'योगायोग'

Submitted by dr.sunil_ahirrao on 18 December, 2013 - 07:44

' योगायोग '
योगायोग

By डॉ.सुनील अहिरराव

मी' त्याला पहिल्यांदा भेटलो ते डॉ. प्रशांत च्या क्लिनिकमध्ये. बाहेर

दोन चार पेशंटस् आणि तो केबिनमध्ये खुर्चीत बसलेला. एक गुडघा टेबलाच्या

कोपऱ्याला टेकवून . हातात वर्तमानपत्र. खूप एकाग्रतेने काही वाचत असावा.

चेहऱ्यावर एक गूढ गंभीर भाव. नजर वर्तमानपत्राच्या पानांवर , पण कदाचित

त्या पलीकडे जाणारी.. त्याला डिस्टर्ब करावसं वाटेना. पण आत गेलो तरी

त्याला माझ्या अस्तित्वाची जणू जाणीवच नव्हती.

"नमस्ते डॉक्टर "

त्याने माझ्याकडे अनोळखी नजरेने पाहिले. कदाचित पूर्वीच्या कसल्यातरी

गूढात तो अजून बुडालेला. कदाचित त्याला टोकलेले आवडले नसावे. पण पुढच्याच

क्षणी तो स्वच्छ हसला

'आपण ?'

'मी डॉ.समीर. आपण डॉ. श्रीकांत ना ? प्रशांतकडून बऱ्याचदा ऐकलय तुमच्याबद्दल '

'' हो. मी प्रशांतकडून ऐकलय तुमचं नाव एकदोनदा' त्याने वर्तमानपत्र

व्यवस्थित घडी करून टेबलवर ठेवलं. पुढे म्हणाला ' प्रशांत व्हिजिटला

गेलाय. येईलच आता; तुम्ही बसा'.

'आपण कुठे असता?' मी संभाषण रेटत विचारले.

' दत्त मंदिरला क्लिनिक आहे.'

आता स्वतःची ओपीडी सोडून हा बाबा इकडे काय करतोय, असा विचार मनात आला.

' आता निघतोय तिकडे. प्रशांतचा आग्रह होता, म्हणून थांबलो होतो.प्रशांतला

फोन करेन नंतर '

तो म्हणाला आणि मी दचकलोच. जणू माझा विचार ऐकूनच त्याने हे वाक्य उच्चारले होते.

'अच्छा..'

इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली

' हं, आलोच दहा मिनिटांत 'नंतर मला म्हणाला 'मी चलतो आता, तुम्ही

थांबा.मी करेन फोन प्रशांतला '

माझ्या उत्तराची वाट न पाहता तो घाईघाईने निघूनही गेला. क्षणभर वाटलं हा

विक्षिप्त मनुष्य असावा.

प्रशांत आला.

' अरे सम्या ? खूप दिवसांनी इकडे ? कांत्या गेला वाटतं !

''हो, एवढ्यातच गेला. तुला नंतर फोन करतो म्हणाला.'

आता कसला फोन करतोय तो, शोधून आणावं लागेल त्याला

''शोधायचं कशासाठी?'

'नंतर बोलू. आज भरपूर पेशंटस् येतील बघ !'

' कशावरून '

' जाऊदे नंतर सांगतो.' आणि त्याने ओपीडी काढायला सुरुवात केली.

तो माझ्या उमेदवारीचा काळ होता. अजून प्राक्टीस सुरु नव्हती केली. एका

हॉस्पिटलला पार्टटाईम जॉब करायचो आणि उरलेला वेळ टाईमपास . प्रशांत माझा

गावाकडचा मित्र. इथे थांबलेले आम्ही सगळे सिंगल्स. त्यामुळे वेळ मिळेल

तसा एकमेकांकडे पडीक असायचो. प्रशांत सुद्धा ओपीडी संपली की माझ्याकडे

यायचा . खिसा गरम असला की बाहेर हॉटेलात बरेचदा सोबत जेवण करायचो.नाहीतर

मेस होतीच. तर कांत्या त्याचा क्लासमेट.

'अचानक सिझन वाढलेला दिसतोय ' मी म्हणालो.

' कांत्या की कृपा !'

' म्हणजे ?'

प्रशांतने या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तो प्रचंड बिझी होऊन गेला.मी

त्याला ओपीडीत शक्य तेवढी मदत केली. मध्यंतरी थोडे बोअर झाले म्हणून

बाहेर फिरून आलो. मग रात्री ११ वाजेला प्रशांत फ्री झाला. आम्ही एका

रेस्टॉरंट मध्ये आलो. जेवणाची ऑर्डर दिली.

' तर कांत्या आला की माझ्याकडे भरपूर पेशंटस् येतात, पायगुण !'

' हाहाहा , आपण डॉक्टर्स इतके अंधश्रद्ध झालो, तर मग इतरांचे विचारायलाच नको.

' खूप पूर्वी माझाही विश्वास नव्हता. पण कांत्याला मी ६ वर्षांपासून

ओळखतो. वर्गातला सगळ्यात जवळचा म्हणता येईल, असा मित्र. म्हटले तर खूप

समंजस आणि तसाच खूप लहरी सुद्धा. मात्र स्वार्थ वगैरे प्रकार त्याला अजून

शिवला नाही. खूप इथिकल वगैरे. तर खूप पूर्वी मी त्याच्यातल्या या अनोख्या

उर्जेचा अनुभव घेतला. ते सारं शब्दांतून नाही सांगता येणार पण खूप

वर्षांच्या अनुभवांतून हा निष्कर्ष मी काढलाय की कांत्या जिथे जातो, तिथे

लोक खेचले जातात.'

' हाहाहा ' मी मोठ्याने हसलो

' तू उद्या येऊन पहा.'

' ठीक , उद्या कांत्या येणार आहे ?'

' तो येणार नाहीये, म्हणूनच तू येऊन पहा.'

' तू म्हणतोयस, ते मला अजिबात पटत नाही. पण केवळ तू म्हणतोयस म्हणून आपण

ते खरं मानलं तरी मला एक सांग, या तथाकथित सामर्थ्याची त्याला स्वतःला

जाणीव आहे ?'

' त्याला स्वतःचा अजिबात विश्वास नाही, असे तो सांगतो. पण त्याला ही

जाणीव नक्कीच असावी, असे मला वाटते. तसा तो स्वतः म्हणतो की त्याच्यात हे

म्याग्नेटीसम असते, तर त्याच्याच क्लिनिकमध्ये गर्दी नसती का झाली ?'

' मला वाटते त्याचं म्हणणं बरोबर आहे. तू एका वेगळ्या विचारचक्रात अडकत

चालला आहेस. वेळ जाण्यापूर्वी त्यातून बाहेर ये. आताही आपण तुझ्यासाठी

सायकीयाट्रीस्ट चा सल्ला घ्यायला काय हरकत आहे?'

' एवढ्यात तुझा विश्वास बसणार नाही. तू उद्या माझ्या क्लिनिकला ये.'

'ठीक आहे. येईन मी '

जेवण आटोपल्यावर मी प्रशांतचा निरोप घेतला

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दुसऱ्या दिवशी मी सकाळपासून माझ्या ड्युटीत बिझी होतो. संध्याकाळी चारला

रुमवर परतलो. तासभर झोप काढली तोपर्यंत कांत्या हा प्रकार डोक्यात सुद्धा

आला नाही. पाच वाजले आणि मी अस्वस्थ झालो. मग घाईघाईत फ्रेश होऊन

प्रशांतच्या क्लिनिकला आलो. पेशंट कुणीच नव्हते.

' बैस आरामात. आज शांतता आहे ' प्रशांत म्हणाला

मी पेपर चाळत बसलो.

' आपण कांत्याला फोन करायचा का? बघुयात त्याच्याकडे काय पोझिशन आहे !'

'कांत्याला फोन करण्यात अर्थ नाही.

' मी करू का फोन ? म्हणजे समजेल तरी आज ओपीडी कशी आहे !'

प्रशांतने त्याचा नंबर डायल करून माझ्याकडे मोबाईल दिला. 'बोल'

'रिंग जातेय. रिजेक्ट केला कॉल..मला वाटतं तो बिझी असेल, किंवा बाईकवर '

'पुन्हा कॉल कर '

मी पुन्हा कॉल केला ' मुव्ह्ड औट ऑफ कव्हरेज एरिया....'क्यासेट वाजत राहिली

'तर हे असं आहे !'

'पण तो कॉल का घेत नाहीये यार ? '

' त्याच्या इच्छेपुढे आपलं काही चालणार नाही.'

'अरे पण जिवलग मित्राचा फोन सुद्धा घ्यायचा नाही म्हणजे काय? आताचं सोडून

दे ,पण एखादी इमर्जन्सी असली म्हणजे ?'

'अशा वेळी मी त्याला एसटीडी बुथवरून फोन करतो. किंवा मेसेज करणे एवढेच

माझ्या हाती असते. मात्र सारे अनोळखी कॉल्स तो आवर्जून एक्सेप्ट करतो.'

एकंदरीत त्या दिवसाची संपूर्ण संध्याकाळ मी आणि प्रशांतने गप्पा करण्यात

घालवली. मोजून फक्त तीन पेशंटस् झाले.मी जाम बोअर झालो.

' तर हे असं आहे बाबा.' प्रशांत म्हणाला

' हा निव्वळ योगायोग आहे. मी उद्या पुन्हा येईन '

' वेलकम !' प्रशांत हसत म्हणाला

........................................................................................................

दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो तर तेच ! एखाद दुसरा पेशंट

' मला वाटतं सगळीकडे स्ल्याक असावा.' मी प्रशांतला धीर देण्यासाठी म्हणालो.

'दोन दिवसांत एवढं फ्लक्च्यूएशन ...'

' कांत्याला मध्ये आणू नकोस. हा निव्वळ योगयोग आहे.'

' प्रत्येक वेळी योगायोग कसा असेल?'

' पण हा योगायोग नाही, हे तरी कसे सिद्ध करणार ?'

' ते काहीही असो, पण मला खात्री आहे, मी काढलेला निष्कर्ष चुकीचा नाही.'

इति प्रशांत

' एक मार्ग असा आहे की कांत्याला तुझी अर्धी ओपीडी झाल्यावर ८ वाजेनंतर बोलवायचं '

' तो येणार नाही. त्याची पण प्राक्टीस आहे..आणि विशेष म्हणजे तो स्वतःच

यावर विश्वास ठेवत नाही.'

मला वाटून गेलं प्रशांतच्या मनात तो विचार एवढा घट्ट रुतून बसला आहे, की

त्यासाठी तो उघडा पडू नये, म्हणून तो आता बहाणे सांगतोय. मला खरेच त्याची

कीव वाटली त्या क्षणाला.

'पण आपल्याला एखाद्या निष्कर्षावर यायचं असेल तर त्याला इथे यावं लागेल.

आपल्याला हव्या त्या वेळात !'

' तो स्वतःची ओपीडी बुडवून तर अजिबात येणार नाही. तसं त्याला नुसतं

विचारलं तरी तो शिव्या घालेल मला. सध्या फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे

कांत्या त्याच्या लहरीनुसार येईल तसं ऑब्झर्व करायचं. कुणी सांगावं

आपल्याला हवी तशी वेळ जमूनही येईल !'

...........................................................................................................................................................

नंतर तो विषय मागे पडला. यथावकाश मी स्वतःची प्राक्टीस सुरु केली. निव्वळ

दोन महिन्यापासून माशा मारत बसलो होतो. बरं ओपीडी टाईम सर्व मित्रांचा

सारखाच. त्यामुळे प्रशांतकडे इच्छा असूनही जाऊ शकत नव्हतो. असोसिएशनच्या

मिटींगला क्वचितवेळा भेट व्हायची. आठवड्यातून एखादा फोन. फारसा संपर्क

उरला नव्हता.

सिटीत गेलो असताना अचानक तो दिसला. कांत्या !

'नमस्ते डॉक्टर !'

' हलो, अरे किती दिवसांनी भेटतोयस मित्रा !

त्याने मला निदान ओळखलं हेच मला खूप बरं वाटलं.

'चला चहा घेऊ !'

