आय अ‍ॅन्ड मी: भाग ११

Submitted by चैर on 6 August, 2014 - 04:23

भाग १, भाग २ ,भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०

काही वर्षांपुर्वी:

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अभिषेक मेरी काकूकडे जेवायला गेला. काकूने वरण-भात, उकडलेल्या बटाट्याची भाजी, मटकीची उसळ असा टिपिकल महाराष्ट्रीयन स्वैपाक केला होता. अभिषेक जाताना अर्धा लिटर आईसक्रीम घेऊन गेला होता. 'काकू सगळं जेवण इतकं छान करते त्यामुळे तिच्याकडे आपण घरचं किंवा विकतचं खायला काय नेणार?' असा विचार त्याने केला.
"जरा अजून दोन-चार पोळ्या लाटून घेते…मग बसूच जेवायला. तू तोपर्यंत टीव्ही बघ" असं म्हणून काकू त्याला रिमोट देऊन निघून गेली.
अभिषेकने टीव्ही सुरु केला आणि तो त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे नवीन घर निरखायला लागला.
हॉलमध्ये सोफा-सेट, टीव्ही ठेवलेलं मोठं कपाट. टीव्हीच्या वर शोकेसमध्ये बऱ्याच वस्तू मांडून ठेवलेल्या होत्या. भिंतीवर काही फोटोस होते. त्यात येशु ख्रिस्ताचा आणि बाजूलाच एक गणपतीचा फोटोसुद्धा होता. सोफ्यासमोरच्या टिपॉयवर एक फुलदाणी होती आणि त्यात ताजी फुलं ठेवली होती. एका कोपऱ्यात मोठं बुकशेल्फ होतं. पुस्तकं दिसल्यावर अभिषेक लगेच पुढे झाला. त्याने एक दोन पुस्तकं काढून चाळली. ती इंग्रजी कवितांची पुस्तकं होती. एक दोन मराठी पुस्तकं सुद्धा कवितासंग्रहच होते. 'काकूला कवितांचं एवढं वेड आहे?...बाहेर आली की विचारेनच" असा विचार त्याने केला.
एवढ्यात बेल वाजली.
"अभि…जरा दार उघड!! आय एम बिझी" काकूने स्वैपाकघरातून सांगितलं.
"ओके काकू" अभिषेकने दार उघडलं.
समोर रीमा उभी होती. चेहऱ्यावर मोहक हसू आणि गालावर खळी. 'प्रीती झिंटा हिच्या वयाची असताना अशीच दिसत असेल' त्याने मनाशी विचार केला.
"हाय…मेरीकाकू आहे का?" रीमाने विचारलं.
"अ…ती पोळ्या करतेय…मी सांगतो तिला…तू आत ये ना" म्हणून अभिने तिला आत येऊ दिलं.…"मेरीकाकू, रीमा आलीय गं!!" तो आतल्या खोलीकडे बघत मोठ्याने म्हणाला.
"एकस्युझ मी?? तुला माझं नाव कसं माहित? आपली ओळख कधी झाली?" रीमाने विचारलं आणि अभिने जीभ चावली.
"अ ते हे…मला तसं माहित नव्हतं पण काकूने मगाशी सांगितलं की रीमा येणारे म्हणून…तू आलीस म्हणून मी तूच रीमा असशील असा अंदाज बांधला आणि--- तू रीमाच आहेस ना?"
"अ हो…तू??"
"मी अभिषेक…काकू कॉल्स मी अभि"
"ओके…" रीमाला हा मुलगा कोण आहे याची अजिबात कल्पना नव्हती. काकूने तिला एकटीला बोलावलं आहे अशा समजुतीत ती होती. दरवर्षी वार्षिक परीक्षेचा रिझल्ट लागला की काकू तिला जेवायला बोलवायची पण तिने अजून कुणाला कधीच बोलावलं नव्हतं. निव्वळ 'आपला हक्क' आहे वाटणाऱ्या गोष्टीत वाटेकरी आला की थोडा राग येणं, निराशा होणं होतंच. रीमाचं तेच झालं. आत जाऊन ती काकूला काही विचारणार तेवढ्यात काकूच बाहेर आली.
"ग्रेट! तू पण आलीस. आता जेवायलाच बसू! अभि मी तुला सांगायचंच विसरले की रीमालासुद्धा मी बोलावलंय म्हणून" काकू म्हणाली आणि आपली थाप पकडली गेलीय हे अभिच्या लक्षात आलं. त्याने जीभ चावत रीमाकडे पाहिलं.
"मलापण बोलावलंय हे तू सांगायला विसरलीस?" रीमाने तिला अविश्वासाने विचारलं. रीमाच्या प्रश्नाचा सूर आपल्यालाच उद्देशून आहे असं समजुन काकूने उत्तर बदललं.
"ओह…चुकले बाई…'तुलापण' नाही --- 'तुलाच' बोलावलंय आणि यंदा 'यालापण' बोलावलंय…आणि हां…हा अभिषेक आणि अभि, ही रीमा" काकूने ओळख करून दिली.
"झाली आमची ओळख काकू…" अभि म्हणाला.
"गुड…मग आता जेवायला बसुया का? रीमा मला डायनिंग टेबलवर सगळं अरेंज करायला हेल्प कर"
"करते…" म्हणून अभिकडे रोखून बघत रीमा आत गेली.
"काकू, मी काय मदत करू?"
"तू? अरे बापरे!! ती बरोबर पिशवी कसली आणली आहेस?" काकूने टीपॉयवरची पिशवी बघत विचारलं.
