इडली, हॉटेल आणि भामटा !

Submitted by चंपक on 4 January, 2014 - 05:57

गेली दोन वर्षे मी काय केले? अर्थात उद्योजक बनन्याच्या स्वप्नापायी काही बड्या लोकांवर विष्वास ठेउन केलेल्या वाटचाली पायी " आत्महत्या" करुन घेतली!

ही कथा आहे, अत्यंत उत्साही, तरुण तीन मराठी तरुणांची! ह्यातील एकाने पुढाकार घेउन एका मोठ्या हॉटेल व्यावसायीकाशी संपर्क प्रस्थापित केला अन मोठी स्वप्ने उराशी बाळगली! पण "नाव मोठे अन लक्षण खोटे" असा अनुभव घ्यावा लागला. अन शेवटी त्यांच्यातील उद्योजकाची हत्या झाली! ही चित्तरकथा त्याच्याच शब्दात....!

हे सर्व सुरु झाले, ते माझ्या एका अमेरिका स्थित मित्राने त्यांच्या नासिक येथील एका प्रसिद्ध उद्योगपतीं यांचेशी माझी फोन वर ओळख करुन दिल्याने!! मी मे २०११ ला भारतात परतलो, अन व्यवसाय करायचे मनावर घेतले. म्हणुन मग, माझ्या मित्राने मला त्या बुजुर्ग उद्योगपतींची भेट घडवुन दिली.

एप्रिल २०१२ मध्ये मी त्यांना नासिक ला भेटलो. त्यांनी त्यांच्या पुणे येथील एका अन्न प्रक्रिया कंपनीत व्यवस्थापनाचे प्रश्न असल्याने मी त्यात लक्ष घालावे असे सांगितले. मी त्यात जास्त रस घेण्याचे कारण म्हणजे, त्या कंपनीत (कु?)विख्यात हॉटेल व्यावसायीक "श्रीमान इडलीवाले" भागीदार आहेत अन त्यांचा तरुन मुलगा विशाल ह्या कंपनीचे कामकाज पाहतो हे कळाले म्हणुन! ह्या "श्रीमान ईडलीवाले" नी आशियातील पहिले ईको-फ्रेंडली हॉटेल बनवले असे जगाला महिती आहेच!

मी मे२०१२ पासुन चिखली, पुणे येथील या कंपनीत बिनपगारी, सी. ई. ओ. म्हणुन काम सुरु केले! (जगातला मी पहिला सी. ई. ओ. असेल जो बिन-पगारी कामावर हजर झाला!) अर्थात, कंपनीचे उत्पादन ४० टन प्रती महिना वाढवले तर मला योग्य तो पगार सुरु केला जाणार होता. तसेच ह्याच कंपनीत ३०% हिस्सा खरेदी करुन रितसर भागीदार बनवले जाणार होते. तसा शब्द, नासिकचे उद्योगपती अन (कु?)विख्यात हॉटेल व्यावसायीक "श्रीमान इडलीवाले" ह्यांनी दिला होता.

ही कंपनी (कु?)विख्यात हॉटेल व्यावसायीक "श्रीमान इडलीवाले" कुटुंबिय अन नासिकचे उद्योजक यांचेतील "लिमिटेड कंपनी' आहे. हॉटेल व्यवसायाला लागणारे "ग्रेव्ही" अन "रेडीमिक्सेस" कंपनी तर्फे बनवले जात असत. पुणे, मुंबई अन गोवा येथे हे पदार्थ हॉटेल व्यावसायीकांना विकले जात असत.

मी मे २०१२ पासुन कंपनीच्या उत्पादन वाढ, विक्री मध्ये वाढ अन त्याच सोबत उत्पादन खर्चात कपात अशा तीन पातळ्यांवर काम सुरु केले. कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबई अन एक संचालक नासिक येथे असल्याने कंपनीचे चेक मिळणे अन 'पेटीकॅश' चा मेळ सांभाळणे अवघड असल्याने अनेकदा माझे पदरचे पैसे खर्चुन मी कंपनी चे काम चालु ठेवत असे. माझे पैसे मला १-२ महिन्याने परत मिळत असत. अश्याने माझे दोन्ही संचालक माझ्या कामावर खुष होते.

