विषय क्रमांक २ - भुजंग आप्पा

Submitted by किश्या on 30 June, 2014 - 13:56

"मालक घ्या तुरीच्या शेंगा आणल्याती तुमच्यासाठी तुम्हास्नी खुप आवडत्यात नं"

आजही हे वाक्य गावकडे गेलं आणि कापुस वेचनीचा दिवस असला की हमखास आठवतं,आणि आठवतो तो रानात काम करुन काळपट झालेला चेहरा , डोक्यावर लाल पटका, हातात एक छोटीशी कुर्‍हाड, अंगात मातीत राबुन राबुन काळपट झालेली बंडी, बंडीच्या खिशात कोंबडा छाप बिडी आणि एक माचीस , त्याच रंगाच धुरकट झालेल धोतर, आणि पायत गावातल्याच चांभाराने शिवलेला गाडीच्या टायर पासुन बनवलेला एक जोडा. भुजंग आप्पा.

भुजंग आप्पा हे नाव माझ्या कधी कानावर पडलं कळालच नाही. आणि कधी त्यांना पहिल्यांदा पाहिलं हे ही आठवत नाही. कारण भुंजग आप्पा हे पहिल्या पासुनच आमच्या घरी कामाला येत असतं. मी जन्माला यायच्या आधीपासुन. गावाकडे घरी शेतावर काम करण्यासाठी खुप माणसे असायची आजही आहेत पण भुजंग आप्पा हे त्यातले खुप वयस्कर होते.

भुजंग आप्पा दररोज माझ्यासाठी तुरीच्या शेंगा घेऊन येत असत. भुंजग आप्पा आणि त्यांची बायको पद्मिनी बाई शेतातल्या कामांना आम्हाला मदद करायचे म्हणजे कापुस वेचायला, खुरपणी करायला, पेरणी करायला. मला माझ्या आत्या आज्जीकडुन कळाले होते की भुजंग आप्पा माझ्या अजोबांचे मित्र होते, खुप जवळचे मित्र असुनही त्यांनी त्यांची पायरी कधीच सोडली नाही. परीस्थीतीत असलेल्या फरकामु़ळे की त्या काळात सामाजीक वातावरणच तस होत म्हणुन , का कुणास ठाऊक?? पण ते कधीच आमचं घर सोडुन दुसरीकडे कामाला गेले नाहीत. तस पाहील तर भुजंग आप्पा आणि बाबा (आजोबा) एकाच शाळेत होते. बाबा शिक्षण सोडुन राजकारणात आले आणि परीस्थीतीमुळे आप्पालाही शिक्षण सोडाव लागलं. आप्पाला खरतर इंजीनीयर व्हायच होतं पण त्यांची हालाकीची परीस्थीती आडवी आली पण त्यांनी ह्या गोष्टीच कधीही वाईट वाटुन घेतल नाही कारण ज्या वेळेस बाबांनी जागा विकत घेऊन बांधायला काढली त्यावेळेस ते बांधकाम फक्त मीच करावं अशी इच्छा त्यांनी आजोबांना बोलुन दाखवली आणि बाबांना नाही म्हणता आलं नाही. खरतर त्या काळात "तारस" नावाचा बांधकाम प्रकार फेमस होता आणि माझ्या बाबांना तसच घर बांधायच होत आणि आप्पाला ह्यातल काहीच माहिती नव्हतं म्हणुन आप्पा कुठेतरी जाऊन माहिती घेऊन आले आणि येताना दगडी चाक घेऊन आले. घराच काम त्यांच्या देखरेखी खाली सुरु झालं. तस काम काही सोपं नव्हतं चुण्याचे खडे घेऊन ते त्या दगडी चाकाने दळुन मग त्याचा गाला करुन घर त्यांनी मोठ्या उत्साहात बांधल. आजही ते दिमाखात उभ आहे.. आणि त्यापुढे त्यांनी सगळेच गायवाडे बांधुन काढले. असे होते आमचे इंजीनीयर साहेब.

आप्पांनी बांधलेले तारसः

tarasa.jpg

आप्पा पोळ्याच्या दिवशी सगळ्या शेतातल्या गड्यांसोबत दरवर्षी जेवायला घरी असतं. पोळ्याच्या आदल्या रात्री बैलांना आमत्रंण देण्यापासुन ते बैलं पोळा मिरवुन येईपर्यंत ते घरीच असतं.
एका वर्षी पोळ्याच्या दिवशी आप्पाच्या काय मनात आलं काय माहितं. पण

"मालक, औंदा तुमी नगा बैलाला औतान देऊ किशोर मालक देतील आता मोठे झाले हायेत... काय मालक येता का औंतान द्यायला??"

