मासिक भविष्य जुलै २०१४

Submitted by पशुपति on 30 June, 2014 - 14:04

राशिभविष्य
जुलै २०१४
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्ये चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्ये वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. जरी दोन्ही राशींची भविष्ये एक दुसऱ्याच्या विरुद्ध वाटली तरी दोन्हीचा सारासार अर्थ लक्षात घ्यावा. )

मेष : या महिन्यात केतू तुमच्या राशीला व मंगळ षष्ठात आहे. त्यामुळे प्रकृती नरम गरम राहील असे वाटते.त्याबरोबर गुरु चतुर्थात उच्चीचा असल्यामुळे आर्थिक स्थिती मात्र उत्तम राहील. द्वितीयातील शुक्र व षष्ठातील चंद्र आर्थिकदृष्ट्या उत्पन्नात भरच घालतील. पहिल्या पंधरवड्यात रवि बुध तृतियात, राहू सप्तमात घरामध्ये कौटुंबिक अस्वास्थ्य निर्माण करतील असे दिसत आहे. राहू काही दिवसांनी कन्येत सरकेल, पण शनि सप्तमातच राहणार असल्याने ऑफिस अगर घरी नरमाईचे धोरण लाभदायक ठरेल. चतुर्थातील गुरु लाभेश शनि आणि द्वाद्शेश गुरु काही लोकांना नवीन घराचा लाभ करून देईल. पंचमेश रवि पंधरा तारखेनंतर कर्केत व शनि सप्तमात होतकरू मुलामुलींचे लग्न जमवण्यास मदत करील. नवमेश गुरु चतुर्थात शनि सप्तमात काही लोकांना प्रवास घडवतील. दशमेश शनि सप्तमात, गुरु चतुर्थात धंदा करणाऱ्यांना थोडेफार त्रासदायक ठरतील असे वाटते. व्यवहार जपूनच करावे.

वृषभ: या महिन्याच्या सुरुवातीला शुक्र तुमच्याच राशीला व चंद्र, सिंह आणि बुध मिथुनेत आहे.सिंह राशीचा रवि सुद्धा द्वितीय स्थानात आहे. त्यामुळे अनेकांना नवीन घरात तरी राहायला मिळेल किंवा त्यातून आर्थिक लाभ तरी मिळेल. तृतीयातील गुरु व षष्ठातील राहू विरोधकांवर मात करण्याची स्थिती उपलब्ध करून देतील. तसेच, गुरु लाभेश असल्याने अनेक लेखकांना देखील चांगला वाव मिळेल व त्यांचे लेख पुढील अंकांसाठी स्वीकारले जातील. गुरु अष्टमेश असल्याने काही प्रमाणात मानसिक चिंता देखील उत्पन्न करेल. पंचमेश बुध द्वितीय स्थानात, मंगळ पंचमात असल्याने मुलाबाळांना अॅडमिशनसंबंधी चांगल्या संधी प्राप्त होतील. तसेच, ज्यांचा शेअरचा बिझिनेस असेल त्यांना देखील बराच लाभ होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. नोकरी अगर व्यवसायातील वातावरण चांगले राहील. ह्याशिवाय कामासंबंधी प्रवासाचे योग देखील दिसत आहेत.

मिथुन : मिथुन राशीचा स्वामी बुध मिथुन राशीतच आहे. मंगळ चतुर्थात आहे. हा योग विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम आहे. तसेच, नोकरीत असणाऱ्या लोकांचे देखील घरातील वातावरण आनंदी राहील. रवि पण मिथुन राशीतच असल्याने ह्या महिन्यात मनोरंजन आणि करमणूक ह्या वर विशेष भर राहील. प्रकृती संबंधी काळजी करण्याचे काही कारण नाही. द्वितीय स्थानात गुरु उच्चीचा असल्याने आर्थिक आवक उत्तम राहील. पंचम स्थानातील शनि, राहू काही बाबतीत काळजीचे वातावरण उत्पन्न करतील. तरी शेअर किंवा तत्सम गोष्टींपासून दूर राहणे उत्तम! तसेच नोकरीच्या ठिकाणी काही प्रमाणात तणावपूर्ण स्थिती संभवू शकते. एकंदरीत ह्या महिन्यात आवक कमी आणि खर्च जास्त असे दिसतेय.

