सांज बिचारी...

Submitted by मुग्धमानसी on 3 December, 2013 - 01:40

एकदा असंच सहजच...
पाय मोकळे करायला
निघाले मी संध्याकाळी
माझ्याचसोबत फिरायला.

हात धरला घट्ट तशी
वैतागले मी माझ्याचवर
’लहान नाही राहिले आता...
सोड हात मोकळं कर!’

दिला सोडूनी हात तरी पण
मीही जराशी काळजीतच
पुन्हा उधळली सैरभैर तर?
हरवलीच जर सांजेतच?

समुद्र ऐसा लुळावल्यागत
आणि मी अशी खुळावल्यागत
किनार्‍यावरी अंथरते मी
स्वप्न जुनेरे उलगडल्यागत

बघत राहते मीच मला मग
क्षितीजापाsssर उडताना
मणभर जडशीळ पाऊल माझे
वाळूत खोल खोल रूतताना

वळून पाह गे एकदातरी
परतून येणे नसे जरी
तुझा पिंजरा दहा दिशांचा
माझ्या भिंती चार घरी...

माझ्यातुन मी अशी कितीदा
उडून जाते होऊन अत्तर
एकेदिवशी उरेल येथे
कुपी रिकामी नुसती पोकळ

स्वप्न जुनेरे घडी घालुनी
घट्ट पकडते छातीशी
उरलेली मी एकटीच मग
पुन्हा परतते घरट्याशी

बरेचदा आताशा खुपदा
दिवस रांगडा सरताना
सांज बिचारी मला टाळते
माझ्या घरी उजळताना!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुन्दर रचना....

<<स्वप्न जुनेरे घडी घालुनी
घट्ट पकडते छातीशी
उरलेली मी एकटीच मग
पुन्हा परतते घरट्याशी

बरेचदा आताशा खुपदा
दिवस रांगडा सरताना
सांज बिचारी मला टाळते
माझ्या घरी उजळताना!>>

छान....

माझ्यातुन मी अशी कितीदा
उडून जाते होऊन अत्तर
एकेदिवशी उरेल येथे
कुपी रिकामी नुसती पोकळ >>>>>>> आहा

मानसी ...तुझ्या कवितांना दाद द्यायला शब्द कमी पडतात खरंच

मनात खूप खोलपर्यंत पोचणारी रचना

माझ्यातुन मी अशी कितीदा
उडून जाते होऊन अत्तर
एकेदिवशी उरेल येथे
कुपी रिकामी नुसती पोकळ

हे तर प्रचंड आवडलेलं कडवं!

Pages