तुमचं नाव मतदार यादीतून गायब करणाऱ्यांची झोप कशी उडवाल?

Submitted by Atul Patankar on 2 May, 2014 - 05:06

२०१४च्या निवडणुकीचे एक महत्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे वगळलेली नावे. एकट्या महाराष्ट्रातच म्हणे ७४ लाख नावं वगळली असल्याचे निवडणूक आयोगानेच प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे कुऱ्हाड पडली ती आमच्याच जातीवर, किंवा आमच्याच पक्षाच्या मतदारांवर, अशा चर्चा, गावगप्पाना उत् आला आहे. महाराष्ट्रापुरतं मतदान संपल आहे, आणि फेर मतदान किंवा ओळखपत्र असूनही मतदान करु न शकलेल्यांसाठी ‘पुरवणी’ मतदान वगैरे पर्याय सुचवले जाताहेत. काही जणांनी तर. मतदार याद्यांची गरजच नाही, एक ठराविक नागरिकत्वाचा पुरावा दाखवणाऱ्या सगळ्यांनाच मतदान करु दिलं पाहिजे, असाही विचार मांडला.

या सगळ्या क्रांतिकारक कल्पना ज्यांना सुचतात, मांडव्याश्या वाटतात, ते त्यांचा पाठपुरावा करतीलच. पण सामान्य नागरिक काय करु शकतो? ज्याला खरच मतदान करायची इच्छा आहे, तो या व्यवस्थेकडून कसं काय काम करून घेवू शकतो? हा मतदार आता जागरूक होतो आहे, हे वेगवेगळया सामाजिक आंदोलनांना मिळालेल्या अभूपूर्व प्रतिसादातून दिसत आहेच. पण लोकशाहीतला सगळ्यात महत्वाचा हक्क जर त्याला बजावता आलाच नाही, तर ती या लोकशाहीची चेष्टाच होईल.

त्यामुळे, आजच्या कायद्याच्या चौकटीत बघायचं, तर खालील गोष्टी स्पष्ट आहेत:
(१) आत्ताच्या निवडणुकीसाठी जी अधिकृत यादी आहे, तिच्यात नाव असेल तरच मतदान करता येईल
(२) आधीच्या निवडणुकीच्या यादीत असलेल्या नावाचा उपयोग नाही
(३) या याद्या बऱ्याच आधी पक्क्या होतात. त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर भांडून काही उपयोग नाही. उदाहरणार्थ या लोकसभा निवडणुकीची यादी ३१ जानेवारीला प्रसिद्ध झाली.
(४) त्यामुळे निवडणुकीच्या ३-४ महिने आधीच आपले नाव तपासून, ते गाळले गेले असेल तर काही धडपड करता येईल. जसा उशीर होईल, तशी आपली धडपड, त्रागा निष्फळ बनत जाईल.

पण मग आता काय करायचं? हातावर हात धरून बसून राहायचं? सरकारी यंत्रणेची बेफिकिरी, मुजोरी, आळस किंवा चक्क सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी, हे सहन करायचं? की ‘इधर्को ये ऐसैच चल्ताय’ म्हणून पुन्हा राग गिळून आपल्या रोजच्या आयुष्याला सुरवात करायची? या मस्तवाल यंत्रणेला ताळ्यावर कसं आणायचं?

सरकारी माणूस जर सगळ्यात कुठल्या गोष्टीला घाबरत असेल, तर ‘तुम्ही काय काम केलं ते प्रत्यक्ष दाखवा’ या प्रकाराला. त्यामुळे त्यांनी आपलं नाव का वगळल, कसं वगळलं, काय प्रक्रिया केली, वगैरे प्रश्नाना त्याच्याकडे उत्तरं नसतात. आणि माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत प्रश्न विचारले, की उत्तरं तर द्यावीच लागतात. ती पण ३० दिवसात. नाहीतर अधिकाऱ्याला रोज २५० रुपये दंड होवू शकतो. आणि अशा एखाद्या अर्जाची पत्रास ही यंत्रणा बाळगत नाही. पण हजारो अर्ज आले तर? वन वगळलेल्या ७४ लाख लोकांनी अर्ज केले तर? १२०० अर्धशिक्षित भूमिहीन आदिवासींनी अर्ज करून जव्हार तालुक्यात काय केलं ते एकदा वाचा, हव तर प्रत्यक्ष जावून पहा. आणि मग ठरवा – आपण ‘बिचारे’ ‘एकटे’ आहोत, की आपण या लोकशाहीचे मालक आहोत ते.