कर्क : नुकताच गुरु महाराजांनी आपल्या राशीत प्रवेश केलेला आहे. कर्क रास ही गुरूची उच्च रास आहे. लग्नी गुरु असल्याने शरीर प्रकृती उत्तम राहील असे दिसते. शिवाय तुमची धार्मिक वृत्ती पण थोडी वाढेल. तूळ राशीचा राहू चतुर्थात व तुळेचा स्वामी शुक्र लाभात असल्याने घरासंबंधी काही आनंदाची बातमी मिळेल. तसेच जे विद्यार्थी असतील त्यांना देखील अॅडमिशनसंबंधी कोणताही त्रास न होता हव्या त्या ठिकाणी अॅडमिशन मिळेल. ज्यांना परदेशी शिक्षण घेण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी अर्ज केले असतील, त्यांना सुद्धा सुवार्ता मिळेल. तृतीय स्थान देखील ह्या गोष्टीला दुजोरा देत आहे. ज्या लोकांच्या प्रकृतीचा कल वजन वाढीकडे आहे अश्या लोकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. सप्तमेश शनि शुक्रच्या राशीत व गुरूच्या नक्षत्रात असल्याने घरातील वातावरण आनंदी राहील. नोकरी अगर व्यवसाय उत्तम राहील आणि बरेच लाभ देखील होतील. नोकरी करणाऱ्यांना कदाचित प्रमोशनच्या दृष्टीने चांगल्या संधी उपलब्ध होतील.

सिंह : ह्या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात चंद्र तुमच्याच राशीला असून रवि लाभातून लाभ योग करीत आहे. त्यामुळे अनेक लोकांना काहीतरी लाभ होण्याची शक्यता आहे. काहींना नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची संधी आहे. ज्यांचा फिरतीचा व्यवसाय आहे, अश्या व्यावसायिकांना (मेडीकल रिप्रेझेंटेटिवज्, कमिशन एजंट, ट्रॅव्हल एजंट इ.) देखील उत्तम संधी उपलब्ध होतील. ज्यांना ह्या काळात गुरूची महादशा आहे अश्यांना दीर्घकाळ परदेशी वास्तव्य आणि त्यातून अर्थार्जन असा दुहेरी लाभ होण्याची संधी आहे. चतुर्थ भावाचा स्वामी मंगळ कन्येत द्वितीय स्थानी आहे व तो राहूच्या उपनक्षत्रात आहे. त्यामुळे अनेक लोकांना नवीन घरात जाण्याचे चान्सेस आहेत. तसेच ह्यामुळे परदेश गमनाच्या योगाला देखील पुष्टी मिळत आहे. पंचमेश गुरु द्वादश स्थानात असल्यामुळे मुलाबाळांच्या शिक्षणात थोडा अडथळा येईल असे दिसते. कौटुंबिक बाबतीत किरकोळ वादाचे प्रसंग सोडता वातावरण चांगले राहील.

कन्या : कन्या राशीला वर्षभर गुरु लाभस्थानी आहे त्यामुळे पारंपारिक पद्धतीप्रमाणे कोणत्याही कार्याला गुरुबळ चांगले मिळेल. शिवाय गुरु महादशा असणाऱ्यांना ज्यांना अध्यात्माची आवड आहे अश्यांना ध्यानधारणेमुळे मन:शांतीद्वारे लाभ मिळेल. अनेक वेळा धार्मिक स्थानांना भेटी देण्याचे ही बरेच वेळा योग येतील. द्वितिय स्थानी राहू आणि शनि हे दोन ग्रह आणि शुक्र नवम स्थानी आहेत, त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी थोड्या काळात जास्त लाभ देणाऱ्या गुंतवणूक संस्थांपासून लाब राहावे, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. कमिशन एजंट, लेखक, प्रोफेसर्स ह्या मंडळींना हा काळ आर्थिकदृष्ट्या बराच चांगला आहे. घराबाबत आनंदाची बातमी मिळेल, कदाचित नवीन घर घेण्याची देखील शक्यता आहे. पंचमेश शनि द्वितीयात आहे आणि शनि गुरूच्या नक्षत्रात आणि गुरु लाभात असल्याने मुलाबाळांच्या बाबत काळजीचे कारण राहणार नाही.

तूळ : तूळ राशीला शनि लग्नी व गुरु दशमात हा योग सर्वसाधारणपणे तुमच्या सामाजिक स्थान व व्यवसाय ह्या दोन्ही दृष्टीने उत्तम आहे. शरीर प्रकृती उत्तम राहील. द्वितीय स्थानाचा स्वामी मंगळ बाराव्या स्थानी आहे व तो स्वत:च्या नक्षत्रात असून राहूच्या उपनक्षत्रात आहे. शुक्र अष्टमात आहे. त्यामुळे आर्थिक बाबतीत चिंता करावी लागेल असे दिसते. ह्याचा अर्थ तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक चिंता ह्या दोन्ही पातळींवर कसरत करावी लागणार आहे. तृतीय स्थानाचा स्वामी गुरु दशमात आहे. हा योग देखील तुमची प्रतिष्ठा वाढवण्यास चांगला आहे. ह्या गोष्टीवरून असे दिसते कि एकंदरीत तुम्हाला प्रयत्न खूप मात्र त्यातून निष्पन्न होणारे फारच कमी असे दिसते. मुलाबाळांच्या प्रगतीकडे तुमचे बारीक लक्ष राहील. तसेच प्रगती देखील समाधानकारक राहील. कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने थोडे नरमाईचे धोरण ठेवल्यास इष्ट ठरेल, अन्यथा छोटीशी ठिणगी देखील भडका उडण्यास पुरेशी होण्याचे योग आहेत. नवमातील रवि-बुध धार्मिक स्थळी भेट देण्यास उपयुक्त आहेत. बाकी हा महिना संमिश्र स्वरूपाचा जाईल असे दिसते.

