बाबा

Submitted by लाल्या on 5 July, 2014 - 04:45

नोंद - १४ जानेवारी २०११ ला लिहिलेला हा लेख इथे पुन्हा सादर करतोय. याच दिवशी ज्येष्ठ अभिनेते श्रि. प्रभाकर पणशीकर यांचं निधन झालं. त्यांच्याबरोबरच्या काही आठवणी!प्रतिक्रिया जरूर द्या!

आज सकाळी पंतांच्या निधनाची न्युज वाचली आणि धक्काच बसला. बाबांसारखे कलाकार(मी त्यांना "बाबा" म्हणायचो) परमेश्वर मोजकेच बनवतो. मला त्यांच्याबरोबर ४ दिवस रहायचा योग आला तो डिसेंबर २००८ मध्ये. गोव्याला एका नाट्यसंस्थेबरोबर १० वर्ष सातत्याने काम केल्याबद्दल माझा सत्कार करण्यात आला. त्या सत्काराहून जास्त मोलाचं होतं कि तो सत्कार हा बाबांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेने जातानाची विमानाची तिकिटं पाठवली होती. त्यानुसार मी, श्रि प्रमोद पवार, आणि बाबा, मुंबई विमानतळावर भेटलो. ती माझी आणि बाबांची पहिली भेट. बाबांसाठी मी नवीन होतो. माझ्यासाठी, आणि अर्थात पूर्ण महाराष्ट्रासाठी प्रभाकर पणशीकर हे नाव काही नवीन नव्हतं. मी विमानतळावरच त्यांच्या पाया पडलो. त्यांना जास्त चाललं की त्रास व्हायचा, म्हणून ते व्हीलचेअर वर होते. प्रमोदभाईंबरोबर मी आधीही काम केलेलं असल्यामुळे ते चांगलेच परिचयाचे होते. बाबांना काय हवं नको ते प्रमोदभाई पोटच्या मुलासारखं पाहत होते. आम्ही सर्वजण "इंडिगो एअरलाईन्स" च्या विमानाने गोव्याला पोचलो. तिथून गाडीने आमच्या यजमानांच्या घरी - सावर्डे इथे आलो.

त्याच्या पुढचे ३ दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातले कधीही न विसरणारे ३ दिवस! बाबांच्या सहवासात घालवलेला एक एक क्षण हा आयुष्य श्रिमंत करणारा होता. दिवसभर नाटकाच्या गोष्टी चालायच्याच....पण खरी मजा यायची ती संध्याकाळी सावर्डे मधल्या "वाईल्ड वेस्ट" या ओपन-एअर हॉटेलात. व्हिस्कीचे घोट घेत बाबा, प्रमोदभाई, संकल्प नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा राजू नाईक, आणि मी! बाबांच्या गप्पा ऐकत वेळ कसा जायचा ते कळायचंच नाही. बाबांचे अफाट अनुभव ऐकताना आम्ही भारावून जायचो. त्यांच्या नाटकांचा दौरा, आधीचं सावर्डे, त्या काळातले त्यांचे आणि त्यांचे मेंटर रांगणेकरजी, वसंतराव देशपांडे, व इतर थोर कलावंतांच्या गमती जमती. त्या अविस्मरणीय मंतरलेल्या ३ दिवसातील दोन आठवणी सांगाव्याश्या वाटतात.

बाबांना त्या दिवसात भयंकर खोकला झाला होता. दर दोन तीन वाक्यानंतर त्यांना खोकला यायचाच! १९ डिसेंबरला जेव्हा सत्कार समारंभ पार पडला, तेव्हा रसिक प्रेक्षकांनी त्यांना परफोर्म करण्याचा आग्रह केला. आम्हा सर्वांना माहित होतं कि बाबांचा खोकला त्यांना काही करायला देणार नाही. पण रसिकांचं मन (आणि मान) ठेवायला म्हणून बाबांनी त्या तिथे रंगमंचावर औरंगजेब उभा केला. बघता बघता आमच्या समोर एक वेगळीच व्यक्ती उभी राहिली. "वाईल्ड वेस्ट" मधले गप्पा मारणारे बाबा क्षणार्धात नाहिसे झाले. त्यांच्या जागी, फक्त त्यांच्या आवाजाच्या फेकीतून प्रकटला तो "इथे ओशाळला मृत्यु" मधील खलनायक. अख्खा सभागृह मंत्रमुग्ध होऊन ही करामत पाहत होता! बाबांचं ते रूप पाहून आम्ही सारे भारावून गेलो होतो. त्यांच्यात जणू औरंगजेब संचारला होता....बघता बघता त्यांनी श्रोत्यांसमोर १९६८ चा तो काळ उभा केला. २००८ साली, वयाच्या ७७व्या वर्षीसुद्धा त्याच ताकदीने ते रसिक प्रेक्षकांना भुलवून टाकत होते. त्यांच्यातला कलावंत हा किंचितही कमी झाला नव्हता...आणि त्यांची प्रतिभा ही त्यांच्या वयावर किंवा शारिरीक बळावर अवलंबून नव्हती हेच त्यांनी सिद्ध केलं.

