आजी-आजोबा

Submitted by शिरीष फडके on 21 December, 2014 - 22:40

कलमनामा – २१/१२/२०१४ – लेख ११ – आजी-आजोबा
http://kalamnaama.com/aaji-ajoba/
आजी-आजोबा
आज लग्नाचा २५वा वाढदिवस साजरा झाला. बायकोने सगळ्या पाहुण्यांसमोर तोंडभरून आपल्या नवर्याचं कौतुक केलं. नवर्यानेदेखील बायकोचं कौतुक केलं. कौतुक करताना दोघांचेही डोळे आनंदाने भरून आले होते. पण या सगळ्यापेक्षा विशेष होतं ते मुलांनी केलेल्या कौतुकाचं. आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतला असं म्हणून दोन्ही मुलांनी आपल्या आईवडिलांना लग्नाच्या २५व्या वाढदिवसाची एकप्रकारे शाब्दिक भेटच दिली. सगळे पाहुणे गेल्यानंतर सवयीप्रमाणे दैनंदिनी लिहायला वडील बसले. का बायकोने आपलं कौतुक केलं? का त्या कौतुकाला आपल्या मुलांनीदेखील संमती दिली? नवरा आणि बायकोने एकमेकांशी कसं वागायचं हे आपण कुठे शिकलो? कुणी आपल्यावर हे संस्कार केले? कुणामुळे आपण आजचा हा दिवस अनुभवू शकलो? अशा प्रश्नांचा आणि त्यांच्या उत्तरांचा उलगडा आज दैनंदिनीमध्ये होऊ लागला होता. लहानपणापासून ते आतापर्यंतच्या काळाची उजळणी होत होती. ज्या
ज्या व्यक्तिंनी आपल्यावर संस्कार केले त्यात जी काही मंडळी होती त्यात अग्रेसर होते आपले आजी आणि आजोबा आणि दैनंदिनीची पानं नकळतच आजी-आजोबांच्या आठवणींनी भरू लागली. वडिलांच्या दैनंदिनीची पानं (दिवस आजचा)ः लहानपणी सुट्टीच्या दिवसात त्यांच्याकडे जाणं व्हायचंच. आई-बाबा आणि दादाबरोबर त्यांच्या घरी दरवर्षी जायचोच. ते घर होतं आजी आणि आजोबांचं. तसं सख्खं असं काही नातं नव्हतं त्यांच्याशी. ओळखीतले होते एवढंच. पण त्यांच्याकडे जाणं जणू नित्य-नियमाचंच होतं. निदान सुट्टीच्या निमित्ताने का होईना पण जात होतो त्यांच्याकडे.
आजी. सगळ्यांना आवडेल अशीच होती ती. नऊवारी साडीतील आजी आजही डोळ्यांसमोर येते. दोन हातात केवळ दोनच बांगड्या असायच्या. सत्तरी जवळ आली तरी डोळ्यांवर अजून चश्मा लागला नव्हता. कपाळावरचं छोटंसं कुंकू, पायातली जोडवी आणि चेहर्यावरचं हास्य आजही मी विसरू शकत नाही. मी कधीच तिला उदास पाहिलं नाही. नेहमी तिचा चेहरा प्रसन्न असायचा.
आजोबा. पांढरा सदरा आणि धोतर. डोळ्यांवर गांधी चश्मा आणि हातात नक्षीदार काठी. त्यांचा चेहरादेखील नेहमीच प्रसन्न असायचा. मुळात त्या दोघांकडे बघितलं की मलाच प्रसन्न वाटायचं. कुणालाही आपले आजी-आजोबा त्यांच्यासारखेच असावेत असं वाटलं तर ते काही वावगं ठरणार नाही. प्रत्येकाला आपलेसे वाटावे असेच होते ते दोघंही.
