उद्धरली कोटी कुळे.....

Submitted by शबाना on 3 April, 2014 - 08:29

उद्धरली कोटी कुळे.....

( तीन वर्षाआधी लिहिलेला हा लेख आज पुन्हा सापडला . इथे पोस्ट करते आहे. खरं १४ एप्रिलला करणार होते पण तेव्हा प्रवासात असेन आणि भारतात आणि भारतीयांच्या मनात पण फार रणधुमाळी असणार आहे १० तारखेनंतर -- त्यामुळे आजच टाकते. )

नेहमीप्रमाणे आज सकाळी मेल बॉक्स उघडला. कोणाचे काय स्टेटस अपडेट्स बघत होते--महेश च्या नावाखाली मराठीत ---उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे!

हं, आज १४ एप्रिल, आंबेडकर जयंती!

आंबेडकर जयंती म्हणल्यावर वेगवेगळे चेहरे समोर आले ---त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव त्यांची आजच्या दिवासाबद्दलची प्रतिक्रिया आणि त्यामागची राजकीय भूमिका अगदी स्पष्ट करतात! भारतात खूप divisive politics आहे हे खरे असले तरी त्याचा एक फायदा नक्कीच आहे ...लोकांच्या भूमिका , त्यांची समाजातली सामाजिक आणि राजकीय जागा त्यांच्या या प्रतिक्रियातून अगदी ताबडतोब काही संशोधन न करता कळून येते!

माझी पहिली जयंतीची आठवण म्हणजे बाबा घरी वेगवेगळ्या मंडळांचे बॅनर्स बनवून द्यायचे. त्यांचे अक्षर फारच सुरेख त्यामुळे कुठलीही जयंती --जिला पाचगणीत मिरवणुका निघायच्या त्यांचे बॅनर्स रात्रभर बसून अगदी तन्मयतेने बाबांनी केलेले असायचे. त्याच्या जोडीला जयंती निमित्ताने शाळेत असणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेसाठी मां ने लिहिलेले भाषण पाठ करण्यात आम्ही मग्न असायचो. वक्तृत्व स्पर्धेच्या भाषणाचा प्रत्येकाचा मजकूर वेगळा असला तरी सुरुवात ,' माझे दोन शब्द शांत चित्ताने ( बऱ्याच वेळा चीत्तेने, चीत्याने ) आणि शेवट ,' अशा महापुरुषास माझे विनम्र अभिवादन ' असा असायचा!जयंतीच्या मागचे राजकारण अगदी शेजारी चालले असले तरी त्याची फार जाणीव तेव्हा नव्हती. एकतर राहायला आम्ही 'आंबेडकर कॉलनी' आणि नंतर सिद्धार्थ नगर ला. त्यामुळे नंतर कॉलेजला आल्यावर जे 'दलित राजकारण ' म्हणून अभ्यासले जायचे ते रोजच्या जगण्याचा भाग असल्यामुळे काही वेगळे जाणवले नव्हते. बाबा आणि मां तसे जुन्या पठडीतले शिक्षक. गावातील सगळ्या समाजातील लोक गरज पडेल तसे घरी यायचे. कोणाला कुठल्या कोर्ससाठी पाठवू, आजारपणात कुठल्या हॉस्पिटलात घेऊन जाऊ, अल्पबचत योजनेत पैसे टाकू का बँकेत ठेऊ अशा सगळ्या गोष्टींवर सल्ला घेण्याचे आमचे घर ,'One Stop Shop' होते. पंधरवड्यात एक -दोन वेळा तरी नवरा दारू पिऊन मारतो आहे म्हणून कोणीतरी दार ठोठवायचे किंवा आईचा पगार झाला नाही म्हणून कोणीतरी आमच्या घरी जेवायला असायचे. पाचगणीत सगळी घरे अगदी जातीच्या आधारावर वेगवेगळ्या विभागात असली तरी तेव्हा आम्हाला काही फरक पडला नव्हता. कदाचित पडत असेल तरी तो त्यावेळच्या दैनंदीन जगण्यात जाणवला नव्हता. पुण्यात शिकत असतांना या गोष्टी जाणवल्या तरी तेव्हा कोर्सवर आणि पुढे काय करायचे यावर जास्त लक्ष केंद्रित असल्यामुळे वाचनापलीकडे फार काही विचार केल्याचे आठवत नाही.

