अन्या - १३

Submitted by बेफ़िकीर on 18 February, 2014 - 01:34

"चहात कधी हिंग टाकून बघितलंयस?"

"हिंग?"

"हं?"

"चहात?"

"हो"

"छे"

"एकदा चव बघ, कर पुढे कप तुझा"

युगिनी कप पुढे केला. मणीने पर्समधून आधीच काढलेल्या एका छोट्या डबीतून चिमूटभर हिंग युगिच्या कपमध्ये टाकला. मग कप हालवत आणि चहा ढवळत युगंधराने एक घोट घेतला. क्षणभर तोंड विचित्र करून तिने मणीताईकडे पाहिले. मणी उत्सुकतेने पाहात होती. मणी सिनियर असल्याने युगंधरा 'ती चव मुळीच आवडली नाही' असे म्हणू शकत नव्हती. पण खरे तर आता तिला तसे म्हणायची इच्छाही होत नव्हती. त्या थंडीमध्ये सकाळी पावणे आठला बसस्टॉपशेजारच्या टपरीवरचा वाफाळता चहा पिताना त्या चहाबरोबर घश्यात गेलेल्या हिंगाने जादू घडवली होती. घश्यातून गरमगरम सेन्सेशन आले तशी युगि स्वतःच्याच नकळत मणीताईला म्हणाली......

"अजुन थोडे घाल ना?"

मणी समाधानाने हासली व तिने पुन्हा ती डबी काढली. मणी जेव्हा हसायची तेव्हा तिचे टपोरे डोळे अधिक हसायचे. गालाची हाडे जणू एखाद्या अस्सल शिल्पाप्रमाणे असल्यामुळे मणी हासली की तिला हासताना बघणारा बघतच राहायचा. सावळी मणी म्हणजे उत्साहाचा प्रवाह होता. दिवसाच्या कोणत्याही क्षणी ती अशीच उत्फुल्ल दिसायची. पण फार फार कमी माणसांना माहीत होते की संतापलेली मणी कशी दिसते. अश्या वेळी तिच्या नजरेला नजरही देता येत नाही ह्याचा अनुभव काहींनीच घेतलेला होता आजवर! अठ्ठावीस वर्षांची एडिमाट्टी मणी दहा वर्षाची असतानाच पालकांसमवेत विजयवाड्याहून पुण्याला आलेली होती. मुळची तेलगु असलेली मणी शिक्षण मराठी व इंग्लिशमधून झाल्यामुळे तेलुगु, इंग्लिश, मराठी व हिंदी या चारही भाषा छान बोलू शकायची. आईच्या आजारपणामुळे एम एस डब्ल्यू ला प्रवेश घेऊ न शकलेली मणी आता केव्हाच शिक्षणाचा नाद सोडून तिच्या आवडीचे काम करू लागलेली होती. समाज प्रबोधन! सोपान उदय संस्थेमध्ये कामाला लागून तिला आता चार वर्षे झालेली होती. आजारपणात आईचे निधन झाले होते. वडील मागेच गेलेले होते. राहता राहिले होते मणीच्या नावाने एक तीन खोल्यांचे घर, बर्‍यापैकी पैसे आणि एकलकोंडेपण! हे एकलकोंडेपण तिने निपटून काढले होते दुसर्‍यांचे एकलकोंडेपण घालवून, दुसर्‍यांना दिशा दाखवून! जेव्हा माणूस दुसर्‍यांवर चांगले संस्कार करू लागतो तेव्हा आपोआपच त्याचे स्वतःचेही रुपांतर एका अधिक चांगल्या व संस्कारीत माणसात होऊ लागते. त्याचप्रमाणे एडिमाट्टी मणी ही सरासरीपेक्षा अधिक उंची असलेली, सावळी, आकर्षक बांध्याची स्त्री तिच्या व्यक्तीमत्वाची छाप पडून माणूस प्रभावित होण्याआधीच स्वतःच्या वर्तनाने त्याला प्रभावित करत असे. दुसर्‍याला सहाय्य करू लागलो की आपल्या मदतीचे सहस्त्र हात पुढे होतात हा अनुभव मणीने गेल्या तीन चार वर्षात कितीतरीवेळा घेतलेला होता.

