अनैतिकता , संगीत दिग्दर्शक आणि Nostalgia चे उमाळे

Submitted by बावरा मन on 12 January, 2014 - 02:11

मी अशात ऐकलेली नवीन वैचारींक पिंक :

headphone वर गाणे ऐकत बसलो होतो .

बाजुच्या डेस्क वरचे काका ," काय रे ? काय ऐकत आहेस ? "

"आतिफ अस्लम ."

त्यांनी माझ्याकडे सहानुभूती पूर्वक कटाक्ष टाकला . त्याला माझा आक्षेप नव्हता . पण ते जे काही बोलले त्यामुळे मी पार भंजाळून गेलो . इतका की ते वाक्य पूर्ण पणे quote करण्याचा मोह आवरत नाही .

"तुमच्यासमोर दुसरे काही चांगले option नाहीत का रे ? हे आजकालची पोर (संगीत दिग्दर्शक ?) इंग्लिश गाणी चोरतात आणि तुम्हाला ऐकवतात . तुम्हाला पण जे काही बाही पाश्चमात्य ते सगळ गोड वाटत . आमची पिढी त्याबाबतीत खूप नशीबवान . काय ते दिग्गज एकेक संगीत दिग्दर्शक होते त्याकाळी . ओपी , बर्मन साहेब , सलिल चौधरी . वा वा ! देवाघरची माणस सगळी . त्यांनी या मातीतल संगीत दील . काय त्या रसाळ चाली . काय ती melody !आणि हे सगळ original बर का. तुमच्या अनु मलिक आणि प्रीतम सारख्या चोऱ्या नाही केल्या त्यांनी. "

असे कुणी पिढीचे हिशेब द्यायला लागले की टाळके सरकते . भारतीय चित्रपटा च्या इतिहासात मला रस असल्याने मी त्यावर थोड फार वाचन केल होत . त्यामुळे मला हे माहित होत की भारतीय चित्रपट हा plagiarism चा इतिहास अंगावर भरजरी दागिना बाळगावा त्याप्रमाणे वागवतात . अगदी सुरुवातीपासून . मग च्यामारी ह्या ५०, ६० आणि ७० च्या दशकातल्या म्युझिक directors एकदम कसे काय गुणवत्तेची खाण निपजले की त्याकाळातले लोक आज पण त्यांच्या नावाने उसासे टाकत असतात ? अशी कशी bollywood रुपी चिखलात हि कमळ उगवली ? दाल मे जरूर कुछ काला है म्हणून थोड अधिक संशोधन केल . मग कळल की पूर्ण दालच काली आहे .

म्हणजे अस बघा . आजा सनम मधुर चांदनी मे हम हे राज कपूर च्या चोरी चोरी मधल शंकर -जयकिशन च मधुर गाण एका गाण्यावरून (http://www.youtube.com/watch?v=U-xsosv6uM0) सरळ सरळ ढापल आहे हे कळाल्यावर धक्का नाही बसणार ? दिल तडप तडप के कह रहा है आ भी जा हे सलिल चौधरी च रसाळ गाण सही सही नक्कल (http://www.youtube.com/watch?v=jLijXZBsdbo) आहे हे कळाल्यावर धक्का नाही बसणार . आर ड़ि बर्मन आणि ओपी ची अख्खी कारकीर्द चोरलेल्या इंग्लिश गाण्याच्या पायावर उभी आहे हे कळल्यावर भारतीय म्हणून वस्त्रहरण झाल्याचा फील नाही येणार का ? आमच्या पिढीच एक ठीक आहे हो पण 'सुवर्ण काळाच्या ' आठवणी काढून उसासे टाकणाऱ्या व आजकालच्या संगीताला उठसुठ नाव ठेवणार्या बाजूच्या डेस्क वरच्या काकासार्ख्या लोकाना काय वाटेल ? ज्या nostalgia च्या आपण दिवसरात्र ढेकरा देतो तोच अनैतिक पायावर उभा आहे हे कळल तर पायाखालच जाजम काढून घेतल्यासारख feeling नाही येणार त्यांना ?