आजी आणि आजोबांच्या राहणीमानात साधेपणा होता पण अजागळपणा नव्हता. कुठेही अतिशयोक्ती नव्हती आणि कमतरताही नव्हती. सगळं कसं तंतोतंत. ते नेहमीच टापटीप, नीटनेटके असायचे. त्यांच्या कपड्यांना जशी शिस्त होती तशीच शिस्त त्यांच्या घरालादेखील होती. त्यांच्या इतकं चांगलं घर मला आजतागायत दिसलं नाही. एखाद्या देवळात गेल्यावर कसं शांत आणि प्रसन्न वाटतं तसंच त्या घरात गेल्यावर वाटायचं. घरात एकच खोली होती. खोलीच्या मध्यभागी पडदा सारून विभाजन केलं होतं. पडद्याअलीकडे आजोबांची आरामखुर्ची ऐटीत डोलायची. त्या खुर्चीच्या हातांची घडी करता येत होती. लहानपणी त्या खुर्चीत बसण्यासाठी आम्ही दोघं भाऊ खूप धडपडायचो, वाद घालायचो. मग आजोबा आम्हा दोघांनाही आळीपाळीने बसू द्यायचे. मी लहान असल्यामुळे माझा नंबर नेहमीच पहिला असायचा. त्या खुर्ची शेजारी दुमडणारी हिरव्या रंगाची लोखंडी खाट होती. आई सांगायची की, मला रांगतादेखील येत नव्हतं तेव्हा मला जर झोप आली तर आजी त्या खाटेखाली तिच्या जुन्या नऊवारी साडीचा झुला बनवून त्यात मला झोपवत असे. खाटेसमोर एका छोट्याश्या लाकडी टेबलावर छोटासा ब्लॅक-अॅण्ड-व्हाईट टीव्हीसुद्धा होता. एक अँटीना होता त्या टीव्हीवर.
आजोबांच्या पुस्तकांचा छोटासा लाकडी स्टँडदेखील होता त्या पडद्याअलीकडच्या खोलीत. त्यावर काळ्या रंगाचा राऊंड डायल फोन होता. त्या फोनच्याबरोबरवर भिंतीवरती एका खुंटीवर आजोबांची काळी आणि पांढरी गांधी टोपी टांगलेली असायची. दुसर्या खुंटीवर आजोबांचा काळा कोट असायचा. पूर्वी शाळेच्या मास्तरांचा असायचा ना, तसाच. सर्वात महत्त्वाचं होतं ते पडद्याला लागून असलेलं लाकडी कपाट. महत्त्वाचं याकरता कारण ते लाकडी कपाट जेव्हा आजी उघडायची तेव्हा त्यातील टापटीपपणा किंवा नीटनेटकेपणा हा बघण्याजोगा असायचा. कपडे म्हणा किंवा इतर सगळ्या वस्तू इतक्या व्यवस्थित ठेवलेल्या असायच्या आणि तेदेखील दर वेळेस. माझ्या दर खेपेला त्या सगळ्या वस्तू, कपडे तसेच स्वच्छ आणि व्यवस्थित असायचे आणि त्याच जागी, ना थोडे डावीकडे नाही थोडे उजवीकडे.
माझं आजीकडे जाण्यामागे खरं कारण असायचं ते तिच्या हातच्या नारळाच्या वड्या. आजीकडे जाण्याआधी आई-बाबा आजोबांना फोन करून सांगायचे की, आम्ही सगळे येत आहोत. आजी-आजोबांकडे पोहोचायला साधारण एक-दीड तास लागायचा. पण तेवढ्या वेळेत कसं काय पण आजीच्या डबा भरून नारळाच्या वड्या तयार. एखाद्वेळ तिच्याकडे नेहमीच नारळाच्या वड्या तयार असाव्यात. कुणास ठाऊक, पण पितळेच्या डब्यातून काढून तांब्याच्या वाटीत दिलेली नारळाची वडी खाण्याची मजा काही औरच. पडद्यापलीकडे असलेल्या स्वयंपाक घरात एक हिरव्या रंगाचा मोठा स्टँड होता. त्यात सगळी पितळेची भांडी होती आणि गोलाकार, वरून उभट झाकणं असलेले पितळेचेच डबे होते. पाणी पिण्याचा तांब्या हा नावाप्रमाणेच तांब्याचा होता. मी त्या सगळ्या भांड्यांचं वर्गीकरण माझ्या वैचारिक कुवतीनुसार पिवळी आणि लाल भांडी असं करायचो. ती सगळी भांडी आजीच्या कडक शिस्तीखाली स्वयंपाकघरात वावरत असायची. आजीकडे चहाचं भांडंदेखील चकचकीत असायचं. तो स्वयंपाकघरातून येणारा स्टोव्ह चालू करतानाचा आणि स्टोव्ह चालू झाल्यानंतरचा विशिष्ट आवाज आजही कानात घुमतो. खरंच असं स्वयंपाकघर पुन्हा दिसणं नाही. खोलीच्या एका कोपर्यात स्वच्छ आणि चकचकीत मोरी होती. मोरीत असलेल्या पितळेच्या आणि तांब्याच्या छोट्याशा बादलीच्या कडीशी मी नेहमी खेळत बसायचो. आवडायचं ते घर मला.
