मुखवटे

Submitted by ashishcrane on 4 January, 2014 - 11:29

मुखवटे

"आज तरी विचारायलाच हवे. नाहीतर मला नाही जगात येणार. असं घुसमटून जगण्यापेक्षा मरणं नक्कीच सोप्पं असेल ना ? ही वेळ जात का नाहीये? आपल्याला नको वाटते तेव्हाच वेळ पुढे सरकायला वेळ का लावते?"
नाना प्रश्नांनी पल्लवी भांबावून गेली होती. रंगेबिरंगी सुंदर फुलांनी वेढलेल्या पलंगावरच्या पल्लवीला मनात प्रश्नांनी वेढले होते.

कधीकधी मिळालेलं सुखही संभ्रमात टाकतं. प्रश्न देऊन स्वतःची किंमत वाढवतं. उत्तरं नसली की, प्रश्न घेरून घेतात, धमक्या देतात, एकट्याला गाठून घाबरवतात. अशीच काहीशी परिस्थिती झाली होती पल्लवीची.
आज रात्र मधुचंद्राची होती. आयुष्यातला एक नाजूक क्षण. पण, आज तोच क्षण पल्लवीला खूप बोचत होता. सहसा माणसाला भूतकाळातल्या दुसऱ्यांच्याच चुका जास्त लक्षात राहतात. पण, इथे पल्लवीला मात्र स्वत:चा भूतकाळ संपूर्ण आठवत होता. शाळेतली पल्लू कॉलेजमध्ये 'पर्ल' कधी झाली, कशी झाली. सगळं सगळं आठवत होतं.

"टकटक..."

"कुणीतरी दार ठोठावले. कुणीतरी काय? माझा निनादच असणार. माझा? निनाद माझा कधी झाला? मागच्या आठवड्यात तर लग्न झाले आमचे. एक आठवडा झाला पण?" स्वतःच्याच प्रश्नांत गुंतत चालली होती पल्लवी.
कुणीतरी काळजी करणारं असलं की, कॅलेंडरच्या रकान्यांकडे लक्ष जात नाही. दिवस कसा जाणार हा प्रश्न पडत नाही. आवडती व्यक्ती प्रत्यक्ष जवळ नसली तरी आठवणी साथ देतात. आठवणी वेळावर पांघरून घालूनच वावरतात.

"आलास? खूप उशीर केलास."

"अगं हो. उशीरच झाला. घरी फोन करून आईची तब्ब्येत विचारली जरा. नातेवाईक होतेच घरी. मग काय? गप्पा वाढल्या. तरी बरे! बाबांनी दम भरला त्यांना."

पल्लवी हसली. तेही छोटंसं.

"असो. वाट पहात होतीस. हाहाहा."
प्रश्न विचारून निनाद हसायला लागला. त्याच्या अश्या प्रश्नाने आणि अचानक अश्या हसण्याने पल्लवी खरंच खूप गोंधळली. तिच्या चेहऱ्यावरचं ते निरागस प्रश्नचिन्ह पाहून त्याला अजूनच हसू येऊ लागले.

तो म्हणाला, "मिस पल्लवी उर्फ पर्ल आणि वाट? कशी? केव्हापासून? कसं शक्य आहे हे?"

"निनाद. झालं तुझं? इतकी वाईट होते का रे मी? आणि होते वाईट तर, लग्न का केलेस माझ्याशी." हे विचारताना तिच्या चेहऱ्यावर राग होता आणि एक त्रासही होता. आपल्यातला एखादा अवगुण आपल्याला माहित असतो, पण तो अवगुण त्रास देत नाही. पण तोच पर्यंत, जोपर्यंत आपल्याला त्या अवगुणाबद्दल कुणीतरी आपलं माणूस बोलून दाखवत नाही.

पल्लवीचे डोळे भरले होते. आवाज रडका झाला होता.