"अरेच्या हो…आइसक्रीम आणलंय. तुला द्यायलाच विसरलो…सगळ्यांना वेगवेगळे फ्लेवर आवडतात म्हणून बेसिक व्हॅनिला फ्लेवर आणला आहे" त्याने पिशवीतून आइसक्रीमचा बॉक्स काढून तिच्याकडे दिला.
'अरे बापरे…एवढं?? आता काय अख्ख्या सोसायटीला बोलवायचं का खायला?"
"काकू तू पण आईस्क्रीम आणलंस? अगं मी भरपूर…म्हणजे चांगलं अर्धा लिटर आणलंय" रीमा बाहेर येत काकुच्या हातात आइसक्रीमचा बॉक्स बघून म्हणाली.
"काय? तू पण आणलंस? अरे बापरे? व्हॅनीला फ्लेवरच का?"
"हो. बेसिक फ्लेवर-- सगळे खातात" रीमाने उत्तर दिलं.
"काय मुलं तुम्ही? तुम्हाला सांगितलं होतं जेवायला या…हे उद्योग कुणी सांगितले होते? आता लिटरभर आईस्क्रीम खायला अजून दहा-पंधरा लोकांना बोलवूया…आणि मी केलेले गुलाबजाम राहू देत!! ते काही आता मी तुम्हाला देणार नाही"
"गुलाबजाम? ए काकू…असं नको करू!! मी पहिल्यांदा आलो ना तुझ्याकडे म्हणून आईस्क्रीम आणलं. मागे एकदा कर्वे सरांच्या घरी गेलेलो काही न घेता आणि त्यांनी मला भरपूर खाऊ-पिऊ घातलं. तेव्हा मला जाम गिल्टी वाटलं होतं. मग मी ठरवलं की कुणाच्याही घरी निदान पहिल्यांदा जाताना हात हलवत जायचं नाही!" अभिने सारवासारव करायला उत्तर दिलं.
"आणि तुझं काय कारण होतं बुवा? तू तर पहिल्यांदा आली नाहीयेस ना?"
"अग…हे…यंदा बोर्डाची परीक्षा होती ना…दहावीच्या वेळी तुला बाबांनी आधीच पेढे दिले होते…पण यावेळी त्यांना पेढे वाटायला वेळ झालाय कुठे?? सो मी--"
"तुम्ही हल्लीची मुलं…काहीही कारणं सांगता…पण तुम्ही म्हणताय तसा विचार खरच करत असाल तर तुमचं कौतुकसुद्धा करायला हवं…आम्हाला तुमच्या वयाचं असताना हे असलं काही सुचलं नसतं…असो आलेच मी" म्हणत काकू आत गेली. पुन्हा रीमा-अभि समोरासमोर आले.
"आत्ता काकूला जे कारण सांगितलंस ते तरी खरं होतं की ती पण थापच?" रीमाने विचारलं.
"अगं…खरंच होतं ते…मी खोटं बोलत ना--" तो वाक्य पूर्ण करणार तेवढ्यात मगाचची थाप त्याला आठवली.
"ओ-- आणि हो सॉरी मला तू येणारेस हे माहित नव्हतं. पण तुझं नाव माहित होतं. मागे तू कधीतरी रोबोसमध्ये आली होतीस तेव्हा मी तिथेच होतो. तेव्हा काकूने मला तुझं नाव सांगितलं होतं ते लक्षात राहिलं"
"ओके…तू जे.एल. कॉलेजलाच आहेस का?"
"अ हो…आत्ताच बारावी सायन्स पास झालो…७५% मिळाले मला---तुझा रिझल्ट काय लागला? तू कॉमर्सला आहेस ना?" अभिने एकदम विचारल्यावर रीमा पुन्हा चपापली.
"तुला कसं माहित?" रीमाने संशयी स्वरात विचारलं.
"अ…काकूनेच सांगितलं" अभिषेक खजील होत म्हणाला.
"अजून काय म्हणाली काकू?मला मार्क्स किती मिळाले ते सांगितलं का?" आता रीमाला थोडा राग यायला लागला होता.
"अ--नाही. ते तू मध्ये पुरणपोळ्या करायचा ट्राय करत--" अभिषेक सांगायला लागल्यावर रीमाने डोळे वटारलेच होते एवढ्यात काकू आली.
"जेवूया का आपण?" काकूने विचारलं.
सगळे जेवायला बसले. जेवणाचं कौतुक वगैरे झाल्यावर काकूने रीमाला विचारलं.
"आता काय गं पुढे? बी.कॉम?"
"हो. आजच आमच्याच कॉलेजचा फॉर्म भरला. जे.एलमध्ये पण फॉर्म टाकायचा विचार करत होते"
"मग भरून टाक…पुढे बघू…तुझं काय रे?"
"काकू आज सकाळीच कर्वे सरांबरोबर जाउन बी.ए साठी फॉर्म भरून आलो" अभिषेक निर्विकारपणे म्हणाला. काकू काय समजायचं ते समजली आणि तिने पुढे काही विचारलं नाही!
"एक मिनिट…बी. ए.?? तू सायन्सला आहेस ना?"
"होतो…आता आर्ट्स" अभिने विषय टाळायला अर्धवट उत्तर दिलं. रीमाचं त्याच्याबद्दल मत अजूनच खराब झालं. 'हा मुलगा आहे कोण? आधी सायन्स आता आर्ट्स? याला आपली नको इतकी माहिती कशी? मेरी काकूने नक्की याला जास्त काही सांगितलं नसणारे' ती उगाचच सावध झाली आणि अभिच्या हालचाली निरखायला लागली.
जेवणं झाली. काकूने गुलाबजाम साखरेच्या पाकाऐवजी आइसक्रीमवर घालून आणले.
"भारी आयडिया आहे ही…गुलाबजाम सहीच आहेत पण हे अजून सही लागतंय" अभिने तोंड भरून कौतुक केलं.
"मग आता त्या आईस्क्रीमच करायचं काय हा प्रश्न होताच" काकू म्हणाली.

