क्षणैक कवडसा (डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो)

Submitted by रसप on 16 October, 2014 - 02:22

कुठलाही चित्रपट, जर प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या २-३ दिवसांत वेळ मिळाला, तरच मी थियेटरमध्ये जाऊन बघत असतो. त्यातही मराठी चित्रपटांच्या खेळांच्या वेळा अक्कलहुशारीने निवडलेल्या असल्याने (जर तो बहुचर्चित नसेल तर) अनेकदा जुळून येत नाहीत. त्यामुळे ते पाहिले जात नाहीत. 'डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो' हा चित्रपट पहिल्या दोन दिवसांत बघता आला नाही. पण नंतरच्या दोन दिवसांत अत्यंत टोकाचे दोन रिव्ह्यू, दोन विश्वासार्ह मित्रांकडून ऐकण्यास आले आणि मग चित्रपट बघायचं ठरवलं. मतदानाच्या सुट्टीचा योगही जुळून आला आणि प्लान आखला गेला.

चित्रपटगृहाच्या आवारात असलेल्या पार्किंगमध्ये गाडी नेत असताना प्रचंड गर्दी दिसून आली. प्रथम मला असं वाटलं की बाजूलाच एका पक्षाच्या नेत्याचे संपर्क कार्यालय असल्याने ही गर्दी असावी. पण गाडी लावेपर्यंत समजुन आलं की ही चित्रपटासाठीचीच गर्दी आहे. दुसरा अंदाज असा होता की कदाचित ही गर्दी 'हैदर'साठी असेल. पण तिकीट खिडकीवर गेल्यावर कळलं की 'डॉ. प्रकाश आमटे'चीच ही गर्दी आहे आणि शो हाउसफुल आहे ! माझं तिकीट आधीच काढलं असल्याने मला चिंतेचं कारण नव्हतं, पण अनेक जण तिकीट न मिळाल्याने परत फिरत होते.

एखाद्या वनराईतून डोकं वर काढणारं एखादं उंच झाड असतं किंवा लांबच लांब पसरलेल्या खडकाळ, ओसाड भूभागावर एखादंच झाड निर्धाराने उभं असतं, त्या प्रमाणे लाखो करोडो लोकांच्या भाऊगर्दीतून एखादीच व्यक्ती असते जी स्वत:चं वेगळं अस्तित्व सिद्ध करते, वेगळा ठसा उमटवते आणि स्वत:च्या मानुषतेचं सार्थक करते. प्रसिद्धीच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलेले खेळाडू असोत किंवा रसिकांच्या हृदयात वास करणारे कलाकार असोत किंवा लाखो लोकांचे पोशिंदे बनलेले कुणी उद्योजक असोत किंवा पराकोटीचा संघर्ष करून परिस्थितीशी झगडा करत तिला झुकण्यास भाग पाडणारे कुणी समाजसेवक. असे सगळेच लोक स्वकर्तृत्वाच्या जोरावर असं स्थान प्राप्त करतात की खुद्द ह्या सृष्टीच्या निर्मात्यालाही स्वत:च्या ह्या सृजनाचा गर्व व्हावा. अशीच दोन नावं म्हणजे' डॉ. प्रकाश आमटे' आणि 'डॉ. मंदाकिनी आमटे'.