"पल्लू. ए पल्लू. रडतेस काय अशी वेड्यासारखी?" तिला समजवण्यासाठी त्यानं तिच्या खांद्यावर हात कधी ठेवला हे त्याला कळलंच नाही.

"sorry sorry. तुला हात लावला. लांब बसतो मी. पण, रडू नकोस तू. रडणं नाही बघवत मला."

"निनाद. नाही राहवतंय रे असं. जीव जळतोय माझा. फसलास ना तू माझ्याशी लग्न करून."

"पल्लू. वेडे. काय झालंय नक्की. सांगशील का स्पष्ट? कोड्यात नको बोलूस अशी. काही चुकलंय का माझं? चुकलो असेन तर सांग तसं. ह्या बघ उठ्याबश्या काढतो." कान पकडून खरंच उठाबश्या काढू लागला तो. पण तिला हसवण्याचा त्याचा हा प्रयत्न वाया गेला. ती काही हसायला तयार होईना.

"निनाद. नको ना रे असे करूस. मला नाही रहावतंय. प्लीज. उत्तरं हवीत मला. देशील ना?"

"बाई साहेब आज भलत्याच मूडमध्ये दिसतायत. बोल, काय प्रश्न आहेत? कसली उत्तरं हवीत? सगळी उत्तरं देतो, पण डोळे पूस आधी."

"निनाद का लग्न केलेस माझ्याशी? खरं सांग.”

“…”

“काय पाहिलंस माझ्यात? मी जशी कॉलेजमध्ये राहायचे त्या तश्या पल्लवीला कुणी वेडाच आपली बायको म्हणून स्वीकारू शकेल.”

“…”

“काय काय चुकीचे नाही केले रे मी? लग्नात जी साडी नेसली ना ती पहिल्यांदाच नेसली होती मी. तू पाहिले होतेस का कधी मला पूर्ण कपड्यांत?"
निनाद मिश्किल हसला या प्रश्नावर.

ती बोलू लागली. "जीन्स-टॉप, स्कर्ट. हेच आयुष्य होतं माझं. स्त्रीला इतका सुंदर देह दिला, तो का लपवन्यासाठी? पुरुषांना ह्या देहाच्या मागे वेड्यासारखं पळवणंही शान असते असे वाटायचे मला. मी विचार करायचे की, सुंदर देह जन्मापासून मिळाला मला. तो असा कपड्यात ठेवून वाया घालवायचा. श्या. नाही जमणार आपल्याला? पुरुष पुरुष तरी नक्की काय असतो रे! देव नाही वाचले तिथे माणसाचा कसला टिकाव लागतोय सौंदर्यापुढे? जितके कपडे कमी तितके पुरुष नजरा जास्त आणि आपल्या कामाच्या यशाची शाश्वतीही जास्त."

निनाद मन लावून ऐकत होता तिचं बोलणं. कधी न कधी हा क्षण येणार हे माहित होते त्याला. या कशाचीच वाट पहात होता तो.

पल्लू सांगू लागली. "जन्मापासून नव्हते मी तशी. पण वयात आले. स्त्रीबद्दल ज्या इच्छा तुम्हा पुरुषांच्या मनात येतात तश्या इच्छांपासून आम्हीही अलिप्त नाही आहोत. कुणी मुलगा दिसला, आवडला की, संसाराची स्वप्नं पडायची. असे कित्येक संसार मी स्वप्नातच पूर्ण जगलेयत."

रूममध्ये बरीच शांतता होती. एक उसासा घेऊन पुन्हा बोलू लागली ती. आज रिकामी व्हायचं होतं तिला.

म्हणाली, "काय काय नाही केलं मी? सिगारेटही काय फक्त पुरुषांची मक्तेदारी आहे का? म्हणून तीही ओढली. मी करतेय ते एका मुलीला शोभणारं नाहीयेय असं मला कुणी बोलून दाखवलं तर त्याला सडेतोड उत्तरं दिली. मी सरळ विचारायचे की, हे सगळे पुरुषांनी करावे असे कुठे लिहून ठेवलंय? दाखवा मला. हे करायचे नाही, ते करायचे नाही हे सगळं पुरुषांनी स्वतः ठरवलं आणि तेही स्वतःच्या स्वार्थासाठी. उत्तरं देऊन मी मोकळी व्हायचे.”