दोनच महिन्यांपूर्वी सोपान उदयमध्ये युगंधरा रुजू झाली होती. अतिशय कमी पगारावरील ते स्थान युगंधराने स्वीकारण्यामागे युगंधराचे एक स्पष्ट व थेट कारण होते. पैसे कमवणे हा तिच्या नोकरी करण्यामागचा उद्देशच नव्हता. समाजकार्य ही तिची पॅशन होती. घरचे बरे असलेल्या युगंधराला ह्या असल्या विचित्र क्षेत्रात जायला वडिलांनी मोठ्या मनाने परवानगी दिलेली होती. युगिलाही आई नव्हती. युगिची आई युगिच्या लहानपणीच गेलेली होती. एकटेच अपत्य असलेल्या युगंधराच्या बाबतीत तिचे वडील अतिशय हळवे होते खरे तर! पण त्याहीपेक्षा तो माणूस कणखर अधिक होता. आपल्या पश्चात जर युगिला जगायचे असेल व जगावेच लागणार असेल तर आजपासूनच जगाच्या या अफाट समुद्रात पोहायला तिला सोडायला हवे हे त्यांनी ओळखलेले होते. जो घाबरला तो संपला. जो धडकला, ज्याने साहस केले तोच तगला. युगिला तिच्या वडिलांनी मंत्र दिला होता. जोपर्यंत तुला माझी गरज लागत नाही तोपर्यंत माझ्याकडे मदत मागू नकोस. स्वतःच्या जीवावर ह्या जगात टिकून राहा. पण लक्षात ठेव. मी कमवलेले हे सगळे तुझेच आहे. हे तू केव्हाही घेऊ शकतेस, मागू शकतेस. तेव्हा मनातून माझे कसे होणार ही भीती घालवून टाक. मी तुझ्या पाठीशी खंबीर आहे. पण उद्या मी नसेन, हे पैसे, हे घर हे सगळे असेल. पण तू एकटी असशील. तेव्हा स्वतःला सवय लाव. लग्न करायचे असले तर निव्वळ आकर्षणावर अवलंबून निर्णय घेऊ नकोस. ज्याच्याबरोबर चाळीस पन्नास वर्षे काढायची तो माणूस सत्शील, विश्वासपात्र आहे की नाही हेही बघणे आवश्यक आहे. हे जग म्हणजे एक थांग न लागू शकणारा समुद्र आहे. वरवर सगळेच आरामात पोहताना दिसतात पण प्रत्येकजण दमलेला आहे, थकलेला आहे, तरीही मरू इच्छीत नाही आहे, बुडू इच्छीत नाही आहे. प्रत्येकाला काठच गाठायचा आहे. एकमेकांना खाली खेचूनच तो काठ गाठता येतो अश्या भ्रमात प्रत्येकजण आहे. पण युगि, कोणालाही अजिबात त्रास न देता आणि कोणाचाही अजिबात त्रास न करून घेताही काठ गाठता येतो. आणि कोणास माहीत? कदाचित काठ गाठणे हा अंत नसेलही ह्या प्रवासाचा! तेव्हा आला क्षण नव्याने पारख, अनुभव महत्वाचा आहेच, पण नव्या क्षणाला तुझ्यातला नवेपणा, ताजेतवानेपणाही दे! जे तुला भेटतील त्यांना फ्रेश वाटूदेत, जगण्याचे बळ येऊदेत. त्यातूनच तुला जगण्याची उर्जा मिळत राहील.

युगंधरा जयस्वाल! जेमतेम उंचीची, बावीस वर्षांची, चष्म्यामधूनही जिच्या शार्प डोळ्यांची धार जाणवते अशी दिलखुलास आणि बुद्धीप्रामाण्यवादी युगंधरा सोपान उदयला जॉईन झाली आणि मणीची असिस्टंट म्हणून काम पाहू लागली. त्या दोघींमध्ये केव्हाच मैत्री जमलेली होती. मणीने आजवर केलेल्या कामगिर्‍या जसजश्या युगिने ऐकल्या तसतसे तिच्या मनात मणीबद्दलचे कुतुहल, आदर व भय या सर्वांचेच प्रमाण वाढू लागले. होय, भयसुद्धा!कारण उद्या जर आपल्याकडून काही विपरीत घडले तर ही मणी काही आपल्याला सोडायची नाही हे युगिला आता नीट समजलेले होते.

आज प्रथमच युगि एका कामगिरीवर निघालेली होती. पहिली कामगिरी असल्याने वरिष्ठांच्या सोबत जाणे आवश्यकच होते. त्यामुळे खरे तर मणी कामगिरीवर निघाली होती व युगि तिला सहाय्य करण्यासाठी व प्रत्यक्ष अनुभवासाठी म्हणून बरोबर चाललेली होती. सातारा जिल्ह्यातील लोणंदजवळील वाठारे ह्या गावी एक केस आलेली होती. तेथील गावकर्‍यांना भानावर आणणे आवश्यक झालेले होते. मूर्खासारखे एका बाईच्या नादी लागून ते अडाणी लोक आता काहीही करण्याच्या पातळीला पोचलेले होते. सोपान उदयच्या डोळ्यात हे वाठारे गाव आधीपासूनच खूपत होते त्या घाणेरड्या भामाबाईमुळे. पण आजवर लक्ष घालावेच असे काही घडलेले नव्हते. पण काल रात्री एक भयंकर बातमी सोपान उदयच्या संस्थापकांना समजली होती आणि रात्रीत त्यांनी मणी आणि युगिच्या घरी आपला सेवक पाठवून दोघींना सकाळी सव्वा आठच्या बसने वाठारेला जाण्याचा आदेश दिलेला होता.

म्हणूनच आत्ता दोघीही अर्धवट गारठलेल्या अवस्थेत आपापली बॅग घेऊन बसस्टॉपशेजारी उभ्या राहून चहा पीत होत्या. आत्ता त्यांना कोणी पाहिले असते तर दोन विद्यार्थिनी कोठेतरी चालल्या आहेत असे वाटले असते. पण एकेकीची बॅग उघडून पाहिली असती तर डोके चक्रावले असते. लहानलहान दोन तीन सुरे, दोर, खिळे, हातोडी, लाल तिखटाची पावडर, मनगटात घालता येईल असे काहीतरी शस्त्र, चाबकासारखे काहीतरी, मोठा आवाज करू शकणारे एक डबडे, फोल्डिंगची काठी, एक एक्स्ट्रा कपड्यांचा सेट, अनेक महत्वाच्या संपर्कांची यादी, स्वत:ची आयडेंटिटी, मणीच्या बॅगेत एक कॅमेरा, एक कसलातरी स्प्रे, बर्‍यापैकी आग लावता येईल इतपत तयारी! एकसे एक भन्नाट गोष्टी होत्या त्यांच्या बॅग्समध्ये! दोघींच्या जीन्सच्या बेल्टला असलेल्या पाऊचमध्ये पैसे, औषधे, फर्स्ट एडचे काही ना काही सामान, एक एक साखळी आणि लहान पाते होते.