विक्री मध्ये वाढ करण्यासाठी मी संचालकांना महाराष्ट्रभर विक्रेत्यांचे जाळे उभारण्याचे सुचवले. विक्रेत्यांची आर्थिक ताकत कळावी म्हणुन त्यांचेकडुन तीन लाखां पर्यंत अनामत रक्कम घ्यावी असे मीच सुचवले.(कुठुन दुर्बुद्धी सुचली!) त्यावर विशाल नी मला विक्रेत्यांशी संपर्क करायला अनुमती दिली. मी नगर, मुंबई, जळगाव, औरंगाबाद, नासिक आणि पुणे येथे काही लोकांशी चर्चा केली. पैकी नगर आणि पुणे येथील दोन फर्म विक्रेते बनण्यास तयार झाले. त्यानुसार करार करण्यात आले. त्या दोन्ही फर्म्सनी प्रत्येकी रु. तीन लाख असे एकुन रु. सहा लाख हे कंपनीच्या एस. बी. आय. मुंबई येथील बॅन्क खात्यात जमा केले. त्यानुसार, अहमदनगर तसेच पुणे येथील फर्म्सना तसे लेखी पत्र माझ्या नावे देण्यात आली. तेंव्हा मला शंका आली, कि माझा अन कंपनी चा लेखी व्यवहार नसल्याने ती पत्रे "श्रीमान इडलीवाले"च्या नावाने द्यायला हवीत. पण "श्रीमान इडलीवाले" ने ती पत्रे माझ्याच सहीने द्यावीत असे आग्रहाने सांगितले.

करार झाल्या नंतर पुणे अन नगर येथे सेल्स टीम ने जाऊन जुजबी मार्केटींग पन केले. परंतु स्पर्धेत टिकण्या साठी पुरेसे मार्केटींग करण्यासाठी "श्रीमान इडलीवाले"तयार झाले नाहीत. (त्यांनी जमलेल्या सहा लाख रुपयांत बिग बजार ह्या रिटेल चेन ची एक ऑर्डर पुर्ण केली अन नफा कमावला). ज्या तडफेने "श्रीमान इडलीवाले" ह्यांनी नगर अन पुणे येथे मार्केटींग साठी पैसे अन वेळ द्यायला हवा तो दिला नाही. मला स्वतःला कुठलाही खर्च करायला परवानगी दिली नाही. माझ्या सहीने पैसे जमा केले पन खर्च करताना "श्रीमान इडलीवाले" चीच सही हवी असे !!!

कालांतराने, मला कंपनीची पुर्वीची अनेक कर्जे नव्याने लक्षात यायला लागली. नव्याने केलेल्या विक्रेत्यांना माल देण्यासाठी नवीन माल तयार करणे गरजेचे होते. पण "श्रीमान इडलीवाले" यांनी ते पैसे इतरत्र वापरल्याने कंपनी बंद राहु लागली. तीन-तीन महिने कर्मचार्यांना पगार नसे. वीज बील अन पाणी बील थकलेले होते. कच्चा मालाचे पैसे मिळावेत म्हणुन अनेक सप्लायर दररोज प्रत्यक्ष येऊन अन फोन करुन त्रास देऊ लागले. काही स्थानिक सप्लायर्सनी कंपनी अन कर्माचार्यांना त्रास दिला जाईल असेही सुचवुन पाहिले.

अश्या अनेक तक्रारी नंतर, नोव्हेंबर २०१२ ला कंपनीचे उत्पादन पैसे नसल्याने बंद पडले. तेंव्हा काही गोष्टी नव्याने कळल्या.

