मासिक भविष्य ऑगस्ट २०१४

Submitted by पशुपति on 1 August, 2014 - 06:31

राशिभविष्य
ऑगस्ट २०१४
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्ये चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्ये वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. जरी दोन्ही राशींची भविष्ये एक दुसऱ्याच्या विरुद्ध वाटली तरी दोन्हीचा सारासार अर्थ लक्षात घ्यावा. )

मेष :- मेष राशीला या महिन्यात चतुर्थात तीन ग्रह रवि,बुध आणि गुरु आहेत. आणि चंद्र, मंगळ आणि शनि सप्तमात आहेत. म्हणजे चतुर्थ आणि सप्तम ही दोन स्थाने जास्त प्रभाव दाखवतील असे दिसते. त्यामुळे घरगुती बाबतीत तुम्हाला बरेच लक्ष द्यावे लागेल. कदाचित त्या संबंधी बराच खर्च देखील करावा लागेल. पंचमेश रवि चतुर्थात आणि बुध देखील चतुर्थात त्यामुळे प्रेमीजनांचे प्रेम थोडे आटण्याची शक्यता आहे. भेटी-गाठी कमी केल्यास उत्तम! ज्यांचा व्यवसाय शिक्षणाशी संबंधी आहे अश्या व्यक्तींना हा महिना चांगला आहे. मुलांच्या शाळा कॉलेजच्या अॅडमिशन्स मनाप्रमाणे पार पडतील. ज्यांचा स्वभाव बोलका आहे अश्या लोकांना अनेक लोकांशी गाठी-भेटी होण्याचे योग आहेत. राहू चंद्र युती उद्योग धंद्यातील भागीदारांना वरचढ ठेवतील. सावधगिरी आवश्यक आहे. घरगुती वातावरण जरा नरम गरम राहण्याची शक्यता असल्याने दमाने घेतल्यास ओके. नवमेश गुरु छोटे मोठे प्रवास घडवून आणतील. कामाचा ताण या महिन्यात नेहमीपेक्षा जास्त जाणवेल असे योग आहेत. एकुणात महिना संमिश्र स्वरूपाचा आहे असे दिसते.

वृषभ :- वृषभ राशीला या महिन्यात आर्थिक बाबतीत ‘पाँचो उंगली घी में’ याचा अनुभव येईल. कारण द्वितीयेश बुध तृतीयात व शनि चंद्र षष्ठात. तसेच षष्ठेश शुक्र द्वितीयात. लाभेश गुरु तृतीयात शनि षष्ठात व शुक्र द्वितीयात. ग्रहांची ही स्थिती आर्थिक बाबतीत जोरदार आहे. या सर्व योगामुळे कदाचित जोडीदारावर लक्ष कमी होण्याची शक्यता आहे. परिणाम कुरबुरी व वाद!! यातून एक मार्ग आहे. वेळ काढून छोटे मोठे करमणुकीचे प्रवास करत राहा. फिरत्या प्रेमाचा अनुभव येईल. प्रकृतीच्या बाबतीत मात्र परिस्थिती जरा वेगळी आहे. षष्ठातील शनि मंगळ तुमच्यावर अस्त्र सोडण्यास तयार आहेत व तृतीयातील रवि गुरु बुध त्यांना प्रत्त्युतर देण्यास सज्ज आहेत. त्यामुळे नेमके काय घडेल सांगणे अवघड आहे. कोण कमी पडेल ह्यावर अवलंबून आहे. पण पंचमातील राहू तुमच्यावर वरद हस्त ठेवील असे दिसते तेंव्हा निर्धास्त राहा.
मिथुन :- ह्या राशीला रवि, बुध, गुरु द्वितीय स्थानी व शनि, मंगळ पंचम स्थानी आहेत. ज्यांचा व्यवसाय ब्रोकरेज किंवा करमणुकीसंबंधी असेल त्यांना उत्तम योग आहेत. तसेच ज्या लोकांचे क्लासेस आहेत त्यांच्या क्लासच्या विद्यार्थ्यांची संख्या बरीच वाढेल. लग्नातील शुक्र, धनस्थानातील गुरु आणि पंचमातील शनि प्रकृतीसंबंधी काही तक्रार ठेवणार नाही. त्यामुळे प्रकृतीच्या बाबतीत निर्धास्त राहा. चतुर्थ स्थानातील राहू कन्या राशीत आहे व त्याचा स्वामी बुध द्वितीय स्थानी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील हा काळ चांगला आहे. षष्ठ स्थानात वृश्चिक रास असून त्याचा स्वामी मंगळ पंचमात आहे व राहू चतुर्थात असल्याने ज्यांचे व्यवसाय शिक्षणासंबंधी आहेत त्यांना सुद्धा हा काळ उत्तम आहे. कुटुंबाबरोबरचे संबंध अतिशय सलोख्याचे राहतील. अष्टम स्थानातील शनि पंचमात आणि गुरु द्वितीयात ही ग्रहस्थिती पार्टनरशिपच्या व्यवसायात थोडी सावधगिरी बाळगण्याचा इशारा देत आहे. नवमेश शनि छोटे मोठे प्रवास देण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा महिना उत्तम दिसत आहे.