"काकू…मी निघते आता. बाबांनी आज तरी लौकर यायचं प्रोमीस केलंय! ते लौकर आले तर मी त्यांना एखाद ड्रिंक घेतलंत तर चालेल असं म्हटलं आहे" रीमा काकूला बाजूला घेत म्हणाली.
"बरं केलंस…त्या सलूनमधल्या बिनडोक लोकांनी भरीस घालून बाहेर प्यायला थांबवण्यापेक्षा हे बरं…असो मी डबा भरून ठेवलाच आहे. तो घेऊन जा"
"ओके काकू…मी मात्र तुझ्यावर रागावली आहे. तू दरवर्षी मला एकटीला बोलावतेस ना मग यंदा हा कोण मुलगा?"
"आर यु जेलस?" काकूने हसत विचारलं. "अगं, तू सोडून अख्ख्या जगात मला कुणी स्वताहून काकू म्हणालं असेल तर हा-- अभि!! चांगला मुलगा आहे गं तो!"
"मला तर थोडा वात्रट वाटला…"
"असं उगाच मत बनवून टाकू नकोस! मला तर गम्मतच वाटतेय-- तू आणि तो दोघं मला काकू म्हणता, आज दोघेही सेम आईस्क्रीम घेऊन आलात. तुमचं तर एकमेकांशी छान पटेल…काय?" काकूने विचारलं.
"काकु प्लीज…जाऊ दे…तू डबा दे…मी भेटते तुला नंतर"