१) "श्रीमान इडलीवाले" ह्यांच्या पुणे येथील या कंपनी मध्ये तयार केलेल्या उत्पादनांची विक्री ही प्रत्यक्षात "श्रीमान इडलीवाले हॉस्पिटॅलिटी अॅन्ड कन्सलटन्सी प्रा लि" ह्या बाप्-बेटे संचालक असलेल्या वेगळ्याच कंपनीच्या नावाने करत असत. त्यामुळे पुणे येथील कंपनीला तिच्या उत्पादनांचे पैसेच मिळत नसत. ते सर्व पैसे "श्रीमान इडलीवाले" अपहार करुन स्वतःच्या इतर कंपनीसाठी वापरत असत.

२) "श्रीमान इडलीवाले हॉस्पिटॅलिटी अॅन्ड कन्सलटन्सी प्रा लि" ने पुणे येथील कंपनीची उत्पादणे वेगळ्या नावाने तळोजा येथील एका कंपनीतुन बनवुन घेणे सुरु केले होते. पुणे येथील ही भागीदारीतील कंपनी त्यांना बंद पाडायची होती.

३) "श्रीमान इडलीवाले" बाल्-बेटे अनेक कागदी खेळ करुन कंपन्यांचे संचालक अन सह्याचे अधिकार बदलत होते. अन त्यामुळे त्यांच्या ही फसवा-फसवी कायद्याच्या आधारे सिद्ध करणे कठीण झाले होते.

नोव्हेंबर/ डिसेंबर २०१२ ला कंपनी बंद झाली. तोवर माझे कंपनीत खर्च केलेले रु.१.९२ लाख आणि दोन विक्रेत्यांचे रु. सहा लाख, असे एकुन रु.सात लाख ९२ हजार ही रक्कम "श्रीमान इडलीवाले" नी मला त्वरीत परत द्यावी असे मी त्यांना कळवले. त्यांनी अनेक उडवा उडवीची उतार दिली. फोन न घेणे, एस एम एस ला उत्तर न देणे, असे प्रकार केले. मी खंडणी मागतोय, अशी पोलीसांत तक्रार करील, अशी धमकीही त्यांनी ई-मेल पाठवुन मला दिली.

तुझे पैसे देईल पण वितरकांचे पैसे विसरुन जा असे सुनावले. आज एक वर्ष उलटुन एक रुपयाचाही उत्पादित माल विक्रेत्यांना न देउन, त्यांचे सहा लाख रुपये बिन-व्याजी वापरायला "श्रीमान इडलीवाले" बाप्-बेट्यांना थोडीही लाज वाटु नये ?? त्या नव्याने उद्योगात आलेल्यांचे पैसे आपण फुकट वापरतोय याची शरम वाटु नये ??

माझ्या अन सोबतच्या तरुणांच्या कुटुंबातील अनेक अडचणीच्या प्रसंगी विशाल इडलीवाले ला मदतीचे साकडे घातले, परंतु निगरगट्ट इडलीवाले महाशय अजिबात बधले नाहीत.

आपल्या पुस्तकांनी महाराष्ट्रातील तरुणांना उदयोजक बना असा सल्ला देणारे, अन आत्महत्येच्या दारातुन परत फिरुन एवढा मोठा उद्योग उभारल्याच्या गप्पा मारणारे "श्रीमान इडलीवाले" प्रत्यक्षात मात्र धादांत खोटारडे अन फसवणुकी चे धंदे करतात हे पाहुन माझ्या सारख्या तरुणाला अत्यंत क्लेश झाले.

जेंव्हा माझ्या घरी बाळ जन्माला यायचे होते, तेंव्हा मी पैशांसाठी खुप विनवनी केली, परंतु "श्रीमान इडलीवाले" बाप-लेक मात्र बधले नाहीत. त्याची शिक्षा म्हणुनच "श्रीमान इडलीवाले" च्या बेट्याच्या बायकोचा गर्भपात झाला...काव्यागत अन नैसर्गिक न्याय होऊनही ह्या बाप-लेकांची बुद्धी मात्र ठिकाण्यावर येत नाही, हे दुर्दैवच!