"जरूर '

आम्ही समोरच्याच एका हॉटेलात आलो.

' खरे म्हणजे मला चहासाठी कंपनीच हवी होती बरं झालं तू भेटलास '

त्याने आरामात सिगारेट पेटवली नंतर पाकीट माझ्याकडे देत म्हणाला

'तू घेतोस ?'

' हं, तसा मी घेत असतो अधुनमधून पण आता नको.'

'ओके.एज यु विश..बरे प्राक्टीस काय म्हणतेय ?'

' वेटींग सुरु आहे. मी आलो होतो क्लिनिकच्या उद्घाटनाची पत्रिका द्यायला.

तुम्ही नव्हतात-"

' हो पत्रिका मिळाली होती, पण नाही जमलं यायला. येईन केव्हातरी प्रशांतबरोबर'

तो तर येतोच म्हणा अधूनमधून. पण तुम्ही आज चलाच. नंतर काही तुम्ही लवकर

भेटणार नाही'

' अरे यार, साडेपाच झालेत. इट्स टू लेट नाऊ ..मलाही आतापर्यंत माझ्या

क्लिनिकला पोचायला हवं होतं !"

' तुम्हाला फक्त ५ मिनिटे उशीर होईल. प्लीज...'

'ठीक आहे' माझा आग्रह त्याला मोडवला नसावा. चहा संपवून आम्ही निघालो

'तू पुढे हो. मी आलोच. '

'याना , तुमचे पाय आमच्या क्लिनिकला लागले, हे भाग्य !' तो मोकळेपणी हसला

.मी त्याला क्लिनिक दाखवले.

' स्पॉट छान आहे. तुला चांगला रिस्पॉन्स मिळेल इथे.'

' सध्या दिवसभरात फक्त ४-५ पेशंटस होतात. '

' येतील रे पेशंट , रील्याक्स !'

आणि तेवढ्यात बाहेर पावलं वाजली.

'पेशंट आलाय तुझ्याकडे !' तो म्हणाला.

मी पेशंटला आत बोलावले. कपाळावर जखम होती. स्टीचेस घ्यावे लागणार होते.

'शुचरिंग सेट घे. मी मदत करतो.'

त्याने ग्लोव्ज घालून जखम स्वच्छ केली , आणि लिग्नोकेन देऊन जागा बधीर केली.

' घे स्टीचेस'

मी स्टीचेस घेतले. " थ्यांक्स, तुमच्यामुळे पटकन काम झाले.'

'मी चलतो आता. '

' थांबा ना पाचेक मिनिटं '

पुन्हा बाहेर पावलं वाजली.

'पुढचा पेशंट आलाय, मी चलतो.' म्हणत तो हसतहसत निघूनही गेला.

त्यादिवशी त्या एका शिफ्टमध्ये मला चक्क १५ पेशंटस् मिळाले. खूप आश्चर्य

वाटले. मग मी कांत्याचा जरा गांभीर्याने विचार करू लागलो. पण बुद्धीवादी

मन म्हणत होतं, हे काही खरं नाही, फक्त एक योगायोग ! न राहवून मी

प्रशांतला फोन करून सांगितलं.

' तर तुझी खात्री झाली म्हणायची !'

'असं नाही, पण तुला सहज सांगितलं '

' हरकत नाही, भविष्यात नक्की आपण एका निर्णयावर येऊ अशी आशा करुयात "

' हं, होप सो..

.......................................................................

त्यानंतर पंधरा दिवस असेच गेले. कांत्या येऊन गेल्यापासून किंवा लोकांना

माझा गुण आला म्हणून असेल पण प्राक्टीस थोडी बरी चालू लागली. आठेक

दिवसांनी प्रशांतचा फोन आला.

'ह, बोल प्रशांत "

' कांत्या काल बाहेरगावी गेलाय. त्याची बाईक माझ्याकडे ठेवून गेलाय. आज

संध्याकाळी साडेसहा पर्यंत तो येणार आहे. म्हणजे अर्धी ओपीडी झाल्यावर.

तू पाच वाजेला माझायाकडे येऊ शकलास तर बघ!'

' तू पेशंटसचं रेकॉर्ड ठेवतोसच ना? तू लिहून ठेव.'

' माझ्या लिहिण्यावर तू विश्वास ठेवणार नाहीस. बेटर, तू तुझी ओपीडी उद्या

बंद ठेव आणि माझ्याकडे ये. पुन्हा असा चान्स भविष्यात लवकर येण्याची

शक्यता कमीच !'

'पण यार तो कांत्या साडेसहालाच येईल कशावरून ? समजा आला रात्री दहाला, तर

विनाकारण ओपीडी बुडेल माझी !'

' वेळेच्या बाबतीत कांत्या शार्प आहे. तो सिटीत पाच वाजेला पोचला तरी

माझ्याकडे साडेसहालाच येणार.'

'बघतो.'

'बाय '

छे, छे, काय तरी वेड लागल्यासारखं करायला लागलोत आपण ! प्रशांत तर

अडकलाच, आपणही अडकत चाललो आहोत. मी प्रयत्नपूर्वक तो विषय तेवढ्यापुरता

बाजूला ठेवला.

.........................................................................................................................................................

मी दुसऱ्या दिवशी डॉ.श्रीकांत च्या विचारांनी अस्वस्थ झालो. खरं म्हणजे

मी माझ्या क्लिनिकच्या रस्त्याने बाईक दामटली पण अस्वस्थता काही जाईना.

मग जणू खेचल्याप्रमाणे प्रशांतच्या क्लिनिककडे वळलो.

आलास !' प्रशांतने हसून विचारलं

'तू पण मला तुझ्यासारखा पागल करून टाकणार ,असं वाटतय !'

' हा हा हा '

' मी येणार नव्हतो; पण भयंकर अस्वस्थ वाटायला लागलं. मग आपोआपच गाडी इकडे

वळली. बाकी काही असो, पण कांत्यात एक एनर्जी नक्कीच आहे. जी लोकांना

आपल्याकडे आकर्षित करते. त्याशिवाय का मी असा ओपीडी बुडवून आलो?'

' शक्य आहे '

' मग हेच त्याच्या स्वतःच्या ओपीडी बाबतीत आहे का? '

' त्याची प्राक्टीस बरी आहे तशी.'

' म्हणजे फारशी चांगली नाही-'

' त्याचं काय आहे, कांत्या हा परोपकारी मनुष्य आहे. तो फारसा हिशेबी

वगैरे नाही. साधा माणूस आहे. त्यामुळे प्राक्टीस बरी असली, तरी कमाई फार

नाही. नाव मात्र नक्कीच आहे.'

संध्याकाळी सहा वाजेला एक पेशंट आला.

'डॉक्टरसाहेब, डोकं लै दुखतंय !'

प्रशांतने त्याला तपासलं. 'काही टेंशन वगैरे?'

' त्याचं काय हाये सायेब, टेंशन तर कुणालाबी आसतयचं ! पन माजं कारण येगळं

हाये. म्हंजी आसं बघा, मला भाईरचं थोडं थोडं समजतं. तुमचा इस्वास नाय

बसणार, पन म्या मोठाले आजारबी ठीक करतो ! पन त्याचं काय हाये सोताचा

उतारा सोतावर न्हाई चालत. म्हनुनशान तुमच्याकडं आलो !'

' बरे, बरे '

प्रशांतने त्याला प्रिस्क्रिप्शन लिहून दिले.

हे घ्या. अर्ध्या तासाने बरे वाटेल'

पेशंटचं बोलणं ऐकलंसना ? पेशंट गेल्यावर प्रशांत म्हणाला

' ते बाहेरचं वगैरे भंकस !'

'हो ते भंकस पण तो एक महत्वाचं एक वाक्य बोलून गेला. "स्वतःचा उतारा

स्वतःवर चालत नाही." कांत्याचा पायगुण त्याच्या स्वतःसाठी विशेष

फायद्याचं नाही. ते इतरांसाठी आहे. आणि आपण नेहमीच पाहतो की

सायकोसोम्याटिक आजारांच मूळ मनात असतं आणि लक्षणे शारीरिक असतात. हे आजार

कधीकधी नुसत्या प्लासिबोनं सुद्धा बरे होतात. पण शारीरिक लक्षणांचा

मनापर्यंत गेलेला धागा न सापडल्यास पेशंटला विनाकारण महागड्या

तपासण्यांना सामोरे जावे लागते. पन निदान होत नाही आणि पेशंट लुटला जातो.

असे पेशंटस् वैतागून बाहेरच्या बघणाऱ्यांकडे जाऊन खडखडीत बरे होतात ! हा

त्या बाहेरच्या उपायांचा गुण नसून पेशंटच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या

'मनाने' पेशंटच्या बरे होण्याच्या दृष्टीने दिलेली प्रतिक्रिया मात्र

असते. यातही पेशंटची लुट होत असली तरी पेशंट त्यात काहीच तथ्य नसूनही बरे

होतात !'

तर आमचा असा काथ्याकुट सुरु असताना बरोबर साडेसहाला 'हलो फ्रेण्ड्स !

म्हणत कांत्या उगवला.

' ये तुझीच वाट पहात होतो.'

' काय म्हणतेय ओपीडी ?'

' स्ल्याक आहे; पण तू आला आहेस तर बघुयात.'

' तुझ्या डोक्यात पाणी झालंय ! बरं, ते जाऊदे ; मला चहा हवाय आणि सिगारेट

पण ! चल टाईमपास नको करूस !'

' जाऊना थोड्या वेळाने. थकलेला आहेस, जरा बैस निवांत.

कांत्याने एक्झामिनेशन टेबलवर बैठक मारली. मला म्हणाला

' अरे , तू गेला नाहीस आज क्लिनिकला?'

' अं, थोडं काम होतं इकडे. म्हणजे फंक्शन होतं मित्राकडे. तिथे उशीर

झाला.मग इकडे आलो.'

'अच्छा अच्छा! जाम थकलो यार.' तो टेबलवर आडवा होत म्हणाला

' तुला झोपायचं तर बिनधास्त झोप कांत्या. कारण आज अगदी मोजून तासाला एक

पेशंट येतोय.'

आणि काय, बाहेर पावलांचा आवाज झाला.

' माझी झोप बोंबलली.' कांत्या उठून बसला.

' थांबरे जरा वेळ. पेशंटच असेल, असे थोडेच आहे !'

पेशंट आत आला तसा कांत्या हसला 'मी तुझ्या रुमवर झोपतो. चावी दे.'

' अरे पाच मिनिटांत जाऊ आपण बैस यार'

आणखी दोन तीन पेशंटस हजर झाले. आणि मग प्रशांतने त्याला चावी दिली.

' मी दहा वाजता येतो. झोपतो जरा वेळ. तुझं आटोपलं की रिंग दे मला'

त्याने त्याची ब्याग उचलली आणि बाईकवरून निघून गेला.'

एका पाठोपाठ एक पेशंटस येतच राहिले. मी आणि प्रशांत दोघेही थकून गेलो.

दहा वाजेला गल्ला मोजताना प्रशांत म्हणाला ' कांत्याची अशी कृपा रोज झाली

तर किती बरे होईल !'

मी म्हणालो 'हाहा , कांत्याला कॉल चार्जेस म्हणून पाचशे रुपये आपण दिले तरी चालेल."

कांत्या आला एकदम फ्रेश , आंघोळ वगैरे आटोपून.

'हलो '

'बैस '

' ओपीडी छान होती ?'

'तुझी कृपा'

कांत्या हसला

' हो, प्रशांत सांगतोय ते खर आहे. '

' चल, बोअर नको मारू यार. बरे आता निदान चहा तरी ?'

' अरे चहा काय, मस्त पार्टी देतो तुला वुईथ ड्रिंकस् !'

' भूक नाहीय यार. सध्या मला सिगारेटची भयंकर तलफ आलीय.'

आम्ही हायवेवरच्या एका हॉटेलात आलो. हॉटेल अगदी शांत होतं. निवांत

बोलायचं म्हणून लॉनवरचं कोपऱ्यातलं टेबल निवडून बसलो. कांत्या आधी

सिगारेट पेटवतो. दीर्घ झुरका घेतो.

