मासिक राशी भविष्य जून २०१४

Submitted by पशुपति on 31 May, 2014 - 13:22

राशिभविष्य
जून २०१४
(के.पी.पद्धतीप्रमाणे)
(टीप : सर्व भविष्ये चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्ये वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. जरी दोन्ही राशींची भविष्ये एक दुसऱ्याच्या विरुद्ध वाटली तरी दोन्हीचा सारासार अर्थ लक्षात घ्यावा. )

मेष : मेष राशीत ह्या महिन्यात शुक्र व केतू हे दोन ग्रह विराजमान आहेत. त्यामुळे तुमचा सामाजिक दर्जा उंचावण्याचे व थोडीफार प्रसिद्धी मिळण्याचे योग आहेत. शिवाय शनि-राहू सप्तमात असल्याने विवाहेच्छू व्यक्तींचे विवाह ठरण्याचे योग आहेत. शुक्र ऐहिक सुखांचा कारक आहे व केतू विरक्तीचा कारक आहे आणि हे दोन ही ग्रह एकाच राशीत असल्याने मानसिक द्वंद्व होण्याची शक्यता आहे. ज्या जातकांची मेष रास लग्नस्थानी आहे, अश्यांना ह्या योगाचा प्रबळ अनुभव येईल. द्वितीय स्थानातील रवि घरासंबंधी आर्थिक लाभ मिळवून देईल, ज्यांची प्रॉपर्टी लीजवर द्यायची आहे, त्यांनी जोरात प्रयत्न करावेत. मिथुनेतील गुरु-बुध लिखाणाला ऊत आणतील असे दिसते...लेखकांनी त्यांची एनर्जी जपून वापरावी म्हणजे बराच काळ टिकेल. ह्या महिन्यातले काही दिवस जातकाच्या आईशी सुख संवाद होतील असे दिसते....(बायकांनो, थोडे दिवस सांभाळून घ्या नवऱ्याला!) मुला-बाळांच्या बाबतीत चिंतेचे काहीच कारण नाही. षष्ठातील मंगळामुळे मात्र किरकोळ आजारांना तोंड द्यावे लागेल. अष्टमेश मंगळ षष्ठात असल्यामुळे ज्यांचा पार्टनरशिप व्यवसाय आहे, त्यांना भरभराटीचा काळ आहे. नवमेश गुरु जून महिन्यात बरेच धार्मिक प्रवास घडवून आणेल अशी चिन्हे आहेत. कारण, नवमेश गुरु तृतीयात आणि केतू लग्नी आहे. एकंदरीत हा महिना उत्तम जाईल.

वृषभ : वृषभ राशीला महिन्याच्या सुरुवातीला रवि वृषभ राशीत, बुध मिथुन राशीत आणि चंद्र कर्क राशीत ह्या ग्रहस्थितीमुळे नोकरी मिळवण्यास इच्छुकांना जूनच्या पहिल्या आठवड्यात यश मिळेल. जूनच्या दुसर्याळ आठवड्यात ज्या तरुण-तरुणींचे एकमेकांवर प्रेम आहे, ते वैवाहिक बंधनात अडकण्याची शक्यता आहे. आर्थिक प्राप्तीच्या बाबतीत पैशाची गुंतवणूक जपून करावी, कारण पैसे अडकून राहण्याची शक्यता दिसते. तसे बघता आर्थिक आवक बऱ्याच मार्गांनी होणार आहेच, मात्र गुंतवणूक सावधपणे करावी. मुला बाळांच्या दृष्टीने हा महिना समाधान कारक आहे. शनि व राहू हे दोन्ही ग्रह षष्ठात, गुरु द्वितीयात मारक स्थानी व शुक्र बाराव्या स्थानी ह्या सर्व ग्रहस्थितीमुळे प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. गृह सौख्याच्या दृष्टीने हा महिना चांगला राहील. दशमेश शनि षष्ठात आणि गुरु द्वितीयात व लाभेश आहे त्यामुळे आर्थिक प्राप्ती आणि नोकरी ह्या दृष्टीने महिना चांगला राहील, फक्त शनि वक्री असल्याने कदाचित थोडा उणेपणा राहण्याची शक्यता आहे, पूर्ण लाभ मिळणार नाही. एकंदरीत महिना चांगला जाईल.