आजी आणि आजोबांच्या घराला जशी शिस्त होती तशीच शिस्त त्यांच्या आचार-विचारांमध्येदेखील होती. त्यांच्या आचार-विचारांमध्ये एक प्रकारचा टापटीपपणा किंवा नीटनेटकेपणा होता. एक विशिष्ट दिशा होती त्याला. खूप काही शिकण्यासारखं होतं त्यांच्याकडून. ते
ज्याप्रकारे एकमेकांना सांभाळून घ्यायचे,
ज्याप्रकारे एकमेकांची काळजी घ्यायचे,
ज्याप्रकारे एकमेकांना वागणूक द्यायचे ते बघून आपसूकच त्यांच्याबद्दल नितांत आदर निर्माण व्हायचा. त्यांच्या वागण्या आणि बोलण्यात कुठेही हक्क किंवा अधिकाराची भाषा नव्हती.
आम्ही त्यांच्या घरात पाऊल टाकलं की आजी आम्हाला गूळ-खोबरं आणि पाणी द्यायची. म्हणायची उन्हातून आलात ना, गूळ-खोबरं खा जरा बरं वाटेल. तिच्या या बोलण्यातून येणारी आपुलकी, काळजी नेहमीच हवीहवीशी वाटायची. कधी कधी गूळ नसला की ती साखर द्यायची आणि बोलण्याच्या नादात साखरेचा डबा बाहेर टीव्हीच्या टेबलावरच विसरायची. थांबा हं मी चहा टाकते असं म्हणून ती स्वयंपाकघरात जायची, तेवढ्यात आजीला लक्षात यायचं की साखरेचा डबा बाहेरच राहिला. मग ती आजोबांना म्हणायची अहो, साखरेचा डबा बाहेरच राहिला का हो? स्वयंपाकघर बैठं असल्यामुळे खाली पाटावर बसून आजी सगळा स्वयंपाक करत असे. वय वाढल्यामुळे तिला उठणं-बसणं सहज शक्य होत नसे. आजोबांना त्याची पूर्ण जाणीव असल्यामुळे आजोबा तो डबा आत घेऊन जायचे. ते येण्याआधीच आजी हात वर करून डबा घेण्यासाठी तयार असायची, जेणेकरून आजोबांना डबा ठेवण्यासाठी खाली वाकावं लागू नये. आजोबासुद्धा कधीकधी त्यांचा चश्मा वेगवेगळ्या ठिकाणी विसरायचे आणि मग त्यांची चुळबुळ पाहून ते चश्मा शोधत आहेत हे न बोलतादेखील आजीला कळायचं. मग ते जिथे चश्मा विसरले आहेत त्या जागी आजी बारीक डोळे करून बघायची. आजोबा ते बघणं बरोबर टिपायचे. पण हे सगळं एकही शब्द न बोलता चालायचं.
चारचौघांत नवरा-बायकोने कसं वागायचं, एकमेकांना कसं सांभाळून घ्यायचं याचं आदर्श उदाहरणच होते ते. कुठेही हक्क, आदेश, अधिकार नाही. घरात असलेल्या किंवा आलेल्यांसमोर अधिकार गाजवणं, आदेश देणं, खोचट बोलणं, धारदार टोमणे मारणं, हक्काची भाषा करणं, अपमान करणं, पाण्यात बघणं, असे कुठलेही प्रकार त्यांच्या आचार-विचारांत दूरवरदेखील नव्हते. त्यांचं वागणं-बोलणं हे चांगल्या वागणुकीचं प्रदर्शन नव्हतं. वागणं-बोलणं कुठेही कृत्रिम नव्हतं. त्यांच्या प्रेमात कुठेही अतिशयोक्ती नव्हती. एकमेकांना दिल्या जाणार्या वागणुकीत सहजता होती. नैसर्गिक वाटायचं ते. अशी वागणूक देण्यामागे काय कारण असेल? एवढा पराकोटीचा परस्पर समन्वय कुठून येत असेल? या प्रश्नांची उत्तरं हवी होती मला पण त्या वयात कशी बरं सापडणार? कारण तसं वय माझं जास्त नव्हतं. त्यात शब्दांची बांधणी करून विचारणं तर जमणारच नव्हतं. यापाठी एवढ्या वर्षांचा सहवास, संसार कारणीभूत असेल असा अंदाज होता पण प्रत्येक बाबतीत खातरजमा करण्याची सवय असल्यामुळे आजी आणि आजोबांकडून उत्तरं मिळाल्याशिवाय चैनही पडत नव्हतं. मग आई आणि आजी किंवा बाबा आणि आजोबांचं बोलणं काळजीपूर्वक ऐकायला लागलो आणि उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न केला.