'च्यायला, पूर्ण २४ तास उलटून गेलेत सिगारेट पिऊन.'

' हं, बाहेर गेला होतास पोरीबरोबर?'

वेटर येतो, म्हणून कांत्या थांबतो.

'कांत्या काय घेणार व्हेज नॉनव्हेज? मी आणि सम्या व्हेज आहोत, तुला माहीतच आहे.'

' मला भूक नाहीय, पण ठीक आहे; व्हेजच सांग.'

' ड्रिंक घेणार ?'

' आज तुला काय झालंय ? तू स्वतः घेत नाहीसच. कंपनीशिवाय मजा नाही.'

' समीर देईल तुला कंपनी. सम्या घेणार ना ?

' अं, ठीक आहे, तुम्हाला कंपनी म्हणून घेईन एखाद दोन पेग'

प्रशांतने कांत्याच्या ब्रांडची व्हिस्की सांगितली सोबत कोल्ड्रिंक,

स्टार्टर्स वगैरे. वेटरने सारं आणून ठेवलं. मी पेग बनवले.

' चीअर्स !'

' चीअर्स!'

' तर मी म्हणत होतो, आज तू एवढा मेहेरबान का झालास ?'

' तुझी कृपा झाली म्हणून !'

' माझी कसली कृपा ? ते बोअर नको मारुस यार'

तुम्ही आलात की याच्याकडे पेशंटस चिक्कार वाढतात, असे प्रशांत म्हणतो.

आणि मी स्वतःही तो अनुभव घेतला आहे.'

तो हसला ' तसं असेल, तर आता रात्री साडेदहा वाजता इथे या हॉटेलात सुद्धा

गर्दी हवी होती. हा सगळा योगायोग आहे. खैर जानेदो. यानिमित्ताने पार्टी

मिळतेय हे एक बरंच आहे !

' तू रोज माझ्याकडे पायधूळ झाडलीस तर तुला रोज पार्टी देईन , वुईथ ड्रिंक्स !'

' ते जाऊदे. दुसरं काही बोल.'

' तू कुठे गेला होतास ?'

' गावाला'

हॉटेलातल्या इतर टेबल्ससमोर इतर तीनचार गिऱ्हाईके येऊन बसली. मग हळूहळू

गर्दी वाढत गेली.

'गावाला म्हणजे कुठे?'

कांत्याने आपला पेग संपवला.

' आणखी घेणार ? समीर ?'

' आणखी एक चालेल.'

सगळे वेटर्स बिझी होऊन गेले. चार पाच हाका मारल्यावर वेटर आला .प्रशांतने

वेटरला पुन्हा व्हिस्कीची ऑर्डर दिली.

' अभी लाया सर,'

' सुनो'

' हां सर,'

' क्या यहां रोज इतनी भीड होती है ?'

' नही साहब, लेकिन आज पता नही कहांसे-'

' ठीक है'

' बघितलंस कांत्या ? तुझा प्रभाव '

कांत्याने दुसरा पेग ओठांना लावला.

म्हणाला 'तुझ्या बोलण्यात कितपत तथ्य आहे, मला माहित नाही. याला योगायोग

म्हणूयात आपण. पण हा वारंवार होणारा योगायोग माझ्या बाबतीत तितकासा

फायदेशीर वगैरे कधीच नव्हता. आता मी पुढे जे सांगणार आहे, ते

व्हिस्कीच्या अमलाखाली बोलतोय, असे समजू नकोस !'

' ओके ,बोल .'

लहानपणीच या योगायोगाचं आणि माझं नातं माझ्या लक्ष्यात आलं- पण ते जाऊदे,

त्याचा विशेष मात्र आता खूप अलीकडे लक्ष्यात आला.'

वेटरन डिशेस मांडल्या सर्व्ह केलं आणि तो निघून गेला. कांत्या पुढे

म्हणाला ' दोन वर्षांपूर्वी आयसीयुत काम करताना हा योगायोग मला वारंवार

जाणवला. माझ्या ड्युटीपूर्वी शांत असणारं हॉस्पिटल माझी एन्ट्री होताच

फुल होऊन जायचं ! माझ्यासोबत ज्या स्टाफसची नाईट असायची, त्यांना

माझ्यासोबतचची ड्युटी म्हणजे संकट वाटायचं; कारण अख्खी नाईट बिझी असायची.

बरं, ज्या एडमिशन्स व्हायच्या त्या सगळ्या क्रिटिकल असायच्या. ओपीपी, हेड

इंज्युरीज, कार्डियाक केसेस एम आय वगैरे. आयसियुला जोडून डायलिसीस युनिट

होतं, हे सर्व मिळून वीस बेडस होते. आणि जनरल वॉर्ड , प्रायव्हेट,

सेमीप्रायव्हेट मिळून चाळीस बेडस वेगळे. वॉर्ड आणि आयसीयूमध्ये प्रत्येकी

प्रत्येक ड्युटीत किमान दोन डॉक्टर्स असायचे. वॉर्डातील पेशंटला काही

प्रॉब्लेम झाल्यास आयसीयुतल्या डॉक्टर्सना बोलावलं जायचं; गरज वाटल्यास

पेशंटला आयसीयुत आणलं जायचं. थोडक्यात, वॉर्डातल्या पेशंटची जबाबदारीही

आयसीयूच्या डॉक्टरवर असायची. कुणाचा इसीजी घे, कुणाला सिव्हीपी लाईन टाक,

कुणी अरेस्टमध्ये गेला त्याला एंडोट्राकियल इंट्यूबेशन करा,

व्हेंटिलेटरवर घ्या, कार्डियाक मसाज दया, कुणाचं पाच पाच मिनिटाला बीपी

मॉनिटर करा, आणि सेंट्रल मॉनिटरवर सतत लक्ष ठेवायचं, आवश्यकतेनुसार त्या

त्या कन्सल्टंटला इन्फोर्म करायचं, अशी शेकडो कामे असायची. त्यात पुन्हा

पेपरवर्क कंप्लीट करायचं. बरेचदा या धावपळीत रात्रभरात पंधरावीस मिनिटं

नुसतं खुर्चीत बसायला सुद्धा मिळायचं नाही. माझी नाईटड्युटी असली की

कन्सल्टंट डॉक्टर्स बिनधास्त असायचे कारण मी बरेच प्रॉब्लेम्स स्वतःच

म्यानेज करून घेत असे.

एके दिवशी एक नवीन डॉक्टर पोरगी माझ्यासोबत नाईटला आली. सावळीच, पण

आकर्षक, प्रसन्न चेहरा. बऱ्यापैकी कोऑपरेटीव वाटली. नाईट संपता संपता ती

म्हणाली ' आपण दोघांनी एकच ड्युटी घेतली तर ?

' हरकत नाही, पण मी फक्त नाईट ड्युटीज करतो. आठवड्यातून चार नाईट्स तीन

ऑफ. त्यात एखादी एक्स्ट्रा ड्युटीपण असतेच.'

' अरे, पण मग तू झोपतोस केव्हा?'

' दुपारी बारा ते संध्याकाळी सहा.'

' सलग चार नाईट्स केल्यावर तुला थकवा नाही येत ?'

' येतो ना , पण उरलेल्या दिवसांत मी रिफ्रेश होतो.'

' मी पण चार नाईट्स केल्या तर मला तीन ऑफ मिळतील ?'

' मिळतीलच. पण तू तसं करू नकोस, आजारी पडशील. बेटर, तू चार मॉर्निंग आणि

दोन नाईट्स घे.'

' मला तुझ्यासोबत नाईट मिळेल ना पण ?'

' सहज. माझ्यासोबत ड्युटी करायला तसही कुणी डॉक्टर तयार होत नाही. माझ्या

नाईट्स हेवी असतात, असे सर्वांना वाटते'

' मला एंडोट्राकियल इंटयुबेशन शिकवशील ? आणि इसिजीतले बारीकसारीक चेंजेस

मला कळत नाहीत.'

' मला जेवढं माहित आहे, सांगेन मी '

..........................................................................

रजनीला माझ्यासोबत अगदी सहजपणे ड्युटी मिळाली. ती सिन्सियर होती. आम्ही

दोघे मिळून आयसीयू व्यवस्थीत म्यानेज करायचो. आमची बऱ्यापैकी दोस्ती

झाली. माझ्यासोबत ड्युटी असेल तेव्हा ती माझासुद्धा डबा घेऊन यायची. आमचा

छोटासा गृप जमला डॉक्टर्स, स्टाफस, वॉर्डबॉईज सगळेच. खेळीमेळीच्या

वातावरणात आपापल्या कामावर परिणाम न होऊ देता सगळे एकमेकांना सांभाळून

घेत होतो. पण म्यानेजमेंट पर्यंत ही भनक कशी पोचली माहित नाही आणि आमचा

गृप फोडण्याचा प्रयत्न झाला. पाट्या टाकणारे डॉक्टर्स आणि नर्सेस माझ्या

सोबतीला दिल्या गेल्या. सोबतीला इगो प्रॉब्लेम्सही आलेच. त्यामुळे

कम्युनिकेशन ग्याप आला आणि कामात चुका होऊ लागल्या. सर्व चुकांच खापर

सिनिअर म्हणून माझ्या डोक्यावर फोडण्यात येऊ लागलं. रजनीला कंपल्सरी

मॉर्निंग ड्युटी देण्यात आली. तिच्यासोबत सुद्धा हेच प्रॉब्लेम सुरु

झाले. पण आमची मैत्री आणखी घट्ट झाली. रोज एकमेकांना भेटल्याशिवाय जमेना.

तिची मॉर्निंग संपताना आणि माझा ऑफ असेल तेव्हा आम्ही दोघे बाईकवरून

दूरदूरवर भटकून यायचो. ठरवून असं कुठेच जायचो नाही. ऐनवेळी जिथे वाटेल

तिथे जायचं. उन, वारा, पाऊस, थंडी कशाचीच तमा न बाळगता

डोंगरदऱ्यांतसुद्धा मनसोक्त भटकायचो. आमच्या बोलण्याला कोणत्याच विषयाचं

बंधन नव्हतं. साऱ्या भावना, विचार उत्स्फूर्तपणे प्रकट व्हायचे. आमचं

नातं अगदी निखळ, निष्पाप होतं. म्हणूनच भिती हा प्रकार आम्हाला ठाऊक

नव्हता. जवळपास वर्षभराचा रजनीचा तो सहवास म्हणजे माझ्या आयुष्यातील

सर्वात सुंदर दिवस होते.

एव्हाना हॉस्पिटलमध्ये आमच्याबद्दल चर्चांना ऊत आला. तिच्या एका

मैत्रिणीने तर तिला सरळ विचारलंच

' तुम्ही दोघे केव्हा करताय लग्न ?'

आपण अशा प्रश्नांना भीक घालायची नाही , मी रजनीला म्हणालो. पण ती त्या

प्रश्नाने प्रचंड अस्वस्थ होती, हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.

दुपारी तीने मला रिंग दिली. फोन घेणार एवढ्यात तो कट झाला. मी सुद्धा

तिला नुसताच मिस्ड कॉल दिला. त्यादिवशी पहिल्यांदाच खूप बोलावसं वाटत

असूनही मनाचं पाऊल अडखळत राहिलं. तो दिवस प्रचंड अस्वस्थतेत गेला. सलग

दोन दिवस ऑफ होता. मेसला सुद्धा गेलो नाही. बेडवर तसाच पडून राहिलो.

रात्री खूप उशीरा झोप लागली.

सकाळी सहा वाजता तिचा मेसेज आला 'गुड मॉर्निंग' मी तोच मेसेज तिला

फॉरवर्ड केला. नंतर पुन्हा तिच्या उत्तराची वाट पाहू लागलो. तिचा मेसेज

आला नाही. मग मी तिला कॉल केला.

' हलो'

' बोल' तिचा आवाज फार कातर वाटला.

' तुला बरं नाहीये का ?'

' नाहीरे, एम फाईन ..'

' रजनी..'

' बोलनारे..' तिचा आवाज रडवेला झाला.

' काही नाही.. रील्याक्स. मी मी ..नंतर कॉल करतो तुला.' मी अडखळत म्हणालो.

