बाईपण ! / रिती !

Submitted by अवल on 9 January, 2009 - 03:02

तुम्हीपण पाहिले, अनुभवले असतील असे गड !
ज्यांना चढण्यासाठी आहेत पायर्‍या अन शेजारचा
काहीसा खडबडीत पण सोपाच चढ !

माझ्या समोरपण आला असा एक गड - संसाराचा !

तुम्ही आणखी एक पाहिलंत ?
साधारणतः बायका चढतात पायर्‍या
अन पुरुष चढ !

तर मी ही गड चढायला लागले.
अर्थात तोही होताच बरोबर !
मी आपली प्रेमवेडी,
हात धरून पायरी चढायला
पुढे केला हात...
अन त्यानेही हसून धरलान की हो हात !

मी मोहरले.
अन आत्मविश्वासाने, त्याच्यावरच्या प्रेमासह
खाली नीट पाहून
चढू लागले
पहिली पायरी !

अन मला त्या पायरीवर कितीतरी गोष्टी दिसल्या.
नवे घर, त्यातल्या नव्या रूढी-परंपरा, सवयी, आवडीनिवडी,
नवी माणसं, नवी नाती, त्यांच्या नव्या अपेक्षा.....
बाई, बाई, कित्ती गोष्टी वाट पहात होत्या, माझ्यासाठी !
मी पुन्हा मोहरले.
भरभर त्या सगळ्या गोष्टी नीट मांडू लागले.
मनाजोगत्या, मनापासून ठेऊ लागले..
कधी वर्ष सरलं कळलच नाही की... !

मग दुसरी पायरी !
तिथे तर माझं सर्वस्व भेटलं मला !
माझं बाळ !
त्याची अंगडी, टोपडी, लंगोट, दुपटी, ...
दूध, खेळणी, फॅरेक्स, ...
अबब केवढ विश्व उभं केलं मी माझं !

मग पुढे होत्याच पायर्‍या !
कधी बाळाचं हसणं, रडणं, पडणं, खेळणं, ...
त्याचे कपडे, बूट, शाळा, दप्तर, अभ्यास, ...
कधी आजारपणं -
बाळाची, बाळाच्या आजी - आजोबांची.
कधी माझ्या नोकरीतल्या जबाबदार्‍या.
आला - गेला, पै-पाहूणा, लग्न- बारशी- मुंजी.

सगळ्या पायर्‍यांवरचे हे पसारे
किती मन लावून, मनाजोगते रचत गेले.
सुखावत गेले.
वाटलं, माझा तो,
माझ्या त्याची माणसं
किती सुखावताहेत !

आणि कशी कोण जाणे
पंधराव्या पायरीवर चढताना
थोडी थकले बरं का !
स्वतःला म्हटलं,
" अंमळ श्वास घे थोडा.
सारखी चढण चढून लागतो थोडा दम.
अन आता अपरिहार्य अशी
कामंही थोडी कमीच झालीत.
थांब थोडी ! "

त्याला विचारावं , सांगावं
म्हणून मान वर केली ...
अन गोंधळले थोडी,
तो आहे कुठे ?
अन हसूच आले.
" अगं तो पुरूष !
तो थोडाच तुझ्यासारखा
पायर्‍या चढणार आहे ?
पहिल्याच पायरीवर
तुझाच हात धरून
तो वर नाही का चढला ?
तो मजेत गेला बघ
चढावरून - टणाटण !

अरेच्च्या !
त्याच्या वाटच्या
सगळ्या संसारातल्या गोष्टी
त्याच्या चढावर
राहिल्याच नव्हत्या मुळी !
त्या आपल्या घरंगळून
आल्या होत्या माझ्या पायर्‍यांवर !
अन मी वेडी
त्या सगळ्या माझ्याच म्हणून
भरभर, भर्भर करत आले की !

मनात आलेलं बोलायला
पुन्हा जरा अधिकचं मान वर करून
त्याच्याकडे पाहिलं,
तर ,
हातातली काठी नाचवत म्हणाला ,
" अगं चल लवकर.
किती वेळ लावतेस.
एवढा काठीचा भार घेऊन
या चढाच्या अवघड, खडबडीत रस्त्यावरून
मी भरभर वर आलोय.
आणि तुला साध्या पायर्‍या चढायला इतका वेळ ?
चल लवकर.
आणि आपलं झेंड्याचं कापड ?
आपला सुखी संसार,
लोकांसमोर आदर्श दिसायला नको का?
चल आटप लवकर.
दे ते झेंड्याचं कापड ! "

" अन मी ,
आपल्या झेंड्याच्या कापडावर
प्रत्येक पायरीवरचे तारे
शीवत शीवत धावतेय
तुझ्याही जबाबदार्‍या पार पाडत ,
त्याचं रे काय ? "
माझा स्वर झालाच थोडा
रडवेला,
कापरा,
अन तापलाही थोडा !

" तुम्ही बायका ना
प्रत्येक बाबतीत रडता,
कटकट करता,
अन तक्रारी करता !
अगं मी नाही का
हा काठीचा भार घेऊन
या अवघड रस्त्यावरून
चढून वर आलो !
चल,
फार भाऊक होता बुवा तुम्ही बायका ! "

मी हातातल्या किती निगुतीने
सारे तारे जडावलेल्या
झेंड्याच्या कापडामध्ये
शोधत राहिले
माझ्या खुणा !
पण जितकं शोधावं तितकं
प्रत्येक तारा आपला
त्याचेच नाव लावणारा !

कसे बसे त्याच्या हातातल्या काठीत
अडकवले ते झेंड्याचे कापड.
मग त्याने ,
अत्यंत जबाबदार व्यक्तीप्रमाणे,
कृतकृत्य होऊन,
तो, झोकात फडकविला की
गडाच्या माथ्यावर !

मी आपली खालीच
पायर्‍यांवर.
रिकाम्या ओंजळी,
झिजलेल्या तळव्यांनी
कशीबशी स्वतःला सावरत,
'कोणी पहात असेल तर '
असं वाटून
हसरा चेहरा करून उभी !
अंतर्बाह्य
पूर्ण रिती !
पूर्ण रिती !

गुलमोहर: 

ह्म्म.... !! पोचली आतपर्यंत.

वाह....!

पण जितकं शोधावं तितकं
प्रत्येक तारा आपला
त्याचेच नाव लावणारा !>>>>>हे आणि तसं सगळंच पोचणार

"मग पुढे होत्याच पायर्‍या !
कधी बाळाचं हसणं, रडणं, पडणं, खेळणं, ...
त्याचे कपडे, बूट, शाळा, दप्तर, अभ्यास, ..."

हीच पायरी तुझी, इथेच थोडा श्वास घे
बाळाला घडवण्याचा तुच थोडा ध्यास घे
हेच तुझ बाळ जेव्हा नविन गड चढेल
तुझ्या सारख्याच प्रेमवेडीचा हात जेव्हा धरेल
तिच्या बरोबरीने तो प्रत्येक पायरी चढेल
तेव्हा तुच सांग मला कोण रितं ठरेल?

कविता, क्या बात है......खूप आवडली दाद देताना उतरलेली कविता
जुन्या गुलमोहोराची आठवण झाली अगदी, अशीच जुगलबंदी चालायची तिकडे. मजा आली

साधारणतः बायका चढतात पायर्‍या
अन पुरुष चढ !

मी हातातल्या किती निगुतीने
सारे तारे जडावलेल्या
झेंड्याच्या कापडामध्ये
शोधत राहिले
माझ्या खुणा !
पण जितकं शोधावं तितकं
प्रत्येक तारा आपला
त्याचेच नाव लावणारा !

सुंदर

तसं मी नाही अनुभवले असे काहीसे गड...
कारण नसतात नेहमीच पाय-या आणी शेजारी
काहीसा खडबडीत सोपाच चढ....

तुम्ही थोडंस बरोबर बोललात
साधरण बायका चढतात पाय-या
नी पुरुष चढतात चढ...

तसं बायकांचे पाय (नव्हे, पाऊल) नाजुकच
आणी मन ही हळवे...
कधी मनात कहुर नी....
भाजलेले तळवे....

उगाच का पाय-यांची वाट केली
समाजाने संसाराच्या गडाल ?
नी झेंडयाचा लोभ देऊन
जुंपले पुरुषांना त्या चढाला.....

प्रत्येक पायरीवर
स्त्रीयांच मन रमतं....
शेजारच्या चढावर साथीदार उभा आहे
क्षणभर असंच विसरलं जातं....

तो मंद गलात हसतो,
ती स्वत: मध्येच गर्क...
साराच तिला पसार वाटतो,
तिचा तर तो भतुकलीचा खेल म्हणत तो तसाच पुढे चालतो...

चढाच्या एखाद्या दगडावर
तोही थकुन विसावतो...
थकवा दुर व्हावा म्हणुन
तिचे संसार मग्न भाव डोळ्यांनेच पितो.

मनात आलेलं बोलायला
ती त्याच्याकडे पाहते मान वर करुन...
तो गड माथ्यावर !!!!
तिची वाट पाहत असतो,
तिथले काटे-कुटे साफ करताना स्वत:ला 'रिता' करुन.....

