यावर कधी कधी भावा पेक्षा स्वराकडे जास्त लक्ष लागते मग! मला पण जेव्हढे समजल्यासारखे वाटते तेव्हढेच लिहितो!
मामा, आज तुम्हाला भेटलो त्यामुळे इथे आता तुम्हाला थांकु म्हणणं म्हणजे औपचारीक होईल!

खूप सुंदर, ओघवतं लिहिलंय! लकी यू...आय अ‍ॅम सो जेलस ऑफ यू!
मीसुध्दा किशोरीताईंची फॅन आहे. पण कधी लाईव्ह मैफिल ऐकली नाहीये. पण नुसतं कारमधून जाताना अवघा रंग एक झाला लावलं तरी वातावरण भारुन जातं, प्रसन्न, मंगल वाटू लागतं. दैवी आशिर्वाद लाभलाय त्यांना.

वेदिका२१, वरील प्रतिसादाशी सहमत. सहज म्हणून त्यांचं हे ऽऽऽ श्यामसुंदर ऐकलं. आता दुसरं कोणाचंही ऐकवत नाही.
आ.न.,
-गा.पै.

छान लिहिलत कुलु. प्रत्यक्ष किशोरीताईंच्या मैफिलीला उपस्थित राहायचा फील आणलात .

<<<< इतकी सुरेख समज आणि शब्दात उतरवण्याचं सामर्थ्य दोन्ही अदभूत आहे.>>> अनुमोद्न

किती सुंदर !! गाणं प्रत्यक्ष जगता आहात असम वाटलं वाचून.

किशोरीताई माझं ही दैवत आहेत. त्यामूळे जास्तच आवडलं . पण तुमच्या " धन्य ते गायनी कळा " लेखमालेतील सर्वच लेख असेच सुंदर आहेत.

इथे प्रतिसाद दिलेल्या सर्वांसाठी....

आज कुलु हा सदस्य कोल्हापूरात माझ्या घरी आला होता. सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.०० पर्यंत अखंड बोलत होतो आम्ही....या संवादात कुलुने "किशोरी आमोणकर" आणि एकूणच रागदारीचा प्रवास असा काही कथन केला माझ्यासमोर माझ्यासाठी....ते ऐकताना सातत्याने जाणवत गेले की हा युवक म्हणजे या क्षेत्रातील माहितीचे भांडार राखून आहे....शिवाय माहिती सांगतेवेळी त्याच्या अंगी वसलेली नम्रता मला फार भावली....

शिवाय जाण्याच्यावेळी "मामा, मी नंतर पुन्हा येईन तुमच्याकडे....आपण बोलत राहू..." असे जे म्हणाला त्यावेळी मी त्याच्याकडे पाहातच राहिलो.....किती सांगणार आहे आणि किती माहिती आहे त्याला या शाखेची ?....हाच विचार त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहाताना माझ्या मनी घुमत राहिला....

मामा तुमच्यासारख्या चौफेर ज्ञान असणार्‍या माणसाने ही माझी स्तुती केलेली वाचताना मला भयंकर भारी वाटतंय. Happy खरी गोम मामांच्या भाचेमंडळींना कळेलच पण Proud

मनीमोहोर, जाई अनेक अनेक धन्यवाद! प्लीज अरे कुलू म्हणा की Sad

पुरंदरे काका आणि शांकली थांकू Happy

एखाद गाण , राग ऐकला , की कानाला आणि मग मनाला आनंद देउन गेला ह्यापलिकडे शास्त्रीय संगित कळत नाही. पण ते शिकल तर हा आनंद सहस्त्रगुणित होइल अस मात्र वाटल तुझा लेख वाचून.
ऐकायला शिकवणार का?

सगळे मिळून ऐकण्यासाठीच संगीत-आस्वाद-गट निर्माण व्हावा असा प्रयत्न करत होतो.
परंतु कमी प्रतिसादांमुळे, प्रत्यक्ष भेटून ऐकणे होईलसे वाटत नाहिये.
त्यामुळे, कुलू, तू ज्या पद्धतीने लिंक देऊन लेख लिहितो आहेस, त्याच पद्धतीने किमान आत्ता तरी संगीत-आस्वाद घेत राहू. प्रत्यक्ष भेटणे कधी होईल तेव्हा होवो.
तेव्हा, पुनश्च हेच सांगतो, लिहीत रहा.
मलाही जसे जमेल तसे लिहीत राहीन.

थँक्स चैतन्य. असा काही धागा आहे हेदेखिल आता इथे उल्लेख केलात म्हणुन समजलं. तो धागा सर्वजनिक वाचनासाठी नसल्यामुळे पोचला नसेल जास्ती जणांपर्यंत.

मला इंटरेस्ट आहे या गटात सामिल होण्यात. पण मी फक्त कानसेनच आहे, तिथल्या पोस्ट्स वाचून मग कळेलच काय ते. तोवर कुलदीप, तुम्ही अशा लेखमालिका लिहित रहा.

Pages