कर्क :- कर्क राशीतील रवि, बुध आणि गुरु तुमचा सामाजिक स्तर वरच्या दर्जाचा ठेवतील. बुकसेलर्, प्रिंटर्स, प्रकाशक अश्या लोकांचा व्यवसाय आर्थिक दृष्ट्या चांगला राहील. चतुर्थातील मंगळ आणि तृतीयातील राहू काही लोकांच्या बाबतीत घर बदलण्याचे योग पण दाखवत आहेत. षष्ठाचा स्वामी गुरु लग्नात, शनि चतुर्थात आणि शुक्र द्वादश स्थानी हा योग प्रकृतीच्या बाबतीत म्हणावे तितके चांगले नाहीत. विशेषत: मधुमेही लोकांनी काळजी घ्यावी. घरातील वातावरण साधारण ठीक राहील. अष्टमेश शनि चतुर्थात आणि गुरु लग्नी अश्या ग्रहस्थितीत वाहने जपून चालवावीत. गुरु नवमेश असून लग्नातील गुरु नवम स्थानाला बघत आहे, त्यामुळे धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा योग आहे असे दिसते. दशमेश मंगळ चतुर्थात आणि राहू तृतीयात त्यामुळे व्यवसायात आर्थिकदृष्ट्या जरी लाभ कमी झाला तरी तुमचे काम लोकांच्या नजरेस निश्चित येईल. लाभेश शुक्र द्वादश स्थानी व बुध, गुरु द्वितीय स्थानी असल्यामुळे काहीलोकांना परदेशी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा महिना चांगला जाईल असेल वाटते.

सिंह :- सिंहेचा राशीस्वामी रवि द्वादशात त्याच बरोबर बुध, गुरु पण द्वादशात त्यामुळे काही लोकांना शरीर प्रकृतीच्या दृष्टीने थोडाफार त्रास होण्याची शक्यता दिसते. काही लोकांच्या बाबतीत सिंह लग्नी रवि, गुरु, बुध तिघेही लाभ स्थानी असतील, त्यांना मात्र उत्तम लाभाची संधी प्राप्त होईल. द्वितीय स्थानी राहू व मंगळ तृतीय स्थानी अशी स्थिती शिक्षक मंडळी, पुस्तक विक्रेते इ. लोकांना लाभदायक आहे. तृतीयातील शनि उच्चीचा असून गुरु द्वादश स्थानी उच्चीचाच आहे, त्यामुळे अनेक लोकांना परदेशी गमनाची पण संधी प्राप्त होईल. भावचलितात मात्र गुरु एकादश स्थानी असेल तर अशी संधी मिळू शकणार नाही. चतुर्थेश मंगळ तृतीयात आणि राहू द्वितीय स्थानी त्यामुळे काही लोकांच्या घरी पाहुणे-रावळे येण्याची बरीच शक्यता आहे. पंचमातील गुरु द्वादश स्थानी व शनि तृतीय स्थानी असल्याने ज्यांचा व्यवसाय शेअर ब्रोकर अश्या स्वरूपाचे आहेत, त्यांनी व्यवहार जपून करावेत, अन्यथा नुकसान संभवू शकते. कौटुंबिक बाबतीत मात्र थोड्याफार कुरबुरी होण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा महिना चांगला आहे.