"श्रीमान इडलीवाले" नी स्वतःची आत्महत्या टाळली, मात्र मी अन माझ्या सारखे नव्याने व्यवसाय करु इच्छिणारे अजुन तीन तरुणांना मात्र आत्महत्येच्या दारात ढकलुन दिले!

स्वतः ऑडी ,मर्सीडिज अन तत्सम लक्झरी गाड्या उडवायच्या, फोर अन फाईव स्टार हॉटेलांत मजा मारायची, पार्ट्या करायच्या, बायका-मुलांना परदेशात फिरायला न्यायचे अन, महाराष्ट्रातील तरुण मुलांना व्यावसायीकतेची स्वप्ने दाखवुन लुटायचे हा नवाच "धंदा" "श्रीमान इडलीवाले"अन त्याच्या मुलांनी सुरु केलाय असे दिसते. मराठी मुलांना फसवणार्या या "ठकसेना" ला शिक्षा झालीच पाहिजे!

आमच्या सारख्या किती तरुणांना "श्रीमान इडलीवाले" ने फसवले ह्याचा शोध गृह खात्याने घेतला पाहिजे, ह्याची चौकशी झाली पाहिजे, आणि त्या सर्वांचे पैसे परत केले गेले पाहिजेत, ही नम्र विनंती!

"श्रीमान इडलीवाले" इतके मोठे आहेत, कि त्यांचे नाव ऐकुन पोलीस अन प्रसार माध्यमेही ह्या हत्येची दखल घेत नाहीत. पोलीसांनी एक कागदावर तक्रार तर लिहुन घेतली, पण पुढे काहीही नाही!

सदर तक्रार गेले एक वर्षे मी स्वतः मा. मुख्यमंत्री, मा. गृह्मंत्री, मा. पोलीस महासंचालक, मा. पोलीस आयुक्त, पुणे, मा. पोलिस निरिक्षक-निगडी, पुणे इत्यादी "अकार्यक्षम" कार्यालयात दिलेली आहे. पण आजवर त्यावर काहीही दखल घेउन कारवाही झाली नाही!

आता न्यायलयात जाउन आपलेच पैसे परत मिळण्यासाठी पुढील २० वर्षे लढाईची मानसिक तयारी करतो आहे!

जै हिंद! जै म्हाराष्ट्र !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या लढाईसाठी प्रथम तुम्हाला शुभेच्छा आणि त्यांचे प्रताप निदान इथे माबोलिकराच्या ध्यानात आणुन दिल्याबद्दल अभिनन्दन.

ऑर्किड ही एक सपुष्प वनस्पतीं असून त्या अपिवनस्पती (दुसर्‍या वनस्पतींच्या आधारे वाढणार्‍या वनस्पती an epiphyte ) आहेत.आणि हे नाव वरील भामट्याने सिद्ध केलेल दिसतंय. ऑर्किड आधार घेऊन वाढणारी वनस्पती पण अखिलजनांना त्याच काय कौतुक. पण ज्या झाडावर (पैश्यांवर) ते ऑर्किड पसरत आहे त्या झाडाबद्दलही विचार करायची वेळ आता आली अहे. .

हे इडलीमय भामटेपुत्र जीप्सिमयांचे जावई सुद्धा आहेत. ( आता ह्या जिप्सी प्रकारात किती थोरामोठ्यांची उठबस आहे ते वेगळे सांगायला नको) त्यांनी कोकणात वेंगुर्ल्याला रिसोर्ट बांधण्याचा उपक्रम हाती घेतलाय तसेच सिंधुदुर्ग - गोवा बॉर्डरवरील एक जुना किल्ला हॉटेलमध्ये बदलण्याचा प्रयत्न सुरु अहे.
<<तसंच ते गर्भपात इ. लिहिलेलं मलाही आवडलं नाही.… >> +१

चंपक प्रथमतः ऐकुन वाइट वाटले. पण आश्चर्य नाही वाटले.