रीमा निघून गेल्यावर अभि आणि काकू गप्पा मारत बसले.
"तुला घरी जायची घाई नाहीये ना रे?"
"नाही ग…मी आईला सांगून आलोय आणि तसंही आज उशिरा गेलेलं बरंच…आजच फॉर्म भरून आलोय! घरी आमचे परमपुज्य तापलेले असणारेत"
"अभि, स्वतःच्या वडलांना असं बोलून नये रे"
"जाऊ देत काकू…बाय द वे…रीमा गेली?"
"हो गेली…आणि हो…तिला तू आगाऊ, वात्रट का वाटलास बरं?"
"काकू….ती असं बोलली तुला?"
"हो…मी माझ्या मनाचं कसं सांगेन? पण प्रश्न हा नाहीचे…प्रश्न हा आहे की ती असं का बोलली…असं चटकन बोलून दाखवण्याचा स्वभाव नाहीये तिचा!"
"अ--काकू मी खरंच काही वात्रटपणा केला नाहीये…हां, मी तिच्याशी मोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न करत होतो हे खरंय" काकूने भुवया उंचावून प्रश्नार्थक चेहरा केला.
"तुला खरं सांगू का? मी मागे तिला रोबोसमध्ये ओझरतं बघितलं तेव्हाच ती मला आवडली होती. तू गैरसमज करू नकोस पण आज ती अशी अचानक समोर आल्यावर मला जरा जास्तच आनंद झाला. आणि मी तुला खात्रीपूर्वक सांगतो की यापुढे तिला आगाऊ, वात्रट वागेन असं मुळीच वागणार नाही"
"अरे बापरे…एवढं सगळं झालंय का? तुम्ही हल्लीची मुलं विचित्रच असता बुवा…जरा चांगली मुलगी दिसली की तुम्हाला लगेच ती आवडते काय? काही विचार करत नाही तुम्ही"
"अगं काकू, तू माझी तुलना बाकी मुलांशी का करते आहेस?"
"बरं बुवा नाही करत. तुला मी पण खरं सांगू का? मला तुमच्या दोघांची एकमेकांबद्दलची मतं ऐकून माझे आणि रॉबर्टचे कॉलेजचे दिवस आठवले"
"म्हणजे?"
"रॉबर्ट माझ्याशी बोलता यावं म्हणून सारखा माझ्या ग्रुपमध्ये यायचा! आमचा वसईहून मुंबईला येणारा सहा-सात ख्रिश्चन मुलामुलींचा ग्रुप होता. शाळेपासून बरोबर असलेले आम्ही. एकाच चर्चला जाणारे! रॉबर्ट मुंबईचाच. इथल्याच महाराष्ट्रीयन मुलांमध्ये असायचा. त्यामुळे आमच्यापैकी कुणाला तो आवडायचा नाही. पण नंतर हळूहळू सगळ्यांची मनं जिंकली त्याने. कविता खूप छान करायचा"
"अच्छा…म्हणजे ती कवितांची पुस्तकं---"
"हो त्याचीच"
"काकू हा गणपतीचा फोटो?"
"तो पण त्यानेच लावलेला. त्यांच्या सोसायटीत गणपती असायचा. स्पर्धा व्हायच्या. सगळी मुलं सकाळ-संध्याकाळ त्या गणपतीभोवती घुटमळायची. हे गणपतीचं वेड तेव्हाचं आहे. तो फोटोसुद्धा कधीकाळच्या तिथल्या सोसायटीतल्या गणपतीचा आहे. आमच्या रीलेटीव्हसपैकी कित्येकांना पटलं नाही हे फोटो लावणं.."
"काकू तो फोटो तुझ्या लग्नातला आहे का?" अभिने भिंतीवरच्या एका फोटोकडे बोट दाखवत विचारलं.
"हो…आमच्या लग्नातला एकमेव फोटो…मी किती गोंधळले होते ते स्पष्ट दिसतंय त्या फोटोत"
"एकच फोटो? का?"
"आम्ही पळून जाउन लग्न केलं होतं ना…"
"पळून?? ते का?"
"ती पण एक मोठ्ठी गोष्ट आहे. माझ्या घरच्यांनी माझं लग्न दुसरीकडे श्रीमंत घरात ठरवलं होतं. रॉबर्ट काही तितका श्रीमंत नव्हता. त्यात तेव्हा त्याचे वडील बरेच आजारी होते. त्यांचं काही बरं-वाईट व्हायच्या आत त्याला घाईत लग्न करायचं होतं. सो आम्ही गेलो पळून! त्याच्या एका चुलत भावाने बरीच मदत केली आम्हाला. पार कारवारपर्यंत गेलो होतो आम्ही. तिथल्याच एका छोट्या चर्चमध्ये लग्न केलं. ब्राईडच्या साईडने दोन मैत्रिणी आणि ग्रुमचे तीन मित्र"