कन्या :- कन्या राशीला रवि, बुध, गुरु कर्केत लाभ स्थानी असल्याने ह्या महिन्यात बऱ्याच मार्गांनी आर्थिक लाभ होतील. लग्नी राहू, मंगळ द्वितीयात त्यामुळे काही लोकांना घशाचे त्रास होण्याची शक्यता आहे, पण एकंदरीत प्रकृती चांगली राहील. द्वितीयातील शनि आर्थिक बाबतीत खर्च दाखवत आहे. चतुर्थेश गुरु लाभात आणि शनि द्वितीयात, अनेक लोकांना घरापासून फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच अॅडमिशनच्या बाबतीत सुद्धा मनाप्रमाणे होईल. पंचमेश शनि द्वितीयात आणि गुरु लाभात हा योग एंटरटेनमेंट इंडस्ट्री, शेअर व्यवसाय इ. व्यावसायिकांना बरेच लाभ होतील व त्यांचे व्यवसाय तेजीत जातील. षष्ठेश देखील शनि असल्याने नोकरी संबंधी पण चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. सप्तमेश गुरु गृहसौख्य उत्तम व आनंदी ठेवेल. दशमातील शुक्र व दशमेश बुध हे दोन्ही ग्रह व्यवसाय अगर नोकरीसाठी अतिशय फायदेशीर आहेत. एकंदरीत महिना उत्तम आहे.

तूळ :- तूळ राशीला शनि, मंगळ लग्नात आणि गुरु दशमात आहे. ज्या तूळ राशीला गुरूची महादशा असेल अश्या लोकांच्या बाबतीत त्यांच्या व्यवसाय अगर नोकरीत मनासारख्या घटना घडतील. तसेच काही लोकांच्या बाबतीत सामाजिक कार्य देखील होण्याची बरीच शक्यता आहे. लग्नातील मंगळ सप्तमेश आहे, राहू कन्येत आहे आणि बुध दशम स्थानी आहे. हि ग्रहस्थिती देखील अनेक लोकांना लाभदायी ठरेल. सप्तमेश मंगळ लग्नी असल्याने कौटुंबिक स्वास्थ्य जरा गरमा-गरम राहील असे दिसते. तृतीयेश गुरु दशम स्थानी, शनि लग्नी आणि शुक्र नवमात. त्यामुळे तुमच्या पराक्रमाला नशिबाची सुद्धा साथ लाभेल. थोडक्यात, तुम्ही जे काम हाती घेतले असेल त्याची एकुणात दखल घेतली जाईल. पंचमेश गुरु आहे, हा देखील एक चांगला योग आहे. मुलाबाळांच्या बाबतीत काळजी करण्याचे कारण राहणार नाही. ज्यांना अध्यात्माची आवड आहे, त्यांची ह्या महिन्यात ध्यान धारणा उत्तम होईल. एकुणात हा महिना चांगला आहे.