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत आल्यावर मात्र या वेगवेगळ्या अस्मिता आणि अस्मितांचे राजकारण फार जवळून बघायला मिळाले आणि अनुभवायालाही! परंतु तेव्हाही आपली नक्की अस्मिता काय हा प्रश्न नेहमी जाणवायचा! तेव्हापासून आणि आता आता पर्यंत ही या प्रश्नाचे एक ठोस उत्तर माझ्याकडे नाही. पण वेगवेगळ्या गटांच्या झुंबडशाही अस्मितेत आपण बसत नाही हे प्रत्येक वेळी कुठल्यातरी गटाशी बांधिलकी बांधण्याच्या प्रयत्नातून झालेली जाणीव! तिथेही असलेल्या दलित गटाबद्दल नेहमीच्या संमिश्र प्रतिक्रिया होस्टेलच्या कुठल्या गटात तुम्ही बसला आहात यावर अवलंबून असायच्या. पण थोडे थोडे आंबेडकर कळायला लागले ते या गटातल्या काही जणांशी बोलल्यावर , थोडा वाद घातल्यावर! त्यात उमानाथनची सांगण्याची पद्धत मात्र फार वेगळी होती. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, शांतपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरे तो मोडक्या इंग्रजीत द्यायचा. त्याचा तो हसतमुख चेहरा आणि शांत आवाज यामुळे दलित प्रश्न आणि दक्षिणेकडचे राजकारण यामध्ये खूप इंटरेस्ट निर्माण झाला हे खरे.

त्याच सुमारास जब्बार पटेलांचे दोन सिनेमा पाहिले, मुक्ता आणि आंबेडकर. दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि आज ज्यांना एक प्रेषितासमान लेखले जाते त्यांचे जीवन किती अवघड होते आणि पन्नास वर्षानंतर कितीही बदल झाले असले तरी ते ज्या मूल्यांसाठी झटले ती लढाई अजूनही किती अवघड आहे ते या दोन्ही सिनेमांमधून अचूक व्यक्त झाले आहे. आंबेडकर खरे मनाला भावले म्हणण्यापेक्षा रुतले ते या सिनेमाच्या माध्यमातून!नंतर कामानिमित्त मराठवाड्यातील दलित गटांबरोबर वेगवेगळ्या प्रश्नासंबधी काम करताना आंबेडकरांचा प्रभाव अगदी ठसठशीतपने जाणवला. परंतु दलित आणि दलित- इतर हे इतके टोकाचे dynamics जाणवले की प्रत्येकवेळी तुम्ही किती 'दलीत मित्र' आहात या निकषांमध्येच तुमच्या जाणीवा आणि काम गुरफटताना बघून गुदमरायला झाले होते. या गटांचे राजकारण हा एक चर्चेचा स्वतंत्र विषय आहे आणि त्यावर खूप अभ्यासकांनी लिहिलेले आहे. काही वर्षांनी मी मध्य प्रदेशात अक्शन एड च्या प्रकल्पामधून तिथल्या जातीवर आधारित सामाजिक प्रश्नावर काम करताना परत एकदा आंबेडकर भेटले. मराठवाडा आणि एकूणच महाराष्ट्रात जी चळवळ, एक राजकीय घडामोड जातीच्या प्रश्नावर आहे तशी देशाच्या या भागात नाही. पहिल्यांदा जेव्हा मंद्सोर जिल्ह्यातील जातीवर आधारीत वेश्याव्यवसाय या विषयावरचा प्रकल्प मला दिला गेला तेव्हा भोपाल ते मंद्सोर पूर्ण प्रवासात हा काय प्रकार असेल याचा विचार आणि सोबतच्या सहकार्यांबरोबर चर्चा चालली होती. मध्य प्रदेशात रतलाम, मंदसौर इथे बाछडा आणि मुरेना, धोलपुर (राजस्थान) आणि सागर इथे बेदिया या समाजात देवदासी प्रथेप्रमाणे मुली हा व्यवसाय करतात. अगदी ६-७ वयाच्या मुलीना इथे ट्रेन केले जाते. आधी फक्त गावातल्या जमीनदारांच्या सोयीसाठी निर्माण केली गेलेली ही प्रथा आज मुलींच्या traficking मध्ये एक पुरवठा केंद्र म्हणून प्रस्थापित झाली आहे. इथून मुली मुंबई आणि नंतर देशातल्या इतर मोठ्या शहरात आणि विदेशातही या व्यवसायासाठी पुरवल्या जातात. पहिल्यांदा जेव्हा तिथे बाछडा समाजाच्या लोकांबरोबर बोलायला बसलो तेव्हा हे आमच्या जातीचे भूषण आहे आणि ते चालवणे हेच या मुलींचे काम आहे हे ऐकून प्रश्नाची दाहकता समजायला लागली. त्याचबरोबर आठ -नऊ वर्षाच्या मुली जेव्हा ही जाती परंपरांची समाजसंमत जोखड वाहताना पाहिल्या तेव्हा 'गुलामी मानसिकता' हा आंबेडकरांचा शब्द किती समर्पक आहे, ते जाणवले.