'श्री..'

' हं, बोल..'

' मला तुला भेटावंस वाटतंय. '

' आता ? अग पण तुझी ड्युटी आहेना. आणि तुझी रूम पार्टनर '

' मी आज जाणार नाहीये ड्युटीला आणि पार्टनर बाहेर गेलीय. येतोस ना ?'

' आलो..'

मी थंडगार पाण्याने आंघोळ उरकून तिच्या रुमवर पोचलो.

' ये, बैस.'

' बोल , कशी आहेस ?'

' ठीक' ती हसण्याचा प्रयत्न करीत म्हणाली.

' इथे समोर बैस , माझ्यासमोर.'

' हे काय इथेच तर आहे '

' तू रडली आहेस थोड्या वेळापूर्वी, होना ?'

' बैस , मी चहा आणते ' ती किचनमध्ये जाण्यासाठी वळली

'रजनी' मी तिचा हात धरला आणि तिला सोफ्यावर शेजारी बसवले. तीने हात

सोडवण्याचा प्रयत्न केला नाही.

'रजनी, मला काय झालंय मला माहित नाही..पण '

' ........'

'माझे शब्द आज मला साथ देत नाहीयेत.'

तीने हातांची वीण अधिक घट्ट केली आणि हलकेच ती माझ्या बाहूंत विसावली ..

मी तिला थोपटत राहिलो. तिच्या उष्ण आसवांनी माझा स्कंध भिजून गेला.

' आय लव्ह यु रजनी..'

तीने माझ्या ओठांवर हात ठेवला. मी हलकेच तिचे अश्रू टिपून घेतले. तो

शांततेचा आवाज होता. आम्ही फक्त एकमेकांना स्पर्शातून जाणून घेत होतो. मी

एका अनावर आवेगात स्वतःला झोकून दिले.त्या क्षणाला तरी त्या स्पर्शात

वासनेचा भास झाला नाही.

ती सावरली. 'आले मी '

जाताना माझ्या आत अनंत वादळे उठवून , विरवून गेली . तिथल्यातिथे त्या

क्षणांत कितीदा भरून आलो आणि किती रिक्त वाटलो मीच मला ! मी सोफ्यावर

आडवा झालो डोळ्यांत झोप दाटून आली. मी त्या पुढल्या क्षणांत जागा होतो,

की गाढ झोपेत मला सांगता येणार नाही.

' श्री..'

मी डोळे चोळत उठलो. 'सॉरी..'

' रात्री झोपला नाहीस, होना?'

' हं, वाचत बसलो होतो उशिरापर्यंत..'

' मघा किती गाढ झोपला होतास ! खरं सांगू, तुला अजिबात डिस्टर्ब करावं

वाटेना. हा चहा दुसऱ्यांदा बनवलाय'

'ओह'..

' चहा घे'

मी चहा संपवला.

'रजनी, मला जायला हवं.. मला आज नाईट आहे. '

' एक विचारू ?'

माझ्या मोबाईलची रिंग वाजली.

' घेऊ नकोस फोन. नक्कीच हॉस्पिटलमधून असणार'

' डॉ. देशपांडे आहेत.'

' नको रिसिव्ह करूस. तुला ड्युटीला बोलावत असतील ते.'

' अगं पण ते विनाकारण कधीच करत नाहीत फोन' म्हणत मी फोन घेतला.

' हलो'

' डॉ. श्रीकांत,

' हो सर, बोला'

' सॉरी टू डिस्टर्ब यु , पण आयसियुला नवीन पाच सहा एडमिशन्स झाल्यात.

मॉर्निंगला रजनी पण आलेली नाही. बाकी दोन डॉक्टर्स नवीन आहेत. तू आलास तर

बरे होईल'

' सर, अर्ध्या तासाने आलो तर चालेल ना?'

' ठीक आहे. ये मग, थ्यांक्स !'

' तरी मी तुला सांगत होते, फोन घेऊ नकोस म्हणून. खरं म्हणजे मी

मॉर्निंगला गेले नाही म्हणून तुला ही ड्युटी करावी लागतेय'

' मी चलतो , क्रिटीकल केसेस आहेत. डॉ. देशपांडे स्वतः थांबलेत आयसीयूमध्ये.'

' थांब मी काही बनवते. '

' आता नको. वेळ होतोय.'

' तू फ्रेश हो. झोपल्यासारखा वाटतोस. बाईकवरून तुला दहा मिनिटं लागतील.'

तीने टेबलवर डिशेस मांडल्या. उपमा, ब्रेड स्लाइसेस, बटर आणि टोम्याटो

सॉंस. 'सॉरी हं, पण पाच मिनिटांत हेच शक्य होतं '

' नो प्रॉब्लेम, हे कॉम्बिनेशन काही वाईट नाही'

मी पाच मिनिटांत जेवण आटोपलं.

' चलतो..'

तीने माझा हात पकडला. 'श्री, थांबना थोडा वेळ."

' रिल्याक्स.. रात्री ९ नंतर फोन करतो'

.......................................................................

आयसीयूत प्रचंड धावपळ सुरु होती. दोन पेशंटस व्हेंटिलेटरवर होते. मी

मॉर्निंग ड्युटीच्या डॉक्टरकडून ओवर घेतला. डायलीसीस युनिटमध्ये तिघांना

डायलिसीस सुरु आहे. आयसीयु नं १ स्ट्रोक, २ व्हेंटिलेटरवरचा तो चेस्ट

ट्रोमा, ३ नंबरची ट्राकीऑस्टोमी सुरु आहे- तो ओपिपी; जस्ट आलाय

आल्याआल्या रेस्पिरेटरी अरेस्टमध्ये गेला. नंबर ४ आणि ५ इंफेरीअर वाल एम

आय , ७ आणि ८ आताच आलेत- हेड इंज्युरीचे आहेत दोन्ही. ९ ,१० स्टेबल आहेत.

११ सीझर डीसऑर्डर त्याला एम आर आयला पाठवायचं आहे. वगैरे वगैरे.. बाकीचं

सगळे स्टेबल आहेत'

' ओके'

' आणि बहुदा नाईटसुद्धा तुझीच आहेना ?'

' हो. सोबत डॉ. हेतल आहे.'

' ती आजारी आहे, मघाच फोन आला होता. म्हणजे नाईटसुद्धा तुला एकट्याने करावी लागेल'

' त्यात काय नवीन' म्हणत मी माझ्या कामाला लागलो. संध्याकाळी ६

वाजेपर्यंत मला ५ मिनिटं खुर्चीत बसायला सुद्धा मिळालं नाही. बिच्चाऱ्या

चारही स्टाफस माझ्या ऑर्डर्स फॉलो करत पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे

धावपळ करत होत्या. साडेसहाला हॉस्पिटलमार्फत मिळणारा मोफत चहा आला . जरा

निवांत बसून घेऊ म्हटलो, तर डायलिसीस टेक्निशियन धावत आला,

'सर, सर, नंबर दोन रेस्पिरेटरी अरेस्ट मध्ये '

' ल्यारीन्गोस्कोप घे. ट्युब्स घे पटकन ..' स्टाफ आणि मी धावतच डायलिसीस

युनिटमध्ये आलो.

पेशंटला एंडोट्राकियल इन्टूबेशन केले. हार्ट रेट फक्त ३०, बिपी पन्नास

सिस्तोलीक . स्टाफला त्याला एट्रोपीन द्यायला सांगीतले आणि डोपामिन ड्रीप

लावली आणि अंबू ब्यागने व्हेंटिलेट करत राहिलो. डॉ. देशपांडे आले

तोपर्यंत पेशंट बऱ्यापैकी स्टेबल झालेला होता.

' श्री,' डॉ. देशपांडे फाईलवर ऑर्डर्स लिहिता लिहिता म्हणाले

' येस सर, '

' आजची नाईट पण तुझीच आहे. करणार ना ? प्लीज..'

'सर'

' आय सी यु तूच एकट्याने व्यवस्थीत म्यानेज करू शकतोस'

'हाहाहा, करतो सर, स्तुती पेलवत नाही.'

पाठीवर थाप मारून डॉ. देशपांडे निघून गेले.

रात्री १० वाजता रजनीचा फोन आला.

' बोल'

' तुझी खूप आठवण येतेय.'

' हं, बोल '

' तुझ्या आसपास कुणी आहे का ?'

' हो, हो'

' नाईट पण करणारेस का ?'

' हो, हो.'

' अरे , पण सांगायचं ना नाही करत म्हणून '

' नाही ना '

' जेवणाचं काय?'

' काय की '

' मी आणू टिफिन तुझ्यासाठी?'

' नको, नको '

' का?'

' ट्राय टू अंडरस्ट्यांड यार'

' रागावलास'

' अरे यार इथे सगळे ..'

' बुद्धू, बाहेर येऊन बोलना पाच मिनिटं !'

' हाहाहा, नको, बाय' मी फोन कट केला.मग एकच हशा उसळला.

' कुणाचा फोन होता?' प्रतिभा म्हणाली

' मित्राचा '

' मोबाईल बघू? '

' मोबाईल कशाला '

एवढ्यात वॉर्डातून स्टाफ आली ' प्रेतीबा मेडम वो डॉक्टर आया'

' कौन आया, राउंडला आलंय का कुणी ?'

' हा मेडम, वो मदर और बच्चा के पास .'

' तुझं ना हिंदी कळत ना इंग्रजी. त्यापेक्षा मल्याळीतच बोलत जा.'

प्रतिभा तिच्यासोबत गेली आणि मी सुटलो.

एकेक कन्सलटंटस येत गेले तसा मी पुन्हा बिझी झालो. रात्री १२ ला राउंड

घेऊन मी नोट्स टाकल्या. प्रतिभाने फोन केला 'जेवायला ये'

' अग पण इथे कोण थांबेल ?'

' स्टाफस आहेतच ना ?'

' हो ग , पण तू असं करना, तू जेवून घे. नंतर तू इथे थांब मग मी येईन'

'चल येतोस का पटकन ' ती रागाने म्हणाली.

' मोजून ५ मिनिटे; आलोच'

' कायरे, किती भाव खातोस !'

' चल दे पटकन.'

' घाई का करतोस. शांतपणे जेवना !'

पण माझे तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते.

' कुठे आहेस तू ?'

' हं, काही नाही. '

' श्री, काय झालेय तुला ?'

' नथिंग '

मी दोन तीन मिनिटांत माझे जेवण संपवले.

' थ्यांक्स !'

' हाहाहा '

' काय झाले , हसतेस का ?'

' काही नाही असेच'

' आता तुला काय झालंय ?'

' तू प्रेमाबिमात पडलायस , होना ?'

मी दचकलो पण सावरून म्हणालो 'तुझ्या ? हूड !'

' गंमत नाही, सिरीअसली विचारतेय , आणि मी एवढी काही वाईट नाही हं, की तू

प्रेमात पडू नयेस ' ती खळाळून हसली.

' मग ठीक आहे. आय लव्ह यु !'

' श्री ?'

' रील्याक्स.. ते एवढं सहज नसतं ना ?'

' हं, खरं आहे . पण तू आज काहीतरी वेगळा वाटतोस '

' शक्य आहे..

' सर ,सर -'

' क्या हुवा ?'

' पाच नंबरका हार्टरेट -'

मी धावतच आयसीयुत आलो. पाच नंबर व्ही ट्याक मध्ये होता. त्याचा

व्हेंट्रीक्युलर रेट दोनशे दहा वगैरे. इसीजी घे फास्ट ! डीफिब्रीलेटर घे

- डॉ.पारीखना फोन लाव.'

' सर, डॉ. पारीख-'

' सर, नंबर फाईव इज इन व्ही ट्याक. कार्डिओव्हर्जन करावं लागेल.'

' हे डिसिजन कोणाचं आहे डॉक ?'

' माझंच सर.'

' मग मला कशाला फोन केलात ?'

'सर चर्चा करायची ही वेळ नाही; प्लीज कम विदिन फाईव मिनिट्स '

प्रतिभाने इसीजी घेतला. 'बिपी इज अल्सो लो.. सिक्स्टी सिस्टोलिक !'