“…”

“फ्लर्टही खूप केले. मुलं नाही का करत कधी? तसेच मीही केले. कपडे वापरताना कधी विचार नाही केला जगाचा. काही गोष्टी स्वतःलाही नाही पटायच्या. पण, मी त्याही केल्या. का? तर मॉडर्न राहायचे म्हणून. मुलांसोबत बाईकवर भटकायचे. कानाला घुमघुमणारा वारा बेभान करायचा. पण त्या वाऱ्यासोबत ओढणी कधी उडाली कळलंच नाही."

पल्लुला इतकं हळवं झालेलं कधीच पाहिलं नव्हतं त्याने. एकाच माणसात किती माणसं दडलेली असतात ना?

पल्लू बोलू लागली, "आयुष्याची एक वेळ अशी आली की, सर्वाचा पश्चाताप होऊ लागला. प्रश्न पडला मला, का केलं मी हे सगळं? काय मिळालं मला हे करून? स्वतःचे हात पाहिले. काहीच नव्हते त्या हातात. आजूबाजूला नजर फिरवली तेव्हा मी जोडपी पाहिली. पण, मी मात्र एकटीच होते. जीवाभावाचं असं एकही माणूस जवळ नव्हतं माझ्या. आणि का असावं? काय वेगळं होतं माझ्याकडे? नेहमी फटकळच वागले सगळ्यांशी."

"हम्म."

"तूला माहित असेलच स्वत:च्या अनुभवावरून? तूही होतास ना आमच्या ग्रुपमध्ये? कधी भाव तरी दिला होता का मी तुला? समोरच्याला आपण माणूस मानून वागलो, तरच तोही आपल्याशी माणुसकीने वागतो. एकटी पडले. पश्चाताप झाला. मोडले आणि अश्यावेळी तू मागणी घातलीस लग्नाची. परावलंबी असलेली वेल एखादा आधार मिळाला की पटकन त्याला वेटोळे घालते. अगदी तशीच वागले मी. कसलाही विचार न करता होकार दिला तुला. पण..."

"पण काय?"

"पण आता स्वत:ची लाज वाटतेय. स्वार्थापोटी फसवलं असं वाटतंय. सांग ना निनाद. का? का केलेस लग्न माझ्याशी? उत्तरं हवी आहेत मला."

"रडू नकोस पल्लू. तुला रडवण्यासाठी नाही केलंय मी लग्न तुझ्याशी. आणि स्वतःला दोष तर अजिबात नको देऊस. डोळे पूस बघू आधी"

“ते सोड. तू बोल आधी”

“मी काही फसलेलो नाहीयेय. मला 'मोठा' करून माझ्या स्वातंत्र्यावर गदा नको आणू. माणूस एकदा 'असामान्य' ठरला की, त्याला 'सामान्य'पणे वागण्याची, जगण्याची परवानगी हे जग देत नाही. असामान्य वागणे म्हणजे त्याग, समजून घेणे, तडजोड या गोष्टींशी जमवून घेणं आलं. आणि आयुष्यभर जमवूनच घ्यायचं तर मग जगायचं कधी?"

टपोऱ्या डोळ्यात टपोरे थेंब घेऊन पल्लू शांत ऐकत होती.

निनाद बोलत होता. "मी जे काही केलं त्यात माझा काहीच मोठेपणा नाहीयेय. या जगात स्वार्थाशिवाय कोणतंही काम क्वचितच केलं जातं आणि क्वचितजणच करतात ते. मग, मी कसा पर्याय ठरेन या गोष्टीला? तुझ्याशी लग्न करण्यामागे माझे स्वतःचे सुद्धा स्वार्थ होते."

