मी येतोय

Submitted by kamini8 on 26 August, 2014 - 07:13

बसने जात असताना पाहीले अनेक ठीकाणी पोस्टर लावले होते 'मी येतोय'. चालता चालता अचानक बस थांबली समोर पोस्टर मी येतोय. ट्रफिक मुळे खुप वेळ थांबावे लागणार म्हणुन डोळे बंद केले. खिडकीतुन पाहीले असता पोस्टरमधील गणपती बाप्पा बोलत होते.
मी आलोय, पण मला काय दिसेल जबरदस्तीने जमवलेली वर्गणी, ठिकठीकाणी खड्डे पाडुन उभारलेले मंडप, कर्णकर्कश आवाजातील गाणी.
ते पहा चौघेजण काय म्हणतात ते :
१) या वर्षी आपलाच बाप्पा हटके असणार
२) सर्वात उंच मुर्ती आपल्याच बाप्पाची असणार
३) दानपेटी आपलीच जास्त भरणार
४)आपल्या मंडळाचा पहीला नंबर येणार
तुम्ही केवढ्या मोठ्याने गाणी लावता. माझे कान मोठे आहेत म्हणुन एवढा आवाज. मला कानावर हातही ठेवता येत नाहीत. एका हाताने तुम्हाला आशिर्वाद देत असतो. दुसर्‍या हातात तुम्ही दिलेला मोदक सांभाळायचा असतो. अजुन दोन हातानी तुमचे रक्षण करण्यासाठी अंकुश, पाश घ्यावे लागतात.
तुमचे लक्ष माझ्याकडे नसुन भाविकांनी आणलेल्या वस्तुकडे असते हे मी माझ्या लहान डोळ्यानी पाहु शकतो. रात्री मला जागवण्याच्या निमित्ताने पत्ते खेळत बसता, बाटली फोडता हे मी सगळे पाहतो बरे.
माझ्या भक्तांना कुरमुरेचा प्रसाद वाटता आणि त्यांनी आणलेले पेढे, मिठाई, लाडु तुम्ही दडवुन ठेवता. माझी स्थापणा कोठेही जागा नसताना अगदी गल्लीबोळ्यातही करता. इतरांना किती त्रास होत असेल याचा विचारही करीत नाही. नवसाला पावणारा गणपती म्हणुन तुम्हीच ठरवुन मोकळे होता. हार, पेढे, नारळ, सोने, नाणे, हीरे, मोती जे मीच निर्माण केले आहे तेच देणार असे नवस बोलता. मी काय फक्त नवस बोलणार्‍या भक्तांनाच पावतो. हे असे नवस करण्यापेक्षा चांगले कर्म करा. मेहनत, कष्ट करुन आपली प्रगती करा. भेदभाव न करता एकत्र शांततेने रहा.
राजकरणी लोक तर माझा वापर मते मागण्यासाठी करतात. माझे पोस्टर लावतात त्यात मी एका कोपर्‍यात एवढुसा इतर उत्सवमुर्तींचे फोटोच जास्त असतात. मला त्याचे काहीनाही उत्सव तुमच्यासाठीच तर आहे. गरीबाला अन्न न देता मला १००१ मोदकाचा नैवद्य दाखवता पण तुम्ही विसरता 'देव भक्तीचा भुकेला'.
माझ्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा कशासाठी लावता. मी चराचरात वसलेला आहे. ओमकारात मी, सुगंधात मी, प्रकाशात मी, निसर्गात मी, सत्यात मी, ज्ञानात मी, विज्ञानात मी, अहिंसात मी, कष्टात मी, परोपकात मी, अणुरेणुत मी, शुन्यांत मी आणि अनंतातही मीच, एकात मी आणि अनेकातही मीच आहे. मला माझा-तुझा, आमचा-तुमचा करु नका. जेथे असाल तेथे मी सांगाती.
मला वेगवेगळा राजा नका ठरवु मी एकच आहे.
मला किती विविध रुपात सजवता, तुमच्या उंदिर मामालाही वजन सहन होत नाही इतके दागीणे घालता आणि मग आम्हाला पहारेकरी ठेवुन नजरकैदेत ठेवता. तुमच्या चुका पोटात घेवुन माझे पोट दिवसेंदिवस वाढत आहे तर मलाच तुम्ही लंबोदर म्हणता.
रासायनिक रंग वापरुन पर्यावरणात बदल करता. नद्या, तलाव, विहिरी यांचे पाणि दुषित करता नंतर आपत्ती आली की म्हणता देवाने हे काय केले.
माझी आरती पाठ आहे का? माझे श्लोक, स्तोत्र म्हणता येतात का? माझी किती नावे आहेत ते माहीत आहेत? अष्टविनायकाचे नाव-गाव माहीत आहे का ? मला जास्वंद, दुर्वा का वाहता याची माहीती आहे?
लो. टिळकांनी ज्या उद्देशाने मला सार्वजनिक केले तेच तुम्ही विसरलात आणि एकमेकांशी स्पर्धा करत बसता.
काही मंडळे खुप छान उपक्रम करतात. मंडपात छान पुजा करतात, सुदंर रांगोळी असते, सुरात आरती म्हणतात, भजणे सुरु असतात. मोफत शिबिराचे आयोजन करतात. विविध स्पर्धा घेतात. गरीबांना मदत करतात. मंडपात प्रसन्न, मंगल वातावरण असते. तिथे मी मंगलमुर्ती म्हणुन असतो.
माझी विर्सजन मिरवणुक काढताना ताल, सुर नसलेली गाणी लावुन अचकट विचकट नाच करता, कुणाच्याही अंगावर गुलाल फेकता. खुप मोठ्या आवाजाचे फटाके वाजवता. याचा इतरांना त्रास सहन करावा लागतो. लहान मुले, आजारी माणसे, जेष्ठ यांना किती त्रास होतो. हे पाहुन मी कसा आनंदी असणार. तुम्हाला उचलताही येत नाहीत एवढ्या उंच मुर्ती करण्याचा अट्टहास का करता. विर्सजन करताना उंच मुर्ती सरळ पाण्यात ढकलुन देता. दुसर्‍या दिवसानंतर काठावर वेगवेगळे माझे अवशेष असतात. ज्या हाताने तुम्ही माझा आशिर्वाद घेतला तो हात, ज्या माझ्या पायावर तुम्ही डोके ठेवले ते पाय. आणि ज्या मुखाकडे पाहुन तुम्हाला प्रसन्न वाटले ते मुख असे कोठेही पडलेले पाहुन तुम्हाला काहीच वाटत नाही.
किती आनंदाने तुम्ही माझे स्वागत करता. भक्तीभावाने निरोप देतानाही म्हणता :
गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या !!
मी तुमच्या आनंदासाठी लवकर येईन.
फटाके वाजण्याचा आवाज झाला. मी डोळे उघडले. खिडकीतुन बाहेर पाहीले पोस्टरवरचे बाप्पा शांत होते. बस पुढे चालु लागली. बाजुने बाप्पांची सवारी चालली होती. लेझीमच्या तालात, फुलांच्या वर्षांवात, लहान मुले मोठ्याने म्हणत होती.
गणपती बाप्पा मोरया ! मंगलमुर्ती मोरया !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान लिहिलंय, अगदी मनापसुन आवडल.