मिथुन : मिथुन राशीत ह्या महिन्याच्या सुरुवातीला बुध आणि गुरु हे दोन ग्रह आहेत. गुरु सप्तमेश व दशमेश आहे, शुक्र लाभात आहे. त्यामुळे मिथुन व्यक्तींना हा महिना बऱ्याच माध्यमांतून चांगला जाईल. गृह सौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. नोकरी-व्यवसायासंबंधी तुमच्याच प्रयत्नाने बरेच लाभ मिळतील. लग्नातील बुध व पंचमातील राहू ह्यांमुळे मुला-बाळांच्या दृष्टीने खूपच चांगला महिना आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर बराच वेळ घालवणार! थोडक्यात एकीकडे लाभ व दुसरीकडे मनोरंजन हे दोन्ही हातात हात घालून चालणार आहे!! द्वितीय स्थानातील चंद्र व पंचमातील शनि-राहू, जूनच्या पहिल्या आठवड्यात पैशाला कात्री लावतील (....कात्री लपवून ठेवा!!) काहींना पर्यटन स्थळांच्या भेटीसाठी दूरच्या प्रवासाचे देखील योग आहेत. चतुर्थातील मंगळ घरातील खर्च वाढवेल असे दिसते. पंचमातील शनि-राहू कदाचित काही लोकांना शेअरच्या बाबतीत लाभदायक ठरतील. नवीन शेअर खरेदी करण्यापेक्षा हातातील शेअर चांगली किंमत आल्यास विकून घ्यावेत, नक्की फायदा होईल. शरीर प्रकृतीच्या बाबत किरकोळ तक्रारी वगळता विशेष काळजीचे कारण नाही. (बंजी जम्पिंग करायला हरकत नाही!!) एकंदरीत हा महिना उत्तम आहे....

कर्क : कर्क राशीच्या लोकांना महिन्याच्या सुरुवातीला चंद्र कर्क राशीत आणि शनि चतुर्थात हे घरगुती बाबतीत सुख-संवाद घडवून आणतील. जूनच्या पहिल्या आठवड्यात रवि लाभ स्थानी व चंद्र द्वितीय स्थानी आकस्मिक धनलाभाचे योग दाखवत आहेत. तृतीय स्थानातील मंगळ जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर पराक्रमाला वाव देईल. म्हणजेच तुमची राहिलेली कामे ह्या आठवड्यात पूर्ण होतील. चतुर्थ स्थानातील शनि-राहू आणि मिथुनेतील गुरु घराच्या बाबत कुरबुरी किंवा वादावादी घडवून आणतील असे दिसते. मिथुनेतील गुरु आणि मेषेतील शुक्र काही लोकांना त्यांच्या नोकरी संबंधी काही लाभ घडवून आणतील असे दिसते. काहींना प्रमोशन देखील मिळण्याची बरीच शक्यता आहे. मीन रास व मिथुनेतील गुरु धार्मिक स्थानी पर्यटन घडवून आणतील. वाहन चालवताना काळजी घेणे जरुरी आहे.