वस्तुस्थिती हि आहे की या तथाकथित 'सुवर्ण कालामधली ' अनेक गाणी ही त्याकाळच्या हिट इंग्रजी गाण्यावरून चोरलेली होती . त्यासाठी आपल्या गुणवान संगीत दिग्दर्शकांनी मुळ गाण्याची मालकी ज्यांच्याकडे होती त्यांच्याकडे परवानगी घेण्याची तोशीस पण घेतली नाही हे तर उघडच आहे . दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हि शुध्द चोरी होती . या चोरी चे अनेक तपशील तुम्हाला इथे सापडतील .
http://mrandmrs55.com/2012/08/24/plagiarism-in-hindi-film-music-is-imita...

http://www.itwofs.com/hindi-opn.html

nostalgia चे उमाळे काढणाऱ्या लोकांचे आद्य सरदार जे की शिरीष कणेकर याना याबाबत कुणीतरी भर कार्यक्रमात प्रश्न विचारला . कणेकर काही क्षण नक्कीच गडबडले असतील पण त्यांनी जी मखलाशी केली ती मुळातून वाचण्यासारखी आहे . कणेकर म्हणतात ," त्यांनी गाणी चोरली हे अमान्य करण्यात अर्थ नाही पण त्यांनी या गाण्याचं 'भारतीयकरण ' केल आणि त्यात जी melody आणली त्याच श्रेय या संगीत दिग्दर्शकाना द्यायला हव ." म्हणजे चोरी ते चोरी वर सिनाजोरी ?

या निमित्तान काही प्रश्न उपस्थित होतात .
१) अन्नु मलिक , प्रीतम , ओपी आणि बर्मन पितापुत्र हे संगीत शर्विलक या एकाच श्रेणीतले म्हणून गणले जाणार का ?

२) आता सगळाच मामला चोरीचा आहे हे कळल्यावर तरी nostalgia चे उमाळे थांबतील का ?

३) ओपी नय्यर आणि तत्सम संगीत दिग्दर्शक चोर आहेत हे कळल्यावर त्यांच्या भक्तांच्या भावना बदलणार आहेत का ?

मी जमा केलेला संगीत चोरीचा डाटा बाजूच्या डेस्क वर च्या काकाना मेल करणार होतो . पण नाही केला . ज्याचा त्याचा nostalgia . हल्ली मी माझ्या डेस्कवर आमच्या रहमान च्या rockstar ची गाणी फुल आवाजात ऐकतो .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व लिंक्स पाहिल्या. दिल तडप तडप के हे उदाहरण लगेच पटले. तसेच पुढच्या दोन लिंक्समध्ये उदाहरणे दिसली व हेही कळले की मूळ गाण्यांच्या लिंक्स तपासल्या तर ती उदाहरणेही कमी जास्त प्रमाणात पटतील.

त्यामुळे मनात नसूनही लेखाला अनुमोदन द्यावे लागत आहे ह्यात लेखाचे यश सामावलेले आहे असे वाटते.

आता प्रश्न असे उरले आहेत की:

१. असे एकही उदाहरण नसेल का की आपल्याकडील चाल चोरून इतर कोणी गीतनिर्मीती केली?

२, असे एकही उदाहरण (दिलेल्या उदाहरणांत) नसेल का की खरोखरच आपल्या संगीतकारांना तशीच ट्यून सुचली?

३. एका ट्यूनवरून प्रेरणा घेऊन ती मॉडिफाय करून आपल्या समाजाच्या अभिरुचीनुसार अधिक चांगली ट्यून बनवली तर त्याचे सगळेच श्रेय काढून घेणे योग्य आहे का?

आणि

४. एवढे सगळे करून मूळ शायराचे शब्द बरोब्बर त्या ट्यूनमध्ये बसवून जी आशयघन आणि मेलोडियस गीतांची निर्मीती झाली त्यांचे मोल काहीच नाही असे म्हणता येईल का?

खरे तर पाचवाही प्रश्न आहे मनात, पण तो वादग्रस्त ठरू शकेल.

तरी विचारतोच.

५. ह्या उदाहरणांमुळे आर डी, ओ पी, सलील वगैरे लोक इतके निकृष्ट ठरतात का की आज ज्यांना आशयाशी, मेलडीशी, गोडव्याशी सुतराम घेणेदेणे नाही त्या संगीतकारांना त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ मानले जावे, केवळ (कदाचित) ते ओरिजिनल ट्यून्स देतात म्हणून? भारतीय संगीतक्षेत्रात जी अद्भुत शिखरे पादाक्रांत केली गेली त्यांचा काहीच प्रभाव आपल्या चित्रपट गीतांवर नाही का? ही दिलेली उदाहरणे प्रातिनिधिक असून त्या त्या संगीतकाराने फक्त चोर्‍याच केल्या का? आजचे संगीतकार जे दिवे लावतात त्यापेक्षा मग भुरळ घालणार्‍या ह्या चोर्‍या बर्‍या असे कितीजणांना वाटते? (मला वाटते)

-'बेफिकीर'!