दुसरा अनुभव मोठा मजेशीर आहे. बाबांना लवकर मुंबई गाठायची होती. म्हणून ते आमच्याहून एक दिवस आधी ट्रेनने निघाले. त्यांना मडगांव स्टेशनला सोडायची जबाबदारी माझ्यावर होती. मला प्रमोदभाईंनी तीन तीनदा बजावून सांगितलं की स्टेशनवर पोचल्यावर बाबांसाठी व्हीलचेअरची सोय कर. त्यांना चालायला लावू नको. मी मान डोलावली. रस्त्यावर ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही अगदी शेवटच्या क्षणी मडगांव स्टेशनला पोचलो. ट्रेन सुटायला अगदी १-२ मिनिटं बाकी होती. व्हीलचेअरची सोय करायचा वेळच नव्हता. मी बाबांना विचारलं, "बाबा, डबा कुठचा आहे." "एच-१", बाबा म्हणाले. आम्ही स्टेशनच्या एका टोकाला होतो. बाबांचा डबा दुसर्‍या टोकाला होता. मला कळेना आता काय करायचं...इतक्यात माझ्या सुटकेसाठी बाबांचीच पुण्याई आली. तिथला एक हमाल मोठ्या सामानासाठी असते तसली एक हातगाडी घेऊन चालला होता...तो बाबांकडे बघून आश्चर्याने मला म्हणाला, "अहो, हे प्रभाकर पणशीकर आहेत ना?" मी म्हणालो "हो. जरा थांब." मला त्या वेळी आणि काही सुचेच ना! मी बाबांना म्हणालो, "बाबा, या हातगाडीवर बसा." आणि बाबा मिश्किलपणे हसत चक्क त्या हातगाडीवर ठिय्या घालून बसले देखील. मी आणि तो हमाल ती हातगाडी प्लॅटफोर्मवरून सुसाट ढकलत पळालो. धापा टाकत आम्ही बाबांच्या डब्याकडे पोचलो, आणि बाबांना डब्यात चढवलं. क्षणात गाडी हलली. मी बाबांना हात हलवून टाटा केला.

संध्याकाळी मी, राजू, आणि प्रमोदभाई "वाईल्ड वेस्ट" ला बसून बाबांना मिस करत होतो. त्यांच्या गप्पा, त्यांचे किस्से...सर्व आठवत बसलो होतो. इतक्यात बाबांचा मुंबईला पोचल्याचा फोन आला. ते प्रमोदभाईंना म्हणाले - "अख्ख्या प्रवासातली फक्त एकच गोष्ट लक्षात राहणार....मला हातगाडीवर बसवून मडगाव स्टेशनवर ती सुसाट पळवणारा माधव!"

आता पण मी, राजू आणि प्रमोदभाई पुढे खूपवेळा व्हिस्की प्यायला बसूच! पण बाबांचा आता फोन येणार नाही! कधीच नाही!

पण बाबांसारखे कलाकार हे रसिकांच्या मनात सदैव जिवंत राहतात हेच खरं! माणूस जातो....कलावंत कधीच मरत नाही...मग ते १९६८ असो, किंवा २००८...किंवा २१०८! प्रभाकर पणशीकर अमर राहतील!

- माधव आजगांवकर.

Baba.jpg
फोटोत (डावीकडून) - संकल्प संस्थेचे लक्ष्मीकांतजी, प्रभाकर पणशीकर, मी, प्रमोद पवार.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी लेखक नाही. त्यामुळे माझ्या लिखाणात खूप गडबड असणार. हा लेख लिहायची खटपट फक्त या आठवणी शेअर करण्यासाठी केली आहे. धन्यवाद.