हिरवळ….

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 30 September, 2014 - 06:44

सिग्नल च्या तीन दिव्यांमध्ये पिवळा लाईट लागला, खर तर पिवळ्या लाईट चा अर्थ असतो कि तुमच्या वाहनाचा वेग कमी करा आणि शक्य असेल तर थांबा... पण भारतामध्ये कोणताही लाईट असुदे, ट्राफिक हवालदार नसेल तर गाडी फुल स्पीड मध्ये चालवा आणि आपल्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचा असा अर्थ एकंदर चालक (driver) जनता घेते आणि त्याच जोमाने चालवते व धावते.

अमित हि त्यांच्यातलाच एक, बाईक रायडर.. त्या रस्त्यावर किती लांब होता तो.. खूप दुरून त्याला सिग्नल दिसला होता, हवेच्या झोताप्रमाणे पुढच्या तीन सेकंदांच्या आत तो सिग्नल पर्यंत पोहोचलासुद्धा पण ब्याड लक- सिग्नल लाल झाला आणि समोरच्या रस्त्यावरच्या गाड्या जोरात धावायला लागल्या... तशी त्याला कसलीच घाई नव्हती पण उगाचच एका जागी थांबून वेळ दवडणे त्याला कंटाळवाणे वाटायचे... (असतो एकेकाचा स्वभाव). आता ५ ते ७ मिनिटांच्या वर इथे थांबण्याशिवाय पर्याय नाही हे अमित ने ओळखले आणि गपचूप स्वतःची बाईक मागे घेऊ लागला. "सिग्नल तसा थोड्या वेळात बदलेल पण ट्राफिक नाही न ऐकणार.. थांबावच लागेल..." तो मनाशीच गप्पा मारत बसला... आता आजूबाजूच्या वर्दळीकडे पाहण्या पलीकडे आणखीन काय करणार. त्याने उजव्या बाजूला मान वळवली... आणि 'ती' त्याला दिसली...

रस्त्याच्या पलीकडे दहा मजली एक इमारत उभी होती. त्याला काचेची लिफ्ट होती. लिफ्ट मध्ये असलेल्याला बाहेरच आणि बाहेरच्याला लिफ्ट मध्ये असलेल्याचे निरीक्षण करणे एकदम सोप्प होत. लिफ्टमध्ये चढलेली ती बहुतेक स्वतःच्याच धुंदीत असावी. बाहेरचे आपल्याला बघू शकत असतील हे तिच्या लक्षात आले नसावे किंवा "बघुदेत, कुठे ते मला आणि मी त्यांना ओळखते" हा तिचा बेफिकीरपणा असावा कदाचित. तिने पर्स मधून छोटासा आरसा काढला, लिपस्टिक काढली स्वतःचा चेहरा न्याहाळला आणि तिचे ओठ रंगवले. लिफ्ट मध्ये कोणीतरी चढले तेंव्हा नाईलाजाने का होईना तिला तिचा मेक अप थांबवावा लागला. सफेद रंगाचा आणि हिरवी डिजाइन असलेला तिचा पंजाबी सूट होता, त्यालाच शोभाव्यात अशा हिरवट रंगाच्या म्याचिंग बांगड्या. एका हातात घड्याळ... लिफ्ट तळमजल्यावर आली आणि ती बाहेरच्या मुख्य रस्त्यावर आली. अमित तिलाच न्याहाळत होता... "हा वारा पण कसा आहे? किती त्रास देतोय बिचारीला, एकटी मुलगी.. आता मोकळे सोडलेले केस सांभाळणार कि तिचा उडणारा दुपट्टा, किती पंचाईत होत आहे तिची... पण तसा हा वारा देखील लकीच आहे तिच्या गोड, नाजूक चेहर्यावरून कसा तिला स्पर्शून जात आहे" तो तिला भान हरवून पाहत होता...लिफ्ट मध्ये असताना दिसले नाही पण आता काजळ भरलेले तिचे काळे भोर डोळे त्याला दिसले.... तिची नजर... तिच्या हालचालीवरून स्पष्ट दिसत होत कि ती कोणाची तरी वाट पाहत आहे. "अग राणी कशाला कोणाची वाट पाहतेस... मी आलोय... " तो उगाचच दिवा स्वप्न पाहू लागला. तितक्यात मागून वाजणाऱ्या होर्न नि तो भानावर आला.. सिग्नल लागला.. "थांबा रे, जीव जातोय का तुमचा... " मघाशी सुसाट धावणारा तो ... त्याच मत परिवर्तन झाले होते, लोकांना मनात शिव्या हासडत होता... काय विचार केला का काही प्लानिंग केल माहित नाही पण त्याने बाईक वळवली आणि ती उभी होती त्या रस्त्यावर आला. उभा राहिला, पण लगेच तिला जाऊन तिच्याशी बोलायचं प्रयत्न करण्या एवढाही तो काही 'हे...' नव्हता आणि असभ्यही नव्हता... काय करू, कस बोलू तिच्याशी...? त्याच एक मन विचार करत होत तर दुसर मन म्हणत होत, "काय हा मूर्खपणा चालवला आहेस? रस्त्यात दिसलेल्या मुलीसाठी कोणी गाडी वळवत का? एवढा चिपकू तू नाहीस.. सभ्य आहेस .. काय चाललाय?" दुसर मन म्हणत होत, "अरे विचार कर कसा संवाद वाढव्शील तिच्याशी... उगाचच तो सिग्नल लाल नाही झाला... तुझ्या जीवनात हि नवीन हिरवळ यावी म्हणूनच त्याने त्याचा रंग बदलला... अरे तू नेहमी इथे 'ती' राहणाऱ्या रस्त्यावर येतोस.. नशिबात असेल तर येतील जुळून रेशीमगाठी.." मनात द्वंद्व युद्ध चालू होत आणि ती...

तिच्या समोर एक बाईक येउन उभी राहिली... बाईक वरचा तो..."छान दिसतेस..." ती म्हणाली, "राहूदे... काय हे... एकतर आपल्या साखरपुड्यानंतर आज भेटतो आहेस आणि त्यातही उशीर?...." पुढच संभाषण अमितला ऐकू येईनास झाल.. त्याच मन त्याला म्हणत होत, "झक मारली आणि बाईक फिरवली... आता या भर रस्त्यावर यु टर्न देखील नाही...कशाला तो लाल सिग्नल लागला... ? आणि कशाला मी या हिरवळीमागे धावलो... हिरवळ नाही शेवाळ होत हे... लांबून छान दिसणार.." त्याच एक मन जिंकल होत... आणि दुसर मन ज्याच त्याने ऐकल ते बिचार शिव्या खात होत....शेवटी दोन्ही मन त्याचीच...

मयुरी चवाथे- शिंदे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी आहे !
शेवाळ मस्त परफेक्ट शब्द वापरला ह्या हिरवळीसाठी.

छान

साखरपुडाच झालाय ना. अजूनही संधी आहे. >>>> हो न पुराना जायेगा तभि तो नया आयेगा Wink

छान