काहीही लेख
आता सगळाच मामला चोरीचा आहे >> हे तुम्ही किती गाण्यांच्या अभ्यासावरून ठरवल ?
तुम्ही संशोधन म्हणालात (हल्ली या शब्दाची काही किंमतच ठेवली नाही आहे लोकानी ) तर तुम्ही अशी जुनी किती गाणी ऐकलीत.
ओपीने १००० गाणी दिली त्यातली ६७६ चोरीची होती असा डेटा असेल तर द्या .

अन्नु मलिक , प्रीतम , ओपी आणि बर्मन पितापुत्र हे संगीत शर्विलक या एकाच श्रेणीतले म्हणून गणले जाणार का ? >> बाकी हा प्रश्न ज्याला पडतो त्याला कोण काय उत्तर देणार ? Sad

प्रश्नः <अन्नु मलिक , प्रीतम , ओपी आणि बर्मन पितापुत्र हे संगीत शर्विलक या एकाच श्रेणीतले म्हणून गणले जाणार का ?>

ऊत्तरः नाही.

आर ड़ि बर्मन आणि ओपी ची अख्खी कारकीर्द चोरलेल्या इंग्लिश गाण्याच्या पायावर उभी आहे>>>>>>
कृपया..
रैना बीती जाए (अमर प्रेम)
आयो कहांसे घनश्याम (बुड्ढा मिल गया)
हमे तुमसे प्यार कितना (परवीन सुलताना वर्जन)
बडा नटखट है रे (अमर प्रेम)
बीती ना बितायी रैना(परिचय)
बहुत शुक्रिया बडी मेहेरबानी (एक मुसाफिर एक हसीना)
दीवाना हुआ बादल (कश्मीर की कली)
आप युंही अगर हम से मिलते रहे (एक मुसाफिर एक हसीना)
ये देश है वीर जवानो का (नया दौर)
या गाण्यांच्या मूळ इंग्रजी गाण्यांच्या चाली द्याल का?

माझ्या लेखावर दुसऱ्या एका संकेतस्थळावर आलेला चिन्मय खंडागळे यांचा हा reply इथे quote करण्याचा मोह आवरत नाही :

आपल्या हिरोजचे पाय मातीचे आहेत हे कळल्यावर माणूस कसा डिनायल मोडमध्ये जातो आणि आक्रमक होऊन प्रतिवाद करू लागतो त्याचं वरचे प्रतिसाद म्हणजे उत्कृष्ट उदाहरण आहेत. 'तुम्ही ज्याची पूजा करता आहात तो देव नाही, एक पाषाण आहे' असं सांगितलं तर लोक मारायला धावतातच.
तुम्ही सांगितलं आहे त्यात नवीन काहीच नाही. 'आयला, ते ४०-७० च्या दशकातले संगीतकार किती थोर्थोर! एवढ्या अद्भुत रचना एवढ्या सातत्याने देणं म्हणजे काय प्रतिभा असेल नै' अशी सर्वसाधारण रसिकाप्रमाणे माझीही कल्पना होती. हळूहळू पाश्चात्य संगीत ऐकण्याचं प्रमाण वाढत गेलं, तसतसे शॉक्स लागत गेले. पूर्वी आजच्यासारखा माहितीविस्फोट झाला नव्हता म्हणून या ढापू लोकांच्या चोर्‍या खपून जात. आजकाल लोक बर्‍यापैकी बहुश्रुत होत असल्यामुळे नव्यांच्या चोर्‍या तर पटकन समजतात, पण काही सणसणीत धक्केपण बसतात. युट्यूबसारख्या साईटवर व्हिडिओखालचं कॉमेंट सेक्शन वाचत जा. बर्‍याचवेळा ते गाणं कोणत्या गाण्यावरून ढापलं आहे त्याची थेट लिंक कोणीतरी दिलेली असते. माझ्या मते बहुतेक गाजलेल्या फिल्मी गीतांपैकी ९०% (याहून जास्त, बहुदा जवळजवळ सर्व!) गाणी ही आयदर अभारतीय संगीतातून कुठून ना कुठून ढापलेली, किंवा भारतातल्याच कुठल्यातरी प्रांतातील फोक ट्युनवर आधारीत, किंवा भारतीय शास्त्रीय संगीतातल्या एखाद्या जुन्या चीजेवर बेस्ड असतात. (दुसर्‍या आणि तिसर्‍या कॅटेगरीवर आक्षेप नाही). बरं या लोकांचं केवळ पाश्चात्य संगीतावर भागत नसे. जगाच्या कानाकोपर्‍यातून हे लोक बिनदिक्कत चाली उचलत, (आणि आजचेही उचलतात) मी वाचलं आहे त्याप्रमाणे चित्रपटाचा निर्माता तेव्हा गाजत असलेल्या पाश्चात्य गाण्यांच्या रेकॉर्ड्सची चळत आणून संगीत दिग्दर्शकासमोर टाकत असे, आणि 'ठोक यातून चारपाच चाली' अशी ऑर्डर टाकत असे. संगीत दिग्दर्शक साहेब मग तीच चाल जरा इकडून तिकडून फिरवून त्याचं अल्ट्रेशन, सॉरी सॉरी 'भारतीयीकरण' करून देत.