हे वाक्य ऐकुण मला खर तरं भीतीच वाटली होती होती पण आप्पा सोबत आहेत म्हणुन मीही जरा उत्साहाने गेलो होतो. आणि त्या वर्षी आप्पानी मला पहिल्यांदा शिकवले होते की औतान कसे द्यायचे.

"टाका बैल्याच्या पायावर पाणी.. लावा कुकु त्याच्या डोस्क्यावर.... हे घ्या लोणी आणि मळा खांदे चांगले बैलाचे... सालभर काम करतेत ते म्हणुन्श्यानी आपल्याला खाया मिळतया... "

"आता बोला कानात त्यांच्या 'आज औतान उद्या जेवाया...'"

हे सगळ चालु असताना गाय वाड्यात गलगा उठला..
"आप्पा वाड्यात लै मोठा परड निघाला हाय लवकर चला" बबन धावत पळत येऊन त्यांना सांगत होता. आप्पा त्याच तत्परते तिकडे निघाले. मला तिकडे यायला त्यांनी मनाई केली होती. तिकडे काय झालं कळाल नाही पण अर्ध्या तासाने कळाले की आप्पाने परड मारले होते. दुसर्‍या दिवशी सगळा गाव लोटला होता ते परड पहायला.. ७ फुट लांब असावा आणि ५० किलोच्या आसपास. तो त्यांनी एकट्याने मारला होत हे नवलच होतं.

बाबांचा त्यांच्या इतका विश्वास कुणावरही नव्हता, आम्ही जर सगळे जर गावी गेलो तर बाबा त्यांनाच घरी घर राखायला बोलवायचे आणि ते पण रात्री जेवण करुन घरी झोपायला कंटाळा न करता यायचे. बहुतेक १९९५ कि १९९६ च साल होतं आठवत नाही पण काही कारणास्तव मला बाबांसोबत गावाला जाता आलं नव्हतं म्हणुन मी घरीच होतो. आणि त्या साली कुठलातरी एक धुमकेतु पृथीजवळुन गेला होता त्यामुळे पहाटे पहाटे उल्कावर्षाव दिसनार होता. घरी कोणीच नव्हतं म्हणुन मी आप्पाला सांगितल की आपण सकाळी लवकर उठुन तो पाहुयात. थंडीचे दिवस होते, आप्पांनी पहाटे ३ लाच उठवले. आणि आम्ही नदीच्या काठी गेलो , घाई घाई मधे मी अंगावर पांघरुन घ्यायच विसरलो. खुप थंडी वाजत होती. आणि फक्त माझ्यामुळे त्या पहाटेच्या अंधारात तुरांट्याच्या ढिगातुन तुरांट्या काढुन त्यांनी फक्त माझ्यासाठी शेकोटी पेटवली होती. आणि त्याच उबे मधे आम्ही त्या उल्कावर्षावाचा आंनद घेतला. बहुतेक त्यांनी देखील तो पहिल्यांदाच पाहिला होता. ती ऊब आणी तो क्षण आजही मनाच्या खुप खुप जवळ आहे. का कुणास ठाऊक पण माझा ते खुप खुप लाड करायचे बहुतेक त्यांना त्यांचा मुलाकडुन कधी सुख मि़ळालच नव्हतं.

खरं तर त्यांना दोन मुल होती. एक मुलगा आणी एक मुलगी. त्यांचा मुलगा पुंडलीक कधीच शाळेत गेला नाही. पहिल्या पासुनच तो टवाळक्या करणे, पत्ते खेळणं असचं चालु होत.जसा जसा मोठा झाला तसा आप्पाला कामामधे हातभार लावण्या ऐवजी दारुच्या नशेत जास्त राहत होता. दारुला पैसे कमी पडायचे म्हणुन त्याने कारखान्यावर ऊसतोडीकामगार म्हणुन जायला सुरुवात केली. तिकडेही त्याने दारुच्या नशेत मुकादमाला मारहाण करुन काम न करता पळुन आला. ज्यावेळेस मुकादम पैसे परत घ्याला आला त्यावेळेस आप्पाचेही धाबे दणाणले होते.

"मालक काय बी करा पण २० हजार रुपये द्या पोरानं पार वाट लावली हो.. मी कुठुन देऊ येवडे पैसे??"