अर्जाचा नमुना सोबत जोडला आहेच. आपल्यासाठी योग्य तेवढे बदल करून घ्या, आठवणीनी १० रुपयाचे कोर्ट फी स्टँप लावा, सही करा, आणि नेवून द्या आपल्या जिल्ह्यातील/ तालुक्यातील निवडणूक शाखेकडे. अर्जाची पोच नक्की घ्या – आणि निवांत झोपा. कारण आता तुमचं नाव वगळणार्या सगळ्यांची झोप उडालेली असेल.

प्रती,
जन माहिती अधिकारी,
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय
____________________________
____________________________.

विषय: माहितीचा अधिकार कायदा २००५च्या कलम ६ प्रमाणे माहितीसाठी अर्ज

महोदय/ महोदया,

मी, _________________________________________________, भारताचा नागरिक या नात्याने आपणाकडे माहिती अधिकार कायद्या अंतर्गत माहितीसाठी अर्ज करतो आहे. माझी माहिती खालीलप्रमाणे:
संपूर्ण नाव
संपूर्ण पत्ता

दूरध्वनी (सकाळी १० ते संध्याकाळी ६)
मागील निवडणुकीतील तपशील
मतदान केंद्र
भाग क्रमांक
यादी क्रमांक
मतदार क्रमांक
मतदान केले होते का?

आवश्यक माहितीचा तपशील
1. मतदार यादीतून मतदारांची नावे वगळण्यासाठी जन प्रतिनिधित्व कायद्याने विहित केलेली प्रक्रिया, तसेच आपल्या कार्यालयाकडे या संबंधी उपलब्ध शासन निर्णय, शासन आदेश, परिपत्रके, मार्गदर्शक तत्वे, वगैरे कागदपत्रे व माहितीच्या प्रमाणित सत्यप्रती.
2. माझे नाव आपण मतदार यादीतून वगळले आहे का?
3. माझे नाव वगळण्यासाठी आपल्याला माझ्याकडून अर्ज मिळाला होता का? असल्यास त्याची प्रमाणित सत्यप्रत
4. माझे नाव मतदार यादीत ठेवण्यास कोणी हरकत घेतली होती का? असल्यास हरकत पत्राची प्रमाणित सत्यप्रत
5. मी दिलेला पत्ता योग्य आहे की नाही, हे तपासण्यासाठी आपले प्रतिनिधी माझ्या पत्त्यावर आले होते का? आले असल्यास त्या भेटीचा दिनांक व त्यांनी त्यासंबंधी दिलेल्या अहवालाची प्रमाणित सत्यप्रत.
6. माझ्या पत्त्यावर मी सापडत नसल्यास त्या संबंधी पंचनामा केला असेल तर अशा पंचनाम्याची प्रमाणित सत्यप्रत.
7. माझे नाव वगळण्याची प्रक्रिया चालू करताना मला सुनावणीची नोटीस दिली असल्यास त्याची प्रमाणित सत्यप्रत तसेच त्याचा जावक क्रमांक, जावक दिनांक, सही करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव, प्राधिकृत अधिकाऱ्या ऐवजी अन्य अधिकाऱ्यांनी/ कर्मचाऱ्यांनी सही केली असल्यास त्यांचे नाव, पदनाम, कार्यालयीन पत्ता.
8. सुनावणी झाली असल्यास त्याचे इतिवृत्त, उपस्थित तसेच सहभागी लोकांची नावे, सर्व संबंधितांनी लेखी किंवा तोंडी म्हणणे मांडले असल्यास त्याची प्रमाणित सत्यप्रत. सुनावणी झाल्यावर संबंधित आदेश मला पाठवले असल्यास त्या पत्राची प्रमाणित सत्यप्रत तसेच त्याचा जावक क्रमांक, जावक दिनांक, सही करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव, प्राधिकृत अधिकाऱ्या ऐवजी अन्य अधिकाऱ्यांनी/ कर्मचाऱ्यांनी सही केली असल्यास त्यांचे नाव, पदनाम, कार्यालयीन पत्ता
9. माहिती अधिकार कायद्याच्या कलम ४ (१)(ग) व ४ (१)(घ) अनुसार माझे नाव वगळण्याच्या आपल्या निर्णयाची पार्श्वभूमी व कारणे आपण प्रसिद्ध केली असतील तर त्याची प्रमाणित सत्यप्रत.
10. मतदार याद्या दुरुस्त करणे, त्यातील बदल करणे, त्यासाठी नावे टाइप करणे वगैरे काम एखाद्या खाजगी संस्थेला/ कंत्राटदाराला दिले असल्यास त्यांच्याशी झालेल्या कराराची प्रमाणित सत्यप्रत
11. अशा खाजगी संस्थेच्या कामावर लक्ष ठेवणे, त्यांनी काम पूर्ण केले आहे/ बरोबर केले आहे अशी खात्री करून घेणे व त्यांचे बिल पास करणे वगैरे कामासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची नावे, पदनाम व कार्यालयीन पत्ते.