थोडा असाही विचार करुन पाहा....
उगाच का पाय-यांची वाट केली
समाजाने संसाराच्या गडाल ?
नी झेंडयाचा लोभ देऊन
जुंपले पुरुषांना त्या चढाला.....

-- मल्लिनाथ !!!

सर्व मित्र आणि मैत्रिणींनो
धन्यवाद !
कविता, आवडलं !
मल्लिनाथ, तुमचेही पटले. चला एक तरी "चढ" हलला Happy मनापासून धन्यवाद मल्लिनाथ !

आरती, कविता, मल्लिनाथ.... चालू दे चालू दे...

आरती, फार छान लिहीलंयत तुम्ही. खासकरुन ही ओळ वाचताना अगदी कसंसंच झालं -
>>कधी आजारपणं -
>>बाळाची, बाळाच्या आजी - आजोबांची
स्वतःकडे तसं दुर्लक्षच होतं नाही का या संसारी बायकांचं?

कविता,
>>तिच्या बरोबरीने तो प्रत्येक पायरी चढेल
>>तेव्हा तुच सांग मला कोण रितं ठरेल?
यातला आशावाद खूप खूप आवडला!

मल्लिनाथ, आपली मल्लिनाथी तर अप्रतिमच! धन्यवाद! Happy

आरती, कविता, मल्लिनाथ....सुंदर च...अप्रतिम....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नवीन वर्ष सर्वांना सुख-समृध्दीचे ,भरभराटीचे ,उन्नतीचे , समाधानाचे आणि आनंदाचे जावो , ही सदिच्छा!!!

मस्त.
कविता हा माझा प्रांत नाही तरीपण ही कविता कळली आणि आवडलीपण. धन्यवाद.

मस्त.
कविता हा माझा प्रांत नाही तरीपण ही कविता कळली आणि आवडलीपण. धन्यवाद.

तिन्ही कवितांची जुगलबंदी वाचतांना मजा आली आणि अर्थपूर्णही वाटली.

सगळ्या पायर्‍यांवरचे हे पसारे
किती मन लावून, मनाजोगते रचत गेले.

हे मस्त.
तिथले काटे-कुटे साफ करताना स्वत:ला 'रिता' करुन.....
हेही छान.

माझ्या संग्रहात संसारावरील ३-४ कविता आहेत (हस्तिलिखित); माहित नाही केव्हा तुमच्यापर्यंत पोहोचवेन.

कविता आवडली आरती..

कविता मनापासून आवडली...... आरती......

छान आहे!!!!!!!!!!!!!
आवडली खूप...........

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हजारों ख्वाइशें ऐसी
के हर ख्वाइश पे दम निकले...............

कविता व प्रतिसादातील कविता. सारेच भन्नाट.
......................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

चढ आणि पाय-या. बायका आणि पुरूष.
काही झेपले नाही. पटले पण नाही.. Sad

--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!

जबरदस्त....!!!!!!
अगदी कविता, मल्लीनाथ... ते ही भारीच.....

सर्वांना धन्यवाद ! खरं तर येवढी मोठी कविता कोणी वाचेल की नाही असे वाटत होते. पण तुम्हा सर्वांचा प्रतिसाद पाहून , वाचून खुप आनंद झाला. पुन्हा धन्यवाद !

छान... सुंदर अगदी गड उभा केलात... कुठेही न गडगडता...

फार फार सुंदर लिहिलंय हो तुम्ही..अगदी काळजातले, मनातले असे Happy

छान आहे कविता!

पण थोडी लांब नाही वाटत? "टणाटण" या शब्दावर संपवली असती तर?

किंवा दोन कविता केल्या असत्या तर....

म्हणजे आपला एक विचार हं.

तुम्ही सरोजिनी यांची "पावलं" वाचली का?

शरद.

काळजाला चरचरीत फोडणीच दिल्यासारखं वाटलं.
हे बर नव्हे, एव्हडं खरं आणी प्रभावी लीहु नये, लई त्रास होतो.

खुप सुन्दर मनातल कागदावर उतरलय.

अगं तो पुरूष !
तो थोडाच तुझ्यासारखा
पायर्‍या चढणार आहे ?
पहिल्याच पायरीवर
तुझाच हात धरून
तो वर नाही का चढला ?
तो मजेत गेला बघ
चढावरून - टणाटण >>> खराय दुर्दैवान Sad

आरती अगदी प्रत्येकाच्या मनातलं!
सुंदर!

Pages