एक्शन एडचा दुसरा प्रकल्प होता तो डोक्यावर मैला घेऊन जाणाऱ्या जातीबरोबर ---तिथेही हे काम म्हणजे आमची परंपरागत 'जहागीर' आहे हे ठासून सांगणारे लोक पाहिले आणि परत हा शब्द आठवला. या दोन्ही जातींबरोबर काम करताना आम्ही 'शैक्षणिक केंद्रे' सुरु केली कारण या दोन्ही समाजातील मुलांना गावच्या शाळेत मज्जाव होता. त्यातही या परिस्थितीवर विचार करणारे, आपल्या आपल्या पद्धतीने काम करणारे युवक पुढे आले आणि ही 'जहागीर', हे 'भूषण' कसे लादले गेले आहे यावर आम्ही थोडे उघडपणे बोलू लागलो. एक प्रश्न नेहमी समोर असायचा या सगळ्या चर्चा ऑफिसच्या सहकार्यांबरोबर किंवा अशा प्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातील इतर संस्थाबरोबर करणे फार सोपे आहे. परंतु आज जर ती मैल्याची टोपली वाहून नाही नेली तर मला आणि दोन्ही मुलांना चौधरीच्या घरची शिळी भाकरी मिळणार नाही --हे सांगणारी लालीबाई मला नेहमी निरुत्तर करायची. परंतु इथेही उत्तर मिळाले ते भिंतीवरच्या मळक्या, धुरकटलेल्या आंबेडकरांच्या फोटोमधून. इथे खूप जणांना ते कोण, कुठले, त्यांचे काय योगदान काही माहित नाही . पण आपल्यातला एक माणूस खूप पुढे गेला आणि आपल्यासाठी खूप काही करून गेला हे नेहमी मिळणारे उत्तर. तोच धागा घेऊन-- पण काय ठेऊन गेला तुमच्यासाठी --यावर बोलता बोलता मला या कामातल्या दिशा दिसल्या. महाराष्ट्रात गावोगावी, झोपडपट्ट्यांमध्ये दलित वस्तीच्या पुढे--'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा ' ही पाटी सर्रास दिसते. तीच ओळ अशा एका बैठकीत म्हणली आणि आमचा पुढचा अक्शन प्लान मिळाला. या कामाबद्दल आणि त्यातल्या निष्पत्तीबद्दल वेगळे लिहिता येईल ....परंतु भुकेल्या पोटी सन्मानाचे जगणे जिण्यासाठीची जिद्द आणि ती लढाई विपरीत परिस्थितीत पुढे नेण्यासाठी लागणारी लगन आणि परिश्रम यासाठीचा प्रेरणास्त्रोत तो धुरकट काळ्या चश्म्यामागच्या आंबेडकरांचा फोटोच होता.