अर्जदार गरिबी रेषेखालील व्यक्ती आहे का हो/ नाही
माहिती कशी हवी आहे? प्रत्यक्ष/ पोस्टाने

(सही)
अर्जदार

मूळ प्रसिद्धी : http://wp.me/pHoXT-8A

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं!
यातून काहितरी उपयुक्तं घडावे ही सदिच्छा!
बाकी माझं नाव यावेळी दोन ठिकाणी होतं! Wink
एका ठिकाणचं रद्दं करण्याची प्रोसिजर करूनही.

बेस्ट बघा..................... नक्कीच सगळ्यांनी करायला हवे

ज्यांची नावं वगळली गेलीत त्यांनी खरंच याचा पाठपुरावा करावा.

आणि ज्या तर्‍हेनं फेसबुक इ. ई-माध्यमांवर या विषयावर अपडेट्स मिळतायत (ज्यांची नावे वगळली त्यांनी केलेलं उपोषण इ.) त्यावरून लोक खरेच पुरेशी जागरूकता दाखवताहेत, पाठपुरावा करत आहेत, असं दिसतं.

मी या पानाची लिंक फेसबुकवर शेअर करतो.

लेखाबद्दल धन्यवाद.

ज्यांची नावं वगळली गेलीत त्यांनी खरंच याचा पाठपुरावा करावा.>> +१

मी पण या पानाचा दुवा माझ्या फेसबुक्च्या पानावर देतो आहे.

धन्यवाद अतुल पाटणकर

या याद्या बऱ्याच आधी पक्क्या होतात. त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर भांडून काही उपयोग नाही. उदाहरणार्थ या लोकसभा निवडणुकीची यादी ३१ जानेवारीला प्रसिद्ध झाली.>>
पण मग मार्च महिन्यात रजिस्टर केलेल्या लोकांची नावे आहेत त्यात. आणि अगदी शेवटच्या पानावर आहेत (त्या त्या केंद्राच्या). बहुतेक पुरवणी टाइप असेल. पण याचा अर्थ या याद्या बऱ्याच आधी पक्क्या होतात असा नाही.

मला वाटतं याच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर नावे वगळली गेली आहेत. हे हेतूतः झाले असेलच असे म्हणत नाही पण हलगर्जी मात्र नक्कीच झालीय. दाद मागायलाच हवी.

एक प्रश्नः माहिती अधिकार कायदा वापरात नागरिकाला माहिती हस्तगत करण्यासाठी कसले शुल्क भरावे लागते का?

उदयन.. ओ.के. धन्यवाद.

विकीपेडियावर असलेल्या खालील मजकुरात असलेली 'फी' कसली असते?
Since the information is to be paid for, the reply of the PIO is necessarily limited to either denying the request (in whole or part) and/or providing a computation of "further fees". The time between the reply of the PIO and the time taken to deposit the further fees for information is excluded from the time allowed. If information is not provided within this period, it is treated as deemed refusal. Refusal with or without reasons may be ground for appeal or complaint. Further, information not provided in the times prescribed is to be provided free of charge. Appeal processes are also defined.