आजी आणि आजोबा ज्या आदराने एकमेकांना वागणूक देत होते त्यामागे बर्याच वर्षांचा संसार, सहवास आणि अनुभव कारणीभूत आहे हा माझा अंदाज खोटा ठरला. त्यामागे बर्याच वर्षांच्या संसाराचा, सहवासाचा आणि अनुभवाचा भाग नव्हता तर सवयीचा भाग होता. या वागणुकीमागे होती ती सवय. सवय हे महत्त्वाचं आणि एकमेव कारण होतं त्या पराकोटीच्या परस्पर समन्वयामागे. आजी आणि आजोबा जेव्हापासून एकमेकांना ओळखतात तेव्हापासूनच ते तसे होते. पूर्वी लग्नाआधी फारशी ओळख नसायची. लग्नानंतर काही कालावधित नवरा-बायको एकमेकांना थोडेफार ओळखू लागायचे. अशी ओळख ज्या क्षणी झाली तेव्हापासूनच आजी आणि आजोबा असेच वागायचे एकमेकांशी जसे वृद्धापकाळात वागत होते. वृद्धापकाळात ते गरजेपोटी एकमेकांशी आपुलकीने आणि आदराने वागत नव्हते. ते केवळ त्यांच्या आचार-विचारांत सुरुवातीपासूनच असलेल्या सवयीमुळे तसे वागत होते. जणू एकप्रकारची आदरयुक्त भावनांची जोड असलेली शिस्तच होती त्यांच्या विचारांना. हेच विचार त्यांच्या आचरणात, पर्यायाने एकमेकांना दिल्या जाणार्या वागणुकीत उमटायचे आणि अशा वागणुकीची, वागणूक मिळण्याची किंवा वागणूक देण्याची त्यांना सवय होती. आजी आणि आजोबांचं म्हणणं होतं की, संसाराच्या एवढ्या प्रदीर्घ काळात ही सवय प्रगल्भ होत गेली एवढंच. संसारात नवर्याने किंवा बायकोने कधीही बदलू नये, नेहमीच स्वतः प्रगल्भ व्हावं आणि आपल्या जोडीदारातही प्रगल्भता यावी यासाठी प्रयत्न करावेत मग संसार खर्या अर्थाने सुखाचा आणि समाधानाचा होतो.
खरंच आजच्या काळातल्या या व्यावहारिक जडणघडण असलेल्या नात्यांच्या परंपरेत असं आजी-आजोबांसारखं निर्मळ, निःस्वार्थी, निरागस आणि नितळ नवरा-बायकोचं किंवा पती-पत्नीचं नातं निर्माण करण्यात मी आणि माझी बायको थोडेफार का होईना पण यशस्वी झालो असू तर त्यात माझ्या आजी-आजोबांचा नक्कीच मोलाचा वाटा आहे. (तशी माझ्या बायकोची आकलनशक्ती ही अफाटच आहे, त्याबद्दल तिचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि त्यामुळेच तिने माझ्यावर झालेले आजी-आजोबांचे संस्कार जाणून घेऊन त्याची योग्य ती चिकित्सा करून ते संस्कार पूर्णपणे आत्मसात करून घेतले.) पण खरंच आजी आणि आजोबांनी बरंच काही दिलं मला. माझ्या कुवतीने हा अमूल्य ठेवा जतन करण्याचा, त्यावर संस्कार करण्याचा आणि त्याचा विस्तार करण्याचा म्हणजेच माझ्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचा मी माझ्यापरिने प्रयत्न करत आहे. कारण दुर्दैवाने मुलांना माझ्या आजी-आजोबांना बघण्याचा, भेटण्याचा योग नाही आला. त्यामुळे सतत प्रयत्न करणं एवढंच माझ्या हाती आहे. हे प्रयत्न माझ्या हातून निरंतर चालू राहू दे हाच ध्यास आणि हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शिरीष फडके

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<चारचौघांत नवरा-बायकोने कसं वागायचं, एकमेकांना कसं सांभाळून घ्यायचं याचं आदर्श उदाहरणच होते ते. >>>>
मान गये....
अशा गुणीजनान्चा सहवास लाभला...थोर भाग्य आहे...