आज उत्तर भारतातील दलित राजकारण, दक्षिणेतील आरक्षण आणि ब्राम्हणविरोधी चळवळ यातून दलित आणि आंबेडकर याबद्दल एक निश्चित मत झाले आहे. बऱ्याचवेळा कुत्सितपने हा विषय छोट्या चर्चातून किंवा मोठ्या वाहिन्यांच्या बातमीजालात चर्चिला जातो. आज ही जयंतीच्या निमित्ताने हा लेखाजोखा होणारच ...

मला मात्र मंद्सोर, रतलाम,सागर मधील बाछडा समाजाच्या काही मुली हा व्यवसाय आम्ही करणार नाही म्हणून ठामपणे उभ्या राहनारया -- पण दुसर्या पर्यायाच्या अभावी जगण्याच्या भेदक लढाईत होरपळनार्या या 'दलीत की बेटी'ना साथ देणारे आंबेडकर आठवतात. इंदोरच्या किंवा गुजरात मधील मैला वाहून नेणाऱ्या कित्येक आई बापांच्या मुलांना --तुम्ही यातून नक्की बाहेर पडू शकता--ही जागीर नाही -गुलामी आहे' हे सांगणारे आंबेडकर दिसतात. आजही कुठलाही अभिनिवेश न बाळगता हसतमुखाने दलित मुलांसाठी होस्टेल चालवणारा, त्यानाही व्यक्तिमत्व विकासाच्या सर्व संधी मिळाव्यात म्हणून झटणार्या उमानाथनला प्रेरणा देणारे आंबेडकर आठवतात....

महेशचा तो स्टेटस ई मेल पाहता पाहता आंबेडकरांची ही विविध रूपे --दिसलेली -भावलेली- समजलेली -समोर येत होती. जयंती निमित्ताने होणारे वेगवेगळे कार्यक्रम आणि भाषणे मग संध्याकाळच्या बातम्यांमध्ये त्यांचे चित्रीकरण असे नेहमीचे या दिवसाचे वातावरण आठवले. या सगळ्या कोलाहलात एक वाक्य सारखे आठवत होते --शाळेतल्या असंख्य भाषणांमध्ये म्हणलेले आणि तेव्हा आणि नंतर असंख्य भाषणातून यांत्रिकपणे ऐकलेले ---'त्या महामानवास विनम्र अभिवादन'.

आज हजारो मैल दूर, त्या सगळ्या वातावरणापासून दूर, मला या उक्तीचा अर्थ जाणवतो आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शबाना तुमचे लिखाण अतीशय सुरेख आणी सुसन्गत असते. समाजाचा पूर्ण चेहेरा त्यातुन डोकावत रहातो. तुमच्या लिखाणात खूप सहजता आहे. मायबोलीवर रैना नन्तर सुरेख लिहीणार्या तुम्हीच.:स्मित:

तुमचा हा लेख पण आवडला. उद्या लिहीन यावर.

शबाना, लेख आवडला. महाराष्ट्राबाहेर आंबेडकरांची प्रतिमा काय असेल याचं कुतूहल काही प्रमाणात शमलं! धन्यवाद! Happy
आ.न.,
-गा.पै.