ज्या काळात वैद्यकीय सेवा, ही सेवा न होता मेवा खाण्याचा एक बाजार झाला आहे, त्या काळात एक डॉक्टर जोडपं भयानकतेची पातळी गाठलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी, ती परिस्थिती ओढवलेली नसताना लढा देतं, ही बाब जितकी वाटते, त्यापेक्षा किती तरी अधिक पटींनी कठीण आहे. 'पाण्यात पडलं की पोहता येतं', 'आली अंगावर, घेतली शिंगावर', 'आलिया भोगासी असावे सादर' वगैरे वचनं आपण ऐकतो, वाचतो आणि ऐकवतही असतो. कठीण परिस्थितीवर मात करण्याचं बळ ती परिस्थिती स्वत:च देते. पण, जेव्हा हे भोग आपल्या वाट्याचे असतात, तेव्हा ह्या सगळ्या वचनांचं मोल आहे. लष्करच्या भाकऱ्या भाजणाऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीबद्दल निराशा व्यक्त करण्याचासुद्धा अधिकार नसतो कारण त्यांनी ती आपण होऊन स्वीकारलेली असते. म्हणूनच कुठल्याही लहान मोठ्या शहरात स्वत:ची वैद्यकी सुरु करता येत असतानाही आणि एक सुरक्षित सुखकर आयुष्य मिळण्याची शाश्वती असतानाही त्याचा त्याग करून स्वत:चे आयुष्य दुर्गम भागातील आदिवासींच्या उत्कर्षासाठी वाहून घेणारे डॉ. आमटे पती-पत्नी सृष्टीच्या असामान्य सृजनाचे जिवंत रूप आहेत. अशी असामान्य कहाणी ऐकताना, पाहताना जर काळीज हेलावलं नाही, तरच नवल ! सर्वसभवती एकाहून एक भ्रष्ट, नतद्रष्ट व दुष्ट प्रवृत्तींचेच दर्शन होत असताना, त्याच वेळी त्याच भागाच्या कुठल्याश्या एका कोपऱ्यात एक प्रवृत्ती सर्वसमर्पण भावाने कार्य करते आहे; ह्याची जाणीव जेव्हा होते, तेव्हा समजुन येतं की हजारो वाईटांना पुरून उरेल इतकं काम एकेक चांगली व्यक्ती करत असते म्हणूनच सृष्टीचा समतोल ढळून अजून तरी विनाश ओढवलेला नसावा.

Dr-Prakash-Baba-Amte-–-The-Real-Hero.jpg

'द रियल हीरो' बघताना अनेक प्रसंग अंतर्मुख करतात, अंगावर काटा आणतात, नि:शब्द करतात, विस्मयचकित करतात, कारण हा चित्रपट डॉ. आमटे पती-पत्नीची कहाणी सांगतो. पूर्ण नाही, तरी बहुतांश सांगतो. त्यापुढे तो जात नाही.
सर्व कलाकारांचा सशक्त अभिनय ही ह्या चित्रपटाची एक अविभाज्य जमेची बाजू आहे. डॉ. आमटेंची भूमिका नाना पाटेकर जगला आहे. एरव्ही अत्यंत आक्रमक अभिनय करणारा नाना इथे मात्र कुठल्याच प्रसंगात अंगावर येत नाही. एका आदिवासी महिलेची प्रसूती शस्त्रक्रिया केल्यानंतरच्या एका दृश्यात दिसलेल्या नानाला बघताना आपल्या नकळतच आपण मनातल्या मनात एक सलाम ठोकतो किंवा दंडवत करतो.

तीच कथा सोनाली कुलकर्णीची. (वैयक्तिक मत सांगायचे झाल्यास मला सोनाली कुलकर्णी अतिप्रचंड आवडते. ती नुसती पडद्यावर दिसली तरी तिने माझ्यासाठी अर्धी बाजी मारलेली असते.) डॉ. मंदाकिनी आमटेंनी ज्या समर्थपणे डॉ. प्रकाश आमटेंची साथ त्यांच्या आयुष्यात दिली असावी, त्याच समर्थपणे सो-कुल नानाची साथ पडद्यावर करते. कहाणीत साहजिकच डॉ. आमटेंच्या भूमिकेतील नानाला अधिक वाव आहे, पण तरी तिची भूमिका सहकलाकाराची न राहता, प्रत्येक प्रसंगात तीसुद्धा जान आणतेच.

इतर सहकलाकारांची नावं मला माहित नाहीत. पण प्रत्येक लहान-मोठ्या व्यक्तिरेखेला साकारणारा प्रत्येक कलाकार स्वत:चं काम अत्यंत चोखपणे वठवतो. आदिवासींच्याच भूमिकेत वावरणारे आदिवासीही खूपच सहज वाटले.

संगीत व गीतांना मर्यादित वाव आहे. पण प्रार्थना अप्रतिम जुळून आली आहे.