याउलट पाश्चात्य साँग-रायटर्सनी भारतीय गाण्यातलं एखादं टुंयटुंय जरी उचललं, (सँपलिंग केलं) तर आधी परवानगी घेतली जाते, गाण्याचे हक्क ज्याकडे असतील त्याला त्याचा मोबदला मिळतो, आणि क्रेडिट दिलं जातं. अलिकडच्या ग्रॅविटी चित्रपटात एक पात्र नुसतं 'मेरा जूता है जपानी' असं गुणगुणतं, तर एण्ड क्रेडिट्समध्ये त्याचा व्यवस्थित श्रेयोल्लेख केला होता.

अनेक जुन्या संगीत दिग्दर्शकांनी इंग्रजी गाणी ढापली आणि श्रेय स्वतः घेतलं याला माझा आक्षेप आहे . आणि तो काळ सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो आणि त्याचे reference आज पण दिले जातात हे दुर्दैव .

प्रिसाइजली!

तसे तर पूर्णपणे भारतीय शास्त्रीय संगीतातील रागदारीवर आधारित गाण्यांना पण चोरी म्हणणार का?

अर्थातच नाही, अभिजात भारतीय संगीत हे केवळ आपल्यासाठीच नाही, तर जगासाठी असलेला ठेवा आहे, पण असं बघा, नदीवर जाऊन पाणी आणणं, आणि शेजारच्याच्या विहीरीवरून त्याला न विचारता पाणी उपसणं, यात काही फरक आहे की नाही?

बाकी, काही 'अवीट चवीची' हिंदी-मराठी चित्रपटातली गाणी आणि त्यांची ओरिजिनल्स यांची काही उदाहरणं देणार होतो, पण ते म्हणजे समुद्रातल्या माशांच्या थव्यातले चारपाच मासे दाखवल्यासारखं होईल. अशा गाण्यांच्या साईट्सच्या साईट्स उपलब्ध आहेत. इच्छुकांनी शोधाव्यात. उदा. http://www.itwofs.com

बाकी, थोडाफार फेरफार केला तर ती काही चोरी नाही ठरत, असे म्हणणार्‍या वरच्या काही मंडळींनी मिसळपाववर यापूर्वी बरंच ओरिजिनल लेखन केलं आहे. त्यातलाच एखादा लेख, ललित, कविता कोणी उचलून, पात्रांची नावं बदलून, जरा इकडेतिकडे फेरफार करून आपल्या नावाने प्रसिद्ध केलं तर त्याला चोरी म्हणणार की कसं?

मूळ लेख वाचला.
उत्तरे, दुरुत्तरेही वाचली.

एक शिळी, घिसीपिटी उक्ती आहे. 'व्यासोऽच्छिष्टंजगत्सर्वं' त्यानुसार सगळ्या पॉप्युलर ट्यून्स आधीच लिहून झाल्यात. उदा एक प्रश्न विचारतो.

भैरवीत बांधलेली गाणी सांगा?

सगळ्या यच्चयावत भैरव्या अन त्यावर बेतलेली क्लासिकल बंदिश वा सुगम संगीत वा चित्रपट संगीत कॉप्याच नं?