चांगला लेख
मला गद्यलेखनातले फारसे समजत नाही
पण तुम्ही एवढ्या अभ्यासातून आणि प्रत्यक्ष अनुभवातून जे मांडू पाहात आहात ते अजून जरा हलके फुलके करा त्यात एक जड्पणा वाटतो लेख अथ पासून इति पर्यंत वाचताना अनेक जागी अक्षरशः बोअर होते आहे तरी तुम्ही मांडत असलेल्या विषयांचा वरचा दर्जा आणि त्यांची मला भासणारी वैचारिक सामाजिक गरज जाणून मी आपले लेख पूर्ण वाचून काढत आहे
बाकीच्या वाचकांचे मत वेगळे असेलही मी माझे मत सांगीतले
चूक भूल द्यावी घ्यावी
Happy

तुमचा हा मी वाचलेला पहिलाच लेख .. छान लिहीला आहे .. अगदी प्रामाणिकपणे चवदार तळ्याचा उल्लेख, भारतीय घटना, भारतरत्न पदवी आणि मग ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर जमणारी गर्दी ह्यापलिकडे आंबेडकरांच्या कार्याविषयी मला फार माहिती नाही .. लेख वाचून माहिती करून घ्यावीशी वाटली ..

उत्तम लेख, बाबासाहेबांचे महत्व कळायला जातीय आणि वर्गीय अभिनिवेशाची झापडे काढणे अत्यंत आवश्यक आहे.

सुरेख लेख. असे कित्येक आंबेडकर भारताच्या कानाकोप-यात कुठेतरी कार्यरत असतील, त्यांना प्रसिद्धीशी काही देणे घेणे नसते. त्यामुळे मिडीयामध्ये त्यांचा उदो उदो होत नाही आणि मग आमच्यासारख्या सामान्य जनतेला असे कोणी लोक कुठेतरी काम करताहेत हे कधीही कळत नाही.

तसेही आता भारतात सगळ्या जयंत्या, मयंत्या, दिन आणि अजुन जे काय असेल ते, सगळे फक्त इवेंट्स झालेत. त्या त्या दिवशी काय काय करायचे ते सगळे ठरलेले आहे. त्या दिवशीचे ते ठरलेले कार्यक्रम दरवर्षी नित्य नेमाने पार पडले की दिवस साजरा झाला. मग त्या दिना आणि दिनाच्या उत्सवमुर्तीची आठवण उरलेले ३६४ दिवस काढायची आवश्यकता रहात नाही. ज्ञात लोकांचे हे हाल, मग कुठेतरी कोप-यात, फ्लॅशलाईट्सपासुन दुर आपले काम करणा-या ह्या लोकांची दखल कोण घेणार?

सुरेख शब्दरचना.
खरोखरच, उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे!
धन्यवाद असा अप्रतिम लेख दिल्याबद्दल !

शबाना, आजच तुझे दोन लेख वाचले.
अत्यंत पुर्वग्रह नसलेले लिखाण .
ह्यावर अजून वाचायला आवडेल. तुला भेटायलाही फार आवडेल. Happy

आपण सगळेजणच विविध प्रकारची झापडे लावून जगतो - जातीची, धर्माची, राजकारणाची आणि व्यक्तीला जसे आहे तसे स्वीकारत नाही. खूपशा अदृश्य पण घट्ट पडद्यांमागे स्वतःला ठेवून स्वतःचे संरक्षण चाललेले असते -- एक पडदा ओलांडून पुढे गेलो तर आपलेही बरेच मुखवटे गळून पडतील अशी भीती वाटत असावी प्रत्येकाला.

ठेचकाळून रक्तबंबाळ झाल्यावर डोळ्यावरचे झापड काढणे आणि विविधतेने नटलेले हे जग पाहण्याच्या उमंगेने उघड्या डोळ्याने त्यास सामोरे जाणे यात फरक आहेच. समाजातल्या व्यक्तींच्या अशाच विविध छटा असतात आपल्या झापडातून पाहताना आपल्याला हव्या तशाच त्या दिसणार. आणि म्हणूनच कितीही एकत्र उठबस झाली सार्वजनिक जीवनात तरी लोकांच्या दृष्टीने आपण दलित, बामन, मुस्लिम, बायका याच वर्गीकरणात राहतो.