सिंह : सिंह राशीचा राशी स्वामी रवि वृषभ राशीत असून बुध मिथुन राशीत आहे. त्यामुळे व्यवसायामार्फत बराच लाभ होण्याची शक्यता दिसते. प्रकृती देखील कोणताही त्रास न होता व्यवस्थित राहील. तुळेतील शनि-राहू आणि मेषेचा शुक्र प्रवासाचे योग नक्की आणतील असे दिसते. द्वितीयातील मंगळ काही वेळेला प्रक्षोभक होऊ शकतो, तरी बोलण्यावर आणि शब्दांच्या निवडीवर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. मुला-बाळांच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे, अँडिमशन हव्या त्या ठिकाणी मिळेल असे दिसते. शेअरच्या बाबतीत मात्र जपून राहणे इष्ट. ज्यांना शेअर संबंधी उलाढाली करण्याची आवड आहे, त्यांनी गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी. ज्यांना व्यवसायात धर्मकार्याद्वारे अर्थार्जन आहे, त्यांच्या बाबतीत हा महिना उत्तम आहे, भरपूर लाभ होतील. गृह सौख्याच्या बाबतीत देखील हा महिना उत्तम आहे. रिटायर्ड व्यक्तींचे फंड, बोनस वगैरे कामकाज मार्गी लागेल. एकंदरीत हा महिना उत्तम आहे.

कन्या : मंगळ कन्या राशीतच असून राशी स्वामी बुध दशम भावात आहे. त्यामुळे तुमच्या तडफदार वृत्तीला चांगलाच वाव मिळणार असे दिसते. तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात काही लोकांना अकल्पित लाभ होण्याची शक्यता आहे. गुरु-शनि नवपंचम योग द्वितीय आणि दशम स्थानातून होत आहे. त्यामुळे व्यवसायात भरपूर प्राप्तीची शक्यता आहे. शनि वक्री असल्यामुळे काहींच्या बाबतीत हा परिणाम तितकासा होणार नाही. तूळ राशीतील राहूमुळे काहींना घशाचा त्रास होण्याची शक्यता आहे. तृतीयेश मंगळ लग्नी, शनि द्वितीय् स्थानी आणि लग्नेश बुध दशम स्थानी त्यामुळे लेखन, शिक्षण, प्रकाशन हे व्यवसाय भरभराटीस येतील. जे विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देत आहेत, अश्यांना कँपस इंटरव्ह्यूमध्ये निवड होऊन जॉब लगेच मिळेल. षष्ठ स्थानाचा स्वामी शनि द्वितीय ह्या मारक स्थानी असल्यामुळे काहींचे जुने आजार बळावण्याची शक्यता आहे. गृह सौख्याच्या बाबतीत मात्र हा महिना उत्तम आहे. एकंदरीत महिना चांगला जाईल.

तूळ : प्रथम स्थानी शनि-राहू, बाराव्या भावात मंगळ आणि गुरु-बुध नवम भावात हे नक्की लांबच्या प्रवासाचे योग दाखवत आहेत. त्यामुळे अनेकांना लांबच्या प्रवासाची संधी प्राप्त होणार आहे. तूळ राशीचा शुक्र सप्तमात आणि केतू पण सप्तमात त्यामुळे गृहसौख्यात थोडासा वाद-विवादाचा प्रसंग येऊ शकेल. खरे तर थोडा खट्टा-मिठा अनुभव येईल! (उन्हाळा जरी असला तरी बाजारातून काला-खट्टा घ्यायची जरुरी नाही.) जे तूळ राशीचे लोक विद्यार्थी दशेत आहेत, त्यांना पोस्ट-ग्रॅजुएशनसाठी अॅडमिशन मिळण्याचे बरेच योग आहेत. शाळेत जाणाऱ्या मुलांबाबत चिंता करण्याचे कारण नाही, ऑल इज वेल !! नोकरी-व्यवसायात तुमचे स्टेटस चांगले राहील आणि कामानिमित्त परदेशी जाण्याची संधी देखील प्राप्त होईल. लाभ स्थानाचा स्वामी रवि अष्टमात असल्याने आणि बुध नवमात असल्याने आर्थिक व्यवहार जपून करावेत, गडबड होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ लाभात आहेत आणि शनि द्वादश भावात आहे. त्यामुळे तुमची आवक गुंतवणूक करण्यात जाईल असे दिसते. फक्त ही गुंतवणूक सुरक्षित स्थानी करावी. द्वितीय स्थानाचा स्वामी गुरु अष्टमात आणि शुक्र षष्ठात हा योग असा आहे की ज्यांचे छोटे-मोठे बिझनेस पार्टनरशिप मध्ये आहेत त्यांना लाभदायक आहे, जे लोक जॉब करतात त्यांना काही अंशी बोनस किंवा वेगळ्या रूपाने लाभ होण्याची शक्यता आहे. तृतीय भावाचा स्वामी शनि बाराव्या स्थानी व गुरु अष्टम स्थानी हा योग तितकासा चांगला नाही, त्यामुळे प्रवासात अडथळे, छोटा मोठा अपघात किंवा तुमच्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाण्याची शक्यता आहे. तरी पुरेशी काळजी घ्यावी. तसेच आपले मत प्रदर्शित करण्यापूर्वी मनाशी संवाद साधण्याची काळजी जरूर घ्यावी. मुलांच्या बाबतीत फारशी काळजी करण्याचे कारण नाही. नोकरी-व्यवसायाबाबत फारसा बदल दिसत नाही. गृह सौख्याच्या बाबत थोडीफार कुरबुर अनुभवाला येईल. नवम भावातील चंद्र जूनच्या पहिल्या आठवड्यात अचानक प्रवासाचे योग आणेल. एकंदरीत महिना संमिश्र स्वरूपाचा जाईल असे दिसते.