वरच्या लेखात दिलेल्या उदाहरणांतले एकही गाणे हुबेहूब कॉपी वाटले नाही. Happy गाण्याची कॉपी कशाला म्हणायचे? तर ओरिजिनल चालीत ओढून ताणून शब्द बसवून म्हणणे. हृदयनाथही लोकसंगीतातून चाली 'चोरतात'.

उदा. सेल्फ कंट्रोल मधील ओह हो हो.. सकट कॉपी आहे. कोणते ते आठवतेय का?

याशिवाय तू चीज बडी है मस्त मस्त चे मूळ गाणे इथे आहे हे ऐकून मजा वाटलेली. ही आहे कॉपी.

पण लेखात दिलेल्या 'कॉपी' नाहीत, असे नमूद करू इच्छीतो.

Classics will stand the test of time! ५० वर्ष झाली तरी आज ही गाणी ऐकली जाताएत. जर ५० वर्षांनंतर देखिल लोक अन्नु मलिक ची गाणी ऐकत असतील तर तेव्हा आपण अन्नु मलिक आणि शंकर जयकिशन यांची तुलना करु!
ह्या सो कॉल्ड चोरलेल्या गाण्यांच्या गीतकारांचं मला खूप कौतुक वाटतं! Hats off to them!

तो निषेध मुळ लेखाचा आहे, नाहीतर उगाच प्रतिसादकर्त्यांचा गैरसमज व्हायचा.
जाऊ द्या ना राव होते पुर्वीचे सगळे भंगार आणि आहेत आजकालचे सगळे भारी,
खुश ???

गीतकारांबद्दल काही म्हणता येईल का याच चालीवर ?कदाचित त्यांच श्रेय आपण मोजतच नाहीय वाद घालताना. त्यांना वगळून तुलना पूर्ण होईल कशी दोन काळांमधली ?

ह्रदयनाथांच्या चाली लोकसंगीतावर किंवा जुन्या बंदिशींवर"बेतल्या" आहेत असे म्हणतात तर अनु मलीकसाहेबांच्या "चोरल्या "आहेत असे म्हणतात. वरील प्रश्न हा बेतणे व चोरणे ह्यातील फरकाबद्दल असावा.
आता बाळासाहेबांची काही गाणी डायरेक्ट बंदिशींवर बसवली आहेत. जसे की....
http://gaana.com/song/vitari-prakhar-tejobal
आणि
http://www.youtube.com/watch?v=1bpKU4WKnlY
(हे पद दिनानाथांनी गायले असले तरी त्याचे संगीतकार वेगळे (वझेबुवा) आहेत)
मी मज हरपून, सुहास्य तूझे हेही अश्याच एका बंदिशीवर आधारित.
बोल रे पपिहरा...डायरेक्ट बंदिश.
दयाघना...रसुलील्लाह बंदिश
अर्थात बाळासाहेब स्वतःसुद्धा मूळ स्त्रोत कधीच लपवत नाहीत.
तस्मात....उगम/स्त्रोत संगीतकाराने जाहीर केल्यास त्यास बेतले म्हणावे काय, व त्याने तो लपवून ठेवल्यास त्यास चोरले म्हणावे काय ह्या विचारात न पडता, नक्कल करायलाही अक्कल लागते असे म्हणावे व गाण्याचा आनंद घ्यावा.

माझ्या मते बहुतेक गाजलेल्या फिल्मी गीतांपैकी ९०% (याहून जास्त, बहुदा जवळजवळ सर्व!) गाणी >>
बावरा मन साहेब , जरा डेटा द्या ना हो . Happy
आम्ही बापडे अस मते वगैरे समजत नाही . जरा आकडे वगैरे असले की बर वाटत .
आता तुम्ही म्हणताय ९०% वगैरे म्हणजे तुम्ही जुनी सगळी (हजारो) गाणी आणी त्यांचे ओरिजिनल ऐकले असणार ना ? जरा त्रास घ्या अन आम्हालाही कळू द्या .
मग तुमच्या आधी मीच म्हणतो , कुठला कोण आरडी , अनु मलिक इज द बेस्ट .

