श्रीयंत्र

Submitted by विक्रमादित्य पणशीकर on 2 December, 2014 - 22:48

॥ललितायै नमः॥
प्रत्येक मानवाने आपल्या जीवनात सुखप्राप्तीचा ध्यास घेतलेला असतो. सुखाची व्याख्या व्यक्तीनिहाय वेगवेगळी असली तरी सुखाचा मूलाधार पैसा असे समजले जाते, अर्थात हा केवळ समज आहे हे जरी खरी असले तरी रंका पासून रावा पर्यंत प्रत्येक जण धनसंपन्न होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतो असतो हे मात्र खरे. कलीयुगाच्या प्रभावाने न्यायमार्गाने धनधान्यसंपन्न होण्याचा प्रयत्न करणारे आपल्या ध्येयसिद्धिचा आनंद घेताना फारच क्वचित दिसतात. यामुळे मनातील आत्मविश्वासाचा स्तर कमी होतो व मनाचे खच्चिकरण होण्यास प्रारंभ होतो. आपल्या नशिबात अपयशच लिहिले आहे अशा विचाराने त्रस्त झालेल्या व्यक्ती विविध क्षेत्रात दिसतात.

पराभूत मनोवृत्तीच्या दृष्टचक्रातून मार्ग काढण्यासाठी दैवी उपायांचा आधार घेण्याकडे माणसाचा कल दिसतो. आपल्या भारतीय संस्कृतीत देवाच्या उपासनेस अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. मनःशक्तीचा विकास करण्यासाठी आपल्या कुलदेवतेची नित्य उपासना हा प्रधान मार्ग सांगितला आहे. कुलदैवत हे मात्यापित्याप्रमाणे आपल्या उपासकाचे पालन पोषण करत असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात कुलाचाराचे पालन करण्याकडे लोकांचा कल कमी होत चाललेला दिसतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुलदैवतेकडे पाठ फिरवून आपण कोणत्याही अन्य धार्मिक अनुष्ठानाचा मार्ग स्विकारलात, तर तो अपेक्षीत फळ देण्यास कदापि समर्थ ठरत नाही. कुलदेवतेची उपासना असताना जर अन्य काम्यव्रताचा आपण स्वीकार केलात तर त्यात हमखास यश येते असा अनुभव येतो.

यंत्र मंत्र तंत्र या उपासना पद्धतीत अनेकानेक भाग्यवर्धनाचे उपाय सांगितलेले आहेत. त्यासाठी विशिष्ठ अनुष्ठान , पूजा पद्धती सांगितलेली असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात झटपट फलप्राप्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. सध्या प्रसारमाध्यमाच्या साह्याने यंत्र मंत्र तंत्र यातील विविध उपाय लोकांपर्यंत अगदी
सहजपणे पोहोचतात असते. अर्थात हे सर्व उपायांचा मूळ हेतु विश्वकल्याण हाच आहे. मात्र सध्या आपण इंटरनेट यांच्या साह्याने विविध यंत्रांच्या विक्रिचा सपाटा लावलेला दिसतोय. उदा. श्रीयंत्र, कुबेर यंत्र, सिद्ध हनुमान यंत्र, शनियंत्र अशी नानविविध यंत्रे आज फोन केल्यास उपलब्ध होतात. आणि विशेष म्हणजे ही सर्व यंत्रे सिद्ध केलेली असतात. जे लोक अपयशाच्या चक्रिवादळात सापडलेले आहेत, त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेण्यात विक्रेते अग्रेसर असल्याचे दिसते. धनप्राप्तीसाठी श्रीयंत्राचा जोरदार खप सुरु असल्याचे दिसते. सोने, चांदी, तांब, स्फटिक अशा विविध प्रकारात श्रीयंत्रे उपलब्ध आहेत, व ती सिद्ध करुन देण्याचा दावा केला जातो. हा एक हास्यास्पद प्रकार म्हणावा लागेल. आज कोणत्याही जत्रेत तांब्याची स्फटिकाची श्रीयंत्रे अगदी ५०/- ते ३०००/- रुपयात मिळतात व ती सिद्ध असल्याचा दावा केला जातो. टिव्हीवर सुरु असलेल्या जाहिरातीचा प्रभाव या विक्रिस हातभार लावताना दिसतो. श्रीयंत्र विकत घेतल्यास घरातील देव्हा-यात त्याची स्थापना केल्यास लक्ष्मी प्रसन्न होईल ही श्रद्धा भाविकांना दिलासा देत असते.