' येस, त्याला डीसी द्यावा लागेल. लगेच. मशीन सेट कर वन सिक्स्टी ज्युल्स '

' ओके'

' रेडी '

' यीहः '

'ज्युली , डोंट टच द बेड'

मी इलेक्ट्रोड प्याडस पेशंटच्या छातीवर ठेवले आणि बटन दाबले . कट आवाज

झाला आणि पुढच्याच क्षणी मॉनीटरवर सायनस ह्रिदम आला.आता पेशंटचा हार्ट

रेट होता ११० प्रती मिनिट !

' कसं वाटतयं बाबा आता ?'

त्याने हातानेच बरं वाटतंय म्हणून सांगितलं.

' सॉरी हं, तुम्हाला थोडा त्रास दिला. झटका जोराने बसला का ? करावं लागतं

असं कधी कधी.' प्रतिभा म्हणाली.

आणि डॉ.पारेख आले. ' कुठे आहे डॉ. वाईड क्युआरएस व्ही ट्याक? '

' मघा होता आता नाही'

' वाट डू यु मीन बाय मघा होता आणि आता नाही? स्वतःला फार ग्रेट समजता

तुम्ही लोक ! आता कुणाला डीसी देऊ? तुम्हाला देऊ ?'

'मी ते ऑलरेडी केलंय सर ' मी पेशंटचा इसीजी पुढे केला.

' प्रतिभा, हे डॉक काय म्हणताहेत समजतयं का तुला ' माझ्याकडे

अंगुलीनिर्देश करत डॉ. पारीख म्हणाले '

' हो सर, आणि ते बरोबर आहेत.डीसी देताना मशीन मीच सेट केले होते '

' इट्स अनबिलीव्हेब्ल !' स्वतःशी बोलल्याप्रमाणे ते उद्गारले नंतर

केबिनमध्ये फाईल मागवून त्यावर नोट्स लिहिल्या आणि निघून गेले.

' काँग्रटस ' प्रतिभा म्हणाली

' सेम टू यु !' मी म्हणालो

'घाईगर्दीत इसीजी घेतला नसता तर डॉ. पारीखने मोठा प्रॉब्लेम क्रिएट केला

असता आपल्यासाठी.

' हं, यांना बहुदा फक्त पाट्या टाकणारे डॉक्टर्स हवे असतात. कारण यांचा

इगो सुखावतो !'

' असू शकेल '

' पण यु आर जिनिअस !

' असे काही नाही, उगाच हरभरे वगैरे '

' बुद्धू '

' हाहाहा, आपटलेस लगेच ! '

' चल जाते वार्डात !'

' बाय '

'>............................................................................................................................................

मॉर्निंगला मला रीलीव्हर म्हणून रजनी आली.

' नाईट पण हेवी होती वाटतं !'

' हं, गेल्या अठरा तासांत अर्धा तास सुद्धा खुर्चीत बसायला मिळालं नाही.'

' डोळे सुजलेत तुझे '

' आणि तुझे पण. रात्री झोपली नाहीस वाटतं !'

' खूप अस्वस्थ वाटत होतं. तुला रात्री एकदाही आठवण आली नाही ?'

तुझी आठवण विसरायला लावणारी नाईट होती '

ती हसली ' तुला नुसतं भेटले तर किती शांत वाटतंय आता ! पण आता तू निघून

जाशील अन् माझी ड्युटी सुरु होईल. मग मला परत अस्वस्थ वाटू लागेल..

रात्री वेड्यासारखी तुझ्या फोनची वाट पाहिली. नाही आला तुझा फोन; आणि

तुला डिस्टर्ब करायला नको, म्हणून मी पण नाही केला. '

' रिल्याक्स रजनी.. ड्युटी इज ड्युटी. '

' श्री, तुला काहीच वाटत नाहीय का ?'

' बोलू नंतर ..चल ओवर घे. एम सॉरी पण फार थकलोय. प्लीज ट्राय टू अंडरस्त्यांड '

तिला ओव्हर देऊन मी निघालो. '

' जा झोप ..जेवण कर व्यवस्थित. मी डिस्टर्ब नाही करणार तुला '

' बाय..'

मी रुमवर आलो. अंघोळ केली आणि बिछान्यावर स्वतःला झोकून दिलं. किती वेळ

मी झोपून होतो कुणास ठाऊक. कपाळावर उष्ण स्पर्श जाणवला. ती रजनी होती.

' रजनी , ? किती वाजलेत '

' संध्याकाळचे ७ वाजले.'

' एवढा वेळ मी झोपून होतो ? पण तू केव्हा आलीस ?'

' दोन तास झालेत. ड्युटी करून रुमवर गेले. तुझा फोन लागला नाही. राहवलं

नाही, मग इकडे आले. मी टिफिन आणलाय. तू फ्रेश होऊन ये .'

' अगं मग मला उठवायचं नाही का ?'

'

रजनीने आणलेला टिफिन आम्ही संपवला .

आता जरा बरं वाटतंय '' तू किती झोपाळू आहेस, अरे !''' फार थकलो होतो ग

!'' श्री ,'' हं '' मी दोन दिवसांसाठी घरी जाणार आहे , नाशिकला . तू

येशील माझ्यासोबत ?'' अगं पण मी तिथे येऊन काय करू ?'' श्री, प्लीज नाही

म्हणू नकोस. तुला माहित आहे की नाही देव जाणे, पण तुझ्यात एक

म्याग्नेटीझम आहे, एवढं नक्की. खरं म्हणजे मला तुला काही सांगायचं

आहे..'' अगं पण असं काय आहे, जे तू मला इथे सांगू शकत नाहीस ?'' श्री,

प्लीज माझ्यासाठी एवढं कर '' ओके, ओके. या दोन नाईट्स संपल्या की मला दोन

दिवस ऑफ आहे. पण मला कुणाकडे म्हणजे अगदी तुझ्याकडेच असं नाही, पण

अवघडल्यासारखं वाटतं. मी मुक्काम वगैरे करणार नाही. म्हणजे कसं आहेना,

तिथे तुझ्या घरात इतर लोक सुद्धा असतील. मग त्यांना सुद्धा अवघडल्यासारखं

वाटेल. '' तुला माझ्याकडे येताना आनंद नाही वाटत ?'' वाटतोय पण

एवढ्यात..'' तू आता माझ्याशी ..' तीने मला पुढे बोलू दिलं नाही. ओठांवर

हात ठेवला.' मला उद्याचं माहित नाही. मात्र तुझ्या पावलांनी माझं भाग्य

उजळेल.' तिच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले.' ए वेडी, असं कोड्यात का

बोलतेस ?'' ते मी सांगेन तुला पण आता नाही. आपण नाशिकला जाऊ तेव्हा

प्रवासात .'' हम्म'' मला जवळ घे. तुझ्या कुशीत पडून रहावसं वाटतंय 'मी

तिला थोपटत राहिलो. कितीतरी वेळ ती माझ्या कुशीत ती मुक्तपणे रडली. मी

तिला थोपवले नाही.

......................................................................................................................................स्लीपर

कोचने आम्ही नाशिकला निघालो. एकमेकांच्या हातात हात गुंफून बसून होतो. '

" रजनी ''
हं ''
" मला तुला काही सांगायचंय !''
"मला माहित आहे. पण तू ते सरळ माझ्या घरी सांग ''
"अगं पण आधी नीट ऐकून तर घे ! आणि एकदम जाऊन मी तुझ्या
घरी काय सांगणार ? निदान काय सांगायच याचं प्रिपरेशन तर हवं ना !''
"काही गरज नाही प्रिपरेशनची. जे वाटतंय ते सांगून टाक.''
"अगं पण मला काय सांगायचं आहे ते एकदा तू _ "
तर ... तीने माझ्या ओठांवर हात ठेवला आणि ती माझ्या शेजारी लहान मुलीप्रमाणे झोपी गेली.मी माझ्या विचारांत हरवून गेलो. आपण काही वेडेपणा तर करत नाहीना ? खरं म्हणजे अजून स्वतःची प्राक्टीस सुरु करायची होती. एवढ्यात लग्न आणि ते सुद्धा आंतरजातीय !

माझ्या घरून विरोध झाला नसता पण रजनीच्या ? काहीच माहित नव्हतं. मला तिच्या घरच्या लोकांबद्दल फारच त्रोटक माहिती होती. इतकंच माहित होतं की तिचे वडील आर्मीत ऑफिसर आहेत. तिला तिच्यापेक्षा लहान एक बहीण आहे.'
कसला विचार करतोयस ?''
" तुझाच ''
" तुला वाटत असेल की मी विचित्र मुलगी आहे ,होना ?'
'खरं सांगायचं तर , हो '
'तुला असंही वाटत असेल की या पोरीच्याn नादी लागून आपण काही वेडेपणा तर करत नाही ना !''
"बरोबर ''
तू इतका साधासरळ असा कसा आहेस रे ''
" रजनी ' मी तिचा हात हातात घेतला
' हं' तिने हातांची वीण घट्ट केली. मनात खूप काही असूनही मी काहीच बोललो नाही. फक्त हातात हात गुंफलेले. तो स्पर्श तिच्या माझ्यातला दुवा होता. त्या स्पर्शातून तिची अस्वस्थता माझ्याकडे वहात राहिली. तिच्या डोळ्यातले टपोरे उष्ण अश्रू हलकेच माझ्या हातावर पडले.'

ट्याकसिने आम्ही क्याम्पातल्या एका प्रशस्त बंगल्याशी उतरलो. बाहेर छान बगीचा. विविधरंगी फुलं. एकदम मस्त वाटलं. रजनीने दारावरची बेल दाबली.

पंचेचाळीशीच्या आसपासचे वय असलेल्या स्त्रीने दार उघडलं. गौरवर्णी ,हसतमुख.

" ये बेटा !" तिने रजनीला प्रेमाने जवळ घेतलं.

" माई , हे माझे मित्र डॉ. श्रीकांत "

" नमस्ते डॉक्टर !"

" नमस्ते !"

" कसा झाला प्रवास ?"

" छान !"

" तुम्ही फ्रेश व्हा. मी कॉफी आणते !"

रजनीची आई गौरवर्णी होती. पुन्हा वय सुद्धा जास्त वाटेना. फार तर ४५

असेल. रजनीत आणि त्यांच्यात कोणतच साम्य नव्हतं.

माईंनी कॉफी आणली. रजनीने आम्हा तिघांचे कप बनवले.

" छान झालीय कॉफी !"

" थ्यांक्स ! आमच्या रजनीने बोअर नाहीना केलं तुम्हाला ?"

" छे, छे, मीच तिला बोअर केलं !"

माई मोकळेपणी हसल्या.

" बेटा, जेवणात काय बनवू ?"

" माई, नो फोर्म्यालीटीज हं, पटकन बनव काहीतरी फार भूक लागली आहे. आणि हा

माझा दोस्त आहेना, याला काही चॉइस नाही. तुला वाटेल ते बनव !"

" ओके बेटा, तुम्ही आराम करा, मी बनवते पटकन काहीतरी !"

रजनीने तिच्या फोटोंचा भलामोठा अल्बम ! त्यात तिचे लहानपणापासूनचे सारे

फोटो. तिचे वडील सावळ्या वर्णाचे. बहीण माईंवर गेलेली. उंचीतलं साम्य

सोडल्यास रजनी आणि तिची बहीण सुचेता- या बहिणी आहेत, असं कुणी म्हणू शकलं

नसतं. एका फोटोत तिच्यासोबत एक लहान मुलगा सुद्धा होता.

" हा माझा लहानपणीचा मित्र - आशिष ! "

" अच्छा !"

" चल मी तुला तूझी रूम दाखवते."

"मला कायमस्वरूपी इथेच ठेवून घेणार आहेस का ?"

आम्ही वरच्या मजल्यावर गेलो.

" तर ही तुझी रूम ! कशी वाटली ?"

" छान आहे !"

" थ्यांक्स !"

" तू बैसना !"

" हेहेहे, माझ्याच घरात मला पाहुणी समजतोयस ! आधी तू बैस "

मी सोफ्यावर बसलो. रजनी माझ्याशेजारी बसली.