<असे कुणी पिढीचे हिशेब द्यायला लागले की टाळके सरकते > टाळकं सरकल्यावर असे लिहिले म्हणावे की टाळके कायम सरकलेले असते असे म्हणावे? लेखाचा उद्देश केवळ आणि केवळ नोस्टाल्जिकांना चिथवणे हा आहे हे शीर्षकातून, लेखातून लक्षात आले नसेल तर प्रतिसादातून त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अनेक गाणी उचललेली आढळली म्हणजे "संपूर्ण दालच काली आहे"; "हिंदी सिनेसंगीताचे सुवर्णयुग चोरलेल्या सोन्याचे आहे" असली सत्तेवर येण्यापूर्वीच्या केजरीवाल टाइप विधाने करणे सोपे आहे.

prosecutor, judge, jury and executioner स्वतःच झाल्यावर उत्तरादाखल येणारा मुद्दा हाही गुन्हाच असल्याचे लेबल तयारच आहे.

तिन्ही प्रश्नांची उत्तरे त्रिवार नाही अशीच आहेत.

त्या काकांना सी रामचंद्र नाही आवडत? Wink

<हल्ली मी माझ्या डेस्कवर आमच्या रहमान च्या rockstar ची गाणी फुल आवाजात ऐकतो .>

रहमानही आमचाच आहे बरं का. त्याच्यावरही शार्विलक असल्याचे आरोप झाले आहेत. तरीही या वरच्या लेखातल्या शार्विलकांची सफाई त्याच्याकडे असल्याने तोही आमचाच. त्यासाठी तो नोस्टाल्जियात जमा व्हायची गरज नाही.

माझ्या डेस्कवर आमच्या रहमान च्या rockstar ची गाणी फुल आवाजात ऐकतो >> काल रात्रीच रहमान
आणि आर्डी ह्याच्यातील कंपॅरिझन सद्रुश्य एक तासाचा कार्यक्रम ऐकला. आरडी यांनी अगदी लहान पणी बनविलेली एक धून एस्डींनी चित्रपटात वापरली आहे. मेरी टोपी वापस आजा असे काही तरी खेळकर
गाणे अगदी तरूण देव आनंद वर चित्रीत केले गेलेले आहे. तेच सेम रहमानचे. त्यांनी बालपणी बनविलेली एक कंपोझिशन त्यांच्या बाबांनी वापरली आहे. संगितात जनरेशन ग्याप चा प्रॉब्लेम का बरे जाणवावा असा जेन्युईन प्रश्न मला पडला आहे. मला मैं रंग शरबतोंका, अंबर सरिया, कबीरा, ते लुटेरातले गाणे पण खूप आवड्ते. चांगले संगीत कालातीत असते. आपले बारके जीवन ५० - ७० वर्शांत संपून जाईल. पण हे सूर इथेच राहणार आहेत.

जुन्या संगीत नाटकांची पुस्तके वाचली आहेत का? त्यात लिरिक्स च्या आधी कंसात अमुक अमुक राग, अमुक अमुक चीज असे दिलेले असे. ते चौर्य होते का?

टाइम पास ह्या मराठी सिनेमातले वेड लागले गाणे पण छान आहे. रंगपेटीत सहाच रंग असतात व ते मिसळून सर्व चित्रकार चित्रे काढतात पण त्यात त्यांचे पर्सनल जिनीअस किती असते, शैली असते ते
जगतात, फिरतात तिथल्या संस्कृतीचा असर पडतो. असे तुम्हाला वाट्त नाही का.

लाइफ इन अ मेट्रो मधले अलविदा, आणि इन दिनो पण आव्ड्तात.

मुक्काला मुकाबला गाण्यातील ड्रम्सचा पीसही सह्ही उचललेला आहे. पण त्या तमिळ तेलुगु गाण्यात तो काय मस्त फिट झालेला आहे. त्याने काही रहमान ह्यांचे जिनीअस डिफाइन होत नाही. डिमीन तर कधीच होत नाही. ते सगळे संगीत बनवतात आणि काही लोक्स डाटा जमवत राहतात.सच इज लाइफ.

र ड़ि बर्मन आणि ओपी ची अख्खी कारकीर्द चोरलेल्या इंग्लिश गाण्याच्या पायावर उभी आहे हे कळल्यावर भारतीय म्हणून वस्त्रहरण झाल्याचा फील नाही येणार का >>>> अख्खी कारकीर्द? अख्खी कारकीर्द? अख्खी कारकीर्द????????
या वरील विधानाला काही सांख्यिक आधार वगैरे आहे का? म्हणजे १०० गाण्यातली ९० गाणी चोरलीली? ही ती शंभर गाणी आणि त्यातली ही ९० गाणी अमुक इथून उचललेली असं काही! तसं असेल तर वरील विधान योग्य आहे, अन्यथा या आरोपाला काहीही अर्थ नाही.