पटकथा, दिग्दर्शन व चित्रणात मला पूर्णपणे समाधान मिळालं नाही. आधीच सांगितल्याप्रमाणे ही कहाणीच एका महान व्यक्तिमत्वाची आहे, त्यामुळे त्या कहाणीत जात्याच दम आहे. पण तिला अजूनही खूप चांगल्याप्रकारे सादर करता आलंच असतं. उदाहरणार्थ - आदिवासींना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी झगडणारे डॉ. आमटे पती-पत्नी दोन वर्षांच्या अथक प्रतीक्षा व परिश्रमांनंतर विश्वास निर्माण करण्यात यशस्वी होतात आणि नंतर त्यांना वैद्यकीय सुविधा पुरवण्याचं काम करतात. ही कहाणी सुरु असताना अचानक त्यांनी अनेक पशुंचे पालन, संवर्धन केलं असल्याचं समोर येतं. हे प्राणी कसे आले, कुठून आले ह्याचं काहीही चित्रण चित्रपटात नाही. सुरुवातीस, 'जखमी प्राण्यांना घेउन आलो' वगैरे किरकोळ उल्लेख आहे, पण प्रत्यक्ष कथनात मात्र एकदम अनेक मोठे मोठे पिंजरे, त्यात चित्ते, वाघ, हरणं, माकडं अचानकपणे येतात. तसंच, वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सरकारकडून पैसे मिळाले असावेत, मात्र ह्या पशूसंवर्धनासाठी लागणारा प्रचंड मोठा निधी उभारणेही एक खूप मोठा संघर्ष असला असणार आहे. ह्या संघर्षाला कहाणीमध्ये पूर्णपणे फाटा देण्यात आला आहे.

चित्रणाच्या बाबतीतही खूप कमतरता वाटल्या. अगदी सुरुवातीला नानासोबत चालणारा वाघ दाखवला आहे. त्या दृश्याचा खोटेपणा ठळकपणे जाणवतो. डॉ. आमटे अमेरिकेत जातात, तेव्हा तिथल्या उंच इमारती व रस्त्यांवर फिरवलेला कॅमेरा तर अक्षरश: चुकून फिरल्यासारखा वाटला ! अश्याच प्रकारे अजूनही काही जागी चित्रणातील उणीवा खटकतात. हे कदाचित उपलब्ध आर्थिक निधीच्या मर्यादांमुळे असलं, तरी 'आहे' हे नाकारता येत नाही आणि खटकणेही दुर्लक्षता येत नाही.

दोन टोकाच्या प्रतिक्रिया ऐकल्यावर माझी स्वत:ची प्रतिक्रिया दोन्हींच्या मधली असणं, हे कदाचित संयुक्तिकही आहे आणि तसंच झालं आहे. मला हा चित्रपट एक शिकवण म्हणून एकदा पाहावा, आपल्या लहानग्यांना दाखवावा असा वाटला. पण मी माझ्या संग्रहात हा ठेवणार नाही, मला तो अप्रतिम, अद्वितीय असा वाटला नाही. डॉ. आमटेंचं जीवन एक प्रकाशवाट असेल, तर हा चित्रपट केवळ एक कवडसा आहे आणि तोही क्षणैक.

रेटिंग - * * १/२

....#रसप....
http://www.ranjeetparadkar.com/2014/10/blog-post_16.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी मनापासुन वाट बघत होते तुमची रसप !!!

हा चित्रपट लगेच बघायला मिळेल याची शक्यता नाही ,पण परिक्षण वाचुनच दुधाची तहान भागवते आहे.

छान परीक्षण.. तसेही त्यांचे कार्य एका चित्रपटात मावणे / बसवणे शक्यच नव्हते. पण ते कार्य लोकांसमोर आणण्यासाठी पुस्तकांपेक्षा हे माध्यम जास्त प्रभावी ठरेल एवढेच.

चित्रपटाचा विषय छान आहे..
काही अमेरीके मधले प्रसंग उगाच ताणल्यासारखे वाटतात

( हुच्चभ्रू प्रेक्षक मिळवण्यासाठी)

अगदी मनापासुन वाट बघत होते तुमची रसप !!! >>> मी पण Happy

ह्या रविवारी बघायचा विचार आहे.