"मग पुढे?"
"पुढे काय? रॉबर्टकडे अप्रुवलचा प्रश्नच नव्हता. माझ्या घरी लग्न झालंय कळल्यावर लोक नरमले. माझं ज्याच्याशी लग्न ठरलं होतं तोच मुलगा समजूतदारपणे माझ्या पप्पांशी बोलला. सगळं एकदम सुखात संपलं असंही नाही कारण मुलीने घरच्या विरोधात जाउन लग्न केलं ही अढी कायम राहिली…"
"तुला आता हे सगळं आठवून वेगळंच वाटत असेल ना?"
"अभि…अगदी काल घडल्यासारखं आठवतं मला सगळं.…आता विचार करून काय उपयोग आहे…आता या पास्टमधली माणसंसुद्धा राहिली नाहीयेत.…"
'आपण काकूला उगाच काहीबाही विचारत बसलो' अभिच्या मनात विचार आला.
"हा काकांच्या लहानपणचा फोटो आहे काय गं?" अजून काहीच विचारायला न सुचल्याने त्याने अजून एका फोटोकडे बोट दाखवून विचारलं.
"लहानपणचा?? छे रे…हे रॉबर्टचे वडील नाहीत…हा रॉबच आहे! आणि त्याच्या कडेवर रॉजर!! ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट फोटो आहे म्हणून खूप जुना वाटतो खरा"
"रॉजर?"
"रॉजर-- माझा आणि रॉबचा मुलगा" काकू निर्विकारपणे म्हणाली.
"काय? तो कुठे असतो आता? काय करतो?" काकूचा नवरा वारल्याचं त्याने कॉलेजमध्ये कधीतरी ऐकलं होतं. पण तिच्या मुलाबद्दल त्याला काहीच माहित नव्हतं.
"तो नाहीये" उत्तर देताना काकूने इतका वेळ रोखून धरलेला हुंदका अखेर आलाच.
"काकू शांत हो…खूप खूप सॉरी…मला नव्हतं माहित!! खरंच गं…" अभिला काय करावं सुचेना.
"रॉबने नवीन बाइक घेतली. रॉजर दोन वर्षांचा होता. मी रॉबला किती वेळा म्हणायचे…तु त्याला घेऊन बाईकवर बसत जाऊ नकोस---पण शेवटपर्यंत ऐकलं नाही माझं" काकू गालवर ओघळणारं पाणी तळहाताने पुसण्याचा प्रयत्न करत म्हणाली.
"शांत हो गं काकू!!" अभिला हे म्हणण्याशिवाय दुसरं काहीच सुचत नव्हतं. तो काकूला पाणी आणून द्यायला डायनिंग टेबलपाशी गेला.
"रॉजर असता आत्ता तर तुझ्याहून दोन वर्ष लहान असला असता-- त्याचीही यंदा बोर्डाची परीक्षा झालेली असती नाही…??"
अभिषेकने तिला पाणी ओतून दिलं. पाणी प्यायल्यावर ती थोडी शांत झाली.
"आय एम रिअली सॉरी काकू! मी उगाच तुला काहीतरी विचारत बसलो…तुला ते सगळं आठवायला लागलं माझ्यामुळे!! खूप सॉरी"
"अभि, अरे असं आठवणं-विसरणं काही नसतंच रे! माणसाचं एकटं असणं त्याला कायम जाणवत असतं. उलट तुझ्यासारखं कुणी चौकशी करायला लागलं की मग डोळ्यातून पाणी येतं. कुणालातरी आपल्याबद्दल जाणून घेण्यात रस आहे हे जाणवून म्हण किंवा डोळ्यातून पाणी वाहिलं म्हणून म्हण- हलकं वाटतं बघ. एकटेपणा क्षणापुरता का होईना, नाही जाणवत"
"काकू असं नको म्हणू…तू कधीच एकटी नाहीयेस!! रॉजरची जागा तर मी घेऊ शकणार नाही पण तो नसला तरी 'मी' आहे. मी तुला रॉजरसारखा नाहीये का?" प्रश्न विचारताना अभिलासुद्धा भरून आलं होतं. काकुच्या डोळ्यातून पुन्हा पाणी आलं पण चेहऱ्यावर थोडं हसू होतं, समाधान होतं.

'काही वेळा देवसुद्धा एखाद्या आईचा 'आई' होण्याचा हक्क असा हिरावून का घेत असेल? काय साध्य करायचं असेल त्याला त्यातून? या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. पण हो-- मी माझ्या वतीने या वात्सल्याचं, ममतेचं मातृत्व स्वीकारतोय…या मातृत्वाचं, स्त्रीत्वाचं जमेल तेवढं ऋण मी फेडेन--
आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं।
सर्वदेवोनमस्कारः मातरं प्रतिगच्छति।।'

रात्री अभिषेक घरी आला तेव्हा आई जागीच होती.
"आई, तू का जागी आहेस? तुला मी उशीर होईल असं म्हटलं होतं ना?"
"हो बाळा पण मला तुझ्याशी बोलायचं होतं"
"आत्ता?"
"हो"
"बाबा बरेच चिडले आहेत-- तुझ्याशी यावेळी झालेलं भांडण बरंच लागलंय त्यांना"
"आई प्लीज-मी तुला त्यांच्याशी भांडणार नाही असं प्रोमीस केलं होतं पण माझ्याकडे पर्याय नव्हता"
"मी तुला काही म्हणत नाहीये अभि. मी ते प्रोमीस केव्हाच विसरले होते" म्हणताना आईचा स्वर पाणावला होता.
"खरंच?"
"अभि, तुला एकच सांगायचं होतं- खूप शिक, मनाला हवं ते शिक…मोठा हो! माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत! कुठल्यातरी वचनांमध्ये आणि बंधनांमध्ये अडकवून आपली आई आपल्या उद्दिष्टांच्या आड येत होती असं कधी वाटून घेऊ नकोस"
"आई प्लीज तू मला इमोशनल नको ना करू" अभि कळवळून म्हणाला.
"बरं नाही करत…तुला काही खायचंय का? की इतक्या उशीरा आलायस म्हणजे झालंय जेवण?"
"मस्त जेवण झालंय"
"कुठल्या हॉटेलला केलीत पार्टी? कोण कोण होतं बरोबर?"
"हॉटेल नाही गं आई…मी मेरीकाकूकडे गेलो होतो. एकटाच. तिने जेवायला बोलावलं होतं"
"मेरीकाकू म्हणजे तुझ्या कॉलेजजवळ कॅन्टीन चालवतात त्या?"
"हो तीच! एकटीच राहते ग ती बिचारी! तिचा नवरा आणि मुलगा अपघातात गेले काही वर्षांपूर्वी! मी गेलो तर तिला बरं वाटलं"
"छान केलंस…अरे हो…फ्रीजमध्ये पेढे ठेवले आहेत…झोपण्यापूर्वी तोंडात टाकायचा असेल तर घे एखादा"
"पेढे? आता अजून कोण पास झालं?"
"अरे हे रिझल्टचे पेढे नाहीत…बाजूच्या विंगमधले शर्मा आहेत ना त्यांची सून बाळंत झाली…मुलगा झाला तिला"
"अरे वा मस्त"
"खाणार असलास तर खा…आणि झोप वेळेवर" म्हणून आई निघून गेली.
पेढा खात खात अभि बाल्कनीत आला. डोक्यात विचारांची चक्रं फिरायला सुरुवात झालीच होती.

I: मी बरोबर केलं ना?
Me: नेमकं कशाबद्दल बोलतोयस तू?
I:हेच-- मी मेरीकाकुला म्हटलं की मला तुझा मुलगा समज…स्वतःला फार ओव्हरएस्टीमेट नाही करते ना मी?
Me: तुला खरच हा प्रश्न पडलाय की अजून काही?
I:खोचक आहेस तू. तुला पक्कं माहितीय की मला काय प्रश्न पडलाय…
Me: तसं म्हण- पण मला तुझ्या शब्दात ऐकायचं आहे.
I: मी मेरीकाकूचं मातृत्व मुलगा म्हणून कबुल केलं हे आईला कळलं तर? तिला ते मान्य होईल? तिला वाईट वाटलं तर? म्हणून विचारतोय!! मी योग्य केलं ना?
या प्रश्नावर Me कडेसुद्धा रॅशनल, तार्किक उत्तर नव्हतं.
अभि कधीकाळी शाळेत ऐकलेली कविता गुणगुणत आडवा पडला-

आई माझा गुरु
आई कल्पतरु
सुखाचा सागरु
आई माझी|


क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !!!!

छान!

छान