मला एखादं गाणं आवडलं, प्रचंड आवडलं म्हणून मी ते मॉडीफाय करून ती चाल वापरली असं कित्येक नव्या-जुन्या संगीतकारांनी स्पष्ट कबूल केलेलं आहे. १९५०-६० दशकांना हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ असं मानलं जातं यामागे अनेक विविध कारणे आहेत "लोकांना गाणी चोरलेली आहेत" हे माहित नसणं हे त्यातले कारण नव्हे. चित्रपटसंगीत हा जॉनर विकसित होण्याचा काळ, त्या जॉनरने इतर संगीत प्रकारांवर चालू केलेला प्रभाव, चित्रपट या माध्यमावर "संगीत" हा पैलू म्हणून विकसित होण्याचा काळ, संगीतकार, गीतकार, वादक, रे़ऑर्डिंग, या सर्वांअम्धे होत असलेले विविध प्रयोग आणि त्या प्रयोगामुळे होणारे इतर संगीतावरचे प्रभाव, चित्रपट संगीताचा समाजाच्या मानसिकतेवर प डणारा प्रभाव, संगीताचा आणि प्रेक्षकांचा अभिरोचीवर पडणार प्रभाव हे सर्व जमेला धरून या काळाला "सुवर्णकाळ" असं संबोधलं जातं. त्या काळातली कित्येक गाणी आजही ऐकली जातात हा लोकांच्या आवडीनिवडीचा भाग झाला. असंच काहीसं १९८० ९० च्या दशकांना चित्रपटसंगीताचा सगळ्यात वाईट काळ असं मानलं जातं. पुन्हा त्याची कारण मीमांसा वेगळी आहे.

प्रश्न त्या संगीतकाराने गाणं चोरलं की नाही हा नसतोच, प्रश्न हा आहे की तुम्ही जेव्हा "अख्खी कारकीर्द" वगैरे शब्द बेजबाबदारपणे वापरता त्याचा आहे. अशी विधाने करायला काहीतरी ठोस आधार द्या, म्हणणे बिनशर्त मान्य करू या. पण उगाचच लिहायचे म्हणून itwofs.com अथव गूगलसर्चला "संशोधन" असे नाव देऊन मजेदार विधाने करू नका.

जुनी गाणी अवीट चवीची होती, कारण त्यामधे मेलडीला प्राधान्य होतं, नवीन गाणी ही बीट्सना जास्त महत्त्व देणारी अस्तात त्यामुळे थोड्या दिवसांनी ऐकवेनाशी होतात (हे सत्य आहे!) त्यामुळे तुमच्या शेजारच्या डेस्कवाल्या काकांचं म्हणणं बरोबर आहे.

खरंतर हा शब्द अनु मलिक अथवा प्रीतमसोबत देखील वापरणे अन्याय आहे, कारण त्याने चोरलेल्या चालींपेक्षा ओरिजिनल चालींची संख्या जास्त आहे. अनु मलिकने दिलेली बॉर्डर, रेफ्युजी, सर, फिर तेरी कहानी याद आयी, सारख्या सिनेमामधील चांगल्या ओरिजिनल गाण्यांची संख्या जास्त आहे. उचललेल्या गाण्यांची संख्या पंचवीस ते तीस असेल फार तर. (itwofs साठेक गाणी लिस्टमधे देतेय, पण त्यामधे काही "पॉसिबल सोर्सेस" आहेत, जशीच्या तशी कॉपी नाही)
अनु मलिकने गाणी चोरली तेव्हा भारतामधे पाश्चात्य संगीत मोठ्या प्रमाणात शिरत होतं, इथले लोक बाहेरचं संगीत ऐकू शकत होते, म्हणून आणी त्यादरम्यान त्याने केलेल्या काही बाष्कळ विधानांमुळे अनु मलिकचं बरंचसं हसं झालं होतं. तरीदेखील अनु मलिक चांगला संगीतकार आहे.

इंटरेस्टिंग लेख आणि चर्चा !
अशाच एका चर्चेत आरडी-एआर तुलना वाचली, तेव्हा आरडींवर असलेले हे चौर्याचे आरोप समजले होते. अन्य (जुन्या) संगीतकारांबद्दल पहिल्यांदाच ऐकले.