" एक विचारू ?"

" विचार "

" प्रत्येकाच्या भावी जोडीदाराबद्दल काही अपेक्षा असतात, तुला कशी मुलगी आवडेल ?"

" आता हे प्रश्न अनावश्यक आहेत राणी, मला तू आवडतेस. तुझा हा सावळा वर्ण;

त्याहीपेक्षा तुझ्या मनाचं पारदर्शीपण !"

मी तिच्या कुरळ्या केसांतून हलकेच हात फिरवला. तिचा चेहरा दोन्ही

हातांनी धरून तिला जवळ घेतले. तिच्या डोळ्यांत डोळे घालून म्हणालो " आय

लव्ह यु राणी !"

तिच्या डोळ्यांतून तोच पाऊस टपटप कोसळला, अनावरपणे .

" रजनी, "

" श्री, मी तुला इथे बोलावलं यात माझा थोडा स्वार्थ आहेरे ! खरं म्हणजे

मला तुला काही सांगायचयं,जे मी तुला खूप आधी सांगायला हवं होतं. पण धीर

झाला नाही."

" रजनी, मन मोकळं करून टाक !" मी तिला थोपटत म्हणालो

" सांगते.. " तीने डोळे पुसले मग ती पुढे म्हणाली " मी जन्मले आणि

महिन्याभरात माझी आई गेली. माझ्यासाठी म्हणून वडिलांनी दुसरं लग्न केलं.

तीने मला खूप जीव लागला. सुचेताच्या जन्मानंतरसुद्धा तीने माझ्यावरच

जास्त प्रेम केलं. सुचेताला ती रागवायची, मारायची; मला मात्र तीने कधीही

मारल्याचं आठवत नाही. मी खेळता खेळता नुसती पडले, तरी तिचा जीव खालीवर

व्हायचा... मी दहा वर्षांची असताना__"

अचानक रजनी उभी राहिली आणि तीने स्वतःच्या गाऊनची बटणे काढली.

" रजनी, ए व्हाट आर यु डुइंग ?"

" मला तुझ्यापासून काहीच लपवून ठेवायचं नाहिये ..." तिच्या पोटावर,

छातीवर जळाल्याचे न मिटणारे व्रण होते.

"रजनी.."

ती तशीच पाठमोरी झाली. पाठीवरही तसेच व्रण होते. मी हळूवार तिच्या पाठीवर

हात फिरवला.

" रजनी, तू जशी आहेस ! किंबुहुना या क्षणी तू माझ्यासाठी या जगातली

सर्वात सुंदर स्त्री आहेस !" मी तिचा गाऊन व्यवस्थित केला. तिच्या

चेहऱ्यावरून ओघळणारे अश्रू हलकेच पुसले. तीने अविश्वासाने माझ्या डोळ्यात

पाहिलं.

" मी खरं सांगतोय रजनी, माझ्यावर विश्वास ठेव !"

ती विषण्ण हसली.

" खर म्हणजे मी तुला इथे आणलं, यातील माझा स्वार्थ होता.मी हे पूर्वीच

तुला सांगायला हवे होते. "

" तू काय म्हणतेयस मला कळत नाही..."

" सांगते... तू योगायोग मानतोस?"

" राणी, तुझ्या एका शब्दासाठी मी इथे आलो. तू सतत कोड्यात बोलत आहेस.

सांगून टाक मन मोळके कर."

" सांगते..मी जन्मले आणि महिनाभरात माझी आई गेली.मला सांभाळायला कुणी हवे

म्हणून वडिलांनी दुसरे लग्न केलं .माई माझी सावत्र आई. तीने मला

स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त जीव लावला. सुचेता ही माझी धाकटी बहीण,

तिच्या जन्मानंतर सुद्धा माईंनी माझ्यावरच जास्त माया केली. सुचेताला ती

रागवायची, मारायची. मला मात्र तीने कधीच हात उगरल्याचे आठवत नाही. अगदी

कळायला लागल्यापासून वडिलांनी ही गोष्ट मला सांगायला सुरुवात केली. ती

कशामुळे माहित नाही. कदाचित माझ्यापासून ही गोष्ट सुद्धा लपून राहू नये,

असे त्यांना वाटत असावे,अगदी पाच सात वर्षांची असताना मला माझी आई सावत्र

असल्याचे कळले. शाळेत पुस्तकात गोष्टींमध्ये सावत्र आईच्या गोष्टी

असायच्या. त्या ऐकून मला आश्चरय वाटायचे की की माझी आई एवढी चांगली कशी ?

ही मला मारत का नाही, मला रागावत नाही. नुसतेच प्रेम का करते ? तीने

कधीतरी रागवावे ओरडावे असेही वाटे. आणि त्यासाठी म्हणून मी तिच्याशी सतत

नेहमी तिरकस बोलत असे. खोड्या करायची. पण चुकुनही तीने तसे घडू दिले

नाही. माझ्यावरचे प्रेम हा तिच्या जीवनाच्या ध्येयाचा भाग होता जणू. मला

साधं खरचटलं तरी तिचा जीव खालीवर व्हायचा. वडील सतत दूर असायचे. तीने आई

आणि वडिलांच्या भूमिका निभावल्या. तिला जमेल तेवढे सारे चांगले संस्कार

तीने आम्हा दोघी बहिणींना दिले. तिच्या प्रेमाने ओथंबून जात असताना,

मात्र मी आतून दाटून येत असताही कोरडीच असल्याचे भासवत राहिले. मग मी

तिच्यासाठी तो माझा स्वभाव बनवून टाकला. मी टाकून बोलावे आणि तीने नुसते

प्रेमच करावे. असे मी का केले माहित नाही. पण कदाचित तिच्या प्रेमाची ओल

जगण्यासाठी मझे कोरडे असणे आवश्यक असावे. मी आणि ती दोघींनी या भूमिका

आजपर्यंत निभावल्या आहेत. यात आता कदाचित कधीच बदल होणार नाही. त्या

शिवाय ती मला आणि मी तिला खऱ्याच वाटणार नाहीत.मी दहा वर्षांची असताना

माझा एक बालमित्र होता-आशिष; मघा फोटोत पाहिलास ना तो ! दिवाळीच्या दिवशी

त्याने फेकलेला फटाका चुकून माझ्या अंगावर पडला माझ्या फ्रॉकने पेट

घेतला. त्याला जमेल तसे त्याने मला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याचे

दोन्ही हात भाजले.आणि मी चाळीस टक्के जळाले.रजनी उभी राहिली आणि तीने

स्वतःच्या गाऊनची या काळात मी तीन महिने हॉस्पिटलमध्ये काढले.माईने

रात्रंदिवस स्वतःला मला वाहून टाकले. मला स्वतंत्र केबिनमध्ये ठेवलेलं

होते. आशिष रोज मला भेटायला यायचा. दुरुनच बघून निघून जायचा. माझ्या

केबिनबाहेर माई अनेकदा रडताना ओझरती दिसत असे. नंतरही मी तिला अनेकदा

एकांतातले रडताना पाहिले आहे.आणि तिला तसे रडताना पाहून मीही माझी एकटी

अनेकदा रडले आहे. त्या जीवघेण्या यातनांतून मी वाचले. आशीस आणि मी बारावी

पर्यंत सोबत शिकलो. तो आय आयटीला गेला. मी मेडिकलला आले. मधल्या काळात

त्याचे वडील रिटायर झाले आणि ते सुद्धा दिल्लीला निघून गेले. मग तो आला

माझ्या बर्थडेला. मी त्याला ओळखलच नाही इतका बदललेला. उंचपुरा ह्यांडसम .

पुढच्या आठवड्यात तो अमेरिकेला जाणार होता. सोफ्टवेअर कंपनीची चांगली ऑफर

होती. त्या दिवशी त्याने पहिल्यांदा मला प्रपोज केलं. मला हे सगळं

अनपेक्षित होतं. ' विचार कर ' म्हणाला आणि तो घाईघाईने आला तसा निघूनही

गेला. त्यानंतर त्याचा फोन नाही. पत्ता नाही. सामान्यतः अनोळखी लोक मुलगी

बघून गेल्यावर मुलगी ज्याप्रमाणे उत्तराची वाट पाहते, तितकीच मी त्याच्या

येण्याची वाट पहिली. आता तो येणार नाही या शक्यतेपर्यंत येऊन पोचले आहे.

साऱ्या गोष्टी स्वच्छपणे तुझ्यासमोर मांडल्या आहेत. तू नकार दिलास तरी

मला वाईट वाटणार नाही. मात्र माझ्यावर सहानुभूती दाखवू नकोस प्लीज..."

मी अंतर्मुख झालो.ती विषण्ण हसली.काय बोलावं,तिला कसं समजावून सांगावं

कळेना. मी मनात शब्दांची जुळवाजुळव करू लागलो. मी भानावर आलो तेव्हा ती

तेथून निघून गेलेली होती. मी हॉलमध्ये आलो. तिची मम्मी सोफ्यावर बसलेली

होती

" या डॉक्टर "

" माई रजनी .."

" ती तिच्या रुममध्ये गेली. येईल आता, तुम्ही बसाना."

" माई, मला आपणाशी काही बोलायचं आहे.'

" अच्छा, मग बोलाना, "

" म्हणजे रजनी बद्दल"

" तुम्ही रजनीला केव्हापासून ओळखता ?"

" वर्षभरापूर्वी ओळख झाली. आम्ही हॉस्पिटलला सोबत काम करतो "

" कशी आहे आमची रजनी ? मला फक्त तिचीच काळजी आहे. थोडी लहरी आहे, पण

मनाने खूप चांगली आहे. एकदाचं तिचं लग्न झालं की माझी जबाबदारी बरीच कमी

होईल."

" त्यात काय , तुमची रजनी आहेच छान. आणि स्वच्छ मनाची.कुणालाही आवडेल अशीच आहे."

" तुमचं म्हणणं खरं होवो आणि तिचे दोनाचे चार होवोत."

आता मला पुढे काय बोलावं सुचेना. तिची आई मला फक्त तिचा मित्र समजत होती.

" माई--" एवढ्यात फोनची रिंग वाजली. मला " एक्सक्युज मी "म्हणत माईंनी

फोन घेतला. बराच वेळ त्यांचे बोलणे सुरु होते. लोक त्यांच्या जुन्या

परिचयातले होते. त्या बोलण्यातून मला एवढा अंदाज आला की रजनीला बघायला

पाहुणे येणार होते. माई म्हणाल्या

" बघा, आपलं ज्या विषयावर बोलणं चाललं होतं, तेव्हाच नेमका फोन आला. "

मी .. मला समजलो नाही "

" थांब, मी आलेच "

माई किचनमध्ये गेल्या. माझ्या हातावर साखर ठेवली म्हणाल्या " तुझा पायगुण

चांगला आहे !"

मी हसलो म्हणालो " माई , मी जरा सिटीतून फिरून येतो. मित्राकडे जाऊन येतो

दोनेक तासात ! आज रात्री मी परत जाईन !"

" अरे पण रजनी तर सांगत होती की तुम्ही दोन दिवस थांबणार म्हणून ,हे बघ,

तू थांबलास तर आम्हाला बरे वाटेल. पाहुणे येणारेत म्हणून काय झालं? तू तर

खास पाहुणा आहेस."

" पाहतो , पाहुणे केव्हा येणार आहेत? ते थांबणार आहेत का"

" ते लगेच परत जाणार आहेत. "

" माई मी येतो दोनेक तासांत "" पण रजनीला सांगून जा हं, ती रागावेल

नाहीतर मला !"

त्यांनी रजनीला हाक मारली " रजनी बेटा, "

" जाऊद्याना माई झोपली असेल ती , मी येतो दोनेक तासांत परत !काही वाटलं

तर ती फोन करेलच नं मला !आलोच मी "

" अरे पण .."रजनी येण्याच्या आत मी घाईघाईने तिथून बाहेर पडलो. आणि

मोबाईल बंद करून टाकला.