वयाने लहान असलेल्या युगंधराच्या मनावर दडपण आलेले होते. ती एकदा मणीकडे तर एकदा बसच्या यायच्या रस्त्याकडे टुकूटुकू बघत होती. हिंग घातल्यावर चहाची चव कशी का होईना, पण इफेक्ट मात्र भलताच वधारला होता. घसा खाकरून युगि मणीकडे बघत म्हणाली......

"ताई, आपण पोचण्यापूर्वी......काही होणार नाही ना?"

मणीने उत्तर दिले नाही. मणी नुसतीच गंभीर झाली. मणी क्वचित स्मोक करत असे. मनावरचा ताण वाढल्यामुळे मणीने आत्ताही एक सिगारेट पेटवली. विद्यार्थीदशेतील ही मुलगी भर रस्त्यावर उभी राहून सकाळी सकाळी सिगारेट ओढत आहे हे दृष्य इसवीसन १९९९ च्या पुणेकरांना नवलाईजनकच वाटत होते. पण असल्या ऐर्‍यागैर्‍यांकडे मणीचे आत्ता लक्ष नव्हते. तिच्या डोक्यात विचारांच्या लाटांवर लाटा येत होत्या.

समाज काही मूर्खांमुळे दिशा सोडून वागू लागला होता. हे जे काही मूर्ख होते ते प्रत्यक्षात अतिशय हुषार, प्रभावी होते. मात्र त्यांच्याजवळील प्रभावी व्यक्तिमत्व आणि वक्तृत्व ते चांगल्यासाठी वापरत नव्हते. स्वार्थासाठी व घाणेरड्या हेतूंसाठी वापरत होते. त्यांचा पर्दाफाश करणे ही फारच क्षुल्लक बाब होती. खरे आव्हान होते ते अश्यांच्या नादी लागून प्रयत्नवादापासून लांब राहण्यात धन्यता मानणार्‍या अडाणी समुदायांना स्वतः विचार करण्याची कुवत मिळवून देण्याचे! मणीच्या असंख्य अनुभवांमधून जे सूत्र मणीने डिराईव्ह केलेले होते ते हे की जोवर माणसाला हे कळत नाही की एखादी गोष्ट शॉर्टकट्स न घेता, मेहनतीने प्रयत्न करून मिळवण्यात एक विलक्षण समाधान असते तोवर माणूस ह्या असल्याच समाजकंटकांच्या आणि देवादिकांच्या नादी लागणार! ह्यासाठी ती नेहमीच असे काहीतरी सांगायची की त्या मार्गावर चालणार्‍याला 'मी स्वतः केलेल्या मेहनतीचे मला हे फळ मिळाले' असे एक आत्मिक समाधान लाभायचे व त्याला मणीचे विचार पटायचे.

सोपान उदय संस्थेचा एक अलिखित नियम होता. काम काय आहे हे आम्ही सांगणार, कसे करायचे हे तुमचे तुम्ही ठरवा. हे मणीच्या पथ्यावरच पडलेले होते. मणी स्वतःच्या खास शैलीने प्रबोधन करत फिरत असे.

पण वाठारे गावाने समाजाचे, माणूसकीचे नाकच कापायचा घाट घातलेला दिसत होता आणि मणी त्याच विचारात गढली होती. तिच्या कपाळापासून डोक्याच्या मागच्या भागापर्यंत एकच नांव नुसते घुमत होते.

'भामाबाई'......

जाऊन ह्या भामाबाईच्या झिंज्या धरून तिला फरफटत सातार्‍याच्या पोलिस स्टेशनवर न्यावे असे मणीला वाटत होते. पण अजुन तर दोघीही पुण्यातच होत्या. आणि बस आली......

"बोला ताई?"

"दोन लोणंद"

मणीने कंडक्टरला तिकिटाचे पैसे दिले आणि युगिच्या चेहर्‍यावर स्पष्ट प्रश्नचिन्ह दिसले की वाठारे ऐवजी लोणंदचे तिकिट ताई का मागत आहे. पण लीडर तो लीडर हे सूत्र होते. प्रवास सुरू झाला आणि मणी अधिकाधिक गंभीर होत चालली. तसे मग तेच सावट युगिच्याही चेहर्‍यावर आले. भयानक गार वारा आत येत असल्याने अर्थातच सगळ्यांनीच खिडक्या लावून घेतल्या होत्या. बाहेर अद्भुत हिरवाई पसरलेली होती. पण तिचा ताजेपणा मणी आणि युगिच्या मनापर्यंत पोचत नव्हता. नि:शब्दपणे सव्वा दोन तासांचा प्रवास झाला. फक्त एकदा युगिने वाटेत जेजुरीच्या खंडोबाच्या गडाकडे पाहून हात जोडले तेव्हा मणीच्या चेहर्‍यावर एक हलकी स्मितरेषा प्रकटली. ती पाहून युगिने ओशाळे हासत खिडकीबाहेर पाहणे सुरू केले. मणी नास्तिक होती. युगि अजुन घडत होती.