ऐकून सगळे पल्लूकडे एकच गोष्ट उरली होती आणि ती म्हणजे प्रश्नचिन्ह. आपल्याला न समजलेल्या अश्या बऱ्याच गोष्ट या जगात असतात. विशेष म्हणजे त्या आपल्याच आजूबाजूला आणि कधीकधी आपल्याच बनून वावरत असतात. निनाद इतका अनाकलनीय होता का?

"मला नाही कळतंय. मला मिळवण्यात तुझा कसला स्वार्थ?"

"स्वार्थ! हा मोठा स्वार्थ होता."

"कसला?"

"पश्चातापातून होरपळून निघालेल्या आपल्या माणसाला एकटं हवेत सोडायचं नसतं. खरंतर अश्याच क्षणी त्याला आपल्या कवेत घ्यायचं असतं. पश्चातापानंतरचा माणूस जितकं प्रेम देऊ शकतो, तितकं प्रेम देणं क्वचितच जमतं इतर कुणालातरी. जो गमावतो, त्याला नसण्याचं दु:ख कळतं. आणि म्हणुनच असं माणूस आपण गमवायचं नसतं. हे प्रेम हवं होतं मला. म्हणून लग्न केलं मी."

एक छोटासा थेंब पल्लुच्या गालावरून टपकन खाली पडला.

"पल्लू, आयुष्यभर मुखवटे लावून जगतो आपण. या अश्या जगण्याला 'जगणं' तरी कसं म्हणावं? प्रत्येक मुखवट्यामागे दुखवटा लपलेला असतो. तो मुखवटा घालून वावरता वावरता आपण स्वतःला विसरतो. आरश्यासमोर उभे राहिल्यावर आरश्यात दिसणारं माणूस नक्की आपणच आहोत का? असंच व्हायचं होतं का आपल्याला? हा प्रश्न पडतो. आयुष्यभर धाव धाव धावतो आपण सुखाच्या पाठी. पण, नक्की काय मिळालं की 'आपण सुखी आहोत' असं वाटेल आपल्याला हेच माहित नसतं. कुठे जायचं, काय मिळवायचं हेच माहित नसताना सुखी होणार तरी कसे आपण? तू जशी होतीस, तशी मला मुळीच पसंत नव्हतीस खरंतर. जे जे काही मला मुलींमध्ये आवडत नव्हते ते सगळे तू केलेस. पुरुषांनी तुम्हाला कमी लेखले ह्या तुमच्या म्हणण्याला माझा अजिबात विरोध नाही. पण, तुम्ही स्वतःला त्यांच्या सोबत तोलून स्वत:च स्वत:चे महत्व कमी करता असे नाही का वाटत तुला?"

ती फक्त ऐकत होती. स्वतःच्याच प्रश्नात अडकलेली ती समोरच्याच्या प्रश्नाचं उत्तर कुठून देणार होती. पण निनादला उत्तर नकोच हवं होतं.

तो बोलू लागला, "मला एक सांग. सांगशील?"

"काय?"

"मला सांग आपण तुलना कोणासोबत करतो? एखाद्या उच्च गोष्टीशी. बरोबर?"

"हम्म."

"मग तुम्ही स्त्रियाच स्वतःला पुरुषांसोबत तुलना करून त्यांना उच्च आणि स्वतःला नीच ठरवता असे नाही वाटत का तुला? निर्मात्याने दोघांना जसे बनवलंय तसेच्या तसे का पसंत नाही स्वतःला?"

निनादचे म्हणणे तिला पूर्ण पटत होते. माणूस पटायला लागला की जवळचा वाटू लागतो. पटणं अंतर कमी करतं. त्याचं बोलणं असंच ऐकत रहावं असं वाटत होतं तिला.

