छायागीत २ - है कली कली के लब पर, तेरे हुस्न का फसाना…

Submitted by अतुल ठाकुर on 1 January, 2014 - 10:46

khayyam-242x300.jpghttps://www.youtube.com/watch?v=Gr5eevEgblw

हिन्दी चित्रपट संगीतात खय्यामचा बाजच वेगळा. “आप यूं फासलोंसे”, “कहीं एक मासूम नाजुकसी लडकी” पासुन ते “दिखायी दिये यूं” पर्यंत कुठलीही गाणी घेतली तरी त्यावर खय्यामची स्वतःची अशी ठसठशीत छाप जाणवते असं म्हटल्यास वावगं होणार नाही. आकर्षक माधुर्य असलेली संथ चालीची गाणी तर खय्यामच देउ जाणे. मग ते “ऐ दिले नादां” असो की “अपने आप रातोंमे”. खय्यामच्या प्रत्येक गाण्यावर लिहीण्यासारखं खुप आहे. मात्र येथे मी “है कली कली के लबपर” ची निवड केली आहे. १९५८ सालच्या “लाला रुख” चित्रपटातील हे गाणं मी फार पूर्वी रेडीयोवर ऐकलं होतं. प्रथमदर्शनी प्रेमाबद्दल माहित नाही मात्र प्रथम ऐकताक्षणी प्रेमात पडण्यावर माझा अनुभवसिद्ध विश्वास आहे. त्यावेळी रेडीयोवर शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पं. शिवकुमार शर्मा यांनी कुठल्याशा रागाचं उदाहरण देताना हे गाणं ऐकवलं होतं. तेव्हापासून या गाण्याच्या प्रेमात पडलो. राग कोणता होता ते स्मरणात नाही. मात्र या गाण्याची गोडी उत्तरोत्तर वाढतच गेली.

हे गाणं अनेक अर्थाने वेगळं आहे. प्रख्यात गायक तलत मेहमूद नायक असलेला हा चित्रपट. मात्र हे गाणं दुसर्याच कलाकारावर चित्रीत झालं आहे. काही क्षण तलतचं दर्शन या गाण्यात जरुर घडतं. संपूर्ण चित्रपट न पाहता फक्त हे गाणं पाहण्याचा योग आला आणि या गाण्यावर आवर्जुन लिहावसं वाटलं. मुळ चित्रपटातला प्रसंग, कथेतलं गाण्याचं स्थान, त्यातील व्यक्तीरेखा, त्यांचे स्वभाव हे मला जसे वाटले त्यापेक्षा पूर्णपणे वेगळे असण्याची शक्यता आहे. इथेच तर गंमत आहे. जे दिसलं, जे पाहिलं, जे वाटलं ते लिहिलं. कथेचा ताण नको, त्यातल्या व्यक्तींची गुंतागुंत नको. आणि आस्वादाला त्यामुळे बाधा येते असं मला तरी कधीही वाटलं नाही. रफीचा सुरवातीचा कोवळा आवाज, त्यात कैफी आझमीचे धुंद काव्य. आणि खय्यामची अरेबिक थाटाची नशा आणणारी संगीत रचना. सर्वप्रथम शारीरिक चापल्य दाखवत नृत्य करणारी युवती पडद्यावर दिसते.ते नृत्य, तिचा शृंगार, धुपदानातुन उसळणारा धूर, पायघोळ अंगरखे घातलेले, छोट्या दाढीमिश्या राखलेले ते रसिक पुरुष.

गाणं पाहताना सर्वप्रथम वेगळेपण जाणवतं ते हे की येथे कुणाच्याही नजरेत आर्जव नाही, इशारे नाहीत की काहीवेळा दिसणारी वखवख देखिल नाही. जणुकाही जीवाला जीव देणारे चार मित्र घटकाभर मौज करण्यासाठी जमले असावेत. दिलखेचक नृत्य करणारी ती ललना तर त्यांच्या खिजगणतीतही नाही. हे मित्र पूर्णपणे एकमेकांच्या मैत्रीतच गुरफटलेले आहेत. आणि म्हणुनच अचानक वाढलेली नृत्याची लय, त्यावरील त्या परीने केलेली करामत, पुन्हा हळुवार झालेला वेग हे सारं काही थोडावेळ पाहुन त्यांच्यातला एकजण आपली नापसंती व्यक्त करत म्हणतो, ” अरे भाई हसन, ये गुंगा नाच कुछ हमे तो पसंद नही.” यावर दुसरा हसनला नृत्याला “जबान” द्यायला सांगतो. हसन मित्रांचा हुकुम मान्य करतो. आनंदाचं कारंजं उसळल्याप्रमाणे लय वाढते. त्यांच्यापैकी एकाची पावलं वाद्य घेउन त्या सुंदरी बरोबर थिरकु लागतात आणि सुरु होतं ” है कली कली के लब पर…….” गीतकार कैफी आझमीची नशीली शब्दरचना गाण्यातला मादकपणा आणखि वाढवते. काही ओळी देण्याचा मोह मला येथेही आवरत नाही.

ये खुले खुलेसे गेसु, उठे जैसे बदलियांसी ये झुकी झुकी निगाहें, गिरे जैसे बिजलियांसी तेरे नाचतें कदममें, है बहार का खजान है कली कली के लब पर, तेरे हुस्न का फसाना मेरे गुलसीतां का सबकुछ, तेरा सिर्फ मुस्कुराना

मैफल रंगतदार होत जाते. मित्रांच्या डोळ्यात हसनबद्द्लचं कौतुक ओसंडुन वाहतं. खांदे उडवत ठेक्याला साथ देणारे ते मर्द गाण्यात रंगुन गेलेले असतानाच “बुलावा” येतो. सुरिली मैफल आवरती घेण्याची वेळ येते. सर्वप्रथम हसन निघतो. त्यानंतर इतर उठु लागतात. तेथुन निघताना नाचणार्या तरुणीशी बोलणं नाही, सुचक कटाक्ष नाहीत, स्पर्श नाही, काहीच नाही. फक्त किंचीत रेंगाळुन चेहर्यावर दाखवलेला प्रशंसेचा भाव. यापेक्षा जास्त काही नाही. या सार्या गोष्टींमुळे हे गाणं मला फार वेगळ्या तर्हेने चित्रीत केल्यासारखं वाटतं. प्रत्येक बाबीचं ठेवलेलं योग्य भान आणि दाखवला गेलेला संयम. मैफल मावळते पण मनात या सार्या गोष्टी रुंजी घालत राहतात. लक्षात राहतं ते लवचिकपणाचा साक्षात्कार घडवणारं नृत्य, त्याभोवती जमलेले ते रांगडे परंतु स्वतःवर ताबा असलेले जिवलग सवंगडी, रफीच्या आवाजातली मखमल, कैफी आझमीच्या शब्दातली वारुणी, आणि खय्यामची अभीजात स्वररचना……

अतुल ठाकुर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख Happy गाणं आणि त्याचा परामर्ष - दोन्ही.
हे गाणं ऐकताना आत कुठेतरी काहीतरी हलतं आणि हवेत तरंगल्यासारखंही वाटतं.