लोणंद स्टँडवर उतरताच कचर्‍याचा भपकारा नाकात शिरला आणि लगबगीने युगि मणीच्या पाठोपाठ चालू लागली. कोणाच्याही विशेष नजरेत न येता मणी झरझर चालत बारा चौदा मिनिटांनी एका गल्लीत शिरली आणि एका घराचे दार वाजवले. दार एका तरुणीने उघडले. तिची आणि मणीची नजरानजर होताच ती तरुणी दारातून बाजूला झाली आणि मणी आणि युगि अलगद आत शिरल्या. त्या तरुणीने क्षणाचाही वेळ न घालवता त्यांच्या हातात पोह्याच्या डिशेस ठेवल्या आणि समोर चहाचे दोन कप ठेवले आणि खर्जातल्या आवाजात म्हणाली......

"कंजारभाटाच्या बायका घालतात तसली लुगडी आहेत, तुम्हाला नेसता यायची नाहीत, मी नेसवते, लाजायचे काम नाही, सतरा ठिकाणी ठिगळे असलेली पोलकी आहेत, रोजच आपण असेच लुगडे नेसतो अश्या आविर्भावात वावरायचे. चेहरा हळद कुंकवाने माखून घ्यायचा. जवळ फक्त कॅमेरा आणि दोन दोन लहान पाती ठेवा. ही मुलगी लहान दिसते. तिला न्यायचे नसले तर नेऊ नकोस. साडेबाराला विधी आहे. पावणेबारापासून तयारी सुरू होणार आहे. रेडहँडच पकडले तर काही करणे शक्य आहे. अन्यथा मरणाशी गाठ आहे हे लक्षात ठेवा. दोन महिला पोलिस त्याच गर्दीत अशीच लुगडी नेसून असतील. त्या तुम्हाला ओळखतात, पण तुम्हाला त्या माहीत नाहीत. तेव्हा रेडहँड पकडल्यावर जय अंबे अशी जोरात हाक घाला. दोघी पुढे होतील आणि भामाबाईला करकचून आवळतील. प्रचंड विरोध होईल, स्वतःला जपा, काहीच जमत नसले तर सरळ पळून पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद द्या आणि पुण्याला रवाना व्हा. समजले?"

युगिने हे ऐकताना किमान सहा वेळा आवंढे गिळले होते. मणी मात्र ठाम चेहर्‍याने सगळे ऐकत होती. पंधरा मिनिटांनी त्यांनी आपापले रूप आरश्यात पाहिले तेव्हा त्यांचा विश्वास बसेना! युगि आजवर फक्त समारंभापुरतीच साडी नेसत आलेली होती. त्यामुळे तिचे दोन्ही हात साडी नीट करण्यासाठी शिवशिवत होते. पण प्रत्येकवेळी हात शिवशिवला की ती तरुणी तिच्य हातावर थप्पड मारत होती. आपण अ‍ॅट ईझ आहोत हेच दाखवले गेले पाहिजे हे युगिने स्वतःवर ठसवले. तिला तिच्या वडिलांची प्रकर्षाने आठवण झाली. त्यांना जर आजचा प्रकार समजला तर ते आपल्याला ही नोकरी सोडायला लावतील हे तिला माहीत होते. प्रचंड दडपण आलेले होते. त्यातच ते गुडघ्याच्या वर गेलेले पातळ आणि सतरा ठिकाणी उसवलेले पोलके घालून बाहेर पडायला कसेसेच वाटत होते. पण दॅट वॉज द जॉब! दॅट वॉज द नीड ऑफ द अवर!

मागच्या बाजूने दोघी एका अंधार्‍या गल्लीतून अलगद सरकत आणि पायांनीच तिथला कुजका कचरा तुडवत मागच्या रस्त्याला लागून गर्दीत मिसळल्या, तेव्हा पावणे अकरा वाजले होते. कोठे जायचे ते माहीत होते. शेअर बेसिसवर लहान लहान गावांमध्ये बेकायदारीत्या प्रवासी वाहतूक करनार्‍या जीपगाड्या एका कॉर्नरवर जोरजोरात हाळ्या देत थांबलेल्या होत्या. जागच्याजागीच घोड्यासारख्या फुरफुरत होत्या. जणू फक्त एक प्रवासी आणखीन बसला की निघणारच होत्या. प्रत्यक्षात मात्र आतमध्ये आठ आठ प्रवासी असूनही गेली कित्येक मिनिटे त्या जीप्स तिथेच होत्या. कमीतकमी बारा प्रवासी झाल्याशिवाय त्या निघणार नव्हत्या.