ह्या इडली पुत्राशी कामाच्या संदर्भात खुप वेळा डिल केलं आहे. मी ज्या उद्योग समुहात फायनान्स मधे काम करत होते त्यांचं हॉटेल हे लोक चालवत होते. पण खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे कळल्या वर आमच्या एम.डी. ( ज्यांच्या दृष्टीने ईडलीवाले पिता पुत्र 'किस झाड की पत्ती") ने त्यांना खड्या सारखे वगळले. नंतर त्यांच्या फी साठी इडली पिता खुप वेळा फॉलो अप करत होता. पण आमचे लोक त्यांचं बारसं जेवले असल्याने त्यांना दाद लागुन दिली नाही.

त्यांचं पुस्तक वाचुन मागे ( १० वर्षांपुर्वी) मी त्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या वर त्यांनी मला एक भेट ही पाठवली होती. पण जेंव्हा कामाच्या संदर्भात त्यांच्याशी भेटण्याचा योग आला तेंव्हा त्यांचा दांभिकपणा नजरेला खुप खुपला. शोभा बोंद्रेंच्या लेखातही त्यांच्या बद्दल च्या अप्पलपोटे पणाचा उल्लेख वाचुन अजिबात आश्चर्य वाटले नव्हते.

एक सल्ला
तुम्ही जर जे प्रकरण न्याय्प्रविष्ट करणार असाल तर ताबडतोब हा धागा बंद करा. त्याचा त्रास तुम्हाल होवु शकतो.

बी...
तुमच्या फेस बुक वरुन हा लेख काढा. नाहीतर आपल्याच मित्राला त्रास होइल. आणि क्रूपया नाव घेवु नका. ते लोक भयंकर आहेत. तुमची नाव असलेली पोस्ट उडवाल का?

यांच्या पुस्तकात त्यांना लोकांनी घातलेले गंडे आणि फसवणुकेचे खुप किस्से आहेत. त्या मुळे मुळात बाळकडुच तसे मिळालेले आहे. त्यात त्यांनी सी.ए. लोकांना शिव्या घातलेल्या आहेत. पण प्रत्यक्षात तेच आमच्या जमाती पेक्षा भयंकर आहेत. जेंव्हा प्रत्यक्ष भेट झाली तेंव्हा त्यांना मी हा निषेध नोंदवलाच होता. आर्थातच ह्यांह्यां हसुन त्यांनी प्रसंग टाळला.

असो. तुमच्या पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा!!!!

बापरे, हे आत्ताच वाचतेय. इडलीवाले खरोखरंच भामटा माणूस आहे. माझ्या लेखनाच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात हा माणूस मला एका अ‍ॅप्रोच झाला, माझ्याकडे मॅनेजमेन्टचे खूप फंडे आहेत जे लोकांना उपयोगी पडतील, तर ते तुम्ही शब्दांकित करा, आपण लेखमाला करु म्हणून. मी एकुण वीस भाग आधी करुन द्यावेत आणि मग एक एक भाग प्रसिद्ध झाला की तुमचे पैसे देत जाऊ असा करार (तोंडी) झाला. पहिला भाग छापून आला आणि त्यात शब्दांकन म्हणून कुठेही माझे नाव नाही. इडलीवाल्यांच्या म्हणण्यानुसार ती उ.सं.ची डुलकी. मग दुसरा भाग आला. त्यातही नाव नाही. मी छापून आलेल्या भागाचे पैसे मागीतले, तर दहा भाग झाले की एकदम चेक देऊ वगैरे. दहा भागांनंतर माणूस भेटेनाच. परदेशातले दौरे चालू आहेत असं त्यांचा सेक्रेटरी सांगायला लागला. वीस भाग छापून आल्यावर मग तीन महिन्यांनी ऑर्किड हॉटेलात बोलावून चेक सुपूर्द केला.