वृश्चिक :- वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ बाराव्या स्थानी, राहू लाभ स्थानी व बुध नवम स्थानी. ही ग्रहस्थिती अनेक लोकांना लांबच्या प्रवासाची वार्ता देत आहे, तेंव्हा बॅगा भरून तयार राहा. मंगळ जसा बाराव्या स्थानी आहे तसाच तो षष्ठेश पण आहे, त्यामुळे उष्णतेचे विकार त्रास देण्याची शक्यता आहे. द्वितीयेश गुरु नवमात आणि शनि बाराव्या स्थानी असल्याने काही लोकांना नोकरीसंबंधी मानसिक ताण येण्याची संभावना आहे. ह्याचा अर्थ काही वृश्चिक राशीच्या लोकांना परदेशी जाण्याचा योग येईल तर इथे राहणाऱ्यांना कामातील ताणाला तोंड द्यावे लागेल. काही विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घ्यायची संधी पण लाभेल. शेअर किंवा तत्सम गुंतवणुकी करण्याची ही वेळ योग्य नाही, नुकसान होण्याचा संभव आहे. कौटुंबिक स्वास्थ्य व्यवस्थित राहील. एकंदरीत महिना संमिश्र स्वरूपाचा राहील.

धनु :- धनु राशीचा स्वामी गुरु अष्टमात, शनि लाभात आणि शुक्र सप्तमात. ह्या राशीचे जे लोक इंजिनिअर असतील अश्यांना ही ग्रहस्थिती बरीच लाभदायक ठरेल. त्या जोडीला कामाचा ताण देखील बराच जास्त येईल असे दिसते. पण ह्यातून बरेच लाभ देखील मिळतील. ज्यांचा व्यवसाय इंजिनिअरींगच्या सामानाशी निगडीत आहे, त्यांना देखील हा काळ अतिशय उत्तम जाईल व त्यांच्याकडे सतत ऑर्डर्स येत राहतील. द्वितीय आणि तृतीय स्थानाचा स्वामी शनि लाभात आहे व गुरु अष्टमात आहे. त्यामुळे जे लेखक अध्यात्मासंबंधी लिहितात त्यांना देखील हा काळ चांगला आहे. त्यांच्या हातून उत्तम लिखाण घडण्याचे योग आहेत. चतुर्थात केतू व चतुर्थाचा स्वामी गुरु अष्टमात, ही स्थिती वाहन काळजीपूर्वक चालवण्याचा इशारा देत आहे. अष्टमातील गुरु काही प्रमाणात प्रकृतीसंबंधी त्रास पण दाखवत आहे. विशेषत: खाण्यापिण्याबाबत विशेष काळजी घ्यावी. कौटुंबिक वातावरण ठीक राहील. तरीपण असे वाटते की तुमचे वैवाहिक जोडीदार खूप जास्त बिझी राहतील आणि तुमच्याशी बोलायला पण कमी वेळ मिळेल. एकंदरीत महिना उत्तम जाईल.

मकर :- मकर राशीचा स्वामी शनि दशम स्थानी व गुरु सप्तम स्थानी असल्याने ज्यांचे स्वत:चे व्यवसाय आहेत, अश्यांना हा काळ उत्तम आहे. व्यवसायात वृद्धी पण होईल. द्वितीय भावाचा स्वामी पण शनिच असल्याने वरील गोष्टीस पुष्टी मिळते. तृतीयाचा स्वामी गुरु सप्तमात आहे, त्यामुळे वैवाहिक आयुष्यात किंवा पार्टनरशिपच्या व्यवसायात थोडीफार कुरबुर होण्याची शक्यता आहे. चतुर्थ भावाचा स्वामी मंगळ दशमात असून त्याचा स्वामी राहू नवम स्थानी आहे व बुध सप्तमात आहे. मंगळ भूमीकारक असल्याने अनेकांचे जमिनीचे व्यवहार सुरळीत होतील. पंचम भावाचा स्वामी शुक्र षष्ठात व गुरु आणि बुध सप्तमात प्रकृतीसंबंधी थोडीफार काळजी दाखवतात. मुलाबाळांच्या बाबतीत विशेष काळजी करण्यासारखे कारण नाही. नवमेश बुध सप्तमात, राहू नवमात कन्या राशीत, शनि दशमात त्यामुळे काही लोकांना पर्यटनाचा योग येईल. लाभस्थानाचा स्वामी मंगळ दशमात, राहू नवमात त्यामुळे नशीब देखील व्यवसाय अगर नोकरीत बऱ्याच अंशी साथ देईल. एकंदरीत हा महिना व्यावसायिकदृष्ट्या नक्की चांगला आहे.

