चुडा

Submitted by संतोष वाटपाडे on 10 July, 2014 - 07:46

भेगा पडलेल्या कुबड्या भिंतीत
जबरदस्ती खोचलेल्या निमुळत्या लाकडाच्या खुंटीवर
किणकिणताना दिसतो मला माझा हिरवागार चुडा....

कधी वळचणीला पडलेल्या चिंधकांनी
तर कधी अर्धवट भरलेल्या पिशव्यांनी
झाकला जातो काही वेळापुरता
श्वास बंद करून डोळे झाकून
तोही गप्प राहतो
मनातील तगमग मुकाट गिळून

कपाळाचा लाल रंग गेल्यापासून
अंगणातला हिरवा रंग कधी कोमेजला
लक्षात आलंच नाही
कोपर्यातल्या विटकरी तुळशीला
तेव्हापासून चेंबलेल्या पितळी तांब्यातून
देव्हार्‍यातलं रंगीत पाणी गेलंच नाही

परातीत पीठ मळताना वरती होणारा
वावरात गवत कापताना थरथरणारा
कार्ट्यांना झोडपताना कळवळणारा
अन निश्चल रात्रीत कुस्करला जाणारा
माझा असहाय चुडा हसत असतो दिवसभर
कळकट्ट खुंटीवरुन
जेव्हा मी झाड़त असते आठवणींचा पाचोळा
चुलीपासून उंबर्‍यापर्यंत.....

दरवर्षीच्या दिवाळीत दोन जुन्या ठेवून
नव्या बांगड्या घालत असताना
काचा टोचायच्या खोलवर
मनगट रक्तबंबाळ होईपर्यंत
तरी त्या लालहिरव्या मनगटात
हिंमत यायची आयुष्य जगण्याची
काळवंडलेले चेहरे पाहून

आता चुडा बोलत नाही
हसत असतो नेहमी एकटा
भडकलेल्या चुलीसोबत चालू असतो त्याचा
न कळणारा मूक संवाद .......

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users