प्रयत्ने स्थळ शोधिता… - भाग १

Submitted by आशयगुणे on 27 July, 2014 - 14:46

" माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलं आहे. मुलगा अमेरिकेचा आहे आणि लवकरच मी देखील 'फ्लाय' करणार आहे", ती मला म्हणाली. हे ऐकताना मी माझा चेहरा शक्य तितका स्थिर ठेवायचा प्रयत्न करीत होतो हे मला जाणवत होते. त्यामुळे बहुतेक वाक्य माझ्या कानीच पडत नव्हती. परंतु जे ऐकायचे ते ऐकले. हिचे लग्न ठरले होते आणि आता माझ्या पुढे पर्याय उरले नव्हते. त्यामुळे आता पुढचे पाउल कुठे आणि कसे टाकायचे ह्याचा विचार करावा लागणार होता. ऑफिस ह्या क्षेत्रा पुरते सारे पर्याय संपुष्टात. आणि आता पर्यायच हवे असतील तर नोकरी बदलायला लागणार होती. पण मी इथे रुजू होऊन वर्ष पण झाले नव्हते. त्यामुळे नौकरी आणि छोकरी ह्या दोन्हींमध्ये पर्यायांचा 'डेड एन्ड' आला होता.
तसा मी लहानपणापासून ( म्हणजे शाळेत नववी-दहावी पासून) 'ट्राय कर' विभागात कार्यरत आहे. ह्या विभागात काम करणारी मुलं सतत 'मुली' ह्या विषयावर म्हटलं तर 'ट्राय' अर्थात प्रयत्न करीत असतात. पण नेमके होते असे की जी मुलं काहीही ट्राय करायच्या भानगडीत पडत नाहीत तेच शेवटी बक्षीस घेण्यास पात्र ठरतात. परंतु आम्ही आमची पद्धत काही बदलत नाही आणि त्याच सनातनी स्वभावामुळे शाळा ते कॉलेज, कॉलेज ते सिनियर कॉलेज, तिथून पुढे नोकरी आणि मग दुसरी नोकरी असे करत सारे पर्याय संपवतो. तोपर्यंत इतर मुलांची 'प्रथमा', 'द्वितीय' वगेरे अनुभवांची परीक्षा देऊन झालेली असते.
असो, तर पर्याय संपलेल्या अवस्थेत काही दिवस गेले. घरून देखील आता थोडे अप्रत्यक्ष इशारे येऊ लागले होते. परिस्थिती बदलली होती म्हणा. आता मी घरी आईला, " मी मुली बघतो आहे", हे सांगू शकत होतो. काही वर्षांपूर्वी कॉलेजला असताना हे वाक्य बोललो असतो तर भुवया उंचावल्या गेल्या असत्या.
पण आता अचानक हे सारे अधिकृत झाले होते. आणि त्यामुळे मी 'समाजमान्य' पद्धतीने मुली शोधायला सुरुवात केली. थोडी तांत्रिक प्रगती झाल्यामुळे समाजाला इंटरनेट वापर सुदैवाने मंजूर आहे. आणि अशाप्रकारे सुरुवात झाली माझ्या मुली बघण्याच्या मोहिमेला…

आता सुरुवात इंटरनेट वरून करायची ठरलेली. ह्याचे मुख्य कारण नातेवाईक! एकदा घरी कसलंस कार्य होतं. मी झब्बा घालून हॉल मध्ये आलो आणि एक अतिउत्साहित आजी म्हणाली, " वा वा … आता आम्ही बघायला सुरुवात करायला हवी!" मी त्या दिवशी पासून नातेवाईक मंडळींकडून चार काय चांगले चौसष्ठ हात लांब आहे!
…. जाता जाता सांगतो, माझे वय त्यावेळेस १९ होते.