मणी आणि युगि एका जीपमध्ये शिरल्या. ती जीप वाठारला चाललेली आहे असे ड्रायव्हर बोंबलत होता. कोणाच्याही नजरेत आपले वागणे येऊ नये म्हणून दोघी काळजी घेत होत्या. काही झाले तरी चेहर्‍यावरचा पुणेरीपणाचा शिक्का घालवणे शक्य नव्हते. म्हणूनच हळदकुंकवाने चेहरा माखवून घेतला होता. तरीही काही बायका टक लावून बघतच होत्या. पोषाख कंजारभाटाचा असला तरी देहबोली, नजर आणि नवेपणा कंजारभाटाचा नव्हता. त्यात एक शिष्टाचारयुक्त घटक सहज आढळत होता. दोघी इतक्या तरुण असून एकीच्याही कडेवर एकही मूल कसे नाही असाही प्रश्न एक दोन बायकांना पडलेला होता. त्या दोघींच्या अंगाला कंजारभाटांच्या अंगाला येतो तसा ओंगळवाणा वासही येत नव्हता. उलट किंचितसा स्नोचा वगैरेच वास येत असावा. त्यामुळे जीपमध्ये किंचित चुळबूळ सुरू झाली असावी. ह्याचे कारण त्या दोघी वेषांतर करून आलेल्या आहेत हे एक दोन चाणाक्ष बायकांच्या थोडेफार लक्षात आलेले होते. पण सुदैवाने आणखीन दोन प्रवासी बसले आणि जीप धडाक्यात सुरू झाली. खड्डे, स्पीडब्रेकर्स आणि आतली घुसमटवणारी गर्दी! त्यातच ते तंबाखूचे वास, न धुतलेल्या कपड्यांचे वास आणि घसा फाडून एकमेकांशी गप्पा मारणारी माणसे! एकुण वातावरणामुळे ढवळल्यासारखे होत होते. पण निश्चलपणे ते सोसत दोघी बसून होत्या. जीपचा ड्रायव्हर मूर्खासारखे वाटेत हात करतील ते प्रवासी आणखीन उचलत होता. कोणी पुढे बसत होते, कोणी मागच्या दाराला लटकत होते तर कोणी गर्दीला आणखी आत ढकलून आत बसत होते. शेवटी असह्य झाले तशी युगि ड्रायव्हरवर ओरडण्यासाठी पुढे झुकताच मणीने तिचा हात दाबला. सगळे समजल्यासारखी युगि गप्प बसली.

सव्वा अकरा! कधीतरी तीस चाळीस मिनिटांनी जीप एकदम रिकामी झाली. वाठार! जिल्हा सातारा!

दोघी खाली उतरल्या आणि एकदा त्यांनी नजरेत काय काय सामावले जात आहे ते तपासले,. कोण्या एका दिशेने किंचित अधिकच लगबग होती. काही विशेष न भासवून मणी तिकडे चालू लागली. उंच मणीच्या लांब ढांगांचा वेग मॅच करताना युगिला जवळपास पळावेच लागत होते. वाटेत अनेक बायका डोक्यावर पदर घेऊन कसला तरी गजर करत हळद कुंकू उधळत निघालेल्या होत्या. कोणीच्या अंगात आलेले होते. पुरुष लोक कधी नव्हे ते स्त्रियांना पाहून हात जोडत होते. दोन रंगवलेले बोकड आयुष्यात प्रथमच सुशोभित होऊन कोठेतरी निघालेले होते. जवळपास वीस मिनिटे उन्हातून घामाघूम होत चालल्यावर वाट जरा खाली खाली उतरू लागली. उतार आल्यावर मणीच्या मनात आलेला पहिला विचार हाच होता की जर पळावे लागले तर त्यावेळी हा चढ चढावा लागणार आहे. कसे होणार अशी एक खिन्नता तिच्या मनावर पसरली. मग ती खिन्नता झटकून आणि कपाळ आणि गाल पदराने पुसून ती वेगात उतरू लागली. ह्या असल्या पातळांची अजिबात सवय नसल्याने युगि कशीबशी उतरू लागली. युगिचे ते नवखेपण त्या गर्दीतही काही जणांना कुतुहलाने बघायला भाग पाडत होते. ते लक्षात आल्यावर मणी जोराने हातवारे करत मरीआईचा उधो असे ओरडत निघाली. हळूहळू युगिला ते अ‍ॅक्टिंग जमू लागले. आता येणारे जाणारे ह्यांनाही पाहून हात जोडू लागले.

पावणे बारा! पावणे बाराला पाच कमी असताना एकदम ते दृष्य डोळ्यासमोर उघडे झाले.

अमाप गर्दीने केलेले रिंगण! मधोमध एक ओबडधोबड दगड, ज्याला देवीसारखे मुंडके आहे. त्या दगडाची पूजा सुरू झालेली. दगडाशेजारीच एक पंचेचाळीशीच्या आसपासची तितकीच ओबडधोबड स्त्री बसलेली. तिची मान अंगात आल्यामुळे फिरत आहे ती तोंडाने काहीतरी पुटपुटत आहे. तिच्या अंगावर पिवळी धमक साडी आहे. गळ्यात अनेक हार आहेत. अंग हळद कुंकवाने माखलेले आहे. मधेच दिसणारे तिचे घारे डोळे भयानक आहेत. सर्व बाजूंनी मरीआईचा जयघोष चालू आहे. ह्या गर्दीत मात्र मणी आणि युगिकडे कोणी ढुंकूनही पाहात नव्हते. कोनाला भानच राहिलेले नव्हते. कोणत्यातरी क्षणी अचानक लोक भामाबाईसमोर लोटांगण घालण्यास प्रचंड झुंबड उडवू लागले. त्याच गर्दीत मणीही घुसली आणि पाठोपाठ युगिही! माणसाचे कोणते रूप त्यांना पाहायला मिळावे? तर भामाबाईवरील अतूट श्रद्धेने त्या गर्दीत घुसलेले पुरुष गर्दीतल्या स्त्रियांच्या अंगावरून आपले ओंगळवाणे हात हपापलेपणाने फिरवत होते. मणीला मनातच हसू आले. म्हणजे या भडव्यांची धड येथेही श्रद्धा नाहीच आहे तर! मणीचा नंबर लागला तेव्हा मणीने भामाबाईसमोर लोटांगण घातले आणि वर मान करून क्षणभर भामाबाईकडे पाहिले. इतक्या प्रसंगातून गेलेल्या मणीलाही त्या क्षणी शहारल्यासारखे झाले, भामाबाईचे डोळे जहाल म्हणजे अतिशय जहाल होते. पण त्याशिवाय त्या नजरेत काहीतरी होते. काय होते ते? चुटपुटत मणी बाजूला झाली आणि युगि भामाबाईच्या पाया न पडताच मणीबरोबर मागे सरकली. पण मणीचे लक्ष अजुनही भामाबाईकडे होते. आश्चर्याचा धक्का म्हणजे...... भामाबाई त्या गर्दीला नजरेने भेदत मणीकडेच पाहात होती. का?