कुंभ :- कुंभ राशीचा स्वामी शनि नवम स्थानी असल्याने ह्या महिन्यात तुम्हाला ध्यानधारणेसाठी बराच चांगला वेळ मिळणार आहे. द्वितीय स्थानाचा स्वामी गुरु षष्ठात असून सुद्धा आर्थिक आवक फारशी होणार नाही किंवा बँकेचे कर्ज देखील मंजूर व्हायला थोडा त्रास होईल. तृतीयेश मंगळ नवम स्थानी, त्यामुळे कामानिमित्त बरेच प्रवास करावे लागतील. जोडीदाराबरोबर थोडेफार कुरबुरीचे प्रसंग येतील, मात्र एकंदरीत कौटुंबिक वातावरण चांगले राहील. षष्ठातील रवि, बुध मात्र आर्थिक स्थितीला बऱ्यापैकी आधार देतील. शनि द्वादशेश, बुध अष्टमेश व राहू अष्टमात, ही ग्रहस्थिती आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगण्याचा इशारा देत आहे. त्यामुळे कोणताही व्यवहार करताना व्यवस्थित काळजी घ्यावी. एकंदरीत हा महिना तुमच्या राशीला संमिश्र स्वरूपाचा जाईल.

मीन :- केतू मीन राशीतच, बुध पंचमात, गुरु पंचमात ही ग्रहस्थिती धार्मिक बाबी व ध्यानधारणेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. पंचम स्थान कार्यरत झाल्याने ध्यानधारणेतून मिळणारे लाभ देखील प्रबळ स्वरूपाचे मिळतील. अष्टमातील शनि, मंगळ देखील तुम्हाला ध्यानधारणेसाठी प्रवृत्तच करतील. मौन हे ह्या महिन्यातील तुमचे ब्रीद धरून चाला! ह्यामुळे तुम्हाला ह्या महिन्यात शांततेचा आनंद मिळू शकेल. पंचमातील तीन ग्रह तुमची प्रकृती देखील ठणठणीत ठेवतील. कौटुंबिक वातावरण सलोख्याचे राहील. दशमेश गुरु पंचमात व शनि अष्टमात त्यामुळे नोकरी करणाऱ्यांना हा महिना तितकासा लाभदायक दिसत नाही. त्यामुळे सर्वांशी जमवून घेण्यातच तुमचा फायदा आहे. मुलाबाळांच्या बाबतीत फारशी चिंता राहणार नाही. ह्या महिन्यातील बजेट डेबिटमध्ये जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे खर्चाला कात्री लावणे आवश्यक आहे. एकंदरीत हा महिना आर्थिक बाबतीत संमिश्र आणि ध्यानासाठी उत्तम आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कन्येच्या भविष्यात लिहील्याप्रमाणेच घडो ही अपेक्षा... मेषेच्याबद्दल लिहीलय त्याप्रमाणे नाही घडल तर उत्तम

कन्येच्या भविष्यात लिहील्याप्रमाणेच घडो ही अपेक्षा>++++१००००००००००००००००००००००

संमिश्र!! Happy चलता है... सगळे दिवस सारखेच आपल्याला Happy रात्री पडल्या पडल्या शांत झोप लागली पाहीजे फक्त Happy
तोंडावर ताबा ठेवला पाहीजे (खाणे आणि बोलणे दोन्हींसाठी Happy )
धन्यवाद पशुपतिजी.