विषय क्रमांक २ : अदब

Submitted by Priyanka Pathak on 14 July, 2014 - 10:29

व्यावसयिक जगतात पाऊल ठेवल्यापासून आलेल्या अनंत वैविध्यपूर्ण अनुभवांनंतर आजचा अनुभव काहीसा निराळाच होता...
आज पहिल्यांदाच कंपनीत एकटी जाण्याची वेळ आली... "पुणं अन मी " हा संबंध तसा मोजक्याच वेळी आला असल्याने “इथले रस्ते अन मी” म्हणजे दाखवायच्या कार्यक्रमात मुलगा अन मुलगी जसे पूर्णतः अनोळखी अन तितक्याच घाबरलेल्या नजरेने एकमेकांकडे बघतात, तशीच काहीशी अवस्था...इथल्या भव्य चौकांकडे बघत, आता नेमकं कुठून कुठे जावं ,हा विचार करत उभी होते....." मनातून आपण कितीही भांबावून गेलो असलो, तरीही ‘नवीन ठिकाणी’ आपण ‘नवीन’ आहोत, हे चेहेऱ्यावर येऊ देऊ नये ",हि कुठेतरी ऐकलेली ओळ आचरणात आणण्याचा मी आटोकाट प्रयत्न करत होते..
इतक्यात कुठून तरी "हिंजेवाडीsssss हिंजेवाडी sss " असा अगदी ताला-सूरातला काळी ५ मध्ये तापलेला आवाज कानी पडला...बघते, तर ‘टमटम’, ’काळी -पिवळी ‘ अशी अनेकविध विनोदी नावे ग्रहण केलेली ती उच्चभ्रू भाषेतील ‘६-आसनी’ होती..... यापूर्वीही औरंगाबादमध्ये असताना मी या ‘शाही’ वाहानाने प्रवास केला आहेच, पण आज गळ्यात कंपनीचं ओळख पत्र असल्याने कदाचित हा पर्याय निवडताना जरा वेळ लागला... शेवटी " आपण इथे नवीन आहोत " या सबबीखाली स्वतःला समजावत मी त्या रिक्षात बसले.. दिसण्यावरून बऱ्यापैकी वरच्या पदावर असल्याची ग्वाही देत अनेक लोक स्वतःच्या वातानुकुलीत गाडीतून जात असल्यागत गर्वोन्नत्त भाव चेहेऱ्यावर प्रयत्नपूर्वक आणून ‘‘दाटीवाटीने ‘बसले होते... एरवी संगणकासमोर शोभून दिसणारी ती छबी याठिकाणी खरंच विजोड दिसत होती.. तरीही चेहेऱ्यावरचे धीर-गंभीर भाव मात्र कायम होते....
या सगळ्या प्रकाराकडे काहीशा खट्याळ नजरेतून बघताना अचानक अगदी नम्र आवाज कानावर पडला.." ‘इन्फोसीस’ हाये का कोनी? " वेग जरा कमी करत त्याने विचारलं...त्याचं ते अदबीनं बोलणं, अन मागे बसलेल्यांचे ते विक्षिप्त भाव, हा विरोधाभास फारच गहन होता... इतक्यात परत काही वेळाने " ‘कोग्नीझंट’ हाये का कोनी ?" तेवढ्याच नम्रपणे त्याचे शब्द उमटले... अन दोन अगदी वेगवेगळ्या वातावरणातील स्वभावातला फरक ठळकपणे समोर आला...योग्य जागी नसूनही गर्व बाळगणारे आम्ही, अन योग्य , हक्काच्या जागी असूनही अदबीने वागणारा तो...
आता मात्र या लोकांसोबत फार वेळ बसणं मनाला रास्त वाटेना... मी कोऱ्या मानाने वाट बघत राहिले,
" ‘टी.सी.एस’ हाये का कोनी?" ऐकण्याची............................
transport_4_1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users