आप्पांचा तो केवीलवाना चेहरा खर तर बघवतच नव्हता. त्यांना आजपर्यंत मी अस कधीच पाहिलं नव्हतं. आणि येवढी आर्जव त्यांनी बाबां पुढे कधीच केली नव्हती. काहीही अडचण असली तरी ते बाबांना हक्काने मागत असत पण मुलाने दारुच्या व्यसनामुळे अस केल्यामुळे त्यांचाही नाईलाज होता. बाबांनी त्यांना सर्वतोपरी मदत करुन पुंडलीकला समजावुन सांगितल पण त्याचा काहीच परिणाम त्याच्यावर झाला नव्हता.. गावात काहीच काम धंदा करत नव्हता म्हणुन बाबांनी शेवटी घराच्या शेतीवर कामास घेतले, पण तो कामावर सुध्दा दारुच पिऊन यायचा. फक्त आणि फक्त आप्पा मुळेच त्याला ठेऊन घेतले. आप्पाला वाटलं की कमीत कमी लग्न झाल्यावर तरी सुधारेल पण तो ही फासा त्यांच्या विरुध्धच पडला. लग्न झाल्यावर काहीच वर्षा मधे त्याने आप्पाला आणि त्यांच्या बायकोला घराबाहेर काढुन दिले.त्या नंतर ते आपल्या मुलीच्या घरी राहत असतं. भरीस भर म्हणुन की काय त्याच्यां बायकोला काचबिंदु झाला तो कधीही दुरुस्त न होण्यासाठी....

जस जस त्यांच वय वाढत गेलं तस तस त्यांचा कामाची ताकद कमी होत गेली. जावायच्या जिवावर राहायच आणि मुलीच्या हातच खायच. त्यांच्या बायकोला तर काहीच दिसत नव्हतं त्यांच पण सगळ्या आप्पालाच करावं लागायचं.

पण त्यांच घरी येण जाण कधीच कमी झाल नाही आणि काम करण्याची इच्छाही. बाबांनीही त्यांना मेहनतीची कामे न देता फक्त देखरेखीची कामे दिली. तेवढीच काही तरी त्यांना मदत म्हणुन. मग कधी तरी ते ज्वारीच्या खळ्यावर येत असतं. पोती उचलने किंवा टोपले उचलने त्यांना जमत नव्हतं म्हणुन ते मळणी यंत्राच्या खाली ज्वारीत पडलेला कचरा साफ करत असतं, तयार झालेली ज्वारीचे भरलेले पोते शिवत असतं. तसेच ज्वारी साठवण्यासाठी घरी असलेले पेव ते साफ करत असतं. नंतर नंतर पोळ्याच्या दिवशी सुद्धा त्यांना काही काम होत नसत म्हणुन ते बसल्या बसल्या बैलांसाठी सुत कातत असतं.

पुढे काय झालं काय माहीत, पण पुंडलीक आणि त्याची बायको कुठे तरी गाव सोडुन गेले. आणि दर सहा महिन्याला जावाई आणि त्यांची मुलगी पण कारखान्यावर जात असतं म्हणुन गावात हेच दोघ राहायला लागली.
पद्मिनी आज्जी त्यांना आधीच काहीच दिसतं नव्हतं आणि हळु हळु आप्पाची पण नजर कमजोर झाली. त्यांना आता कुठे जास्त चालता पण नव्हत येतं. पण वय वाढलं आणि काम होत नाही म्हणुन पोटाची भुक थोडीच जाते. काही तरी काम करायच म्हणुन त्यांनी गावात कुत्र चावल्यावर औषध घ्यायला येणार्‍या लोकांसाठी लागणारे साहित्य विकण्याचा व्यवसाय सुरु केला, जसे कि एक मातीच मडक, विड्याची पाने, उद.. त्यातुनच थोडेसे पैसे मिळत असतं. आणि त्यातही त्यांनी कधी परिस्थीतीने गरीब असलेल्या माणसांकडुन कधीच पैसे घेतले नाहीत जेवढ देईल तेवढेच घेतले. दर रविवारी ते घरी चक्कर मारायचे आणि १०० पाने आवर्जुन घरी द्यायचे. बाबा पैसे द्यायचे तर ते घ्यायचे पण नाहीत मग बळचं पद्मिनी आज्जी जवळ नेऊन द्यावे लागायचे.