महिन्यानी मला फोन. आपण याचे पुस्तक करायचे आहे. माझ्याकडे भरपूर अजून मटेरियल आहे, ते वापरु. तुम्ही येऊन जाल का? मी गेले. त्याच्याकडे मॅनेजमेन्टच्या इंग्रजी पुस्तकांतून ढापलेला मजकूर. म्हणाला. हे माझे अयुष्यभराच्या चिंतनाचे (!) सार. तुमच्याकडे सुपूर्द करतो. आपण झकास पुस्तक करायचे.

त्याला म्हटले हे अमुक इंग्रजी पुस्तकातले आहे. अधिकृतरित्या अनुवादाचे हक्क मिळवा. मी अनुवादक म्हणून काम बघीन. तसा इडलीवाला मनातून चिडला. पण हट्टाला पेटला होता. म्हणाला. तुम्ही फारच सुंदर लिहिलित लेखमाला म्हणून काम तुम्हिच करावं अशी इच्छा आहे. मजकूर ओळखू येणार नाही अमुक पुस्तकातला अशा तर्‍हेने बदला म्हणजे कोणी हरकत घ्यायचे नाही. आम्हीही असेच करतो हो. इतर सुप्रसिद्ध शेफ्सच्या रेसिप्यांमधे चेंज (हे त्याचेच शब्द). म्हटलं नाव द्यायला हवे मुख्य कव्हरवर. आणि लेखी करारपत्र द्या, अ‍ॅडव्हान्सही लागेल. मग कामाला सुरुवात करीन. आता गडबडला. म्हणाला पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. आजतागायत गायब. नंतर त्याचं पुस्तक आलंच. व्यवस्थापनाचे मूलमंत्र सांगणारं.

इडलीवाला खतरनाक भामटा आहे यात वादच नाही.

बापरे हे सगळं खरंच भयानक आहे.

इतक्या जणांना इतक्या विविध प्रकारे तसाच अनुभव आला आहे म्हणजे काय ते समजा.

धक्कादायक अनुभव आहे शर्मिला फडके यांचा ! तुम्ही त्वरीत सावध झालात आणि शोभा बोंद्रे यांच्याप्रमाणे तुमची फसवणूक झाली नाही, याबद्दल अभिनंदन.
पण शेवटी त्या माणसाने आपला हेतू (दुसर्‍या कुणाकरवी) साध्य करून घेतलाच. Sad

मी काल म्हणालो होतो आणि आजही अनेक जण त्याच सुरात बोलत आहेत त्याप्रमाणे.. कृपया या बाबतीत जास्त चर्चा पब्लिक फोरम वर करणे चंपक यांच्या दृष्टीने घातक आहे.. तेव्हा जास्त चर्चा करु नये !!!

'रनिंग अ बिझनेस कॅनॉट मेअरली बी डन ऑन ट्रस्ट'

हे आपल्यासारख्या उच्चविद्याविभूषित व्यक्तीच्या लक्षात आले नाही ह्याचे आश्चर्य वाटते.

श्रीमान इडलीवाल्यांच्या वागण्याची चीड आली परंतू आश्चर्य वाटले नाही कारण कुठलाच धंदा(लार्ज स्केलबद्दल बोलत आहे) कुठलाच व्यावसायीक १००% सचोटीने करत असेल असे मला वाटत नाही.

परींदातला एक डॉयलॉग आपणही लक्षात ठेवायला हवा,

'न भाई, न बहन, न बीवी, न बच्चा.... धंदे मे कोई किसी का कुछ नही होता'

आपल्या लढ्यासाठी शुभेच्छा!

सर्वांच्या शुभेच्छा, काळजी अन कायदेशीर सल्ल्याबाबत धन्यवाद.

