सुख-दु:ख संत महात्म्यांचे .......

Submitted by पुरंदरे शशांक on 2 December, 2013 - 01:29

सुख-दु:ख संत महात्म्यांचे .......

श्रीनिवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव व मुक्ताई या चार भावंडांनी त्यांच्या माता-पितरांच्या पश्चात कसे दिवस काढले असतील याची आपण याकाळात कल्पनाही करु शकत नाही !

त्यांच्या पिताश्रींनी (विठ्ठलपंत) संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमात टाकलेले पाऊल - हा त्याकाळातील त्या समाजाने ठरवलेला एक अक्षम्य अपराध - ज्याला प्रथम बळी पडले ते विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई. जेव्हा समाजाने त्यांना वाळित टाकले (ग्रामण्य) ते त्या दोघांनी सहन करुन आळंदी गावाबाहेर रहाणे पसंत केले. त्यावेळेसचा समाजरोष पूर्णपणे स्वतःवर झेलून त्यांनी या चार मुलांचे जे संगोपन केले ते मोठे आश्चर्यच.

जेव्हा मुलांची वये व्रतबंधनायोग्य झाली तेव्हा त्याकाळातील चालीरीती लक्षात घेता त्यांनी आळंदीच्या ब्राह्मणांपुढे तो विषय मांडला. आधीच संतप्त असलेल्या त्या ब्राह्मणांनी त्यांना देहांताची शिक्षा सुनावली. विठ्ठलपंत व त्यांच्यामागोमाग चालणार्‍या रुक्मिणीबाई यांनी ती विनातक्रार स्वीकारली. त्यावेळेस त्यांनी आपले ह्रदय किती कठोर केले असेल हे त्यांचे तेच जाणोत.

लहानपणीच ही चारी भावंडे निराधार झाली. निवृत्ती हे मुळातच विरागी असल्याने व सोपाना व मुक्ताई हे खूपच लहान असल्याने सर्वांची जबाबदारी ज्ञानदेवांवर आली - जी त्यांनी समर्थपणे उचलली. अतिशय तरल कविमन लाभलेले माउली कशा प्रकारे या आपल्या भावंडांना सांभाळत असतील, कसे त्या समाजरोषाला तोंड देत असतील याची कुठेही नोंद नाही - ते केवळ आपण कल्पनेनेच जाणायचे......

हे सगळे आठवायचे कारण म्हणजे श्रीमाऊलींच्या संजीवन समाधी सोहोळ्याचे श्री नामदेवरायांनी केलेले अतिशय भावपूर्ण वर्णन. त्यातलेच हे काही अभंग ....

निवृत्तिदेव म्हणे करितां समाधान । कांही केल्या मन राहात नाहीं ॥१॥
बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट । ओघ बारा वाट मुरडताती ॥२॥
बांधल्या पेंढीच्या सुटलासे आळा । तृण रानोमाळा पांगलेसे ॥३॥
हरिणीविण खोपी पडियेली वोस । दशदिशा पाडसें भ्रमताती ॥४॥
मायबापें आम्हां त्यागियेलें जेव्हां । ऐसें संकट तेव्हां जालें नाहीं ॥५॥
नामा म्हणे देवा पेटला हुताशन । करा समाधान निवृत्तीचें ॥६॥

निवृत्तीनें बाहेर आणिले गोपाळ । घातियेली शिळा समाधीसी ॥१॥
सोपान मुक्ताई सांडिती शरीरा । म्हणती धरा धरा निवृत्तीसी ॥२॥
आणिकांचीं तेथेम उद्विग्न तीं मनें । घालिताती सुमनें समाधीसी ॥३॥
नामदेवें भावें केली असे पूजा । बापा ज्ञानराजा पुण्यपुरुषा ॥४॥

श्री निवृत्तीनाथ हे मुळात अतिशय विरक्त वृत्तीचे व पुढे आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे स्थितप्रज्ञता लाभलेले पूर्णपुरुष होते. अशा सुखदु:खातीत निवृत्तीनाथांच्या मनाची अवस्था या काळी (संजीवनसमाधी काळी) काय झालेली होती ते पहिल्या अभंगात पहायला मिळते. कारण स्थितप्रज्ञता लाभलेली असली तरी मुळात ते एक मनुष्य होते. एक संवेदनशील मन त्यांच्याठायी होते.