साधारण ८ ते १० वर्षा पुर्वी माझे बाबा वारले. आप्पा संध्याकाळपासुन ते त्यांच्या अंत्यविधीपर्यंत बसुन होते. कोणाशीच काहीच बोलले नाहीत. चिता रचताना कुठुन तरी एक चंदनाच्या लाकडाचा तुकडा त्यांनी चितेत रचला होता. बहुतेक त्यांच्या मित्राने दिलेल्या आयुष्यातल्या मदतीची परतफेड म्हणुन असेल कदाचीत. गावाकडे जोपर्यंत कवटी फुटण्याचा आवाज येत नाही तो पर्यंत चितेजवळ कोणी ना कोणी तरी रहायला पाहीजे अशी प्रथा आहे. माझ्या वडीलांसोबत आप्पा फक्त मागे राहिले होते. आणि मग बाबा गेल्यापासुन त्यांच घरी येणही हळुहळु कमी झालं.

नंतर मी गाव शिक्षणासाठी सोडलं मग जी काही त्यांची सकाळी बसस्टँडवर भेट व्हायची ती पण बंद झाली. ४ वर्षापुर्वी पुण्यात आल्यावर एके दिवशी वडिलांनी फोन वर सांगितलं कि भुंजग आप्पा गेले म्हणुन... काळजाचा ठोकाच चुकला.. जितक मी त्यांच आयुष्य पाहिलं तितक सगळं आयुष्य डोळ्यासमोरुन तरळुन गेलं....

आज कधीही गावाकडे गेलं आणि त्या त्यांच्या जागेकडे पाहिलं की त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, पोळ्याच्या दिवशी अजुनही कधीतरी वाटतं की आप्पा येतील आणि म्हणतील..

"काय मालक येता का औंतान द्यायला??"...............

***************************************************************************************************************
संदर्भः
१) तारस :- चुणा आणि विटांपासुन तयार केलेली रुम
२) औतान :- आमंत्रण.
३) पेव :- ज्वारी साठवण्यासाठी केलेला विहिरीसारखा प्रकार किंवा खोल खड्डा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख.

एक टायपो झाला़य का?
>>साधारण ८ ते १० वर्षा पुर्वी माझे बाबा वारले.
आणि नंतर

>>४ वर्षापुर्वी पुण्यात आल्यावर एके दिवशी वडिलांनी फोन वर सांगितलं कि भुंजग आप्पा गेले

वडिल आणि बाबा दोन वेगळ्या व्यक्ति आहेत ???

मस्त लिहिलंय, आमच्या नातेवाईकांच्या गावचा असाच एक भाग्यादा आठवला.

वेका - लेखातली 'बाबा' म्हणजे आजोबा, त्यांचे संबोधायचे नाव आहे ते.

किश्या, मस्त लिहिलस! व्यक्ती अगदी समोर उभी राहिली.
वडिल आणि बाबा दोन वेगळ्या व्यक्ति आहेत ???>>>>>>>>.किश्या, फ़क्त "तस पाहील तर भुजंग आप्पा आणि बाबा एकाच शाळेत होते. " इथे ’बाबा” च्या पुढे कंसात आजोबा लिही.

छान लिहीलय किश्या. मला ते घर पण खूप आवडले, तसेही मला गावाकडची दमदार घरेच जास्त आवडतात.

ही जूनी माणसे मनाने खूप चान्गली असतात, आणी निरपेक्ष वृत्तीने दुसर्‍याला मदत करतात. पण भुजन्ग अप्पान्बद्दल वाचुन वाईट वाटले. मुलान्चा आधार मिळालाच नाही म्हणजे दोघाना.:अरेरे:

छान व्यक्ती निवडलीत तुम्ही लिहिण्यासाठी. मनात घर करून राहिलेलीच माणसं मनापासून रेखाटली जातात. इथंही तेच झालंय.
आवडलं व्यक्तिचित्र.

सगळ्यांचा मनापासुन खुप खुप आभारी आहे..

मला ते घर पण खूप आवडले, तसेही मला गावाकडची दमदार घरेच जास्त आवडतात. >>
रश्मी खरचं मला पण असलीच घरे आवडतात....
ते फोटोतलं घर आप्पांनी चुना वापरुनच बांधल आहे.. आणि वापरलेल्या विटा तर फक्त आपल्या रिन साबना यवढ्याच आहेत... कधी कधी खरच नवल वाटतं त्यांच...

छान आवड्ल व्यक्तीचित्र.........

खुप छान्..माझ्यासमोर पण अशी खुप मानस आली..जी मी सुट्टीला गावी गेले की माझी काळजी घेत...
व्यक्तीचित्रन एक नंबर्...डोळ्यासमोर ऊभे राहतात भुजंगआप्पा.

किश्या, लै भारी गड्या !
माझ्या मामच्या गावाला अशा प्रकारचे एक आप्पा होते त्यांची याद आली.
आता अशी माणसे दुर्मिळ होत चालली आहेत.