असे सिनेमा त्यातल्या त्रुटींसकटही बघावेसे वाटतात कारण त्यांमुळे अशा मोठ्या माणसांबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल खूप काही समजते. (अवांतर - मेरी कोमही म्हणूनच पाहीला होता). आणि दिनेशदा म्हणतात तसे पुस्तकांपेक्षा हे माध्यम जास्त प्रभावी वाटते.

लेकीलाही घेऊन जाणार आहे.

परिक्षण अगदी योग्य केल आहे.

ज्या काळात वैद्यकीय सेवा, ही सेवा न होता मेवा खाण्याचा एक बाजार झाला आहे, त्या काळात एक डॉक्टर जोडपं भयानकतेची पातळी गाठलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी, ती परिस्थिती ओढवलेली नसताना लढा देतं, ही बाब जितकी वाटते, त्यापेक्षा किती तरी अधिक पटींनी कठीण आहे. >>> हा एकच विचार काल चित्रपट पाहिल्या पासुन मनात घोळत आहे. अशी माणसं आजच्या युगात आहेत यावर विश्वास बसत नाही. हॅट्स ऑफ टू आमटे फॅमिली...

छान प्रामाणिक परीक्षण,
चित्रपटाचा विषयच तगडा आहे, सामाजिक आहे म्हणून चित्रपट सादरीकरणात फसला असेल तरीही त्याचे बळेच कवतुक करायची गरज नाहीयेच.
अभिनयाबाबत मात्र नाना, सोनाली हि नावे आणि ट्रेलर पाहता शंका नव्हतीच. इथे चित्रपट फसतो तर मात्र असह्य झाला असता.
बघणार होतोच, बघणार आहेच Happy

काळात वैद्यकीय सेवा, ही सेवा न होता मेवा खाण्याचा एक बाजार झाला आहे, त्या काळात एक डॉक्टर जोडपं भयानकतेची पातळी गाठलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी, ती परिस्थिती ओढवलेली नसताना लढा देतं, ही बाब जितकी वाटते, त्यापेक्षा किती तरी अधिक पटींनी कठीण आहे. >>> हा एकच विचार काल चित्रपट पाहिल्या पासुन मनात घोळत आहे. अशी माणसं आजच्या युगात आहेत यावर विश्वास बसत नाही. हॅट्स ऑफ टू आमटे फॅमिली... >>> अगदी अगदी.. मलाही हेच वाटतय.

मतदानाची सुट्टी साधुन मी पण काल बघितला आणी आवडला महत्वाचे म्हणजे थेटर एकदम फुल्ल होत.. माझ्या लेकीला घेऊन गेले होते तिच्या प्रश्नाची उत्तर देताना अगदी नको झाले..
हा एकच विचार काल चित्रपट पाहिल्या पासुन मनात घोळत आहे. अशी माणसं आजच्या युगात आहेत यावर विश्वास बसत नाही. हॅट्स ऑफ टू आमटे फॅमिली..>>>>>>>>>>>>>> +१

भयानकतेची पातळी गाठलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी, ती परिस्थिती ओढवलेली नसताना लढा देतं >> हा सगळा परिच्छेद एकदम आवडला. छान लिहिलंय. प्रत्यक्ष बघणं कदाचित शक्य नाही होणार, डीव्हीडी यायची वाट किंवा मग आपली मराठी.

हा चित्रपट अजुनही हाउस फुल्ल आहे :). गेल्या शनिवारीच जाऊन आले. खुप छान. वरील निरिक्षण अगदी योग्य कारण काही द्रुष्य खरच चुकीची दिग्दर्शली गेलीयेत. उदा. बिबळ्या चे प्राण जाण्याचा जो प्रसंग आहे त्यात तर कॅमेरा खुपच हलला आहे. एवढा चांगला (की वाईट Sad ) प्रसंग ज्यात सगळ्यांच्या अभिनयाला वाव होता तोच प्रसंग इतक्या वाईट रित्या हाताळला गेलाय.
बाकी बाबांना आणि सर्व कुटुंबियांना हॅट्स ऑफ...