निनाद बोलू लागला, "पुरुषांची बरोबरी करता करता कमावता किती आणि गमावता किती? ज्या बाईला स्वत:च्या पदराची कदर असते, पुरुषही अश्याच बाईची कदर करतात. पुरुषांनी तुमच्याकडे कोणत्या नजरेने बघावे हे त्यांच्यापेक्षा तुम्हीच जास्त ठरवता."

त्याच्या ह्या वाक्याने तिचा चेहरा अजूनच रडवलेला झाला.

"निर्णय चुकला ना तुझा निनाद?" ती म्हणाली.

"नाही. अजिबात नाही. मला तसे वाटत नाही."

"नाही? का?"

"तुला माहितीय का खरं निर्णय कोण घेतं ते?”

"कोण?"

"माणूस खरंतर कोणत्याही विषयाबाबतचा फक्त निर्णय एकदाच घेतो आणि मग मागच्या निर्णयाचा निकालच पुढचा निर्णय ठरवतो."

"म्हणजे?"

"मी तुला ज्या क्षणी लग्नाची मागणी घातली, त्या क्षणीच्या तुझ्या डोळ्यांतल्या थेंबांनी माझ्या निर्णयाला साथ दिली. मी घेतलेला निर्णय योग्य आहे हे मला तेव्हाच पटले होते. आज तू या क्षणी जी काही रडतेयस, जळतेयस हा प्रत्येक क्षण मला येणाऱ्या सुखाची साद देतोय. आजचा तुझा आवाज ऐकला तेव्हाच मला खात्री पटली की, 'माझा संसार' आता 'आपला संसार' होणार आणि तो कसाही असला तरी तू माझी साथ सोडणार नाहीस. तेच मला हवंय. तू शेवाळ नको बनुस. मगच मी उभा राहीन."

आता मात्र सगळे शांत झाले. प्रश्न नव्हते. उत्तरं होती. पण तरीही सगळे शांत होते. कुणीच काही बोलत नव्हते. पल्लू बेडवर शांत बसली होती. निनाद खिडकीतून एकटाच बाहेर बघत होता.
कितीतरी वेळ असाच गेला. एकदम मुका.

इतक्यात ती म्हणाली, "निनाद"

"काय?" का कुणास ठाऊक पण काळजाचे ठोके वाढले होते निनादच्या.

विचित्र आहे ना? हृदय आपलं, काळीज आपलं. पण, त्याचे ठोके कधी वाढावे अन कधी कमी व्हावेत हे आपल्या हातात कधीच नसतं.

"निनाद. मी प्रेमात पडलीय."

"काय! कधी?"

"आत्ताच."

"आत्ता? म्हणजे मी हरलो? काय गं तू पण?"

"ऐक रे. तू नाही हरलास. तू जिंकलंस. संसारही आणि मलाही."

निनादचा खांदा पल्लवीच्या डोळ्यांतून वाहून जाणाऱ्या मुखवट्याने ओला होत होता.

प्रत्येक माणसाचे दोन चेहरे असतात. एक जगत असतो अन् दुसरा वागत असतो.
वागणारा दिसत असतो अन् जगणारा पहावा लागतो...डोकावून.

-- आशिष राणे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली. छान लिहिलय.
काही वाक्य खुप आवडली. विशेषतः
तुम्ही स्त्रियाच स्वतःला पुरुषांसोबत तुलना करून त्यांना उच्च आणि स्वतःला नीच ठरवता असे नाही वाटत का तुला? निर्मात्याने दोघांना जसे बनवलंय तसेच्या तसे का पसंत नाही स्वतःला?"
सही लिहिलय.

apratim..

प्रत्येक माणसाचे दोन चेहरे असतात. एक जगत असतो अन् दुसरा वागत असतो.
वागणारा दिसत असतो अन् जगणारा पहावा लागतो...डोकावून. -----------हे वाक्य जबरदस्त आवडलं... पण एवढा समजूतदारपणा असू शकतो? असो... शुद्धलेखनाच्या चुका थोड्या अजूनही आहेत...बाकी छानच...