कारण फार विचित्र होते. मणी जेव्हा भामाबाईसमोर वाकली तेव्हा तिच्या पोलक्यातून भामाबाईला तिचे अंतर्वस्त्र दिसले होते जे कंजारभाट बायका वापरत नाहीत. ही मुलगी नक्कीच शहरी आहे हे भामाबाईला जाणवले होते. त्या गर्दीत एखाददुसरी व्यक्ती शहरी असण्यात भामाबाईला अडचण नव्हती, पण मुद्दामहून वेषांतर करून महार, रामोशी किंवा कंजारभाटासारखे कोणी दिसावे हे तिला पटत नव्हते. त्यामुळे खरे तर मुळापासून हबकलेली भामाबाई इतक्या गर्दीतही मणीवर नजर ठेवून होती. आणि भामाबाईची ती भयंकर नजर इतके अनुभव गाठीशी असूनही मणीला सहन होत नव्हती.

पण आता असे झाले होते की गर्दीचा रेटाच इतका भयंकर होता की काही वेगळे करणे, ठरवणे हे जवळपास अशक्य होते. जवळच थांबलेल्या एका ग्रामीण म्हातारीला मणीने कुजबुजत व शक्य तितक्या ग्रामीण बाजात विचारले......

"बळी कधी द्यायचा हाय?"

म्हातारीने भस्सकन् मणीकडे पाहिले, इकडे तिकडे पाहिले आणि ठसक्यात म्हणाली......

"त्ये काय दोन बोकाडे बांधलेल्यात तिक्डं? दिस्लं न्हाईत तवा?"

"हा"

समाधान झाल्यासारखे दाखवत मणीने तेच दोन बोकड पुन्हा पाहिले. युगि गोंधळलेली होती. काहीतरी प्रचंड घोळ होता. उत्सुकतेने मणी आणि युगि त्या गर्दीत महिला पोलिस कोण असू शकतील ह्याचा अंदाज बांधू लागल्या. कुठूनतरी भामाबाईचे डोळे अजूनही आपल्यावर रोखलेले आहेत असे मणीला जाणवत होते. किंबहुना, इतरही काही डोळे आपल्यावर रोखल्यासारखे तिला आता वाटू लागले होते. सर्वांचीच भलावण व्हावी म्हणून मणी जोरजोरात हातवारे करून मरीआईच्व्हा उधो असे ओरडू लागली. आधीच ठरल्याप्रमाणे आता मणी आणि युगि एकमेकींपासून लांब झाल्या, सुट्या सुट्या झाल्या आणि तरीही एकमेकींच्या नजरेच्या आणि स्पर्शाच्या टप्प्यात राहू लागल्या.

मात्र एकुण वातावरणामुळे ते सावट लवकरच निवळले. भामाबाईच्या हालचाली आता जोर धरू लागल्या. तिचे मणीवरचे लक्ष उडाले. ती उठून मरीआईसमोर उभी राहून अंगात आल्यासारखी घुमू लागली. गर्दीतील काही बायका, ज्यांना वातावरणाचा तो ताण असह्य झाला, त्याही अंगात येऊन घुमत त्या मोकळ्या जागेत अक्षरशः आपटू लागल्या. त्यांना उठवणे, पाणी शिंपडणे, त्यांचा जयघोष करणे हे प्रकार टिपेला पोचले. परिस्थिती अशी झाली की क्षणभर मणी आणि युगिलाही वाटले की भक्तीची ही कोणती पातळी आहे जिथे स्वत्वाची भावनाच नष्ट होते? सर्व वातावरणच जणू भारले जाते? काय ही श्रद्धा? काय हे समर्पण? पण भानावर राहणे आवश्यक होते. आसमंतात धूप, ऊद, हळद आणि कुंकू ह्यांचा मिश्र गंध पसरलेला होता. लांबून झुंडी येऊ लागल्या होत्या. आणि अचानकच ते घडले......

भामाबाई अंगावरील पातळ सोडत कर्कश्श आवाजात चेहरा भयावह करून उद्गारली......

"बळीऽऽऽ ... कुठाय बळीऽऽऽ???"