आपला धाकटा भाऊ व अत्यंत आवडता शिष्य आता देहाने आपल्याला दिसणार नाही यामुळे ते टाहो फोडताहेत - एखाद्या तळ्याचा बांध जर फुटला तर त्यातील पाणी कसे बारा वाटा निघून जाते, एखादी गवताची पेंढी सुटल्यावर त्यातील गवत जसे रानोमाळ पांगते तशी त्यांच्या मनाची विकल अवस्था झाली आहे. त्यांचे मन इतके पेटून उठले आहे की नामदेव प्रत्यक्ष भगवंताला आवाहन करुन विनवताहेत की याचे तुम्हीच समाधान करा.

अशाच प्रकारचा अनावर शोक सोपानदेव आणि मुक्ताईलाही झालेला दुसर्‍या अभंगात दिसतो. (ही दोन्ही भावंडेही आत्मानुभवी अशी होती). दु:खाने व्याकुळ होऊन आपली शरीरे जमिनीवर पडताहेत का याचेही भान त्यांना नाही - हे पाहून नामदेवराय कळवळून सांगताहेत त्यांना धरा, सांभाळा .....

एवढेच काय स्वतः श्री नामदेवराय, ज्यांना श्रीविठ्ठलाचे सतत सान्निध्य लाभलेले असे जे संतश्रेष्ठ, तेदेखील ज्ञानदेवांच्या विरहाने अतिव्याकुळ होऊन विठुरायाला विनवताहेत ...
तंव नावेक श्रीहरी । तटस्थ घटिका चार्‍ही ।
ध्यान धरुनी अंतरीं । निश्चळ राहिला ॥१॥
जयजयशब्द नामा बोभाये । केशवा त्राहे त्राहे ।
मी व्याकुळ होत आहें । ज्ञानदेवाकारणें ॥२॥
नारायण त्राहे त्राहे । कृपादृष्टी तूं रे पाहे ।
मी व्याकुळ होत आहें । ज्ञानदेवाकारणें ॥३॥
तुझेनि दर्शनें । ज्ञानाचेनि अवलोकनें ।
मज पंढरीस असणें । तुझे चरणी गा विठठला ॥४॥
आतां मज तूं सांभाळी । ज्ञानदेवेंवीण सदाकाळीं ।
मज न कंठे भूमंडळी । भानुसहित वर्ततां ॥५॥
तूं माझी जनक जननी । परि ज्ञानदेवेंविण मेदिनी ।
शून्य वाटे हे धरणी । जैसे मत्स्य जीवनेंविण ॥६॥
तूं रक्षिता सर्व जीवांसी । तरी कां दुःख दिधलें आम्हांसी ।
तूं जवळी असतां ह्रषिकेशी । ऐसी दशा हे प्राप्त ॥७॥
नामा खेदें क्षीण जाला जीवें । तंव नेत्र उघडिले देवें ।
आलिंगला केशवें । चार्‍ही भुजा पसरुनी ॥८॥

अशा प्रकारचा हा एक विलक्षण आर्त विरहक्षण ज्याला आपण "संजीवन समाधी-सोहोळा" म्हणून स्वीकरतो तो प्रत्यक्ष बघणार्‍या श्रीनामदेवरायांनी अतिशय ह्रद्यप्रकारे विविध अभंगातून वर्णन केलेला आहे. ते वाचताना आपणही अगदी सहजच भावविव्हल होऊन जातो.