नवसाला पावणारा गणपती म्हणुन तुम्हीच ठरवुन मोकळे होता. हार, पेढे, नारळ, सोने, नाणे, हीरे, मोती जे मीच निर्माण केले आहे तेच देणार असे नवस बोलता. मी काय फक्त नवस बोलणार्‍या भक्तांनाच पावतो. हे असे नवस करण्यापेक्षा चांगले कर्म करा. मेहनत, कष्ट करुन आपली प्रगती करा. भेदभाव न करता एकत्र शांततेने रहा>>>>>>>>> हे तर खुपच भारी.

छान लिहीलंय! ह्यावर्षी एकाही मंडलाला वर्गणी दिली. आमच्या काॅलनीत तीन ठिकाणी गणपती बसवतात व कुठलाही विधायक कार्यक्रम नाही. अर्धा तास वाद /चर्चा केली व योग्य शब्दात नकार दिला वर्गणी द्यायला. आता गणपती होत नाही तो दुर्गापूजाची वर्गणी मागायला येतील तर चर्चेचा रिपीट टेलीकास्ट होईल.

मला वेगवेगळा राजा नका ठरवु मी एकच आहे.>> हे तर खूप आवडलं..
आधीच सगळीकडे राजांचे अमाप पीक आले आहे.. नेत्यांमध्येसुद्धा

छान लिहिले आहे ..
सार्वजनिक गणेशोत्सवातील गंमत आपण केव्हाच हरवून बसलो आहोत .. Sad
आठ तास रांगेत उभे राहून एका सेलिब्रेटी गणपतीचे दर्शन घेण्याचे मला कधीच कौतुक वाटले नाही. त्यापेक्षा मी त्याच आठ तासात विभागातील तुलनेत उपेक्षित पण उत्साहाने स्थापलेल्या इतर गणपतींचे दर्शन घेऊन येतो. निवांत पूजाअर्चा, दर्शन, गार्‍हाणे, साकडे, गप्पा सर्व काही होतात जो खरे तर देवदर्शनाचा मूळ उद्देश असतो.. असावा ..

चांगले लिहिलेय..

माणूस जात समजावण्याच्या पलिकडे पोचलीय.
देव स्वत:च यावर पर्याय शोधेल अशी मला पूर्ण खात्री आहे.....

अगदीच गं मस्त लिहिलेय. पण शोबाजीच्या या काळात टिळकांचे विचार पार मागे पडलेत. खरे तर हे सार्वजनिक प्रस्थ बंद करायला हवे. रस्त्यावर एकही मंडप नको. काय ते घरात नाहीतर बिल्डींगमधे करा. अन २ फुटांच्यावर एकही मुर्ती नको. पण हे सर्व समजुन घ्यायची मानसीकता हरवली आहे हल्ली. Sad

Kamini sunder lekhan .Sarv maayboli karaana ganesh utsvachya hardik subhechha "GANPATI BAPPA MORYA"