धनु : धनु राशीचा स्वामी गुरु सप्तमात असून शनि लाभात आहे. त्यामुळे गृह सौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. शरीर प्रकृती सुद्धा उत्तम राहील. द्वितीयेश शनि लाभात म्हणजे लाभ आणि केतू पंचमात म्हणजे खर्च......कुटुंबासाठी बराच खर्च करावा लागेल. मुला-बाळांच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे, काळजी नसावी! (लोभ असावा ही विनंती!!) दशमातील मंगळ नोकरी-व्यवसायात उत्तम फळे मिळवून देईल. तुमचा दर्जा उंचावेल व वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. दशमातील मंगळामुळे तुमच्यात कणखरपणा वाढेल! ज्यांच्याकडे शेअर आहेत अश्या लोकांना शेअर विकून चांगला फायदा होईल. तरी शेअर मार्फत आर्थिक प्राप्तीची ही संधी गमावू नका!!! प्रवासाचे मोठे योग दिसत नाहीत.

मकर : मकर राशीचा स्वामी शनि दशम स्थानी, गुरु षष्ठ स्थानी आणि बुध देखील षष्ठ स्थानी त्यामुळे ज्यांचा सेवा हा व्यवसाय आहे, त्यांना बरीच कामे मिळून आर्थिक लाभ होईल. शरीर प्रकृती बाबत विशेष काळजी घ्यावी, दगदगीमुळे थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. चतुर्थात शुक्र व केतू हे दोन ग्रह आणि मेष रास आहे. मेषेचा स्वामी मंगळ नवम स्थानी आहे. त्यामुळे शैक्षणिक दृष्ट्याद हा योग अतिशय उत्तम आहे. उच्च शिक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्यांसाठी निकाल अनुकूल लागतील. पंचमात रवि, चतुर्थात केतू त्यामुळे शेअर्स किंवा तत्सम गोष्टींपासून लांबच राहणे उचित!! षष्ठ स्थानी गुरु, बुध दोन ग्रह असल्याने प्रकृतीसंबंधी काळजी घ्यावी. विशेषत: ज्यांना डायबेटीस आणि तत्सम आजार असतील अश्यांनी जास्त काळजी घेणे योग्य! मात्र षष्ठातील बुध आणि दशम स्थानातील राहू काहीतरी आर्थिक लाभ मिळवून देतील. गृह सौख्याच्या बाबत हा महिना थोडाफार नरम-गरम राहील असे दिसते. पण चंद्राचे राश्यांतर झाल्यामुळे काही काळ उत्तम सौख्याचा राहील. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा राहील.

कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि नवम स्थानी आणि गुरु पंचम स्थानी कुंभ सारख्या विचारी राशीला अध्यात्माच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. त्यामुळे ह्या महिन्यातला बहुतांश वेळ सत्संग किंवा प्रवचने ह्यामध्ये घालवाल. द्वितीय स्थानाचा स्वामी गुरु हा सुद्धा पंचमातच आहे, त्यामुळे अर्थप्राप्तीकडे असणारा ओढा कमी होईल अशी शक्यता आहे. तृतीय हे पराक्रम स्थान सुद्धा ह्यावेळी बलवान आहे, त्यामुळे पराक्रमाला चांगलाच वाव आहे. जे प्राध्यापक आहेत त्यांची लेक्चर्स चांगली होतील. प्रवचनकार आणि कीर्तनकार ह्यांची प्रवचने चांगली रंगातील. ज्यांचे इंटरव्ह्यू अपेक्षित आहेत, त्यांना इंटरव्ह्यूसाठी कॉल येतील व इंटरव्ह्यू देखील उत्तम पार पडतील. अपेक्षित पत्र हाती पडतील. चतुर्थातला रवि व पंचमातला बुध घरगुती बाबतीत सुख-संवाद दाखवत आहे. मुला-बाळांच्या शिक्षणाची फारशी काळजी नसावी, ऑल इज वेल!!! किरकोळ गोष्टी वगळता प्रकृती उत्तम राहील. अष्टमातील मंगळ काही बाबतीत मानसिक ताप देईल असे दिसते. नोकरी-व्यवसायात कामाचा ताण बराच राहील, त्यामुळे मनाची अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सुद्धा हा महिना सर्वसाधारण राहील.

मीन : मीन राशीचे स्वामी गुरु महाराज, चतुर्थात बसलेले आहेत. त्याच्या जोडीला बुध पण आहे व शुक्र द्वितीयात आहे. त्यामुळे तुम्हाला घरासंबंधी काहीतरी चांगली बातमी ऐकायला मिळेल. द्वितीय स्थानात शुक्र आहे, केतू पण द्वितीय स्थानीच आहे व मंगळ सप्तमात आहे. त्यामुळे ज्यांचे व्यवसाय भागीदारीत आहेत त्यांना लाभ होण्याची शक्यता आहे. किंवा जोडीदाराकडून सुद्धा काही आर्थिक प्राप्तीची शक्यता आहे. तृतीय स्थानातील रवि चंद्राच्या भ्रमणानुसार छोटे-मोठे प्रवास देण्याची शक्यता आहे. शेअर अगर तत्सम व्यावसायिकांनी व्यवहार जपून करावेत, नुकसान होण्याचा धोका आहे! षष्ठेश रवि तृतीयात असल्याने आजारासंबंधी फारशी चिंता करण्याचे कारण नाही, प्रकृती धडधाकट राहील. मंगळ सप्तमात असल्याने घरात किरकोळ कुरबुरी होतील, पण सर्वसाधारणपणे गृहसौख्य उत्तम राहील. अष्टमातील शनि-राहू वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी असा इशारा देत आहेत. नोकरी-व्यवसाय उत्तम राहतील, थोड्याफार प्रमाणात लाभ होण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा राहील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !ग्रहस्थितीसह भविष्य असल्यामुळे अभ्यासाच्या दृष्टिने उपयुक्त आहे .एक तारखेची वाट पाहतो आणि सर्व राशीँचे वाचतो .सिंह राशीवाल्यांना (आम्ही पक्के ,चंद्र डोक्यावर)पाण्याचा तिटकारा असला तरी जून महीना बरा वाटतो ,रवि दशमात येतो ना .कामे उरकतात .घरातल्यांचे भविष्य वाचून या महिन्यात किती माफक गुरगुरायचं तेही ठरवता येतं .

घरातल्यांचे भविष्य वाचून या महिन्यात किती माफक गुरगुरायचं तेही ठरवता येतं .>> हो Happy
माहीतीबद्दल धन्यवाद पशुपतिजी