एकटी

Submitted by संतोष वाटपाडे on 25 May, 2014 - 02:03

नदीकाठी अशी तू एकटी जाऊ नको राणी
तुला पाहून येताना नदीचे थांबले पाणी।

खुल्या केसामधे वारा नको गुंतायला आता
रवीला पर्वतापल्याड गे लोटायचे कोणी।

फ़ुलावी तांबडी ओली फ़ुले आता नभी सार्‍या
रवी गेल्यावरी आभाळ सांडावे पुन्हा रानी।

पहा लाजून लालेलाल झाले गाल पाण्याचे
निळ्या पाण्यात गोरे पाय तू टाकू नको दोन्ही।

बटा गालावरी आल्या अशा मागे नको सारु
उडू पाहे तुझी ही ओढणी सांभाळ हातांनी।

सखे वाटेत झाडांनी फ़ुलांच्या मेखला केल्या
जरा हातात घे वेडे अशा वेळी तुझी वेणी

थवे रानात पक्षांचे पुन्हा आलेत माघारी
पिलांची बोबडी बोली सुरु झाली जशी गाणी॥

तुझ्या पायातली ती पैंजणे वाजू नको देवू
दमाने टाक तू पाऊल जाताना घरी राणी ।

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थवे रानात पक्षांचे पुन्हा आलेत माघारी
पिलांची बोबडी बोली सुरु झाली जशी गाणी॥

<<<छान!

जरा हातात घे वेडे अशा वेळी तुझी वेणी<<< ओळ आवडली.

(अवांतर - गझल म्हणून रचायची झाली तर अनेक तांत्रिक सुटी घेतलेल्या दिसतात. ) Happy