माहितीच्या अधिकारा चा अर्ज करताना त्याला फी म्हणून १० रु चा कोर्ट फी स्टॅम्प लावावा लागतो. नन्तर माहितीची जेवढी पाने होतात त्याचा खर्च सरकारी दराने भरावा लागतो. उदा; ५० पाने असतील तर समजा १ रु. प्रति पान दरसेल तर अधिकचे ५० रु भरावे लागतात त्याला फरदर फीज म्हणतात. काही महाभागानी दोन दोन ट्रक भरतील एवढी कागदपत्रे माहितीच्या अधिकाराखाली मागितली आहेत अशा वेळी झेरॉक्स काढ्ल्या आणि तो आलाच नाही तर वाया जाऊ नये म्हणून आधी पैस भरायला सांगतात.

माहिती मध्ये पदार्थांच्या नमुन्याचाही समावेश होतो . उदा. एखाध्या सरकारी कामावर चालू असलेल्या सिमेन्ट बाबत काही तक्रार करायची आहे तर ती सिद्ध करण्यासाठी त्याचा अधिकृत नमुना माहितीच्या अधिकारात मागता येतो मग हजारो लोकांनी नुसता नमुना मागितला तर सर्व सिमेन्ट नमुन्यावारीच संपायचे म्हणून त्या सिमेन्टची किम्मत ठरवून माहितीवाल्याकडून वसूल केली जाते. औषधे, खरेदी केलेल्या वस्तू , रेशनमधील धान्य असे नमुने माहिती अधिकारात मागता येतात . या किमतीचा समावेश ' further fees च्या व्याख्येत येतो

बाकी झोप उडवण्याचा बी बी विनोदाचा अप्रतिम नमुना आहे.

गजानन,
माहितीच्या अधिकारात एखादा अर्ज करा, अन तुमची झोप उडाली नाही तर मला सांगा.
ती उडाल्यावर आपण बीबीच्या विनोदी असण्यावर साधक बाधक चर्चा करू Happy

(१) माहिती अधिकाराच्या अर्जाची फी १० रुपये. ही अनेक मार्गांनी भरता येते. रोख, पोस्टल ऑर्डर, किंवा डिमांड ड्राफ्ट. ज्या कार्यालयाला अर्ज करतो आहोत ते राज्य सरकारच्या अखत्यारीत असेल, तर १० रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प चालतो. केंद्र सरकारला चालत नाही.
(२) जादा माहिती करिता प्रत्येक अ४ आकाराच्या कागदाला २ रुपये. अन्य स्वरुपाची माहिती असेल तर (उदा. ब्लू प्रिंट, पदार्थांचे नमुने, वगैरे) तर प्रत्यक्ष किंमत. एका पानाला १ रुपया एवढा कमी दर कुठेही नाही.
(३) गरिबी रेषेखालील व्यक्तींना ही दोन्ही शुल्के माफ.

माहिती अधिकार कायद्याखालील शुल्काचे नियम प्रत्येक राज्यात, प्रत्येक विधिमंडळात आणि प्रत्येक उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत वेगवेगळे असतात.

रॉबिनहूड, मी आत्तापर्यंत अंदाजे १०० अर्ज केले आहेत. आणि अंदाजे १,५०० लोकांना अर्ज करायला मदत केली आहे. पण माझी झोप अजून तरी उडाली नाही. आमच्या अर्जांमुळे जव्हारमध्ये सरकारी अधिकाऱ्यांची झोप कशी उडाली, ते इथे टिचकी मारून प्रत्यक्ष वाचा. त्या प्रकरणात माहिती उशिरा दिल्याबद्दल अधिकाऱ्यांनी १० अर्जदारांना प्रत्येकी २००० रुपये नुकसानभरपाई प्रत्यक्ष दिली आहे.

पाटणकर झोप ऊडण्याचा उल्लेख इब्लिसने केला आहे. मी फ़क्त तुमचा बीबी विनोदी आहे एव्ढेच म्हटले आहे आणि अजूनही मला तसेच वाटते आहे.