मला तशी घाई नव्हतीच. मला वेळ घालवायचा होता. म्हणून निवांत बसची वाट

बघत राहिलो. मग अर्ध्यापाऊण तासाने सीबीएसची बस मिळाली. सीबीएसपासून

पायीच अशोकस्तंभ, कारंजा आणि मग व्हिक्टोरिया पुलावरून चालत गेलो.इथे

काही वर्षे मी काढलेली. त्यामुळे एक ओढ या शहराबद्दल आहेच. सर्कलमध्ये

मित्रांसोबत कितींदा तरी चित्रपट पाह्यला जायचो. आता इथेही गर्दी वाढत

चालली आहे. तेव्हाची शांतता आता नाही, पण जेवढी आहे तेवढी त्या

क्षणांसाठी पुरेशी होती. गंगाघाटावर शांतपणे बसून राहिलो.हळूवार लाटा,

तरंग, पाण्यावरचे बदलते रंग , दूरच्या सोडियम व्हेपर्सचा भगवा रंगही

त्यात मिसळलेला. हे सार आकर्षक होतं पण कृत्रिमही. इथे लोकांनी आपल्या

सोयीसाठी नदीचा प्रवाह बांधून टाकला आहे. जवळपास सगळ्याच मोठ्या नद्यांची

अस्वस्था यापेक्षा वेगळी नाहीच. गोदावरीचे नैसर्गीक रूप बघण्याचे भाग्य

लाभले नाही. तसे आपण उशीरच जन्माला आलो. आपल्या आधीच्या पिढीने ते आपल्या

डोळ्यांत साठवून ठेवले आहे. नाही म्हणायला मदर इंडिया या सिनेमात गोदावरी

दिसते. हाच भाग तेव्हा किती सुंदर होता ! आणखी तासभर उगाचच इकडेतिकडे

भटकलो. मग एका टपरीवर चहा घेतला , सिगारेट पेटवली. आता रात्रीचे आठ वाजत

आलेले. आता रजनीकडे परत जायला हवे होते. मगच पुढे मी केव्हा परत जायचे ते

ठरवायचे होते. मी मोबाईल सुरु केला तर रजनीचे अनेक मिस्ड कॉल्स येऊन

गेलेले होते. मी मोबाईल पुन्हा बंद करून टाकला. मी परतलो तेव्हा तिच्या

दाराशी बेन्झ उभी होती. एक पोक्तशी स्त्री आणि एक तरुण. उंचपुरा स्मार्ट.

तो जायला वळताना त्याने माईंना झुकून नमस्कार केला. ; ते

गाडीत बसले. त्या तरुणाच्या उजव्या हाताच्या मधल्या तीनही बोटे नीटशी

दिसत नसली तरी नॉर्मल नक्कीच नव्हती. त्यावर जळाल्याचे व्रण असावेत; हा

नक्कीच आशिष !

ते लोक गेल्यावर मी जमेल तेवढ्या हसऱ्या चेहऱ्याने रजनीला सामोरा आलो.

" तू आता येतोयस ? आणि मोबाईल का बंद करून ठेवलास ?"

" अगं मित्राने फार आग्रह केला म्हणून थांबलो . आणि मोबाईलची ब्याटरी संपली.."

" खोटं बोलतोयस तू !"

"नाही ग, इथे सिडकोत मित्र आहे एक. "

" बरे जाऊदे, फ्रेश हो आधी. आणि हे काय सिगारेट प्यायलास ना ? कधी सुटणार

आहे, कुणास ठाऊक !जा, ये पटकन जेवायला "

" आलोच मी " म्हणत मी गेलो आणि फ्रेश होऊन आलो.मी चेहऱ्यावर शक्य तेवढ स्माईल आणले.

"अरे कुठे गेला होतात तुम्ही? बसा लवकर जेवून घ्या. मी वाढते. रजनी, चल तू पण ! माई म्हणाल्या

" माई तुम्ही पण बसाना , आमच्यासोबत"

" मी जेवेन नंतर. तुम्ही बसा ; मी गरम गरम फुलके आणते.

" माई , तू जा आम्ही घेतो ; मी वाढते त्याला."

' अग पण किती घाई करतेस, सावकाश जेवू दे त्यांना. "

" हो सावकाशच जेवेल तो , तू जा. "

" त्यांच्याशी भांडू बिंडू नकोस हं, !"

" भांडणार मी , आता तू जातेस का ?"

" रजनीचं फार मनावर घेऊ नका.आता तुम्हाला सांगते डॉक्टर, एवढं चांगलं

स्थळ आलं आहे आणि आता ही नाही म्हणतेय .बरं मुलगा आमच्या पाहण्यातला आहे.

हिला अगदी सुखात ठेवेल.तुम्ही तरी काही समजवा हिला.तुमचं तरी ऐकेल निदान

ती."

" माई, त्याला कशाला तू सांगत बसलीयेस ?मी सांगेन त्याला .तू जाना , आराम कर !"

" रजनी, काय झाले काय प्रॉब्लेम आहे? " मी विचारले

" मी सांगेन म्हटले ना तुला, माई तू जा . आता तुझ्यासमोर मी कसे आणि काय सांगू ? नाहीतर तूच सांग मी जाते !"

" वेडी कुठली , ठीक आहे, मी येते. "माई आत निघून गेल्या.

" हं बोल आता.."

" आधी तू जेवून घे, मग बोलू "

" जेवता जेवता बोलुना, त्यात काय ?"

" नाही. आपण दुसरे काही बोलू तोपर्यंत "

" स्वयंपाक तू केला नसणारच .. "

" कशावरून ?"

" कारण फारच स्वादिष्ट आहे. "

" हे हे , मला पण बनवता येतो हं,!"

" हो मी जेवलो आहे तुझ्या हातचे !"

" हो माहित आहे. बरे हे पनीर घे , खरेच छान बनवले माईने"

" येस !

" पण तू घेना ,स्वतः काहीच जेवत नाहीयेस "

" तू दुपारपासून कुठे होतास ?"!

" सांगीतले ना , किती वेळा विचारशील ?आणि तुला जे सांगायचे आहे, ते नेमके तू सांगत नाहीस ."

"तू जा रूममध्ये. मी आलेच.. का छळतो आहेस मला?"

माझं जेवण आटोपलं, ती अशी जेवलीच नाही. मला सर्व्ह करत राहिली.

मी रुममध्ये आलो सोफ्यावर आडवा झालो. या क्षणी खूप एकटे वाटले. अचानक हे

तिचं घर खूप परकं वाटू लागलं. या क्षणी सिगारेट खूप आवश्यक वाटू लागली.

ब्यागेतुन पाकीट काढले. आणि टेरेसवर आलो. कुणाला दिसणार नाही, अशा ठिकाणी

सिगारेट पेटवली. साला आयुष्य म्हणजे निव्वळ आशा आणि स्वप्नांचा धूर. तो

असाच विरून जाणार !

डोकं बधीर होऊन गेलं. काही सुचेना. आपण इथे कशासाठी आलोत, कळेना.थोडा वेळ

तशाच बधीर अवस्थेत गेला. सिगारेट संपली तसा खाली आलो. रुममध्ये येऊन ब्रश

केला. आणि रजनी आली. " कसला विचार करतोयस "

" काही नाही, सकाळी निघायला पाहिजे. उद्या नाईट आहे. "

" तुझा आवाज या क्षणी किती वेगळा वाटतो. तू तो नाहीसच जणू.. "

" तीने माझा हात हातात घेतला. म्हणांली

" श्री, सकाळचाच प्रश्न विचारते. लग्न करतोस माझ्याशी ?"

" सकाळ आणि संध्याकाळमध्ये खूप अंतर असतं गं.."

" पण मी तर तीच आहेना. "

" असशील.. पण संदर्भ बदलतात. "

ती आणखी जवळ आली. माझ्या छातीवर डोके ठेवून पडून राहिली.. मी तिला हळूवार

थोपटत राहिलो.

" माझं व्यंग माहित झाल्यावरही तू नकार दिला नाहीस. आणि मी त्या

क्षणापुरता का होईना तुझ्या होकाराची वाट न पाहता तुझ्यावर अविश्वास

दाखवला. त्याची एवढी मोठी शिक्षा मला देऊ नकोस राजा..तू बाहेर गेल्यावर

आख्खे जग सुने वाटू लागले, आपण खूप पुढे निघून आलोत; आता मार्ग का

बदलावेत? तुझ्याशिवाय आयुष्य .. कल्पना सुद्धा नकोशी वाटते. "

" रिल्याक्स राणी, आता संदर्भ बदलले आहेत. सुरुवातीला मलाही खूप त्रास

झाला. पण थोडा विचार केल्यावर लक्षात आलं , जे होत आहे, तेच ठीक आहे.

मुळात आपण खूप उशीरा . म्हणजे प्रेम वगैरे भावनांची जाणीव झाल्यावर. ;

बऱ्यापैकी म्याचुअर झाल्यावर. फक्त कदचित एकमेंकांचे विचार जुळलेत

म्हणून. आआपल्या सहवासासाठी ,मैत्रीसाठी एकमेकांचा लहरीपणा खपवून घेतला

असेलही. पण माणसांचे स्वभाव गुण दोष कळायला काही वर्षे जावी लागतात.आपण

समजतो तेवढे आपण एकमेकांना अनुरूप असूच असे नाही.

खरे म्हणजे मी माईंना आपल्याबद्दल सांगायला म्हणून आलो. आणि काहीच

सांगू शकलो नाही. मला तेवढी संधीच मिळाली नाही. तेवढ्यात तो फोन आला आणि

कळले की पाहुणे. येत आहेत म्हणून, अगदी अचानकच. माईंना सुद्धा आश्चर्यच

वाटले. त्या म्हणाल्यात सुद्धा की पुढच्या आठवड्यात निवांत या म्हणून पण

आशिष कडचे लोक घाईत होते. पण ठीक आहेना, काही बिघडलं नाही. तुझ्यासाठी

अत्यंत योग्य स्थळ आहे. तुझा लहानपणीचा मित्रच आहे. मी एवढे सांगू शकतो

की आशिष तुझ्यावर मनापसून प्रेम करतो. प्रेमात व्यंग दिसत नाही असे आपण म्हणत असलो आपल्या व्यंगासह आपल्यावर प्रेम करणारा मनाने मोठाच असतो. आणि माईंचा

तुझ्यात खूप जीव आहे. त्यांना आशिषची निवड योग्य वाटते. मलाही वाटते

आशिषच तुझ्यासाठी सर्वथा योग्य आहे.आजवर तू माईंचे काहीच ऐकले नाहीस , पण

माईंच्या मते आशिष हाच तुझ्यासाठी जीवनसाथी म्हणून योग्य आहे;केवळ माईंचा

शब्द पाळायचा म्हणून नव्हे तर, तो तुझ्यासाठी सर्वार्थाने योग्य आहे

म्हणून. "

" माझा जीव केवळ माईच्या शब्दाशीच अडला होता. म्हणजे काल मी कोणतीच

प्रतिक्रिया देऊ शकले नाही.मी माईंशी बोलेन. मी सारं काही सांगेन तिला

आपल्याबद्दल. माझं ऐकेल ती. तिला तिच्या शब्दापेक्षा माझं सुख हवं आहे.

...

आज सुद्धा तो आला तर मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. उलट मला असे

वाटत होते की आज हा इतक्या उशीरा का आला? त्यावेळी तू माझ्या जवळ असायला

हवा होतास, असं खूप तीव्रतेनं वाटून गेलं. तुला वारंवार फोन केले; तू फोन

बंद करून ठेवलेला..

आशिष माझ्यावर प्रेम करत असेलही, पण हे आवश्यक नाही की मी पण करावं.

खरे सांगायचे तर मी त्याच्यामुळे जळले म्हणून माझा त्याचयावररागच होता.

त्याने टे अजाणतेपणी केले असले तरीही. आणि त्याने जेव्हा प्रपोज केलं

तेव्हा मी त्याला म्हटले होते, कदाचित लहानपणीच्या चुकीचे अंशतः निरसन

व्हावे असे तुला वाटत असेल. तर तो म्हणाला होता, "माझ्याकडून ती चूक झाली

नसती, तरीही मी तुझ्यावरच प्रेम केले असते. "कोणतीही ओळख नसताना नाही का

मुलीला बघयला येतात, अगदी तसेच मी त्याला सामोरी गेले. कारण माझा नाईलाज

होता. माईने ऑलरेडी त्यांना बोलावून घेतले होते. मी काहीच करू शकत

नव्हते. मी तेव्हा समोर असते तर मी नकार दिला असता. हे सारं योगायोगाने झालंरे. माझी काहीच चूक नाही त्यात.. मला तू हवा आहेस, तुला मी हवी आहेका, ते ठरव."