नेमणुका, करार तोंडी जरी असले, तरी सर्व बाबींची तपशीलवार नोंद एकमेकांना केलेल्या ए-मेल मध्ये आहेत. डिस्ट्रिब्युटर चे पैसे ज्या कंपनी खात्यात जमा केले आहेत, त्यांच्या नोंदी आहेत. डिस्ट्रिब्युटर ची पत्रे माझ्या सहीची असली, तरी लेटरहेड कंपनीचे होते.

शंका जेंव्हा उपस्थित झाल्या तेंव्हाच व्यवहार थांबवले. पण तोवर उशीर झालेला होता.

माझ्या अगोदर नासिक च्या उद्योगपतीला ह्या गृहस्थाने अंदाजे एक कोटी ला गंडवले. माझ्या नंतर एका आमदाराला ३३ लाखाला फसवले. पण त्या आमदाराने त्याला फसवले गेल्याची जाणीव होताच मला संपर्क केल्याने त्याचे ३३ लाख मी भामट्याच्या तावडीतुन वाचवु शकलो.

ह्या प्रकारात मला पैसे गमावल्याचे दु:ख नाही, पण दीड वर्षे वेळ वाया गेला ह्याचे वाईट वाटते. पैसा कधीही कमावता येतो, अन गमावला जातो! उद्योग करणे हे फक्त पैसे मिळवण्यासाठी नाही असे मला वाटते.

गर्भपाताचा मुद्दा अत्यंत दुर्दैवी असला तरी, नैसर्गिक न्याय कसा असतो त्याचे उदाहरण म्हणुन दिला आहे. या गृहस्थाच्या उचापतींचा परिणाम त्याच्या पत्नी, मुलांवर व्हावा अशी माझी अजिबात ईच्छा नाही.

या गृहस्थाने अनेकांना फसवले असल्याने तो माझ्यावर अब्रुनुकसानीचा खटला वगैरे काही करणार नाही ह्याची वकीलांमार्फत खात्री केलेली आहे. आणि त्याने जर तो केलाच तर तो माझ्या फायद्याचा असेल.

लढा चालुच राहील! धन्यवाद!

चंपक, तुम्हाला लढ्यास शुभेच्छा! एक वेळ अशी नक्की येईल की इडलीवाले तोडपाण्याचा प्रस्ताव समोर ठेवतील. तेव्हा काय करायचं हा विचार तुम्ही केला असेलंच! Happy
आ.न.,
-गा.पै.

फार वाईट वाटतय तुमच्यासाठी आनि तितकाच राग ही येतो आहे. शाळेत असताना पुस्तक वाचलेले तेव्हा किती भारी अस वाटल होत. मग कॉलेजात असताना जेव्हा ह्यांना प्रत्यक्ष पाहिल आनि एकल टिळक स्मारक मंदिरात एका कार्यक्रमाला तेव्हा मात्र " माणुस " फार काही भारी नाही ह्यावर पुर्ण ग्रुप च एकमत होत.
तुम्हाला लढ्यास शुभेच्छा >>> +१०० Happy

फार फारच धक्कादायक आहे!!!!! किती आदर होता या व्यक्तिबद्दल.....

चंपक तुमच्या लढाईसाठी तुम्हाला शुभेच्छा!!

बापरे.....हे सगळं काय भयंकर आहे !!
पुस्तक वाचून खूप कौतुक वाटलं होतं ह्या माणसाचं. पण ते पुस्तकही त्याने लिहिलंच नव्हतं हे कळल्यावर आणखी धक्का बसला !!
माझ्या ब्लॉगवर या पुस्तकाबद्दल कौतुकाने लिहिलं होतं. तिथे कोणीतरी ह्या लेखाची लिंक दिल्यावर ह्या माणसाबद्दल हे सगळं कळलं. लोकांचे तळतळाट घेऊन कसे जगत असतील हे लोक ??
चंपक.... लवकरात लवकर तुला ह्यातून सावरता यावं याबद्दल शुभेच्छा !!
यापुढे मात्र सावध रहा !!

बापरे!
चंपक, तुला शुभेच्छा!