या श्रीनामदेवरायांनी हे अभंग लिहिताना जी अजून एक उंची गाठलीये ती पाहूया -

नामयाचा धरुनि हात । क्षणक्षणा पंढरिनाथ ।
ज्ञानदेवातें आठवित । कंठ सद्‌गदित करुनियां ॥१॥
उद्धवासी म्हणे पांडुरंग । या सज्जनाचा न व्हावा वियोग ।
हें ह्रदय होतसे दोन भाग । जाणा अंतरंग तुम्ही माझें ॥२॥
त्याविण गोड मज न वाटे । ऐसे जिवलग कैचे भेटे ।
जे मनींचा वियोग दुःख तुटे । समाधान वाटे ह्रदयामाजीं ॥३॥
ज्ञानदेवा ऐसो निधान । नाहीं धुंडितां त्रिभुवन ।
न संपडे न देखो जाण । तुझी आणि उद्धवा ॥४॥
धन्य धन्य हे तिघेजण । मुक्ताताई मुक्तरुपें पूर्ण ।
हीं उद्धरिलें त्रिभुवन । भवदुःख दारुण नासीलें ॥५॥
याचे निपडी पाडे । उपमेसी दीसे थोडे ।
परी ज्ञानदेवा ऐसें रत्न जोडे । हें न घडे कल्पांतीं ॥६॥
माझे जिवीचें गुह्यगुज । हें उद्धवा सांगितलें तुज ।
कां नामदेव जाणे सहज । आणि सकळ संत सज्जन ॥७॥

प्रत्यक्ष पंढरीनाथही या भक्तवियोगामुळे विव्हल झाल्याचे वर्णन जेव्हा नामदेवराय करताहेत तिथे मग मनुष्यदेह धारण केलेला इतर सामान्य जीवाचा काय पाड ??

बर्‍याच जणांचा असा गैरसमज झालेला असतो की संत हे सुखदु:खातीत, मानापमानापलिकडले असतात - म्हणजे जणू त्यांच्या भावना पार बोथट झालेल्या असतात. हे पूर्णपणे चुकीचे आहे. सर्वसामान्यांची देहाची, मनाची जी काही सुख -दु:खे असतात ती संतांनाही भोगावी लागतातच. समोर अनायासे पंचपक्वांनाचे ताट आले तर ते काय असे म्हणतील का - "अरेरे, काय हे माझ्या नशिबी आलंय आज !!" तेही आनंदाने जेवतीलच की, फक्त फरक इतकाच की पुन्हा पुन्हा हे असे स्वादिष्ट भोजन मिळावे असे त्यांच्या मनात कदापिही येणार नाही - त्या विचारात ते अज्जिबात गुंतून पडणार नाहीत.

इतर सुखादु:खाच्याबाबतही त्यांचे असेच असते - त्याक्षणाला त्यांना सुखदु:ख होणारच पण त्याची आठवण पुढच्या काही क्षणांनंतर तितकी तीव्र असणार नाही जितकी सर्वसामान्यांची असते.

पं. जवाहरलाल नेहरु मरण पावल्यावर सर्वपल्ली राधाकृष्णन हे लहान मुलासारखे धाय मोकलून रडले, तेव्हा कोणीतरी त्यांना म्हणाले - अहो, तुम्ही तर मोठे तत्त्वज्ञ, आत्म्याचे अमरत्व आम्हाला शिकवणारे.... आणि तुम्ही काय असे रडताय ???
त्यावर राधाकृष्णन उत्तरले - "मी काही दगड-विटांचा बनलेला नाहीये...मी जिवंत माणूस आहे - हाडामांसाचा, भावना असलेला...."

---------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांक, खूप सुंदर लिहिलं आहेस. ह्या संतरचना आपल्याला अजूनही कश्या समजावत असतात ह्याचं उत्तम उदाहरण आहे.

खरच छान पद्धतीने समजवलत शशांकजी. तुमची या मागची क़ळकळ समजली.
आम्हाला आतापर्यंत इतिहासाच्या पुस्तकावरुन या चार भावंडांच्या आईवडीलांना समाजाने वाळीत टाकले एवढच कळलं होतं. 'संन्याशांची मुले' असं या भावंडांना लोक हिणवत असत हे ही तितक्याच मख्खपणे आम्ही वाचत असु. अर्थात तेव्हा ते कळण्याचं वयही नव्हतं आणि आताही ज्ञानेश्वरी व्यतिरिक्त इतकं खोलात जात नव्हतो. आता हे कळतय.