रानजाई आणि शकुंतला

Submitted by भारती बिर्जे.. on 18 December, 2014 - 13:37

रानजाई आणि शकुंतला

दरीत गाणे घुमते आहे.
निर्झरिणी होऊन वहाते आहे.
दरी प्रकाशाने भरली आहे.
हिरव्या काळोखाची वेळ सरली आहे.
निबिड आडवाटांवर एक पाखरू उडते आहे.
बाळ-कहाणी शकुंतलेची पानजाळीत दडते आहे.

दरीत ही परी, कशी आली झाडांच्या घरी?
वहाते जिथून निळीजांभळी रंगझरी .
आली ती कुठून ?
आकाशातून उमटून ?
कुणाला विचारावेत असले प्रश्न सारे ?
दरीत तरी नाही कुणी उत्तर देणारे.

रानजाईच्या झुडपाला इतकेच कळे,
त्याच्या आडोशाला होते एक मुटकुळे.
गुलाबी गोरे, गालांवर सुकलेले अश्रू खारे.
गार गार तिचे चिमणे हातपाय
दंवात भिजून काकडून जाय.

आली ही इथे माणसांच्या जगातून
टाकून दिलेली ! कुजबुज पानातून
करावे काय हिचे ? सांभाळावे हिला ?
रानजाईचा जीव गलबलून गेला
पांघरेल ती पाचोळा खाईल ती फळे
राहू दे इथेच.
रानातही वाढतात ना पशुपक्ष्यांची बाळे.

पक्षीही म्हणाले आम्ही पाळू हिला
आमच्या चोचीतून भरवू फळे,रानपाला.
अशी जगली रानजाईची लेक गुणी
एके दिवशी तिथे आले कण्वमुनी
बाळाला धरले छातीशी प्रेमाने चुंबून
नेले जवळच्या आश्रमात मायेने उचलून.

रानजाईचे झुडूप हरखून गेले,म्हणाले,
‘’ बाळाचे आयुष्य मार्गी लागले
माणसांचं जग असो कितीही क्रूर
आश्रमाचं जग त्यापासून दूर .
ऋषींच्या घरी
पर्णकुटी बरी .
मोर आणि गायी, हरणाची पाडसे.
झाडे आणि वेली, उन्हाचे कवडसे .
माझ्या बाळा, सुख लागो तुला.
ये कधीमधी मलाही भेटायला.. ‘’

पक्ष्यांनी चोचीतून भरवून कण
जगवलेले बाळ अतिविलक्षण.
ऋषींनी खरेच नाव ठेवले शकुंतला.
नवे घर मिळाले दरीतल्या परीला.
ऋषींची लाडकी, आश्रमाचं गोंदण
सई कळ्या-फुलांची,पाडसांची मालण,
.

तिच्या ओठांवर रुमझुमणारी गाणी
ऐकायला आश्रमातले भोळे जीव कोणी
मैत्रिणी जिवाभावाच्या सोबतीला सदाच्या
दिवस फुलून मावळे ,येती रात्री नक्षत्रांच्या .
दरीकडे आडवाटेवरून ती विहरत जाई
तेव्हा तिला पाहून बहरे रानजाई,
-तिची सख्खी आई !

‘’माणसांचं जग असो कितीही क्रूर
आश्रमाचं जग तरी त्यापासून दूर ’’
खुळंभोळं झुडूप हेच म्हणायचं पुन:पुन:
त्याला कशा कळाव्यात अदृष्टाच्या खुणा ?

असो. इथेच संपवूया ही बाळ-कहाणी
सुखाच्या कोवळ्या छाया हिरावण्याआधी कोणी ..
कारण अजून तरी दरीत गाणे घुमते आहे.
निर्झरिणी होऊन वहाते आहे.
दरी प्रकाशाने भरली आहे.
हिरव्या काळोखाची वेळ नित्याप्रमाणे सरली आहे.

आणू नका इकडे बाहेरची बाधा, रोखा त्या शिकाऱ्याला,
न लागो नजर वखवखत्या जगाची निरागस शकुंतलेला.

-जिगीषा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users