दोडक्याचे कबाब

Submitted by चिन्नु on 25 December, 2014 - 03:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ लहान दोडके शिरा काढून, १ मध्यम बटाटा, २ लहान हिरव्या मिरच्या, १ च्मचा आलं-लसूण पेस्ट, १ जुडी कोथिंबीर, २ छोटे चमचे रवा, मीठ, शॅलोफ्राय करायला तेल, आवडत असल्यास एक छोटा कांदा बारीक चिरून, ताजे मटारदाणे, बाईंडींगसाठी बेसन आणि तांदळाचे पीठ समप्रमाणात पण लागेल तसे.
कबाबची प्लेट सजवायला कोथिंबीर, गाजराची फुले, काकडीचे आणि कांद्याचे काप.

क्रमवार पाककृती: 

दोडक्याच्या शिरा काढून तुकडे करा. बटाट्याची साल काढून तुकडे करा. हे तुकडे, थोडी मटार, अर्धी जुडी कोथिंबीर (काड्यावाला भाग), हिरव्या मिरच्या, आल-लसूण पेस्ट, थोडे मीठ घालून मिक्सरमधून वाटा.
*आशूडीने सुचवल्यानुसार-- मिक्सरमधून काढलेले मिश्रण थाळीत एका बाजूला ठेवले तर दोडक्याचे पाणी निघून येईल ते वेगळे करावे म्हणजे बाईंडिंगला पीठ कमी लागेल.
रवा घाला. ५ मिनिटे ठेवा तसेच. नंतर लागेल तसे बेसन, तांदळाचे पीठं, मीठ, जीरे, मटारदाणे, कोथिंबीर, कांदा मिक्स करा. कबाब थोड्या तेलात शॅलोफ्राय करा. एका प्लेटमध्ये सॅलड आणि केचपबरोबर किंवा कांदा काकडीने सजवून खायला द्या.

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात आलू टिक्कीच्या आकाराचे ८ कबाब झालेत.
अधिक टिपा: 

१. मिश्रणात पाणी मुळीच लागत नाही. दोडक्याचे पाणी पुरते.
२. एकदा मिक्स केल्यावर कबाब लगेच लावावेत, नाहीतर दोडक्याचे पाणी सुटत जाते, मग भजी तळावी लागतील Happy
३. थोडा गाजराचा कीस मिक्स करू शकतो, पण एक गोडीळ चव येते. तशी न येता मीठ आणि तिखट जास्त टाकावे लागेल.
४. आधी प्लेट सजवण्याचे सामान सज्ज ठेवावे. आयत्यावेळी कबाब ठेवून गरम सर्व्ह करावे. नाहीतर तळता तळताच कबाब खाऊन फस्त होतात Proud
५. पुलाव, हे कबाब, कोशिंबीर, गाजर हलवा किंवा गुलाबजामून म्हणजे मस्त आणि लाईट बेत.
६. प्रतिसादातून सुचवलेले - बाजरीचे पीठ खमंगपणासाठी वापरता येइल. थँक्स टू आशूडी. Happy

माहितीचा स्रोत: 
मंजुलाज किचनच्या राईस कबाबवरून प्रेरित.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वेगळा प्रकार. दोडका पोखरूनही करता येतील हे. तूकडे करून पोखरायचे आणि आतल्या पोकळीत सारण भरायचे.

पाककृती छानच असेल, पण फोटोशिवाय मजा नाही. पुढच्या वेळेला कराल तेव्हा फोटो तेवढे काढून घ्या फस्त करायच्या आधी. Happy

थँक्स दिनेशदा. सारण भरून वाफवून शॅलो फ्राय करता येतील. हेल्दी प्रकार!
नरेशजी, दोडक्याला खपवण्यासाठी म्हणून ऐनवेळी केलेला प्रकार. सॉरी हं, फोटो नै घेतले.

नाही भाऊ. फ्रेश मटार किंवा फ्रोझन हिरवे मटार तसेच धुवून वापरायचे.
वाफवायची गरज नाही. शिजतात पटकन.

मस्त पाककृती. आज करून पाहिली. फोटो काढायचे लक्षात आले नाही. दोडका अजिबात न खाणार्यांसाठी मस्त प्रकार आहे. कळलेही नाही यात काय काय.जिन्नस आहेत. मी यात थोडासा ओवा आणि तांदळाच्या पिठीऐवजी घरात असलेले बाजरीचेच पीठ वापरले त्यामुळे भाजणीसारखा खमंगपणा आला होता. (कालची पोळी आणि भातही ढकलून दिला त्यात! Wink )
झटपट होणारा मस्त स्टार्टर. घरच्या पार्टीत पण करता येईल.थँक्स चिन्नु! Happy
मिक्सरमधून काढलेले मिश्रण थाळीत एका बाजूला ठेवले तर दोडक्याचे पाणी निघून येईल ते वेगळे करावे म्हणजे बाईंडिंगला पीठ कमी लागेल.

थँक्स आशु. हो आज्जिबात कळत नाही दोडका आहे यात Happy
टिप वर अ‍ॅड करते. मीही बाजरीपीठ ट्राय करेन नक्की. मोठ्ठा थँक यू Happy

अंकु, करके देको Happy