समहाऊ, ते पुस्तक वाचताना अजिबात भारावल्यासारखं वाटलं नव्हतं... उलट हा माणुस अजिबात सरळ नसणार असच वाटत होतं.

आई शप्पथ !!!

काल रात्री च सह्याद्री वाहिनी वर ह्या साहेबांची मुलाखात सुरु होती....आणि आज सकाळी हा बाफ नजरेसमोर आला....बापरे! सगळं भयंकर आहे !! Angry
चंपक, तुमच्या लढ्या साठी शुभेच्छा!

आत्ता कळले मला कोणाबद्दल बोलणं चाललं आहे.एका पत्रकाराकडून कळले होते. हा माणूस बायकांच्या बाबतीत अत्यंत वाईट आहे. काही पत्रकार स्त्रियांनी त्याचा अनुभव घेतला आहे.

त्यांचे पुस्तक कॉलेजात असताना का त्यानंतर वाचले होते, खूप इम्प्रेस झाले होते. पण आत्ता हे सगले वाचल्यावर त्यांच्या हॉटेलात जाणे बंद.

त्याम्च्या ग्रेव्ही रेडी मिक्सेस बद्दल कोणी संगेल तर बरे म्हणजे तेही वापरने बंद करता येईल.

भारत, वाईट अनुभव आहे. पण अनुभवातूनच शिकायचे असते ना ? अजिबात निराश होऊ नकोस. नव्या उद्योगाला नव्या उमेदीने सुरवात कर.

@गामा_पैलवान: विकीपेडीया वर external links मध्ये मला मायबोली चा reference दिसत नाहीये.
कोणी डिलीट केला की तुम्ही ईमेज स्वता edit केलीये?

@गामा_पैलवान: विकीपेडीया वर View History भागात गेल्यास दिसेल की खालील आय्.पी. वरुन ४ जानेवारी ला कोणीतरी maayboli.com चा reference काढुन टाकलाय....
15:55, 4 January 2014‎ 69.119.63.99

सगळंच भयंकर आहे... माणूस जितका नावाजलेला तितका तो चोर असण्याची शक्यता जास्ती असंच मानायला पाहीजे.

निखिलएम,

हो, तुम्ही म्हणतात ते साधारणत: बरोबर आहे. मायबोलीचा संदर्भ विकीवर कुणीतरी ४ जाने. १४ ला टाकला होता. तो मी ७ जाने.ला इथे प्रतिसादात दाखवला. लगेच ८ जाने.ला कोणीतरी काढून टाकला. इथे इतिहास दिसतो : http://en.wikipedia.org/w/index.php?title=Vithal_Venkatesh_Kamath&diff=5...

ज्या कोणी संदर्भ काढला त्याचा आयपी ५९.१८४.१४०.३४ आहे. हा पत्ता मुंबईचा दिसतो.

आ.न.,
-गा.पै.

कुठल्याही क्षेत्रात माणूस जितका यशस्वी होतो तितकेच त्यांना मित्रही मिळतात आणि शत्रूही. .त्याचं वागणं काही जणासाठी देवासमान असत तर काही जणांसाठी भामट्या सारख.. चालायचच . प्रत्येक जण आपापल्या अनुभवानुसार व्यक्त होतो.
एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ( पार्ल्यातले) ज्याचं नाव खूप गाजलेलं आहे. त्यांचा माझ्या काकांना ( अमेरिकेतल्या) त्यांची जमीन विकताना ( त्या व्यावसायिकाचा ) खूप वाईट अनुभव आला होता. पण त्यांचाच बाबतीत इतरांचा अनुभव मात्र खूप म्हणजे खूपच छान असतो /आहे. प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येत असतात. शेवटी हेच जीवन आहे.
पण तरीही तुमच्या लढाईत तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळुन तुमचे व यात गुंतलेल्या इतरांचे पैसे व्याजासहित तुम्हाला मिळोत हि शुभेच्छा.

Pages