हास्यास्पद लेख! नंदिनीला अनुमोदन.
आदरणीय बावरा मन यांनी त्यांची सांगितीक जाण वाढवावी अशी मनापासून विनंती.
तुम्हाला विरोध करणारे लोक त्यांची 'हिरो वर्शिप' दुखावल्याने बिथरलेले आहेत हे तुम्ही आधीच गृहित धरलेले आहे आणि प्रत्येक कॉमेंट त्याच चष्म्यातून वाचणार याची खात्री आहे त्यामुळे कसलाच प्रतिवाद करण्याची इच्छा नाही.
बायदवे, अतिफ अस्लमही कधीकधी उत्तम गातो!

>> बायदवे, अतिफ अस्लमही कधीकधी उत्तम गातो
I beg to differ. रेंज चांगली असणे हेउत्तम गाण्याचे लक्षण ठरू शकत नाही.

नॉस्टाल्जीयातच रमायला आवडते त्यामुळे येथे मत देता येणार नाही. माझ्या सर्व गरजा जुन्या काळातील गायकांनी, गीतकारांनी आणि संगीतकारांनी पूर्ण केल्या आहेत. म्हणुन त्याकाळातुन आजवर बाहेर पडावेसेच वाटले नाही.

नवीन गाणी कानावर पडतात. त्यातली क्वचित काही आवडतात. पण फार काळ त्यांचा प्रभाव माझ्यावर टिकत नाही. नव्याबद्दल आकस असा नाही मात्र "काळाबरोबर राहायला हवे" असं काही मला कलेच्या बाबतीत वाटलं नाही.

मदनमोहनने सज्जाद हुसेनच्या समोर त्याच्या "ये हवा ये रात ये चांदनी" वरुन "तुझे क्या सुनाऊ मै दिलरुबा" हे बसवलं आणि "आजकल हमारे गाने तो क्या उनकी परछाईयांभी चलने लगी है" असा खास सज्जाद हुसेनी टोमणा ऐकुन घेतला. पुढे एका मुलाखतीत बहुधा अनिल विश्वास कडुन असे ऐकल्याचे आठवते कि " मैने किसी गैर के नही अपने बाप के खिसे से चोरी की है" रागदारीतील संगीतावर आधारीत गाण्यांसंबंधी काहीतरी प्रश्न विचारला गेला होता.

एखाद्या जुन्या संगीतकाराची अख्खी कारकिर्द चौर्यावर आधारलेली आहे हे मत मान्य करणे कठीण आहे.

'चोरी' ची व्याख्या प्रत्येकाची वेगळी.

अरे त्या बाप्प्याला विसरलात का. त्याच्या बद्दल बोलला असता तर एकवेळ मान्य केल असत हो.

लेखकाला दंडवत,
नंदिनी, आगावु या लेखावर प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्हाला वेळ जास्त झालेला नाही हे मला माहीत आहे. इथे वेळ वाया घालवु नका.
नंदिनी, तु तुझा टेंपर आवुट करुन घेवु नकोस......
लेखकास... GROW UP!!!

लेखकास उद्देशून....

तुम्हाला जे संगितकार आवडतात ते श्रेष्ठ आहेत हे दाखवण्यासाठी तुम्हाला दिग्गज संगितकारांचे पाय खेचावे लागले यातच सगळं काही आलं. तुम्ही जी गाणी सध्या ऐकत आहात ती गाणी तुमची मुलं देखिल ऐकतील का? हा प्रश्न स्वतःलाच विचारून बघा. कारण तुम्ही जी चोरलेली गाणी म्हणत आहात त्या गाण्यांत किमान तीन पिढ्यांनी अत्यानंदानं गटांगळ्या खाल्ल्या आहेत.

असो, जेव्हा 'जाण' येईल तेव्हा उपरतीचा एक लेख पाडाल ना?

आता मी जाते इटलीतून चोरलेल्या रेसिपीनं रिसोटो बनवायला..........

यानी, आणि बीथोवन च्या टयुन्स एकदा ऐकून बघा, त्यातले बरेच से पिसेस कुठ्ल्या न कुठ्ल्या हिंदी गाण्यात वापरलेली असतात. ज्यांना पुरावा हवा आहे त्यांनी तो स्वतः शोधावा...!
~सध्या, 'आता आठवतायेत ते फक्त काळेभोर डोळे' - (संदीप खरे) हे गाणं ऐकणारा बंडू

Pages