या इथे कधी काळी देखणे शहर होते (तरही)

Submitted by वैवकु on 24 January, 2014 - 15:16

काळ चांगला होता ..लोक बेखबर होते
या इथे कधीकाळी देखणे शहर होते

चालवायचो मी ते फार चालले नाही
वेगळ्या विचारांचे ते नवे सदर होते

कालची नशा नाही आजही उतरलेली
ज्या नशेत तू माझे चुंबिले अधर होते

फक्त तेवढ्यांवरती चालली तिची सत्ता
एक शेजघर होते एक माझघर होते

मी कधीच सौख्यांचा चंद्र पाहिला नाही
ज्या कुशीसही वळलो दु:ख रात्रभर होते

जीवजाळती माफी तू नकोस मागू ना
मीच आपल्यामधले छेडले समर होते

रोज मानतो त्यांचे ऋण अता सुना रस्ता
ज्याकुणी इथे काही लावले तगर होते

मीच राखतो थोडे हातचे असे काही
शेर छान झाला की वेदना प्रखर होते

वेगळे असे काही होत फारसे नाही
जे मला हवे आहे तेच फारतर होते

मी जिथे जिथे जातो लोक मारती जोडे
विठ्ठला तुझ्यापायी केवढी कदर होते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त तेवढ्यांवरती चालली तिची सत्ता
एक शेजघर होते एक माझघर होते

अप्रतिम, वैभव.

चालवायचो मी ते फार चालले नाही
वेगळ्या विचारांचे ते नवे सदर होते

वेगळे असे काही होत फारसे नाही
जे मला हवे आहे तेच फारतर होते

दोन्ही शेर आवडले. काही नवे शब्द शिकलो.

धन्यवाद.

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार
पुण्याचीविनिता ह्यांचे विशेष आभार माझ्या गझलेवर पहिल्यांदाच त्यांचा प्रतिसाद पाहतो आहे Happy

अतिशर सुंदर गझल….

'माजघर' शेर अप्रतिम झालाय.

चालवायचो मी ते फार चालले नाही
वेगळ्या विचारांचे ते नवे सदर होते

सुंदर…

कालची नशा नाही आजही उतरलेली
ज्या नशेत तू माझे चुंबिले अधर होते

व्वा…

मी कधीच सौख्यांचा चंद्र पाहिला नाही
ज्या कुशीसही वळलो दु:ख रात्रभर होते

सुरेख शेर… ( सौख्यांचा ऐवजी सौख्याचा अधिक चांगले वाटेल का ?)

गझलेची लगावली जाम आवडली…

शुभेच्छा.

धन्यवाद अमित मु.कु. आणि फाटक साहेब
मु.कु. विशेष आभार आपले . माघर <<थोडीफार शाहनिशा (की शहानिशा Uhoh ) करून योग्य तो बदल करीनच Happy

आता एक लहानसा बदल सुचला आहे एका शेरात तो करत आहे ..

रोज मानतो त्यांचे ऋण अता सुना रस्ता
ज्याकुणी इथे काही लावले तगर होते

पुनश्च आभार सर्वांचे

फक्त तेवढ्यांवरती चालली तिची सत्ता
एक शेजघर होते एक माझघर होते

आवडला....

फक्त "माझघर" असते का "माजघर" या बद्दल शंका आहे.

जाणकारांनी निरसन करावे...... (जाणकारांनीच... )