श्रीयंत्राची उपासना लक्ष्मी प्राप्तीसाठी करणे हाच मुळात अत्यंत सामान्य हेतु आहे, आणि श्रीयंत्राची मुख्यदेवता लक्ष्मी आहे असेही चुकीचे आहे. श्रीयंत्राची मुख्यदेवता
श्रीललिता आहे. श्रीयंत्राचा अधिकार सर्वश्रृत असा आहे. श्रीयंत्राच्या केवळ दर्शनाने मानवाचे कल्याण होते. मात्र त्यासाठी त्याची रचना शास्त्रसंमत असणे गरजेचे आहे.
उदा. समजा आपण नोकिया कंपनीचा उत्तम मोबाईल घेतला, मात्र त्यात सिमकार्ड घातले नाही तर त्याचा काय उपयोग माझ्याकडे मोबाईल आहे या मानसिक समाधानापेक्षा आपणास काही लाभ होणार नाही. त्याच प्रमाणे शास्त्रसंमत रचनेचे श्रीयंत्र उपलब्ध असेल त्याची विधिवत उपासना होणे नितांत गरजेचे आहे, आणि त्यात सातत्य ठेवणे हि गरजेचे आहे. मात्र सध्या केवळ मी पैसे मोजणार व घरी श्रीयंत्र आणणार हा मार्ग स्विकारलेला दिसतो. त्यामुळे जर आपल्या श्रद्धेस योग्य ते फळ मिळाले नाही तर आपण अजूनच निराशेच्या गर्तेत जातो असे दिसून आले आहे. यंत्र उपासना हा सोपा मार्ग नाही यासाठी कठोरपरिश्रमाची, निरपेक्ष श्रद्धा, अव्यभिचारी निष्ठेची, निर्मलमनोवृत्तीची नितांत गरज आहे. श्रीयंत्र विश्वब्रह्मांडाच्या स्वरुपात आहे. त्यात विविध देवतांचा वास आहे. या यंत्राची देवता श्री ललिता हिचे दास्यत्व देवी महालक्ष्मी व महासरस्वतीने स्विकारले आहे. यावरुन आपण देवीललितेचे महात्म्य ओळखू शकाल. लक्ष्मीप्राप्तीसाठी श्रीयंत्राची पूजा हा मनास न पटणारा विषय आहे. त्याचे कारण विष्णू स्मरण केले तर तेथे लक्ष्मीने उपस्थित होणे हे लक्ष्मी आद्यकर्तव्य समजते, रामनामाचे किर्तन सुरु आहे तेथे हनुमंताने उपस्थित असणे हा हनुमंताचा परमानंदाचा भाग आहे. त्याप्रमाणे श्रीयंत्राची उपासना सुरु असेल तर तेथे धनधान्यादी वैभवाची कधीही वानवा असणार नाही किंबहूना असूच शकत नाही. त्याचे कारण तृप्ती हे श्रीयंत्र उपासनेचे प्रधान लक्षण आहे. श्रीयंत्र उपासनेचा साधक मनाने तृप्त असतो. त्यामुळे त्याच्या घरात सकल वैभव त्याच्या सेवेत धन्यता मानत असते असे चित्र दिसते. भगवान हयग्रीव देवाने अगस्तीऋषींना ललितांबिकेची जी दिव्य नामावली सांगितली त्यात ॐ ह्रींकार-जप-सुप्रीतायै नमः। असे नाव आहे म्हणजे " ह्रीं " या बीजमंत्राचा जप केल्याने जीला परमानंद होतो अशी. आद्यशंकराचार्य कल्याणवृष्टी स्तोत्रात ललितादेवीच्या " ह्रीं " या मंत्राची महती सांगताना पुढील श्लोक रचना केली आहे .....

ह्रीं हींमिती प्रतिदिनं जपता तवाख्यां किं नाम दुर्लभमिह त्रिपुराधिवासे ।
मालाकिरीटमदवारणमाननीया तान्सेवते वसुमती स्वयमेव लक्ष्मीः ॥

केवळ ह्रीं ह्रीं हा रोज जप केल्यासही प्रत्यक्ष लक्ष्मी साधकाच्या सेवेत धन्यता मानते असे आद्य शंकराचार्य म्हणतात.

त्यामुळे नामजपाचे महत्त्व लक्षात घेऊन ॥श्री ललितायै नमः ॥ या मंत्राचा जप करणे हिताचे ठरेल. यासाठी आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे श्रीयंत्र असणे गरजेचे नाही. जाहीरातबाजीस भुलून विकत घेतलेले श्रीयंत्र किंवा अन्य कोणतेही यंत्र आपल्या भाग्यवर्धनास पोषक ठरेल अशी भोळीश्रद्धा कदापी बाळगू नका. त्यापेक्षा एकही रुपया खर्च न करता दृढ श्रद्धेने
॥ ॐ दौर्भाग्यतूलवातूलायै नमः।। या नावाने गौरविलेल्या ललितेचे नामस्मरण करणे सौभाग्याची नानाविविध दालने खुली करणारे ठरेल, याबाबत आम्हास तिळमात्र शंका वाटत नाही.

श्रीयंत्राची उपासना करावी किंवा करु नये या बाबत हा लेखनप्रपंच नसून केवळ पैशाच्या मोबदल्यात घेतलेले श्रीयंत्र आपल्या सकल मनोकामना पूर्ण करणारे ठरेल असा अर्थ लावणे योग्य नाही. आजच्या काळात संसारी माणसास यंत्र उपासना हा दुर्लभ व दुःसाध्य मार्ग आहे, नामस्मरण हा आपल्या मनास तृप्तीचा आनंद देणारा व व्यावहारीक दृष्ट्या यशाच्या शिखरावर विराजमान करणारा ठरेल असा विश्वास वाटतो. श्री ललिता विजयते !

विक्रमादित्य
९०४९६००६२२

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले लिहीलय, शेवटचे वाक्य तर सर्वात महत्वपुर्ण, की केवळ बाजारातून यंत्र आणले म्हणजे झाले असे नाही, तर त्याजोडीने योग्य साधना हवीच.
इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

हनुमान चालिसा यंत्राची जाहिरात पाहिलीच असेल वाचकांनी. सात दिवसाच्या आत नोकरी लागली. कसे शक्य आहे ? सर्वांनाच असे फायदे दिसतील का ? नामांकीत कलाकार याच्या जाहिरातीत भाग घेतात याचे आश्चर्य वाटते.

जर हनुमान चालिसा यंत्र नोकरी निर्माण करण्यास कारणीभुत असणार्‍या तेजी/ मंदी च्या सायकल्स पेक्षा प्रभावी असेल तर ते रोजगार निर्मीती मंत्रालयात आधी स्थापन करायला ह्वे.