त्यानंतर जवळ जवळ प्रत्येक सामाजिक प्रसंगात मी कुठल्या न कुठल्या तरी आजी-आजोबा, मावशी, आत्त्या, काकू ह्यांच्या जाळ्यात अडकायचो! प्रेत्येका पुढे एकच समस्या - माझे लग्न कधी होणार! मी मुलगा असल्यामुळे , ' काय मग, कुठे जमवून घेतलं आहेस का', हा प्रश्न ते मला विचारू शकत होते. आणि पुढे ज्या लग्नाला आम्ही गेलो असू तिथून निघताना त्यांच्या दोनच अपेक्षा होत्या - माझ्याकडून लग्न ठरलं हे लवकरच ऐकायची आणि ज्यांचं लग्न झालं त्यांच्याकडून 'लवकरच गोड बातमीची!' ह्या पलीकडे त्यांचे जग नसावे!

त्यामुळे आता जर त्यांना सांगितले तर सामानाची यादी आणावी तशी ते माझ्या पुढे मुलींची यादी घेऊन आले असते. आणि काही दिवसांनी दुकानदार बिल चुकतं करायला येतो तसे मागे लागले असते. नकोच ती भानगड! शिवाय ऑनलाइन पद्धतीने मला माझ्या निकषांनी निर्णय घेता येणार होते. आता तसे काही फार मोठे निकष नव्हते माझे. परंतु ज्या मुलीला किंवा मुलींना मला भेटावे लागणार होते, त्यांच्याशी आणि सुरुवातीला त्यांच्याशीच बोलून मला पुढे ही 'केस' घरी रेफर करायची होती. त्यामुळे पहिले कुठल्या तरी 'लग्न पोर्टल' वर नाव रेजिस्टर करणे आणि पुढे काय होतंय ते पाहणे इथून मी सुरुवात करणार होतो. माझ्यावर ही वेळ येईल असे मी अगदी शाळा-कॉलेज पासून वागत आलो असलो तरीही ही प्रक्रिया एकूण नवीनच होती!

तेवढ्यात घरच्यांनी एका खाजगी विवाह संस्थेचे नाव मला सुचाविले. ह्या संस्थेचे ब्रीदवाक्य काय असावे? तर 'इथे विवाह जुळून येते!' आता ही काय सांगायची गोष्ट झाली का? हे म्हणजे कोणत्याही ऑफिसच्या बाहेर 'येथे काम होते' असे लिहिण्यासारखे आहे. ह्यांची मुलं-मुली जोडण्याची कल्पना खूप
भव्य होती. हे लोक कुठेतरी मेळावा जमवतात आणि भरपूर संख्येने मुलं-मुली तिकडे उपस्थित राहतात. मग आपण त्यातील कुणा एकी बरोबर जोडी जुळवायची आणि तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात करायची. आणि ओळख करून घरी जायचं. पुढचं पुढे. पण ह्या कल्पनेला एक अडचण होती.
हॉटेल मध्ये कितीही चांगला पदार्थ मागवला - अगदी तिखट, चमचमीत - तरी आपले लक्ष शेजारच्या टेबल वर काय मागवलं गेलंय ह्याच्याच कडे असते! मनुष्य स्वभाव आहे त्याला काय करणार? त्यामुळे तिकडे जाऊन मला बाजूचा मुलगा कुणाशी बोलतोय, तिच्याशी आपण बोलायला हवं होतं का वगेरे विचार करायचे नव्हते. आणि मी त्या वाटेला न जायचे ठरविले. आणि लग्न डॉट कॉम नावाच्या एका वेबसाईटची निवड केली.