" तुझं सारे खरे आहे राणी, पण आता मला फक्त एक सांग , तुझ्या आयुष्यात

मी आलो नसतो तर तू आशिष ला नकार दिला असतास ?"

"......."

" फक्त हो किंवा नाही सांग !"

" नाही ! कारण तेव्हा मी कुणावरच प्रेम केलं नव्हतं.. आता आपल्यांत एवढं सगळं.. म्हणजे आपण इतके जवळ आलो असताना ..मी काय करू ?"

"रिल्याक्स.. आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तुला माहित असते,

की आशिष परत येणार आहे, तर कदाचित तू माझ्या जवळ आलीच नसतीस. खरे तर तो

तुला भेटून गेल्यावर त्याने तुझ्या संपर्कात रहायला हवे होते. त्याने तसे

का केले नाही देव जाणे; ही गोष्ट सहज शक्य होती. पण असो, कदाचित त्याची

काही मजबुरी असेल, आपण नुसतेच अंदाज बांधण्यात अर्थ नाही. आणि आता

माझ्याबद्दल सांगायचं तर नुकतीच इंटर्नशिप संपली आहे. स्वतःची प्रकटीस

कधी सुरु करेन, अजून सांगू शकत नाही. पुन्हा नाही म्हटले तरी इंटरकास्ट,

माईंचे मन तू वळवशील सुद्धा, त्यापेक्षाही त्या तुझं मन मोडणार नाहीत

इतकच. जिने तुला एवढा जीव लावला, तिचा एक शब्द न मानता माझ्याशी लग्न

करून अस्थिर भविष्य ओढवून घेण्यापेक्षा माईचा शब्द मानून सुखी आयुष्य तुला

नक्की लाभेल.आशिषला तुला जेवढे समजून घेता घेईल, तेवढे मला कदाचित समजून घेता येणार नाही .आपण भेटून फार दिवस झाले नाहीत आणि आपल्यांत विशेष असं काही घडलं नाही. आज माझा स्वभाव तुला आवडतो,

उद्या तो तुला आवडेलच याची खात्री नाही .मलाही हेच मला तुझ्याहीबाबतीत वाटू शकते म्हणून

वेडा हट्ट सोड. आपल्यातली दोस्ती कायम ठेवून बाकी सारे विसरून जा !"

" तुला नकार द्यायचा असेल तर सरळ का नाही देत ? "

" तुझा गैरसमज होतोय राणी, पण तू असेही समजलीस तरी हरकत

नाही.किंबहुना असा समज होणेच तुझ्यासाठी ओग्य आहे ; आता तू जा, खूप रात्र

झाली आहे."

" तू खूप कठोर आहेस.. "ती हुंदका देऊन रडू लागली.

" राणी , रिल्याक्स..प्लीज, शांत हो आणि असे बोलू नकोस..तू आता रागात

बोलून जाशील. मग तुझा तुलाच त्रास होईल, मला सकाळी परत जायला हवे. "

ती हुंदका देऊन रडू लागली ..

" रजनी प्लीज.. शांत हो."

जा तू मला एकटीला टाकून.. जाशीलच तू !"

" रिल्याक्स.. काही गोष्टींना तुझा अणि माझाही इलाज नाही.मला तर जावेच लागेल ना "

आता तिच्या अश्रुंचा बंध फुटला.. ती हुंदका दाबत तिच्या रुमकडे निघून गेली.आख्खी रात्र विचारांच्या वादळामुळे झोपलो नाही. ती सुद्धा झोपली नसेलच. सकाळी

ती सहालाच आली. " एवढ्या लवकर उठलीस ? "

" हो अंघोळ पण झाली."

"मी पण करून घेतो !"

" घाई करू नकोस, तू कुठेही जाणार नाहीयस "

"आपलं काम तर करावच लागतं ना ? आणि थांबून तरी काय करू? इथे थांबलो

तर दोघांना खूप त्रास होणार, मग इथून जाणे कठीण होईल. आज आता थोडा त्रास

होईल, पण काळाच्या ओघात सगळं मागे पडेल. मला खूप आनंद होतोय , तू लग्न

करून अमेरिकेला जाशील. तुला माझी आठवण येईल की नाही कुणास ठाऊक !"

तीने माझ्या ओठांवर बोट ठेवलं. माझ्या छातीवर डोकं ठेवून ती पडून

राहीली.लहान मुलासारखी मुक्तपणे रडली.तिची सारी अगतिकता, हतबलता तिच्या

डोळ्यात दाटून अली.

" शांत हो राणी, "

" तुझा हा शब्द फार खोलवर रुतला आहेरे.."

तिचे अश्रू धुवांधार बरसले. ती शांत झाल्यावर मी म्हणालो

"राणी, मला आता जायला हवे "

" प्लीज नकोना जाऊस.."

" वेडी, '

" जा माझ्यासाठी काही चहा. कॉफी बनव !"

" नाही बनवत. आता हे सारे अधिकार कुठे राहिलेत मला ?"

" जा तू असाच!" ती मला घट्ट बिलगत म्हणाली.

मी हसलो. "तू ना निव्वळ बावळट आहेस."

" असू दे."

"तू जा आता ,मी अंघोळ उरकून घेतो !"

" रजनी" माईंनी हाक मारली तशी रजनी तिकडे गेली.

|" मी आलेच वेट.."

मी अंघोळ आटोपली. माझी ब्याग घेऊन हॉलमध्ये आलो.

" अरे बेटा, कुठे निघालास?"

" मला जायला हवे आता. ड्युटी .."

" रजनीने सांगितलं मला सगळं !""

म्हणजे, मला नाही कळलं "

" यु लव्ह इच् अदर.."

" माई प्लीज .. सुनिताचं

काही ऐकू नका. तिचं आयुष्य .."

" या डोळ्यांनी जग बघितलंय बेटा. रजनीसाठी त्यात अमाप प्रेम आहे. मला फक्त माझ्या मुलीचं सुख हवं !"

" तसं असेल तर,मग तीने सांगितलं ते विसरुन जा !आणि मला हसत निरोप दया."

रजनीने येऊन तिच्या मम्मीला मिठी मारली.." माई बघ ग हा चालला " रडवेल्या आवाजात

म्हणाली

" माई त्याला थांबव ना ग .."

माईंनी तिला थोपटले. ' शांत हो रज्जू , आपण ठरवतो त्यापूर्वीच काही निर्णय होऊन गेलेले असतात..."

" द्याटस् लाईक अ ग्रेट मम्मा ! माई, मला मस्त एक कप कॉफी हवीय, आणता ना ?"

" ओह शुअर बेटा, आणते बैस !"

" काही नकोग कॉफी त्याला , जायचं तर जाऊदेत "

" रजनी, असं बोलू नये बेटा, " नंतर त्या मला म्हणाल्या 'रजनीचं मनावर घेऊ नका, ती लहान बाळासारखी आहे '

" हो, मला माहित आहे '

' शेवटी तू तुझ्या मनाप्रमाणेच वागलास ना ? '

" खरं म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या मनाप्रमाणेच वागायला हवं , तुला एक सांगू, तू लकीच आहेस.'

' कशी काय '

' कारण तुला माझ्यासारखा मित्र मिळाला. माझी दोस्ती खूप कमी लोकांशीहोते , यात अहंकार वगैरे नाही , फ्याक्ट आहे..'

' आय नो..आय नो... ' तिचे डोळे भरून आले, ती मला घट्ट बिलगली आणि

तिने माझ्या कपाळाचं चुंबन घेतलं. तिच्या डोळ्यांतला पाऊस माझ्या छातीवर

मुक्तपणे कोसळला. मी तिला थोपटत राहिलो '

माई आल्या तशी ती बेडरूममध्ये गेली. माईंनी आणलेली कॉफी घेऊन मी निघालो.

' येतो मी माई .."

' तुझं मन खूप मोठं आहे, येत रहा. '

' नक्की येईन माई '

' रजनी '

' आता तिला आवाज नका देऊ माई .तिचा बांध फुटला की मी आवरू शकणार

नाही. मी येतो ..'

' बाय बेटा, गॉंड ब्लेस यु !'

मी परतलो . रजनीचे अनेक कॉल्स आले.मी घेतले नाहीत. मेसेजेस आले , मी

रिप्लाय दिला नाही. नंतर मी सीम बदलून टाकले. रूम सुद्धा बदलली.हॉस्पिटल

सोडून दिले आणि प्रक्तीस सुरु केली. हा काळ खूप कठीण होता, कदाचित

तिच्यासाठी सुद्धा असेल. पण काही गोष्टींना कालावर सोडून द्यावे लागते..

तिने माझा पत्ता कुठूनतरी मिळवला असणार. चार दिवसांपूर्वी माझ्या

रुमवर पत्रिका मिळाली. आतमध्ये लेटर

"प्रिय श्री ,

प्रेम मला कळलं की नाही, माहित नाही. मात्र तू माझ्यावर तुझ्या

सुखापेक्षा अधिक प्रेम करतोस, हे मला माहित आहे. तुझा जेवढा सहवास मला

लाभला, ते मी माझं भाग्य समजते. तुझ्या नुसत्या पावलांनीच माझं भाग्य

उजळलं... तुला गमवून मी काय मिळवलं ,मला माहित नाही. पण त्यागानेच

प्रेमाची परिभाषा कळते. आपण सोबत राहिलो असतो, तरी तू मला प्रिय नसतास,

एवढा आज आहेस ! माझ्या लग्नाला ये. मला आता कोसळण्याची भीती वाटत नाही.

सावरायला तू असशील ही खात्री आहे. माझ्यासाठी म्हणून ये .. तू यायलाच

हवंस..

तुझी होऊनही तुझी न होऊ शकलेली

रजनी "

कांत्याने सिगारेटचा दीर्घ झुरका घेतला

' काल तिथेच गेलो होतो. अगदी वेळेवर गेलो. गिफ्ट वगैरे दिलं. तिच्या

नवऱ्याशी ओळख करून देताना ती म्हणाली ' माझा जिवलग मित्र ..'

' हलो डॉक ' अगदी हसतमुख. मी निश्चिंत झालो. मी जायला वळणार एवढ्यात

तिने माझा हात घट्ट पकडला. '

" श्री ,प्लीज जाऊ नकोस ..थांब '

' रील्याक्स, मी आहे इथेच..'

तिथे भेटणाऱ्यांची गर्दी उसळली. हात आपोआप सुटून गेला. माईंना भेटलो

'नमस्ते बेटा, कसे आहात ? रजनी वाट पाहतेय तुमची. '

' मी भेटलो तिला '

' बेटा, तू पण एखादी छानशी मुलगी बघून लग्न करून टाक.'

मी हो म्हणालो . " नमस्ते मिसेस प्रधान ' म्हणत एक बाई तिथे आल्या

मी आपोआप बाजूला झालो.व्हिडीओ क्यामेरांच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या

प्रकाशाला शक्य तेवढा टाळत , रजनीला मनोमन शुभेच्छा देत ,मी त्या

गर्दीपासून दूर झालो. "

कांत्याची कहाणी संपली. शेवटचा पेग त्याने एका दमात संपवला.आम्ही

निघालो तेव्हा रात्री साडेबाराला हॉटेल गर्दीने फुलून आलं होतं.

- डॉ. सुनील अहिरराव
'सुभाषित', दिवाळी अंक २०१३ मध्ये प्रकाशित
(समाप्त )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान कथा.

एक जनरल निरिक्षण :- मकर राशीच्या लोकांना असा (म्हणजे गर्दी) अनुभव बरेचदा येतो Happy प्रेमाचं माहिती नाही.

मस्त मस्त मस्त........................ प्रतिसादाला शब्दच नाहीत
खुप छान कथा

मस्तच