आंबेडकर, नेहरू या नेत्यांचे ही झापडे काढून परीक्षण केले तर खूप वेगळ्या दृष्टीने त्यांचे महत्व कळते. राज्यघटनेला फक्त आरक्षणाशी जोडून टाकल्यामुळे तिचे महत्व लोकांपर्यंत पूर्णपणे पोहोचले नाही. खरे तर १९५० च्या दरम्यान अनेक देश वसाहतवादातून मुक्त झाले पण भारताने जी प्रगती केली आणि मुळात एकसंध भारत टिकून राहिला याचे कारण त्यावेळी योजलेली धोरणे, घेतलेले निर्णय आणि त्यानुसार पुढच्या दशकात केलेली प्रगती आणे हे सर्व संविधानाच्या पायावर उभे राहू शकले. आजच्या संदर्भात ही धोरणे चुकीची वाटतील, तेव्हाही त्यात त्रुटी होत्याच पण राजकीय धोरणे ठरवणे आणि ती राबवणे हे अवाढव्य काम आहे. दोन महायुद्धात कमकुवत झालेल्या ब्रिटीश साम्राज्याने फार काही सोडले नव्हते आपल्यासाठी, फाळणीची प्रचंड मानसिक, आर्थिक आणि राजकीय झळ बसलेली होती. दंगली, निर्वासितांचा प्रश्न या सर्व पार्श्वभूमीवर पुढची आखणी आणि अंमलबजावणी अशा जटील वेळी संविधानाची मांडणी, त्याला संमती या किचकट प्रक्रिया घडल्या. आंबेडकरांबरोबर इतरांचेही यात योगदान आहेच. जातीव्यवस्थेच्या अमानवीय जोखडातून बाहेर पडण्यासाठीची प्रेरणा आणि त्यासाठीचा संघर्ष या गोष्टींची साधी कल्पनाही आजच्या दलित राजकारणाकडे पाहून येत नाही. एक cult करून टाकतो आपण आणि त्याच्याच आधारावर सर्व गोष्टींचे विश्लेषण --आपल्यालाच हवे तसे ।

आंबेडकर आणि मुकता हे दोन्ही जब्बार पटेलांचे सिनेमा खूप छान मांडतात या दोन्ही गोष्टी.

राज्यघटना, प्रजासत्ताकाची स्थापना आणि एकूणच स्व्तान्त्र्यानंतर लगेचच्या दोन वर्षात काय आव्हाने होती देशासमोर हे समजून घेण्यासाठी केतन मेहताचा सरदार अगदी must see. पटेलांचे काहीही अभिनिवेश न आणता, व्यक्तिसोम न माजवता केलेले संयत चित्रण आहे यात. हा आणखीन एक नेता लोह पुरुष म्हणून त्याचाही cult करायचा प्रयत्न झाला पण अजूनही त्याचे योगदान तसे समजून घेतलेले नाही या देशाने

पटेलांचे काहीही अभिनिवेश न आणता, व्यक्तिसोम न माजवता केलेले संयत चित्रण आहे यात. हा आणखीन एक नेता लोह पुरुष म्हणून त्याचाही cult करायचा प्रयत्न झाला पण अजूनही त्याचे योगदान तसे समजून घेतलेले नाही या देशाने>>>>>>

शबाना मायबोलीवर इतके सुरेख आतापर्यत कुणीही लिहीले नव्हते. हा देश नुसताच नेत्यान्चा नव्हे तर शास्त्रज्ञान्चा सुद्धा आहे. डॉ. होमी भाभा, डॉ. सी व्ही रामन आता आपले माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम हे सर्व भारताला जगात एक समर्थ राष्ट्र म्हणून उदयास आणण्यात यशस्वी झालेत. अजून काही जे विद्वान आहेत ते दुर्दैवाने आपल्या लाल फितीच्या भोन्गळ कारभारात अडकले आहेत.

जेव्हा केव्हा भ्रष्ट्राचाराची आणी अप्पलपोटेपणाची विषवल्ली दूर होईल तेव्हाच हा देश न. १ बनेल.

Pages