स्वतःबद्दल लिहिणे ही एक तापदायक प्रक्रिया असते. अगदी पोटापाण्याशी निगडीत असल्यामुळे मी नोकरी सुचित करणाऱ्या वेबसाईट वर स्वतःबद्दल लिहितो. शिवाय तिथे स्वतःबद्दल वाट्टेल ते लिहिता येऊ शकतो. पण इकडे? नोकरी मिळावी म्हणून वाढवून चढवून लिहिण्याची प्रक्रिया छोकरी मिळवताना वापरता येत नाही. शिवाय नोकरी मिळवतानाचा एकमेव निकष 'आधीचा अनुभव' ( तुम्ही स्वतःबद्दल काहीही लिहिले तरी) हा असतो. इकडे जर 'आधीचा अनुभव' सांगायला गेलं तर कोणतीही मुलगी तुम्हाला समोर उभं करणार नाही! त्यामुळे जे काय असेल ते सत्य लिहावे लागते आणि म्हणूनच ते अवघड असते.
ह्या वेबसाईट वर 'स्वतःबद्दल थोडे' ( हे थोडे थोडीच असते! पण हे नंतर लक्षात आले!) ह्या व्यतिरिक्त बरेच काही होते. त्यात माझ्या परिवारा विषयी, मी सध्या काय करतोय ह्या विषयी आणि एकंदर मी जीवन जगणे कसे पसंत करतो हे सारे कॉलम भरायचे होते. मग मला भरायची होती माझी उंची, माझा शारीरिक बांधा ( स्वतःबद्दल लिहिणे कठीण का ते कळलं ना आता?), माझा वर्ण, मी सिगारेट पितो का, दारू पितो का, माझी रास आणि माझा रक्तगट आणि माझा धर्म वगेरे. पुढे जात आणि एवढं पुरे न होत तर माझे गोत्र!

आता मी अत्री नामक ऋषीशी संबंधित आहे असे मला सांगितले गेले होते. आणि म्हणून माझे गोत्र 'अत्री'. पण जवळ जवळ पाच हजार वर्षांपूर्वी जन्माला आलेला हा इसम माझा डायरेक्ट नातेवाईक कसा होऊ शकतो हे काही मला कळेना! हा प्रश्न विचारल्यावर मला असे सांगितले गेले की आपल्या पिढ्या मागे नेल्या तर अत्री ह्या ऋषींशी आपले मूळ शोधतात. परंतु ह्याचे डॉक्युमेंटेशन माझ्या कोणत्याही नातेवाईकांकडे सापडले नाही. त्यामुळे वेबसाईट वर मी हा कॉलम भरला नाही.
ह्यापुढे माझी नोकरी, माझे वार्षिक उत्पन्न, मी किती शिकलोय, मी कुठे राहतो, माझ्या आवडी-निवडी, माझे आवडते पदार्थ, मला कोणते खेळ आवडतात ( हा प्रश्न खेळायला की बघायला हे माहिती नाही), कोणत्या प्रकारचं संगीत आवडतं ( माझे लग्न झालेले मित्र सांगतात की लग्नानंतर केवळ रड'गाणं'च गायलं जातं!), कोणत्या प्रकारचे सिनेमे आवडतात आणि कोणत्या प्रकारचे कपडे आवडतात ( ह्याचा लग्नाशी काय संबंध काय माहिती) हे सारे प्रश्न होते. पुढे माझ्या होणाऱ्या बायकोकडून काय अपेक्षा आहेत हे सारे प्रश्न होते आणि तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट आली.
कॉलेज मध्ये ( आणि एकूणच आतापर्यंत) आम्ही मुली बघत(च) आलो आहे. त्यावेळेस कधी कधी शाळेतल्या मुली देखील दिसायच्या. परंतु , " बच्ची को क्या देखना' अशा आविर्भावाने आम्ही त्यांच्याकडे बघणे टाळायचो. आमच्यापेक्षा चार वर्ष लहान असलेल्या मुलींकडे काय बघायचे! पण आज जेव्हा मी 'अपेक्षित वधू' साठी वयोगट २३- २७ हा ठेवला तेव्हा नियतीने चक्र उलटे फिरविण्याचा अनुभव मला आला. परंतु आता त्याला काही इलाज नव्हता. मी माझी 'प्रोफाईल' आता तयार केली होती. आणि पुढे काय अनुभव येणार ह्या उत्सुकतेने आणि क्वचित टेन्शनने मी सज्ज झालो होतो.

- आशय गुणे Happy

(…. भाग २ पुढे)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखनासाठी हा विषय घेतलात त्यासाठी माझ्यातर्फे अभिनंदन व धन्स
काही अजून टिप्स मिळू शकतील का

आपला गरजू
~वैवकु