गर्दी एकीकडे धावली. काही पुरुषांनी घाईघाईने ते बोकड दोरातून सोडवले. आता ते बोकडे भेदरल्या अवस्थेत गर्दीमध्ये आणण्यात आले व मरीआईसमोर उभे करण्यात आले. मणी आणि युगि गोंधळून एकमेकींकडे पाहातच राहिल्या. हे काय चाललेले आहे? पण तेवढ्यात सगळा प्रकाश पडला...... भामाबाई भयंकर प्रकारे ओरडत म्हणाली.....

"आधी आईसाठी आणलेला बळी द्या...... आम्चा बळी आमास नंतर द्या...... आधी आई मंग आमी भक्त"

९९% गर्दीला काहीही समजेना! दोन बोकड जर भामाबाईसाठी असलेले बळी असतील तर मरीआईला कोणता बळी हवा आहे. मात्र स्वतः भामाबाई, मणी, युगि, दोन महिला पोलिस आणि गर्दीतील एकाच कुटुंबातील चौघांना व्यवस्थित माहिती होते की तो बळी कोणता होता!

त्याच क्षणी एका कोपर्‍यातून अचानक भयानक रडण्याचे आवाज आले. प्रचंड रेटारेटी झाली. कोणी दोघे तिघे इतरांना धक्काबुक्की करू लागले. एक पुरुष घाईघाईने मोकळ्या जागेकडे सरकू लागला. त्याच्यामागे एक तरुण स्त्री जिवाच्या आकांताने ओक्साबोक्शी रडत आणि गर्दीला मदतीची याचना करत धावू लागली. अचानकच तो पुरुष मोकळ्या जागेत आला. गर्दीच्या जिवाचे अक्षरशः पाणीपाणी झाले ते दृष्य पाहून! त्या पुरुषाच्या हातात हळद कुंकवाने माखलेले आणि उलटे पकडलेले असे सहा महिन्याचे एक मूल होते. ते मूल त्याने भामाबाईसमोर धरले तशी भामाबाई सुखातिरेकाने भयानक हसू लागली. घडता प्रकार पाहून गर्दी मागे मागे सरकू लागली. भामाबाई किंचाळली......

"मरी आई, हा नरबळी घे, गावाचा उद्धार कर माते"

थिजलेल्या डोळ्यांनी गावकरी बघू लागले. त्या पुरुषाने ते मूल एका दगडावर ठेवले. ते तान्हे मूल रडत होते. ते दगडावर ठेवले जाताच त्याची आई सगळा विरोध मोडून काढत त्याच्या अंगावर पडली आणि नवर्‍याकडे बघत रडत म्हणाली......

"मला मारा वो.... मला मारा... ह्या प्वरीला नका मारू........"

त्या स्त्रीला कोणीतरी फरफटत लांब नेऊ लागले. पुढचे काहीही कोणालाही बघवत नव्हते. त्या पुरुषाने एक कोयता उचलला आणि मरीआईला नमस्कार करून जणू त्या तान्ह्या मुलीचा नैवेद्य दाखवला आणि कोयता उचलताच.....

लख्ख सूर्यप्रकाश असूनही कॅमेर्‍यांचा लखलखाट झाला. युगिने ते सर्व क्षण कॅमेर्‍यात बद्ध करून मागच्यामागे धूम ठोकली. कोणालाही काहीही कळायच्या आत मणीच्या हातात आलेल्या एका काठीचा जबरदस्त तडाखा त्या पुरुषाच्या हातावर बसला. पाठोपाठ दुसरा तडाखा त्या पुरुषाच्या डोक्यात आणि तिसरा भामाबाईच्या खांद्यावर! भामाबाई आणि तो पुरुष दोघेही कोसळले तशी गर्दी बेभान झाली. पण दोन महिला पोलिस, ज्या गर्दीतच होत्या, त्यांनी लाठीहल्ला सुरू केला आणि तोंदाने शिव्यांचा पट्टा! त्यातच कुठूनतरी पोलिसची जीपही आलेली दिसली. गर्दी भयातिरेकाने पांगू लागली. केवळ दहा मिनिटांत...... केवळ दहा मिनिटांत त्या जीपमध्ये हातात बेड्या घालून भामाबाई आणि तो पुरुष बसलेले होते. दुसर्‍या एका गाडीत मणी, युगि आणि लोणंदला त्या जिच्या घरी थांबल्या होत्या ती स्त्री अश्या तिघी बसून लोणंद स्टेशनवर निघालेल्या होत्या.

वाठार गाव थक्क झालेले होते. बहुतेकांच्या मते आज मरीआईला बोकडांचा नैवेद्य दाखवून मग मटण मिळणार होते. पण एकाच कुटुंबाला माहीत होते की ते त्यांच्या सख्ख्या सहा महिन्याच्या मुलीचा बळी सर्वांसमक्ष देणार होते. तो बळी दिल्यास कोणीही कधीही काहीही वाकडे करू शकणार नाही आणि प्रचंड बरकत होईल असे आश्वासन मरीआईच्या वतीने भामाबाईने त्यांना दिलेले होते. हा बळी गुप्तरीतीने देणे मात्र चालणार नव्हते. एक प्रकारे सर्वांसमक्ष बळी दिल्याने दहशतही बसणार होतीच. माणसाला माणूस का म्हणू नये हेच जणू सिद्ध केले जाणार होते. मटनासाठी लोटलेली गर्दी अचानक ते तान्हे मूल दगडावर ठेवलेले पाहून श्वास घेणेच विसरून थिजून उभी राहिली होती. आणि कोयता खाली यायच्या आत चार बायकांनी तो बेत धुळीला मिळवलेला पाहून अनेकांच्या भामाबाईवरील श्रद्धेस सुरुंग लागलेला होता. जनक्षोभ उसळला खरा पण मनात कोणालाच नरबळी ही क्ल्पनाही पटलेली नव्हतीच. त्यामुळे दिङ्मूढावस्थेत गर्दी असतानाच पोलिस आलेले होते आणि गर्दी पळत सुटलेली होती.

