काकडी पोहे ( फोटो सहीत )

Submitted by मनीमोहोर on 17 August, 2014 - 09:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

उद्या गोपालकाला . दही, दूध आणि पोहे हे गोपालकृष्णाचे विशेष आवडते. ह्या दिवशी श्रीकृष्णाला प्रिय असणार्‍या पोह्यांचा प्रसाद दाखविण्याची पद्धत आहे. ह्या दिवशी आमच्याकडे काकडी पोह्यांचा प्रसाद दाखविण्याची पद्धत आहे त्याची ही कृती.

साहित्यः
जाड पोहे २ वाट्या ( नेहमी प्रमाणे धुवून, भिजवून घावेत)
काकड्या (लहान आकाराच्या ) २ ( ह्या दिवसात येणार्‍या गावठी काकड्या घ्याव्यात )
गोड दही दोन वाट्या, आवडत असल्यास थोडं आलं बारीक चिरुन किंवा किसून
हिरवी मिरची, कोथिंबीर, नारळ, दाण्याचं कूट अंदाजाने. मीठ, साखर चवीप्रमाणे
जरुरीप्रमाणे दूध.

क्रमवार पाककृती: 

प्रथम काकड्या कोचवून अथवा अगदी बारीक चिरुन घ्याव्यात. पाणी काढून टाकू नये.
त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, नारळ, दाण्याच कूट. मीठ साखर, आणि दही घालून मिश्रण सारखं करुन घ्यावे.
नंतर त्यात भिजवलेले पोहे घालून एकत्र कालवावे. हे पोहे अगदी घट्ट न करता जरासे सरबरीतच चांगले लागतात. म्हणून लागेल तसे दूध घालावे. दह्या दूधाच प्रमाण आपल्या आवडी प्रमाणे अ‍ॅड्जेस्ट करता येईल.

हा फोटो

From mayboli

वाढणी/प्रमाण: 
जेवणावर दही भाता ऐवजी घेतले तर चार जणांना पुरेल.
अधिक टिपा: 

हे पोहे तयार करून ठेऊ नयेत. कारण पोहे फुगत जातात आणि जसजसा वेळ जाईल तसतसे आळत जातात.
चवीला खूप छान लागतात. एखाद दिवस दही भाताला छान पर्याय.
काकड्या गावठीच घ्याव्यात. खीरा काकड्या घेऊ नयेत.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहेत.

मीपण साधारण असेच करते फक्त नारळ आणि दाण्याचे कुट नाही टाकत. जाडे पोहे पाण्यात भिजवून नाही घेत, असेच घेते.

काकडीची दह्यातली दाणेकूट, नारळ घातलेली कोशिंबीर पोह्यांबरोबर मिसळायची कल्पना मस्त वाटतेय. असा काकडी रायते घातलेला भातही मस्त लागतो. गावठी काकड्यांमुळे चवीत फरक पडतो का?

फोटो टाकते संध्याकाळी.
सर्वांना धन्यवाद

अरुंधती , गावठी काकडयाच छान लागतात.
हल्ली त्या मिळतात ही नेहमी.

मस्त आहे फोटो हेमाताई. फक्त आमच्याकडे एवढे मऊ नाही आवडत म्हणून मी आधी न भिजवता डायरेक्ट टाकते. थोडे दाताखाली चावायला आवडतात.

हेमा ताई फोटो तोपासु, आणि बाजुला त्या काकडीचे फुल कीत्ती गोड दिसतय! व्वा, काय कलात्मक आहात तुम्ही.:)

हेमा ताई, मस्त फोटो आहे तो.पासु. माझा आवडता पदार्थ आहे. काकडीच फुल कस बनवले त्याचीपण कृती द्या. Happy

तुम्हाला सर्वांना फोटो आवडला खूप खूप धन्यवाद.
काकडीच फुल आवडल म्हणुन परत एकदा धन्यवाद.
वेजीटेबल कार्विंग माझी आवड आहे. खूप नाही मन रमविण्यापुरती.
प्रथम काकडीचा एक तुकडा घेतला. त्याचे सारखे आठ भाग केले ( मार्किंग करुन)
नंतर खाल पर्यंत कट घेऊन पाकळ्या केल्या. इंग्रजी वी आकारात ते वरुन कट केले
प्रत्येक पाकळीची साल फर्म पण हलक्या हाताने काढली. नंतर मधला भाग ( बियांचा) काढून
टाकला. आणि पाकळ्या सारख्या केल्या.
एक टोमॅटोची गोल चकती कापून ती त्या फुलात ठेवली. मिरचीला वी कट देऊन टुथ पिक च्या सहाय्याने ती टोमॅटोच्या रिंग मध्ये खोचली.
हे सर्व गार पाण्यात ठेवल थोडावेळ पाकळ्या उमलण्यासाठी.
पोहे पांढरेच दिसतायत पण सजावट पाहून त्यात काय काय आहे त्याचा साधारण अंदाज यावा म्हणून हे काकडीच फुल बाजूला ठेवल फोटो काढताना.

माझ्याकडे एक अगदी साधी वेज. कार्विंगची सुरी आहे ( २५ रु. वाली ) ती वापरते मी हे करायला.

वा हेमाताई क्या बात है. वेजिटेबल कार्विगचे अजुन फोटो टाका, एक लेख होईल मस्त त्यावर.

वा हेमाताई क्या बात है. वेजिटेबल कार्विगचे अजुन फोटो टाका, एक लेख होईल मस्त त्यावर. +१००% अनुमोदन

तुम्ही मल्टी टालेंटेड असुन सुद्ध नेहमी अस लिहीता फार काही नाही, मन रमवण्याकरिता ह्याच मला खुप कौतुक वाटतं..
खरच खुप काही शिकण्यासारखे आहे तुमच्या कडुन...

आज आणलेला एकानी दहीकाला डब्यात. मस्त होता, मात्र पोह्यांऐवजी ज्वारीच्या लाह्या होत्या... दही, काकडी, दा.कू.; हि.मी.; को सगळंच होतं. मस्त लागत होता प्रकार Happy

मनीमोहोर.. फुल मस्तच जमलेय.
कार्वींगची मला पण खुप आवड आहे. ( जमतेच असे नाही ) माझ्याकडे पण ती नाईफ आहे.

अंजू, आरती, सायली धन्यवाद.
योकु, आम्ही कोकणातले असल्याने पोहे घालतात आमच्याकडे. कोकणात नाही ना ज्वारी होत उपलब्ध. ज्वारीच्या लाह्या पण छानच लागत असतील.
जिथे जे पिकत त्याचा वापर होतो अस मला वाटत.

दिनेश दा धन्यवाद. आपणाला ही वे का ची आवड आहे हे वाचून छान वाटलं
मी कोणी यायच असेल जेवायला किंवा एखादा खास दिवस असेल तर करते. हे खूप वेगळ असल्याने खूप उठून दिसते. हे मी केलेले सॅलड डेकोरेशन
From Drop Box

Pages