वृश्चिक : वृश्चिकेचा राशीस्वामी मंगळ लाभात असून राहू द्वादश स्थानी आहे व शुक्र सप्तमात आहे. त्यामुळे ह्या महिन्यात आर्थिक व्यवहार जपून करणे आवश्यक आहे. शरीर प्रकृतीच्या दृष्टीने महिना बरा आहे. द्वितीय स्थानाचा स्वामी गुरु नवम भावात असल्याने आर्थिकदृष्ट्या आवक मनासारखी होणार नाही. चतुर्थाचा स्वामी शनि द्वादश स्थानात व गुरु नवम स्थानात लांबच्या प्रवासाचे योग आणेल असे दिसते. रवि-शनि नवपंचम योग ८ व १२ ह्या स्थानातून होत असल्याने वाहने देखील जपून चालवणे आवश्यक आहे. नवपंचम योग असल्याने प्रतिकूल परिणामांची तीव्रता कमी होते. नोकरी निमित्त देखील बाहेर गावी प्रवास घडण्याची शक्यता आहे. सप्तमातील शुक्र एकुणात कौटुंबिक वातावरण व्यवस्थित ठेवेल. पंचमेश गुरु नवमात असल्याने अध्यात्मिक बाबतीत पोषक परिस्थिती राहील. दशमेश रवि अष्टमात आणि राहू द्वादाशात ह्यामुळे नोकरीच्या ठिकाणी मानसिक ताण जास्त राहील. एकंदरीत महिना संमिश्र राहील.

धनु : तुमच्या राशीचा स्वामी गुरु अष्टमात असून राहू लाभ स्थानी आहे व शुक्र षष्ठ स्थानी आहे, त्यामुळे शरीर प्रकृती उत्तम राहील असे दिसते. द्वितीय स्थानाचा स्वामी शनि लाभात आणि गुरु अष्टमात हा योग आर्थिक दृष्ट्या चांगला आहे, त्यामुळे कुठूनतरी अचानक आर्थिक लाभ संभवतात. षष्ठेश षष्ठातच असून चंद्राच्या नक्षत्रात आहे, त्यामुळे नोकरी करणाऱ्यांना चंद्राच्या स्थितीनुसार कधी शांतता तर कधी कामाचा तणाव अशी परिस्थिती सतत राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. कारण सप्तमेश सप्तमातच आहे व रवि देखील सप्तमात असून राहूच्या नक्षत्रात आहे व रवि लाभेश देखील आहे. फक्त राहू तुळेत असून शुक्र षष्ठात आहे, त्यामुळे काही वेळेला मनाविरुद्ध घटनांना सामोरे जावे लागेल. नवमेश रवि सप्तमात व राहू लाभात ह्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्यांना देखील हा महिना उत्तम आहे. दशमात मंगळ, लाभात राहू आणि दशमेश बुध सप्तमात हि परिस्थिती नोकरीच्या ठिकाणी उत्तम संधी दाखवत आहे. एकंदरीत हा महिना उत्तम आहे.

मकर : मकर राशीचा स्वामी शनि दशमात असून गुरु सप्तमात आहे, त्यामुळे स्वत:चा व्यवसाय असणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. पण शनि वक्री असल्याने कदाचित त्याचे परिणाम ताबडतोब दिसणार नाहीत. द्वितीय भावाचा स्वामी देखील शनिच असून ह्या गोष्टीला दुजोरा देत आहे. थोडक्यात पत्रिकेत पोटेन्शियल असून परिणाम मात्र उशिरा दिसणार असे दिसते. विद्यार्थ्यांना मात्र हा काळ चांगला दिसतोय, अॅडमिशन हव्या त्या कॉलेजमध्ये मनाप्रमाणे मिळतील. तसेच, उच्च शिक्षणासाठी देखील वेळ उत्तम आहे. काही लोकांना नव्या गाडीचा लाभ होईल असे संभवते. छोटे-मोठे प्रवास घडण्याचे योग येतील. कौटुंबिक बाबतीत किरकोळ कुरबुरी होण्याची शक्यता आहे (किती गुरगुरायचे ते ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार ठरवावे!!) ज्यांचा व्यवसाय भागीदारीत आहे, अश्यांचे व्यवसाय उत्तम चालतील. एकंदरीत हा महिना उत्तम जाईल असे दिसते.

कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि नवमात आणि गुरु षष्ठात. त्यामुळे हा योग शरीर प्रकृतीच्या दृष्टीने काळजी घेण्याचे निर्देशित करतो. द्वितीय स्थानाचा स्वामी गुरु षष्ठात असल्याने बँकेकडून लोन मिळण्याचे कामे व्यवस्थित पार पडतील. चतुर्थात शुक्र उच्चीचा असल्याने कौटुंबिक वातावरण चांगले राहण्याचे योग आहेत. पंचमेश बुध पंचमातच आहे आणि रवि पण तिथेच आहे, त्यामुळे हा योग मुलांच्या दृष्टीने चांगला आहे. १,५,९ ह्या स्थानांचा परस्परांशी संबंध असल्यामुळे अध्यात्मासाठी उत्तम योग आहे. अष्टमात मंगळ असल्याने वाहने जपून चालवणे इष्ट ठरेल. तसेच, ज्यांना उष्णतेचे त्रास आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे, तरी पण वरिष्ठांकडून कामाची दखल देखील घेतली जाईल. एकंदरीत महिना संमिश्र जाईल असे दिसते.

मीन : मीन राशीचा स्वामी गुरु पंचमात उच्चीचा आहे. गुरूची पंचम दृष्टी नवम स्थानावर आणि नवम दृष्टी प्रथम स्थानावर आहे. त्यामुळे जुलै महिन्यात गुरु तुमच्याकडून धार्मिक कार्य निश्चितपणे घडवून आणणार. शरीर प्रकृतीच्या दृष्टीने काळजीपूर्वक राहणे आवश्यक आहे. तसेच वाहन देखील जपून चालवावे. गुरु पंचमात असल्याने तीव्रता एवढी जाणवणार नाही, असे दिसते. सप्तमातील मंगळ तुमच्या जोडीदाराला थोडाफार प्रवास करायला लावणार असे दिसते. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा ताण वाढेल. लाभाचा शनि गुरूच्या नक्षत्रात आणि स्वत: शनि अष्टमात आहे, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा काळ तितकासा अनुकूल नाही. एकुणात हा महिना धार्मिकदृष्ट्या उत्तम आणि आर्थिकदृष्ट्या संमिश्र राहील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम !

राशी भविष्य ही कल्पना मला फारशी रुचत नाही, तरीही प्रत्येक लग्न व चंद्र्र राशी नुसार असलेली गोचर ग्रहाची स्थिती पाहून, ग्रह व भाव यांच्या कारकत्वाचा चांगला मेळ घातलेला दिसत आहे. त्याबद्द्ल मी लेखकाचे अभिनंदन करतो.

वाचतोय .
महिन्याचे राशिभविष्य हा कौटुंबिक गप्पांत करमणूकीचा विषय असतो .बरोबर आले नाही म्हणून कोणी चिडत नाही .कुंभ रासवाले पेपरात दोन गोष्टी आवर्जून(गुपचूप) पाहतात :सोन्याचा भाव आणि भविष्य .

धन्यवाद पशुपति जी..तुंम्ही स्वप्नांचे अर्थ सागु शकता का?<<<

स्वप्नांचे अर्थ येथील काँग्रेस समर्थक सांगू शकतील तुम्हाला!

धन्यवाद पशुपति जी..तुंम्ही स्वप्नांचे अर्थ सागु शकता का?<<<

स्वप्नांचे अर्थ येथील काँग्रेस समर्थक सांगू शकतील तुम्हाला!
>>>
अय्य्या बेफिकीर आज मी स्वप्नात तर नाही..तुम्ही चक्क परत मला रिप्लाय दिला...

मिथुन : मिथुन राशीचा स्वामी बुध मिथुन राशीतच आहे. मंगळ चतुर्थात आहे. हा योग विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम आहे. तसेच, नोकरीत असणाऱ्या लोकांचे देखील घरातील वातावरण आनंदी राहील. रवि पण मिथुन राशीतच असल्याने ह्या महिन्यात मनोरंजन आणि करमणूक ह्या वर विशेष भर राहील. प्रकृती संबंधी काळजी करण्याचे काही कारण नाही. द्वितीय स्थानात गुरु उच्चीचा असल्याने आर्थिक आवक उत्तम राहील. पंचम स्थानातील शनि, राहू काही बाबतीत काळजीचे वातावरण उत्पन्न करतील. तरी शेअर किंवा तत्सम गोष्टींपासून दूर राहणे उत्तम! तसेच नोकरीच्या ठिकाणी काही प्रमाणात तणावपूर्ण स्थिती संभवू शकते. एकंदरीत ह्या महिन्यात आवक कमी आणि खर्च जास्त असे दिसतेय.

कसली परस्पर विरोधी वाक्य आहेत ही...