स्विट्झर्लंडचे अनुभव.. २

Posted
20 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

पहिल्यांदा आम्ही कांही आमच्या आधी स्थायीक झालेल्या भारतीय कुटुंबांना भेटलो तेव्हा जाणवलं की त्यांची मुलं मातृभाषा बोलतच नाहीत. त्यांना मातृभाषा व्यवस्थित समजत असे कारण आईच्या मातृभाषेतील प्रश्नाला स्वीस जर्मनमधे उत्तर दिलं जाई. हें आम्हा दोघांनाही खटकलं. आम्ही तेव्हाच ठरवलं की घरी काहीही झालं तरी स्विस जर्मन येता कामा नये. अशी वेळ आली होती की माझी मुलं एकमेकांच्यांत स्वीस जर्मन बोलू लागले होते, त्याला मी व माझ्या नवर्‍याने विरोध केला. जर आमच्याशीही त्या भाषेत बोलू लागले तर उत्तरच देत नसूं. काही भारतीय घरांमधे मुलांना उत्तेजन दिलं जात असे कारण पालकांना मुलांकडून स्वीस जर्मन अनायासे शिकता येत होतं. दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या भारतीय नातेवाईकांशी संपर्क! मुलांचे आजी - आजोबा, काका, मामा, चुलत - मावसभावंडे ह्या सर्वांशी खूप जवळीकीचे संबंध आहेत ते मराठी येत असल्यामुळेच! त्यांनाही माझी मुलं फिरंगी वाटत नाहींत व मुलांनाही भारतात परकं वाटत नाही. मराठी येत असल्यामुळे माझ्या मोठ्या मुलाने मुंबईच्या मराठी मुलीशी लग्न केलं आहे. माझ्या सुनेलाही आमच्या घरातलं वातावरण परकं वाटलंच नाही. फक्त मराठी लिहायला वाचायला शिकवलं नाही तेव्हा माझ्या मुलांना साहित्यिक मराठी समजायला जड जाते. मराठी बातम्या डोक्यावरून जातात...

इथे दुसरी एक गोष्ट सांगाविशी वाटते की लहान मुलांना दोन ते तीन भाषा एकाचवेळी शिकण्यांत काहीच आडचण येत नाही. स्वीसमधे स्थायिक झालेले अनेक परदेशी आपली भाषा जिवंत ठेवतात. इटलियन, स्पॅनिश, फ्रेंच आपली भाषा सोडत नाहीत. त्या सर्वांची मुलं दोन्ही भाषा व्यवस्थित बोलतात. सुमारे ऐशी वर्षांपुर्वी स्वीस लोकांनी मोठ्या प्रमाणांत दक्षिण अमेरिकेला देशांतर केलं होतं. तुम्हाला खोटं वाटेल, पण तेव्हा हा देश गरीब होता, पोटापाण्यासाठी स्वीस मोठ्या प्रमाणांत दक्षिण अमेरिकेत जात असत. आता त्यांची मुलं म्हणजे तिसरी पिढी परत येत आहे. ते अस्खलीत स्वीस जर्मन बोलतात व जर्मन भाषेत लिहितात. याचं कारण तिथे स्वीस व जर्मन नागरिकांनी जर्मन भाषा शिकवण्यासाठी शाळा उघडल्या. त्यांचे तिथल्या स्थानिक स्पॅनिश किंवा पोर्तुगीज भाषांवर पण प्रभुत्व असते.

विषय: 
प्रकार: