लिंबाच्या सालींची मधुर चटणी..

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

हिरव्या मिरचीचे लोणचे केले कि त्यात लिंबाचा रस घालतो.हा लिंबाचा रस काढुन उरलेल्या सालींची ही मधुर चटणी ..अर्थात त्यात आणखी जिन्नसही वापरले आहेत.थोडीशी पुर्वतयारी करायची आहे.
limbachya salinche lonache.JPG
१० लिंबांची साले -एका सालीचे चार तुकडे ,अशी सर्व साले चिरुन घ्यावी.
४ लिंबाचा रस.
१० साखरी खारका.-या नेहमीच्या खारकेपेक्षा आकाराने लहान व चवीला गोड असतात.
१० जर्दाळु..
१/२ वाटी साखर.
२ टी स्पून जिरे भाजुन केलेली जाडसर पुड.
१ टी स्पून तिखट.
१ टी स्पून सपाट भरुन मीठ.
पाणी लागेल तसे..

क्रमवार पाककृती: 

खारीक व जर्दाळु [त्यातील बिया न काढता ,सबंध ]भिजतील इतके पाणी घालुन वेगवेगळे दोन बाऊल मधे भिजवा.आता या दोनही बाऊल मधे १-१ टेबलस्पून लिंबाचा रस व १-१ टी स्पून जिरेपुड मिक्स करा.खारीक व जरदाळु रात्रभर भिजत ठेवा.
भिजलेल्या खारीक व जर्दाळु तील बी सुरीच्या सहाय्याने काढुन त्याचे तुकडे करा.व पुन्हा अनुक्रमे त्याच बाऊल मधे ठेवा..थोडेफार पाणी उरले असेल तर त्यातच राहु द्या.
लिंबाच्या सालींचे तुकडे करुन लहान कूकर किंवा प्रेशर पॅन मधे ठेवा.सर्व साली छान भिजतील इतके पाणी घाला.पाणी थोडे जास्त झाले तरी चालेल.. आता प्रेशर लावुन गॅसवर ठेवुन ३ शिटया येवु द्या.कूकरचे प्रेशर गेले कि झाकण उघडुन आतील सालींचे मिश्रण मिक्सरच्या भांडयात काढुन घ्या.मिक्सरवर छान बारीक पेस्ट करुन घ्या.मिश्रण घट्ट वाटले तर थोडे पाणी घाला.आता मिक्सरच्या भांड्यातुन सहज ओतण्यासारखे मिश्रण तयार होईल.
आता पॅन मधे हे सालींचे वाटलेले मिश्रण ओतुन त्यात साखर घाला ढवळा.गॅसच्या मध्यम आचेवर शिजायला ठेवा.सतत ढवळा.साखर विरघळ्ल्याने आधी मिश्रण पातळ होईल आता त्यात उअरलेला लिंबाचा रस ,बाऊलमधील जिरे-लिंबुरसाच्या पाण्यासकट खारकां.चे तुकडे घाला.एक मिनिट शिजवा.आता त्यात जर्दाळु चे तुकडे घाला.तिखट-मीठ घाला.एक उकळी येवु द्या.तयार चटणी एका बाऊल /बाटलीत मधे काढुन घ्या.तयार चटणी बाऊल/बाटलीत सहज ओतता येईल अशीच पातळसर असावी.कारण थंड झाली कि दाटपणा येतो.
चटणी थंड झाली कि दोन दिवस तशीच ठेवावी.कारण लिंबाच्या सालींचा कडवटपणा त्यात असतो आणि दोन दिवसांनी कडवटपणा पूर्णपणे जातो व छान आंबटगोड ,मधुर चव येते.त्यानंतर खाता येते.

अधिक टिपा: 

तयार चटणी फ्रिज मधे ठेवल्यास टिकेल..
तिखट कमीजास्त घेता येईल.आवडत असल्यास भरडलेले मिरे,काळ्या मनुका [पाण्यात भिजवुन्]घालता येतील.
तयार चटणीत थोडेसे चवीपुरते सेंधव मीठ घालता येईल..

माहितीचा स्रोत: 
माळवी खासियत..

Submit to kanokani.com

वॉव. मस्त वाटतेय.

वॉव. लिंबाच्या साली टाकवत नाहीत. छान रेस्पी.
थँक यू.

ए....... सहीये ही चटणी सुलेखा.. मस्तच!

वॉव. लिंबाच्या साली टाकवत नाहीत.
छान रेस्पी.
थँक यू. >>>>>>>+111111

मस्त रेसेपी. फोटो बघून अगदी तोंपासु.

वॉव सुरेख

टेस्टी रेसिपी आहे. स्मित

मस्त!
चटणीचा रंग पण सही आहे!

लाळ गाळु रेसिपी आहे ही एकदम. फ्रीज मध्ये साधारण किती दिवस टिकेल.

जबरदस्त तोंपासु पाककृती आहे. फोटो एकदम कातिल.

भार्री आयडिया! तोंपासु!

छान आहे.
आपल्याकडची पातळ सालीची लिंबे वापरलीत ना ? आमच्याकडे फक्त जाड सालीचीच मिळतात. त्यामूळे तिथे आल्यावरच करेन.

मस्तच! फोटो बघून जीभ चाळवली.

दिनेशदा,
मी उसगावात असताना जाड सालीं वापरल्या होत्या..शिजवताना पाणी जास्त घातले...तिथे "कॉस्टको"मधे लिंबाचा रस [प्रेझर्वेटिव्ह न घातलेला]रेडिमेड मिळतो , घरात होता तो घातला.खारीक/जरदाळु नव्हते..काजु व बदाम वापरले..आमच्याकडे इडलिंबाचे झाड होते.आई त्याची चटणी खजुरा च्या फोडी घालुन करायची.
पिन्की ८०- तुमच्याकडे विजेचे संकट नसेल तर बरेच दिवस टिकते.फक्त जास्त प्रमाणात केली तर २ डब्यांत ठेवावी..

तोंपासु

वॉव.. स्लर्पी रेसिपी आहे ,सुलेखा.. स्मित

मस्त!!

मस्तच..

वाव.. वाचतानाच तोंडात लाळ जमा झाली अरेरे

लिंबाचे लोणचे माझे आवडते. मी लिंबांची सालेही एकदा मिठ लावून ठेवलेली, ती मुरल्यावर भारी लागत होती. चटणी केली तर सुंदरच लागेल.

हा.....
आता सुलेखाचा पोस्टीनंतर मी खजूर घालून ही चटणी करणार फिदीफिदी
खारका जर्दाळूंचं जरा अवघड वाटत होतं डोळा मारा

मंजुडी ,बेदाणे / किशमीश तयार चटणीत घातले तरी मस्त !!!

यापैकी काहीच घातले नाही तरी चालेल का? (आळस!)
सालांचा कडूपणा येत नाही ना?

मंजुडी, हो चालेल ..तयार चटणीची चव घेवुन पहा आंबट कमी लागत असेल तर त्यात थोडा लिंबुरस घाल.पहिले दोन दिवस खुपच कडु लागते ..त्यानंतर कडुपणा आपोआप कमी होतो ....

मला एकूणच वर्णन वाचून माझी एक आत्याआजी लिंबाचं २५ शिट्यांचं लोणचं करायची, त्याची आठवण झाली. आता आई/ मावशी/ माम्यांपैकी कोणालातरी पकडून हे लोणचं आठवतंय का विचारायचंय..

हे लोणचं खाणारा पंचवीस शिट्ट्या वाजवतो म्हणून लोणच्याचं हे असं नाव, असं आमचे मामा लोकं आम्हाला सांगायचे. आता खरोखर लोणचं करता येऊ लागल्यावर खरंखोटं काय ते बघायला हवंय.. डोळा मारा

आता आई/ मावशी/ माम्यांपैकी कोणालातरी पकडून हे लोणचं आठवतंय का विचारायचंय..

माबोवरच वाचलीय ह्या २५ शिट्ट्यांच्या लोणच्याची क्रूती.

मग दे की लिंक...

मन्जूडी, ही घे लिन्क
http://www.maayboli.com/node/39810

क्लास रेसीपी आहे सुलेखा. आम्ही घरी नुस्त्या लिंबाच्या सालीच लोणच करतो. तेच इतक सुरेख लागत. यात तर ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत. जबरी लागत असणार आहे.

>> मला एकूणच वर्णन वाचून माझी एक आत्याआजी लिंबाचं २५ शिट्यांचं लोणचं करायची

स्मित हाहा

फार पुर्वी टिव्हीवर गजरामध्ये १६ शिट्यांच्या लिंबाच्या लोणच्याबद्दल ऐकल्याचं आठवतं .. स्मित

आई गं भयंकर तोंपासू रेसिपी आहे! आत्ता चव बघावीशी वाटली!