एक घोर पाप, जे सहज घडणार होते, ते सोपान उदयच्या दोन नाजूक तरुणींनी उधळून लावलेले होते......

...... भामाबाई आणि त्या पुरुषाला कोठडीत मारहाण होत असताना बाहेर बसलेल्या मणी आणि युगिला ती लोणंदमधील बाई खासगी स्वरात सांगत होती......

"आजची कामगिरी उत्तम पार पाडलीत...... पण एक मोठी कामगिरी आता हाती घ्यायची आहे..."

घामाघूम झालेल्या युगिची बोलतीच बंद झालेली होती. मणीने त्या स्त्रीला विचारले......

"कोणती कामगिरी आशाताई?"

आशा पाटील! एक सणसणीत व्यक्तिमत्व, जे सोपान उदयला ग्रामीण भागातून मदत करत होते.

आशाने उत्तर दिले......

"वीर गावात एक महाराज अवतरलाय...... त्याचा पर्दाफाश करायचाय?"

"वीर? कुठे आहे हे वीर?"

:इथून सदतीस किलोमीटर...... जिल्हा साताराच"

"कोण म्हणे हा महाराज?"

"अवलिया बाबा! तिन्मुर्ती दत्ताचा अवतार! गाव खुळा केलाय त्यानं"

मगाचपासून घाबरलेल्या युगिला आशाने जवळ घेतले आणि मणी गंभीर होत चौकीच्या दारात उभी राहिली. तिची स्मरणशक्ती जर तिला धोका देत नसेल, तर ह्याच अवलिया बाबाने अनेक स्वच्छता अभियाने काढलेली होती, संस्कार वर्ग सुरू केले होते, मग त्याचा पर्दाफाश का करायचा होता??????

तेवढ्यात मागून तिला, आशाला आणि युगिला कोणीतरी आतल्या साहेबाकडे बोलावले. तिघी आत गेल्या तशी एक महिला पोलिस त्या तिघींना म्हणाली......

"ती भामाबाई सेटलमेंटला तयार आहे...... तीन तीन लाख देते म्हणतीय...... तुमचं काय म्हणणं?"

================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बापरे..................... मस्त चाललीय कथा

जब्बरदस्त!!!!!!! नेहमी प्रमाणे भारी!!!!

खुप उशीरा प्रतीक्रिया देतेय बेफी..पण आत्तापर्यंतचे सगळे भाग मोबाईलवर वाचत होते, त्यामुळे प्रतीक्रिया नाही देता आली... पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत!!!!

श्वास रोखुन बघणं माहित होत्...आज श्वास रोखुन वाचनं अनुभवल्..अजुन धड्धडतय..
मस्त बेफी...

Angry बेफिकिर पुन्हा जर का इतका उशिराने भाग टाकला ना तर बघत रहा..... कधी पासून वाट बघत आहोत आम्ही

बाकि कहानीत ट्विस्ट एकदम जबराट

mastach..

वीर तालुका पुरंधर जिल्हा पुणे हे मला माहीत आहे आबासाहेब, मुद्दाम तसे लिहिले आहे.
>>>>> ओह, ओके Happy

नीरा परिसर चांगलाच माहीत आहे तुम्हाला.
अगदीच अवांतर : वीरची यात्रा सुरू झालीयं Happy

कथा आवडली म्हणनार नाही कारण आवड्ली या शब्दात बसवता येत नाही
बापरे बेफी भयानक ह व्टिस्ट तर पचलाच नाही आणी तुमच्या बोक्याची आठवण करुन दिली मणीने
उशीरा आली कथा पण अप्रतीम

< जग म्हणजे एक थांग न लागू शकणारा समुद्र आहे. वरवर सगळेच आरामात पोहताना दिसतात पण प्रत्येकजण दमलेला आहे, थकलेला आहे, तरीही मरू इच्छीत नाही आहे, बुडू इच्छीत नाही आहे. प्रत्येकाला काठच गाठायचा आहे. एकमेकांना खाली खेचूनच तो काठ गाठता येतो अश्या भ्रमात प्रत्येकजण आहे. पण युगि, कोणालाही अजिबात त्रास न देता आणि कोणाचाही अजिबात त्रास न करून घेताही काठ गाठता येतो. आणि कोणास माहीत? कदाचित काठ गाठणे हा अंत नसेलही ह्या प्रवासाचा! तेव्हा आला क्षण नव्याने पारख, अनुभव महत्वाचा आहेच, पण नव्या क्षणाला तुझ्यातला नवेपणा, ताजेतवानेपणाही दे! जे तुला भेटतील त्यांना फ्रेश वाटूदेत, जगण्याचे बळ येऊदेत. त्यातूनच तुला जगण्याची उर्जा मिळत राहील. > अप्रतिम!